गेल्या महिन्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि संपादक विद्या बाळ यांचं निधन झालं. मागच्या वर्षी ‘पुन्हा स्त्रीउवाच’ वेबसाईटच्या उद्घाटन समारंभात त्या उत्साहाने सामील झाल्या होत्या. त्यांच्याविषयी त्यांची मैत्रीण, बहीण आणि चळवळीतील सहकारी छाया दातार यांनी लिहिलेले मनोगत.
विद्या माझी चुलतचुलत बहिण! ती तात्यासाहेब केळकरांची नात आणि मी गिरजाबाई केळकरांची नात. म्हणजे दोघींच्या घरी लेखनाचा वारसा. अर्थात लेखनाचे स्वरुप वेगळे. वैचारीक बांधिलकी वेगळी. पण मागील पिढीशी बंडखोरीचे नाते. आणि आम्ही केवळ नात्याने नाही तर विचारांनी बांधल्या गेलो. दोघींचाही प्रवास एका टप्यापर्यन्त सारखा. १८ व्या वर्षी प्रेमविवाह. शिक्षण विवाहानंतर. मुलेबाळे होऊन ती मोठी झाल्यावर काहीतरी करण्याची आस. मी मार्क्सवादी चळवळीत काही काळ आणि पुढे स्त्रीमुक्ती चळवळीत प्रदीर्घ काळ असा प्रवास करत आहे. माझा प्रवास हा जनप्रवाहात संपूर्णपणे झोकून दिलेला नाही. तर एका बाजूला शैक्षणिक, वैचारीक दोर धरून पुढे पुढे जाण्याचा हा प्रयत्न आहे. स्त्रियांचे अनेक प्रश्न आहेत. त्यातील काही प्रश्न घेत आणि त्यांच्यासाठी उत्तरे शोधत हा प्रवास काहीसा शैक्षणिक अंगाने पुढे जात रहातो. विद्याही तशा अर्थाने जरी ‘मास लीडर’ नसली तरी तिने महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय, शिक्षित स्त्रियांचे मने निश्चितच जिंकली आहेत. एका अर्थाने हा स्त्रियांचा गट अधिक कुंठीत जीवन जगतो कारण घरातून नोकरी करण्याची परवानगी मिळतेच असे नाही. खाऊन पिऊन सुखी असल्यावर बाहेर जाण्याची गरज काय अशी भुमिका. पण छुप्या पध्दतीने हिंसा चालू रहाते. मन मारणे तर सततच. अशा स्त्रियांना घराबाहेर पडण्याचे मोठे धैर्य तिने दिले. म्हणूनच तिचा मुख्य संदेश काय असा विचार करता मला आठवले - तिचे "बोलत्या व्हा" हे आवाहन!

तशी मी कामगार चळवळ, स्त्री मुक्ती चळवळ अशा रस्त्यावरील चळवळीत रमणारी. पण विद्याने माझ्या कथाकौशल्याला वाव दिला आणि पुढे माझे दोन कथासंग्रह प्रसिध्द झाले. तोपर्यन्त विद्याचे कर्तृत्व चांगलेच नावारुपाला आलेले होते. विद्याही काही प्रमाणात रस्त्यावरील चळवळीत उतरू लागली होती. मुंबईला स्त्री मुक्ती संघटनेची स्थापना आणि पुण्याला नारी समता मंचाची स्थापना मला वाटते साधारण एकाच वेळी झाली होती. मंजुश्री सारडा प्रकरण नारी समता मंचाने लावून धरले होते. १९८० साली मथुरा बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आरोपी पोलीसांना सोडल्याबद्दल सगळ्याच स्त्री संघटनांना संताप आला होता. उपेन्द्र बक्षी, वसुधा धागमवार, लतिका सरकार या तीन जेष्ठ वकीलांनी त्यावेळी कायद्यातील त्रुटी दाखवून दिल्या आणि कायद्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता दाखवून दिली आणि हे बलात्कार प्रकरण केवळ एका घटनेबाबत