
आपल्या देशात ८० टक्के शेतीची कामे महिलांकडून केली जात असली तरीही महिलांना ‘शेतकरी’ म्हणून ओळख मिळू शकलेली नाही. अगदी त्याचप्रमाणे पशुपालनातील महिलांच्या सहभागाचीही दखल घेतली गेलेली नाही. गेल्या 25 वर्षांपासून राजस्थानात रायका ह्या पशुपालक समूहासोबत काम करणार्या इल्सा कुलर रोलेफ्सन म्हणतात, ‘Women are the invisible guardians of animal diversity’. या महिलांच्या अस्तित्त्वाबद्दलच जाणीव नसल्यामुळे बदलत्या काळातल्या त्यांच्या गरजा, समस्या यांच्याकडेही दुर्लक्ष होत आलेले आहे. त्याचा परिणाम म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. ‘फूड अँड अॅग्रिकल्चरल ऑर्गनाइज़ेशन ऑफ यूनायटेड नेशन्स’(FAO) चा अहवाल असे सांगतो की जगातल्या एकूण पशुपालकांपैकी दोन तृतीयांश महिला आहेत. या महिलांना सक्षम केले तर पर्यावरणाच्या संवर्धन आणि संरक्षणाच्या दृष्टीने मोठा उपयोग होऊ शकतो असे FAO च्या या अहवालात म्हटलेले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या देशातली आणि राज्यातली परिस्थिती समजून घेऊया.
आपल्या देशात पर्यावरणाचे संरक्षण आणि पशुपालन यांचा परस्परसंबंध दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत चालला आहे. एकीकडे बदलत्या राजकीय वातावरणात गोवंशहत्याबंदीचे कायदे होत आहेत; त्याचवेळी जंगलात गुरांना चरण्यासाठी देखील कायद्यानुसार बंदी आहे. शहरातल्या लोकांना फक्त मोठमोठ्या गोठ्यांमध्ये बांधलेल्या गायीम्हशीच माहीत असतात. पण अजूनही निमशहरी भागातील रस्त्यांवरून शेळ्या-मेंढ्या आणि गायीगुरांचे कळप घेऊन भटकंती करणारे लोकदेखील सहज बघायला मिळतात. जंगलात जाऊन चरणाऱ्या गुरांमुळे पर्यावरणाचे नुकसान होते – अशीही एक समजूत असते. पण सजल कुलकर्णी म्हणतात की – “ जर एकाच क्षेत्रात सलगपणे चराई केली तर जंगलांवर दुष्परिणाम होतात. पण धनगर, रब्बारी, बंजारा यासारखे समूह सतत फिरत असतात, त्यांचे वर्षभराचे ठराविक मार्गांनी जाण्याचे कॅलेंडर असते. आपल्या मार्गावर असलेल्या रानात ते गुरे चरायला सोडतात. गुरांचे शेण जंगलात पडते. त्याचा झाडांना फायदा होतो. यांच्या मागोमाग हरणे, निलगायी, चिंकारा इ. प्राणीसुद्धा फिरतात.” - महाराष्ट्रातल्या भटक्या पशुपालकांचे जीवन, त्यांच्या फिरतीचे मार्ग, पशुधनाची बाजारपेठ आणि या सर्वांचा पर्यावरणाशी असलेला संबंध याचा सजल कुलकर्णी अभ्यास करतात. भटक्या पशुपालकांची जीवनपद्धत पर्यावरणपूरक असते, असे त्यांना वाटते. हे समूह पशुधनाचे संवर्धन करून दूध, मांस, कातडे, लोकर याशिवाय शेतीसाठी बैलशक्ती आणि शेणखत, लेंडीखत पुरवतात. “आपल्या देशातल्या दूध आणि मांसाच्या उत्पादनात या समाजाचा मोठा वाटा आहे. ढोबळ आकडेवारी प्रमाणे भारतात भटक्या पशुपालकांचे एकंदर आर्थिक योगदान हे 35 हजार कोटी आहे” असेही सजल कुलकर्णी यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार मानवी इतिहासात शेती आणि पशुपालन विकसित होण्यात महिलांचा महत्त्वाचा वाटा आहे.
