लिंगभावाच्या चष्म्यातून कोरोना आणि आरोग्य

कोविड -१९ च्या महामारीमुळे प्रत्येक क्षेत्रावर कमी अधिक प्रमाणात नकारात्मक परिणाम होणार आहेत हे आपण जाणतोच. त्यामुळे २०२० हे साल जगाच्या इतिहासामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये लक्षणीय ठरणार आहे . विविध चळवळींद्वारे किंवा योजना अथवा कृतींद्वारे कष्टाने घडवलेले सकारात्मक बदल नाहीसे होऊन जग काही वर्षे मागे जाईल असे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.अर्थात् ,हे सर्व आरोग्य क्षेत्राबाबत देखील घडेल. पूर्वीही स्त्रियांच्या आरोग्यावर लिंगभेदामुळे विपरीत परिणाम होतच होते - त्यामध्ये आता कोविडच्या महामारीची भर पडली आहे. कोरोनामुळे आणि या महामारीची साथ रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांमुळे होऊ घातलेल्या परिणामांबाबत आपण लिंगभावाच्या दृष्टिकोनातून समजून घेऊया .


हा लेख डॉक्टर प्रिया देशपांडे यांनी लिहिला आहे. त्या मिरज येथील मेडिकल कॉलेज मध्ये समाज वैद्यकशास्त्र विभागात अध्यापन करतात.

पूर्ण जगभरातील चित्र जर बघितले, तर कोरोनाचा संसर्ग होण्यामध्ये स्त्री-पुरुष प्रमाण हे साधारण सारखेच दिसून येते. पुरुष जास्त घराबाहेर पडत असल्याने त्यांच्यामध्ये थोड्या केसेस जास्त दिसून येतात. मात्र कोविडमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जर बघितले तर स्त्रियांपेक्षा पुरुषांना मृत्यूचा धोका हा अधिक आहे, असे दिसून येते.
स्त्रियांना त्यांची पाळी सुरू असेपर्यंत हृदयरोग व उच्च रक्तदाब अशा आजारांपासून नैसर्गिकरित्या काहीसे संरक्षण प्राप्त असते. हेच दोन्ही आजार कोविडमुळे मृत्यू होण्याचा धोका वाढवत असल्याने जगभरात पुरूषांच्या मृत्यूचे प्रमाण स्त्रियांपेक्षा अधिक आहे . भारतात झालेल्या एक अभ्यासानुसार एकूण मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी पुरुषांचं प्रमाण जास्त (जवळपास 63 टक्के) आहे.आता हे वाचून तुम्हाला नक्कीच असे वाटले असेल की चला या कोविडच्या साथीमध्ये स्त्रिया त्या मानाने नशीबवान निघाल्या! पण थांबा ...
कोविडच्या साथीचे परिणाम हे केवळ तो आजार होणे एवढ्यापर्यंतच सीमित नाहीत . कोरोनामुळे कोविड तर होतोच पण कोरोनामुळे स्त्रियांचे आयुष्य निरनिराळ्या प्रकारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या खडतर बनत आहे – हे पुढील काही उदहरणांवरून लक्षात येईल.
● काशीबाई, ७० वर्षाच्या आहेत आणि आता पुन्हा त्यांच्या अंगावर लाल जाऊ लागले आहे . त्यांनी लवकरात लवकर तपासणी करून कर्करोग असल्यास त्यावरील शस्त्रक्रिया आणि उपचार करून घेणे आवश्यक आहे . पण कोविडमुळे सरकारी दवाखान्यामध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. त्यांच्या मुलाची नोकरी गेल्याने खाजगी दवाखान्यामध्ये जाण्याची परिस्थिती नाहीये. आजार जेवढा अंगावर काढला जाईल तेवढा गंभीर होत राहील आणि जीव वाचण्याची शक्यता देखील कमी होत राहील. जे आजार लवकर निदान केल्याने थोडक्यामध्ये बरे होऊ शकतात, असे सर्व आजार केवळ निदानास उशीर झाल्याने उपचारास दाद देणार नाहीत.
● काशीबाईंचीच नात स्मिता, आठवीतील एक हुशार मुलगी. पण आता वडिलांची नोकरी गेल्याने तिचे खूप शिकण्याचे स्वप्न बहुदा अर्धवट राहणार असे दिसते . आता तिला घरातील कामांमध्ये मदत करावी लागते. सध्या मोबाईलवरून शाळा सुरू आहे पण तिच्याकडे स्मार्टफोन नसल्याने ती ऑनलाईन वर्गाला बसू शकत नाहीये .

