पर्यावरण आणि स्त्रीया

मी शाळेत असतानाची घटना आहे. इंग्लिशचा वर्ग चालू होता आणि आमच्या बाई व्याकरणातील जेण्डर हा भाग शिकवत होत्या. वर्गात माझे एक उत्तर चुकले आणि चूक सुधारताना त्यांनी सांगितले, nature नेहमी 'she' असते 'he' नव्हे! तेव्हापासून मला नेहमीच ही उत्सुकता वाटत असे की इंग्लिश मध्ये nature स्त्रीलिंगी का आहे? भारतीय साहित्यातदेखील धरती आणि स्त्री या दोन्हीला जननी रूपात पहिले जाते – असे माझ्या नंतर लक्षात येऊ लागले. परंतु पर्यावरणीय स्त्रीवाद अभ्यासाला घेतल्यापासून ह्या कोड्याचे उत्तर किंचित हाती लागल्यासारखे वाटायला लागले. लिंगभाव आणि पर्यावरण या दोन स्वतंत्र संकल्पना एका समान सूत्रात बांधून त्यावर विचार व कृती करणारा हा दृष्टीकोन आहे. निसर्गातल्या वेगवेगळ्या प्रक्रियांची म्हणजे फुलणे, फळणे, बहरणे, पुनरुत्पादन, संवर्धन यांची आणि स्त्रियांच्या आयुष्यातील विविध अवस्थांची पर्यावरणीय स्त्रीवाद या संकल्पनेत सांगड घातलेली दिसते.
स्त्री आणि निसर्ग यांच्यातील नाते हे पुरुष आणि निसर्ग यांच्यातील नात्या पेक्षा जास्त अतूट असते असा या विचार प्रवाहाचा मूळ गाभा आहे. पर्यावरणाची होणारी हानी आणि ह्रास यांचा सर्वात जास्त परिणाम स्त्रियांवरच होत असतो कारण पुरुषांपेक्षा स्त्रियांच्याच कामाचा जास्त संबंध निसर्गाशी येतो, जसे की पाणी आणणे - ही स्त्रियांची पारंपरिक जबाबदारी आहे (असे इथली पुरुषसत्ता मानत असते.) पाण्याची सहज सुलभ उपलब्धता ही सर्व स्त्रियांचे श्रम हलके करते परिणामी त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. याउलट वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण घटते, विहिरी तलाव व इतर जलाशय कोरडे पडतात. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी स्त्रियांना मैलोनमैल पायपीट करावी लागते याचे अतिशय दूरगामी परिणाम स्त्रियांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत असतात. माझ्या आईकडून मी तिच्या पाणी भरण्याच्या कहाण्या ऐकल्या आहेत. ती सांगते, विहिरीवरून पाणी भरून घरी घेऊन येत येत शाळेची वेळ होउन जायची, तसेच पळत पळत शाळेत आले कि खूप थकव्यामुळे वर्गात झोप लागायची. त्यामुळे शाळेचे शिक्षण नीट पूर्ण करता आले नाही. तिच्या इतर मैत्रिणी सारखे पुढे कॉलेज मध्ये जाऊन नोकरी मिळवता आली नाही.
आज मुंबईत राहत असताना आजूबाजूच्या बर्‍याच बायकांचे आयुष्य या पाण्याभोवती कसे जखडून गेले आहे ते अनुभवास येते. नोकरदार स्त्रियांना बाहेर पडताना पहाटेपासून पाण्याची तजवीज करून ठेवावी लागते. अगदी हातावर पोट असणाऱ्या बायका ज्या रोजंदारीवर बाहेर काम करायला जातात त्यांनाही पहाटेपासून थंडीत / पावसात उठून पाणी भरून ठेवावे लागते आणि मग कामावर जायचे. त्याचे खूप वाईट परिणाम त्यांच्या शरीरावर होतात. हा झाला शहरातला अनुभव. गावी राहणाऱ्या माझ्या नात्यातल्या बायका किंवा मैत्रिणी यांनादेखील सरपण आणणे, भाजी शेतात पिकवणे, चुलीसाठी सामान जमवणे, शेतीशी संबंधित इतर कामे करणे अशा जबाबदाऱ्या घ्याव्याच लागतात. त्यासोबत मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी असतेच! स्त्रियांची जास्त कामे निसर्गाशी संबंधित असल्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी आणि ह्रास यांचा सर्वात जास्त परिणाम स्त्रियांवर होत असतो. याकडे पर्यावरणवादी स्त्रीवादाने लक्ष वेधले आहे.
