कष्टकरी वर्गातल्या ज्या महिलांना समाज “टाकलेली” या शब्दाने ओळखतो – त्या स्वत:ची ओळख कशी प्रस्थापित करतात? एकल महिलांच्या संघर्षाची कहाणी
मराठवाड्यात एकल महिलांच्या प्रश्नांवर काम सुरू झाले तेव्हा एकल महिलांचे सर्वेक्षण करायचे ठरले होते. ‘ज्यांचा प्रश्न त्यांचे नेतृत्व’ यावर आमचा विश्वास दृढ असल्याने एकल महिलाच सर्वेक्षणात मुख्य भूमिका निभावणार हे निश्चित होते. आम्ही फक्त सुविधाकाराची भूमिका निभावत होतो. सर्वेक्षणासाठी प्रश्नावली तयार करण्याच्या शिबिरात एकल महिलांचे कोणते प्रकार असू शकतात यावर चर्चा सुरू होती. विधवा, परित्यक्ता, प्रौढकुमारी, घटस्फोटीत असे प्रकार सांगितल्यावर ‘परित्यक्ता’ म्हणजे नेमके काय यावर चर्चा आली. ‘नवर्याने टाकलेली बाई’ अशी रोजच्या बोलण्यातली व्याख्या कोणीतरी सांगितली. यावर समोरून एका महिलेने तत्काळ विचारले की ‘बाईने नवर्याला टाकले’ असेल तर त्या बाईला काय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नव्हते. असा काही शब्द आहे का हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. मराठी, हिन्दी किंवा इंग्रजी अशा कोणत्याही भाषेत असा काही शब्द सापडला नाही. पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रीने नवर्याला सोडणे ही संकल्पनाच मान्य नसल्याने असेल, पण असा शब्द कुठे सापडला नाही. शेवटी सर्वांनी मिळून आपण तात्पुरता पर्यायी शब्द द्यावा असे ठरले. ‘मी नवर्याला टाकले’ याचे इंग्रजीतील संक्षिप्त रूप म्हणून MNT हा शब्द ठेवावा असे महिलांनीच सुचविले. यावर ‘टाकले’ पेक्षा सोडले, विभक्त झाले असे काही शब्द वापरावेत असे मुद्दे समोर आल्यावर ‘पुरुष बाईला टाकतो ना मग आम्ही पण नवर्याला टाकले आहे’ अशी तीव्र प्रतिक्रिया महिलांची होती. त्यामुळे शेवटी MNT हा शब्द प्रश्नावलीत एकल महिलांच्या प्रकारांसाठीचा पर्याय म्हणून आला. प्रत्यक्ष सर्वेक्षण झाले तेव्हा सर्व महिला या पर्यायाविषयी कुतुहलाने विचारत होत्या. त्यातल्या काही जणींनी तर असे म्हटले की ‘मी आतापर्यंत स्वत:ला परित्यक्ता समजत होते पण मी MNT आहे कारण मी त्याला टाकलंय, त्याने नाही’. MNT या शब्दाने त्यांना नवी ओळख दिली जी जास्त ताकद देणारी होती. आज त्यातल्या बर्याच जणी आपण MNT आहोत हे अभिमानाने सांगतात. MNT हा शब्द आणि महिला नवर्याला टाकू शकतात ही भावना जी महिलांच्यातून तीव्रतेने आली ती सर्वांनाच खूप काही शिकवून गेली.
मुंबईतील कोरो संस्था ग्रासरूट लेव्हलला काम करणार्या कार्यकर्त्यांचे नेतृत्व विकसित करण्यासाठी फेलोशिप देते. या योजनेतून मराठवाड्यात सन 2008 पासून बर्याच कार्यकर्त्यांना फेलोशिप दिली होती. यात बहुतांश महिला होत्या आणि त्यातही एकल असणार्या महिला बर्यापैकी होत्या. जेव्हा एखादा प्रश्न घेऊन सामूहिकतेने सोडविण्यासाठी मोहीम उभी करावी असे सर्वांनी मिळून ठरवले, तेव्हा ‘एकल महिलांचे प्रश्न’ हा मुद्दा प्रामुख्याने महिला कार्यकर्त्यांनी निवडला. सर्वच महिलांचे प्रश्न गंभीर आहेत पण त्यातही एकल महिलांचे प्रश्न वेगळे आहेत आणि त्यावर अजून काहीच काम झाले नाही असे त्यांचे म्हणणे होते. मराठवाड्याची ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेता महिलांचे दुय्यम स्थान, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात लादलेली बंधने, त्यांच्याकडे मशीन म्हणून पाहण्याचा पुरुषी दृष्टीकोन या सर्व गोष्टी सहज लक्षात येत होत्या. पण त्यातही एकल महिलांची अवस्था अतिशय बिकट होती. त्यांना कोणत्याही सण समारंभात सहभागी करून घेतले जात नव्हते. अशा प्रसंगी त्यांचे तोंडही पाहू नये अशी धारणा खोलवर रुजलेली होती. त्यांच्याविषयी बोलताना अतिशय घाणेरडे शब्द वापरले जायचे. एकल महिलाना नीटनेटके राहण्यावरसुद्धा खूप बंधने होती. त्यांच्या नावावर कोणतीही संपत्ति नसणे, त्यांचे होणारे प्रचंड शोषण, त्यांच्यावर होणारे अत्याचार आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन जो मुख्यतः एकतर ‘बिचारी’ किंवा ‘उपलब्ध’ असा होता.
