तत्त्वज्ञानाच्या चष्म्यातून

'मी स्त्रीवादी आहे', हे मला माहित आहेच, पण इतरांना सांगताना ते लिखित रुपात कसे शब्दबद्ध करावे,हे बराच काळ सुचत नव्हते. वंदना खरेशी चर्चा करताना तिने काही प्रश्न सुचवले. उदाहरणार्थ "तुझी स्त्रीवादाशी ओळख कधी, कशी, कुठे झाली? आपण स्त्रीवादी आहोत हे तुला कसं जाणवलं? स्त्रीवादी बनण्याची तयारी म्हणून स्वतःमध्ये तुला जाणीवपूर्वक काही बदल करावे लागले का? इतर पुरुषांपेक्षा तू वेगळ्या जाणिवा असणारा आहेस, असे तुला का वाटले ? ते वेगळेपण कधी जाणवले ? वेगळे असल्याचे फायदे-तोटे कोणते झाले किंवा अजूनही होतात? उदाहरणार्थ पुरुषांच्या ग्रुपमध्ये असताना बायकांवरच्या पुरुषी विनोदाला हसला नाहीस तर ते पुरुष तुला काय म्हणतात? स्त्रीवादाच्या बाबतीत आपल्यात सुधारणेला वाव आहे, असं तुला वाटतं मनोमन का? पुढचा जन्म बाईचा मिळाला तर चालेल का?" तिच्या ह्या प्रश्नांनी मला माझ्या कथनाचा सूर सापडला... आता, मी काहीतरी सांगू शकेन, असे मला वाटते.
“मी स्त्रीवादी आहे " म्हणण्यात 'मी' हे सर्वनाम येणे भाषेच्या आणि कृतीच्या दृष्टीने अनिवार्य झाले. 'मी' हे प्रथम पुरुषी एकवचनी संबोधन व्यक्तीला अनिवार्यपणे आत्मनिवेदनाकडे घेवून जाते. 'मी' आला की आत्मश्लाघेचा दोष येतोच. तो स्वीकारला नाही तर निवेदन पुढे सरकत नाही. तो स्वीकारून माझा स्त्रीवाद उलगडतो. माझ्या निवेदनात मी कितपत यशस्वी होईन, हे मला माहित नाही.
कोणतीही विचारधारा केवळ सिद्धांकनाच्या पातळीवर न राहाता ती प्रत्यक्षात उतरणे, ही तिच्या सचोटीची अनिवार्य अट असते. "मी स्त्रीवादी" नामक कथनात जी कोणी कथनकार व्यक्ती असेल त्या व्यक्तीची स्त्रीवादी विचारसरणी, तिचे घडत गेलेले अनुषंगिक वर्तन आणि त्या वर्तनाचे समकालीन सातत्य ह्या तिन्हींनी मिळून त्या व्यक्तीच्या 'स्त्रीवादी जीवनाचा आकार' कसा घडत गेला, ह्याचा काहीएक आलेख मांडावा, असेही अपेक्षित आहे. त्यात 'भावी जीवनातील वर्तनही त्याच रीतीचे असेल' अशी एक आश्वासकताही गृहीत धरलेली असते.
मला आधी अनुभव येत गेले, अनुभवांचे मी निरीक्षण करत गेलो. ते भरड कच्चे-सच्चे आणि अनाम होते. त्यांना स्त्रीवाद असे नाव नव्हते, पण त्यांचे स्वरूप स्त्रीवादी होते (हे मला नंतरच समजले). हे अनुभव खासगी व सार्वजनिक असे दोन प्रकारचे होते. कुटुंब आणि व्यावसायिक जीवन हे त्याचे ढोबळ वर्गीकरण करता येते.
गेली तीस वर्षे मी संगमनेर या निमखेड्यात आणि निमशहरात राहातो आहे. येथील जनता खेडे आणि शहर ह्या दोन्ही जीवनशैलीत जगते आहे. कुटुंब या पातळीवर माझ्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांचे आयुष्य जवळून पाहिल्यानंतर, अनुभवल्यानंतर माझ्या स्त्रीवादाचा पाया रचला गेला. माझी आई, दोन बहिणी, दोन वहिन्या, माझी बायको आणि आमच्या दोन मुली ह्या माझ्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया. माझ्या जीवनात सर्वप्रथम आलेली पहिली स्त्री म्हणजे माझी आई. किंबहुना तिने मला 'जीवनात' आणले, मग ती माझ्या 'जीवनाचा हिस्सा' बनली. नंतरचा क्रम बहिणी, शाळासोबतिणी, वर्गमैत्रिणी (पण भगिनी नव्हे. कोणत्याही परस्त्रीला भगिनी म्हणणे हे स्त्रीवादी दृष्टीकोनातून चूक आहे, असे माझे मत आहे- हे शालेय जीवनातही होते आणि आजही आहे.)
