पर्यावरणाच्या साथी - परिसर भगिनी

पर्यावरण विषयक समस्यांमध्ये ‘कचरा’ ही एक महत्त्वाची समस्या असते. वाढत्या शहरीकरणासोबत कचर्‍याची समस्या वाढतच गेली आहे. महाराष्ट्रात रोज २२,५०० टन हून अधिक घनकचरा निर्माण होतो. यापैकी ५०% कचरा मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरांमधून निर्माण होतो. जास्त उत्पन्न गटातले लोक जास्त कचरा निर्माण करतात. या कचऱ्याची विल्हेवाट लावतानाही पर्यावरणाचे प्रदूषण वाढायची शक्यता असते. म्हणून कचऱ्याचे वर्गीकरण आणि त्यावर योग्य प्रक्रिया करणे गरजेचे असते. कचरा वेचणारे लोक हेच काम करतात. त्यांचे स्थानिक अर्थव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य याबाबतीत मोठे योगदान असते. पण बरेचदा आपल्याला त्याबद्दल जाणीव नसते. अजूनही कचरावेचक हा समाजातला सर्वांत उपेक्षित घटक राहिलेला आहे. अनेक मध्यमवर्गीय लोकांना वाटते की हे लोक चोरीच्या उद्देशाने फिरत असतात किंवा ते रस्त्यावर कचरा पसरवून ठेवतात. पण नवी मुंबईत अनेक वर्षांपासून कचरावेचक महिलांसोबत काम करणार्‍या वृषाली मगदूम म्हणतात – “ या महिलांचा शहराच्या स्वच्छतेत खूप मोठा वाटा आहे. जरी या महिला कचरा गोळा करून त्यातून पैसे मिळवत असल्या तरी त्या पर्यावरणाच्या रक्षणाचं कामच करत असतात.”
शहरात जी वेगवेगळ्या प्रकारची अनौपचारिक कामं केली जातात त्यात कचरा वेचणे हे सगळ्यात खालच्या दर्जाचे काम मानले जाते. ज्यांना रोजगाराचे इतर कुठलेच साधन उपलब्ध नसते असे गरीबातले गरीब आणि जातीच्या उतरंडीतले सर्वात खालच्या पायरीवरचे लोक हे काम करतात असे WIEGO (Women in Informal Employment : Globalizing and Organizing) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पाहणीत आढळले आहे. भारतात कचरा वेचण्याचे काम करणाऱ्यांमध्ये ९०% महिला आहेत. गेल्या काही वर्षांपासून काही शहरांमध्ये विविध संस्था या महिलांसोबत त्यांच्या समस्यांवर काम करू लागल्या आहेत.
मुंबईत १९९८ साली स्त्रीमुक्ती संघटनेने कचरावेचक महिलांचे सर्वेक्षण केले होते तेव्हा त्यांना असे दिसून आले की बहुतेक सर्वजणी दलित समाजातील आहेत. त्या अत्यंत भयानक परिस्थितीत दारिद्र्य रेषेखालचे वंचित आयुष्य जगत होत्या. त्यांना निरक्षरता, अनारोग्य, बालविवाह, कर्जबाजारीपणा, फसवणूक अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने स्त्रीमुक्तिसंघटनेने मुंबईतील कचरावेचक महिलांना संघटित करून ‘परिसर विकास’ उपक्रम सुरू केला. आता या उपक्रमाचा विस्तार नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांतही झाला आहे. गेल्या वीस वर्षात संघटनेने नवी मुंबईतील ७०० कचरा वेचक महिलांना संघटित केले असून त्यांना ‘परिसर भगिनी’ अशी ओळख मिळाली आहे. या महिलांना महापालिकेकडून ओळखपत्र दिले जाते. या महिलांना कामात सामावून घेणारी नवीमुंबई महानगर पालिका एकमेव पालिका आहे असं नवी मुंबईतील परिसर विकास उपक्रमाच्या समन्वयक वृषाली मगदूम यांनी सांगितलं. गेल्या वीस वर्षातल्या कामाची वाटचाल सांगताना त्या म्हणतात – “या महिलांना संघटनेने ओल्या कचर्‍यापासून खत तयार करायचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांचे स्वयंसहायता गट बनवून त्या गटांची ‘परिसर सखी विकास संस्था’ नावाची फेडरेशन उभारली आहे. यात कचरा वेचक बायकांचीच लीडरशिप आहे आणि स्त्रीमुक्ति संघटना मार्गदर्शन करते. सध्या रुक्मिणी पॉल ही कचरावेचक महिला ह्या फेडरेशनची अध्यक्ष आहे. तिच्यात उत्तम नेतृत्वगुण आहेत. हिशोबासहित संस्थेची सगळी कामं ती बघते. दूरदर्शनवर ‘हॅलो सखी’ कार्यक्रमातही ती सहभागी झाली होती.