एकल असण्यात किंवा होण्यात या महिलांची कोणतीही चूक नसतानासुद्धा ‘आपले नशीबच फुटके’ असे समजून या सर्व महिला सगळे निमूटपणे सहन करत होत्या. हेच आपले जीवन आहे आणि आता यातून आपली सुटका नाही हेच त्यांना वाटत होते. आमचे काम जेव्हा सुरू झाले तेव्हा सुरूवातीला 100 पेक्षा अधिक गावातील जवळपास प्रत्येक घरात जाऊन किती एकल महिला आहेत आणि त्यांची प्राथमिक स्थिति काय हे शोधून काढण्यात आले. त्यातल्या काहीजणींच्या सखोल मुलाखती घेऊन त्यांचे नेमके प्रश्न, त्यांचे होणारे शोषण, याची त्यांना वाटणारी कारणे आणि उपाय याचा अभ्यास करण्यात आला. एकल महिलांसोबत काम करणार्या इतर संस्था प्रामुख्याने शासकीय योजना, रेशन आणि जमीन हक्क यावर काम करतात पण इतकेच एकल महिलांचे प्रश्न नाहीत याची जाणीव होत गेली. अगदी उध्वस्त अशा स्थितीत असलेल्या एकल महिलाना एक नवी ओळख मिळायला हवी आणि त्यातून त्यांचा प्रवास स्वतंत्र होण्याकडे असायला हवा हे कळत गेले.
एकल महिलांच्या भौतिक गरजा पूर्ण झाल्या तरी त्यांना समाजात सन्मान, समान स्थान आणि स्वातंत्र्य मिळाले नाही, त्यांनी स्वतः आणि समाजाने त्यांना माणूस म्हणून पाहिले नाही तर त्यांच्या परिस्थितीत कोणताही बदल होणार नाही. म्हणूनच सर्वप्रथम तिच्या ‘स्व’ मध्ये बदल व्हायला हवा आणि तिला तिचे मूलभूत अधिकार कळावे यासाठी एकल असणार्या महिला कार्यकर्त्यांना आणि इतरांना प्रशिक्षित करून गावागावांतील एकल असलेल्या महिलांची स्व आणि मूलभूत अधिकार यावर प्रशिक्षणे घेण्यात आली. या प्रशिक्षणांतून तिला स्वत: विषयी प्रश्न पडत गेले आणि ती विचार करायला लागली. प्रशिक्षणाची सुरुवात करताना प्रत्येकाने स्वत:च्या नावासोबत आईचे नाव घेऊन ओळख करायची असे एक सत्र होते. यानंतर महिलांच्यात चर्चा व्हायची. आपण एकल आहोत तेव्हा पुढे जाऊन आपल्या मुलांनीसुद्धा आपलेच नाव वापरुन ओळख करून द्यायला हवी असे त्यांना वाटू लागले. प्रशिक्षणातून त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला आणि आपण माणूस आहोत, आपल्यालासुद्धा समान हक्क आणि अधिकार आहेत याची जाणीव त्यांना होऊ लागली. दरम्यान आमची ओळख केवळ एकल महिलांसोबत काम करणारे अशी होऊ लागली जी आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हती. एकल महिलांकडे पाहण्याचा इतर स्त्रिया आणि पुरुषांचा दृष्टीकोण बदलायला हवा आणि त्यासाठी त्यांच्यासोबत काम व्हायला हवे. त्यासाठी आम्ही गावागावांत एकल आणि ईतर अशा सर्व महिलाना एकत्र आणून महिला मंडळे तयार केली. गावागावांत वेशीवर एकल महिला संघटनेचे बोर्ड लागले. जेथे फक्त पुरुष आणि युवक मंडळांचे बोर्ड लागायचे अशा ठिकाणी महिला संघटनेचे बोर्ड लागणे हे विशेष होते. यातून संघटनेची गावागावात चर्चा व्हायला लागली. एकल महिला संघटनेच्या महिला मंडळातील महिलांनी मोठ्या प्रमाणात ग्रामसभेत जायला सुरुवात केली. जिथे केवळ चार ते पाच महिला ग्रामसभेत असायच्या तिथे आता मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित असतात. त्या नुसत्याच उपस्थित राहत नाहीत तर आपले प्रश्न मांडतात आणि सोडवूनसुद्धा घेतात.