घडलेल्या अन्यायाबाबत थांबले नाही तर पुढे लॉ कमिशनने देशभर दौरा काढून अनेक स्त्री संघटनांशी सल्लामसलत करून महत्वाच्या सुधारणा घडवून आणल्या. हल्ली १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत झालेल्या बलात्कार प्रकरणी जसा सर्व देश उसळून उठला तसाच काहीसा तो प्रसंग होता. त्यातूनच स्त्रियांना किती प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडावे लागते याकडे लक्ष वेधले गेले. त्यातूनच पुढे हुंडा बळी प्रकरणे, कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे पुढे आली. प्रमिला दंडवतेंनी हुंडाविरोधी बिलाची केलेली मागणी पारीत झाली. परित्यक्ता, विधवा, लग्नाविना राहिलेल्या अशा एकट्या स्त्रियांचे प्रश्न पुढे आले. मला आठवते आहे की या स्त्रियांच्या एका मेळाव्याला विद्याताईंनी नाव दिले होते, ’अपराजिता’. नारी समता मंचामध्ये विद्याताई नेहेमीच कार्यरत होत्या आणि नवनवे वैशिष्ठ्यपूर्ण कार्यक्रम घेण्यात त्यांचा पुढाकार असे. एकतर्फी प्रेमप्रकरणानंतरच्या हिंसाचाराच्या अनेक घटना त्यावेळी गाजल्या होत्या. त्यासाठी तरुण मुलामुलींची एकमेकांच्या संबधी आदरावर आधारीत निखळ मैत्रीचे महत्व सांगण्यासाठी त्यांनी 'दोस्ती झिंदाबाद’ हा कार्यक्रम घेऊन अमीरखानला बोलाविले होते. पालकांनाही हजर रहाण्याचे आवाहन होते. मला याचे नेहेमीच कौतुक वाटत राहिले आहे. अर्थात त्यामध्ये नारी समताच्या इतर सर्वच कार्यकर्त्यांचा मोठाच वाटा असे.माझी विद्याशी ओळख घरातलीच - विद्याच्या विवाह्सोहोळ्याला मी उपस्थित होते. ती १८ वर्षांची, मी १० वर्षांची. थोडीशी कुरबुर मी ऐकल्याचे आठवते की ‘इतक्या लवकर लग्न कशाला. शिकू दे की!’ पण एकदा प्रेम जमले आणि नवरा वयाने मोठा असला की लग्नाचा आग्रह दोन्ही बाजूने धरला जातो, आणि ‘लग्नानंतर शिकेल की’ हे व्यावहारीक उत्तर तयार असते. माझ्याही बाबतीत हेच तर घडले. बाईला करीअर हवेच असे गृहिततत्व तेव्हा नव्हतेच. त्यानंतर विद्याची आणि माझी इन्टीमेट भेट झाली ती मी फर्ग्युसन कॉलेजला शिकायला आले तेव्हा. मी होस्टेलला आणि ती कालव्याच्या पलिकडे राईलकरांच्या बंगल्यात. तेव्हा ती लेकुरवाळी होती आणि घरी असायची. माझे प्रेमप्रकरण सुरू झाल्यावर मी तिलाच सांगायला गेले पहिल्यांदा. आणि महिनाभरातच प्रेमभंगाचे दु:ख व्यक्त करण्यासाठीही तिचाच आधार मला मिळाला. माझ्या प्रियकराला अमेरीकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये स्टुडन्ट ए़़क्स्चेन्ज कार्यक्रमामध्ये स्कॉलर्शिप मिळाल्यामुळे त्याच्या वडिलांनी ठरविले की हे दूर पल्ल्याचे प्रेम कामाचे नाही, तेव्हा आताच बांधिलकी नको. आमच्यावर सक्त पहारा सुरू केला त्यांनी. त्यानंतर लग्न होऊन मुलेबाळे मोठी झाल्यावर विद्याची आणि माझी भेट एकदम झाली ती ‘स्त्री’ मासिकाची संपादक म्हणून - लिहिण्यासाठी प्रवृत्त करणारी !
