अंगणवाडी कर्मचारी

 मागच्या महिन्यात लॉकडाऊनच्या काळातही घराबाहेर जाऊन काम करणाऱ्या मुंबईतल्या एका डॉक्टरचे अनुभव आपण वाचलेत. आज आपण कोकणातल्या दोन अंगणवाडी सेविकांचे अनुभव समजून घेऊया. त्यांच्या अनुभवांचे शब्दांकन सुनीता गांधी यानी केले आहे. सुनीता गांधी अनेक वर्षापासून विविध सरकारी आणि गैरसरकारी संस्थांच्या सोबत प्रशिक्षणाचे काम करणाऱ्या स्त्रीवादी कार्यकर्ती आहेत.

कल्पना वाघे  

16 मार्चला मात्र आमचे आयुष्यच जणू बदलून गेले! करोना नावाची जागतिक महामारी आल्याचा बातम्या येत होत्या. पण 16 मार्चला आम्हाला आदेश आला की मुलांना आंगणवाडीत बोलावू नका. लॉकडाऊन नावाचा नवीन शब्द पहिल्यादाच ऐकला. सगळ्या देश,राज्य,जिल्ह्याच्या सीमा बंद केल्याचे समजले. कोकणात गावांनी निर्णय घेऊन गावच्या सीमाही बंद केल्या. आमच्या गावची परिस्थिती वेगळी नव्हती. मी चिपळूण तालुक्यातील निर्व्हाळ गावात आंगणवाडी सेविका म्हणून 29 वर्ष काम करते आहे. लॉकडाउनच्या सुरवातीच्या काळात गाव करोना मुक्त ठेवण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न सुरू केले. सरकारी आरोग्ययंत्रणा कामाला लागली, पण मनुष्यबळ कमी पडू लागले. अशातच आंगणवाडी बंद ठेवून अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस यांनी गावाच्या करोना विषयक सर्व्हे,जनजागृती च्या कामात सहभागी होण्याचे ग्रामविकास खात्याचे आदेश आले. आजवर मुलांसोबत काम करताना गावविकासाच्या वेगवेगळ्या अभियान,उपक्रमात सरकार आम्हाला हक्काने सामील करून घेते, आम्ही पण या सगळ्या कडे एक अनुभव म्हणून पहातो.
आमच्या नेहमीच्या कामात गावातली 0 ते 6 वयोगटातली मुलं आणि गरोदर, स्तनदा मातांच्या सोबत लसीकरण, आहार, आरोग्य यासाठी आम्ही काम करतो. आमचे रोजचे साडेचार तासाचे वेळापत्रक तयार असते. यात मुलांना खेळ, गाणी,स्वछता शिकवणे.पोषक आहार देणे ही प्रत्यक्ष आंगणवाडीत मुलांसोबत कामे करायची असतात.या कामासाठी आम्हाला मदतनीस मदत करते. याच सोबत वेगवेगळी 11 रजिस्टर भरणे आणि 4/5 विविध नोंदीही करायच्या असतात. हे काम वेळापत्रका प्रमाणे केले तर मासिक अहवाल बनवणे सोपे जाते.याच सोबत दैनदिन गृहभेटी हा पण आमच्या कामाचा महत्त्वाचा भाग असतो. या मध्ये किशोर वयीन मुलीचा आहार,मार्गदर्शन ही कामे असतात. गावामध्ये राबवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय अभियानाच्या कामांसाठी आम्ही हक्काच्या कार्यकर्त्या असतो. अनेकदा आम्ही ते सामाजिक बांधिलकी म्हणून करत असतो. त्याचा स्वतंत्र मोबदला आम्हाला मिळत नाही. पण या नव्या आदेशानंतर आमची कामाची चौकट पूर्ण बदलली. जागतिक महामारीच्या संकटाच्या निर्मूलनाचा आम्ही एक भाग झालो. सोशल डिस्टन्स ,क्वारन्टाईन...