आता महिला विविध शासकीय समित्यांवर आहेत. या सगळ्यात एकल महिला नेतृत्वात असतील याकडे लक्ष दिले जाते. काही गावांत महिलांनी एकत्र येऊन त्यांना भेडसावणारे प्रश्न जसे की रस्ता, पाणी, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था असे प्रश्न सोडवलेत किंवा सुटण्याच्या प्रक्रियेत आहेत. एखादी महिला विधवा झाल्यावर तिसर्या दिवशी तिचे दागिने काढण्याची प्रथा आहे परंतु चार गावात महिलांनी एकत्र येऊन ही प्रथा रोखलीय. वैयक्तिक स्तरावर महिलांनी मोठ्या प्रमाणात गोष्टी बदलल्या आहेत. कोणी मनासारखे नीटनेटके राहायला लागलीय तर कोणी शिक्षण परत सुरू केलेय. कोणी संपत्तिचा अधिकार मिळवलाय तर कोणी स्वत: चा व्यवसाय सुरू केलाय. उस्मानाबाद मध्ये तर 25 महिलानी चक्क पेट्रोल पंप वर नोकरी स्वीकारली आहे आणि त्या स्वत:च्या पायावर उभे राहत आहेत. महिला अमुक गोष्ट करू शकत नाहीत या मानसिकतेला जबरदस्त तडा दिलाय. काही महिलांनी पुनर्विवाहाचा निर्णय घेतलाय आणि यात मराठा समाजातील महिला अधिक आहेत. आजवर ह्या समाजात पुनर्विवाह सहज शक्य नव्हता. जातीच्या उतरंडीत जसे वरवर जावे तसे एकल महिलांचे प्रश्न अजून गुंतागुंतीचे होत जातात ही या कामात मिळालेली अजून एक शिकवण.
एकल महिलांचे नेतृत्व विकसित होऊन त्यांची एक मजबूत संघटना तयार व्हावी जिने त्यांचे प्रश्न सोडवावेत हाच विचार सुरुवातीपासून कामात होता. या सगळ्या प्रवासात काही कार्यक्रम आणि रणनीती खूप प्रेरणा देणारे होते. तुळजापूर, अंबाजोगाई आणि चाकूर येथे संघटनेच्या महिलांनी हजारांच्या संख्येत एकत्र येऊन केलेले कार्यक्रम आणि त्यात झिंगाट सारख्या गाण्यावर बेभान होऊन केलेला डान्स, एकमेकींना गजरे लावून तोडलेले नियम (त्यातील एकीने तर चक्क २० वर्षांनी गजरा लावला होता.), महिलांना अंतर्गत आणि सामूहिक ताकदीची झालेली जाणीव, त्यांनी स्वतःपासून बदल करण्याचा केलेला प्रयत्न हे सगळे खूप काही शिकवून गेले. अंबाजोगाईतील कार्यक्रमात तर 'हमारा आस्मान' नावाचा एक कार्यक्रम केला होता. एका मोठ्या हॉलमध्ये चारही बाजूला आरसे लावून आत पोलीस, वकील, डॉक्टर यांचे गणवेश, पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे, मेकअपचे सामान, संगीत, पुस्तके, सेल्फी अशी सर्व काही व्यवस्था करण्यात आली होती. आतमध्ये केवळ महिलांनाच प्रवेश होता. मराठवाड्यातील ग्रामीण भागातील महिलांचा या प्रयोगाला कसा प्रतिसाद असेल याची धाकधूक मनात होती. पण दोन दिवस हा हॉल महिलांनी जणू ओसंडून वाहत होता. महिला त्यांना आतापर्यंत जे करता आले नव्हते ते करून पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद दिसत होता.
