“असे कितीही ‘कोरोना’ आले तरी आम्ही आमच्या बहिणीला उपाशी राहू देणार नाही, त्यासाठी आम्ही आमची धान्य बँक तयार करणार.”
“आमची संघटना आमच्यासाठी माहेर वाटते”
“ आमची संघटना ही आम्हाला बोलण्यासाठी आमच्या हक्काची जागा आहे”
हे उद्गार आहेत मराठवाड्यातल्या गावोगावच्या एकल महिलांचे आणि त्या ज्या संघटनेविषयी इतक्या आपुलकीने बोलताहेत ; ती संघटना आहे त्यांची स्वत:ची – एकल महिला संघटना!
भारतीय समाजात पुरुषाशिवाय राहणाऱ्या महिलांना स्वतंत्र जीवन जगण्याचा पर्याय उपलब्ध नाही. विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता महिलांना बरेचदा कुटुंबावरचे ओझे मानले जाते. कुटुंबातही बर्याचदा त्यांचे शोषण केले जाते आणि घर सोडल्यास अनोळखी लोकांकडून त्रास होण्याची शक्यता असते. अशा महिलांकडे नेहमी मदतीसाठी याचना करणाऱ्या व्यक्ती म्हणून तुच्छतेने पाहिले जाते. पण मराठवाड्यातल्या एकल महिला संघटनेतील महिलांनी लॉकडाउनच्या काळात गावोगावच्या गरीब लोकांना सहाय्य केले आहे. ही जादू कशी घडली, ह्या एकल महिलांमध्ये ही ताकद आणि प्रेरणा कुठून आली – ते समजून घेण्यासारखे आहे.
जेव्हा सरकारने मार्च मध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सुरुवातीला तर लॉकडाऊन म्हणजे काय हेदेखील अनेकजणीना समजले नव्हते. लॉकडाऊनच्या आधी सकाळी उठून महिला घरातील सर्व कामे केल्यावर शिल्लक राहिलेला वेळ आपल्या घराच्या शेजारी असलेल्या इतर महिला गावातील वस्ती मधील मैत्रिणी यांच्या सोबत थोड्या का होईना गप्पा, सुख दुख: याची चर्चा करण्यात वेळ घालत होते. मुलांच्या भविष्या संदर्भात चिंता व्यक्त करणे आपल्या रोजच्या जगण्यातील शेअरिंग करण्याचा संदर्भात वेळ जात होता. परंतु लॉकडाऊन झालं आणि सर्व प्रकिया बंद झाली. सर्वांना सांगण्यात आलं एकमेकांच्या पासून लांब रहा, गावात कुठेही फिरण्यास बंदी,त्यामुळे कुटुंबातील सर्व सभासद आपल्या घरात बसून राहिली.सर्वजण सतत घरात असल्यामुळे वादविवाद तयार झाले आणि त्यामधून होणारी हिंसा देखील आपोआप आली. कितीही त्रास झाला तरी सांगणार कोणाला? हा प्रश्न समोर महिलांच्या आला. काही काळाने सरकारने जाहीर केलं शेतीच्या कामाला परवानगी आहे. त्यामुळे घरात बसलेले मंडळी कामाच्या निमित्ताने शेतात जायला लागली. परंतु मेहनतीचे कामे करतांना तोंडाला मास्क लावणे, हात स्वच्छ करणे हे अशक्य व्हायला लागलं. त्यामध्ये रोज बातम्या मध्ये सोशलमिडिया मधून रुग्णाचे आकडे ऐकायला मिळायला लागले. त्यामुळे मनात भीती खूप वाढली. महिलांच्या मध्ये उलट सुलट चर्चा सुरु झाली. जी काही माहिती मिळत होती ती शास्रीय माहिती नव्हती. लोक एकमेकांकडे संशयीवृत्तीने पाहू लागले आणि अंधश्रद्धा वाढण्यास मात्र सुरुवात झाली.