मी मुंबईला रहात असले तरी माझे पुण्याला जाणे होई. मुंबईतर्फे मी संपर्क समितीची सभासद म्हणून मी हमखास जाई. मी १९८१ साली हॉलंडहून स्त्रिया व विकास या विषयात एम.ए, ची डिग्री घेऊन आले होते. त्यानिमित्ताने माझा थोडाफार सैंध्दान्तिक अभ्यास झाला होता. माझे ‘स्त्री पुरुष’ हे पुस्तक ग्रंथालीने प्रसिध्द केले होते. त्यामुळे नारी समता मंचच्या काही सभासदांबरोबर सैध्दांतिक विषयावर अभ्यास मंडळ सुरू करण्याची कल्पना निघाली होती. विद्या म्हणत असे की मला काही सैध्दांतिक गोष्टी फारशा कळत नाहीत आणि फार खोलात जाण्याची जरुरी वाटत नाही. पण तरीही ती चर्चेला बसत असे याचे मला आजही कौतुक वाटते. ती आम्हा सर्वांपेक्षा वयाने मोठी होती आणि तिला स्त्री चळवळीची कार्यकर्ती किंवा लोकप्रिय पुढारी म्हणून मान्यताही मिळाली होती. तसेच चाकोरीबाहेर जाणारे कौटुंबसंस्थेबाबत रॅडिकल विचार करणारी अशी प्रसिध्दी मिळाल्यामुळे शिव्याशापही खावे लागत होते. तरी कधीही ती डगमगली नाही. मात्र पुरुषसत्ता ही भांडवली समाजव्यवस्थेचाच भाग कसा आहे आणि म्हणून स्त्रीमुक्ती ही केवळ आहे त्या परिस्थितीत वैयक्तिक पातळीवर बदलून होऊ शकणार नाही तर तिचा आवाका हा वाढवीत सबंध समाजव्यवस्था बदलण्यासाठी वापरला पाहिजे, आणि आपल्याला मिळणा-या व्यासपीठांवरून हे सतत आग्रहपूर्वक मांडले पाहिजे. तसेच पुरुषसत्ता ही लैंगिक प्रेरणेतून, लैंगिक शोषणातून, हिंसाचारातून कशी स्त्रीवर्गावर जरब बसवते या बाबत बोलले पाहिजे असा सगळा सैध्दांतिक आग्रह तिने फार खोलात जाऊन समजून घेण्याची आवश्यकता मानली नाही. कदाचित म्हणूनही ती मध्यमवर्गाला भावली. पुरुषांनाही भावली. पुढे तर तिने ’मिळून सा-याजणी’ या मासिकाच्या मुखपृष्ठावर जे उपशीर्षक दिले आहे (’ती’ आणि 'तो' या पलिकडचे सर्व ’ते’ यांचा स्वत:शी आणि परस्परांशी नव्याने संवाद व्हावा यासाठी’) ते तिच्या मध्यम मार्गी स्वभावाला साजेसे आहे असे म्हणावेसे वाटते.