● माझी घरकाम मदतनीस, लक्ष्मी - वय वर्षे ५५, लठ्ठपणासह उच्च रक्तदाब व हृदयाचा आजार. म्हणजेच कोविड झाल्यास गंभीर आजारासाठी अतिजोखमीचा गट . हृदयाच्या ऑपरेशननंतर महागडी औषधे देखील सुरू आहेत. घरातील इतरांचीही आरोग्याबाबत साधारण अशीच परिस्थिती आहे . मी माझ्याकडून जरी भरपगारी रजा दिलेली असली तरी लॉकडाऊन उठल्यानंतर इतर घरांमधून तिला कामावर येण्याचा आग्रह सुरू आहे. अशा अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी घराबाहेर पडणे धोक्याचे ठरू शकते हे ती जाणते . अशा परिस्थितीमध्ये काय करावे हे तिला समजत नाहीये . हा कोरोना कधी संपणार हे मला सारखे विचारत असते .. कामावर हजर नाही झाली तर काम जाण्याचा धोका आहे आणि हजर झाली तर कोरोनाचा .. निर्णय तिच्यासाठी अवघड आहे .

● श्वेताने लॉकडाऊनच्या काळामध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला . मात्र तिची काळजी घेण्यासाठी तिच्या सासर आणि माहेरचे कोणीदेखील तिच्याजवळ पोचू शकले नाहीत . बाळाच्या जन्मानंतरच्या कठीण काळामध्ये तिची काळजी घेण्यासाठी तिच्या पतीशिवाय कोणीच जवळ नव्हते .. बाळंतपणानंतर योग्य ती विश्रांती न मिळाल्याने भविष्यामध्ये तिच्यासाठी आरोग्यविषयक तक्रारी उद्भवू शकतील. बाळाच्या लसीकरणामध्येही अडचणी येत आहेत. तरी श्वेता नशीबवान म्हणायची! ती आणि बाळ सुखरूप आहे. काही दिवसांपूर्वी बर्‍याच दवाखान्यांनी नाकारल्यामुळे बाळाला जन्म देताना एक स्त्री मरण पावली ही बातमी आपण सर्वांनी वाचली असेल. 

गरोदर स्त्रिया त्यांच्या मासिक तपासणीसाठी दवाखान्यात जायला घाबरत आहेत किंवा प्रवासाची सोय नसल्याने जाऊ शकत नाहीयेत . याचा परिणाम त्यांच्या गर्भातील बाळावर होऊ शकतो. लॉकडाऊननंतर ९ महिन्यांनी बेबी बूम होईल असे जोक आपण सर्वांनी वाचले . पण गर्भनिरोधक साधने आणि सुरक्षित गर्भपाताच्या सोयी या कोरोनामुळे सहजसाध्य उरल्या नाहीत म्हणून यातील कितीतरी स्त्रियांना बाळंतपणाला सामोरे जावे लागेल याची आपण सर्व नक्कीच कल्पना करू शकतो. अशा काही स्त्रिया भोंदू लोकांकडून धोकादायक रीत्या गर्भपात करवून घेण्याचा प्रयत्न करतील आणि नक्कीच जीवाला मुकतील .
● आशाला सध्या गर्भ राहिलाय पण तिला दुसरे मूल नको आहे .ती २७ वर्षांची आहे पहिल्या गरोदरपणामध्ये बिपी खूप वाढल्याने दुसरे मूल होऊ द्यायचे नाही असे तिने ठरवले होते . मात्र या कोरोनाच्या भीतीमुळे गर्भपात करण्यासाठी तिने दवाखान्यामध्ये जाण्याऐवजी तिने गर्भ राहू द्यावा असा तिच्यावर घरून दबाव येत आहे . . लगेचच राहिलेल्या या गर्भामुळे तिला अशक्तपणा आलाय आणि तिच्या छोट्या बाळाकडेही तिला नीट लक्ष देता येत नाहीये . गर्भपातासाठी तिच्या काकूने तिला एक घरगुती उपाय सांगितलाय. तो केल्यावर जीवाला धोका तर निर्माण होणार नाही ना अशी तिला भीती वाटतेय. घरगुती उपाय करून जीवाचा धोका पत्करायचा की हे नको असलेले बाळ होऊ द्यायचे अशी तिचीद्विधा मनस्थिती आहे . 
