
“ गर्भात मुलगा किंवा मुलगी कसे बनतात, हे मुलां-मुलींना कसे समजावून सांगाल? आणि तसे सांगणे का आवश्यक आहे?”
यावर ते उलट मलाच म्हणतात, “त्यांना जीन्सच्या जोड्या वगैरे कसे लक्षात येणार?” मला एक माहीत होते की, वैद्यकीय विद्यार्थी शरीरशास्त्र (Physiology), शरीर रचनाशास्त्र (Anatomy) शिकतात पण, लैंगिकतेबद्दल कुठंच शिकत नाहीत. आजारपणाची सामाजिक कारणे व प्रतिबंध यावर आमचा ‘रोग प्रतिबंध आणि सामाजिक वैद्यक विभाग’ काम करतो. वस्ती पातळीवर, शाळां-कॉलेजांमध्ये लोकांना आरोग्य, रोग, औषधे आणि रोग प्रतिबंध हा विषय सोपा करून कसा सांगायचा(Health Education) हे पण आमच्या विभागाचे काम आहे.
मी तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना विचारते, “मुलां-मुलींना लैंगिकता शिक्षण कोणत्या वयात दिले पाहिजे?”
तर अगदी ठासून उत्तर येतं - “टीनएजमध्ये”
“पण नेमकं केव्हा? टीनएज तर १३ ते १९ वर्षापर्यंत आहे. यापेक्षा आधी नाही का देता येणार? म्हणजे दहाव्या वर्षी ?नवव्या वर्षी ?पाचव्या वर्षी ? ” - माझा प्रश्न. मग वर्गात एकदम जहाल शांतता पसरते ! जणू काय, हे काय काहीतरीच - असं त्यांना वाटतं! पण खरं तर आपल्याला हवं असलं किंवा नसलं तरी लैंगिकता शिक्षणाची सुरुवात बाळाच्या जन्माबरोबर होते! आपल्या सर्वांना माहीत आहे की बाई बाळंतीण होते, तेव्हा पहिला प्रश्न काय विचारते? श्रांत चेहऱ्याने, तोंडातून आवाज फुटायच्या आधी भुवया उंचावून ती डोळ्यानेच विचारते ‘काय झालं’? “मुलगा” हे शब्द ऐकायला कान टवकारून विचारलेला प्रश्न! कारण तिला वाटतं की मुलगा झाला तर आपल्याला उंच मानेने घरात जाता येईल. कौटुंबिक हिंसाचारातून तात्पुरती का होईना सुटका होईल, नाहीतर टोमणे आणि नालस्तीला सामोरे जावे लागेल. म्हणजे ते बाळ मुलगा म्हणून वाजतगाजत घरी येईल की मुलगी म्हणून गुपचूप पदराखालून येईल, पेढे वाटले जातील की नुसते नाक उडवले जाईल - हे सगळं आई आणि परिवारातील लोक बाळाला आपल्या वागण्यातून,कृतीतून शिकवतात. हेदेखील लैंगिकता शिक्षणच आहे! याचा अर्थच लैंगिकता शिक्षणाची सुरुवात जन्मापासून होते.
वैद्यकीय विद्यार्थ्यांना विचारलं की ‘तुमच्यापैकी कुणाला वयात येताना कोणते बदल होतात व ते का याबद्दल माहिती मिळाली होती का?’ तर बऱ्याच वेळानंतर एकदोन हात उठतात, ते सगळे मुलींचे हात असतात.
“मला आईने सगळंच उघडपणे सांगितले, कुठला पॅड वापरायचा आणि का ते पण सांगितले.”
“पण रक्तस्त्राव कुठून होतो, रक्त अशुद्ध नसतं वगैरे सांगितलं होतं का? बरं, तुमच्या पालकांनी गुड आणि बॅड टच (Good & Bad Touch) बद्दल माहिती दिली असणार ना?”