कुटुंबाशिवाय बाहेरच्या 'दैनंदिन भूगोल' परिसरातील स्त्रियांविषयीही मला सहकार्य आणि समतावादी भावनेचे ममत्व आहे. त्या जसजशा ज्या क्रमाने माझ्या जीवनात आल्या तेव्हापासून मी त्यांच्याशी 'समतावाद' ह्या अर्थाने स्त्रीवादीच वागत आलो. 'समता' हे तत्त्व माझ्या 'वर्तनाच्या गुणसूत्रां' मध्येच अंतर्निहित असल्याने ते माझ्या वर्तनातच मुरलेले आहे. म्हणून वेगळे खास स्त्रीवादी वर्तन कसे करावे ? 'मी स्त्रीवादी' म्हणजे नेमके काय? हे वेगळं काय लिहावं अजूनही तसे फारसे उमजत नाही.
स्त्रीवादाची ओळख मला कशी झाली ? हा प्रश्न मला वेगळ्या रीतीने मांडावा लागेल. मी सोलापूरचा नागरिक आहे. त्यावेळी मी महाविद्यालयात असताना एका व्याख्यानमालेत विद्याताई बाळ यांचे व्याख्यान होते आणि विषय होता 'मंजुश्री सारडा खून खटला'. ते व्याख्यान ऐकत असताना मला विद्याताईंची ओळख पटली. तरीही साहित्याचा बऱ्यापैकी वाचक आणि तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी म्हणून मला त्याच्या व्याख्यानात स्त्रीवादापेक्षा मानवतावाद जास्त वाटत होता.
एमए नंतर मला १९८५ साली पुण्यातील गरवारे महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकी मिळाली. त्यावेळी नेहमी सिटी बसने येजा करीत होतो. तेव्हा बसचा कंडक्टर आणि एक प्रवासी यांच्यात कोणत्या तरी कारणाने जुंपली. त्यांनी एकमेकांना शिव्या द्यायला सुरुवात केली. पहिली गोष्ट तर बसमधील स्त्रीलोकांमधील बहुतेक स्त्रीप्रवासी कावऱ्याबावऱ्या झाल्या होत्या, लहान मुलामुलींना काहीतरी भांडणे चालली आहेत हे समजत होते, पण एक म्हातारी बाई निर्विकार चेहऱ्याने सगळ्यांकडे पाहात होती. पुरुषलोक भांडण सोडवण्याचा प्रयत्न करीत होते. दुसरी गोष्ट सगळ्या शिव्या आईबहिण यांच्यावरून होत्या.. शिव्यांचे केंद्र केवळ आईबहिणच होत्या. शिव्यांच्या परिघात नातेविस्तार झालेला नव्हता. मावशी, आज्जी किंवा बापाकडून आत्या, काकी, तिकडची आजी इत्यादी स्त्रिया शिवीक्षेत्रात आल्या नव्हत्या - आजही विस्तारित नात्यावरून शिव्या नाहीतच. भांडण चालू असताना मी प्रथमच "शिव्या का दिल्या जातात? त्यात आईबहिणच का असतात? बापभाऊ का नसतात?" असा विचार करू लागलो.त्यामुळे कंडक्टर आणि प्रवाशाच्या भांडणातून मला नवीन ज्ञान काही मिळाले नाही. पण एक वेगळे भान आले. शिव्या मला नवीन नव्हत्या पण माझे शिवीचिंतन मलाच नवीन होते. सगळ्या स्त्रीकेंद्री शिव्यांनी माझ्या स्त्रीवादी जाणिवेचा पाया घातला, आणि हे स्त्रीवादाचे माझे पहिले भान होते, असे मी आता म्हणून शकतो. म्हणजे शिव्यांनी माझा स्त्रीवाद अभ्यास सुरु झाला.
