संपादकीय

आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 

मागच्या वर्षी महिलादिनाच्या निमित्ताने ‘पुन्हास्त्रीउवाच’ ही मराठीतली पहिली स्त्रीवादी वेबसाइट प्रकाशित झाली. 1980 आणि 90 च्या दशकात हिरीरीने स्त्रीवादी विचार मांडणार्‍या ‘स्त्रीउवाच’ प्रकाशन गटातल्या ज्येष्ठ मैत्रिणींच्या कामाला अभिवादन करण्यासाठी एक छोटीशी वेबसाइट तयार करायच्या विचारातून मागच्या वर्षी काम सुरू केले होते. ‘स्त्रीउवाच’ वार्षिकाच्या संपादकांच्या दृश्य-श्राव्य मुलाखती आणि जुन्या अंकामधल्या काही लेखांचे डिजिटायझेशन करण्यासोबत सध्या स्त्रीवादी विचारांनी काम करणार्‍या व्यक्तींच्या कामाची ओळख करून देणे – अशी वेबसाईटची मूळ कल्पना होती. खरं म्हणजे काही वर्षांपासून महिलादिवसाचं जे बाजारीकरण होत चाललं आहे, त्या पार्श्वभूमीवर महिलादिना निमित्त वेबसाइटच्या उद्घाटन करणे ही एक जोखीमच होती. पण वर्षभरापूर्वी प्रकाशित झालेल्या वेबसाइटला मात्र अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. डिजिटल आणि छापील माध्यमांनी देखील विशेष दाखल घेतली आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणच्या वाचकांपर्यंत पोचता आले. वाचकांनी सोशल मीडियावर आणि वैयक्तिक संपर्क साधून आपल्या प्रतिक्रिया आमच्या पर्यंत पोचवल्या आणि आमचा उत्साह वाढता ठेवला.

त्यामुळे “पुन्हास्त्रीउवाच”चा पसारा वर्षभरात वाढतच गेला. त्यानंतर आम्ही दर तीन महिन्यांनी वेबसाइटमध्ये भर घालत राहिलो. साधारणत: लिंगभाव आणि स्त्रीवाद यांच्या संबंधीच्या लेखनात स्त्रियांवरची हिंसा, लैंगिक अत्याचारा सारख्या घटना किंवा माध्यमातल्या नकारात्मक चित्रण  याविषयीचे लेखन असते. आम्हाला यापलीकडे जाऊन रोजच्या जगण्यातील लिंगाभावाबद्दलचे बारकावे मांडायचे असल्याने आम्ही पर्यावरण, खाद्यसंस्कृती आणि विनोद अशा वेगवेगळ्या विषयसूत्रांची जाणीवपूर्वक निवड केली. वर्षभरात शंभरपेक्षा जास्त लेखकांनी कविता, कथा आणि लेखांच्या रूपात अंकाच्या विषय आणि आशयात भर घातली. मुखपृष्ठावरची चित्रं, व्यंगचित्र आणि फोटोग्राफ्सच्या निमित्ताने अनेक कलाकार जोडले गेले. या सर्वांच्या विनामूल्य सहकार्यामुळे स्त्रीवादी दृष्टिकोनातून अनेक विषयांचा वेध घेता आला. मुख्यत: तुम्ही वाचकांनी वेळोवेळी अंकावर ज्या प्रतिक्रिया दिल्यात आणि आवडलेले साहित्य विविध माध्यमातून नवनवीन वाचकांच्या पर्यन्त पोचवले – त्यामुळे आमचा उत्साह टिकून राहिला. सुरुवातीला फक्त तिघींचे संपादन मंडळ होते त्यातही आता बरीच भर पडली आहे. आता विविध क्षेत्रातला अनुभव असलेले एकूण दहाजण संपादक मंडळात सहभागी झालेले आहेत.