याचे उदाहरण म्हणून त्यांनी काही पशुपालक समाजातील महिलांची दिनचर्या सांगितली - “ ढेबरिया रब्बारी महिलाची दिनचर्या बघितली तर या सकाळी चारला उठतात मेंढ्यांची कोकरं, वाडा यांची सोय लावली की स्वतःच्या परिवारासाठी पाणी आणणे, स्वयंपाक करणे आणि मेंढ्या चरायला जाण्याआधी सगळ्या परिवाराची न्याहारी करणे इतकी कामे या महिला तीन तासात करतात कारण सात वाजता मेंढ्या चरायला निघायला हव्या कारण आपण दुसर्याच्या शेतात राहतो.” धनगरांच्या डेऱ्यावरचे घोडे, कुत्रे, मेंढ्यांची कोकरे यांच्यापासून घरची लहान मुलं या सगळ्यांची काळजी आणि यांची जोपासना करण्याचे निर्णय आणि नियोजन हेदेखील महिलाच करतात असेही कुलकर्णी यांचे निरीक्षण आहे. त्यांना पिढ्यानपिढ्या आपल्या आई, आजीकडून पशुधनाच्या संवर्धनाचे अनुभवजन्य ज्ञान मिळालेले असते. या ज्ञानाचा उपयोग करून गावोगावी पशुसंवर्धनाचे काम करणाऱ्या मुद्रिकाबाई मुंढ, शालनबाई निमसरकर, राजाबाई राठोड सारख्या अनेक महिलांची ते उदाहरणे देतात. अशा महिलांच्या मेहनतीमुळे स्थानिक हवामानात तग धरून राहणाऱ्या अनेक प्रजाती टिकून राहिलेल्या आहेत.
म्हणजेच जैवविविधता टिकवून धरण्यात या महिलांची महत्त्वाची भूमिका असते. अनेक समूहामध्ये दूध काढणे ही देखील महिलांचीच जबाबदारी असते.याशिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी संपूर्ण बिऱ्हाड बांधण्याचे कौशल्य महिलांकडेच असते.
म्हणजेच जैवविविधता टिकवून धरण्यात या महिलांची महत्त्वाची भूमिका असते. अनेक समूहामध्ये दूध काढणे ही देखील महिलांचीच जबाबदारी असते.याशिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी संपूर्ण बिऱ्हाड बांधण्याचे कौशल्य महिलांकडेच असते.
परंतु फिरस्तेपणाच्या जीवनशैलीमुळे या महिलांना धोका देखील असतो. त्या असुरक्षित असतात आणि प्रसूती , मासीकपाळी विषयीच्या आरोग्याशी संबंधित समस्यांवरही त्यांना मदत मिळत नाही. अनेकजणींची बाळंतपणं जंगलात, शेतात इ. असुरक्षित वातावरणात होतात. करोनाच्या प्रादुर्भावामुळे केलेल्या लॉकडाउनचा या स्त्रियांवर बराच विपरीत परिणाम झाला. कारण जिल्हाबंदीमुळे त्यांना एकाच ठिकाणी अडकून पडावं लागलं. अनेक गावांच्या आत शिरायला बंदी केल्याने दूधविक्री करता आली नाही. दळणवळणावर बंदी असल्यामुळे विक्रीसाठी तयार केलेली जनावरं बाजारात नेऊन विकता आली नाहीत. ह्या जनावरांच्या व्यवस्थापनाचे, पालनपोषणाचे काम वाढले. तरीही, या समूहांनी आपल्या वर्षानुवर्षांच्या अनुभवांवर आणि पारंपरिक ज्ञानाच्या बळावर या समस्येवर मार्ग शोधले. सजल कुलकर्णी सांगतात की जनावरांच्या रोगाच्या साथी येणे हे या समाजाला नवीन नाही आणि त्यावर त्यांच्याकडे पारंपरिक क्वारंटाईन सदृश उपायदेखील आहेत. आधुनिक जगातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करण्याचे हे कौशल्य नक्कीच वाखणण्यासारखे आणि अंगीकारण्यासारखे आहे. पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीतले पशुपालक महिलांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना नियोजनात सामील करून घेणे गरजेचे आहे.