अमूर्त शिवी चिंतन प्रत्यक्ष कागदावर उतरायला दहा वर्षे गेली. त्यातून माझ्या 'शिवीचे मानसशास्त्र' हा अतिशय कच्च्या स्वरूपातील लेख निर्माण झाला. 'अपशब्द संकल्पने विषयी काही तात्त्विक विचार' हा निबंध महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेत १९९५ साली वाचला. पण त्यावरील लेख प्रसिद्ध झाला तो १९९७ साली ('परामर्श' खंड १८, अंक ४, फेब्रुवारी १९९७). हा निबंध वाचून प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ डॉ अशोक केळकरांचे मला अतिशय उत्साहवर्धक पत्र आले. पण त्यांनी 'अपशब्द' शब्दाला हरकत घेऊन 'शिवी' हाच शब्द वापरण्यास सुचवले. मग माझ्याच महाविद्यालयात २००७ साली एका स्त्री प्रश्नांच्या परिषदेत मी 'शिवी : स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून' हा निबंध वाचला. आणि शिवी चिंतन बऱ्यापैकी पक्व होवून 'शिव्यांमधील पुरुषप्रधानता' ह्या लेखाच्या स्वरुपात ते चिंतन प्रकट झाले. ( 'पुरुष उवाच' - दिवाळी २००९)या शिवी चिंतनाने मला बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली.
शिवीला जोडून दारू येते. असाच रस्त्यावरून जाताना एकदा नवराबायको दारूने झिंगून एकमेकांना शिव्या देताना, झिंज्या ओढून मारामारी करताना पाहिलं. ते शिव्या देत होतेच, त्यात नाविन्य आढळले. मुख्यतः आईबहिण होतीच, पण बाप, सासूसासरा, मेव्हणा-मेव्हणी यांची भर पडून खुमासदार शिव्या बनवल्या जात होत्या. ती बाईसुध्दा नवऱ्यासारखी, पुरुषासारखी त्याच अवयवांवरून त्याच लैंगिक कृतीसूचक शिव्या देत होती. ते लैंगिक अथक व अदम्य संबंधाचे युद्ध चालू होते... ते करीत असलेल्या वर्णनावरून जणू प्रसंग उभा राहात होता. 'भाषा ही वस्तूस्थितीचे चित्र असते' हा तत्त्वज्ञानातील सिद्धांत तेथे सिद्ध होत होता. त्यांना आवरण्याच्या ऐवजी बघे ते एन्जॉय करत होते. मला चमत्कारिक वाटले. मला जाणवले- त्याक्षणाला ती बाई 'मानसिकदृष्ट्या स्त्री उरली नव्हती तर पुरुष झाली होती ! हे मानसिक कायांतर विलक्षण होते. माझ्या शिव्यांच्या लेखात हा मुद्दा मी नंतर समाविष्ट केला. पण दारूने हे घडल्याने दारू चिंतनाच्या केंद्रस्थानी आली आणि दारूचिंतन सुरु झाले. त्यातून "दारू म्हणजे काय रे भाऊ अर्थात मद्यपानाची आचार संहिता" हा एक प्रदीर्घ उपहास लेख मी लिहिला. तो २००५ साली 'परिवर्तनाचा वाटसरू' मध्ये प्रसिद्ध झाला.
पीएचडी करत असतानाच्या काळात २००५-०७ दरम्यान काहीतरी लिहिताना जेन्डरचे तत्त्वज्ञान म्हणजे काय ? असा प्रश्न पडला. त्यानंतर नोव्हेंबर २००७ ते ऑक्टोंबर २००९ दरम्यान ‘बायजा ’ मासिकातल्या लेखमालेत मी – ‘लैंगिक अल्पसंख्यांक आणि लिंगभाव’, ‘लिंगभावाच्या तत्त्वज्ञानाची गरज’ ह्या संकल्पना तात्त्विक दृष्टीकोनातून स्पष्ट केल्या.
या खेरीज ज्या ज्या विषयांचा त्रास मला झाला किंवा प्रश्न पडले ते सारे मी लिहिले. गितालीने काही विषय मला लिहायलाच लावले, त्यामुळेही काही नवीन विचार सुचले. संकल्पना स्पष्ट करणे हा हेतू होताच. संगमनेरला वरिष्ठ महाविद्यालयात 'भारतीय तत्त्वज्ञान' हा स्पेशल पेपर शिकवत असताना मला बरेच प्रश्न पडत गेले. पुरुष-प्रकृति, ब्रह्म-माया, चार्वाकांचा अर्थ-काम पुरुषार्थ ह्यात मला स्त्री-पुरुष नाते आणि त्यातील पुरुषी पक्षपात, शोषण, विषमता जाणवू लागली. त्या नात्याचा शोध घेण्याचा प्रयत्न मी सुरु केला. मला जे जाणवले ते नवीन आहे, ह्याची मला खात्री होती. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर 'महाराष्ट्र टाईम्स' चे संपादक होते. त्यांना मी 'चार्वाकांची स्त्री विषयक संकल्पना' असा लेख पाठवला. तो त्यांनी प्रसिद्ध केलाच पण पुढे त्यातूनच समग्र भारतीय दर्शन परंपरेतील 'स्त्री' विषयक मते मांडावीत असे वाटले. त्यावेळी म. टा चे 'मैत्रिण' हे सदर सुरु होते. या सदरात 'भारतीय तत्त्वज्ञानातील स्त्री दर्शन' ही लेखमाला १९९७ साली मी लिहिली. त्यानंतर अनेक दिवाळी अंकात अजूनही मी स्त्रीवादी अंगाने लिहीत आहे.
