स्त्रिया आणि विनोद - सत्तासंबंधाच्या शोधात

विनोद ही गंभीर गोष्ट आहे, हे वाक्य सकृतदर्शनी विनोदी वाटले तरी ते मूलतः गंभीरच आहे, ह्यात शंका नाही . चांगला, निर्विष, निर्मळ, निखळ विनोद करणे अनेक कारणांमुळे अतिशय अवघड असते. विनोद ही भाषिक कृती असते, पण ती व्यक्ती, वस्तू, घटना, प्रसंग इत्यादी माध्यमातून प्रगट होत असते. 'विनोद' ह्या संकल्पनेच्या अनंत व्याख्या करण्यात आल्या, पण अचूक व्याख्या करणे अवघड आहे. एकवेळ 'तत्त्वज्ञान' या संकल्पनेची व्याख्या होऊ शकते, पण विनोदाची व्याख्या जवळपास अशक्य होते.

विनोदाला अतिशय प्राचीन इतिहास आहे. मानवी संस्कृती आणि सभ्यतेत विनोद कधी निर्माण झाला, हे सांगणं कठीण आहे तसं हास्य कधी निर्माण झालं, हे सांगणही कठीण आहे. माणसाची व्याख्या 'हसणारा प्राणी' अशी केली जाते. हास्य हे मानवी वैशिष्ट्य आहे. केवळ माणूसच हसू शकतो, प्राणी हसू शकत नाहीत (प्राण्यांनी हसावे ही इच्छा बालसाहित्यात पूर्ण होते.)


मला आठवते, १९८२-८४ दरम्यान एमए करत असताना एकदा आम्ही वर्गमित्र लोणावळ्याला गेलो होतो. तिथे कुठल्यातरी बागेत एका पिंजऱ्यात एक बुटका माकडासारखा प्राणी होता. त्याला पाहताच हसू फुटत असे. नीट निरीक्षण केल्यावर लक्षात आले की त्याचा चेहऱ्याची ठेवणच माणसाला हसू फुटावे अशी निसर्गतः होती. म्हणजे त्याच्या चेहऱ्याचे स्नायू, गाल, ओठ, नाक, ओठ यांची रचनाच माणसाला हसवणारी होती. पण ते त्याच्या चेहऱ्यावरचे ते हास्य त्याच्यासाठी हास्य नव्हतेच, ते त्याचे भागदेय होते. तो प्राणी स्वतः हसतच नव्हता पण त्याला पाहाताच हसू माणसाला येत होते. ती त्याची नैसर्गिक ठेवण होती!

विनोद करणे आणि विनोदाचे समीक्षण चिंतन प्राचीन काळापासून होत आले आहे. भारतीय, ग्रीक आणि चीनी या तीन सभ्यतांमध्ये व संस्कृतींमध्ये जसा मोक्ष, मुक्ति विचार आढळतो तसा हास्य, विनोद यांचाही विचार आढळतो. ग्रीक कवी होमर (इ. स. पू. आठवे शतक) च्या मते माणूसच काय पण देवदेवताही विनोद करतात. भारतीय पुराणात नारद हे एकमेव पात्र विनोद, चेष्टा-मस्करी करताना आढळते. प्लेटो, अरिस्टोफेनीस, भरतमुनी (इ. स. पू. दुसरे शतक), अभिनवगुप्तपासून मराठीत चक्रधरांचे लीळाचरित्र, साहित्यसम्राट न. चि. केळकर, श्री. कृ. कोल्हटकर, राम गणेश गडकरी, गंगाधर गाडगीळ, पु. ल. देशपांडे, ग. त्र्यं. देशपांडे, वि. वि. बोकील, बाळ गाडगीळ, अ. वा. वर्टी, शि. गो. भावे, वा. ल. कुलकर्णी, दत्तू बांदेकर, जयंत दळवी, द. मा. मिरासदार, मुकुंद टाकसाळे ते भालचंद्र नेमाडे, समीक्षक गो. मा. पवार यांच्यासोबत सुशीला मराठे, सुशीला बापट, अपर्णा देशपांडे, मधुवंती सप्रे या कवयित्री आणि इंद्रायणी सावकार, दीपा गोवारीकर, पद्मजा फाटक, मंगला गोडबोले या तुलनेने अतिशय मोजक्या विनोदी लेखिका अशा अनेकांनी विनोदविषयक चिंतन-समीक्षा लेखन केले आहे. पुढे आजच्या दिवाळी अंकातील विविध लेखिका-लेखक असे चिंतन करीत आहेत.