जर Ecofeminism ह्या शब्दाचा गूगलच्या मदतीने शोध घ्यायचा प्रयत्न केला तर खूप वेगवेगळे मुद्दे समोर येतात. काही व्याख्यांमध्ये महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या अनुषंगाने नफ्याच्या नावाखाली निसर्गाचा नाश करणार्‍या प्रक्रियांविषयी आहेत. निसर्गाशी महिलांचे जे नाते आहे – त्याबद्दल काही विवेचन दिसते तर काही व्याख्यातून केवळ शब्दबंबाळपणा दिसतो. सामान्यतः एकोणिसशे सत्तरच्या दशकात ‘पर्यावरणीय स्त्रीवाद’ ही संज्ञा प्रचलित झाली. एक फ्रेंच स्त्रीवादी विचारवंत Francois d Eaubonne यांनी सर्वप्रथम Ecofeminism हा शब्द वापरला. त्यांनी आपल्या लेखनातून स्त्रियांचे पर्यावरणाशी असलेले अतूट नाते व्यक्त केले आणि पाश्चात्य जगातील वर्चस्व प्रस्थापित करण्याची भूमिका स्त्रियांचे शोषण करण्याबरोबर पर्यावरणाचा ऱ्हासाला देखील कशाप्रकारे जबाबदार आहे याचे एकत्रित विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. खरंतर Simone de Beauvoir यांनीही 1952 च्या सुमारास अशी मांडणी केली होती की पितृसत्तेने स्त्रिया आणि निसर्ग दोन्हीचे शोषण केले आहे! युरोपात वाढत्या औद्योगिकरणाच्या अपरिहार्य परिणामातून निर्माण झालेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणीय स्त्रीवाद हा दृष्टिकोन उदयास आला. निसर्गातील प्राणी, जमीन, पाणी आणि वायू ह्या घटकांचे जसे शोषण केले जाते तसेच स्त्रीया, काळे लोक, मुले यांचेही वर्चस्ववादी गटांकडून शोषण केले जाते. म्हणून पर्यावरणीय समस्या ह्या एक प्रकारे स्त्रीयांच्याच समस्या आहेत, असे ईकोफेमिनीझम विचारधारा मानते.
विविध देशांमधला सांस्कृतिक वारसा, राजकीय समस्या आणि आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असल्याने प्रत्येक देशातल्या स्त्री प्रश्नांचे स्वरूप देखील वेगवेगळे असते. जसे स्त्रीवादाचे निरनिराळे प्रवाह आहेत तसे पर्यावरणीय स्त्रीवादात देखील विविध मतप्रवाह आहेत. पण बहुसंख्य देशात औद्योगिकरणामुळे पर्यावरणाचे प्रश्नदेखील उभे ठाकलेले आहेत, लष्करावरील खर्च वाढत आहेत आणि गरीबश्रीमंतामधली विषमतेची दरी देखील वाढत आहे. जगभरात प्रत्येक वर्गात तळाशी असलेल्या स्त्रियांवर याचा विपरीत परिणाम होतो आहे. म्हणून संपूर्ण विकासप्रक्रियेच्या संदर्भात स्त्रीयांच्या प्रश्नांचा नव्याने विचार करण्याचे ‘दर्शन’ (vision) पर्यावरणीय स्त्रीवादाने मांडले. या विचारधारेवर वेगवेगळ्या स्वरूपाची टीकादेखील झाली. उदा. ही चळवळ म्हणजे पाश्चात्य गोर्‍या स्त्रीवादी लोकांची फॅशन आहे, ह्यातल्या कल्पना अव्यवहारी आहेत - असे म्हटले जात असे. मध्यंतरी काही काळ ही विचारधारा एकप्रकारे लुप्त झाल्यासारखे वाटत होते. पण जसजशा पर्यावरणवादी चळवळी पुन्हा जोर धरू लागल्या तेव्हापासून पुन्हा एकदा पर्यावरणीयस्त्रीवादाच्या संकल्पनेकडे पाहायची गरज वाटायला लागली आहे. 

जरी इकोफेमिनीझम हा शब्द पाश्चात्य स्त्रीवादी महिलांनी वापरात आणला असला तरी भारतातले चिपको आंदोलन, केनियामधली ग्रीन बेल्ट चळवळ, त्याच दशकातला पाश्चात्य देशातला अण्वस्त्रविरोधी चळवळीतला महिलांचा सहभाग या आणि अशाच प्रकारच्या विविध चळवळींनी एकत्रितपणे पर्यावरणीय स्त्रीवादाच्या तत्त्वज्ञानाला आकार दिलेला आहे. 
