नजरीया


मी लग्न करून घरात आले आणि बरोबर एका महिन्याने मला पाळी आली. मी आईंना सांगितल्यावर मला त्यांनी – ‘त्याच खोलीत रहा’ - असं सांगितलं. मी जराशी गोंधळले पण, वाटलं की तेवढ्यापुरतंच असेल. पण थोड्या वेळाने बाथरूमला जायला म्हणून बाहेर आले तर त्या म्हणाल्या की, इथेतिथे हात न लावता बाथरूममध्ये जा. जर डोळस माणसाला समोर बघून चालताना अजिबातच इकडेतिकडे नजर वळवता कामा नये, असं सांगितलं तर जमेल का? नजरेच्या टप्प्यातल्या वस्तूंनाही नजरेचा स्पर्श होणारच ना? की तेही घाण आहे, अपवित्र आहे असं मानलं जाईल? मला आईंच्या सूचनांनी दडपण आलं... बाथरूमच्या समोरच्या पॅसेजमधला पिंप आणि सर्वच कामांसाठी वापरलं जाणारं त्यातलं पाणी माझ्या स्पर्शाने विटाळेल असं त्यांचं म्हणणं होतं. मी आतूनच बंडखोर! असं कोणी काही सांगायला लागलं की, आतून चीड दाटून यायची. काय आणि कसं सांगावं या लोकांना? मला दिसत नसल्याने फक्त त्यांना खूश ठेवण्यासाठी म्हणून सुद्धा कुठेही स्पर्श होऊ न देता वावरणं मला शक्य नाही हे जाणवलं. मी पुढे जात म्हटलं, “मला दिसत नाही, चुकून तरी माझा हात लागेलच इथेतिथे.” त्यांनी ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि पिंपाशी येऊन उभ्या राहिल्या. त्या दिवशी जेवण माझ्यासमोर लांबून सरकावलं गेलं, ते बेडरूमच्या दारात ठेवलं गेलं, माझं ताट मी बाहेरच्या बेसिनमध्ये धुतलं, पिण्याचं पाणीही बाटल्या भरून दारातच आणून ठेवल्या होत्या. या सर्व गोष्टींनी मनावर ओरखडे उमटत होते. त्या वेळी भरतने जवळ असावं हे प्रकर्षाने जाणवत होतं पण, तो ऑफिसात होता. संध्याकाळी तो घरी आला. मी त्याच्या कुशीत शिरायला अधिर झालेले पण, दारातच त्याला मला पाळी आल्याची बातमी दिली गेली. तो बेडरूममध्ये आला आणि मला गच्च जवळ घेतलं. मी रडत सुटले. या अशा वातावरणातून पार पाडायला जर भरत ताकदीने उभा नसता तर माझ्या संघर्षाला एकाकी रंग चढला असता. रात्री माझं ताट त्याने बेडरूम मध्ये आणलं. मागोमाग कुजबूज आली तरी स्वतःचं ताटही तो आतच घेऊन आला. त्याचा बिछाना बाहेर घातल्याचं त्याला सांगितलं तेव्हा ठामपणे – ‘मी आत अनुजाजवळ झोपणार’ - हे खणखणीत आवाजात सांगितलं आणि तसंच केलं. ही बाब माझ्यासाठी जशी खूप मोठी, महत्त्वाची होती तशीच ती त्याच्यासाठीही खूप महत्त्वाची होती. काल आलेल्या पोरीपायी त्याला थेट आईवडिलांच्या विरुद्ध उभं रहावं लागलं होतं. पुढे हळूहळू याचा त्रास आम्हा दोघांनाही झाला, तो आजही वेगळ्या पद्धतीने होतोच. पण तो सोबत आहे!