'विनोद म्हणजे काय? ' पासून साधू, संत, महात्मे, प्रेषित विनोद करतात का ? 'टवाळा आवडे विनोद' हे खरेच खरे आहे का? ह्यावरही गंभीर चिंतन झालेले आहे. ह्या साऱ्या चिंतनाचे एक समान आशयसूत्र कोणते आहे? तर "विनोद निर्विष असावा, सुखात्म असावा!" 'विनोद करण्यातून कोणालाही दुखवू नये' हा विनोद निर्मितीचा आणि त्याची मजा घेण्याचा लसावि व मसावि आहे. लसावि व मसावि एकत्रित अपेक्षित असणारा 'विनोद' हा कदाचित एकमेव चिंतनप्रांत असावा, असे मला वाटते.

हास्य आणि विनोद

विद्यमान सभ्यता आणि संस्कृतीत विनोद आणि हास्य हे एकत्रित असणारे घटक मानले जातात. दोन्हीचा तोंडवळा एकसारखाच जुळा दिसत असला तरी त्यांच्यात फरक करणे व वेगळे करणे आवश्यक आहे असे मला वाटते. विनोद आणि हास्य दोन्हीचा तोंडवळा जुळा असल्याने हसणे म्हणजे विनोद असे समीकरण झाले आणि जे जे हास्याबद्द्ल मांडले गेले ते ते विनोदाबाबत स्वीकारले गेले, असे दिसते. त्यातून विनोद (humour/joke), उपहास/उपरोध (satire), विडंबन /गूढान्वय /व्याजस्तुती (Irony), थट्टा/चेष्टा/मस्करी (jest), हास्यविनोद (laughter), हास्यास्पद (ridiculous), कोटी (wit), विनोदात्मकता (comic) काळा विनोद किंवा कटुहास्य (black humor) इत्यादी हे सारे हास्याशी जोडले गेलेले शारीरिक आविष्कार प्रकार निर्माण झाले आणि ते सारेच्या सारे विनोदाचे प्रकार मानले गेले. या प्रत्येकाचे स्वरूप वेगवेगळ्या रीतीचे आहे. साहित्य, चित्रे, कला, नाटक, सर्कस, तमाशा, रोजचे बोलणे असा विविध रीतीने विनोद व हास्य व्यक्त होत असते. ह्या साऱ्या मानवी निर्मिती आहेत. भरताच्या नाट्यशास्त्रानुसार हास्य हा एक रस आहे. पण वास्तवातल्या हसण्याविषयी भरत काही सांगत नाही!
सुखदायक विनोद ही संकल्पना मान्य केली तर विनोदात क्रौर्य असतं का? विनोद क्रूर, हिंसक, घातक असतो का? असा प्रश्न उपस्थित करता येतो. हास्य हा मूळ रस असताना ते शस्त्र कसे बनले? शोषण, अन्याय, आंदोलन इत्यादिपेक्षा कुचेष्टा, खिल्ली उडवणे इत्यादीसाठी 'हास्य' हे शस्त्र म्हणून कायमच वापरले गेले. वास्तवात रोजच्या व्यवहारात असे क्रूर, हिंसक विनोद घडत असतात. विनोद कसा घडतो? त्याच्या आविष्कार पद्धती कोणत्या असतात? ह्या प्रश्नांप्रमाणेच क्रूर विनोद का घडतो? हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे, असे मला वाटते. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत क्रूर विनोद होतात तेव्हा ते का घडतात, हे शोधणे गरजेचे आहे. स्त्री आणि विनोद यांच्या संदर्भात सत्तासंबंध शोधताना एक शस्त्र म्हणून स्त्रियांच्या विरोधात विनोद प्राचीन कालपासूनच वापरले गेले आहे. तसे का झाले असावे?

