
‘दोन रुग्णांना मी सोमवारी तपासले. ते माझ्या क्लिनिकमध्ये आले होते. तेव्हा मला शंका आली होती तसेच झाले. बुधवारी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. मग मीही स्वत:ला इतरांपासून थोडं लांब ठेवले. पण आता १६ दिवस झालेत. मी ओके आहे.’ हा अनुभव आहे डॉ. प्रणाली बाणवलीकर यांचा. त्या बालरोगतज्ज्ञ आहेत. अर्थात त्यांच्या क्लिनिकमध्ये छोट्यांबरोबर त्यांचे पालकही येतातच.
कोरोनाची भीती काही संपत नाही. सरकारने सगळ्यांनाच घरात बसण्याचे आवाहन करत लॉकडाऊन घोषित केले. पण त्याही काळात काही स्त्रियांना घराबाहेर पडावेच लागायचे. त्यातल्याच डॉक्टर प्रणाली बाणवलीकर.
त्यांच्या दिनचर्येत या लॉकडाऊनच्या काळात कसा बदल झाला? त्या सांगतात, ‘ पूर्वी मी रोज दोनदा क्लिनिकला जायचे. पण आता या काळात मी एकदाच संध्याकाळी ४ ते ९ वाजेपर्यंत जाते. म्हणजे सकाळी घरातले काम करता येते. लॉकडाऊन असं एकदमच अंगावर आदळलं. त्यामुळे घरातही सगळं सामान भरून ठेवलं. तसं क्लिनिकला लागणारं सॅनिटायझिंगचं सर्व सामान आणलं. सगळी तयारी झाल्यावरच मी क्लिनिक सुरू केलं.’ क्लिनिक तर सुरू झालं, पण नेहमीपेक्षा येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होती. ‘मी अंधेरीत असले तरी पेशंटपैकी बरेच जण विरार, मीरा रोड इथून येणारे होते. त्यांना येणं शक्य नसायचं. म्हणून मी रोज फोनवर सकाळी आणि संध्याकाळी कन्सल्टेशन सुरू केलं आणि एक दिवसाआड क्लिनिक सुरू ठेवलं.’
प्रणाली यांच्या भागात सीनियर डॉक्टर्स जास्त असल्याने ते क्लिनिक बंद ठेवत. त्यामुळे त्यांचे रुग्णही मग प्रणालीकडेच यायचे. शिवाय कुटुंबातले लोक , फ्रेंड्स यांचेही फोन यायचे. सगळीकडे पॅनिक वाढत होतं, त्यामुळे जरा काही झालं तरी घाबरून सर्वांना डॉक्टरचा सल्ला घ्यावासा वाटत असे. त्यावेळी अनेकदा नैतिक आधार देणे, सांत्वन करणं ही कामंदेखील प्रणाली करत होत्या.
क्लिनिकमध्ये प्रणाली रुग्णांना तपासताना पुरेपूर काळजी घेतात. त्या स्वत: पीपीई किट घालतातच, पण पेशंटला तपासताना त्याने काही बोलायचे नाही आणि डॉक्टर ही काही बोलत नाहीत. नंतरचे मार्गदर्शन करताना रुग्ण रिसेप्शन भागात बसलेला असतो आणि या आतून म्हणजे लांबून त्याला औषधं सांगतात. प्रत्येक रुग्ण बाहेर पडल्यानंतर सॅनिटायझेशन तर होतेच. सुरुवातीला प्रणालीच्या पतीला वाटत होते की - एवढा धोका पत्करू नये. पण प्रणाली सांगतात, ‘लहान मुलांना अनेकदा लस द्यावी लागते. पालिकेच्या रुग्णालयात कोविडमुळे हे काम बंद होतं. म्हणून मग मला त्यासाठीही जाणं भाग होतं. कारण लसीकरणात दिरंगाई करून चालत नाही.’