स्त्री मुक्ती संघटना व ‘स्त्रीउवाच’गट यांनी मिळून१९८५ साली पश्चिम महाराष्ट्रात १० दिवस चालणारी स्त्री मुक्ती यात्रा काढली होती त्यालाही विद्याने आणि नारी समता मंचने चांगला पाठिंबा दिला होता. पुढे ‘स्त्रीउवाच’ गटाने आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने एक वार्षिक काढण्याचे ठरविले. विद्या नुकतीच स्त्री मासिकातून बाहेर पडली होती. किर्लोस्कर समूहाने त्यातून अंग काढून घेतले होते. तिच्यापुढे स्वत:चे मासिक सुरू करण्याचा पर्याय होताच. पण त्यासाठी काही दिवसांच्या मुदतीची आवश्यकता होती. म्हणून आम्ही तिला या वार्षिकाचे संपादन करण्याचे आवाहन केले. तिने प्रतिसाद दिला आणि पहिला अंक तिच्या हातून बाहेर आला. पण तेव्हाही आमचे व तिचे थोडेफार मतभेद झाले. आम्हाला ‘स्त्री’ मासिकाच्या नेमस्त भूमिकेच्या पुढे जाऊन अधिक ज्वलंत आणि मिमांसक लेख मिळवायचे होते. विश्लेषणात्मक लेख हवे होते. स्त्री मुक्तीचा व्यापक दृष्टीकोन लोकांपुढे मांडायचा होता. शिवाय आमची संपादनाची कल्पना ही सामूहिक होती, तीही तिला पटणारी नव्हती. अर्थात तरीही आम्हाला तिच्या नावाचा फायदा मिळाला. कारण आम्ही आमचा पहिला अंक विद्या बाळ यांच्या हातून बाहेर आला असे फुशारकीने सांगू शकलो.

पुढे ‘स्त्रीउवाच’ गटाने १९८७ ते १९९४ असे आठ वार्षिक अंक काढून आपली हौस भागविली. पुढे ही वार्षिके काढायची कल्पना ’पुरुष उवाच’ आणि ’पुरुष स्पंदन’ या दोघांनी उचललेली दिसते. यानंतर मी स्वत: टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत स्त्रीअभ्यास विभागात प्राध्यापिकेची नोकरी स्वीकारली. त्यानिमित्ताने मला ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, बचत गट, सेंद्रीय शेती वगैरे प्रश्नांवर काम करण्याची संधी मिळाली. पुढे विद्याही अधिक धीट होत गेली. समलिंगी संबंधाबद्दल तिने समजून घेतले. सेक्स वर्कर्सच्या संघटनेबद्दल तिची मते बदलली गेली. इच्छामरणाबाबत तर तिने खूपच पुढाकार घेतला. तिचा मृत्युही एक प्रकारे त्याच पध्दतीने झाला असे म्हणता येईल!
विद्याच्या यशस्वी वाटचालीचे आकलन करत असतांना असे लक्षात येते की विद्याला आकाशवाणीवर निवेदिका म्हणून नोकरी मिळाली आणि ती सार्वजनिक जीवनात आली. अतिशय मुलायम पण कणखर आवाज. तो आवश्यकतेनुसार कमी अधिक फेकण्याचा चपळपणा ही आवाजाची कसरत तिला पुढेही उपयोगी पडली, स्त्री चळवळीमध्ये लोकांना जोडण्यासाठी. आपला मुद्दा लोकांना खात्रीलायक रीत्या पटवून देण्यासाठी, ऐकणा-यांच्या मनातील द्विधा मन:स्थितीला बाजूला सारून सकारात्मक बाजूला ठामपणे उचलून धरण्यासाठी मदत करणारा तो आवाज असे. आवाजाला साजेसे व्यक्तिमत्वही तिला लाभले होते. पाच फूट सहाइंच उंची आणि उत्तम बांधा, त्यामुळे सहज लक्ष जाण्यासारखे भारदस्त व्यक्तिमत्व. चेहे-यावर सदा हसरे भाव आणि नवे ते सर्व स्वीकारण्याची वृत्ती, त्यामुळे कोणालाही तिच्याजवळ सहज जाता यायचे. ती चळवळीत होती आणि तरीही चळवळीमध्ये असलेल्या अनेकांच्या चेहे-यावर जाणवणारा रुक्षपणा तिच्याकडे नव्हता. नवनवीन अनुभवांना सामोरे जातांना आवश्यक कुतुहल ती जपून होती. स्त्री चळवळीमध्ये फार टोकापर्यन्त जाण्याची तिची इच्छाही नव्हती. तिला एक सूर सापडला होता. एक ताल सापडला होता त्या तालावर जितकी पावले टाकता येतील तितकी सदा सर्वदा तेवढ्याच सराईतपणे ती न दमता टाकत असे, शेवटपर्यन्त. त्यामुळेच तिचा कार्यक्रम आयोजित करणा-यांना कार्यक्रमाची लय साधली जाईल, पुरेसे मनोरंजन होईल याची खात्री असे. खूप काही नवनवीन मिळेल अशी अपेक्षा न ठेवता पण जमलेल्या लोकांना त्यांचे विचार नक्की आवडतील असा त्यांना विश्वास असे. विद्याचा प्रेक्षक हा मध्यमवर्गीय स्त्रिया आणि पुढे पुढे पुरुषही असत. स्त्रियांच्या मुक्तीसाठी स्त्रीपुरुष संवाद हा तिचा आवडीचा विषय होता. त्यामुळे तिच्या भाषणांना कधी एकारलेपणा आला नाही. आणि हीच गोम होती तिच्या भाषणांच्या लोकप्रियतेची.