महिला कार्यकर्त्या देखील सुरुवातीला गांगरून गेल्या.गावातील महिलांचा प्रश्न तर अजून बिकट झाला. ज्या महिलांवर कुटुंबाची जबाबदारी होती, त्यांच्या समोर तर अनेक प्रश्न ‘आ’ वासून उभे राहिले. टेन्शन जास्त वाढत चाललं, कुटुंबाच्या गरजा भागवायच्या कश्या? मुलांच्या शिक्षणाचे काय? लोकांनी रात्ररात्र काळजीत जागून काढल्या. अश्या सर्व परस्थिती मध्ये तर एकल महिला संघटनेच्या सभासदांवर मोठे संकट कोसळले. गेल्या पाच वर्षांपासून CORO च्या प्रयत्नातून एकल महिलांच्या प्रश्नावर काम सुरु आहे. गावात संघटनेची महिला मंडळे आहेत आणि तालुका पातळीवर समित्या आहेत. एकल महिलांना त्यांच्या प्रश्नावर संघटीत करणे आणि त्यांच्या प्रश्नाच्या भोवती संघटना बांधणी करण्याच्या कामातून आज साधारपणे सोळा हजार महिलांची संघटीत ताकत निर्माण झाली आहे. हे काम ३० महिलांची कोअरटीम विभागीय पातळीवर करते. या टीमने ठरवून टाकले की आता आपल्यालाच पुढाकार घ्यायला हवा. त्यांनी आपल्या मोबाईलवरून “कॉन्फरन्स कॉल” चे तंत्र शिकून घेतले आणि एकमेकीना मात्र धीर देण्यास सुरुवात केली – ‘आपण सर्व सोबत आहोत आणि काही अडचण आली तर फोनवरून संपर्क करू या...!’ असे ठरवले. गावातल्या महिलांवर याचा चांगला परिणाम दिसून येऊ लागला. नातेवाईकांच्या कडून धीर मिळण्याच्या अगोदर संघटनेतील मैत्रिणीनी त्यांना फोन करून धीर दिला. तेव्हा ‘या जगात आपलं कोणीतरी आहे’ याची त्यांना खात्री पटली. एकल महिला संघटनेच्या एक कार्यकर्त्या कौशल्या बावणे यांनी आपल्या ओळखीच्या लोकांच्या मदतीने गावातून शेतकरी कुटुंबातील महिलांच्याकडून भाकरी जमा करून बीड शहरात अत्यंत गरजवंत महिलांना एका दिवशी ६०० भाकरी मिळवून दिल्या. पण भाकरी देण्याच्या कामात काही आव्हाने येत होती. जर एखाद्या कुटुंबाला एक दिवस भाकरी मिळाली तरी ती दुसऱ्या दिवशी शिळी होते आणि अन्न जपून वापरण्यावर मर्यादा येतात. हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्यांच्या संघटनेतील मैत्रिणी, सहकारी यांच्यासोबत चर्चा केली. आपण भाकरी जमा करून मदत करण्याच्या ऐवजी धान्य जमा करून त्याचे कीट करून वाटप केले तर किमान आठवडा भराची मदत होऊ शकेल, हे लक्षात आले. आपल्या संघटनेतील ज्यांच्याकडे शेती आणि घरात धान्य आहे अश्या सभासदांशी बोलायला सुरुवात केली. त्यांनी बीड तालुक्यातील ढेकणमोहा या गावात महिलांच्या बैठकीत जाण्याच्या अगोदर महिलांच्या सोबत टेलिफोन वरून संवाद केला. त्यामुळे कौशल्याताई मात्र गावात जाण्याच्या अगोदर महिलांनी २०० किलो धान्य जमा करून ठेवले. या सर्वांच्या मधून महिलांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांनी ते धान्य गरजू महिलांची यादी तयार करून त्यांना वाटप केले.
आतापर्यंत व्यक्तिगत पातळीवर सुरु असलेले हे काम आता सामुहिक व्हायला सुरुवात झाली. एकल महिला संघटनेच्या ज्या इतर लीडर्स आपल्या संघटनेच्या सभासदांच्या सोबत फोनवरून संवाद करत होत्या त्यांनीही आपआपल्या विभागात कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून बैठका घेऊन महिलामध्ये चर्चा घडवून आणली. गावातल्या महिलामंडळाच्या पुढाकारातून धान्य जमा करून गावातील वंचित घटकातील कुटुंबाना असेच धान्यवाटप केले. साधारणपणे २० दिवस ही मोहीम सुरु ठेवली त्यामधून 4,509 किलो धान्य जमा झाले. ही प्रकिया ११ तालुक्यातील ४१ गावातून होतांना पहावयास मिळाली. कुठेही कोणीही न सांगता एकल महिलांनीच पुढाकार घेऊन ह्या मोहिमेचे नेतृत्व केलं. या महिलांचे पाहून गावात ज्यांच्याकडे धान्य आहे असे लोकप्रतिनिधी, शिक्षक अशा व्यक्तींनी देखील त्यांच्या परिसरातील गरजवंत कुटुंबाला “फूड कीट” वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला. ह्या महिलांकडे गावात सुरुवातीला “घेणारे” म्हणून पाहाणारे आता मात्र “लोकांना मदत मिळवून देणारे” म्हणून पाहायला लागले. त्यामधून काही सकारात्मक गोष्टी घडल्या तश्या काही नकारात्मक गोष्टी देखील झाल्या. उदा. संघटनेच्या लीडर्सच्या कामाकडे पाहून प्रशासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था आणि काही दानशूर व्यक्तीनी चांगला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. मदत करण्यास पुढाकार घेतला. संघटनेच्या कामाची दखल घ्यायला सुरुवात झाली. पण काही ठिकाणी नकारात्मक प्रतिसाद तयार झाला. एकल महिला संघटनेच्या काम करणाऱ्या कार्यकर्त्या श्रीमंत नव्हत्या उलट त्यांनादेखील लॉकडाऊनचा कालावधी वाढत असतांना मदतीची गरज होती. पण त्यांनी मदत करतांना आपल्यापेक्षा गरजवंत कुटुंब शोधली. स्थानिक पातळीवरच्या लोकांकडून मदत मिळवून दिली. तरीही जेव्हा स्थानिक लोकप्रतिनिधीनी मदतकार्य सुरु केलं तेव्हा- “यांना मदतीची आवश्यकता नाही, त्या श्रीमंत आहेत” असे काही लोक बोलू लागले. पण महिलांनी एक एक पाउल पुढे टाकायला सुरुवात केली आहे. भविष्यात अशी वेळ आली तर पुन्हा तुटवडा निर्माण होऊ नये, म्हणून “धान्य बँक” तयार करायचा विचार करत आहेत. तर काही ठिकाणी महिलांनी सामुहिक उद्योग व्यवसाय करण्याचा विचार करून त्यांची प्राथमिक सुरुवात केली आहे.