नव्या संपादक मंडळाने ह्या वर्षपूर्ती विशेषांकासाठी ‘लिंगभाव आणि ओळख’(Gender & Identity) असे विषयसूत्र ठरवले. व्यक्तीच्या ओळखीचे जे विविध पैलू असतात त्यांचा लिंगभावाच्या भिंगातून शोध घेणारे लेख या अंकात वाचायला मिळतील. आपल्या व्यक्तित्त्वावर स्वत:च्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांच्या शिवाय ज्या अनेक सामाजिक घटकांचा प्रभाव पडतो त्यातून आपली ओळख घडत जाते. नाव, गाव, जात, धर्म, रंग, लैंगिकता, आर्थिक वर्ग, मूल्यव्यवस्था, भाषा, शिक्षण इ. अनेकविध परिस्थितीजन्य घटकांचाही त्यात मोठा भाग असतो. सध्या देशात धार्मिक आणि जातीय अस्मितांच्या राजकारणाला ऊत आलेला आहे. राष्ट्रवादाच्या कल्पनेचा बडिवार माजवून हिंसाचारला निमित्त पुरवले जाते आहे. बहुसंख्य प्रसारमाध्यमे प्रतिगामी विचारसरणीचे ढोल वाजवत आहेत. संविधानाने मांडलेल्या समतेच्या तत्त्वांमधली आणि सामाजिक न्यायाच्या अंमलबजावणी मधली दरी वाढत चाललेली आहे. त्यामुळे स्त्रियांच्या आणि वंचितांच्या हक्कांची गळचेपी होण्याचे प्रमाणदेखील वाढते आहे. या सर्वांचा परिणाम आपल्या व्यक्तित्त्वाच्या सगळ्याच घटकांवर होणे अपरिहार्य आहे. ह्या विविध घटकांची लिंगभावाच्या संदर्भात पडताळणी करताना समाजातला व्यवस्थात्मक हिंसाचार (structural violence ) अधोरेखित झाला आहे. या अंकात काही लेखकांनी स्वत:च्याच व्यक्तित्वाचा एखादा पैलू निवडून त्याचा लिंगभावाच्या संदर्भाने शोध घेतलेला आहे आणि काहीनी विशिष्ट सामाजिक ओळख असलेल्या समूहांविषयी लिहिले आहे. ह्या सगळ्या लेखांमुळे – ‘समाजात सगळ्यांनी एकमेकांशी समजुतीने वागले की विषमता शिल्लक राहणार नाही; कसल्याही चळवळी-आंदोलने करायची गरज पडणार नाही’ – अशी भाबडी समजूत थोडीतरी कमी व्हायला मदत होईल.
लैंगिक सेवा पुरवणार्‍या महिलांच्या हक्काविषयी मीना सेशू यांच्या मुलाखतीतून समजून घेता येईल. सगळ्याच जातीधर्माच्या महिलांकडे केवळ त्या त्या समाजाची इज्जत म्हणून पाहिल्यामुळे स्त्रियांवर किती मोठ्या प्रमाणात हिंसा केली जाते त्याचे भान मनीषा गुप्ते यांच्या मुलाखतीमधून येईल.
‘मी नवर्‍याला टाकलं’ असं स्पष्टपणे सांगणार्‍या एकल महिला संघटनेविषयी शिशिर सावंत यांचा लेखही असाच दृष्टीकोनात बदल घडवणारा आहे. गावचा कारभार करणार्‍या सरपंच महिलांना अजूनही किती पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो – त्याबद्दल साधना तिपन्नकजे यांनी लिहले आहे. नीरजा पटवर्धन यांनी ऐतिहासिक संदर्भ देऊन वेशभूषा ह्या महत्वाच्या पैलूविषयीचे विश्लेषण मांडले आहे. निमशहरी भागातील शिक्षकांच्या समताविषयक जाणिवांबद्दल अश्विनी बर्वे यांनी खुसखुशीत शैलीत निरीक्षण नोंदवले आहे. त्याचसोबत स्त्रीवादाला नाकारणार्‍या मतांतराची दखल घेणारा एक लेखसुद्धा आवर्जून समाविष्ट केला आहे.
स्वत:चे नाव हा कुठल्याही व्यक्तीच्या ओळखीतला महत्त्वाचा भाग असतो. आपले नाव कसे असावे यावर देखील पितृसत्तेचा किती प्रभाव असतो – याबद्दल ‘ नाव बदलण्याची गोष्ट’ या मुक्ता खरेच्या लेखातून लक्षात येईल. रवींद्र रु.प. आणि श्रीनिवास हेमाडे यांनी स्त्रीवादी चळवळीशी जोडलेले पुरुष या दृष्टिकोनातून स्वत:मध्ये घडवलेल्या बदलांविषयी लिहिले आहे. अंजली जोशी यांनी स्वत:च्या आयुष्यातल्या स्त्रीवादी मूल्यांविषयी सांगितले आहे. शुभांगी थोरात यांनी एक स्त्रीवादी व्यक्ती म्हणून पालकत्व निभावताना आलेले अनुभव मांडले आहेत.
‘इंद्रधनुष्य’मध्ये स्वत:ची वेगळी लैंगिक ओळख निवडणार्‍या तरुणाचे अनुभवकथन आहे तर ‘कॅलिडोस्कोप’ मध्ये स्त्रीवादी मूल्ये घेऊन जगणार्‍या पत्रकार तरुणीने स्वत:च्या आयुष्यातले अंतर्विरोध उलगडून पाहिले आहेत. अनुजा संखे हिने स्वानुभवाचा संदर्भ देत अंध मुलींच्या लैंगिकतेविषयी लिहिलेला लेख सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.
‘लिंगभाव आणि ओळख’ ह्या विषयाचे असे विविध पदर उलगडणारा हा अंक वाचकांच्या समोर ठेवताना ‘पुन्हास्त्रीउवाच’च्या विस्तारीत संपादक मंडळाला अतिशय आनंद होतो आहे. पण ह्या आनंदात सहभागी होण्यासाठी विद्या बाळ आणि मीना देवल ह्या दोन उत्साही ज्येष्ठ मैत्रिणी मात्र आपल्यात नाहीत – त्यांच्या विचारांच्या रूपाने त्या नेहमीच आपल्या सोबत राहतील.

त्या दोघींच्या स्मृतींना हा वर्षपूर्ती विशेषांक अंक समर्पित !

वंदना खरे 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form