स्त्रिया, समाज आणि पर्यावरणीय स्त्रीवाद


बरेचदा असा अनुभव येतो की ज्याविषयी आपण प्रदीर्घ काळ अनभिज्ञ किंवा गोंधळलेले असतो ते कुठल्याशा क्षणी अचानक आरशासारखे स्वच्छ आणि स्पष्ट दिसू लागते. असे नवा दृष्टीकोन देणारे क्षण एखाद्याच्या विचारामध्ये मूलभूत बदल घडवत असतात. साधारणपणे तीस वर्षांपूर्वी भारतीय स्त्रीवादी चळवळीमध्ये अग्रेसर असणाऱ्या छाया दातार यांसोबत अनौपचारिक गप्पा सुरू असताना असाच एक क्षण मी अनुभवला. पर्यावरणविषयक साहित्याबाबतच्या या चर्चेत निसर्ग आणि स्त्रियांमधील नाते, छाया दातार यांनी त्यांच्या खास शैलीत त्यांच्या स्वतःच्या तसेच त्यांची ज्येष्ठ मैत्रीण प्रा. मारिया मीएस यांच्या कामाचा आधार घेऊन उलगडून सांगितले. त्यांची मांडणी इतकी बिनतोड होती की त्यांनी सांगितलेली इकोफेमिनीझमची तत्वे माझ्या तात्विक समजेचा एक महत्वाचा घटक बनली. मला त्याचा उपयोग केवळ स्त्रीविषयक प्रश्नच नव्हे तर समाज आणि पर्यावरण यांचे एकमेकांशी असणारे नाते, त्यामधील बारकावे आणि विविध छटा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी झाला. मी प्रस्तुत लेखामध्ये या संबंधांविषयी काही प्राथमिक विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे करताना मी प्रामुख्याने पर्यावरणीय स्त्रीवादावर विपुल प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा आधार घेतला आहे. 
पर्यावरणीय स्त्रीवादामधील मुख्य सिद्धांतानुसार स्त्रिया आणि निसर्ग हे एकमेकांशी नुसतेच जोडलेले नाहीत तर त्यांच्यात सामाजिक आणि जैविक संबंधांची अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीची गुंफण आहे. यामधील पहिले नाते हे स्त्रियांच्या मूल जन्माला घालण्याच्या जबाबदारीशी म्हणजेच जैविक घटकाशी स्पष्टपणे संबंधित आहे. स्त्री दीर्घकाळ गर्भ धारण करते ज्यामध्ये प्राथमिक अवस्थेतील गर्भापासून ते मूल जन्माला येईपर्यंतचा काळ समाविष्ट असतो. शारीरिक पुनरुत्पादन अथवा पुनर्निर्मितीच्या प्रक्रियेतील स्त्रीची ही भूमिका तिला या महत्वाच्या नैसर्गिक घटनेच्या केंद्रस्थानी आणून ठेवते. मानवी समाजाच्या सभोवताली असणाऱ्या विविध नैसर्गिक घटकांची स्थिती आणि गुणवत्ता ही जरी संपूर्ण समाजासाठी महत्वाची असली तरीही ती माता आणि गर्भाच्या दृष्टीने अधिक महत्वाची आणि निर्णायक ठरते. यामागचे कारण असे की ही दोघंही अत्यंत संवेदनक्षम असतात आणि सभोवतालच्या परिस्थितीतील बदलांचा त्यांच्यावर भला-बुरा परिणाम सर्वप्रथम होत असतो. उदाहरणादाखल, पाण्याच्या प्रदूषणाबद्दल समाज बेपर्वा असल्यामुळे सगळ्यांच्या आरोग्याला जरी धोका निर्माण होत असला तरीही, या स्त्रिया आणि तिच्या पोटातील बाळ हे या प्रदूषणाचे सर्वात आधी आणि सर्वात वाईट बळी ठरतात. 