एकल महिला संघटनेची निवडणूक हा एक असाच वेगळा कार्यक्रम. महिलांचे राजकीय शिक्षण व्हावे, संघटनेत त्यांचा सहभाग वाढावा आणि लोकशाही रुजावी यासाठी संघटनेची निवडणूक झाली. एक प्रकारे ही राजकीय निवडणुकीची तालीमच होती. महिलांना बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच कळल्या. आपण निवडून येऊ शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यात तयार झाला. आता हाच आत्मविश्वास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना खूप फायदेशीर ठरणार आहे. सांस्कृतिक गोष्टींना बदलण्याचा प्रयत्न सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाला. महिला खूप वर्षांनी मैदानात जाऊन खेळल्या तेही गावाच्या मध्यभागी. आता तर तालुक्याला महिलांच्या खेळाच्या स्पर्धा आयोजित होतात. यावर्षी संविधान दिनाच्या दिवशी तर महिलांनी संविधान ठेवलेल्या पालखीला खांदा दिला आणि एका प्रथेला आव्हान दिले.
आजमितीस एकल महिला संघटनेच्या १६००० पेक्षा जास्त सभासद आहेत ज्यात ६०% एकल तर उर्वरित इतर महिला आहेत. बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १० तालुक्यांत संघटना पसरलीय. प्रत्येक तालुक्यात ३०-३५ महिला संघटनेच्या विविध समित्यांवर आणि तेही मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवी पद्धतीने जबाबदाऱ्या घेऊन आहेत. महिलांच्या विविध प्रश्नांना घेऊन काम करणारी संघटना म्हणून शासकीय यंत्रणेला सुद्धा एकल महिला संघटना चांगली माहिती झालीय. बीडमधल्या ऊसतोडणी कामगार महिलांच्या गर्भपिशवी काढण्याच्या मुद्द्यावर सुद्धा एकल महिला संघटनेने इतर संघटनांसोबत मिळून जनसुनवाई करून मुद्दा पुढे नेला आहे. आता सर्व महाराष्ट्रातील एकल महिलांच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या संस्था-संघटना एकत्र येऊन महाराष्ट्र एकल महिला अधिकार परिषदच्या माध्यमातून एकल महिलांची स्थानिक स्वराज्य संस्थेत नोंदणी व्हावी म्हणून व्यापक प्रमाणात काम करीत आहेत. नुकत्याच झालेल्या २६ जानेवारीच्या ग्रामसभेत असे ठराव महाराष्ट्रातील कानाकोपर्यातील गावांत ग्रामसभेत झाले आहेत.कामाच्या सुरुवातीला कायदेशीर किंवा समाजमान्य पार्टनर सोबत नसणारी महिला ती एकल महिला अशी समज होती पण आता ती अपुरी वाटतेय.
पार्टनर असलेल्या महिला सुद्धा एकल असू शकतात. मुळात तिच्या पार्टनर असण्यावर किंवा नसण्यावर तिची एकल किंवा दुकल अशी ओळख असताच कामा नये. ती स्वतंत्र आहे. तिचा उधवस्त असण्याकडून एकल या ओळखीपर्यंत झालेला प्रवास आता स्वतंत्र माणूस असण्याकडे सुरु आहे. लिंगावर आधारित असणारे भेदभाव नष्ट करताना आधी सर्वाना मिळून एकल महिला आणि इतर महिला असा भेद नष्ट करायचाय म्हणजेच एकल महिला संघटनेची स्वतंत्र महिला संघटना व्हायला वेळ लागणार नाही.
शिशिर सावंत
भावना तीव्र असणे अतिशय स्वाभाविक आहे. परंतु टाकण्याची मानसिकता वा प्रवृत्ती वाईट आहे तर ती महिलांनी अवलंबवावी का?
ReplyDeleteअभिनंदन शिषिर तुमचे, या आधी एकदा चर्चेत तुम्ही हे विषय बोलले होते, आणि ते प्रकर्षाने मला आठवतात. मी तुमचे Facebook page follow करते, आणि या सर्व महिलांचा अभिमान वाटतो. एकल महिला संघटनेच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
ReplyDeleteखूप खूप अभिनंदन शिशिर भाऊ अगदी पहिल्या पासून ते आत्ता पर्यंत जे काही बदल झाले ते एकदम मोजक्या व स्पष्ट शब्दात तुम्ही मांडले आहेत . मला अगदी मनातून सांगावेसे वाटते की एकल महिला संघटनेमुळेच आमचे म्हणजे उध्वस्त झालेल्या , टाकून दिलेल्या , समाजाने नाकारलेल्या महिलांचे प्रश्न या पुरुष प्रधान व्यवस्थेपुढे आणले .समाजाचा एकल महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचे काम सुरू आहे जे आजपर्यंत कुणीही केलेले नाही . त्यात तुमचा पण खूप मोठा सहभाग आहे .
ReplyDelete