‘इज्जतीचे’ राजकारण

 एकीकडे स्त्रियांना व्यक्ती म्हणून इज्जत दिली जात नाही पण स्त्रियांना कुटुंबाची, समूहाची, जातीधर्माची इज्जत मानलं जातं ! समाजाने घातलेल्या मर्यादा ओलांडल्या की बाईला शिक्षा दिली जाते. पण स्त्रियांच्या इज्जतीची सुरक्षा करायची जबाबदारी मात्र समाज घेत नाही. इज्जतीच्या नावाखाली चालणाऱ्या ह्या राजकरणा विषयी डॉ. मनीषा गुप्ते यांची अनीता पगारे यांनी घेतलेली मुलाखत
‘ऑनर किलिंग’ हा शब्द आपण अनेकवेळा ऐकलेला आहे. एखाद्या मुलाने किंवा मुलीने समाजाच्या नियमांना न जुमानता जातीबाहेर किंवा धर्माबाहेर स्वतःचे लग्न केल्यामुळे त्या संबंधित कुटुंबाने त्यांना मारून टाकले असे आपण वर्तमानपत्रातून वाचतो. त्यासाठी भारतातील उत्तर भागात असलेल्या ‘खाप पंचायती’ आपल्याला चटकन आठवतात. पण जेव्हा आपल्याच गावातील, आपल्याच परिचयातील कुटुंबांमध्ये असे घडायला लागले, तेव्हा त्याची दाहकता अधिक जाणवते. ह्या विषयाची एवढीच त्रोटक माहिती घेऊन मी डॉ. मनीषा गुप्ते यांना भेटायला गेले. पण त्यांच्याशी बोलता बोलता माझा ह्या विषयाबद्दलचा एकूणच दृष्टीकोन बदलला. समाजाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली आणि मग आपल्या आजूबाजूला रोज शेकडो महिला ह्या ‘ऑनर’च्या नावाखाली मरत आहेत याची जळजळीत जाणीव झाली! तो चटका तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न.
स्त्रीवादी चळवळीतील एक अग्रगण्य नेत्या डॉ. मनीषा गुप्ते यांचा Ph. D चा विषय ‘ऑनर किलिंग’ असा आहे - असे मी ऐकले होते. पण मनीषाताईना भेटले तेव्हा लक्षात आले कि त्यांचा अभ्यास हा आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्नाच्या निमिताने होणारे खून एवढ्या पुरता मर्यादित नाही. या निमित्ताने त्यांनी एकूणच ‘ऑनर’(इभ्रत/इज्जत) या संकल्पनेचा अभ्यास केला आहे. भारतातलीच नव्हे तर एकूणच आशिया खंडातील समूहांचा अभ्यास मनीषाताईनी केला आहे. बऱ्याच गोष्टीत ‘दक्षिण आशियाई’ देश म्हणून आपण वागायला सारखे आहोत, आपल्या प्रथा परंपरामध्ये सारखेपणा आहे, त्यामुळेच आपले प्रश्नही बरेचसे सारखे असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे. त्या म्हणतात, आपण फक्त लग्नाच्या निमित्तानेच फक्त स्त्रीला आपली इज्जत मानत नाही तर एकूणच कुटुंब, समाज, समूह म्हणून सतत स्त्रियांना त्या त्या कुटुंब, समूहाची, जातीची, धर्माची इज्जत म्हणून पाहतो आणि त्यामुळेच तिच्या आयुष्यावर सतत बंधन असतात. त्यामुळेच तिच्या बंधनाचे समाजात समर्थन होत असते. ती बंधने पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी अतिशय सहज अश्या प्रथा, परंपरांची निर्मिती करण्यात आली आहे. ‘स्त्रियांना इज्जत नाही पण स्त्रिया ह्या इज्जत आहेत’ हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विचार आहे. स्त्रियांना इज्जत नसते हा समज समाजात पक्का असल्यामुळे ‘तिचा अपमान झाला’ असे कधी म्हणायचे - याचे कुठलेही निकष समाजात नाहीत. बाईच्या सुरक्षेची काहीही व्यवस्था नाही आणि काही घडलं तर त्यावर शिक्षाही नाही. त्याउलट अशा ‘इज्जती’ला वाचवण्याचे शंभर प्रकार आणि त्यासाठी हजार बंधनं स्त्रीयांवरती आहेत.
आज आपण एकूणच देशाची इज्जत, देशप्रेम, देशभक्ती आणि यासारखे कायकाय प्रकार रोज ऐकतो आहोत आणि अशी इज्जत घालवणाऱ्याना शिक्षा देण्याचे प्रकारही पहातो आहोत. असे रोज रोज घडल्यामुळे त्यातील दु:ख, गांभीर्य आणि गुलामगिरी लक्षातच येत नाही. मनिषाताई सांगतात - स्त्री हीच त्या कुटुंबाची इज्जत असल्याने तिला कुठलाच निर्णय तिने एकटीने घेण्याचे स्वातंत्र्य नसते. म्हणूनच मुलींनी, स्त्रियांनी कुठले कपडे घालावेत? किती वाजता घराबाहेर पडले तर चालेल? कुठल्या जागा, रस्ते हे कुठल्या स्त्रियांसाठी आहेत? कुठल्या रस्त्याने ‘खानदानी’ स्त्रियांनी जाऊ नये? असे एकूणच