जसजसे मी स्त्रीवादी लेखन करत गेलो, वाचत गेलो तसतसा मी स्त्रीवादी बनलोच आणि 'पुरुषीसत्ताकवाद विरोधी' देखील बनत गेलो. स्त्रीपणा किंवा पुरुषीपणा हा लिंगाधारित आहेच, ह्यात शंका नाही. पण मला असे अनुभव येत गेले की पुरुषीपणा हा पुल्लिंगाच्या पलिकडे गेलेली वृत्ती बनली आहे. तिने अनेक स्त्रिया कह्यात घेतल्या आहेत किंवा त्या गेल्या आहेत. काही स्त्रियादेखील पुरुषी आहेत. भारतीय स्त्रियांमध्ये तर धर्मवर्णजात यांचाही अहंकार आढळतो मला! निवडणुकीतील उमेदवार स्त्रिया मतदारांना दारू, मटणाची लाच देणाऱ्याही आढळल्या. लाचखोर कर्मचारीही आढळल्या. नवरा वेश्याव्यवसायात काम करतो म्हणून त्याला पोरी पळवण्यात मदत करणाऱ्या, बलात्काराला मदत करणाऱ्या...तशा टीव्ही वाहिन्यांवरील विषप्रयोग करणाऱ्या, अनेक भानगडीत गुंतलेल्या ,चकचकीत काकू, मामी, सासवा सुना याही पुरुषीच आहेत, असे मला वाटते. या मुद्दया विषयी मला आणखी विस्ताराने लिहायचे आहे.
माझ्या मनात प्रश्न उपस्थित होतील तसे आणि संधी मिळेल तसे स्त्रीवादी लेखन मी केले. स्त्रीवादाची जाणीव मला असली तरी मी कुठल्याही चळवळीत कधीच सक्रीय नव्हतो. MAला असताना बहुधा विलास वाघ, वसुधा सरदार यांनी आंतरजातीय विवाह संघटना किंवा गट स्थापन केला होता. त्या गटाच्या काही बैठकांना उपस्थित राहिलो होतो. या गटाच्या चळवळीकडे 'जातीचे वाहन असणारी स्त्री ही प्रतिमा बदलण्याचा प्रयोग' म्हणून मी पाहात होतो. चळवळीत कार्यकर्ता होणे, मोर्चे-आंदोलने करणे म्हणजेच फक्त चळवळ करणे असे मी समजत नाही. विचार करणे, विचारांची निर्मिती करणे ही सुद्धा माझ्या मते कृतीच आहे. म्हणूनच मी 'स्त्रीवाद' आणि तिच्याशी जोडल्या गेलेल्या 'पुरुष', वर्ण, जात, धर्म, आश्रम, पुरुषार्थ, भाषा इत्यादी संकल्पना माझ्या मलाच स्पष्ट करत आलो आहे. स्त्रीवादात गुंतलेल्या संकल्पना स्वतः समजून घेणे आणि इतरांपर्यंत त्या संधी लाभेल तसे पोहोचवण्याचा प्रयत्न करणे, हे माझ्या 'व्यक्तिगत स्त्रीवादी चळवळी' चे स्वरूप ठरले.हाच माझा स्त्रीवाद आहे! आणि ह्या शोधप्रवासात मला आलेले स्त्रियांचे अनुभव, त्यांच्या जाणवलेल्या मर्यादा आणि त्यातून माझा घडत गेलेला व घडणारा स्त्रीवादापलिकडील मानवतावाद.. मला मांडायचा आहे. या सगळ्या प्रयत्नातून मला स्त्रीत्वाचा आणि पुरुषत्वाचा शोध कसा लागला आणि दोन्हीही कसे पक्षपाती ठरू शकतात, आणि त्यावर मी कोणता उपाय शोधला, ते मला सांगायचे आहे...त्यासाठी आणखी एक लेखमालाच लिहावी लागेल!

श्रीनिवास हेमाडे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form