शारीरिक पुनरुत्पादनाच्या पलिकडेही स्त्रिया सामाजिक पुनरुत्पादनाची प्रचंड मोठी जबाबदारी विविध मानवी संस्कृत्यांमध्ये युगानुयुगे निभावत आल्या आहेत. येथे, सामाजिक पुनरुत्पादन ही संज्ञा जगणे व उपजिविका यासंबंधातील विविध कामे अशा अर्थाने वापरली आहे. यामधे, लहान मुले आणि वृद्धांच्या काळजीसह कुटुंबाच्या रोजच्या जगण्याशी निगडित कामे, आव्हानात्मक परिस्थितीत तगून राहण्यासाठी निभवाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या तसेच कुटुंबासंबंधातील इतर अनेक जबाबदाऱ्या सांभाळणे या साऱ्यांचा समावेश होतो. स्त्रियांवरच्या या साऱ्या जबाबदाऱ्या त्यांना निसर्गाच्या किंवा भवतालाच्या (म्हणजेच पर्यावरणाच्या) अगदी जवळ घेऊन जातात, आणि नेमकी हीच गोष्ट पर्यावरणीय स्त्रीवादाच्या दृष्टीने अभ्यासविषय म्हणून महत्वाची मानली आहे. ग्रामीण भागामध्ये पाणी भरण्यापासून तर लहान मुले आणि वयस्कर माणसांची काळजी घेण्यापर्यंत, आणि प्रसंगी त्यांच्याकडे असणाऱ्या पारंपरिक ज्ञानाच्या आधारे वनौषधी गोळा करून आजाऱ्यांवर औषधोपचार करण्यापर्यंतची ही सारी कामे स्त्रिया सातत्याने करीत असतातच. परंतू, अगदी मुंबईतही मी अशा एका साठ वर्षीय महिलेस ओळखतो जी कोविड-साथीच्या काळात बाजारात गर्दीच्या ठिकाणी जाऊन घरातील व्यक्तींसाठी दूध आणि भाजीपाला आणण्याचे अत्यंत धोक्याचे काम निडरपणे करते आहे.

या चर्चेमध्ये यापुढे जाण्याआधी दोन मुद्द्यांबद्दल स्पष्टता आणणे आवश्यक आहे. प्रथमतः मला याची जाणीव आहे की काही स्त्रीवादी विचारवंतानी सामाजिक पुनर्निर्मितीमध्ये स्त्रियांच्या असणाऱ्या या महत्वाच्या भूमिकेचे रोमांटिसायझेशन करण्यातील धोके अधोरेखीत केले आहेत. मला त्यांचे म्हणणे पटते. यातील पहिला धोका असा की अशा प्रकारच्या रोमांटिसायझेशनमुळे स्त्रियांचे उद्दात्तीकरण केले जाते ज्यामध्ये सामाजिक पुनरुत्पादनाच्या स्त्रियांवर पडणाऱ्या अतिरेकी ओझ्याचे समर्थन अनुस्यूत असते. परिणामी, या ओझ्यामुळे स्त्रियांना झेलाव्या लागणाऱ्या कष्ट, हालअपेष्टा, आणि परावलंबित्व याकडे (हेतूपुरस्सर?) दुर्लक्ष केले जाते. दुसरे म्हणजे, स्त्रिया आणि निसर्ग यांच्यातील परस्परसंबंधांची मांडणी अर्कवादी (इसेन्शिअलीस्ट) भूमिकेतून करण्यावर काही विचारवंतांनी रास्त शंका उपस्थित केल्या आहेत. ही अर्कवादी भूमिका, स्त्रियांमध्ये असे काही निसर्गदत्त आणि जैवशास्त्रीय गुणधर्म असल्याचे मानते की जे समाजव्यवस्थेने त्यांना दिलेले नसतात आणि अश्या निसर्गदत्त नात्याद्वारे स्त्रिया निसर्गाशी जोडलेल्या असतात. अशा प्रकारचा अर्कवाद स्त्रियांवर असणारी शारीरिक पुनरुत्पादनाची जबाबदारी आणि त्यातून येणारे ओझे याची योग्य ती दखल घेण्याचे नाकारतो आणि त्यास निसर्गदत्त काम किंवा नशीबाचा भाग (फेट-अकम्पली) समजून त्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणूनच स्त्रियांच्या शारीरिक आणि सामाजिक पुनरुत्पादनाच्या जबाबदाऱ्यांची चर्चा करताना या दोन मुद्द्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.