यावर सगळे मुलगे मुलींकडे पाहू लागले, जणू Bad Touch हा केवळ मुलींनाच होतो! खरंतर लहान मुली आणि मुलगे दोघांचेही लैंगिक शोषण सारख्याच प्रमाणात असू शकते. काही वेळा मुलग्यांचे शोषण फार काळपर्यंत लक्षातही येत नाही. मुली वयात यायला लागल्यावर तू असे कपडे नको घालू, इकडे उभी राहू नको, मुलांशी बोलू नको, अंगचटीस जाऊ नको असे सल्ले पालक मुलींना देतात. पण मुलगे लहान असताना कोणालाही तुझ्या अंगांना हात लावू देऊ नकोस, कुणीही घरात किंवा शाळेत तसा प्रयत्न केला तर न घाबरता सांग - असे आपण त्यांना बजावत नाही. शिवाय काही वेळा मुलांनी कुणाची तक्रार करण्याचा प्रयत्न केला तरी पालकांचा विश्वास बसतोच असे नाही. त्याही पुढे जाऊन त्यांना काही करता येतेच असे नाही. इथे मी दोन उदाहरणे देते, वस्ती आरोग्य केंद्रात कार्यरत असताना एक जरीकामगार महिला आपल्या पाच वर्षाच्या मुलाला घेऊन आमच्या वैद्यकीय समाजसेविकेकडे आली, तिचा ‘मुलगा तिला मारतो आणि सकाळी ती कामाला जाऊ लागली की शिव्या देतो.’ त्या महिलेला बाहेर थांबवून समाजसेविकेने त्याच्याशी थोडं बोलायचं ठरवलं. त्याने सांगितलं - “आई कामावर गेल्यावर माझा मामा मला सतत उचलून घेतो आणि मला खाली सोडतच नाही. मला तोच भरवतो, बाहेर खेळायला जाऊ देत नाही मी माझ्या आईला सांगितले पण ती माझं ऐकत नाही.” चेहऱ्यावर अत्यंत राग व रुसवा. त्या मुलाला बाहेर काही खाऊ देऊन बसवले आणि त्याच्या आईला आत बोलावून विचारले - “तुझ्या मुलाने तुला काही तक्रार केली का ?”
ती बाई हमसून रडत होती. ती म्हणाली, “एकदा अंघोळ घालताना त्याची पप्पुडी(पेनिस) सुजली होती आणि माझ्या मुलाने मला सांगितले की मामा दिवसभर पप्पुडीला चिमटीत पकडून ठेवतो आणि रडेपर्यंत सोडत नाही. मी माझ्या अम्मीला तक्रार केली, पण ती म्हणते, ‘माझा मुलगा तुझ्या कारट्याला दिवसभर संभाळतो, त्याचे लाड करतो. तलाकनंतर तुला तुझ्या मुलाबरोबर इथं राहू दिलं, तर तू माझ्याच मुलावर आळ घेतेस, जायचं तर दार खुलं आहे’ मॅडम मी कुठं जाऊ? कामावर नाही गेले तर काय खाऊ?” तिच्याकडे मार्ग नव्हता आणि आमच्याकडे उत्तर नव्हते.
दुसरी केस BMC च्या शाळेतली. मुंबईत BMC च्या १२०० शाळा आहेत. अगदी गरिबातली गरीब मुले या शाळांत येतात, त्यात मुलींची संख्या दुप्पट असते, कारण गरीब माणूस मुलीला BMC मराठी/हिंदीत पाठवून मुलग्याला खाजगी इंग्लिश शाळेमध्ये पाठवतात. बृहन्मुंबई महानगर पालिकेने २००३-४ मध्येच एक अत्यंत पुरोगामी पाऊल उचलले होते आणि प्रत्येक झोनमध्ये एक अशा सात अंतर्गत तक्रार समित्या स्थापन केल्या. एकदा समितीपुढे शाळेतल्या एका अत्यंत हुशार मुलीची केस आली. तिला आपण वर्षा म्हणू. नुकतीच वयात आलेली ही मुलगी घरातली सर्व कामे करून कोणत्याही क्लासला न जाता गणितात ९०% मार्क मिळवत होती. एक दिवस बातमी पेपरला वाचली की तिच्या शाळेतील एका शिक्षकाच्या तोंडाला काळे फासलेले कारण काही मुलांनी एका रविवारी त्या शिक्षकाला वर्षाबरोबर स्टेशनच्या बेंचवर बसलेलं पाहिलं