● रुबिनाला कोरोनाची बाधा झाली होती. आधी तिच्या नवर्‍याला झाली आणि त्यानंतर तिच्या कुटुंबातील ३ जण बाधित आहेत असे तपासणीमध्ये सापडले . तिला याचा काहीच त्रास जाणवला नाही . मात्र तिचा शौहर कोविडमुळे मरण पावला आहे. आता आपल्या लहान लहान ३ मुलांना घेऊन कसे जगायचे या प्रश्नाचे उत्तर डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिला शोधावे लागेल.
केवळ आरोग्यविषयक तक्रार असली तरच कोविड साथीचा परिणाम जाणवतो असे नाही. 
 डॉ. रचना एक कोविड योद्धा आहे. तिचे घर आणि कामाचे ठिकाण वेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहे . लॉकडाऊनच्या काळामध्ये जिल्ह्याच्या सीमा पार करता येत नाहीत म्हणून कर्तव्याला प्राधान्य देऊन कामाच्या ठिकाणी राहू लागली . तिचे संपूर्ण घर सांभाळण्याची जबाबदारी तिच्या सातवीमधील मुलीवर पडली कारण तिच्या घरकाम सहायिकादेखील कामावर येऊ शकत नव्हत्या आणि तिचे पती देखील डॉक्टर असल्याने त्यांनाही कामावर जावे लागत होते. त्या मुलीचे बालपण संपून ती अचानक मोठी झालीये. कोरोना आला नसता तर असे नक्कीच झाले नसते. लॉकडाऊन संपल्यावर आता तिच्या सहायिका येऊ शकतात कामावर, मात्र त्यांच्यामार्फत आजार देखील येऊ शकतो , तेव्हा काय करावे याबाबत तिची द्विधा मनस्थिती आहे ... आता मुलीची ऑनलाईन शाळा सुरू झाल्याने तिच्या अडचणी अजूनच वाढल्या आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये मृत्यू झाल्यास तिच्या कुटुंबाचे काय होईल या चिंतेने तिची झोप उडाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय केवळ त्यांच्या मृत्यूनेच त्रासात जाऊ शकतात असे नाही.
अलगीकरणामध्ये ठेवलेल्या एका नर्सकडे दुरून बघत रडणारी तिची छोटी छोकरी आणि तिच्याकडे बघून दुरून अश्रू ढाळणारी तिची ती आई हा फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर वायरल झाला होता. समाजाची सेवा करताना त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम सर्व कोविड योद्ध्यांची कुटुंबीय भोगत आहेत . या मानसिक तणावाचे परिणाम पुढील बऱ्याच काळासाठी राहणार आहेत.आरोग्य क्षेत्रामध्ये स्त्रियांचे प्रमाण ७०% हून अधिक आहे . त्यांना कोरोना बाधेचा धोका अधिक आहे. तरीही या संकटाच्या काळामध्ये काही कोविड रुग्णांसाठी तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तीची माहिती मिळविण्यासाठी पूर्ण देशभरामध्ये परिचारिका आणि आशा सेविका अश्या हजारो स्त्री आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत. त्यांच्या कौटुंबिक अडचणी आणि रात्रंदिवस काम केल्याने त्याचा त्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम सर्वदूर असणार आहे. याशिवाय सामाजिक, जातीय आणि आर्थिक उतरंडीनुसार समाजातील घटकांवर होणारे परिणाम हे निम्न स्तरातील लोकांसाठी अधिक व्यापक असतील.
साथीच्या काळात वाढलेली कौटुंबिक हिंसा हा देखील एक सार्वजनिक आरोग्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे.   
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार स्त्रिया व बालके यांच्यावरील हिंसाचाराचे प्रमाण लॉकडाऊनच्या काळामध्ये वाढले असून आता ३३% ऐवजी ५०% स्त्रिया या हिंसाचाराने पीडित आहेत. लॉकडाऊनमध्ये नवर्‍याची मारहाण वाढल्याने आणि मदत मिळवण्यासाठी अथवा उपचारासाठी घराबाहेर पडू शकत नसल्याने अनेकजणींची घुसमट खूप वाढली आहे . पूर्वी हेल्पलाईन नंबरवर फोन करून मनातील दु:ख मनमोकळेपणाने बोलता येत होते, पण आता सर्व कुटुंबीय घरी असल्याने तेदेखील शक्य होत नाहीये. कौटुंबिक हिंसाचाराचे परिणाम हे शारीरिक तसेच मानसिक देखील असतात. घरातील लहान मुलांच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम होतो. भविष्यातील मानसिक ताणतणावाच्या काळामध्ये हिंसाचाराचे प्रमाण अजूनदेखील वाढण्याची शक्यता आहे . अशा स्त्रिया स्वतः मदतीपर्यंत पोचू शकत नाहीत म्हणून अशा स्त्रियांपर्यंत मदत पोचण्याच्या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे.
