संग्राम

सांगली येथील “संग्राम” या संस्थेमार्फत वेश्या व्यवसाय कारण-या स्त्रियांना स्वतःची ओळख मिळवून देण्यासाठी मीना शेषु यांनी सातत्याने अनेक वर्ष काम केले आहे. ‘वेश्या व्यवसाय करणा-या स्त्रियांचे अधिकार’ या विषयी काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांचे काम जागतिक स्तरावर नावाजले गेले आहे. या मुलाखतीत त्यांचे काम आणि त्यामागची वैचारिक भूमिका समजून घेता येईल. ही मुलाखत सांगलीतील डॉ.प्रिया देशपांडे यांनी घेतली आहे.

तुमच्या या कामाची सुरुवात कशी झाली? आणि आता त्याची व्याप्ती काय आहे? 
सर्वात आधी मी हे स्पष्ट करू इच्छिते कि मी हे “माझे” एकटीचे काम समजत नाही... कारण या कामामध्ये सर्वांचा सहभाग होता आणि या स्त्रियांच्या सहभागामुळेच एवढे काम होऊ शकले. त्यामुळे माझ्या मुलाखती ऐवजी आपण या कामाबाबत गप्पा मारुया.
मी १९८६ साली सांगलीमध्ये आले. माझे शिक्षण मुंबईमधील TISS मधून झालेले असल्याने तेव्हापासूनच मी स्त्रीविषयक प्रश्नामध्ये काम करत होते. सांगलीला आल्यावर देखील या जिल्ह्यातील स्त्री मुक्ती संघर्ष सारख्या  चळवळींमध्ये मी माझे योगदान देत होते. ८० व ९० च्या दशकांमध्ये एड्स या नव्या रोगाचा उदय झाला आणि मुंबई पाठोपाठ सांगलीमध्ये देखील याचे बरेच रुग्ण आढळून येऊ लागले. माझे शिक्षण विज्ञान शाखा व समाजकार्य असे असलेने या महत्वाच्या विषयामध्ये आपण काम करायला हवे असे वाटत होते. एड्स रोगाबाबत जनजागृती व प्रतिबंधाचे काम करण्यासाठी एक संस्था सुरु करण्याचे मनात येत होते. त्या सुमारास “संपदा ग्रामीण महिला संस्था” ही ग्रामीण स्त्रियांनी सुरु केलेली संस्था बंद झाली होती. सांगलीतील आम्ही सहा स्त्रियांनी या नोंदणीकृत संस्थेचे पुनरुज्जीवन केले. संस्थेच्या नावातील पहिली अक्षरे घेऊन “संग्राम” चे काम सुरु झाले. प्रभाताई कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. उषा उदगावकर, शीतल प्रताप, उज्ज्वला परांजपे, वंदना दांडेकर आणि मी असे आमचे संचालक मंडळ होते.
एड्स सारख्या रोगाविरुद्ध वेश्या व्यवसाय करणा-या स्त्रियांचा लढा “संग्राम” द्वारे सुरु झाला आणि आता संग्राम सोबत “वेश्या अन्याय मुक्ती परिषद,” (वेश्या व्यवसाय करणा-या स्त्रिया) “मुस्कान” (समलिंगी संबंधातील पुरुष व तृतीयपंथी व्यक्ती) , “विद्रोही महिला मंच” (ग्रामीण महिला- बहुसंख्य दलित)  , “नजरिया” (मुस्लीम महिला) , “मित्रा” (वेश्या व्यवसायातील स्त्रियांच्या मुला-मुलींची संघटना)  आणि  “व्हॅम्प प्लस” (एचआयव्हीग्रस्त स्त्रियांसाठीची संघटना ) अश्या सहा संस्था काम करत आहेत. या सर्व संस्थांच्या बांधणी मध्ये संग्रामचा सहयोग आहे . ‘समाज बदलला जाऊ शकतो यावर लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे’ अशी संग्राम ची भूमिका आहे . अन्य लोकांच्या अधिकारासाठी लढणा-या मुठभर कार्यकर्त्यांपेक्षा ज्यांना समाज बदलण्याचे ध्येय पटले आहे त्यांनी स्वतःच्या अधिकारासाठी सक्षमतेने लढले पाहिजे , तरच शाश्वत बदल घडून येऊ शकतो. त्यामुळे समाजातील विविध उपेक्षित घटकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे व संघटीतपणे समाज बदल घडवून आणण्यासाठी सक्षम बनवणे यासाठी संग्राम संस्था अविरतपणे कार्य करते.