होतं. पेपरमध्ये बातमी म्हटल्यावर ताबडतोब केस स्त्री संसाधन केंद्राला आली. मुलीला आम्ही भेटायला गेलो तर तिच्या पालकांनी तिला बिहारला आजोळी पाठवलेलं. त्या शिक्षकाला बोलावलं तर तो अगदी साळसूदपणे म्हणाला, “ती हुशार होती म्हणून मी तिला गणित इंग्लिशसाठी मदत करीन म्हटले. ती फार चाप्टर निघाली. ती मला नेहमी इशारे करायची. त्या दिवशी फोन करून मला म्हणाली की ‘तुम्ही स्टेशनवर भेटायला नाही आला तर मी जीव देईन’, म्हणून मी आलो - तर ती माझा हातच धरून बसली. मुलांनी आम्हाला स्टेशनवर बघितले आणि दुसऱ्या दिवशी लोकांनी येऊन मला बडवले व तोंड काळे केले.मला सस्पेंड केलंय. मी कोर्टात जाईन. मी लग्न झालेला गृहस्थ आहे, मला एक तान्ही मुलगी आहे. ती पोरगी चालू आहे!” तिथे ती मुलगी तर उपस्थित नव्हती. परंतु त्यांच्या शाळेतील एका शिक्षिकेने सांगितले की वर्षा शाळेला आलेली नसताना या शिक्षकाने एका चिटोऱ्यावर स्वतःचा मोबाईल नंबर लिहून दुसऱ्या एका मुलीला दिला आणि म्हणाला त्यांच्याच चाळीत तो ट्युशन घेणार आहे वर्षाला यायचे तर येऊ दे. वर्षासारख्या गरीब हुशार मुलीला या वयात जर कोणी म्हणाले, की ‘तू हुशार आहेस, बोर्डात येऊ शकतेस मी मदत करेन. मी तुझी फी घेणार नाही’ यावर ती मुलगी काय करेल? एक तर तिच्या वयात कौतुकाने हुरळून जाईल. दुसरे आपल्याला पैसे न घेता शिकवायला तयार झालेल्या शिक्षकाला देवदूत मानून कोणतीही शंका न घेता क्लासला जाईल. शिक्षक म्हणेल त्या गोष्टीला वर्षा तयार झाली असल्याचे नाकारता येणार नाही. शिवाय एखाद्या मुलीने जीव देते अशी धमकी दिली असताना त्याने पोलिसांनाही कळवले नव्हते! वयात येणाऱ्या मुलांच्या मानसिक, भावनिक बदलाच्या काळात त्यांना जाळ्यात ओढून घेणे सोपे असते. सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राने ‘मुलामुलींचा लैंगिकछळ’ ह्या विषयावर सर्व शाळांसाठी हिंदी आणि मराठीतून चार पोस्टरचे संच तयार केले आहेत. दर जून महिन्यात हे पोस्टर १२०० शाळांना नोटीस बोर्डला लावण्यासाठी देण्यात येतात.
वयात येताना मुलगे आणि मुली यांच्यात शारीरिक, मानसिक व भावनिक बदल होत असतात. मुलींना पाळी आली की जननअंगाच्या स्वच्छतेबद्दल जुजबी माहिती तरी मिळते. मुलग्यांना मात्र कोणीच कसली माहिती देत नाही. वीर्यपतनाबद्दल नाही आणि जननअंगाच्या स्वच्छतेबद्दल तर मुळीच नाही. मुलगे या सर्वांबद्दल काळजी करीत असतात. मुलांना लैंगिक अवयवांची स्वच्छता शिकवली नाही तर ते किती मोठ्या अडचणीत सापडू शकतात त्याचं उदाहरण मला STD क्लिनिकमध्येच मिळालं. एका मुलाला अस्वच्छतेमुळे ‘फायमोसीस’ झाला, म्हणजे लिंगावरची त्वचा जंतुसंसर्गामुळे लिंगाला चिकटते आणि लिंगाला ताठरपणा येतो तेव्हा त्वचा मागे न सरकल्याने वेदना होतात. या मुलाने मित्राला जेव्हा सांगितले की लिंग उत्तेजित होताना दुखतंय तर तो त्याला म्हणाला, ‘अरे तुझं लग्न होईल तेव्हा तुझी फजिती होईल, तू थोडं सेक्स ट्राय कर!’ एक दिवस रात्री त्याला रक्तबंबाळ अवस्थेत हॉस्पिटलला आणलं, सेक्स ट्राय करताना त्याच्या लिंगावरची चिकटलेली त्वचा फाटली होती, इमर्जन्सी सुंता (Circumcision) करावी लागली होती. पुढे या मुलाच्या तीन महिन्या नंतरच्या चाचणीत एच.आय.व्ही. देखील डिटेक्ट झाला. अज्ञानाची किती भयानक किंमत! लोकांच्या मनातील भीती आणि गैरसमजाना घेऊन त्याला खतपाणी घालण्यासाठी गल्लीबोळात, रस्त्यावर किंवा व्हॅनमध्ये चाललेली सेक्सक्लिनिक खोटेनाटे प्रचार करतात. वर्तमानपत्रात जाहिराती असतात – ‘स्वप्नदोष, विर्यपतन, लिंगाचा वाकडेपणा यावर हमखास उपचार!’ खेडेगावात सुद्धा भिंतीवर अशा जाहिराती असतात. शिवाय असा समज असतो की लग्नानंतर सेक्सची सर्व माहिती असण्याची अवजड जबाबदारी पुरुषांची असते. मुलींना सेक्समधलं काही समजत नाही म्हणून त्यांना खूश करणे हे केवळ मुलावर असते! हे सेक्स ट्राय करणं - फक्त मुलांसाठी! मुलींनी मात्र एकदम समर्पित प्रेमच करायचे!! आणि त्याची परिणती लग्नात झाली, तर बरं, नाहीतर ती वाया गेलेली मुलगी बनते. मुलींना सेक्सबद्दल माहिती नसावी आणि असली तरी त्याबद्दल कुणाला कळू द्यायचे नाही, कारण मुलींना ही माहिती असणं चांगली गोष्ट मानली जात नाही असे पालक मुलींना शिकवतात. पण मुलींनाही अनेक लैंगिकतेच्या मुद्यांवर कुतूहल असते. कॉलेजमध्ये मुलींच्या कडून हमखास येणारा प्रश्न असतो - हायमेन(योनिपटल) म्हणजे काय? आपला सेक्स आधीच झाला असेल तर नवऱ्याला कळते का? पालकांना मुलीचे लग्न उरकण्याची घाई असते, पण तिला लैंगिक संबंधाबद्दल काही सांगण्याची गरज वाटत नाही. मुलींना संबंधाबद्दल माहिती असण्याची गरज नाही पण गर्भानिरोधनाची जबाबदारी मात्र तिची! घरात देव धर्म असला तर पाळी पुढेमागे करायला तिला आले पाहिजे अशी माहेर-सासर दोन्हीकडून अपेक्षा!
शिक्षकांना पण गर्भनिरोधकाची माहिती मुलींना सांगण्याची ‘भीती’ वाटते! दर वर्षी आम्ही काही डिग्री कॉलेज मध्ये फायनल वर्षीच्या मुलींना ‘फॅमिली लाईफ’ची माहिती देण्यासाठी कार्यशाळा घेतो. त्यात गर्भनिरोधक साधनांचे सत्र असते. त्यांना सर्व गर्भनिरोधक साधने हाताळायला देतो. कॉँडोमचे महत्त्व पुनःपुन्हा सांगतो. तेव्हा मुलींचे प्रश्न, विशेषत: कॉँडोम हाताळणे त्यांच्या शिक्षकांना अस्वस्थ करते. “डॉक्टर इतकं उघड उघड सगळं सांगू नका, या मुली या माहितीचा गैरवापर करतील नं! ” असे ते बऱ्याच वेळा बोलून दाखवतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसते! एक तर गर्भनिरोधकाचा गैरवापर होऊच शकत नाही, त्याचा फक्त उपयोग होऊ शकतो. गर्भनिरोधके नको असणारी गर्भधारणा रोखतात. लहान वयात नको असणारा गर्भ राहणं हे एक डिझॅस्टर होऊ शकते. आम्ही बऱ्याच वेळा कॉलेजेसना सांगितले की अशी सत्रे फक्त मुलींसाठी न ठेवता मुलग्यांसाठी पण असावीत. पण अजुन तसा विचार कोणी केला नाही!
आम्ही एका संस्थेसाठी वस्तीत एक लैंगिकता शिक्षणाचा कार्यक्रम करीत होतो. सत्र संपल्यावर, लता आमच्याजवळ येऊन म्हणाली, “ आई बोलावते”. तिचा आवाज थोडा मुलासारखा घोगरा वाटला.