● लॉकडाऊन संपल्यानंतर सीमा अडचणीमध्ये आली आहे . पूर्वी नोकरीसाठी ती रोज प्रवास करायची , पण आता अजून प्रवासाची सोय नीटशी सुरू झालेली नाही. तिला गाडी चालवता येत नाही आणि डबल सीट प्रवासाला परवानगी नसल्याने तिच्यासमोर नोकरी सोडणे किंवा कुटुंबापासून दूर राहणे हेच पर्याय आहेत. बसमध्ये ठराविक लोकांनाच प्रवेश असल्याने सध्या वेळेमध्ये घरी पोचू शकत नाहीये आणि घरातील कामांबाबत देखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. घरातील सर्व कामे सुनेनेच करायला हवी अशी तिच्या कुटुंबियांची अपेक्षा आहे. तिचा नवऱ्याला तिची ओढाताण लक्षात येत आहे . पण तिला मदत केल्यास त्याचे आईवडील नाराज होतील म्हणून तो तिला घरकामामध्ये काहीही मदत करत नाहीये. या सर्व दगदगीमुळे पुरेशी झोप होत नसल्याने, तिला थकवा, डोकेदुखी , पित्त अशा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. न्यू नॉर्मलमध्ये पुरुषांनी घरकाम करणे जर समाजमान्य झाले नाही तर मात्र स्त्रियांचे , विशेषतः नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे आयुष्य अधिक खडतर होईल हे नक्की.
असंघटीत क्षेत्रामध्ये स्त्री कामगारांचे प्रमाण लक्षणीय आहे. मोठमोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांना सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आणि बदल सुरू केले आहेत . मात्र अशा असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणा-या , तसेच वेगवेगळ्या घरी कामासाठी जाणाऱ्या स्त्रिया कोरोनाबाधित होण्याचा धोका अधिक आहे . तरीही समाजातील कितीतरी जणी या क्षणी हा अवघड निर्णय घेत आहेत आणि पोटापाण्यासाठी घराबाहेर पडत आहेत.  योग्य काळजी न घेतल्यास त्यांना स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी कोरोनाचा धोका अधिक आहे.
● कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होत असल्याने रोझीला नोकरी बदलण्याची इच्छा होती. मात्र कोविड महामारीमुळे आर्थिक मंदी अपेक्षित असल्याने आता हातातील नोकरी सोडण्याचा धोका ती घेऊ शकत नाही. नोकरीच्या ठिकाणी होणारा त्रास ती घरी बोलू शकत नाहीये आणि तिथे तक्रार केल्यास नोकरीवरून काढून टाकले जाईल अशीही तिला भीती वाटतेय. रोज कामावर जाणे हे तिच्यासाठी खूपच स्ट्रेसफुल आहे . तिला आता सतत भीती वाटत राहते, छातीमध्ये धडधड होते , झोप लागत नाही . स्त्रियांच्या असहाय्यतेचा फायदा उठवण्याची प्रवृत्ती या काळामध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे. कामाची ठिकाणे या दृष्टीने सुरक्षित बनविणे ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे.
● सुमन ही ३५ वर्षीय गृहिणी. आपण बरे आणि आपला संसार बरा असे तिचे आयुष्य सुरू होते. नवरा बांधकामावर मजूर म्हणून जात होता. आता काम बंद झाल्याने त्याचे दारूचे व्यसन भरपूर वाढले आहे .. आणि आता घराचा गाडा ओढण्यासाठी तिला घराबाहेर पडावे लागले. एक नोकरी मिळाली आहे पण तिथे काहीही सोयी मिळणार नाहीत असे सांगितले आहे . एका छोट्या कोंदट खोलीमध्ये दिवसभर बसून ठराविक काम रोज संपवावे लागते. दिवसभर एका जागी बसून काम करून तिच्या मागे पाठदुखी व मानदुखी सुरू झालीये. त्याच्या औषधोपचारावर पैसे घालवले तर कुटुंबाच्या पोटाला पुरणार नाहीत म्हणून ती तसेच दिवस ओढत आहे.