यासाठी तुमचे प्रेरणास्थान कोणते?
असे एक प्रेरणास्थान सांगणे अवघड आहे. कारण मी जे काही स्त्रीवादी लिखाण वाचले ते सर्व, तसेच इतरांनी स्त्रियांसाठी केलेले काम ते सर्वच मला प्रेरणा स्थानी आहे.
कामाच्या सुरुवातीच्या काही अडचणी आल्या होत्या का? त्यावर कश्या पद्धतीने मात करू शकलात? 
एचआयव्ही चा प्रसार रोखण्यासाठी निरोध वापरण्याबाबत या स्त्रियांना माहिती देण्यापासून कामाची सुरुवात झाली. मी एक शहरातील शिकलेली, इंग्रजी बोलणारी बाई त्यांना विश्वासपात्र वाटले नाही कारण माझी पर्सनालिटी बघून त्या स्त्रियांना मी पोलीस किंवा सरकारी अधिकारी वाटायचे. त्यांचा विश्वास मिळविणे हीच खूप मोठी अडचण होती. सुरुवातीला तर दगडफेक करून आमच्या गाडीच्या काचा देखील फोडल्या गेल्या होत्या. पण मी पुन्हा पुन्हा येतेय आणि काहीतरी बोलू पहाते हे बघून शेवटी त्यांनाही माझ्याविषयी विश्वास वाटू लागला. त्यांचे स्वतःचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनाच काहीतरी करणे आवश्यक वाटू लागले आणि मी सांगितलेली कंडोम विषयक माहिती त्या एकमेकींना सांगू लागल्या, ग्राहकांना समजावू लागल्या आणि त्यांना कंडोम वापरण्यास भाग पडू लागल्या. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता.हा बदल त्यांनी आंतरिक प्रेरणेने घडवून आणला होता. त्यावेळी त्यांना आजाराबाबत माहिती आणि सहाय्य हवे होते. त्यांना एड्स (त्यांच्या भाषेत एडस) पासून वाचायचे होते. मी त्यावेळी त्यांच्यापर्यंत पोचले आणि बदलाचे निमित्तमात्र झाले.
कोणत्याही व्यक्तीच्या ओळखी मध्ये त्यांना ज्या शब्दाने ओळखले जाते तो महत्वाचा असतो. या स्त्रियांना कोणत्या शब्दामुळे चांगली ओळख मिळते?
या स्त्रियांना चांगली किंवा वाईट ओळख ही समाज सापेक्ष आहे. त्यामुळे अश्या शब्दांऐवजी जी योग्य ओळख आहे ती मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत . हा लैंगिक सेवा पुरवणारा व्यवसाय असल्याने या स्त्रियांना “वेश्या व्यवसाय करणा-या स्त्रिया / व्यक्ती “ किंवा ”Women / People in Sex work”  असे संबोधित करणे अधिक योग्य होईल. Sex worker  या शब्दामध्ये सर्वात कमी कलंकित भावना जाणवत असलेने हा शब्द सर्वत्र वापरला जातो. आम्ही जेव्हा काम सुरु केले तेव्हा आमच्या लक्षात आले कि पूर्वापार वापरले जाणारे शब्द म्हणजे वेश्या आणि वेश्या व्यवसाय या शब्दांना सामाजिक प्रतिष्ठा नाही. त्यामुळे आम्ही “वेश्या व्यवसाय करणा-या स्त्रिया” असे संबोधणे सुरु केले . हिंदी मध्ये “धंदेवाली” न म्हणता “धंदा करनेवाली स्त्री” असे म्हणू लागलो. कारण या स्त्रियांच्या दृष्टीने धंदा करणे हे एक काम होते .