असे एकेक नवनवीन शब्द समजत होते. लोकांनी सुरक्षित रहाण्यासाठी घरातून बाहेर पडू नये - हे सांगत असताना आम्ही मात्र सगळी दिनचर्या बदलून घरातली कामे उरकून सकाळी 9 ते रात्री उशिरा पर्यंत घराबाहेर रहात होतो. पण कामाची नेहमीची एक ठराविक वेळ आणि त्यानुसार घरची कामे, जबाबदाऱ्या यांचे केलेले वैयक्तिक नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले. सर्व्हे, जागृती, मार्गदर्शन करतानाच स्वतःसोबत कुटूंबाच्या आरोग्याची चिंता,भीती सतावत होती. 
सरकारला आमच्याकडून काम करवून घ्यायचे होते. पण आमच्या सुरक्षेची कोणतीही जबाबदारी घेतली नाही. मास्क, सॅनिटायझर पुरवले नाहीत. 60 वर्षाच्या पुढील व्यक्तींना धोका अधिक आहे – असे आम्हीच सांगत होतो – पण तेव्हा वयाची साठी ओलांडलेल्या अंगणवाडी कार्यकर्त्या मात्र या कामात सहभागी होत्या. आमच्या संघटनेच्या सततच्या पाठपुराव्या नंतर 4 महिने सातत्त्याने काम केल्यावर ICDS (एकात्मिक बालविकास) च्या आयुक्तांनी अखेर आंगणवाडी सेविकांना काम थांबवण्यासाठी चे आदेश दिले. करोना काळातील कामाचे स्वतंत्र मानधन ग्रामपंचायत मधून मिळेल असे सांगण्यात आले.आधीच आम्हाला जेमतेम साडेआठ हजार इतके तुटपुंजे मानधन मिळते! चौदाव्या वित्त आयोगातून 80 टक्के सेविकांना हे मानधन फक्त एका महिन्याचे मिळाले.आता ग्रामपंचायत म्हणते आम्हाला शासनाचे आदेश नाहीत. त्यामुळे 3 महिन्याचे मानधन अजून मिळाले नाही आणि मिळेल की नाही याची शंका आहे. कारण अजून गेल्या 2 वर्षाचा प्रत्यक्ष प्रवास खर्च आणि भोजन भत्ता गेली मिळणे बाकी आहे. 
आम्ही जेव्हा करोना दरम्यान काम करत होतो तेव्हा सतत घरच्यांची चिंता त्रास द्यायची. या फिरण्यामुळे आपण आपला आणि कुटूंबाचा जीव धोक्यात घालतोय असे वाटत रहायचे. घरचे म्हणायचे,'एकीकडे सरकार घरी रहा म्हणतंय आणि दुसरीकडे तुम्हाला गावभर फिरायला सांगतय, हे दुटप्पीपणाचे आहे.' तर गावातील लोक म्हणत, ‘गावात बाहेरगावावरून कोणी आलय त्याची माहिती यंत्रणेला द्या’ - या सगळ्यातून सुवर्णमध्य गाठायचा प्रयत्न करताना खूप तारांबळ उडायची. आजपर्यन्त घरच्यांनी सांभाळून घेतलय. अजूनही मुलाची वजने,लसीकरण यासाठी बाहेर पडावेच लागते. भीती वाटतेच, पण तरीही सामाजिक बांधिलकीची भावना स्वस्थ बसू देत नाही. अजून किमान आमच्या गावातल्या आरोग्य यंत्रणेने तरी करोनापासून गाव सुरक्षित ठेवलाय. पण आता भीती आणि नवे आव्हान आहे...गणपतीसाठी येणाऱ्या चाकर मान्याचे! दरवर्षी गणपती आणि चाकरमानी मंडळीची आम्ही आतुरतेने वाट पाहतो. पण या वर्षी मात्र विघनहर्त्याने - चाकरमान्यांना गावी न येण्याची बुद्धी द्यावी - अशी जरा विचित्र प्रार्थना करावीशी वाटतेय. अशी प्रार्थना पण खूप वेदनादायी आहे.पण या विचित्र संसर्गजन्य करोनामूळे आमचा पण नाईलाज झालाय.

