करोना निमित्तमात्र....

भूकंप, सुनामी, पूर , गॅसगळती अशा अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांनी माणसाला घराबाहेर काढलं होतं परंतु माणसांना घरात बंद करणारी ही एकमेव आपत्ती आहे. घर सर्वात सुरक्षित आहे असं म्हटलं जातंय! आजही जगभर घर हे निर्विवादपणे स्त्रियांचं बलस्थान आहे. कुटुंबातले सगळे सदस्य डोळ्यासमोर असावेत याबद्दल त्या आग्रही असतात. करोनामुळे मुलं आणि नवरा आठवड्याचे सात दिवस चोवीस तास, प्रदीर्घ काळ एकत्र असण्याची संधी प्रथमच अनेकींच्या आयुष्यात आली. पण त्याचे अनेक भले बुरे परिणाम पुन्हा महिलांनाच सोसावे लागत आहेत. प्रत्येक वर्गात या परिणामांचे नवनवीन आयाम समोर येत आहेत. 

कामाच्या रगाड्यात दिवसभरात रात्रीचं जेवण आणि झोप एव्हढयापुरती घरात एकत्र येणाऱ्या माणसांना पैसा आणि खाण्याची (आणि पिण्याचीही) विवंचना असताना सतत रिकामटेकडा सहवास लाभणं याचे महिलांवर काही फारसे सकारात्मक परिणाम झाले नाहीत. बाहेर कामाला जावं लागत नसेल तरीही महिलांना रोज दिवसभर पुरून उरेल एव्हढं काम घरात असतं. सर्वाना खायला करून घालण्याची जबाबदारी निभावताना या टंचाईच्या दिवसात त्यांचा कस लागला आहे . बहुसंख्य पुरुषांना घरातली कामं येत नाहीत आणि या कामांना बायकी म्हणून कमी लेखल्यामुळे घरात स्वत:ला त्या कामात गुंतवून ठेवता येत नाही. मुलं आणि पत्नीशी संवाद साधावा अशी मानसिकता समाजाने घडू दिलेली नाही - त्यातच अनिश्चितता, भय याचा राग पुरुषांनी नेहमीप्रमाणे हक्काच्या बायांवरच काढला आहे .

ज्या महिला तथाकथित सुरक्षित नात्यात पुरुषांबरोबर घरात आहेत ते पुरुष त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करोनाचा वापर करून घेत आहेत. या काळात भारतात घरगुती हिंसाचार आणि मुलांवरच्या अत्याचारांचं प्रमाण वाढत आहे अस हेल्पलाईन आणि समुपदेशन सेवांकडे आलेल्या वाढत्या तक्रारीवरून स्पष्ट झालं आहे. हा काळ संपल्यानंतर कौटुंबिक कलहांमुळे घटस्फोटाचं प्रमाण ३० टक्क्याने वाढेल असा तज्ञांचा अंदाज आहे. या काळात महिलांना तक्रारी करता याव्या यासाठी हेल्पलाईन, संकेत ठरवणे, फोन न करता मदत मिळवण्यासाठी अॅप हे सगळे उपाय तोकडे ठरत आहेत. कोरोना आणि महिलांवरील अत्याचार या विषयावर जगभरातील धक्कादायक आकडेवारी पुढे येत आहे. कोरोना प्रतिबंधाच्या कामात जखडलेल्या पोलिसांना या तक्रारींकडे लक्ष द्यायला आता तर अजिबात वेळ नाही आहे.

गावातून शहरात आलेल्या, निम्न मध्यमवर्गातल्या किंवा गरीब वस्तीत राहणाऱ्या स्त्रिया घरकामगार, भाजी/किराणा/ इस्त्री/ शिवणकाम/ पार्लर आदी छोटं दुकान चालवून घराला हातभार लावत होत्या, बचतगटातून छोटं मोठं कर्ज काढून मुलांची शिक्षणं, मोबाईल आदी गरजा पूर्ण करत होत्या. त्यात खंड पडला आहे. त्यांचे ग्राहक वस्तीतलेच असल्याने आता पुन्हा व्यवसाय सुरळीत होण्याची आशा उरली नाही. कर्जावरचं व्याज, सोनाराकडे गहाण ठेवलेले दागिने, हफ्त्याने केलेली खरेदी, सुट्टीचा पगार द्यायला मालकिणीनी दिलेला नकार यामुळे हवालदिल झाल्या आहेत. मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढत जाणाऱ्या दुसऱ्या, तिसर्‍या घरबंदीत घर कसं चालवायचं हा प्रश्न त्यांना भेडसावतोय.