त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर सेक्स वर्क हा शब्द वापरला जात होता . म्हणून त्याची सांगड घालून “Women doing prostitution and sex work” असेही नाव आम्ही काही काळ वापरले . जेव्हा या व्यवसायामध्ये स्त्रियांप्रमाणे तृतीयपंथी व इतर समलैंगिक पुरुष देखील आहेत , तेव्हा “people in prostitution and sex work” हा शब्द वापरणे अधिक योग्य वाटले . बऱ्याच वेळा या स्त्रियांना “commercial sex worker “ किंवा  CSW असे संबोधले जाते. यातील कमर्शियल या शब्दाला आमचा आक्षेप आहे . जेव्हा इतर सर्व व्यवसायामध्ये देखील पैश्याचे आदान-प्रदान होते मात्र त्याचा असा उल्लेख केला जात नाही. आपण commercial doctor किंवा lawyer म्हणतो का? तेव्हा या स्त्रियांबाबत देखील असा उल्लेख करणे योग्य नाही. तेव्हा असा शब्द केवळ या स्त्रियांबाबत वापरणे हे भेदाभेदाचे लक्षण आहे. म्हणून आम्ही CSW म्हणजे Commercial Social Worker म्हणत नाही.
मात्र पाश्चिमात्य देशांमध्ये सेक्सवर्क हा शब्द सेक्स विकणे किंवा देहविक्रय या अर्थाने वापरला जातो. मात्र या स्त्रियांना हा अर्थ मान्य नव्हता. खूप साऱ्या चर्चेनंतर इथे सेक्स वर्क म्हणजे विक्री नसून यामध्ये इतर कोणत्याही सेवा व्यवसायाप्रमाणेच लैंगिक सेवा पुरवली जाते अश्या निष्कर्षापर्यंत या स्त्रिया आल्या. मराठी मध्ये वापरला जाणारा “वेश्या” हा शब्द त्याच्या मूळ अर्थासह वापरावा या बाबत आम्ही आग्रही आहोत. हिंदू संस्कृतीमधील संस्कृत ग्रंथांमध्ये वेश्यांचे अनेक उल्लेख सापडतात आणि ते नकारात्मक नक्कीच नाही. नंतरच्या व्हीक्टोरीयन कालखंडामध्ये समाजाची नैतिकता मुल्ये बदलली आणि मूळ अर्थ व सामाजिक स्थान लोप पावले.
एक मध्यमवर्गीय स्त्री म्हणून काही मर्यादा आड आल्या का आणि त्यावर कशी मात केलीत?
वेश्या व्यवसायातील स्त्रियांसोबत काम करण्याबाबत कौटुंबिक स्तरावर कोणतीही अडचण नव्हती. याबाबत मी स्वतःला नशीबवान समजते कारण आपले कुटुंब एखाद्या कामामध्ये आपल्या सोबत असेल तर ते काम आपण अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. काही नातेवाईकांनी मात्र आमच्यासोबतचे संबंध तोडले. पण त्यामुळे आमचे काम थांबले नाही.
शिकताना सेक्स वर्क बाबत शिकणे किंवा वाचणे किंवा त्यांच्या वस्तीला भेट देणे आणि या स्त्रियांसोबत त्यांच्यामध्ये जाऊन काम करणे या पूर्णतः वेगळ्या गोष्टी आहेत आणि आपल्या मध्यमवर्गीय समजुती पेक्षा पूर्णतः विपरीत आहेत. त्यामुळे या समजुती सोडून या स्त्रियांना त्यांच्या स्वतःच्या नजरेतून पाहणे आवश्यक होते आणि ते मी केले.  मात्र त्यामुळे माझ्यावर विविध आरोप करण्यात आले . मी वेश्यावृत्तीला आणि त्यातील गुन्हेगारीला समर्थन देते अश्या थराचे आरोप देखील होते. अर्थात त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून आपल्या मनाला पटलेले काम करत राहणे मी योग्य समजले.  
वेश्या व्यवसायातील स्त्रियांच्या सुटकेसाठी प्रयत्न कि या व्यवसायातील स्त्रियांच्या हक्कासाठी काम याबाबत माझ्या स्वतःच्या मनामध्ये काही संदेह नव्हता. मात्र यामुळे माझ्यासाठी राजकीय आणि सामाजिक अडचणी निर्माण झाल्या. आपण वेश्या व्यवसायातील स्त्रियांना एक बळी म्हणूनच बघितलेले आहे जिचे समाजव्यवस्थेने नेहमी शोषण केलेले आहे. मात्र जेव्हा तुम्ही या स्त्रियांशी बोलता , त्यांच्या सोबत काम करत तेव्हा असे लक्षात येते कि या स्त्रियांची स्वतःची अशी खास कुटुंब व्यवस्था आहे , सामाजिक व्यवस्था आहे ज्यामध्ये स्त्रीला निर्णय स्वातंत्र्य देखील असू शकते. आहे या परिस्थितीमध्ये वास्तव स्वीकारून या वेश्या व्यवसाय करणा-या स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना एड्सपासून वाचविण्यासाठी काही करणे आवश्यक होते आणि मी तेच काम करण्याचा निश्चय केला. या स्त्रिया अश्या व्यवसायामध्ये का पोचतात ही खूप गुंतागुंतीची परिस्थिती आहे आणि त्यावरचे उपाय देखील साधे असू शकत नाहीत. त्यावेळी एड्सपासून त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना पुरेसे आणि चांगल्या दर्जाचे कंडोम मिळणे ही प्राथमिकता होती आणि आम्ही त्यावर काम सुरु केले.
