बाईवजाआई

बाई मधून आई वजा केली तर काय उरतं? ‘आईपणा’च्या आणि ‘बाईपणा’च्या घडणीतले सूक्ष्म अंतःप्रवाह टिपणाऱ्या ’ या  नाटकाच्या निमित्ताने घेतलेला वेध!


एकीकडे ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ सारखी सुभाषितं, असंख्य कविता, गाणी यातून मातृत्वाचे गोडवे गायिले जातात आणि दुसरीकडे मुलांच्या अपयशाचं, समाजाच्या दृष्टिकोणतून चुकीच्या वर्तनाचं, त्यांच्या नैराश्याचं खापर त्यांच्या आईवरच फोडलं जातं! आई म्हणून बाईला सतत आरोपीच्या पिंजऱ्यातही उभं केलं जातं. माझ्या ओळखीतल्या लोकांच्या बाबतीत घडलेल्या दोन घटना सांगते. एकात मुलाला बारावीला कमी गुण मिळाले. त्याला कारणं काही असोत, पण घरातले, शेजारीपाजारी, नातेवाईक, मित्रमंडळी मुख्य म्हणजे मुलाचा बाप अशा सर्वांनीच म्हटलं की – ‘आई उशिरापर्यंत ऑफिसात काम करीत बसते, परीक्षेच्या वेळीही हिला रजा घ्यायला नको, जेमतेम परीक्षेच्या दिवसांपुरती रजा घेतली, आधी घेतली असती तर काय बिघडलं असतं थोडंच? पण हिला करियर महत्त्वाचं ना, कुटुंबाचं काहीही होवो. काय करील बिचारा मुलगा तरी!’ दुसऱ्या घटनेत घरातली मुलगी मुस्लीम मुलाशी लग्न करण्यासाठी पळून गेली. कारण घरचे लोक नकार देतील! पण तिथेही लोकांनी म्हटलंच, “आई काय झोपा काढत होती का? लक्ष नाही मुलगी काय करते, कुठे जाते, कुणाबरोबर जाते याकडे.” इथे एकट्या आईला दोष देताना - त्या मुलीला तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न करायचं स्वातंत्र्य नाही, त्याचं कुणाला काहीच वाटलं नाही!
बाईने त्या विशिष्ट जातीधर्माधिष्ठित समाजाच्या मर्यादा ओलांडून इतरत्र जाऊ नये म्हणून घालून दिलेले अलिखित दंडक समाज वेगवेगळ्या प्रकारे स्त्रीवर लादत असतो. तिचं वेगळं अस्तित्व उरु नये, ती रोजच्या दिनचर्येत, व्रतवैकल्यात, ‘गृहोपयोगी’ कामकाजात बुडून रहावी, किंबहुना यातच आपलं सार्थक आहे अशी तिची मानसिकता व्हावी असा प्रयत्न आजही होत असतो. काहीवेळा स्वतः स्त्रियांनाही मातृत्वाशिवाय आपण अपूर्ण आहोत असं वाटत असतं. याला जशी नैसर्गिक कारणं असतील तशीच ती पितृसत्ताक समाजाने घडवलेल्या मानसिकतेतूनही आलेली आहेत. आपापल्या जातीधर्माला पुढे नेण्यासाठी संतती निर्माण न करणारी वांझ बाई - पितृसत्ताक समाजाच्या दृष्टीने निरुपयोगी ठरल्याने तिलाच न्यूनगंड यावा अशा प्रकारे समाजाचं वागणं असतं. असे ‘आईपणा’च्या आणि ‘बाईपणा’च्या घडणीतले बहुविध सूक्ष्म अंतःप्रवाह संजय पवार या बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या नाटककाराने बाईच्या ‘बाईवजाआई’ या नव्या नाटकात फार संवेदनशीलतेने टिपले आहेत.
सगळं नाटक मीनलच्या फार्महाऊसच्या दिवाणखान्यात घडतं. ही मीनल पाटणकर आयएएस कॅडरमधून आलेली महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाची सचिव आहे, काही वर्षांतच मुख्य सचिवपदी बढती मिळण्याची शक्यता आहे. तिचा नवरा शिरीष नागपूरला पोलीस आयुक्त आहे. एका वर्षापूर्वी त्यांच्या मुलाने चैतन्य पाटणकरने कळसूबाईच्या शिखरावरून उडी घेत आत्महत्या केलीय. चैतन्यच्या पहिल्या स्मृतिदिनी एका फाऊंडेशनची स्थापना करून त्या फाऊंडेशनचा शुभारंभ आणि पुरस्कार सोहळा असा कार्यक्रम आटोपून मीनलच्या ‘मिळवती’ या वॉट्सअप गटातल्या मैत्रिणी तिच्या फार्महाऊसवर पार्टीसाठी जमल्यात. सगळ्या मध्यमवयीन आहेत. त्यात शीतल ही माजी आमदार आणि आता एका राजकीय पक्षाची प्रवक्ता, प्रतिभा ही मुंबई विद्यापीठातल्या मराठी विभागाची प्रमुख आणि नव्या दमाची दलित कथाकार, लता ही पूर्ण वेळ गृहिणी, इव्हेंट मॅनेजमेंट करणारी मैथिली, नयना ही अभिनेत्री आणि विद्युत ही सेवानिवृत्त बँक कर्मचारी यांच्यासोबतच सकीना ही हाऊसकीपरही आहे.