कोविड साथीच्या काळामध्ये धैर्याने तोंड देणाऱ्या स्त्रिया आणि पाण्याच्या प्रदुषणाचा गर्भवती स्त्रियांवर होणारा परिणाम ही याआधी सांगितलेली उदाहरणे पर्यावरणीय स्त्रीवादाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या चिंतेला अधोरेखीत करतात. सर्वच मानवी समाजांनी पिढ्यांपिढ्या तगून राहण्यासाठी तसेच त्यांच्या आर्थिक वाढीसाठी लागणाऱ्या सर्व भौतिक संसाधने आणि ऊर्जेच्या साधनांचा स्रोत म्हणून निसर्गाचा वापर केला आहे. त्याचप्रमाणे जगण्यासाठीचे आणि आर्थिक वाढीसाठीचे उपक्रम करताना त्यातून निर्माण होणारा टाकाऊ माल व कचरा टाकण्यासाठी देखील निसर्गाचा वापर उकीरडा म्हणून केला जात आहे. मात्र, साधारण चार शतकांपूर्वी झालेल्या औदयोगिक क्रांतीने मानव आणि निसर्गामध्ये असणाऱ्या दुहेरी नात्यामध्ये संपूर्णतः परिवर्तन घडवून आणले. परिणामतः, प्रामुख्याने गेल्या दोनशे वर्षांमध्ये स्रोत आणि उकिरड्याची जागा अशा दोन्ही स्वरूपात नैसर्गिक संसाधनांचा वापर करण्याच्या पद्धती आणि अशा वापराचे प्रमाण यात पराकोटीचे बदल झाले आहेत. त्यामुळे निसर्गाचा वापर केवळ जगण्यापुरता व वाढीपुरता मर्यादित न राहता उपभोग व चैन-ऐषोआरामासाठी केला जात आहे. आता आपण केवळ स्थानिक जंगले उध्वस्त करणे आणि स्थानिक जल-संस्था प्रदूषित करण्यापुरते समर्थ राहिलो नाहीत तर आपल्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे आपल्या भोवतालच्या पर्यावरणाला आकार देणाऱ्या मुलभूत नैसर्गिक प्रक्रियांमध्ये मानवाच्या कारवायांमुळे अडथळा येतो आहे. म्हणूनच निसर्गामध्ये होणाऱ्या अशा सर्व प्रकारच्या हस्तक्षेपांमुळे विविध प्रकारचे प्रतिकूल परिणाम पर्यावरणावर व मानवी समाजावर होताना दिसतात. विविध प्रकारचे प्रदूषण आणि कोवीड सारखे रोगकारक विषाणू निर्माण होणे हा याच दुष्परिणामांचा एक भाग असल्याचे मानणारा एक मोठा वर्ग आहे.