बाहेरचे लोक आपल्या गावात शिरू नयेत म्हणून पुरुष गस्त घालत आहेत. त्यात महिलांवर विशेषतः किशोरी आणि एकट्या महिलांवर लक्ष ठेवलं जात आहे. मुलींना, महिलांना बाहेर पडू दिले जात नाही. दाटीवाटीच्या वस्तीत महिलाकडे वाईट नजरेने बघणे, त्रास देणे, अश्लील शेरे मारणे त्याच्या नकळत त्यांचे फोटो, व्हिडियो काढणे, असे प्रकार सर्रास चालू आहेत. चोवीस तास घरात राहता येतील अशी ऐसपैस घरं शहरातून नाहीत, त्यामुळे मुलं वारंवार घराबाहेर जात होती. घरातली कामं, स्वयंपाक, वाळवणं आदी कामं करून मोठ्या माणसांची, पुरुषांची हरप्रकारे मर्जी राखण्याची कसरत करतानाच बाहेर पोलिसांच्या तावडीतून मुलांना सोडवून आणणं, मोठमोठ्या रांगेत उभं राहून बँकेत आलेली सरकारी मदत, राशन आणणं आदी कामं करत आहेत. ज्यांचे नवरे नाहीत , आजारी आहेत किंवा काम करू शकत नाही त्यांना घराबाहेर पडून अन्न – औषधाची सोय करण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

चौकोनी कुटुंब आणि पक्कं घर, नियमित उत्पन्न या सुरक्षित कवचात राहणाऱ्या मध्यम/ उच्च मध्यमवर्गीय स्त्रीलाही, कोरोना संसर्ग आणि घरबंदीमुळे वेगवेगळ्या बदल, परिणामांना सामोरं जावं लागत आहे. पूर्वी या महिलांना स्वयंपाक, वरकाम यासाठी मदतनीस आणि असल्याने नोकरदार आणि गृहिणींना टीव्हीवर मालिका पहाणे, भिशी पार्टी, योग, झुम्बा आदी छंद जोपासता येत होते. वेगवेगळ्या चवीच्या पदार्थांची हॉटेल्स, स्पा, पार्लर, पर्यायी उपचार पद्धतीतून स्वत:साठी वेळ काढत होत्या. करोनाने त्यांना ५० वर्ष मागे ढकललं आहे. घरकाम. स्वयंपाक, सुट्टीवर असलेली मुलं, वृद्धांची सुश्रुषा आणि घरातून कार्यालयीन काम अशी त्यांची कसरत चालू झाली आहे.

पण या आजाराची सर्वात जास्त झळ बसली आहे ती स्वत:चं रेशन किंवा आधार कार्डही नसलेल्या वर्गातील महिलांना. या असंघटीत, बेघर, एकट्या, भटक्या, रस्त्यावर राहणाऱ्या, वीटभट्टी, बांधकाम कामगार आदी स्थलांतरित श्रमिक, कचरा वेचणाऱ्या, सेक्स वर्कर, हिजडा, घरकामगार आदी महिलांच्या उत्पन्नाचं साधन आणि मार्ग बंद झाले आहेत. ज्यांना घरात बंद राहण्यासाठी घरंच नाहीत अशा महिलांसाठी शहरात काही आधारगृह ( शेल्टर ) आहेत, तिथे त्या रहात आहेत. तिथे आता इतकी गर्दी झाली आहे कि कोरोनाची लागण रोखण्यासाठी आवश्यक सहा फुटांचं शारीरिक अंतर राखणं अशक्य आहे. पैसा नाही, काम नाही, पेन्शन नाही – अशा परिस्थितीत घरबंदीचे हे दिवस ठिकठीकाणी मिळणाऱ्या शिजवलेल्या अन्नावर काढून काही महिला गुजराण करत असल्या तरी आत्ता किमान खर्चासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि त्या करत असलेलं काम पुन्हा कधी सुरु होईल त्याची शाश्वती नाही.