एक वर्षापूर्वी मुलगा गेला तो दिवस असा खातपित, गप्पा मारत साजरा करायची कल्पना तिच्या मैत्रिणींना थोडी धक्कादायक वाटत असली तरी मीनलच्या मनात वेगळं काहीतरी आहे. चैतन्यच्या आत्महत्येनंतर त्याच्या मृत्यूला आईबापांची – विशेषतः आईची करियरवर भर देण्याची वृत्तीच कारणीभूत आहे असे आरोप केले गेले, तिने आईचं कर्तव्य पार पाडलं नाही असा दोषारोप केला गेला. त्या सगळ्यामुळे दोघांनाही मनस्ताप झाला. तिचं व्यक्तिगत दुःख तर होतंच, पण त्या कोर्ट मार्शलमुळे तिच्यासारख्या कमावत्या बायका हादरल्या. काहींनी नोकऱ्या सोडल्या तर काहींनी बढती नाकारली. त्यामुळे “बाईचं मादीपण आणि आईपण, बाईचं स्वतंत्र अस्तित्व पुसून टाकतात.” असं तिला वाटतं. लोकांच्या दृष्टिकोणातून आई म्हणून नापास झाल्याने बाईने कमावलेलं सगळं यश मातीमोल होतं का? - हा तिला छळणारा प्रश्न आहे आणि मैत्रिणींच्या सोबतीने तिला त्याची उकल करायची आहे.
हा विषय मनोविश्लेषणात्मक अंगाने मांडायचा असल्याने चर्चेतून, वादविवादांमधून, मतभेदामुळे दुखावलं जाणं, एकमेंकीना चिडवणं, थट्टामस्करी करणं, तर कधी बोचरी टीका करणं अशा विविध रूपांमधून हे चर्चानाट्य फुलत गेले आहे. त्या सगळ्याजणी मैत्रिणी असल्या तरी त्यांच्या आचारविचारानुसार त्यांच्यात छोटे गट आहेत. लता आणि विद्युत या दोघीही थोड्या पारंपरिक विचारांच्या, गृहिणीपदात कृतार्थता वाटणाऱ्या आहेत. बाईने बाय डिफॉल्ट चांगली आई असणं गरजेचं आहे हा अशा पारंपरिक मनोवृत्तीच्या बायकांचा दृष्टिकोण विद्युत आणि लता यांच्याकडून समोर येतो. पण बोलण्याच्या ओघात आपण एकदा सोडून दोनदा गरोदरपण निभावलं असलं तरी ते आपण एकदाही आपल्या मनाने केलं नाही हे विद्युत मान्य करते.राजकारणातल्या सहभागामुळे शीतलच्या गाठीशी खेड्यापाड्यातल्या स्त्रियांच्या बाबतीतला अनुभव आहे, तसा राजकारणाच्या क्षेत्रातल्या स्त्रियांच्या दमनाचाही. प्रतिभा ही स्वतः सगळ्या प्रकारच्या दमनाला तोंड देत स्वतःला सिद्ध करीत आल्याने विचारांच्या बाबतीत फार आक्रमक आहे. पुरुषाचं पौरुषत्व बाईच्या आईपणात दडलेलं असतं, पण पुरुषसत्ताक पद्धतीत बाईचं वांझपण तेवढं उघड केलं जातं आणि पुरुषाचं नपुंसकत्व मात्र झाकलं जातं हा प्रखर विरोधाभास तीच मांडू शकते. तरी मीनल आई म्हणून कमी पडली असं सगळं जग म्हणत असेल तर तिने आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं म्हणता म्हणता लता सर्व पारंपरिक गृहिणींच्या मनातली मिळवत्या बायांच्या विषयीची भावना बोलून दाखवते. तिसरीकडे मूल होऊ न शकलेल्या सकीनाला वाटतं तिचं शरीर एखाद्या अशा यंत्रासारखं आहे ज्याचा एक भाग कामच करत नाहीय, ती त्या वांझपणामुळे वेडाच्या टोकापर्यंत जाऊन बरी होऊन परतली पण तिला मूल हवं असतांनाही मूल सांभाळण्याची ऐपत नाही म्हणून तिला मूल दत्तक दिलं जात नाही.
प्रतिभा म्हणते तसं आपलेच संसार, नवरे, मुलं हे केस स्टडीसाठी म्हणून घेत आपापले अनुभव ओघाओघाने मांडत नाटक पुढे सरकत जातं. या ओघात स्त्रिया, त्यांच्यावर कुटुंबाकडून लादलं जाणारं लग्न, मातृत्व, त्यासाठी त्यांना करायला लागणाऱ्या त़डजोडी, त्या तडजोडी न करणाऱ्या बायकांवरही हे आजूबाजूचे लोक ही बंधनं कशा प्रकारे लादू पहातात, त्यातून त्यांची सुटका त्यांना करून घेता येते का, या सगळ्यात त्यांना स्वतःला काय वाटतं, पुरुषाला मात्र या सगळ्यातून कशी सोयिस्कर सूट मिळते हे आणि असे अनेक मुद्दे हाताळले जातात. नाटकातला शेवटचा प्रसंगही आपल्या क्षेत्रात पुढे जाणाऱ्या मिळवत्या स्त्रीच्या कर्तृत्वाला पायबंद घालण्यासाठी खाजगी अवकाशावर घाला घालीत कसं राजकारण केलं जातं हे दाखवणारा आहे. लेखकाने छोट्या छोट्या बारकाव्यांतून सहजतेने महत्त्वाचे मुद्दे पुढे आणले आहेत. स्त्रियांच्या जगण्यातल्या सूक्ष्म संघर्षांचा आढावाच घेतला जातो. बायकांची बोलण्याची जी शैली आणि लय असते ती पकडत संवाद सहज पुढे सरकतात, त्यामुळे चर्चा कंटाळवाणी होत नाही.

