लॉक डाऊन सुरू होऊन आता जवळजवळ दोन महीने झाले. आता आपण सगळे ह्या ‘न्यू नॉर्मल’ सोबत अॅडजस्ट करायला लागलो आहोत. अर्थात त्यासाठी प्रत्येकाची आपापली वेगळी पद्धत असणार. मी अनेकदा इंस्टाग्रामवर मांजरीचे व्हिडीओ बघते, फिल्म्स बघते, थोडं फार वाचते, आणि भरपूर झोपा काढते. सध्या वातावरणच असं उदास झालंय की फार प्रॉडक्टीव असावंसं वाटतच नाहीये. त्यात मीडियाचं भयंकर म्युझिक सोबत बातम्या देऊन घाबरवणं, नेत्यांचं घाणेरडं राजकारण, रस्त्यावरून चालत निघालेली कष्टकरी माणसं - अशा गोष्टी पाहून अजूनच भयाण वाटतं! त्यामुळे कित्येक लोक बराचवेळ सोशल मिडियावर पडीक असतात. कधी जुनेपुराणे फोटो पोस्ट करणं, रेसिपीज् शेअर करणं, मीमस् बनवणं किंवा व्हॉटसॅपवर जोक्स फॉरवर्ड करणं असे उद्योग करून त्यातल्या त्यात सुख शोधत असतात. पण एकीकडे आपापलं वैयक्तिक आयुष्य सुखाचं करायचं प्रयत्न करत असताना त्याच कारणाने दुसऱ्याला त्रास होऊ नये अशी काळजी देखील घ्यायला पाहिजे. कारण आपल्याला सगळ्यांनाच अशा वेळी एकमेकांकडून सहानुभूती आणि सपोर्ट मिळण्याची गरज आहे. पण दुर्दैवाने असा सपोर्ट सगळ्यांना मिळत नाहीये असं म्हणावं लागतंय!

आणखी एक कार्टून तर फारच चीड आणणारं होतं – त्यात एक जाड्या बाईचं चित्र होतं आणि एक बारीक बाईचं चित्र होतं. जाड्या बाईच्या चित्राच्या वर लिहिलं होतं ' कामवाल्या बाया लॉक डाऊन नंतर अशा दिसायला लागतील ' आणि बारीक बाईच्या चित्राच्या वर लिहिलं होतं ' बायको लॉक डाऊन नंतर कधी नव्हे ती घरातली कामं केल्यामुळे अशी दिसायला लागेल' हे व्यंगचित्रं म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे. घरेलू कामगार बायका जरी कामावर जाऊ शकत नसल्या तरी त्यामुळे त्यांना ‘आराम’ मिळतोय – हा फारच मोठा गैरसमज आहे. उलट त्यांची उपासमारच जास्त होत आहे. त्या ज्यांच्या घरी काम करत होत्या तिथे त्यांना थोडंतरी खायला मिळत असे. आता लहानसहान कामधंदा करणाऱ्या नवऱ्याची कमाई थांबलेली आहे, बाईला स्वत:लाही पगार नाही – अशा परिस्थिती मध्ये त्यांना चिडचिड करणाऱ्या नवऱ्याचा मारच जास्तवेळा खावा लागतोय. एकुणातच जगात बायकांचा शारीरिक आणि मानसिक त्रास वाढलेला आहे - नेमकं तेव्हाच बायकांना हिणवणाऱ्या ताज्या विनोदांचं भरभरून पीक आलं आहे.

या प्रश्नावर बरेच लोक नव्याने घरकाम करू लागलेल्या पुरुषांचे फोटो दाखवतात. पुरुषही घरकामात मदत करतात त्याचा पुरावा म्हणून हे फोटो कौतुकाने दाखवले जातात. मुळात स्वतःच्या घरात काम करण्याला ‘मदत’ का म्हणावं? आणि अशी 'मदत' करून हे पुरुष काय घरावर उपकार करतात का? अशा पुरुषांना मी - "कुकी मॅन" म्हणते. ‘बघाबघा मी बायकोला किती मदत करतोय’- असं म्हणत हे कुकीमॅन स्वतःवरच फुलं उधळून घेतात. प्रत्येक छोट्याशा कामासाठी त्यांना शाब्बासकीची कुकी हवी असते. वर्षानुवर्षे असंख्य बायका निमूटपणाने अशी अनेक कामं करत आहेत - आणि त्याबद्दल त्यांना पैसे तर नाहीच पण चार कौतुकाचे शब्दसुद्धा मिळालेले नाहीत.

