इंद्रधनुष्य

स्वत:चा निराळा लैंगिक कल असणाऱ्या मुलाचे अनुभव आणि निरीक्षणे


·         
माझं डोकं त्याच्या छातीवर होतं. तो म्हणाला, "काय झालं?"

मी म्हटलं, "काही नाही. तुझ्या हृदयाचे ठोके ऐकतोय."

तो म्हणाला, "आजची रात्र इथेच राहा ना."

मी म्हटलं, "नको. ऑफिस आहे उद्या."

तरंगतच घरी गेलो. काही दिवसांनी त्याला मेसेज केला, "आपण पुढे काय करायचं?"

तो म्हणाला, "काय करायचं म्हणजे? तुला काय साखरपुडा वगैरे करायचाय का?" आणि हसला.

पुन्हा एकदा माझ्या मनातली आशा मावळली.

मी त्यावेळी तेवीस वर्षांचा होतो आणि तो तेहत्तीसचा.

आता वयाची तिशी ओलांडल्यानंतर जेव्हा फेक अकाऊंटवरून मला वीस-एकवीस वर्षं वय असलेल्या मुलांच्या फ्रेंड रिक्वेस्ट्स येतात आणि मी मित्र असल्यासारखा त्यांच्याशी बोलू लागतो, तेव्हा हळूहळू ती खुलतात. आपल्या समस्या माझ्याकडे मांडू लागतात. मी त्यांना एवढा विश्वासार्ह वाटतो याचा आनंदही होतो. 
... 
स्त्री-पुरुषाचं नातं हे समाजमान्य असल्यामुळे ब्रेकअप नंतर अन्याय झालेल्या पक्षाला खांदा देण्यासाठी सारा समाज तयार असतो. समलैंगिकांच्या विश्वात मात्र परिस्थिती थोडी वेगळी आहे. एकतर पार्टनर मिळणं मुश्किल. त्यात एखाद्या नशीबवान मुलाला तो मिळालाच, तर त्या प्रियकराचे सगळे हुकूम प्रेमाखातर शिरसावंद्य मानले जातात. कारण तो निघून गेला की पुन्हा नवीन कुणी मिळेलच, मनासारखा मिळेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे कधीकधी शारीरिक छळवणूक, कधी मानसिक त्रास, धमक्या वगैरे सहन करूनसुद्धा अशी मुलं नातं रेटत राहतात. ती जो छळ सहन करत असतात, ते पाहून वाईटही वाटतं.
मी कुठेही बाहेर जाणार असेन किंवा उशिरा येणार असेन, तेव्हा बाबा हजार प्रश्न विचारून भंडावून सोडतात. ते बऱ्याचदा इरिटेटिंग वाटत असलं तरी आत कुठेतरी माझा मेल इगो सुखावतो त्याने. दुसऱ्या कुणी माझ्यावर त्यांच्याइतकं प्रेमच करू नये, हा त्यांच्या इगोचा त्या काळजीतला अंडरकरंट मला स्पष्टपणे जाणवतो. पण तो हक्क अर्थातच माझ्या जन्मापासून त्यांना मिळत असला तरी सुरुवातीच्या विरोधानंतर मी आता तो त्यांना स्वतःहून देऊ केलाय. इतक्या वर्षांत आमच्या नातेसंबंधांचा पोत बदलत गेला असला, तरी वरवर कातळासारख्या वाटणाऱ्या या दोन पुरुषांच्या नात्याखालून एक निखळ प्रेमाची नदी आम्ही दोघांनीही संथपणे सतत वाहती ठेवली आहे.
थोड्याफार फरकाने सर्वच मुलांचे पालक आपल्या मुलांबद्दल असे पझेसिव्ह असतात. समलिंगी मुलांचं चुकतं ते इथे की त्यांना आपल्या पार्टनरवर शक्य तितक्या लवकर हक्क प्रस्थापित करायचा असतो. जो प्रस्थापित करायला आईवडिलांना इतक्या वर्षांचं प्रेमाचं सिंचन करावं लागतं, तो समलिंगी मुलांना एका सेक्स डेटमधल्या प्रणयाच्या धबधब्यात मिळवायचा असतो. तो मिळाला नाही की मग प्रेमाबद्दल मन शंका घेऊ लागतं. प्रेम उद्ध्वस्त करतं हे खरंच, पण ते रुजायला वेळ लागतो, वाट पाहावी लागते. मळलेल्या विवाहाच्या वाटेवरच विरोधाचे एवढे काटे पसरलेले असताना समलिंगी संबंधांमध्ये तर जास्तच... हे जेव्हा समलिंगी मुलांना कळेल, तो सुदिन!