वैयक्तिक पातळीवर तर विद्या अतिशय उदार होती. पत्र लेखनाचा अफाट पसारा, लांबलचक नाहीत पण अचूकपणे उत्तेजन देणारी पत्रे नवनवीन लेखकांनाच नाहीत तर वैयक्तिक पातळीवर सल्ला मागायला येणा-यांना ती सहजपणे लिहीत असे, तेव्हढा वेळ देत असे. लोकांचा संग्रह जमविणे ही फार मोठी कला आहे आणि ती तिला कमवावी लागली नव्हती. ती तिच्या रक्तात होती. स्त्री मासिकाच्या भोवती उभी राहिलेली स्त्रीसखी मंडळे ही केवळ बाजारपेठीय संकल्पनेतून जन्माला आलेली नव्हती तर तिच्या संघटना कौशल्याचा भाग आणि स्त्री चळवळीला त्यामुळे मिळालेले प्रोत्साहन असे त्यातून साध्य झाले. त्याकाळी म्हणजे साधारण १९७० ते २००० पर्यन्त गावोगावी मध्यमवर्गीय स्त्रियांची महिलामंडळे जरूर असत पण त्यांना काही प्रमाणात वैचारीक धार लावण्याचे काम या स्त्री सखी मंडळांनी केले असे म्हणता येईल. स्त्री विषयक प्रश्न असलेल्या नवनवीन साहित्याची ओळख करून घेण्याचा हा प्रयत्न निश्चितच स्त्रीभानाला पुढे नेणारा होता. तिच्या व्यक्तीमत्वाने आणि विचाराने प्रभावीत झालेल्या अनेक स्त्रिया तिच्या सहवासात होत्या पण त्यांच्यावर तिचे दडपण नव्हते. त्या तिच्या मैत्रिणी होत्या. स्त्रीच्या संपादनाचे काम म्हणूनच ती कुशलपणे करू शकली. मी पर्यावरणीय स्त्रीवादाकडे झुकायला लागले तेव्हाही विद्याने मला लिहिण्याचा आग्रह केला. स्त्रीचळवळ हे कायम आमचे एकत्रित काम करण्याचे व्यासपीठ राहिले आहे. शेवट पर्यन्त ती कार्यरत होती याचा मला अभिमान वाटतो आणि आधारही वाटतो. विद्याची मैत्रिण म्हणून कोणत्याही मध्यमवर्गीय स्त्रियांच्या समूहामध्ये स्वीकारले जाण्याचा मानही मिळतो. तिच्या जाण्याने चळवळीमध्ये एक पोकळी झाल्याचे जाणवणार आहे!
छाया दातार
(हा लेख weeklysadhana.in मध्ये पूर्व प्रकाशित झाला होता.)
Tags
आदरांजली