सगळं नाटक फार्महाऊसच्या दिवाणखान्यात घडत असलं तरी सहज हालचालींनी तो अवकाश जिवंत होतो. बोलतांना मनातलं खोलवरचं काही उलगडतांना मैत्रिणी नकळत आपल्या विचारांना जवळच्या असलेल्या मैत्रिणीजवळ जाऊन बसतात, किंवा एकटं वाटत असतं तेव्हा त्या वेगळ्या, दुसऱ्या टोकाला जाऊन बसतात. असे हालचालींतून येणारे सूक्ष्म बारकावेही मनोज्ञ आहेत. पार्टीचं वातावरण असल्याने नाटकभर या बायका खातांना आणि त्यातल्या काहीजणी वाईन किंवा इतर मद्य घेतांना, सिगारेट ओढतांना दाखवल्यात. या गोष्टी त्यांच्या मनातील अस्वस्थतेशी जोडता येतात.तसंच ते त्यांना मिळालेल्या मोकळ्या अवकाशाचं द्योतक आहे. त्यांच्या मनात दडपलेल्या गोष्टींना बोलते करणारी प्रयुक्ती म्हणून नाटकात त्यांच्या या खाण्यापिण्याचा अर्थपूर्ण उपयोग केला गेला आहे.
प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य आणि प्रकाशयोजना, मिलिंद जोशी यांचं पार्श्वसंगीत समर्पक आहे. सगळ्या कलाकार आपल्या अभिनयातून नाटक रंगवित ठेवतात. पात्रांची निवड चांगली केली गेलीय. सुजाता देशमुखांच्या वेशभूषेच्या आयोजनातून या सर्व बायका ज्या वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक पार्श्वभूमीतून आल्या आहेत ते अधोरेखित होतं. या सगळ्या जमेच्या बाजूंमुळे हे एक विशिष्ट वैचारिक भूमिका मांडणारं नाटक प्रेक्षकांना बांधून ठेवतं. रेश्मा रामचंद्र या गुणी अभिनेत्रीने हे नाटक सादर करून स्त्रीवादी नाटकांच्या परंपरेला पुढे नेण्याचं एक चांगलं काम जबाबदारीने पार पाडलंय.

शुभांगी थोरात








1 Comments

  1. नाटकाविषयी उत्सुकता निर्माण झाली . पण नाटककाराने वास्तवातील नावांशी मिळतीजुळती नावे नाटकात का वापरली हे समजत नाही. कारण महाराष्ट्रातील एका वरिष्ठ शासकीय अधिकारी कुटुंबात घडलेली शोकांतिका- मुलाची आत्महत्या- ही खरोखर घडलेली घटना आहे.

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form