वैयक्तिक प्रश्न सार्वजनिक विषय बनले आहेत. पण त्यात त्या स्त्रीच्या वैयक्तिक आवडी निवडीला, सोईला काही किंमत नसते – हे आपल्याला फारसे खटकत नाही. मुलींना स्वतःचे निर्णय घेण्याची मान्यता समाजात नसल्यामुळे जेव्हा ती लग्नाचा निर्णय घेते तेव्हा ती स्वार्थी ठरते, तिने आपल्या कुटुंबाचा, जातीचा विचार केला नाही त्यामुळे ती गुन्हेगार ठरते आणि खून करणारे पुरुष हे बिचारे आपदग्रस्त ठरतात! तसेच ते कुटुंबाच्या, जातीधर्माच्या इज्जतीचे रक्षक बनतात आणि म्हणून त्यांच्या कृत्याला समाजाची मान्यता मिळते.
मनिषाताई लक्षात आणून देतात की - हे आजच घडतंय, असं समजण्याचं काही कारण नाही! जेव्हा दोन समुहात, देशांमध्ये लढाया व्हायच्या तेव्हा ज्याची जीत व्हायची तो समूह हरलेल्या समूहाच्या स्त्रिया उचलून आणत होते, यात कोणालाच गैर वाटत नव्हते. हरलेल्या समूहाच्या स्त्रिया सामूहिक आत्महत्या करायच्या कारण त्या समूहाची इज्जत वाचवण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर आलेली असायची, आणि आत्महत्येशिवाय कुठलाही पर्याय त्यांच्या कडे उपलब्ध नसायचा. आजही जेव्हा एखाद्या मुलीवर बलात्कार होतो तेव्हाही तिच्याकडे आत्महत्या हाच पर्याय शिल्लक राहतो असेच चित्र दिसते आहे. खरंतर ज्या गोष्टीत त्या स्त्रीचा किंवा एकूणच स्त्री समूहाचा काहीही संबंध नाही, ती त्या निर्णयात सहभागी नसली तरीही तिला त्या घटनेची किंमत मोजावी लागते कारण तिची ‘ओळख’ ही फक्त तिची योनी आहे. पोलिसांचा संशोधन विभाग सांगतो की प्रत्येक दोन तासाला एक बलात्कार होतो. ही आकडेवारी त्यांच्याकडे जे गुन्हे नोंदले गेलेले आहेत त्यातून घेतलेली आहे. जे बलात्काराचे गुन्हे समाजाची, कुटुंबाची, जातीची प्रतिष्ठा जाईल म्हणून लपवले जातात त्यांच्या बद्दल तर कुठेही बोलले जात नाही. जमिनीच्या वादातल्या केसेस पिढ्यान पिढ्या चालतात तरी त्या नोंदवल्या जातात पण बलात्काराच्या केसेस मध्ये न्यायालयाची दिरंगाई, किचकट प्रक्रिया याचे कारण पुढे करुन ‘इज्जत’ वाचवण्याची पद्धत सर्रास आपल्याकडे आहे.
मनीषाताई म्हणतात की, या सर्व अनुभवांमुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘स्त्री ही जाती व्यवस्थेचे प्रवेश द्वार आहे’ असे म्हणत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जे म्हणाले ते आज आपल्याला पदोपदी अनुभवायला मिळते. कुठल्याही जातीचा मोर्चा असला कि पाच त्या जातीतल्या जरा बोलक्या मुली घ्यायच्या त्यांना मोर्च्याचा पुढे चालवायचे आणि त्याच शिष्ठमंडळात घेवून जायच्या, ह्याला ते महिला सक्षमीकरण म्हणतात. पण ह्या मुलींनी आपल्या आवडीच्या मुलाशी लग्न करायचे ठरवले किंवा आपल्या आवडीच्या विषयात शिक्षण घ्यायचे ठरवले किंवा लग्न न करता समलिंगी मैत्रिणी सोबत रहायचे ठरवले किंवा अविवाहित रहायचे ठरवले तर ती जात तिच्या घरच्यांना परवानगी देऊ देणार का? समजा एखाद्या कुटुंबाने अशी परवानगी दिली तर समाजातील लोक अशा मुलामुलींना त्यांच्या निर्णयाची शिक्षा म्हणून अतिशय क्रूर पद्धतीने ‘मृत्यू’ देतात.
महाविद्यालयांमधून तरुणांच्या मध्ये होणाऱ्या मारामारीची कारणे आपण शोधायचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येते की, कुठलीतरी एक मुलगी ‘याची का त्याची?’ यावरुन त्यांच्या आपापसात मारामाऱ्या होतात ज्याची साधी खबरही त्या मुलीला नसते किंवा या दोघांनाही त्या मुलीला नेमकं कोण आवडत याची चौकशी करुयात असे मनात देखील येत नाही. एखाद्याने आमच्या मुलीकडे पहिले म्हणून पाहणाऱ्याला मारण्याची एक प्रचलित पद्धत आपल्याकडे आहे पण हेच जातीचे रक्षक आपल्या मुलीला शिक्षणाला पैसे कमी पडले किंवा तिला उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यासाठी मदत करायला तयार नसतात तेव्हा ती त्यांची नसते. याचाच अर्थ मुलगी ‘व्यक्ती’ म्हणून कोणाला नको आहे.