स्त्रिया आणि विनोद हा विषय अतिशय गंभीर असूनही त्याचा उल्लेख झाला तरी तो विनोदाने घेतला जातो. स्त्रीची विनोदबुद्धी या विषयाबद्दलही विनोदानेच बोलले जाते. साहित्याच्या संदर्भात हा विषय अप्रशस्त मानला जातो. स्त्री आणि विनोद हा विषय प्रामुख्याने दोन पातळीवर चर्चिला जातो. एक त्यांचे वर्तन आणि त्यांच्या वर्तनाचे कथा, कविता, नाटक, कादंबरी इत्यादीतील त्यांचे पुरुष लेखकांनी केलेले चित्रण. पुरुषी लेखन अतिप्राचीन ते अतिआधुनिक काळात होत आलेले आहे. अतिआधुनिक काळात पुरुषांच्या लेखनाच्या जोडीने स्त्रीयांचे लेखनही होते आहे. त्यात विनोदी साहित्याचा समावेश आहे. पुरुषी लेखन अतिप्राचीन आहे तर स्त्री लेखन अतिआधुनिक आहे.

व्यक्तीचे वर्तन अतिशय खासगी ते अतिशय खुल्या सार्वजनिक अवकाशात घडत असते. हा अवकाश प्राचीन काळी स्त्रियांना उपलब्ध नव्हता. आधुनिक जीवनशैलीत तो उपलब्ध झाला आहे. नवरा-बायको, लिव्ह इन इत्यादी खासगी जीवन म्हणजे कुटुंब ते रोजची दैनंदिन कामे, रस्ता, कामाचे ठिकाण इत्यादी सार्वजनिक वर्तन ठिकाणी होणारे स्त्रियांचे वागणे हा विनोदाचा विषय बनवला जातो. त्यांच्याकडून होणारे किंवा केले जाणारे विनोद, त्यांना समजणारे विनोद आणि त्यांचे विनोदी वाटेल असे वर्तन यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होतोच, पण स्त्री हाच विनोदाचा, उपहासाचा, चेष्टा-मस्करीचा विषय बनवून विनोदी, प्रहसनात्मक लेखन पुरुष लेखकांकडून केले जाते.

पुरुषांनी स्त्रियांबद्दल केलेल्या विनोदात बहुधा सत्तासंबंध असतो, असे लक्षात येते. हिंसा ही सत्ताप्राप्तीच्या प्रक्रियेत अंतर्निहित घटक म्हणून काम करते. विनोद जर सत्तासंबंध प्रस्थापित करणारी घटना ठरत असेल तर असे विनोद हिंसक मानले पाहिजेत. तसे झाले की विनोद निर्विष न ठरत विषारी व हिंसक बनतो.

प्राथमिक काळातील मानवी संस्कृतीत हास्य हे प्रथम विजयाचे प्रतिक मानले गेले होते. ते क्रूरता, युद्धातील विजय, त्यातील उन्माद यांचे प्रतिक होते. नंतर सौम्य स्वरुपात विनोदाशी जोडले गेले उत्क्रांतीच्या विकसनात हास्यातील क्रूरतेची बाजू पूर्ण गेली नाही आणि जाणारही नाही, पण विनोदातील क्रूरतेची बाजू जाऊ शकेल, असे मला वाटते. हसणं आणि त्या कृतीच्या वर्गातील दात विचकणं, तोंड वेंगाडणं, विकटता, छद्मपणा, सात मजली हास्य हे एकच असतं. हास्य व विनोद विषयक साधारणतः दोन ठळक विचारप्रवास दिसतात. वर्चस्ववादी विषमता आणि खुली स्वातंत्र्यवादी समता असे दोन प्रकार करता येतील.

हास्य-विनोदातील वर्चस्ववाद

स्त्रियांच्या बाबतीत हास्य आणि विनोद यांचा उपयोग मुख्यतः शस्त्र म्हणून वर्चस्ववादी वृत्तीतून होतो, असे दिसते.

होमर, प्लेटोपासून अनेकांनी हास्य-विनोदाविषयी चिकित्सक चिंतन केले आहे. त्यात अॅरिस्टॉटलचे मत महत्वाचे आहे, तो म्हणतो, " विनोद हा एक अपशब्द आहे, म्हणूनच इतरांना सांगताना तो हानिकारक होणार नाही, असे पाहिले पाहिजे. मध्ययुगीन काळात इंग्लिश तत्त्ववेत्ता थॉमस हॉब्ज (१५९८-१६७९) चे विचार प्रस्तुत विवेचनासाठी महत्वाचे आहेत. त्याच्या मते, माणसामध्ये एक 'मूलभूत आत्मश्रेष्ठत्वाची भावना' असते, तीच हास्याचे मूळ कारण आहे. हॉब्ज म्हणतो, "हास्याची प्रेरणा म्हणजे अन्य काही नाही तर स्वतःमधील भूतकालीन न्यूनत्वाशी किंवा इतरांमधील कमीपणाशी आपल्याला अचानक जाणीव होऊन त्यांच्याशी तुलना करण्याच्या प्रक्रियेतून अचानक उद्भवणाऱ्या स्वतःबद्दलची श्रेष्ठत्व भावना असते." अशा हसण्यामागे स्वतःतील चांगले शोधण्यापेक्षा नेहमीच इतरांचे दोष काढणे हाच माणसाचा मुख्यः हेतू असतो. हे नैतिकदृष्ट्या चूक आहे, म्हणूनच कोणत्याही चांगल्या माणसांचे योग्य काम म्हणजे इतरांना त्यांच्यातील उणेपण दूर करण्यासाठी मदत करणे, त्यांना आपल्या तिरस्कार भावनेतून मुक्त करणे आणि स्वतःची तुलना जे उत्तम आहे त्याच्याशीच करणे.