... 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करायला मी माझ्या गे ग्रुपसोबत एका रेस्टॉरंटमध्ये जातो. तिथे एखाद्या सर्पोद्यानात काचेच्या पेटाऱ्यात साप ठेवले असावेत, त्याप्रमाणे वेगवेगळ्या मापांचे, आकारांचे पुरुष मॉडेल्स काचेआड उभे राहून आम्हांला इशारे करत असतात. आमचा गट चेकाळतो आणि आरोळी ठोकतो, "Kudos to our freedom..."
सर्वजण टेबलवर स्थानापन्न होतात. काही घोळक्यात, काही एकेकटेच. मी त्या सर्व स्वातंत्र्याची नशा चढलेल्या गर्दीपासून दूर एका टेबलवर जाऊन बसतो. पुरुषांच्या मांसाला चटावलेली एवढी गर्दी पाहून वेटर्स भराभर ऑर्डर्स घ्यायला येतात. कुणी एखादा हडकुळा पोरगा ऑर्डर करतो. कुणाला गुलाबी ओठांचा कुणी मदन हवा असतो. माझं लक्ष काचेपलीकडच्या एका धष्टपुष्ट सिक्स पॅक अॅब्स असणाऱ्या देखण्या पुरुषाकडे जातं. त्याचा अवाढव्य प्राईज टॅग पाहून वाॅलेटमध्ये कार्ड्स आहेत ना हे मी एकदा तपासून पाहतो. त्याच्याकडे बोट दाखवून मी वेटरला म्हणतो, "मला तो हवाय."
वेटर त्याचा देह माझ्या टेबलवर आणून ठेवतो. त्याच्या भरलेल्या देहाकडे पाहून माझी भूक आधीच चाळवलेली असते. वेळ न घालवता मी त्याच्या शर्टाची बटणं काढतो आणि त्याच्या मांसल छातीत काटा आणि सुरी खुपसून मांसाचा एक तुकडा कापतो. प्लेटमध्ये काढून घेतो आणि मिटक्या मारत खाऊ लागतो. त्याच्या छातीच्या हाडांचा पिंजरा बाजूला करत मी आणखी खोल जात पुन्हा काटा खुपसतो आणि तेवढ्यात रक्ताची एक चिळकांडी उडते. माझ्या भुकेखातर बलिदान दिलेल्या त्या देहाच्या आत हृदय अजून धडधडत असतं. मी काटा पुन्हा हातात घेतो आणि माझा गिल्ट दाबण्याचा प्रयत्न करत पुन्हा हृदयात खुपसतो. 'मला प्रेम हवंय, फक्त सेक्स नको' अशी आर्त किंकाळी ठोकत ते हृदय धडधडत माझ्या प्लेटमध्ये येऊन पडतं आणि चक्क रडू लागतं... आणि तेव्हाच शेजारी ठेवलेल्या फोनमधला अलार्म वाजून मी झोपेतून जागा होतो.
... 
स्त्रियांबद्दल स्ट्रेट पुरुषांना वाटणारं आकर्षण जितकं नैसर्गिक, तितकंच देखण्या पुरुषांचा घोळका पाहिल्यावर हे सगळे समलैंगिक असतील तर किती बरं होईल, असं समलैंगिक पुरुषांना वाटणंही नैसर्गिक. (माझी तर अशी विचित्र फँटसीच आहे की चर्चमधल्या फादरकडे असतं ना त्या 'होली वॉटर'मध्ये अशी काहीतरी जादुई शक्ती यावी की ते शिंपडलं की आपल्याला हवा असणारा पुरुष गे व्हावा आणि अर्थात त्यालाही आपण आवडावं... 'जादू तेरी नजर' नाटकातल्या त्या जादूच्या मुळीसारखं...) म्हणूनच मग अशा घोळक्यातल्या प्रत्येक नराचं लक्ष वेधून घ्यायचे गे पुरुषांचे प्रयत्न इतर दुनियेला कितीही वावगे वाटत असले, तरी त्यात चुकीचं काही नाही. पक्ष्यांच्या किंवा प्राण्यांच्या कळपातल्या मादीने नरांना किंवा नराने माद्यांना भुलवण्यासाठी केलेल्या विभ्रमांइतकीच ती भावना सुंदर आणि नैसर्गिक असते. चुकून त्यांच्यापैकी कुणाची नजर पडली की काळजाचा ठोका चुकून नजर दुसरीकडे वळत असली, तरी मनात मात्र पार्श्वसंगीतासारखं 'राजसा... जवळी जरा बसा' आपोआप सुरु झालेलं असतं.