घरबंदी जाहीर झाल्यापासून वस्त्या, अनाथालय, बांधकाम मजूर , सेक्स वर्कर्स आणि तृतीयपंथी यांना मदत द्यावी यासाठी फोन आणि संदेशांचा पाऊस पडत होता. या गटांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या संस्थांनी त्यांच्याशी संबंधित लाभार्थींच्या नावांच्या याद्या तयार केल्या आहेत. मदतीचे काही हात पुढे येत आहेत, पण ते पुरे पडत नाही आहेत किंवा संचारबंदीमुळे त्यांच्यापर्यंत पोहोचताही येत नाही आहे. काहीनी तात्पुरती मदत देऊ केली, पण अगोदर एकवीस दिवसांपुरती उत्साहाने केलेली मदत दीर्घकाळ चालू ठेवणं कठीण होत आहे. संस्था, गट यांच्याशी न जोडलेल्या महिलांची संख्या जास्त आहे. 
या काळात महिलांना लागणार पाळीचे पॅड, गर्भ निरोधक पोहोचवणं आवश्यक आहे त्याची गरज कुणी ओळखली नाही. गर्भवती महिलांचं आणि लहान मुलांचं पोषण यांचं संस्था आणि सरकार करत असेलेलं काम ठप्प झाल्याचे अनुभव अनेक वेबिनारमध्ये पुढे आले.

जशा अडचणीत असलेल्या महिला आहेत तशा सर्वांना सेवा पुरवणाऱ्या, भार वाहणाऱ्या अनेक महिला आहेत . आंगणवाडी सेविका, आशा, नर्स आदी आरोग्य आणि सरकारी कर्मचारी, सफाई कर्मचारी या आजही महिलाबहुल सेवा आहेत. अनेक व्यावसायिक , नोकरदार, पत्रकार, पोलीस आणि डॉक्टर या महिला स्वत:च्या घरी आणि बाहेर दोन्ही आघाड्या सांभाळत आहेत. लोकांना सेवा पुरवताना घरी लागण घेऊन जाऊ नये याची खबरदारी घ्यावी लागतेय. रुग्णालयाजवळ राहण्याची व्यवस्था करावी यासाठी मुंबईत नर्सेसना भांडावं लागलं. त्यानंतर आता तशी सोय करण्यात आली आहे. आपल्यामुळे घरी लागण होऊ नये या काळजीने अनेक महिला महिनोंमहिने घरी गेल्या नाहीत तर काही नाईलाजाने मुलांना बरोबर घेऊन अर्ध्या सुट्टीतून परत येऊन आपलं कर्तव्य बजावत आहेत. नोकरी जाण्याची किंवा आजाराची लागण होण्याची टांगती तलवार त्याच्या मानेवर आहे. सरकारी यंत्रणेत सर्वात तळाशी असलेल्या आणि लोकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येणाऱ्या ‘आशा’ आणि आंगणवाडी सेविकांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था आहे. कोरोना लागणीची शक्यता असलेल्या लोकाना शोधण्याचं आणि मुलांपर्यंत मध्यान्ह भोजन पोहोचवायचं काम या करत आहेत. त्यांना घरूनही विरोध होत आहे आणि त्या आपल्या दारात आल्याबद्दल नागरिकही राग राग करत आहेत. प्रतिबंधाच्या खबरदारीची पुरेशी साधनं उपलब्ध नसतानाही या महिला आपलं कर्तव्य निभावत आहेत. जगभरात महिला नेतृत्व असलेल्या जर्मनी, न्यूझीलंड, तैवान, डेन्मार्क, देशांनी कोरोना रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि कार्यनिती याची वाहवा होत आहे हा केवळ योगायोग नाही.