माझ्यासोबत भरत नसता तर मी ह्या नियमांनी स्वत:ला बांधून घेतले असते का? खरं सांगायचं तर अजिबात नाही. पाळीच्या बाबतीत एवढी स्पष्ट आणि ठाम भूमिका मनात निर्माण झाल्याचं कारण माझी शाळा. वयाच्या नकळत्या टप्प्यापासून आम्ही निवासी शाळेत वाढलो. दुखलंखुपलं, छोटी आजारपणं, रोजच्या सवयी सारं शाळेने शिकवलं. मुलगी म्हणून आयुष्यातला सर्वात मोठा बदल म्हणजे पाळी येणं. हा बदल मी आणि माझ्या अनेक मैत्रिणींनी शाळेतच पाहिलाय. आम्हा मुलींचं वय वर्गाच्या मानाने बहुतेक एखाद दुसरं वर्ष जास्त असायचं. म्हणजे १० वर्षांचं मूल जे पाचवीत असणं प्रमाण मानलं जायचं तिथे आमच्या विशेष शाळांमध्ये पाचवीतल्या मुली १२-१३ वर्षांच्या म्हणजेच पाळी येऊ शकते अशा वयाच्या असायच्या. अशा टीनएजच्या उंबऱ्यावर असलेल्या सर्वच मुलींना शाळेतून लैंगिकता शिक्षण दिलं जायचं. शरिरात होणारे बदल, पाळी कशी येते, त्या वेळी आपल्याला कोणत्या प्रकारचे त्रास होऊ शकतात, या दिवसात कशी काळजी घ्यावी आणि स्वच्छता कशी राखावी हे समजावलं जायचं. या पाळीबद्दल माहिती देण्यासाठी जी मंडळी यायची त्यात एक ताई आणि एक दादा असायचे. तेव्हा ‘अय्या, हे दादा का बोलताहेत मुलींच्या विषयी!’ असा प्रश्न मनात यायचा आणि आम्ही सर्व एकत्र आलो की, त्याबद्दल बोलायचोसुद्धा! पण ही मंडळी आम्हांला फक्त पाळीसंदर्भात माहिती देऊन थांबत नसत तर पाळी येणं ही एक नैसर्गिक घटना आहे, याचा देवाशी किंवा पवित्र-अपवित्र या मान्यतांशी काहीही संबंध नाही असं ठासून सांगत. पाळीत आपण देवाला नमस्कार करू शकतो. देव सगळीकडे आहे. त्याला पाळीबद्दल घाण वाटत नाही उलट त्याला मुलींची खूप काळजी वाटते वगैरे आम्हांला समजेल असं ते काहीबाही सांगत. त्यावेळी अर्थ फारसा कळायचा नाही पण, शब्द मनात कोरले गेले! तेव्हापासूनच मला पटायला लागलं की, पाळी येणं हे वाईट नाही. पण, हे चांगलं आहे असं वाटायला लागलं ते आमच्यासाठी घेतल्या गेलेल्या आणखी एका वर्कशॉपमुळे!
तेव्हा मी आठवीत असेन. पाळी येणं थोडंफार कॉमन झालेलं... तरी त्याबद्दल माहिती देणाऱ्या ताई दरवर्षी यायच्या आणि आम्हा सर्वांना तिथे जावं लागे. वाटायचं - आता येतेय ना पाळी, मग का नेहमीच तेच ते ऐकायचं? एकदा त्या ताईने तेव्हा आम्हांला स्त्री आणि पुरूषाच्या जननेंद्रियांचे लाकडी मॉडेल दाखवले. आम्ही आधी उगाच कचरत होतो. पण, हळूहळू ते कमी होत गेलं आणि आम्ही शांतपणे ते मॉडेल्स हाताळले. योनी म्हणजे नेमकं काय हे पहिल्यांदा तिथे ऐकलं. ताईने घरी गेल्यावर आपला अवयव नीट पहा असं सांगितलं, तेव्हा शाळेतून आलेल्या शिक्षिकेने असलं काही मुलींना सांगू नका असं निक्षून सांगितलं. पण ताईंनी मात्र त्यांना थांबवलं. त्यांनी पुढे सांगितलं की, जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा त्यांना बाळ होतं. ते एकत्र कसं येतात आणि बाळ कसं होतं हेही त्यांनी जुजबी पद्दधतीने सांगितलं पण, त्यापुढचं वाक्य माझ्या आयुष्याला वेगळा विचार देऊन गेलं. त्या म्हणाल्या होत्या की, बाळ जेव्हा पोटात असतं तेव्हा स्त्रीची पाळी बंद होते. याच पाळीच्या रक्ताची मऊ गादी असते आपल्या गर्भाशयात ज्यावर बाळ झोपलेलं असतं. पाळीच्या रक्तातला काही भाग घेऊन बाळ वाढतं, मोठं होतं म्हणून या दिवसात पाळी येत नाही. आपली पाळी ही बाळ तयार करणारी अगदी शक्तीशाली गोष्ट आहे. मग, ज्या पाळीमुळे आख्खा एक माणूस तयार होत असेल तर ती घाण, असेल का? यावर आम्ही मुली खणखणित आवाजात म्हणालो, “नाही...” पण मनातला विचार पक्का करण्याचं काम या सततच्या माहितीने झालं.