हॉब्जच्या मते, ज्याच्यात ही श्रेष्ठत्वभावना निर्माण होते त्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून विनोदाचा विषय झालेल्या इतर व्यक्तीत काहीतरी कमीपणा आहे, वैगुण्य आहे असे वाटत असते. म्हणून ती व्यक्ती स्वतःला श्रेष्ठ समजून अहंकाराचे हसते. 'स्वतःला श्रेष्ठ मानणे' हे माणसाचे स्वरूपच तो करत असलेल्या विनोदामागील मुख्य कारण इतरांना कमी लेखणे हेच असते असे हॉब्जला म्हणायचे आहे. हा हॉब्जचा 'श्रेष्ठत्व सिद्धांत' आहे. चार्ल्स बॉदलिएर हा विचारवंत ह्या प्रतिपादनाचा आधार घेऊन म्हणतो, "हास्य सैतानी असते. हास्य हा प्राण्यांपेक्षा उच्च असल्याची श्रेष्ठत्वाची भावना आणि आपण मर्त्य असल्याच्या जाणीवेमुळे निर्माण होणारी वैफल्यग्रस्तता यांचा आविष्कार आहे.

रेने देकार्त या आधुनिकतेचा जनक विचारवंताच्या मते आश्चर्य, प्रेम, सौम्य दुस्वास, इच्छा, आनंद, हर्ष आणि दुःख या सहापैकी तीन भावना हास्यात असतात. असे असले तरी इतरांविषयी तिरस्कार आणि हास्यास्पद भावना यांचा आविष्कार म्हणजे हास्य. स्टीफन लीकॉक या विसाव्या शतकातील लेखकाच्यामते, विनोदाचा उगम हाच मुळी शत्रूवर मिळालेल्या विजयाचा आनंद प्रकट करण्यातून झाला असावा. तो म्हणतो," विनोद म्हणजे प्रतिकूलतेवर मिळवलेल्या व्यक्तिगत विजयाने होणारा आनंद अथवा काही एक नष्ट झालेले अथवा आकारभ्रष्ट झालेले बघण्यात मिळणारा आनंद."

सिग्मंड फ्रॉईडने मनाचे कार्य उलगडत असताना विनोद, कोटी, विनोदात्मकता किंवा विनोदीवृत्ती यांचे स्पष्टीकरण दिले आहे. त्याच्या मते अबोध अहं, अर्धबोध अहं आणि पूर्णबोध असणारा अहं असे मनाचे तीन स्तर आहेत. अबोध अहं बालपणी मुक्त असतो. जसजसा माणूस मोठा होतो तसे त्याच्यावर अर्धबोध अहंचे नियंत्रण येते. कोणत्या प्रेरणा, भावना प्रगट करायच्या ते अर्धबोध मन ठरवते. पूर्णबोध मनाचे दोघांवर नियंत्रण असते. ही मनाची उच्च अवस्था असते, ते संस्कारित असते. माणूस अहंकारी असतो, याचा अर्थ तो अबोध अहंच्या पूर्ण नियंत्रणात आणि अर्धबोध अहंच्या अर्ध्या नियंत्रणात असतो. अबोध अहं तर केवळ सुख आणि सुखासाठी काहीही करायला तयार असतो, तो कोणतेही नैतिक, सामाजिक बंधन मानत नाही, त्याच्या आड येणारी सारी बंधने तोडून तो 'नागडा स्वसुख' वादी असतो. म्हणून माणूस मूलतः सुखवादी असतो आणि त्यातच त्याचा अहं अतिशय गुंतलेला असतो. पण अनेकदा अबोध मनावर बाह्यजगाचे, म्हणजे इतर लोकांचे, लोकनीतीचे, नियमांचे आक्रमण होत असते. सुखाला बाधा येते. त्या मनाचा तोल जातो, सुख हिरावले जाते. मग ते विनोदाकडे वळते. (संस्कृती, धर्म, नीती, कायदा इत्यादी पूर्णबोधात्मक मनाची निर्मिती असते) या अबोध मनाच्या रक्षणाचे शस्त्र म्हणजे विनोद असे फ्रॉईडचे मत आहे.