त्यावेळी कन्डोम्स इतके महाग होते कि ते या स्त्रियांना विकत घेणे शक्यच नव्हते आणि म्हणून सरकारकडून ते मिळणे आवश्यक होते. आम्ही या स्त्रियांपर्यंत भरपूर कन्डोम्स सरकार मार्फत पोचतील अशी व्यवस्था केली. मात्र या बळी समजल्या जाणा-या स्त्रिया ग्राहकाला कंडोम वापरण्यास बाध्य करू शकतील का असा सर्वांना प्रश्न पडला होता. यामुळे त्यांना हिंसेला सामोरे जावे लागेल का अशीही शंका वाटत होती. मात्र ज्या सहजतेने त्यांनी अनोळखी ग्राहकांना कंडोम वापरायला लावले त्यामुळे मला आपल्या समजुतीपेक्षा वास्तव वेगळे असू शकते याची जाणीव झाली. आमच्या समुपदेशन केंद्रामध्ये येणा-या विवाहित स्त्रिया देखील आपल्या पतीला कंडोम वापरण्यास बाध्य करू शकत नव्हत्या. त्यामुळे या स्त्रियांची गरीब बिचारी ही आमच्या मनातील ओळख डळमळीत होऊ लागली. त्यामुळे या स्त्रिया पैश्याने गरीब असण्यापेक्षा समाजाकडून दुर्लक्षित व उपेक्षित असल्याने गरीब असतात, बिचा-या असतात. त्या त्यांचे पैसे बँकेमध्ये न ठेऊ शकल्याने किंवा इतर मध्यमवर्गीय लोकांप्रमाणे न गुंतवू शल्याने गरीब बिचा-या होतात. जर त्यांना समाजाकडून आधार आणि हक्क मिळाले तर त्यांचे जीवनमान चांगले होऊ शकते.
या कामामुळे तुमची स्त्रीवादी जाणीव विकसित झाली की तुम्हाला स्त्रीवादी मूल्यांशी तडजोडी करायला लागल्या?
मी सुरुवातीपासून स्त्रीवादी होते मात्र या स्त्रियांनी मला स्त्रीवाद जगणे आणि पुरुषप्रधानतेचे आधारस्तंभ नाकारणे काय असते हे शिकवले. एके दिवशी एक सेक्स वर्कर माझ्याकडे आली. ती गरोदर होती आणि अगदी उत्साहाने तिने मला तिच्या पोटाला हात लावून बाळ कसे लाथा मारतंय ते बघ अशी गळ घातली. त्यावेळी नकळत माझ्या तोंडून प्रश्न बाहेर पडला, “ कोणाचंय हे?” कारण कुमारी माता आणि विवाहबाह्य मातांमध्ये काम करताना माझ्यामधील स्त्रीवादी कार्यकर्ता सतत त्या बिचाऱ्या स्त्रीला या परिथिती मध्ये आणणाऱ्या , अन्याय कारणा-या व्यक्तीच्या शोधात असायची. म्हणून हिलाही तोच प्रश्न नकळतपणे विचारला गेला. मात्र त्या बाईने ताडकन उत्तर दिले – “ कोणाचं म्हणजे? माझे आहे हे बाळ ... पूर्णपणे माझे! “ तिच्या या उत्तराने मला जाणीव करून दिली कि “माझ्या शरीरावर, माझ्या गर्भाशयावर केवळ माझा हक्क आहे” ही स्त्रीवादी भूमिका या स्त्रिया अक्षरश: जगत होत्या. हे सर्व मी सखोलपणे शिकले होते आणि त्याचे प्रत्यक्ष उदाहरण तेव्हा माझ्यासमोर उभे होते. पितृसत्तेला नाकारणारे त्यांचे जगणे होते. त्यांच्यातील काही स्त्रियांच्या नावे घरे होती, जमिनी होत्या जे इतर स्त्रिया मुक्तपणे नाही करू शकत. आणि असे असून देखील त्या उपेक्षित होत्या कारण त्यांच्या कामाला सामाजिक मान्यता नव्हती.