यापूर्वी दुसऱ्या महायुद्धात पुरुष युद्धावर गेल्यावर महिलांनी उत्पादनात सहभाग घेऊन देश, अर्थव्यवस्थेला आपलं योगदान दिलं. आज या विषाणूने संपूर्ण विपरीत परिस्थिती निर्माण करून लोकांना घरात पाठवलं आहे. आता एकूणच रोजगाराच्या संधी कमी झाल्यावर सर्वात अगोदर महिलांनाच घरात बसावं लागेल. अकुशल, आर्थिक पाठबळ नसलेल्या परिस्थितीने बेजार स्त्रियांना कमी वेतनावर कामं करावी लागतील किंवा बरे पैसे मिळवण्यासाठी महिलांकडून अपेक्षित असलेल्या पुरातन व्यवसायाकडे वळावं लागेल. पूर्वीपासून या व्यवसायात असलेल्या महिलांची स्थिती आणखी बिकट होईल. भूक भागवायची की आजारापासून बचाव हे दोनच पर्याय असतील तर अगोदर तगून राहण्यालाच महत्व मिळेल.संपूर्ण कुटुंबाची आर्थिक घडी सांभाळत त्यांची शारीरिक , मानसिक स्वास्थ्य सांभाळण्याची महत्वाची जबाबदारी महिला निभावत आहेत त्याबरोबर गर्भनिरोधकाशिवाय लैंगिक संबंधांचा, नको असलेल्या गरोदरपणाचा धोका पत्करत आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर पुरुष घरी परत आल्यावर वर्षभरात घरोघरी पाळणे हलले होते ते ‘बेबी बूम’ प्रसिद्ध आहे. आता ४५ ते ६० दिवसाच्या या घरबंदीत महिलांच्या विशेष गरजांकडे लक्ष न दिल्यामुळे ‘२०२१:बेबी बूम पार्ट टू’ येण्याची पूर्ण शक्यता दिसत आहे.

आपल्या समाजात आधीच असलेली गरीब श्रीमंत यातली दरी, स्त्री पुरुष विषमता , जाती धर्माची उतरंड कोरोनाने आणखी अधोरेखित केली आहे. या आजाराला आपल्या देशाने खास धार्मिक रंगही चढवला आहे त्यामुळे भेदभावाचा सामना करणाऱ्या अनेक कुटुंबाना गावाबाहेर वाळीत टाकण्यात आलं आहे त्या महिला आणि मुलांचं जगणं सर्व बाजूनी असुरक्षित झालं आहे. काश्मीरसारख्या प्रदेशात या काळातही दोन देशात एकमेकांवर हल्ले चालू आहेत तेव्हा जीवाच्या भीतीने नाईलाजाने घराबाहेर येण्याशिवाय तिथल्या महिला, मुलांपुढे दुसरा पर्याय नाही. मध्यंतरी दिल्लीत भूकंप आला, विशाखापट्टणमला गॅसगळती झाली तेव्हाही आजाराची लागण होण्याच्या भीतीपेक्षा जीव वाचवण्यासाठी लोकांना घराबाहेर यावं लागलं. याच काळात स्थलांतरित मजुरांची अवस्था आणि रेल्वेरुळावर, रस्त्यावर आलेलं मरण यातून आपलं अत्यंत क्रूर आणि नीच रूप समोर आलं आहे. वृद्ध, गरीब, आजारी आणि वंचित लोक जगभर करोनाला बळी पडत आहेत. जे बळी आहेत त्यांनाच दोषी ठरवलं जात आहे. त्या लोकांनीच जादा कष्ट सोसून डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सावरावी अशी अपेक्षा केली जात आहे. करोना हा आपला आरसा नाही भिंग झाला आहे. संकुचित दृष्टी, स्वार्थी राजकारण, संवेदनशील नेत्यांचा आणि कार्यनीतीचा अभाव यामुळे अन्याय, शोषण, भेदभाव, आणि हतबल गटातल्या लोकांवर वर्ण, वर्ग, वय, धर्म, लिंगाधारित हिंसा या काळात वाढताना दिसत आहे. वैयक्तिक, मानवनिर्मित, नैसर्गिक आपत्ती की आजाराची लागण होण्याचं भय आणि जगण्याची इच्छाशक्ती कोण कुणावर वरचढ ठरणार हे काळच ठरवेल. ऑगस्टपर्यंत तरी घरबंदीचं कवित्व सुरू राहील. त्यानंतर करोनासंसर्गाचा दुसरा टप्पा सहा महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबरमध्ये येणार आहे आणि कोरोनावरची लस शोधण्यासाठी १६ ते १८ महिन्यांची वाट पहावी लागणार आहे. तोवर या जगात जे स्वास्थ्य, मानवी मुल्यं आणि सकारात्मकता तगून राहील त्यात घराघरात आणि घराबाहेर खपणाऱ्या स्त्रियांचा निश्चितच मोलाचा वाटा असेल.













Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form