कामप्रेरणा, कामसुख किंवा अनुषंगिक इंद्रिय सुख हेच केवळ अबोध मनाचे एकमेवाद्वितीय उद्दिष्ट असते. पण ते सुख मिळाले नाही की दुःख निर्माण होते. पण अबोध मन हे नेहमी अर्धबोध आणि पूर्णबोधात्मक मनाच्या नियंत्रणात असल्याने उघडपणे ओरबाडून सुख घेऊ शकत नाही. त्यास्थितीत ते विनोद करून सुखभावनेचे रक्षण करते. विनोदापासून आनंद मिळवला जातो. हे अहंकाराचे रक्षण असते, असे रक्षण करणे ही फ्रॉईडच्या मते माणसातील मूलभूत प्रेरणा असते.('अहंकार जपणे' असे आपण बोलीभाषेत म्हणतो, त्याचा हाच अर्थ असतो.) ती अहंरक्षणाची प्रेरणा सहज साध्य झाली नाही की मूळ अबोधात्मक भरड मन कामप्रेरणेने लिप्त मनात आक्रमणाची उर्मी निर्माण होते. त्यातून उपहास आणि अश्लीलता यांची निर्मिती होते. अश्लीलता अबोध मनात जन्मते आणि विनोद पूर्णबोधात्मक मनात जन्मतो. अश्लीलता स्वरूपाने कामलिप्त असते, ती सतत उफाळून वर येत असतेच. पण तिला थेटपणे व्यक्त होण्याची परवानगी नसते. मग जणूकाही अर्धबोध मनाची परवानगी घेऊन त्याच्या नियंत्रणाखाली विनोदात मिसळली जाते आणि मग विनोद अश्लीलतेकडे झुकतो.

सिग्मंड फ्रॉईडने कामभावनेचे सविस्तर विवेचन केले आहे. त्याच्या मते, माणसात सुख मिळवण्याची मूलभूत प्रेरणा असते आणि ती मूलतः आक्रमक स्वरुपाचीच असते, सुखप्राप्ती झाली की मिळालेले सुख हिरावले जावू नये म्हणून ती प्रतिआक्रमक होते, म्हणजे मूलभूत प्रेरणा ही केवळ स्वतःचे सुखाचे व स्वतःचे संरक्षण करण्यासाठी वापरली जाते. सत्तेचे स्वरूप मूलतः कामोपभोग हेच असते.

कामप्रेरणा अतृप्त राहिली की ती अश्लीलतेचे रूप धारण करते. त्याच्या मते अश्लीलता पुरुषी असते, म्हणून अश्लीलता नेहमी स्त्रीला उद्देशून असते. अश्लीलता म्हणजे सुप्त रुपात (दृश्य रुपात न केलेला) पण मानसिक पातळीवर केलेला बलात्कार असतो. जे शब्द अश्लील भावनेने उच्चारले जातात ते ज्यांचे सूचक असतात ते अवयव आणि तिच्याशी जोडलेली कृती समोर येत असते. अश्लीलतेमागे खरे तर 'लैंगिक अवयव' पाहण्याची-भोगण्याचीच इच्छा असते. एका अर्थाने अश्लील बोलणे, वागणे हे स्त्रीचे पुरुषाने केलेले नग्नीकरण असते.