मी तेव्हापासून हे सारं घरी गेल्यावर माझ्या मम्मीला आणि माझ्या दोन खास मैत्रिणी होत्या त्यांना सांगत असे. त्या दोघी डोळस असूनही त्यांना माझ्यासारखी अजिबात माहिती कशी नाही? असा प्रश्न मला पडायचा. त्या म्हणायच्या की, घरात कोणी याबद्दल काही बोलतच नाहीत. त्यातल्या एका मैत्रिणीला तर पाच बहिणी होत्या, तरी अज्ञान होतं - अर्थात संवादाची कमतरता होती. याच मैत्रिणी लहानपणी मला सोबत खेळायला घेत नसायच्या आणि मोठ्या झाल्यावर माझ्याशी लैंगिकतेबद्दल बोलण्यासाठी माझी शुक्रवारी वाट बघत असायच्या. आमची वेळही मजेदार. शनिवारी आणि रविवारी सकाळी सातला आम्ही तिघी गच्चीवर भेटायचो आणि खूप गप्पा मारायचो. मी त्यांना रटरटाई माहिती द्यायचे तर त्या मला कोणता मुलगा किती हॅंडसम दिसतो, कोणाची हेअर स्टाइल एकदम भारी आहे - हे सर्व जनरल नॉलेज पुरवायच्या. शाळेत जाताना येताना मुद्दाम मुलांशी ओळख काढण्याचे नुस्खेही मला सांगायच्या. पण मला हे ऐकून एन्जॉय करण्यापलिकडे काहीच करता येणं शक्यच नव्हतं. मी एका कोंदणात होते. घरी मम्मीपप्पांच्या नजरेत आणि शाळेच्या भिंतीत.
शाळेत असताना आवर्जून पाळी ही कशी अत्यंत नैसर्गिक, वैज्ञानिक घटना आहे - हे समजावलं जायचं. पण याच शाळेत जेव्हा नागपंचमीची पूजा, गोकुळाष्टमीचा उत्सव किंवा होळीला वंदन करायचं असलं की, ‘पाळी आलेय का गं कोणाला?’ - असं हॉलमध्ये विचारून त्यांना खाली न येण्याची सक्त ताकिद दिली जायची. ही विसंगती तेव्हा समजतच नव्हतीच. पण, मनात विचार यायचा की देवीलाही तर पाळी येत असेल मग तिच्या पूजेत पाळी आलेल्या मुलीला का परवानगी नाही? 
आमच्या शाळेतला एक प्रसंग खूप बोलका आहे. मी तेव्हा आठवीत होते. सातवीच्या मुलींनी वर्गाला विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षिकेला जाऊन प्रश्न विचारला, “कॉन्डम म्हणजे काय?” तर शिक्षिकेने त्या मुलींची मुख्याध्यापिकेकडे तक्रार केली. जर त्यांना नीट सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं? आज मला त्या शिक्षिकेची कीव येते. टिव्हीवरच्या जाहिरातीत, रेडियोवरही कित्येकदा हा शब्द कानावरून जात असतो पण, तो उच्चारायचा मात्र नाही! का? कारण ते घाण आहे! - हे त्या मुलींच्या मनात बसलं. या कोषातून बाहेर पडून मोकळेपणे पाळी, शारीरिक संबंध, सेक्समधून मिळणारं प्लेजर, याबद्दल सहज बोलणं कधीतरी जमेल का? जमेलही कदाचित. पण हा प्रसंग मनात येईल तेव्हा मन बिचकेल. वयात येताना आवश्यक असलेल्या सुयोग्य कम्युनिकेशनच्या अभावामुळे अनेक समस्या निर्माण होतात. हेच निकष लावून आपण अंध मुलांचाही विचार केला पाहिजे. खरं म्हणजे नुकत्याच वयात येणाऱ्या मुलामुलींना लैंगिक कुतूहल वाटणं स्वाभाविक समजलं पाहिजे. तसं या वयात दोन मुली किंवा दोन मुलं एकमेकांच्या जवळ येणं स्वाभाविक आहे. पण आज जरी समलैंगिकतेला कायद्याचं स्वरूप प्राप्त झालं असलं तरी हे सामान्य लोकांच्या पचनी पडत नाही. शाळेत आम्ही लहान असताना किंवा आमच्या बॅचनंतरही कितीतरी असे प्रकार पुढे आले. पण अशा मुलींशी कधीच कोणी प्रेमाने बोलले नाही. त्यांना इतर मुलींपासून वेगळं ठेवायचे. ती मुलगी स्वतःहून ‘चूक’ कबूल करेपर्यंत तिला एकांतवास भोगावा लागे. हे अंध मुलांच्या शाळेतही घडतं. आजकालची मुलं मात्र किमान मोकळेपणाने शंका तरी विचारतात! माझे कितीतरी मित्र-मैत्रिणी असे आहेत ज्यांनी माझ्याशी सेक्स, पाळी, प्रेग्नन्सी, डिलेव्हरी याबाबत चर्चा केली आहे.