वेश्या व्यवसाय करणा-या स्त्रियांचे कोणते हक्क असतात? त्यांचे कसे उल्लंघन होते? सध्या परिस्थिती कशी आहे?
समाजाची एखाद्या गटाबाबतची मते/दृष्टीकोन आणि त्या गटाची स्वतःबद्दलची मते/दृष्टीकोन यामध्ये खूप अन्तर असते हे आम्ही जवळून बघितले होते. समाज ज्यांना केवळ एड्सचे वाहक समजत होता, त्या वेश्या व्यवसायातील स्त्रिया एड्सने पिडीतदेखील होत्या. माहिती आणि सहाय्य मिळाल्यानंतर स्वतःच्या आरोग्यासाठी ग्राहकांना कंडोम वापरण्यास बाध्य करू शकत होत्या आणि त्यांचे समुपदेशन देखील करत होत्या. म्हणजे आरोग्यदुतासारखे काम देखील त्यांनी केले आणि जनजागृतीमध्ये त्यांचे योगदान दिले.  हे सर्व जवळून बघताना त्यांच्या आयुष्याच्या त्यांच्या स्वतःच्या आकलनासह त्यांच्या सहा हक्कांचा मसुदा आम्ही तयार केला. 
‘आदराने वागवले जाण्याचा हक्क’ , ‘ ‘होय’ व ‘नाही’ म्हणण्याचा हक्क’ , ‘मारक रूढी नाकारण्याचा हक्क’, ‘समतोल अधिकाराचा हक्क’ , ‘ ‘सुटका’ नाकारण्याचा हक्क’ आणि ‘अस्तित्व टिकवण्याचा हक्क’ असे हे सहा हक्क आहेत. याखेरीज सर्व मानवी हक्क जितके आपले आहेत तेवढे त्यांचे ही आहेतच .
हे हक्क वेश्या व्यवसायातील व्यक्तींना मिळावेत यासाठी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे मात्र आता या स्त्रिया सर्व संघटीत व जागृत झाल्याने आपले हक्क मिळविण्यासाठी स्वतः संघर्ष करू शकतात.
वेश्या व्यवसायाला लैंगिक सेवा पुरविणारा व्यवसाय असे समजल्यानंतर या स्त्रियांच्या आत्मसम्मानामध्ये खूप फरक पडला आहे. कलंकित भावना केवळ समाजाकडून येते असे नाही. स्वतःविषयी कलंकित भावना वाटणे हे त्या व्यक्तीच्या सर्व जीवनाला व्यापून राहू शकते. सेल्फ वर्थ वाढणे हे आत्मसम्मानापेक्षाही खूप महत्वाचे असते आणि वेश्या व्यवसायाबद्दलचा या स्त्रियांचा स्वतःचा दृष्टीकोन बदलल्याने त्या स्त्रियांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले आहेत. आरोग्य सेवा, पोलीस किंवा वकील अश्या लोकांशी वागताना आता या स्त्रिया आदरपूर्व वर्तणुकीची मागणी करू शकतात. हा बदल त्यांच्या संघटीत होण्याने आणि स्वतःविषयी कलंकित भावना नसल्याने घडून आला आहे.
जेन्डर आणि सेक्शुअलिटी मुळे या सेक्स वर्कर्स मध्ये सामाजिक उतरंड असते का?
सेक्स वर्क कारणा-या जश्या स्त्रिया आहेत तसेच तृतीयपंथी आणि समलैंगिक पुरुष (कोथी) देखील आहेत. सेक्स वर्कर्सच्या जगामध्ये ग्राहकाच्या पसंतीक्रमानुसार व मिळणा-या मोबदल्यानुसार सर्वात वर समलैंगिक पुरुष, मग तृतीयपंथी आणि मग स्त्रिया अशी रचना आहे. यावरून त्यांच्यामध्ये कधीकधी वाद देखील उद्भवतात. 