स्त्रीचा मूळ उपयोग केवळ उपभोग हाच आहे, हे गृहीत धरले जात असले तरी अश्लीलता, त्यावर आधारलेले विनोद हे नातेसंबंधाचे स्वरूप महत्वाचे ठरते. पुरुषाकडून आई, बहिण, मुलगी आणि सून ही जवळची नाती आणि नंतरची आईशी समांतर मावशी, काकू, आजी, चुलत-मावस-आते इत्यादी बहिणी-पुतणी-सून इत्यादी. जसजसे हे नाते दूरचे होत जाते तसे त्या नात्यातील तीव्रता कमी होत जाते. म्हणजे पुरुषाला पत्नी वगळता आई, बहिण व सून यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करता येत नाहीत. त्याचवेळेस ज्याने असे संबंध प्रस्थापित केलेले असतात किंवा ज्यांच्या अशा संबंधामुळे पुरुषाचा (पर्यायाने स्त्रीचाही) जन्म झालेला असतो त्या आईवडिलांच्या लैंगिक संबंधाविषयी तो (किंवा ती) मौन बाळगतो/बाळगते.बहिण-मेव्हण्याच्या लैंगिक संबंधाविषयीही साधारणतः मौनाचे धोरण असते. सून-मुलगा यांच्याबाबत मात्र पुरुष काहीसा सभ्यतेची पातळी कमी करून, उघडपणे बोलू पाहातो.....कारण मुलगा जर 'कामाचा' नसला तर सून त्याला उपभोग्य होऊ शकते, उपलब्ध होऊ शकते. असेच उलट बाजूनेही घडते. स्त्रीला बाप, भाऊ व मुलगा यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करता येत नाहीत, पण जावई उपभोग्य होऊ शकतो, उपलब्ध होऊ शकतो. अर्थात अशा प्रकारच्या संबंधातून निर्माण होणाऱ्या अपत्याच्या नात्याबद्दल अनेक गुंतागुंती होतात. कोणताही पुरुष त्याच्या या स्त्री नातेवाईकांना मात्र त्यातून वगळतो. पण जिथे लैंगिक संबंध प्रस्थापित होऊ शकतात अशी नाती असतील तर तेथे विनोदाची शक्यता निर्माण होते. मामेबहीण, आतेभाऊ. चुलतभाऊ-चुलतबहिण, दीरभावजय इत्यादी. (ते काहीसे धर्मावर अवलंबून असते.) इथे लैंगिक संबंध सूचक विनोद घडू शकतात आणि इथे सत्तासंबंध अदृश्यपणे आपले अधिपत्य प्रस्थापित करतो.

विनोदाकडे आक्रमण, हल्ला करण्याचे साधन म्हणून पाहिले जाते, अशी मांडणी मराठीत केली ती प्रथम ते श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि प्र. के. अत्रे यांनी. कोल्हटकरांच्या मते, "विनोद हे एक शस्त्र असून त्याचा उपयोग स्वसंरक्षणापेक्षा इतरांच्या व्यंगाचा स्फोट करण्याचेच कमी विशेषेकरून होतो."

अत्रे म्हणतात, "पुरोगामी ललित लेखकांना विनोद हे आता एक अत्यंत सामर्थ्यवान शस्त्र उपलब्ध झाले आहे" ते अन्यत्र म्हणतात, " हास्याची उत्पत्ती प्रथम जी झाली ती विशुद्ध आनंदाच्या पोटी नाही. शत्रूवर विजय झाल्यावर त्या आनंदाचे प्रदर्शन करताना प्राथमिक अवस्थेतील मनुष्याने दिलेला हुंकार म्हणजे हास्य...उत्क्रांतीच्या ओघात हास्यविनोदाचे काटे झाडून गेले असले तरी ह्या मूळ हास्यात रानटी ओबडधोबडपणा, सुडाची भावना व क्रौर्याची तीव्रता होती. गळा दाबल्याने तडफडणाऱ्या शत्रूंचे हाल पाहून प्राथमिक माणसाला हसू येत असेल, तर आजच्या सुधारलेल्या जगात आपल्या प्रतिपक्षाला कोटीक्रमाने निरुत्तर झालेला पाहूनही आपल्याला हसू येते. विनोदजन्य हास्याचा प्राण उपहासच आहे."

पण पु.लं.ची विनोदाबाबतची भूमिका वेगळी होती. ते म्हणतात, 'वस्तऱ्याने गुळगुळीत हजामत केली पाहिजे, पण त्याने जखम मात्र होता कामा नये.''