लेखामध्ये आधी म्हटल्यानुसार, सामाजिक पुनरुत्पादनाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्त्रियांना आघाडीवर राहून सभोवतालच्या निसर्गाशी झगडावे लागते. परिणामी, निसर्गातील मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेले दुष्परिणाम सर्वप्रथम व मोठ्या प्रमाणात स्त्रियांना भोगावे लागतात. वर दिलेल्या उदाहरणातील ६० वर्षीय महिलेच्या धैर्यातून, विशेषतः प्राणघातक कोविड आजाराच्या साथीमध्ये ती पत्करत असलेल्या धोक्यातून हे ठसठशीतपणे दिसते. त्याचप्रमाणे जंगलांचा विनाश आणि भूगर्भातील पाण्याचा अनिर्बंध उपसा झाल्यामुळे दुर्मिळ झालेले सरपण किंवा पाणी मिळविण्यासाठी संपूर्ण दिवस रानामध्ये वणवण फिरण्याची वेळ आलेल्या ग्रामीण महिलेच्या दिनक्रमातूनही ही बाब तितक्याच प्रकर्षाने जाणवते. ६० ते ८० फूट खोल परंतु पूर्णपणे आटलेल्या विहिरीतून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाणी काढण्याची कसरत करणाऱ्या महिलांचे चित्र आपल्यापैकी अनेकांनी अनेक वेळा पाहिले असेल. अगदी अशीच परिस्थिती मुलींवर ओढवते जेव्हा ग्रामीण आणि शहरांमधील घराघरातील मुलींना शाळेत जाण्याऐवजी पाण्याच्या टँकरची वाट पाहण्यासाठी रांगेत उभे केले जाते. 
सामाजिक आणि शारीरिक पुनरुत्पादनाच्या कामात मध्यवर्ती भूमिका पार पडताना स्त्रियांच्या आयुष्यात निर्माण झालेल्या असुरक्षित स्थितीची तीव्रता जगभरातील विविध सभ्यता-संस्कृत्यांमध्ये असणाऱ्या पुरुषप्रधानतेच्या विकृतींमुळे केवळ वाढते आहे असे नाही तर, यामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणावर शोषणही होते आहे. पुण्यामध्ये माझ्या वृद्ध आईची काळजी घेण्यासाठी रोज येणारी बाई पुण्याजवळील एका गावातील दलित कुटुंबातून आलेली आहे. लग्नापूर्वी, अगदी लहानपणापासूनच ती एका वीटभट्टीवर मजुरीचे काम करायची. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी लग्न झाल्यापासून ती घरोघरी फरशी पुसणे आणि साफसफाईचे हे पाठदुखीचे काम गेली जवळपास पंधरा वर्षे करते आहे. या उण्यापुऱ्या चौदा-पंधरा वर्षांच्या कालावधीमध्ये तिला पाच मुली, आणि अर्थातच वयाने सगळ्यात लहान असलेला एक मुलगा झाला. या सगळ्या मोठ्या कुटुंबाची जबाबदारी एकटयाने सांभाळताना तिच्या व्यसनाधीन नवऱ्याची तिला काडीची मदत नाही, उलट अनेक वेळा मारहाण सहन करून तिला नवऱ्याच्या दारूसाठी पैसे देणे भाग पडले आहे. नवऱ्याकडून होणारी सततची मारहाण आणि छळाबाबत तिने अनेक वेळा पोलिसांकडे नवऱ्याच्या विरोधात तक्रारी नोंदवल्या, प्रसंगी नवऱ्याला मारावे यासाठी तिने पोलिसांना लाचही दिली. असे असले तरीही ती तिच्या नवऱ्याला सोडून देण्यास अथवा त्याला घराबाहेर काढण्यास तयार नाही, कारण यामुळे वस्तीमध्ये राहण्याच्या दृष्टीने ती आणखी असुरक्षित आणि असहाय्य होईल असे तिला वाटते. एखाद-दोनदा तिने तिच्या गावी जाण्याचाही प्रयत्न करून पाहिला. पण तिच्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा भागतील इतकी उपजीविका तिच्या पाण्याचे सततचे दुर्भिक्ष्य असलेल्या दुष्काळप्रवण गावात मिळणे दुरापास्त होते. पाठ मोडून निघेल असे शारीरिक काबाडकष्ट, तीव्र कुपोषण, सततची आणि कधीकधी क्रूरपणे नवऱ्याकडून होणारी मारहाण, आरोग्याकडे होणारे घोर दुर्लक्ष, आणि तिच्या मुलींच्या सुरक्षिततेच्या काळजीमुळे येणारा सततचा तणाव या सगळ्यांशी अवघ्या तिसाव्या वर्षी लढत लढत तिला कुटुंबाचा गाडा हाकावा लागतो आहे. वस्तुत: अशी उदाहरणे आपल्या नित्य परिचयातली आहेत. पण, या उदाहरणाकडे आपण शारीरिक आणि सामाजिक पुनरुत्पादनाच्या जबाबदाऱ्या, पुरुषप्रधान विकृती, नैसर्गिक संसाधनांच्या नाशामुळे ओढवलेली स्थिती, आणि या सगळ्यामध्ये स्त्रियांचा सर्वप्रथम जाणारा बळी अशा दृष्टिकोनातून पाहू शकतो का? 