बायका कितीही शिकल्या, कितीही पैसे मिळवले आणि कितीही प्रेमात पडून लग्न केलं तरी घरकाम मात्र बायकांनीच करायचं असं त्यांच्या डोक्यात पक्कं ठरून गेलंय - घरकामाला पैशाच्या रूपात मोजता येत नाही म्हणून ते कमी प्रतीचं आणि हास्यास्पद ठरतं. पण पुरुष तर "महान" आहेत, ते घरासाठी पैसे कमावण्याचं काम करतात, त्यांनी जर बिनपैशाचं घरकाम केलं तर त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार! भारतातल्या बायका तर पुरुषांपेक्षा जवळजवळ सातपट जास्त घरकाम करतात अशी OECD (Organisation for Economic Co-operation and Development)ची माहिती आहे. पण त्याबद्दल कधी त्यांच्यासाठी कोणी थाळ्या वाजवून, मेणबत्त्या लावून कौतुक केलं का? उलट त्यांच्या कामाला कायम फालतू ठरवलं गेलं. एकीकडे बायकांना शिक्षण, नोकरी अशा हक्कापासून पासून वंचित ठेवायचं - त्यांच्यावर घरकाम लादायचं आणि दुसरीकडे त्याचसाठी त्यांच्यावर विनोद करायचे. हे कशामुळे शक्य होतं ? कारण पुरुषांच्या हातात भरपूर आर्थिक सत्ता आहे. त्यामुळे काय महत्त्वाचं आणि काय बिनमहत्त्वाचं ते ठरवायचा सांस्कृतिक अधिकार सुद्धा त्यांचाच ! विनोद करणारी व्यक्ति आणि जिच्यावर विनोद होतो अशी व्यक्ति ह्या दोन्हीमध्ये सामाजिक सत्तेचा फरक असतो. मस्करी करण्याची सत्ता पुरुषांकडे असते आणि बाईकडे नसते. म्हणून तर बहुतेक वेळा पुरुषच बायकांवर जोक करताना दिसतात.
विनोद करणारे जरी त्याकडे डिप्रेशन कमी करण्याचं साधन म्हणून बघत असले तरी अशा स्त्रिद्वेषी विनोदांचे स्त्रियांच्या आणि पुरुषांच्याही मनावर खूप खोल परिणाम होतात. 'बाईने मुकाट्याने घर सांभाळायचं आणि पुरुषाने रुबाबात पैसे मिळवायचे' असले विचार अजुन पक्के होत जातात. बायकांनी अशा विनोदांना विरोध केला की बायकांना विनोदबुद्धी नाही- असं म्हणून आणखी काही विनोद केले जातात. पण बायकांनी पुरुषांच्या वागण्यातल्या विसंगतीवर विनोद केले तर ते मात्र पुरुषांना खिलाडूपणे ऐकून घेता येत नाहीत. एवढंच नाही तर विनोद करणाऱ्या बायकांच्या चारित्र्यावर, बुद्धीवर आणि integrity वर देखील अनेक पुरुष एकत्र येऊन टीकेची झोड उठवतात.
गेल्याच आठवड्यात सोशल मिडियावर काही मुलींनी मुलांवर टीका करणारे मीमस् बनवले होते. फेसबुकवर मराठी मिम् माँक्स नावाचं एक पेज आहे. तिथे विविध विषयांवर मीमस् बनवण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. एकदा खास मुलींसाठी घेतलेल्या ‘मिमर पोरी’ नावाच्या स्पर्धेत अनेक मुलींनी पुरुषप्रधानतेवर सणसणीत मीमस् बनवली. क्रिकेट, राजकारण,मासिक पाळी, सेक्स, व्हर्जिनिटी, ऑर्गझम, अशा अनेक पैलूंचा त्यात समाचार घेतला होता. खरं म्हणजे ह्या विनोदांवर हसून ते सोडून देणं सहज शक्य होतं - पण पुरुषांच्या इगोला बाऊ झाला! ह्या मुली स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी लैंगिकतेचा मसाला वापरतायत अशी टीका पुरुष करायला लागले. खासकरून चड्डी धुण्याविषयीचं एक मीम काही पुरुषांच्या अगदी जिव्हारी लागलं. त्याचा साधारण आशय असा होता की - ‘फेमिनिझम चा फ माहित नसलेला दादा जेव्हा त्यावर लेक्चर देऊ लागतो तेव्हा मी म्हणते - तू तुझ्या आई /बायकोकडून चड्ड्या धुवून घेणं बंद कर.’

यात ‘लिंगाधारित श्रमविभाजन’ हा मुख्य मुद्दा दुर्लिक्षतच राहिला. शिवाय नेहमीप्रमाणे मुलींच्या चारित्र्यावर, जातीवर, पुरुषांशी असलेल्या नातेसंबंधावर देखील पोस्टस् करण्यात आल्या. ही टीका मीमस् बनवणाऱ्या ठराविक मुलींच्या पुरतीच मर्यादित राहिली नाही, तर टीकेमध्ये ‘इथल्या स्त्रिया’ असे शब्द वारंवार येत राहिले. स्त्रीवादी चळवळीची आणि या मुलींच्या बाजूने उभं राहणाऱ्या स्त्रीवादी पुरुषांचीही खिल्ली उडवली गेली.
या घटनेतून माझ्या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात आल्या आहेत. एक म्हणजे पुरुषांनाही विनोदबुद्धी कमीच असते! दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषी असुरक्षितता! मीम बनवणं हे नव्याने आकार घेणारं आणि भरपूर पोटेन्शियल असलेलं एक अगदी नवं करीयर आहे. जगभरात कितीतरी माणसं मीमस् बनवून आपलं पोट भरतात. पण बायका हेही काम करायला लागतील अशी शंका येऊन ह्या पुरुषांना असुरक्षित वाटतंय. मला ह्याबद्दल नवल नाही वाटत. पण मला जास्त खटकलेली गोष्ट म्हणजे ' बायकांना त्यांचेच प्रश्न समजावून सांगायला लागतात.' असा पुरुषांचा तोरा! बायकांना पुरुषांकडून काय त्रास होतात आणि त्यांनी आपल्या कुठल्या समस्येला कधी,किती महत्त्व द्यायचे हे पुरुष कसे काय ठरवू शकतात? हा तर सरळ सरळ स्त्रीवादी चळवळ हायजॅक करायचा प्रयत्न आहे. आपण बायकांच्या किती हक्कांवर पाय देऊन उभे आहोत हे पुरुषांच्या कधी लक्षात येणार? वर्षानुवर्षं पुरुषांनी विनोदाचं हत्यार वापरुन पितृसत्तेचा डोलारा टिकवून ठेवला होता. पण आता स्त्रियांनाही हे हत्यार वापरता यायला लागलं आहे आणि त्या पितृसत्ता उलथून टाकण्यासाठी हे हत्यार वापरायला कचरणार नाहीत!