लताची आई ३-४ घरची भांडी घासते, त्यांच्या छोट्याश्या खोलीत लताच्या बक्षिसाच्या कपांचा ढीग होता ती स्टेट लेवल कब्बडी चेम्पियन आहे. लता १८ वर्षाची आहे. अजुन पाळी नाही, ती मुलासारखेच कपडे वापरते, आवाज मुला सारखा येतो, केस कापलेत. लताची आई म्हणाली, “आधी काही वाटत नव्हते आता थोडं अवघड वाटतंय.” परंतु लोक काय म्हणतील म्हणून, डॉक्टरना दाखवलं नव्हतं. पालकांना ती मुलगीच राहावी असं वाटत होतं! तिची तपासणी केली तेव्हा तीचे बाह्यअंग साधारण मुली सारखं असलं तरी शरीरात गर्भाशय, अंडाशय नव्हते तर पुरुष बिजाशय अपरिपक्व अवस्थेत होते. तिचे समुपदेशन केले तेव्हा तिने सांगितलं कि ‘तिला मुलगाच होऊन रहायचं आहे.’ तिच्या पालकांचेही समुपदेशन केलं. संघटनेने पण ही केस अत्यंत संवेदनाक्षम पणे हाताळली, आणि पालकांची समजूत काढली. तसं बघायला गेलं तर बी.डी.डी. चाळीत अश्या व्यक्तिला इतक्या सहज स्वीकारलं गेलं नसणार. पण लताच्या स्वत:च्या कष्टामुळे , आईच्या हिमतीने आणि के ई एम च्या सोशल वर्करच्या मदतीने हे होऊ शकले.
आपल्या देशात गर्भ लिंग तपासणी आणि गर्भलिंग ओळख या विरुद्ध कायदा येऊन २७ वर्षे झाली तरीही, अजुनही चोरून- मारून( बेकायदा) गर्भलिंग ओळख केली जाते आणि असं करणारी मंडळी उच्चशिक्षित डॉक्टर. म्हणजे महिलानां, मुलीना कमी लेखण्यात उच्च शिक्षित काही मागे नाहीत. शिक्षणाने यांच्या हीन विचारात काहीच बदल नाही झाला आणि शिवाय डॉक्टर मंडळी या व्यापाराचे मुख्य सूत्रधार असतात ! म्हणून मेडिकलच्या विद्यार्थ्यांना लैंगिकतेचे नीतिशास्त्र (Ethics in Human Sexuality) शिकवणे आवश्यक असते.
मी शिकवताना शेवट असा करते की,

2) वयात येताना मुलां-मुलींना गर्भनिरोधनाबद्दल माहिती देणं जीवनदायी (Life Saving) आहे.
3) आपल्या देशात कितीतरी महिलांना मुलगा झाला नाही म्हणून घरातून घालवून दिले जाते.मुलाचा गर्भ राहण्या न राहण्यामध्ये स्त्रीचा काही वाटा नाही, हे मुलामुलींना माहीत पाहिजे.
4) पाळीचं रक्त अशुद्ध नसतं, ते पूर्णपणे शुद्धच असतं, पाळी मागे पुढे करू नये. याबद्दल माहिती हवी. पाळीची स्वच्छता, कापड किंवा पॅड वापरले तरी दिवसातून कमीत कमी ३-४ वेळा बदलावेत, मायांगाची स्वच्छता साबण व पाण्याने दिवसातून दोन वेळा तरी व्हावी.
5) मुलींना पाळी येते तसे मुलग्यांमध्ये वीर्यस्खलन होते, त्यामध्ये कोणताही दोष नाही.उपचारांची गरज नाही, हे मुलांना आणि सर्व काही विसरून गेलेल्या पालकांना माहीत पाहिजे,जे सांगणे आपले कर्तव्य आहे .
6) चांगला आणि वाईट स्पर्श याची जाणीव करून देणे, कोणाला सांगू शकता, त्यात तुमची काही चूक नसते, हे मुलांना माहीत पाहिजे
7) मुलगी आणि मुलगा असा भेद करून, गर्भलिंग ओळख करणे बेकायदेशीर आहे, तसं करणाऱ्या डॉक्टरची गय करू नये. तसेच आपल्या मुलांमध्ये असा भेद करून मुलींना शिक्षणात मागे ठेवणे अमानवीय आहे. मुला मुलींना घरातली व बाहेरची कामे शिकवावीत.
8) स्त्रीपुरुष संबंधात प्रेम आणि विश्वास महत्त्वाचा, हे संबंध परस्पर अनुमती आणि आदराचे असणे आवश्यक आहे. म्हणूनच एकमेकांच्या सुरक्षेची जवाबदारी घेणे हेच विश्वासाचे प्रतिक आहे. एकमेकांपासून काही रोग पसरू नये, आपल्यामुळे त्या व्यक्तीला इजा होऊ नये हे पाहणं म्हणजेच प्रेम.
या सर्व गोष्टी वयात येणाऱ्या मुलां-मुलींना सांगणे, हा लैंगिक शिक्षणाचा भाग आहे.