या सर्व परिस्थितीला आणखीन एक बाजू देखील आहे. ही बाजू म्हणजे पितृ-सत्ता आणि निसर्गाचा होणारा विनाश यांच्या एकत्रित परिणामांना तोंड देण्यामध्ये, प्रतिकार करण्यामध्ये स्त्रिया बजावत असलेली आघाडीची भूमिका. निसर्गाच्या विनाशाला कारणीभूत ठरणाऱ्या विकास प्रकल्पांच्या तसेच नैसर्गिक संसाधनांवर कब्जा करण्याच्या उद्योगांच्या व सरकारच्या प्रयत्नांच्या विरोधातील जगभरातील लढ्यांमध्ये स्त्रिया अग्रस्थानी राहिल्या आहेत. स्त्री आणि निसर्ग यांमधील परस्पर संबंधांवर काम करणाऱ्या अनेक पर्यावरणीय-स्त्रीवादी विचारवंतांनी व कार्यर्त्यांनी हा मुद्दा पुढे आणला आहे. यात जागतिक पातळीवरील प्रख्यात संशोधक आणि कार्यकर्त्या वंदना शिवा व मेधा पाटकर यांच्या बरोबरीने आपल्यामधील कार्यकर्त्या-मैत्रीणी सीमा कुलकर्णी, सुनिती सु र, सुजाता खांडेकर, मुमताझ शेख, सुप्रिया जान यांचा समावेश करता येईल. वंदना शिवा यांनी हिमालयातील पर्वतमय भागातील स्त्रियांच्या संघर्षाबददल विस्तारपूर्वक लिहिले आहे. मेधा पाटकर सरदार सरोवर आणि त्यासारख्या महाकाय विकास प्रकल्पांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांविरोधातील लढाया स्थानिक स्त्रियांसोबत लढत आहेत. स्थानिक स्त्रियांसोबत लवासा सिटी प्रकल्प आणि वांग-मराठवाडी धरणग्रस्ताच्या प्रश्नावर सुनीती सु.र. काम करीत आहेत, तर सीमा कुलकर्णी पाण्यासह स्थानिक ठिकाणच्या संसाधनांवर स्त्रियांना हक्क मिळावेत यासाठी सातत्त्याने दक्षिण महाराष्ट्रात काम करीत आहेत. याचप्रमाणे मुमताज शेख, सुजाता खांडेकर, सुप्रिया जान मुंबईतील महिलांसाठी पुरेशा संख्येने शौचालये उपलब्ध व्हावीत यासाठी 'राईट टू पी ' हे आंदोलन चालवित आहेत.
  अशाप्रकारे, पर्यावरणीय स्त्रीवादाचा दृष्टीकोन हा जगभरातील स्त्रियांना होणारा त्रास ओळखून-समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतो कारण त्यांचे कुटुंब जगवण्यासाठी तसेच उपजीविका मिळवण्यासाठी स्त्रियांना रोज कराव्या लागणाऱ्या संघर्षावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तो मदत करतो.







सुबोध वागळे ( प्राध्यापक आयआयटी मुंबई )
अनुवाद - ललिता जोशी (सहायक संशोधक आयआयटी मुंबई )







Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form