म्हणजे वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांमध्ये खूप विविधता आहे. काही स्त्रिया या असहाय्यपणे या व्यवस्थेचा बळी ठरतात तर काही स्त्रिया सर्व परिस्थिती योग्य प्रकारे हाताळून आयुष्य व्यतीत करू शकतात. या स्त्रियांना त्यांच्या आयुष्याचे नियंत्रण करणे शक्य झाले तर त्यांची प्रगती होईल का ?
फक्त वेश्या व्यवसाय करणा-या स्त्रियाच का? हेच विवाहित स्त्रियांच्या बाबतीत देखील म्हणता येईल की! काही स्त्रिया त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये असतात आणि हे समाजाच्या सर्व स्तरांतील स्त्रियांबाबत सत्य आहे. केवळ काही स्त्रिया त्यांचे वैवाहिक जीवन त्यांच्या मर्जीनुसार जगू शकतात. एकंदर पाहता समाजातील सर्वच स्त्रियांची ही शोकांतिका आहे. समाजातील जास्तीत जास्त स्त्रिया सबलीकरणामुळे आपल्या आयुष्याचे नियंत्रण करू शकतील व स्वतःची प्रगती करू शकतील अशीच आमची आशा आहे  आणि म्हणून सर्व उपेक्षित स्तरामध्ये आम्ही काम करत आहोत.  
सेक्स वर्क च्या decriminalization ची नेहमी चर्चा होते. याच्या आवश्यकतेबाबत काही सांगा.
मी आधी सांगितल्यानुसार ही सर्व परिस्थिती खूप गुंतागुंतीची आहे. decriminalization ही एकच गोष्ट आहे ज्याने या स्त्रियांची परिस्थिती सुधरू शकते.  सध्याच्या ITP Act मध्ये सेक्स वर्क मधील सेक्स वर्क खेरीज इतर ब-याच गोष्टींना क्रिमिनलाइज करण्यात आले आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना येथील स्त्रियांचे शोषण करणे शक्य होते . जर या कामाला मान्यता देऊन इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणे त्याची नियमांमध्ये आखणी केली तर या स्त्रियांचा सर्वात जास्त फायदा होऊ शकेल. हे काम सुरक्षित बनवता येऊ शकते, त्यातील शोषण कमी करण्याचे प्रयत्न करता येऊ शकतात. सध्याच्या परिस्थिती मध्ये सत्तेच्या असंतुलनामुळे शोषण होऊ शकते व गुन्हेगारीकरणामुळे या स्त्रिया अन्यायाविरुद्ध दाद मागू शकत नाहीत.
तुमच्या या प्रवासामध्ये कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आव्हानात्मक वाटली ?
जेव्हा या कामाला सुरुवात केली त्यावेळी सर्व स्तरांवरून याला विरोध झाला. सेट बॅक आरोग्य विभागाकडून मिळाला, पोलिसांकडून मिळाला, निकृष्ट दर्जाच्या कंडोम मुळे मिळाला, मला वेश्या ठरविणा-या समाजाकडून देखील मिळाला. स्त्रियांच्या हक्कासाठी काम कारणा-या इतर संस्थांकडून देखील मला नकारात्मक वागणूक मिळाली कारण त्यांच्या दृष्टीने मी वेश्यावृत्तीला समर्थन देत होते, मी त्या स्त्रियांच्या शोषणाची समर्थक समजली जात होते. अगदी यु एस च्या सरकारने देखील मला देह व्यापाराची समर्थक मानले होते. अश्या समाजाच्या सर्व थरांमधून आमच्या या स्त्रियांसाठी काम करण्याच्या निर्णयाचे, आमच्या पद्धतीचे निषेध होत होते त्यावेळी या स्त्रियांनी मला मानसिक बळ दिले. मध्यमवर्गीय मानसिकतेमुळे आणि शिक्षणामुळे माझी मते समाजातील इतर कोणत्याही व्यक्तीसारखीच होती .  “धंदा आमचे काम आहे”  या स्त्रियांच्या स्वतःच्या कामाकडे बघण्याच्या दृष्टीने मलाही एक नवी दिशा मिळाली आणि यांच्यासाठी, यांच्या हक्कांसाठी काम करणे सोपे झाले.
या स्त्रियांकडून तुम्ही काय शिकलात? 