रूपाली परब 

चिपळूण मध्ये राहणारी पण जवळच्या ग्रामपंचायती च्या हद्दीतल्या  मिरजोळी,कोल्हेखाजन येथील अंगणवाडी सेविका. वयाची साठी ओलांडलेली,सर्वासोबत हसतखेळत असणारी,मनमिळावू अशी ही कार्यकर्ती. दर महिन्याला होणारी मीटिंग आणि चार सहा महिन्यांनी कधीतरी होणारी ट्रेनिंग हाच त्यांचा विरंगुळा! सख्याना भेटायचे,सुख दुःखाच्या गोष्टी सांगायच्या.आनंद साजरा करायचा आणि दुःखात धीर द्यायचा.हे सगळ घडू शकायच मीटिंग मुळे. आज ते एकत्र भेटणे, तो विरंगुळा पण नाहीये. 
कुटुंबात मुलगा, सून आणि 6 महिन्याची नात. सून माहेरी बाळंतपणाला गेली होती आणि जानेवारीत नात झाली. 2 महिन्यांनी नातीला, सुनेला घेऊन यायचे, नातीचे कोडकौतुक करायचे – असे आजीने ठरवले...पण मार्चमध्ये करोनाचे संकट आले. नुसते संकट आले नाही तर कामाचा दुप्पट ताण आणि भीती घेऊन आले! स्वतः सोबत कुटूंबातील व्यक्तींना पण आपण संकटात टाकू शकतो - अशी धास्ती रोज घर गाठताना सोबतच असायची. त्यामुळे इतक्या छोट्या बाळाला संकटात नको टाकायला म्हणून आजपर्यत परबबाईंनी नातीला आणि सुनेला माहेरातून घरी आणलेले नाही. करोनासारख्या आपत्तकालीन स्थितीत सरकारने हक्काच्या अशा अंगणवाडी सेविकांना ड्युटी दिली..परंतु कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिली नाही. वृद्ध व्यक्तींना धोका आहे हे माहीत असूनही परब बाईंनी 3 महिने काम केले. नियमितपणे ठराविक वेळेत आंगणवाडीत काम करणाऱ्या व्यक्तीला वेळेचे भान न ठेवता दिवसरात्र काम करावे लागले. या अतिरिक्त कामाचा ना मोबदला मिळाला, ना या कामाची साधी दखल शासन दरबारी घेतली गेली - याची खंत परब बाईंना वाटतेय. 
आज ना उद्या सरकार अंगणवाडी सेविकांना मानधनाऐवजी पगार देईल, चार पैसे पेंशन मिळेल, म्हातारपणाचा आधार होईल - या आशेवर अशा अनेकजणी सेवेत आहेत. अखेर संघटनेच्या पाठपुराव्या नंतर 3 महिन्यांनी त्यांची ही अतिरिक्त कामे थांबवली गेली. अजूनही मुले अंगणवाडीत येत नसली तरी नियमित सर्व्हे, वजन घेणे, लसीकरण यासाठी गावात जावेच लागते. बाहेरच्या संपर्कातुन धोका आहेच हे लक्षात घेऊन आजही आज्जी नातीला घरी आणू शकत नाहीये. त्याचसोबत नातीला भेटायला जाणेही शक्य होत नाहीये. आज करोना संदर्भातील काम थांबले असले तरी 3 महिने केलेल्या कामाच्या अतिरिक्त काम,सर्व्हे यामुळे असणाऱ्या गुढघेदुखीचा अधिकच त्रास सुरू झालाय, सांधेदुखी वाढली. आज या परिस्थितीत त्या प्रार्थना करत आहेत...”जगावरचे करोना चे संकट लवकर टळू दे." खरंच असंच होऊ दे. लवकरात लवकर आज्जी आणि नातीची भेट होऊ देत, नातीच्या खोड्यानी परबबाईंचे घर भरू देत!

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form