कामाच्या ओझ्याबद्दलही त्या म्हणतात, ‘ समजा मी रोज ५० पेशंट बघते, त्याऐवजी १०० आले, तर ते मला झेपू शकतं. कारण ते माझा नेहमीचं काम आहे. पण घरकाम करायला घरात एरवी ३ बायका होत्या. त्या तिघीही बंद झाल्या. मग ते काम अचानक अंगावर पडलं. जी कामं इतके दिवस फारशी केली नव्हती, त्याचा ताण तर नक्कीच आला.’ शिवाय प्रणाली यांनी अनेक भारतीय घरातलं सर्वसामान्य चित्रच समोर उभं केलं. त्या म्हणाल्या, ‘ घरातल्या पुरुषांना काम करण्याची अजिबात सवय नाही. आतापर्यंत नाश्ता वगैरे बनवून त्यांच्या हातात देण्याचीच माझी सवय. त्यामुळे सुरुवातीला हे सर्व मॅनेज करणं वेळखाऊ होतं. म्हणूनच सुरुवातीच्या काळात मी क्लिनिक बंद ठेवलं होतं.’
प्रणाली या काळातली सकारात्मक गोष्ट सांगतात, ती म्हणजे त्यांना घरी भरपूर वेळ देता आला. त्यांचे पतीही वर्कफ्रॉमहोम करत होते. घरी दोन मुलगे. त्यातल्या एकाची नुकतीच बारावी झालेली. दुसरा अमेरिकेला शिकायला गेला होता. पण कोरोना कहर सुरू झाल्यानंतर प्रणाली यांनी त्यालाही परत भारतात आणण्याचे प्रयत्न केले आणि त्यात त्या यशस्वीही झाल्या. या काळात घरातल्यांशी संवाद वाढला, असंही त्या सांगतात. एकमेकांबरोबरचा मोकळेपणा वाढला. अगदी एकमेकांच्या आवडीनिवडीही नव्याने कळल्या. महत्त्वाचं म्हणजे समंजसपणा वाढला, असंही त्या सांगतात. त्या गमतीने म्हणतात, ‘ नवऱ्याने नुसतं मुलाला सांगितलं की जा रे आईला मदत कर, तरीही बरं वाटतं.’ ‘ खूप दिवसांनी मी इतका वेळ घरात दिला, त्यानेही छान वाटलं. वेगवेगळे पदार्थ करून पाहिले. यु ट्युबवर बघून रसगुल्ल्यापासून बरंच स्वादिष्ट बनवलं. त्याने खूप आनंदही झाला.’ असेही त्या म्हणाल्या.
प्रणाली म्हणतात - ‘ घरातल्या पुरुषांना हे काम आपलंच आहे. आपण बायकोला, आईला मदत करत नाही. तर हे आपल्या घरातलं काम आपण करतोय, हे समजून द्यायला थोडा वेळ लागला. पण नंतर त्यांनाही त्याची जाणीव झाली.’ याच काळात बाहेरून एकदम सामान आणणं, मग जेवणं बनवणं ही कामं एकदम अंगावर पडल्याने प्रणाली यांच्या खांद्याला थोडी दुखापतही झाली होती. अर्थात, कोरोना काळात मनावर तणाव तर असतोच. एक अदृश्य चिंता सतत अवतीभवती असते. अशा वेळी प्रणाली यांना योगाचा आधार मिळाला. रोज सकाळी त्या ऑनलाइन योग करतात. त्याचा फायदा हा होतोच.
आपल्याला कोरोना होईल ही भीती डॉक्टरला कितपत असते? याबद्दल प्रणाली सांगतात, - ' खरं सांगायचं तर एकदा का क्लिनिकला गेलं की ती भीती जाते. पण अनेकदा येणारे पेशंटही खरं काय ते सांगत नाहीत. एक-दोन पेशंटच्या घरातल्यांना कोरोना झाला होता - त्यांनी हे मला सांगितलंच नाही. पण मी एक करते, आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येकालाच कोरोना आहे, असं समजून माझी सर्व काळजी घेते. जर मला इन्फेक्शन झालं, तर घरचेही धोक्यात येणार. म्हणूनही काळजी घ्यावी लागते आणि करावीही लागते. पण डॉक्टरांना काही पर्याय नाही,हेही खरं!’