● लैला ही एक वेश्या आहे . लॉकडाऊनच्या काळामध्ये तिचा धंदा पूर्णपणे बंद पडल्याने उपासमारीला सामोरे जावे लागले. लॉकडाऊननंतर देखील पूर्वीसारखा व्यवसाय होत नाहीये .उपासमारीमुळे पुढे कसा मार्ग काढावा हे तिला समजत नाहीये. आता मिळेल तो धंदा हातातून सुटू नये म्हणून असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले गेले तर तिला लैंगिक आजार , तसेच एड्सचा धोका आहे . अर्थातच तीही असहाय आहे . म्हणून गिऱ्हाईकाकडून होणाऱ्या अत्याचारास देखील निमुटपणे सामोरे जावे लागणार आहे . तिच्या मुलीला तिने धंद्यापासून दूर एका संस्थेच्या वसतिगृहामध्ये ठेवले होते. पण आता ते वसतिगृह बंद झाल्याने तिची मुलगी तिच्याकडे परत आली आहे. आणि आता या वस्तीमध्ये तिला सुरक्षित ठेवणे किती दिवस शक्य होईल हे तिला माहीत नाही .
या आणि अशा किती कहाण्या सांगाव्या! या सर्वांची प्रत्यक्षातली नावे बदलली आहेत, पण अशा स्त्रिया तुम्ही देखील आपल्या आसपास नक्कीच बघितल्या असतील. शेकडो मैल प्रवास करणार्‍या मजूर स्त्रिया - काही घरी पोचल्या, काही पोचल्या नाहीत .. कोरोनाने गाठण्यापूर्वी मृत्यूने त्यांना गाठले. कोरोनामुळे केवळ कोविड आजारच होत नाही तर कोरोना आयुष्यातील बर्‍याच गोष्टी बदलू शकतो. कोणासाठी शिक्षणाची संधी नाहीशी करू शकेल, कोणासाठी नोकरीची. कोणासाठी मिळेल तशी आणि मिळेल ती नोकरी/व्यवसाय करण्याचे बंधन असेल तर कोणाला वेश्याव्यवसायात अडकवले जाईल. कोणासाठी आजार अंगावर काढण्याचे कारण तर कोणासाठी झाडपाल्याचे औषध घेण्याचे . कोणी घरच्यांना खाऊ घालून स्वतः उपाशी राहील तर कोणी शिक्षण सोडून नोकरी करू लागेल. कोणासाठी हे कौटुंबिक हिंसाचार बनून येईल तर कोणासाठी लैंगिक अत्याचार.. एक कोविडची साथ मात्र रूपे तिची हजार आहेत.
हे सर्व परिणाम स्त्री पुरुष सर्वांवर होणार आहेत, मान्य आहे . पण लिंगभेदामुळे हे परिणाम स्त्रिया व पुरुषांसाठी वेगळे असतील.पुरुषांवर कुटुंबप्रमुख म्हणून घरासाठी पैसे कमविण्याची जबाबदारी अधिक आहे . त्यामुळे कोरोनाच्या सावटाखाली देखील त्यांना घराबाहेर पडावेच लागेल . आजार झालाच तर गंभीर आजार होण्याचा धोका जास्त असल्याने मृत्यूचा धोका जास्त आहे याचा मानसिक दबाव देखील सहन करावा लागेल . नोकरी किंवा व्यवसायावर गदा आल्यास सर्व खर्च कशा प्रकारे चालवायचा आणि कर्जाचे हप्ते कसे भरायचे याचे टेंशन त्यांना मानसिक तणावाकडे ढकलेल. लिंगभावाच्या परिणामांमुळे मनातील दु:खे कोणाशी मनमोकळे बोलणे हे पुरुषांसाठी अवघड असते, तसेच आत्महत्येचा धोका देखील पुरुषांसाठी अधिक असतो. त्यामुळे पुरुषांनी या काळामध्ये जपायला हवे आणि मानसिक ताणतणाव जाणवल्यास त्यांनी तज्ज्ञाचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. हा अवघड काळ काही महिने/वर्षे सुरू राहणार असल्याने हा काळ पार पडेपर्यंत सर्वांनीच एकमेकांना जपणे आवश्यक आहे. पुरुषांमधील व्यसनाधीनता व त्या अनुषंगाने येणारी गुन्हेगारी व हिंसक प्रवृत्ती भविष्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसेल.