रुक्मिणी पॉल 
आम्ही या महिलांमध्ये नेतृत्व आणि इतर गुण तयार होण्यासाठीदेखील प्रशिक्षण देतो. रेशनसारख्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठीही आम्ही त्यांना तयार करतो. पूर्वी अक्षरओळख नसलेल्या अनेक बायका आता सही करू लागल्या आहेत. आता त्या महापालिकेच्या माध्यमातून सोसायटी मध्ये काम करायला लागल्या आहेत. त्यांना त्याबद्दल मानधन मिळतं. त्या खूप लांबून कामासाठी येतात म्हणून सोसायटी कडून प्रवासखर्च पण मिळतो.” हल्ली लॉकडाउनमुळे दोन महीने काम बंद होतं तरीही त्यांना मानधन देण्यात आलं याबद्दल वृषाली यांनी आवर्जून उल्लेख केला.
कचरावेचक महिलांच्या कामाविषयी जास्त तपशीलवार माहिती देताना वृषाली मगदूम यांनी संगितले की – “सध्या या महिला विविध हाऊसिंग सोसायट्यातून कचरा घेतात आणि ओल्या,सुक्या कचर्‍याचे वर्गीकरण करतात. जो कचरा रीसायकल होऊ शकत नाही असा - बिस्किटांच्या पाकीटाची आवरणे वगैरे सारखा कचरा वेगळा करून निर्मिती करणार्‍या कंपन्यांना परत दिला जातो. ओल्या कचर्‍याचं खत बनवतात. त्याबद्दल त्यांना मानधन मिळते. रोज 500 किलो ओल्या कचर्‍याचं खत केलं जातं. त्यामुळे तो कचरा बाहेर डंपिंगग्राऊंडवर जात नसल्याने महापालिकेचा ट्रान्सपोर्ट खर्च वाचतो. त्याशिवाय वस्तीपातळीवर दारोदार फिरून त्या 2000 घरांचा कचरा जमवतात आणि त्याचेही वर्गीकरण करून खत बनवतात. काही महिला पहाटे 4.00 वाजता डंपिंगग्राऊंडवर जाऊन कचरा वेगळा करतात. प्लॅस्टिक, कागद इ. कोरडा कचरा विकून पोट भरतात. तिथे त्यांना पाण्याची आणि टॉयलेटची बेसिक सुविधा तरी मिळायला पाहिजे! एकेक महिला रोज 25 किलो कचरा पाठीवर घेऊन येते. असा कचरा विकत घेणारे काटेवाले असतात. तुर्भेला बरेच काटेवाले आहेत. कारण डंपिग ग्राऊंड जवळ आहे. पण या काटेवाल्यांकडून सुध्दा त्यांची फसवणूक होते. म्हणजे जर त्याने दोन रुपयांना प्लॅस्टिक विकत घेतला तर तो दहा रुपयांना विकतो. हे काटेवाले गरजेनुसार कर्जपण देतात आणि मग त्यातूनही या महिलाचं शोषण होतं. या सगळया महिला झोपडपट्टी मध्ये राहतात. बहुतेक सगळी घरं महिलाच चालवत आहेत. या महिलांमध्ये अनेकजणी एकल पालक आहेत. ज्यांना नवरे आहेत त्यापैकी बरेच दारूडे आणि संशयी आहेत. त्या महिलेने आणलेले पैसे बळकावून, त्याची दारू पिऊन तिचाच संशय घेऊन मारहाण केली जाते. अशा परिस्थितिमध्ये त्यांना आरोग्याच्याही अनेक समस्या असतात. कचऱ्यात काम करत असल्यामुळे त्यांना डोळयाचे विकार होतात; तसंच श्वसनाचे विकार असतात, अनेकींना कायमस्वरूपी खोकला असतो आणि त्वचारोगांचंही बरंच प्रमाण असतं. सतत वाकून काम करण्यामुळे आणि ओझं उचलून चालत राहावं लागल्याने मणक्यांचे आजारही होतात. यासाठी वस्ती पातळीवर जाऊन महिलांशिवाय त्यांच्या संपुर्ण कुटुंबाची डॉक्टर्स कडून तपासणी करून औषधोपचार केले जातात. त्याकरता एलअँडटी कंपनीने मोबाईल व्हॅन दिलेली आहे. प्रत्येक वस्ती मध्ये महिन्याला एकदा अशी पनवेलपर्यंत ती व्हॅन जाते. पनवेल मध्येही आपण 500 महिलांबरोबर काम करतो. काही क्रिटीकल केसेस डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये भरती केल्या जातात. तिथे फीमध्ये सवलत मिळते. नुकतीच एका महिलेची बायपास सर्जरी मोफत झाली आणि तिच्या औषधांचा खर्च करायला एक एन.जी.ओ. पुढे आली. असे अनेकांच्या सहकार्याने हे काम सुरू आहे. डॉ. रामास्वामी सारख्या आय.ए.एस. अधिकार्‍यांची आम्हाला सगळयाच बाबतीत खूप मदत झाली आहे.”