मुलगी म्हटलं की, सुरक्षितपणाची अतिरिक्त जबाबदारी सांभाळणाऱ्यावर येतेच. तशी शाळेवरही ती होतीच. वयात येणाऱ्या अपंग मुलींच्या गटावर लक्ष देणं सोपं नाहीच आहे. शाळेतून मुलींना एकट्याने बाहेर जायला बंदी होती आणि ती आवश्यकही होती. आमच्या राहण्यावर, कपडे घालण्यावरही शाळेतून बंधनं होती. जिन्स घालायची बंदी होती. पण त्यामुळे असं होत होतं की, मुलींना आपलं घर किंवा शाळेतच अडकून रहावं लागत असे. त्यामुळे इतरांमध्ये मिसळणं, आत्मविश्वासाने वावरणं जमायला खूप वेळ जायचा. मुलांशी मैत्री नसल्याने सुरुवातीला त्यांच्याशी बोलायला खूप दडपण यायचं आणि मग जर कोणी एखादा गोड बोललं की, या मुली त्याच्या बोलण्यात वाहवतही जायच्या. थोड्याफार प्रमाणात आजही असंच होतं. खरंतर, यात दोष कोणाचाच नाही. पण या सर्वाचा मुलींच्या व्यक्तीमत्त्वावर दूरगामी परिणाम होतोच. घरापासून दूर राहणाऱ्या मुलींना कॉलेजमध्ये गेल्यावर अचानकच मोकळं आभाळ दिसतं. त्यात भरारी मारणं सुरुवातीला जड जातं पण, एकदा उडता येऊ लागलं की, कुठे कसं वावरावं हे मात्र संवादातून पटवून देणारं, समजावणारं कोणीही नसतं. अशात, जो मुलगा तारुण्यसुलभ भावनेतून बोलतो त्या मुलाशी या मुली चटकन् भावनिक दृष्टीने जोडल्या जातात. यातला मुलगा विचारी असेल तर ठिक; जर नसेल तर मुलींचा उपभोग घेऊन, त्यांना फसवून, त्यांच्या भावनांचा वापर करून सोडून देतात. शाळेतून लैंगिकतेबद्दल माहिती मिळते, आपली शारीरिक काळजी कशी घ्यावी याबद्दलही सांगितलं जातं. पण भावनिक बाबतीत स्वत:ची काळजी कशी घ्यावी, दुसऱ्याला कसं ओळखावं याबाबत स्वतःहून मुलींशी कोणीच आपलेपणाने संवाद साधत नाही. जगात वावरण्याचाही फारसा अनुभव नसतो. मग एकाने सोडून दिलेल्या मुलीला दुसरा मुलगा आधार देऊ पाहतो. ती त्यात मानसिक आधार शोधत असते पण, त्याच्या उद्देशाबद्दल नेहमीच प्रश्नचिन्ह असतं. यामुळे काही मुली एकाकडून दुसऱ्याकडे फक्त लैंगिकभूक भागवण्याचं साधन म्हणूनच जात राहतात. माझ्या अशा कितीतरी मैत्रिणी आहेत ज्यांना पार्टनर होते पण, लग्नाची वेळ येताच त्यांनी डोळस मुलींशी लग्न केली. अशा संबंधातून सावरण्यासाठी, गर्भधारणेसारख्या अडचणी सोडवण्यासाठी ती एकटीच उरते. चांगली धडधाकट मुलगी असली तरी तिचं लग्न होणं कठिण होतं अशावेळी - मग दृष्टीहीन मुलीचं काय होणार ? 