स्ट्रेट पुरुषांच्या प्रेमात पडणं ही समस्त गे कम्युनिटीची सर्वांत मोठी समस्या आहे. विकतचं दुखणं म्हणा हवं तर. पण हा महाभयंकर रोग एकदाही जडला नाही असा समलिंगी पुरुष शोधून सापडणं कठीण. बरं, त्यातही तो 'स्ट्रेट' पुरुष समजूतदार असेल तर ठीक. नाहीतर त्याचं प्रेम तसंही नशिबात नसतंच, मैत्रीही तुटते, शिवाय त्याने आणखी चार जणांना त्याच्यावर एकतर्फी प्रेम करणार्‍या याच्याबद्दल सांगून त्याची बदनामीच करण्याच्या शक्यता अधिक. पण स्ट्रेट पुरुषांसाठी झुरून स्वतःच्या आधीच गुंतागुंतीच्या असणार्‍या आयुष्यातला झांगडगुत्ता वाढवणारे माझे मित्र पाहिले की मला वाईट वाटतं त्यांच्याबद्दल. 
... 
"माझ्यावर लहानपणी लैंगिक अत्याचार झाला आणि मी 'असा' 'झालो'," असं म्हणणारे समलैंगिक पुरुष समलैंगिकतेविषयीच्या गैरसमजांनाच खतपाणी घालत असतात. कुणावरही कधीही झालेला लैंगिक अत्याचार हा वाईटच, याविषयी दुमत नाही. पण त्यामुळे कुणाचाही विशिष्ट लैंगिक कल तयार होत नाही किंवा त्यात कोणत्याही प्रकारे बदलही होत नाही. लहानपणी झालेल्या लैंगिक अत्याचाराची परिणती भीती, कुतूहल अशा दबलेल्या भावनांमुळे वाट फुटेल तशी समलैंगिक आकर्षणात व्यक्त होत असेलही कदाचित, पण एखाद्या अशा घटनेमुळे किंवा अपघातात एका विशिष्ट वयात कधी समवयस्क मित्रासोबत घेतलेल्या 'तशा' अनुभवामुळे कुणीही समलैंगिक 'होत' नाही. त्यामुळे कधीतरी जेव्हा समलैंगिक पुरुषच एकमेकांना "तू या 'लाईनमध्ये' कसा आलास?" वगैरे प्रश्न विचारतात, तेव्हा फिस्सकन हसणं मला आवरता येत नाही. 'लाईन' म्हटलं की फिल्मलाईन वगैरे शब्दच पटकन डोक्यात येतात माझ्या. पुरुष आवडण्याच्या 'लाईनमध्ये' कुणी 'येत' नसतो. तो तिथे जन्मापासूनच असतो किंवा नसतो.
... 
मी कॉलेजमध्ये वगैरे असेन तेव्हा. मी आणि आई एकदा बस स्टॉपवर थांबलो होतो. तिथेच जवळ दोन मुलगे उभे होते. त्यांतील एकजण दुसऱ्याशी खूप लाडीकपणे बोलत होता. त्याच्या खांदयावर वगैरे हात टाकत होता. ते पाहून आई हसली आणि 'बायल्या' हा शब्द उच्चारला तिने. अर्थातच त्याला ऐकू येणार नाही अशा पद्धतीने. पण मला मात्र तो ऐकू आला आणि तेव्हाही तिडीकच गेली डोक्यात. पण तिला समजावण्याच्या वगैरे भानगडीत मी पडलो नाही. कारण तेव्हा मीच झुंजत होतो स्वतःशी. ते दोघे कसे का वागेनात, त्यामुळे तुम्हांला त्रास तर होत नाहीये ना, मग त्यांना 'बायल्या' वगैरे म्हणण्याचा हक्क तुम्हांला कुणी दिला? पण हे सगळं बोलायचं तेव्हा मनातच राहून गेलं.
... 
लहानपण आठवलं की अजून एक गोष्ट आठवते. माझ्यावर रागावताना माझ्या अत्यंत जवळची एक व्यक्ती मला 'हिजड्या' म्हणत असे. तेव्हा त्या शब्दाचा अर्थही माहित नव्हता, कळला तेव्हा राग आला होता. पण तो व्यक्त करायला ती व्यक्ती नव्हती या जगात. नंतर हळूहळू नवीन शब्द कळत गेले. 'गुड', 'मीठा' वगैरे. मित्रांनीच भेट म्हणून दिलेले. पण त्यावेळी मात्र मी हे सगळं सहन करणं सोडून दिलं होतं. आताही कुणी या शब्दांत काही बोलू लागलं की मग मीही माझा मूळचा शांत स्वभाव गुंडाळून ठेवतो. तुमच्या अध्यातमध्यात नसणाऱ्या आणि तुम्हांला कसलाही त्रास न देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ही असली शेलकी विशेषणं वापरून तिचा पाणउतारा करण्याचा हक्क नाहीच तुम्हांला. नाहीतर तुमची जागा दाखवायलाही आम्हांला वेळ नाही लागत.
... 