वृषाली मगदूम
वृषाली मगदूम यांनी 2000 साली नवी मुंबईतल्या डम्पिंगग्राऊंडवर जाऊन एकेका कचरावेचक महिलेशी बोलून त्यांच्या परिस्थितीचा सर्व्हे केला होता. तेव्हा त्यांचं भयाण आयुष्य बघितल्यानंतर त्यांना या महिलांसोबत काम करायची प्रेरणा मिळाली. “त्याकाळी अनेकजणी आपल्या मुलांना पण डंपिंगग्राऊंडवर आणत असत. पण आता स्त्रीमुक्तीसंघटनेच्या प्रयत्नामुळे त्या मुलांना आणत नाहीत. संघटनेने इथल्या मुला-मुलींच्या शिक्षणावरही खूप लक्ष दिले आहे. 2000 साली जेव्हा आम्ही काम सुरू केलं, तेव्हा त्यांच्याकडे मुलांचे जन्म दाखलेही नव्हते. त्यांची आई अंदाजाने सांगायची की अमुक दिवशी त्यांचा जन्म झाला त्याप्रमाणे शाळेत घातले जाई. पण आता सर्व मुला मुलींकडे जन्म दाखले असतात. साताठ वर्षांपासून प्रत्येक वस्तीमध्ये अभ्यास वर्ग सुरू आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्याला अभ्यास वर्गासाठी शाळेची खोली दिली आहे. तिथे आपण स्थानिक शिक्षक नेमतो. गॅलेक्सी नावांची कंपनी आहे ती या शिक्षकांच्या पगाराचा खर्च उचलते. नेरूळला राधाकृष्ण नावाचे गृहस्थ आहेत त्यांनी या वर्षी 180 मुलांची फी भरली. दरवर्षी अनेकजण दहावी, बारावी होतात. आता मुलीसुध्दा खूप शिकल्या आहेत. बरीच मुलं-मुली उच्च शिक्षण घेता आहेत. एक मुलगा पी.एच.डी करतो आहे. काही इंजिनिअर झाले आहेत, काही फार्मसीला आहेत.” – हे सांगताना त्यांना खूप अभिमान वाटतो. स्त्री-मुक्ती संघटनेच्या अध्यक्ष ज्योती म्हापसेकर यांनी कचरा वेचक महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी अशी विनंती अधिकाऱ्यांकडे केली आहे.
एकीकडे या महिलांच्या कामाचं स्वरूप सुलभ व्हावं यासाठी संघटना प्रयत्न करते पण त्यांनी या कामातून बाहेर पडायला पाहिजे हे स्त्रीमुक्ती संघटनेचं मोठं उद्दीष्ट आहे. जागरूकता, प्रशिक्षण आणि आत्मनिर्भरतेद्वारे कचरा व्यवस्थापनातील समस्या सोडविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून या महिलांना हातगाडया दिल्या आहेत आणि काही महिला आता संध्याकाळच्या वेळी 3-4 तास भाजी विकतात, चणे शेंगदाणे किंवा चहा विकतात. नवी मुंबईतील सर्व विभागांतील सफाई कामगारांसाठी कचरा व्यवस्थापन व व्यसनमुक्ती अशा विषयांवर प्रशिक्षणही सुरू असते. साधारण अशाच प्रकारचे काम पुण्यातली कागदकाचपत्राकष्टकरी पंचायत देखील ‘स्वच्छ सहकारी संस्थे’ द्वारे करते आहे. बंगळुरू आणि हैदराबाद मधील काही संस्था देखील कचरावेचक महिलांना थोडेफार हक्क मिळवून देण्यात यशस्वी झाल्या आहेत. पण कचरा गोळा करणार्‍या लोकांच्या कामात सुलभता यायला हवी असेल आणि त्यांचे त्रास कमी व्हायला हवे असतील तर कचरा निर्माण करणार्‍या लोकांमध्ये जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे.

मुंबईतील स्त्रीमुक्तिसंघटना आणि पुण्यातील स्वच्छ सहकारी संस्थेच्या कामाला मदत करायची असेल तर https://streemuktisanghatana.org/covid19-donate/ आणि https://fundraisers.giveindia.org/nonprofits/kashtakari-panchayat-trust ह्या लिंकवर आर्थिक सहाय्य करता येईल.


पर्यावरणाच्या रक्षणाचे काम करणाऱ्या कचरावेचक महिलांच्या विषयीचा हा लेख - डॉ. सीमा घंगाळे आणि प्रणित गिरकर यांनी घेतलेली वृषाली मगदूम यांची मुलाखत आणि इंटरनेट वरील पूरक माहिती यावर आधारलेला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form