ज्येष्ठ गुजराती साहित्यिक कुंदनिका कापडिया यांचे निधन होऊन आज पंधरा दिवस झाले. कुंदानिकाबेनने लिहिलेल्या – ‘सात पगला आकाशमा’ (‘सात पावले आकाशी’) या कादंबरीमुळे अनेक मराठी वाचकांना त्यांचे नाव परिचित होते. पण अनेकांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या इतर पैलूंविषयी फारशी माहिती नाही. म्हणून गुजराती साहित्यविश्वाशी जोडलेल्या काही मित्रमैत्रिणींशी बोलून ह्या स्त्रीवादी लेखिकेचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न केला आहे!


१९८४ साली ही कादंबरी नवभारत साहित्य मंदिर तर्फे पुस्तक रूपात प्रकाशित झाली. जेव्हा ह्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तेव्हा सुरुवातीचा हा विरोध हळूहळू मावळला. नंतर अनेक पुरस्कारांनी ह्या कादंबरीचा गौरव होत राहिला. कादंबरीच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या. अनेक भाषांमधून ह्या कादंबरीचे अनुवाद झाले. त्यावर आधारित गुजराती आणि हिन्दी टीव्ही सिरियल देखील झाल्या.
गुजराती लेखक आणि नाटककार राजू पटेल म्हणतात की ह्या कादंबरीने गुजराती समाजावर एक महत्त्वपूर्ण ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या मते ‘आई रिटायर होते’ ह्या प्रसिद्ध मराठी नाटकाची प्रेरणा ह्याच कादंबरीतील एका प्रकरणापासून घेतलेली आहे.
मृणालिनी देसाई यांनी ह्या कादंबरीचा मराठीत अनुवाद केलेला आहे. त्याचा काही भाग ‘स्त्रीउवाच’ वार्षिकात 1987 मध्ये प्रकाशित झाला होता, तेव्हा तो स्त्रीवादी वाचकांना आपलासा वाटला होता. ह्या कादंबरीत केवळ स्त्रियांवरच्या अन्यायाची चर्चा न करता एका सुंदर भविष्याची कल्पना देखील उलगडून दाखवली होती.
बडोदा येथे ‘ओळख’ संस्थेद्वारे काम करणाऱ्या निमिषा देसाई म्हणतात – “माझ्यासाठी तर ही कादंबरी म्हणजे बायबलच आहे. त्यातला प्रत्येक शब्द पितृसत्तेला आव्हान देतो. त्यांची सगळी पात्रं बोल्ड, स्वाभिमानी आणि स्वतःचा वेगळा दृष्टीकोन असलेली आहेत. एक स्त्रीवादी कार्यकर्ता म्हणून काम करताना ह्या कादंबरी मधून मला सतत प्रेरणा मिळते. कम्युनिटी वर्क करताना ह्या कादंबरीची मला प्रचंड मदत झाली. आमच्या संस्थेतर्फे आम्ही अनेक कार्यकर्त्यांना हे पुस्तक भेट म्हणून दिलेले आहे.”
निमिषा देसाई यांची कुंदनिकाबेन सोबत चांगली मैत्री होती. त्यांच्या आठवणी जागवताना त्या सांगत होत्या , “ कुंदनिकाबेन अत्यंत मोहक व्यक्तिमत्त्वाच्या होत्या. त्या अतिशय प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांना छान, नीटनेटकं दिसायला खूप आवडायचं. छानशी साडी, त्यावर शोभेशी एखादी माळ अशीच त्यांची प्रतिमा माझ्या आठवणीत आहे. त्यांच्याशी गप्पा मारायला खूप मजा यायची!मी अनेकदा त्यांना नंदीग्राम मध्ये जाऊन भेटत असे. ”
नंदीग्राम हा कुंदनिकाबेन यांनी सुरू केलेला आदिवासी आश्रम आहे. 1987 साली कुंदनिकाबेन आणि त्यांचे पती मकरंद दवे दोघेही मुंबई सोडून वलसाड जवळच्या एका खेड्यात स्थायिक झाले. एका उजाड माळरानावर त्यांनी आदिवासी विकास कामासाठी नंदीग्राम आश्रमाची स्थापना केली होती. आजही तिथे आदिवासीना आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीकोनातून शिक्षण आणि आरोग्य सुविधांविषयी काम केले जाते. शेवटपर्यन्त कुंदनिकाबेन नंदीग्राम मध्येच कार्यरत होत्या. 30 एप्रिल रोजी वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी तिथेच अखेरचा श्वास घेतला.
वंदना खरे
Tags
आदरांजली
आभार, संक्षिप्त और सुरेख परिचय.
ReplyDelete