अनेक दृष्टिहीन मुलींना तर त्यांच्या घरातलीच माणसं लैंगिक त्रास देतात. माझ्या शाळेतली एक अत्यंत सुखवस्तू घरातली मुलगी. वर्गात अभ्यासात आणि गाण्यातही हुषार होती. माझ्यापेक्षा किमान ४-५ वर्षं तरी सीनिअर. ती पास आऊट होऊन गेली. मग मीही कॉलेज वगैरेत गुंतले. पण, तोपर्यंत आमच्यातला संपर्क तुटला होता. अचानक भेट झाली आणि कळलं की ती पुढे शिकलीच नाही. शाळा जेमतेम पूर्ण झाली. तिला कारण विचारलं तर एकदम रडत सुटली आणि म्हणाली, “आईवडिल बाहेर जाऊ देत नाही. वडलांची भिती वाटते, राग येतो, चीड येते.” तिला शांत करून विचारलं तर कळलं की, रोज रात्री तिचा बाप तिच्यावर बलात्कार करत होता. आम्ही एकदोघी मैत्रिणींनी तिला घराबाहेर निघायला मदत केली होती. पण, तिच्यावर दबाव टाकून पुन्हा स्वतःच्या आईनेच तिला घरी परत बोलावलं. तिने दोनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला तरी तिची विटंबना अजूनही चालूच आहे. आणि माहिती असूनही संपर्कच नसल्याने आपण काहीच करू शकत नाही, ही शोकांतिका! 
तशी मला आठवते ती छोटी. एका वर्गाने माझ्यापेक्षा मागे. दर शुक्रवारी आई घ्यायला यायची. तिच्याच घरी बहिणीचं कुटूंब येऊन राहिलेलं. ती आली की, रात्री तिचा भाओजी तिच्यावर आई आणि बहिणीदेखत बळजबरी करायचा. बहिणीला वाटायचं तेवढाच आपल्याला आराम आणि आईला तो धमकी देत असे – ‘बोललीस तर पोरीला सोडून देईन. नाही तरी या आंधळीचं काय करणार?’ मनावर असलेल्या प्रचंड दडपणाने तिला टिबीने ग्रासलं पण, माझ्यासमोर तिने त्या गोळ्या कित्येकदा बेसिनमध्ये चुरून वाहवल्यात. तेव्हा मला तरी किती अक्कल असणार? पण एका प्रकारे तिने केलेली ही आत्महत्याच ना? आज हे लिहितानाही मनात राग भरून राहिलाय.
माझ्यासारख्या सुशिक्षित आणि स्वावलंबी मुलींना नोकरीसाठी घराबाहेर पडणं देखील सोपं नाही. रस्त्यावर, ट्रेनमध्ये आम्हाला लैंगिक त्रास द्यायला टपलेल्या पुरुषांपासून सतत सावध राहावं लागतं. एक मैत्रिण थोडा उशिराचा कार्यक्रम अटेंड करून घरी येत होती. पश्चिम रेल्वेच्या अपंगांसाठीच्या डब्ब्यात ती बसली होती. डब्ब्यात ती एकटीच असावी. एक स्टेशन गेलं असेलनसेल; एक माणूस आला आणि त्याने तिच्या गालावर पप्पी घेतली आणि ट्रेन थांबताच उतरून पळून गेला. तिने आवाज करायला हवा होता ना? पण होतं कोण तिचं ऐकायला? कुणी म्हणेल रात्रीच्या वेळी प्रवास करू नये. मग तिला सोशल लाइफ कसं मिळणार? आणखी एकीची गोष्ट अशी की एकदा गर्दी कमी असताना एक माणूस हळूहळू सिटवरून सरकत तिच्या जवळ आला. बेंचवरून हात पुढे सरकवत तिला स्पर्श केला. ती लांब झाली. पुन्हा तेच झालं म्हटल्यावर तिने त्याचा हात धरला आणि मुरगळला. नखं रुतवली आणि म्हणाली की, जर पुन्हा असं काही केलंस तर मी तुला फाडून खाईन. ती म्हणाली, ‘ही एवढी हिंमत दाखवताना मात्र ताई मी खूप घाबरले होते गं!’
पण हे असे प्रसंग रोजच घडतात. रोड क्रॉस करताना गाड्यांचा आडोसा मिळाला की, कोणी छातीला हात लावू पाहतं, कोणी कोपराने ढोसू पाहतं. कोण काय करेल, हे सांगणं कठिण! पण यावर तोडगा काय? 
खरं तर अंधत्व आणि लैंगिकता याबाबत काम करणाऱ्या संस्थांची खूप गरज आहे. आजकाल अंधांसाठी काम करणाऱ्या संस्था अनेक आहेत पण त्या शिक्षण, रोजगार एवढ्या पुरत्याच मर्यादित आहेत. पण शिक्षणाबरोबर लैंगिक शिक्षण, लैंगिक समस्या आणि त्यासंदर्भातला मुक्तसंवाद यावर काम करायची आवश्यकता कोणालाही जाणवत नाही. लैंगिक समस्यांवर बोलता येईल असा एखादा तज्ञ तरी या संस्थांमधून असावाच असं मला मनापासून वाटतं! 

अनुजा संखे 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form