स्त्रियांवर मात्र कुटुंबांची काळजी घेण्याचे काम सोपवलेले असते. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची सुश्रुषा करताना त्यांना स्वतःला आजार होणार नाही ना याची योग्य ती खबरदारी त्यांनी घ्यायला हवी. स्त्रियांवरील हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याने त्यांना मानसिक तसेच शारीरिक आरोग्यविषयक मदतीची नितांत गरज भासणार आहे , मात्र मदतीपर्यंत पोचणे त्यांना अवघड जाईल. नोकरी करणार्‍या स्त्रियांना आता जास्तीचे घरकाम देखील करावे लागत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येईल . घरकामाची वाटणी करून घेऊन घरातील पुरूषांना देखील यामध्ये हातभार लावणे क्रमप्राप्त आहे . पैश्यासाठी पोटच्या पोरीला विकणे यापूर्वी देखील सुरू होते, मात्र आता त्याचे प्रमाण वाढू शकते. कुटुंबातील संसाधनांची जेव्हा वाटणी करण्याची वेळ येते तेव्हा अर्थातच स्त्रिया व मुली मागे पडतील. शाळा बंद होताना आधी मुलींच्या शाळा बंद केल्या जातील . शिक्षणाची वाट अधिक खडतर झाल्याने आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यामध्ये आणि आत्मनिर्भर बनण्यामध्ये आता पुन्हा अडचणी निर्माण होतील . स्त्रियांच्या आरोग्यासाठी जर खास तरतुदी व सोयीसुविधा दिल्या नाहीत तर माता मृत्यूचे प्रमाण वाढू शकते. स्त्रियांच्या औषध पाण्यावर पैसे खर्च करायला आपल्या समाजात दुय्यम प्राधान्य मिळते. त्यात रोजगाराची हमी नसताना, असलेले रोजगार गमावले असताना,रोजगार आहेत पण पगार नाही अशा अवस्थेत स्त्रियांच्या औषधपाण्यावरचा खर्च शून्यावर येऊ शकतो. 
स्त्रिया व मुलांमधील कुपोषण आपल्या देशात आधीच मोठ्या प्रमाणात आहे , ते प्रमाण अजून वाढू शकते. शिक्षण बंद झाल्याने कमी वयातील लग्ने व गरोदरपणा यांना मुलींना सामोरे जावे लागेल . पुरुषांचे मृत्यू अधिक प्रमाणात झाल्याने विधवांचे प्रमाण वाढेल व त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागेल. पैश्याच्या तंगीमुळे अडलेल्या स्त्रियांचे विविध स्तरावर लैंगिक शोषण होण्याचा धोका अनेकपटीने वाढेल . तृतीयपंथी व्यक्तींसाठी आरोग्यविषयक सेवा मिळवणे हे नेहमीच अवघड होते . त्यांचे राहणीमान देखील आरोग्यपूर्ण असण्याची शक्यता कमी आहे . नियमित रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने त्यामधील अनेक जण लैंगिक सेवा पुरवीत होते . या सर्वांसाठी कोरोनाचा धोका आणि कोरोनामुळे उपजीविकेमध्ये येणार्‍या अडचणी यांना सामोरे जाणे अवघड जाणार आहे  - असा हा कोरोना आणि त्याचे नानाविध परिणाम !
आरोग्य आणि स्त्रिया असा व्यापक विचार करताना असे लक्षात येते की मूलभूत आरोग्य आणि संगोपनाच्या सेवा कल्याणकारी राज्य व्यवस्थेने उपलब्ध करून न दिल्यामुळे कष्टकरी आणि मध्यमवर्गातील स्त्रिया अधिकच परिघाबाहेर फेकल्या जातात,तर कोविडच्या काळात होत असलेले स्त्रियांच्या आरोग्यावरील परिणाम पाहता त्त्यात अधिकच तीव्र वाढ झाली आहे. हा आजार जरी एकच असला तरी लिंगभावानुसार समाजातील विविध घटकांवर होणारे त्यांचे परिणाम हे पूर्णतः निराळे आहेत आणि म्हणूनच समाजाच्या आरोग्याची काळजी घेताना या सर्व बाबींचा विचार होऊन त्यानुसार योग्य त्या उपाययोजना करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यासाठी व्यापक आणि संवेदनशील दृष्टी आणि लिंगभावाधारित समर्पक नियोजन पाहिजे . पोस्ट कोविड जगामध्ये “न्यू नॉर्मल” तयार करताना या आणि अशा सर्व समाजघटकांचा विचार करून एक संवेदनशील व सुरक्षित समाज निर्माण करण्याचा आपण सर्व प्रयत्न करुया.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form