अलीकडे वर्तमानपत्रांत, इंटरनेटवर समलैंगिक संबंधांतून झालेल्या गुन्ह्यांच्या बातम्या वाचल्या. 'लैंगिक संबंध ठेवायला नकार दिला, म्हणून खून' अशा किंवा अशासारख्या मथळ्याच्या. पत्रकारितेतलं मला काही समजत नाही, पण एक विचार मनात चमकून गेला. स्त्रियांवर होणारे अत्याचार, बलात्कार, खून वगैरे बातम्या नव्या नाहीत आपल्याला. एकतर्फी प्रेमप्रकरणातून आजवर तरुण मुलींवर झालेले ऍसिड हल्ले, बलात्कार, खून यांची तर गणतीच नाही, तिथेही मुलीने मुलाचं प्रेम नाकारणं म्हणजे छुप्या पद्धतीने शरीरसंबंधांस नकार देणं, हाच अर्थ दडलेला नसतो का? लग्नापूर्वी शरीरसंबंध न ठेवता फक्त प्रेमाच्या भावनेतून मुलीला प्रपोज करणारीही मुलं आहेत, नकार मिळाल्यावर तो पचवणारीही आहेत. पण गुन्हे करणाऱ्यांची मानसिकता ही सत्ता गाजवण्याचीच असते. मग ते पुरुष आणि स्त्रीमधले संबंध असोत, दोन पुरुषांमधले संबंध असोत किंवा दोन स्त्रियांमधले. समलैंगिक संबंधांना जिथे अजूनही लग्नासारखी व्यवस्था मिळालेली नाही, तिथे लैंगिक सुख ओरबाडून घेणं, हाच गुन्हे करणाऱ्यांचा मुख्य हेतू असतो. पण तो गुन्हा नेमका कसा घडलाय, याची शहानिशा हे पत्रकार करतात का? अशा बातम्यांमधून समलैंगिक समाजाचं फक्त नकारात्मक चित्रच समाजासमोर उभं राहतं, त्याचं काय? म्हणजे इतर समाज करतो ते 'एकतर्फी प्रेम' आणि समलैंगिक करतात ती 'लैंगिक संबंधांची मागणी', हा दुटप्पीपणा का?
... 
माझ्यापुरता मी विचार करतो, तेव्हा आईबाबांशी मी नेहमी गुडीगुडी वागू शकत नाही, हे सत्य मी माझ्यापुरतं स्वीकारलं आहे. माणूस म्हणून ते चुकत असतील, तर ते केवळ आईवडील आहेत, म्हणून ते म्हणतील ते बरोबर, हा विचार मी कितीही प्रयत्न केला तरी नाही करू शकत. अर्थात प्रत्येक वेळी मतभेद मिटवण्याची गरज असते, असंही नाही. देवावर विश्वास असला, तरी पूजा, कर्मकांड या गोष्टींत रमणारा मी नाही. तरी आईने कधी हात जोड, पूजा कर म्हणून सांगितलं तर तेवढ्याने माझं काही नुकसान होत नसतं. तेव्हा तिला 'तुझी श्रद्धा आहे, तर तू कर' असं मी उर्मटपणे नाही सांगू शकत. कधीतरी प्रयत्नही केलाय, पण फरक पडत नाही, तेव्हा मी माझी ऊर्जा अशा ठिकाणी वाया घालवत नाही.
... 
बाबांचा विचार करताना मला अलीकडेच जाणवू लागलंय की त्यांच्यातला पुरुष आणि माझ्यातला पुरुष वेगळा आहे. स्ट्रेट पुरुषांचं पौरुष जाणून घ्यायचं ठरवलं की फार दूर जावं लागत नाही. बाबांबरोबर जगताना त्याचे दाखले पदोपदी नजरेस पडतात. आताशा मी ही दरी मिटवण्याचा प्रयत्न करणंही सोडून दिलंय. पुरुषसत्ताक कुटुंबव्यवस्थेचा एक घटक म्हणून वाढताना त्यांच्यावर झालेल्या संस्कारांत आणि माझ्या विचारसरणीत असलेली तफावत, त्यांचा कधीकधी डाचणारा हेकेखोरपणा, आईचा धाक घरात जास्त असला, तरी त्यातूनही जाणवणारा बाबांचा पुरुषी अहं, हे सगळं आहे तसं स्वीकारण्याचा प्रयत्न करतानाही प्रचंड दमछाक होते. तरीही त्यांच्या मनाचा थांग लागत नाही. गे पुरुष म्हणून ते मला अर्थातच शक्य तेवढं समजून घेण्याचा सुदैवाने प्रयत्न करत असतात, पण त्यांच्यातला स्ट्रेट पुरुष समजून घेण्याचे माझेच प्रयत्न कुठेतरी थिटे पडू लागतात कधीकधी.


संदेश कुडतरकर



1 Comments

  1. Very well explained all the feelings and interactions. I think it should get published in the regular journal or news paper.

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form