मनिषाताई म्हणतात की ह्या ‘इज्जती’च्या कल्पनेने बाईच्या ‘मी’पणाची ओळखच संपवून टाकली आहे. शासकीय जाहिराती पहिल्या कि आपल्याला शासन मुलींच्या बद्दल काय विचार करतंय, याचा अंदाज येतो. प्रत्येक बस वर लिहिलेल्या ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ या घोषणेचा आपण विचार करुया. तिचं शिक्षण अमलात आणायची कुठलीही संधी तिला द्यायची नाही आणि मग मुलींना शिकवून काही उपयोग नाही असे म्हणायचे. लहानपणापासून तिला कुठलेही ‘एक्स्पोजर’ द्यायचे नाही आणि मग अचानक नवऱ्याने मारले कि तिने एकदम सक्षम व्यक्ती म्हणून वागावं अशी अपेक्षा कशी करता येईल? ती पोलिसकडे का गेली नाही? सासरच्या घरातून बाहेर पडतांना आपले सर्व पेपर्स घेवून बाहेर का पडली नाही? एवढ मारलं होत तर दवाखान्यात जाऊन आधी रिपोर्ट का नाही घेतला? असे अनेक प्रश्न तिच्यावर फेकले जातात. ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी आधी व्यक्तीला ‘ मी कोण?’ चा शोध लागावा लागतो आणि मग त्या ‘मी’ ची ओळख टिकवण्यासाठी आपल्यावर अन्याय झाला तो समजतो आणि मग व्यक्ती अन्याया विरुद्ध दाद मागू शकते. ह्या ‘इज्जती’च्या कल्पनेने बाईच्या ‘मी’पणाची ओळखच संपवून टाकली आहे.
आपण रोज कुठल्या कुठल्या प्रकारचे ‘ऑनर’ सांभाळतो हे समजावून घेण्यासाठी मनिषाताईंचा तो अभ्यासच मुळातून वाचला पाहिजे. हे ‘ऑनर’ तुम्ही कुठल्या जातीत कुठल्या वर्गात जन्मल्या, तुमची आर्थिक स्थिती काय आहे? ह्या सर्वांवर अवलंबून असते. जातीच्या उतरंडीत उच्चवर्णीय स्त्रीला आपण दलित, आदिवासी पुरुषांपेक्षा सक्षम आहोत असे वाटते पण ह्याच स्त्रीला ‘बाई’ म्हणून मात्र समाजातल्या सर्वात शेवटच्या, साधनहीन, वंचित पुरुषांपासूनही असुरक्षित वाटते कारण तिची असुरक्षितता तिच्या ‘योनी’शी जोडलेली आहे. आणि या सर्वांचा संबंध ‘पावित्र्या’शी जोडला असल्यामुळे ते जपण्याचे बंधन तिच्यावर टाकले आहे आणि त्यामुळे तिला ते असुरक्षित वाटते. बर यातली सर्वात गम्मत काय तर कुठल्याही पुरुषाच्या कुठल्याही कृत्याने त्या व्यक्तीची किंवा त्याच्या कुटुंबाची किंवा त्याच्या जात, धर्माची इज्जत जात नाही. त्यामुळे तो काहीही, केव्हाही आणि कसंही करायला मुक्त. ज्या ज्या काळात ज्या स्त्रीपुरुषांना हे ‘इज्जतीचे’ राजकारण समजले त्यामागचा हेतू आणि एका विशिष्ट समूहाला ताब्यात ठेवण्याचे कारस्थान लक्षात आले त्यांनी ह्या खोट्या इज्जतीच्या लढ्यातून बाहेर येऊन स्वतःची ओळख बनवली. ‘इज्जती’ची ही संकल्पना हे एक अनंतकाळ चाललेले कारस्थान आहे. समाजातील जात, धर्म उतरंड आणि विषमता टिकवण्यासाठी निर्माण केलेले कारस्थान आहे हे जेव्हा लक्षात येते तेव्हा ती व्यक्ती नक्की बंड करून उठते. हे समजावून घेण्यासाठी आपण मनीषा गुप्ते यांचा हा संशोधनात्मक अभ्यास मुळातूनच वाचूया आणि ‘ऑनर’ची जी परंपरा आपण पुढे चालवत आहोत ती खंडित करुया, स्वतःला ओळखू या. आपली ‘ओळख’ अधिक स्पष्ट करुया!




3 Comments

  1. Thanks Anita for the Great Sharings.

    ReplyDelete
  2. हे 'आॅनर अँड विमेन्स राईट' हे पुस्तक मला वाचायला कुठे मिळेल?

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form