सर्वात महत्वाचे म्हणजे मला माझ्या प्रीविलेजेसची जाणीव विशेषत्वाने झाली. फक्त इंग्रजी बोलता येणे या सध्या गोष्टीने देखील तुम्हाला आपसूकपणे एक वरचे स्थान प्राप्त होते आणि काही बाबी सुकर होतात. मात्र अश्या या वेगळ्या कामामुळे व विचारांमुळे जीवनात मैत्री मिळणे थोडे अवघड झाले कारण समविचारी लोक मिळणे कठीण आहे. आधी सांगितल्यानुसार माझ्या स्त्रीवादी जाणीवा अधिक विस्तृत होण्यामागे या स्त्रियांचा फार मोठा वाटा आहे. माझ्या स्त्रीवादी भूमिकांना मी अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकते. 
भांडवलशाही मध्ये पैसे महत्वाचे असतात तसेच पैसे घेऊन सेवा देणारा देखील महत्वाचा असतो. मात्र या वेश्या व्यवसायामध्ये या स्त्रिया जरी पैसे घेऊन लैंगिक सेवा देत असल्या तरी त्यांचे स्थान हे समाजामध्ये कमी लेखले जाते. हि परिस्थिती बदलण्यासाठी या स्त्रिया संघटितपणे कार्य करीत आहेत, पितृसत्ताक पद्धतीला विरोध करीत आहेत. त्यांच्या श्रमाला शारीरिक किंवा मानसिक श्रमासारखी मान्यता मिळणे आवश्यक आहे.
या स्त्रियांच्या गरजा समाजाने ठरविण्याऐवजी, त्या या स्त्रियांनी स्वतः ठरवणे अधिक संयुक्तिक आहे नाही का? समाजाचा एक घटक म्हणून त्या गरजा पूर्ण करणे हे समाजाचे काम आहे.
या चळवळीचे भविष्य काय आहे असे वाटते? 
याबाबत काहीही आडाखे मांडणे सध्या अवघड आहे. या स्त्रियांचे आयुष्य भविष्यात कसे असेल हे राजकीय अनुमती वर अवलंबून आहे . समाजाची या व्यवसायाला अनैतिक मानण्याची वृत्ती आणि बेकायदेशीरपणे चालणारा देहव्यापार यामुळे वेश्या व्यवसाय विरोधी कायद्यामध्ये होणारे बदल हे पुढील बदलांची नांदी ठरतील . 
सेक्स वर्करला अश्या कायद्यांचे परिणाम भोगावे लागतात पण त्यांना या व्यवसायात आणणारी व्यक्ती मात्र यातून सुटून जाते. हा देहव्यापार खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. कधीकधी या स्त्रियांचे पूर्वायुष्य इतके वेदनामय असते कि त्यातून बाहेर पाडण्यासाठी या स्त्रिया अश्या ट्राफिकर्सची देखील मदत घेण्यास तयार असतात . त्यामुळे सर्व स्त्रियांसाठी त्यांच्या वेदनामय आयुष्यातून सुरक्षितपणे बाहेर पडण्याचे मार्ग उपलब्ध असणे हे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक आहे. असे मार्ग नसल्याने या स्त्रिया असुरक्षित होतात व या गुन्हेगारीच्या जगात ओढल्या जातात आणि मग त्यांचे शोषण सुरु होऊ शकते . 
या बाबत विचार करताना दोन स्तरांवरून विचार केला पाहिजे. सज्ञान स्त्रियांसाठी कायदे बनवताना लहान मुलांसाठीचे नियम न लावता स्त्रियांची बाजू देखील विचारात घ्यायला हवी. त्या स्त्रीने हा व्यवसाय निवडला म्हणून या निर्णयाबाबत मते बनविण्याऐवजी त्यासाठीची तिची कारणे (back story) तिला विचारणे आणि कारणमीमांसा समजून घेणे आवश्यक आहे. सरसकटीकरण केल्याने अश्या लोकांवर अन्याय होण्याची तसेच त्यांचे हक्क नाकारले जाण्याची शक्यता वाढते. या वेश्या व्यवसायातील व्यक्तींना सक्षम बनविण्याचे काम सुरूच राहील. या मॉडेलचा स्वीकार आता जागतिक स्तरावरून झाल्याने आता आमचे काम इतर देशांमध्ये देखील पसरत आहे याचा आनंद आहे. 
 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form