1984 साली बेंगलोर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या वेळी विविध देशातल्या महिला विकासाची रणनीती, धोरणे, सिद्धांत आणि संशोधनासह त्यांचे अनुभव सांगण्यासाठी एकत्र आल्या होत्या. त्यांनी जगातल्या आर्थिक आणि राजकीय संकटांच्या संदर्भात महिलांवर होणार्‍या विकासाच्या परिणामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि मूलभूत अस्तित्वाच्या गरजांना महत्व देईल अशा वैकल्पिक विकासनीतीचा विचार करण्याची गरज मांडली. यातूनच डेव्हलपमेंट ऑल्टरनेटिव्ह्ज विथ विमेन फॉर न्यू एरा (DAWN) ची स्थापना झाली. 1985 साली त्यांनी स्त्रीकेन्द्री विकासाची संकल्पना DAWN डॉक्युमेंट मधून जगासमोर मांडली. पर्यावरणीय स्त्रीवादाच्या संदर्भात हा सामूहिक पद्धतीने लिहिलेला मसुदा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. 
पर्यावरणीय स्त्रीवादाची तपशीलवार मांडणी आणि विकास करण्यामध्ये मारिया मिएस, देवकी जैन , बिना अग्रवाल, वंदना शिवा यासारख्या अनेक स्त्रीवादी विचारवंत स्त्रियांचा मोलाचा वाटा आहे. बिना अग्रवाल मँचेस्टर मधील ग्लोबल डेवलपमेंट इन्स्टिट्यूट येथे अर्थशास्त्र आणि पर्यावरण या विषयाच्या प्राध्यापक आहेत. त्यांच्या मते - पुरुष हे संस्कृतीच्या जवळ असतात तर स्त्रिया या निसर्गाच्या जवळ असतात. पितृसत्ताक व्यवस्थेने संस्कृतीला प्रकृती पेक्षा श्रेष्ठ मानल्यामुळे या व्यवस्थेत स्त्रियाही दुय्यम झाल्या आहेत. मारिया मिएस ह्या जर्मन स्त्रीवादी विचारवंत आहेत. त्यांनी वसाहतवादाच्या भिंगातून पर्यायी विकासनीतीचा आणि स्त्रियांच्या शोषणाचा विचार केला. त्यांनी भारतातदेखील अनेक संशोधन अभ्यास केले आणि स्त्रिया केवळ पितृसत्तेच्या मूक बळी नाहीत तर प्रतिकार करण्याचे अत्यंत सर्जनशील प्रकारही त्यांनी विकसित केले आहेत हे देखील दाखवून दिले. मरिया मिएस आणि वंदना शिवा या दोघींनी मिळून ECOFEMINISM हे पुस्तक लिहिले आहे. 1988 साली वंदना शिवा यांचे Staying Alive हे पुस्तक प्रकाशित झाले. आजची विकासाची संकल्पना पाश्चात्य पुरुषप्रधान आर्थिक दर्शनाशी एकवटलेली आहे आणि ती निसर्ग आणि स्त्रियांच्या शोषणावर आधारित आहे – असे मत या पुस्तकात त्यांनी मांडलेले आहे. 
वंदना शिवा एक महत्त्वाच्या पर्यावरणीय स्त्रीवादी विचारवंत आहेत . त्या नवदान्या संशोधन फाउंडेशनच्या संस्थापक संचालक आहेत. 1993 मध्ये त्यांना राईट टु लाइव्हहुड अवॉर्ड (पर्यायी नोबेल पुरस्कार) आणि २०१० चा सिडनी पीस पुरस्कार मिळाले आहेत. मे महिन्यात लिहीलेल्या एका लेखात वंदना शिवा म्हणतात की सध्या जगात तीन प्रकारच्या आपत्ती आलेल्या आहेत. एक तर आहे करोना व्हायरसची साथ, दुसरी भुकेची महामारी आणि तिसरे अब्जावधी लोकांचे रोजगार नष्ट होण्याचे अरिष्ट ! आजवर करोना व्हायरस मुळे लाखो माणसे बाधित झाली आहेत. रोज कित्येक मृत्यू होत आहेत. हा एक धोक्याचा इशारा समजून आपण पृथ्वी आणि मानवतेचे रक्षण करण्यासाठी लोकशाहीवर आधारित नवीन अर्थव्यवस्था तयार करायला पाहिजेत. संपूर्ण जगावर ओढवलेल्या ह्या नव्या संकटात कदाचित ‘पर्यावरणीय स्त्रीवाद’च सुटकेचा मार्ग दाखवू शकेल!

 डॉ सीमा घंगाळे
वंदना खरे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form