मीना आजी ...



गेल्या वर्षभरात मी मिनाआजीला इतक्या वेळा भेटले, गप्पा मारल्या, फोटो काढले आणि एक दिवस अचानक समजलं की मीना आजी आता या जगात नाही!मीनाआजी गेली, हे मला अजूनही खरंच वाटत नाहीये! 

मी लहान असल्यापासून माझ्या आईच्या मैत्रिणी म्हणून विद्या बाळ, छाया दातार, मीना देवल, विजु चौहान, नीरा आडारकर ह्या सगळ्यांना पाहिलेलं आहे . माझ्या आईचे सगळे संघर्ष ह्या बायकांनी खूप जवळून पाहिले आहेत, तिला सपोर्ट केलेलं आहे. माझ्या सख्ख्या आजीशी माझा फारसा संबंध आला नाही. पण आईच्या ह्या मैत्रिणींना मी छायाआजी, मीनाआजी, विजूमावशी म्हणत मोठी झाले. खरं म्हणजे ह्या सर्वांशी कायम संपर्क असतो असं नाही, पण सख्ख्या आजीपेक्षा ह्या मला नक्कीच जास्त जवळच्या वाटतात.
मीना आजीशी माझ्या आईची सगळ्यात जास्त जवळची मैत्री आहे. आजारी पडल्या पासून मीना आजीला घराबाहेर पडणं हळूहळू अवघड होत गेलं. बरेचदा आई तिच्याशी फोनवर बोलायची किंवा तिच्या घरी जाऊन भेटायची. पण कधीकधी तेही शक्य नसेल तर मी दादरच्या आसपास गेले तर मीना आजीला भेटून यावं असं ती सांगत असे. मला सुरुवातीला वाटायचं की आपल्याला एवढ्या मोठ्या बाईशी काय बोलता येईल? तरी पण आईच्या सांगण्यावरून मी मीना आजीला एकदा भेटायला गेले आणि नंतर अनेकदा जातच राहिले.
तिच्याशी बोलताना असं कधी वाटायचंच नाही आपण एका पंच्याहत्तर वर्षांच्या बाईशी बोलतोय. आमची खरंच चांगली दोस्तीच झाली होती. तिच्याकडे जाताना मी तिच्यासाठी चाफ्याची फुलं, मोगऱ्याचा गजरा आणि तिचा आवडता ‘आमेरी खमण’ घेऊन जात असे. आमच्या २-२ तास गप्पा चालायच्या! निघायची वेळ झाल्यावर ती नेहमी अजुन थोडावेळ थांबवून घ्यायची. मग अजुन थोडावेळ गप्पा व्हायच्या. पूर्वी मला नेहमी वाटायचं की माझ्या पिढीला मीना आजीच्या पिढीच्या स्त्रीवादाच्या कल्पनेशी कसं काय जुळवून घेता येईल? पण तसं अजिबात नव्हतं. मला लक्षात येत गेलं की माझ्या पिढीची स्त्रीवादाची कल्पनाच मुळात मीना आजीसारख्या बायकांनी केलेल्या कामातून तयार झाली आहे. ती जेव्हा मला तिच्या काऊनसेलिंग मधल्या केसेसचे किस्से सांगायची तेव्हा मला सारखं जाणवायचं की ती ३०-४० वर्षांपूर्वी जे प्रॉब्लेम्स बघत होती, त्यातले ८० टक्के मी आज पण बघतेच आहे... मग आमच्यातल्या पिढीच्या फरकाचा प्रश्नच संपला.
पण आम्ही काही फक्त स्त्रीवादाबद्दलच बोलायचो असं नाही. मीना आजी अतिशय गोष्टीवेल्हाळ होती. बोलत बोलता ती धमाल जोक्स पण सांगायची. तिच्या आणि डॉक्टरांच्या आठवणी सांगायची, आम्ही फिल्म्स बद्दल बोलायचो, तिचे जुने जुने फोटो पण बघायचो. मी लहानपणी एकदा तिच्या किहिमच्या घरी राहून आले होते, त्याच्या तर भरपूर आठवणी तिच्याकडे होत्या. त्याबद्दल तर तिने एक आख्खं पुस्तकच लिहिलं आहे.


एकदा ती मला म्हणाली होती की तिला तिच्या जुन्या साड्या देऊन टाकायच्या आहेत. मी वेळ काढून यायचं कबूल केलं होतं. पण बरेच दिवस मला जायला जमलंच नाही. मग तिने एकदा आईला फोन करून आठवण केली आणि मला खास करून साड्या देण्यासाठी बोलवूनच घेतलं. तिच्याकडे एकसे एक सुंदर साड्या होत्या. कॉटनच्या काठापदरांच्या सुंदर सुंदर साड्या. शिवाय कित्येक साड्यांना तिने स्वतः अतिशय सुबक एम्ब्रोयडरी केली होती. ते भरतकाम पाहून मला मीनाआजीची वेगळीच बाजू समजली. 
मी चक्क 10/12 साड्या घेऊन घरी आले. मला आई थोडीशी रागावली सुद्धा! ती म्हणाली की – तू यातली एकतरी साडी नेसणार आहेस का? पण मी घरी गेल्यावर एकएक साडी नेसून त्यांचे फोटो पाठवेन असं मीना आजीला प्रॉमिस केलं होतं! एकदा मी साड्यांच्या भरतकामाचे थोडेसे फोटो पाठवले, पण साडी नेसून फोटो पाठवायला काही मला जमलं नाही. कुठल्या साडीवर कसा ब्लाऊज घालायचा याचा मी नुसता विचारच करत बसायची. माझ्याकडून ब्लाऊज शिवून घेणं मात्र सारखं राहूनच जात होतं. एकदोनदा माझ्या आईने आणि एकदा मीना आजीने पण आठवण केली. मी सुद्धा फोटो पाठवते असं म्हणत राहिले आणि पुढे ढकलत राहिले.

... आणि अचानक एकदा सकाळी कळलं की मीनाआजी गेली. साड्या नेसून फोटो पाठवायचं शेवटी राहूनच गेलं; हे मला आता कायम टोचत राहील. Sorry मीना आजी! पण आता त्या साड्या म्हणजे मला तिच्या मैत्रीचं आणि तिच्या कडून मला शिकायला मिळालेल्या सगळ्या गोष्टींचं प्रतीक वाटतं. मी ते कायम सांभाळून ठेवेन!
मुक्ता खरे 

1 Comments

  1. खूप छान आठवणी. कधी नव्हे ते मुक्ता तुझ्या आठवणी वाचून डोळ्यात पाणी आलं. मीनाचमीनाची आठवण तर मला सारखीच येत असते. ती आता नाही हे पचवणे अवघड आहे.

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form