स्त्री स्वभावातून निखळ विनोदनिर्मिती करणाचा मान पुरुषलेखकांमध्ये श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चिं. वि. जोशी हे आधीच्या पिढीतील लेखक आणि समकालीन लेखकात शि. द. फडणीस यांचा समावेश होतो. स्त्रियांमध्ये लक्ष्मीबाई टिळक, शकुंतला परांजपे व सई परांजपे यांचा असल्याचे गो. मा. पवार नमूद करतात. फडणीसांनी स्त्रीच्या अनेकांगी स्वभावाला आपल्या व्यंगचित्रांतून निखळ विनोदी पद्धतीने चितारलेले आहे. ते एके ठिकाणी म्हणतात, ‘‘तुम्ही स्त्रियांवरच विनोद का करता आणि मुखपृष्ठावर स्त्रियाच का, असे मला एकदा विचारण्यात आले होते. स्त्रियांच्या विनोदबुद्धीवर आणि खिलाडूपणावर माझा विश्वास आहे. त्या माझे अपराध पदरात घेतात, म्हणून स्त्रियांना पहिलं स्थान दिले आहे.’’

या साऱ्या विचारवंताचे विचार पाहाता त्यांचे विश्लेषण पुरुषप्रधान संस्कृतीच्या बाबतीत पहिले तर असे दिसेल की पुरुष नेहमीच स्वतःला श्रेष्ठ मानत आला आहे. पुरुष स्वतःला 'फर्स्ट सेक्स' समजतो आणि स्त्रियांना 'सेकंड सेक्स.' अर्थात 'स्वतःला शहाणे समजणे' ह्या गोष्टीसाठी इतरांना तुच्छ लेखणे हाच एक मार्ग नसतो. ज्ञान, नीती, समृद्धी, व्यवस्थापन, शिक्षण इत्यादी अनंत मार्ग असतात. हॉब्जच्या म्हणण्या नुसार – “ पुरुषाने आकस्मिक आत्मश्रेष्ठत्वाची प्रतीती इतरात काहीतरी कमी आहे, व्यंग आहे हे समजल्यामुळे स्वतःला श्रेष्ठ समजणे कितपत नैतिक आहे? आत्मश्रेष्ठत्व जाणवण्यासाठी इतरांचे व्यंग ओळखणे, त्यावर प्रहार करणे, ही अनिवार्य अट आहे का? तसे न होतही आपण स्वतःतील चांगलेपणा, उच्चता ओळखू शकतो ना ! मग ते मार्ग कोणते? ते शोधले पाहिजेत.

स्वातंत्र्यवादी समता विचार मांडायचा तर हे लक्षात घेतले पाहिजे की आक्रमक विनोद तर कधीही सुखावह नसतो. स्त्रीच्या बाबतीत तर तो कधीही असू शकत नाही, असे म्हणता येईल. याला अपवाद असूही शकेल पण मला तरी तो माहित नाही. उलट बाजूने स्त्रीकडून मात्र प्रतिआक्रमणास प्रतिबंध होऊ पाहातो.

गांधीजींचं हसणं हे मला नेहमीच गूढ वाटत आलं आहे. त्यांच्याइतके निर्मळ, सरळ हसू मला अजून कुठेही आढळलेलं नाही.

पण हे सगळे विश्लेषण किंवा असेच काही साहित्य वाचून, उमजून जर स्त्री-पुरुषांमधील विनोदच संपला तर त्यांचे नातेच संपेल. मग निष्कर्ष काय काढावा? विशेषतः स्त्रीवादी स्त्री किंवा पुरुषाबरोबर कोणते विनोद करावेत ? त्यांची चेष्टा करावी की नाही ? असे काही प्रश्न उपस्थित होतील? मग साधारण असे म्हणता येईल की कोणत्याही पुरुषाने आणि स्त्रीनेही सार्वजनिक ठिकाणी तरी हिंस्त्र कामुक विनोद टाळावेतच. आता, कामुक विनोद नवरा-बायकोत व्हावेत, ज्यांच्यात लैंगिक संबंध आहेत त्यांच्यातच व्हावेत, असे म्हणावे का? हाही प्रश्न आहेत, कारण स्त्रीवरचे विनोद, हिंस्त्रता घरगुतीतच तर असते ना ! मग उत्तेजक, कामुक विनोद कोणी, कुठे करावेत ? कारण ते उफाळून वर येत राहणार. विनोद हा जगण्याला दिलेला उत्तम प्रतिसाद आहे. पण कधी ? विनोद सहज साधा, निर्विष असेल तर.... तसा नसेल तर ... ???

संदर्भ :

१. John Morreall , Philosophy of Humor : the Stanford Encyclopedia of Philosophy (SEP) : https://plato.stanford.edu/entries/humor/

२. Aaron Smuts : Philosophy of Humor : The Internet Encyclopedia of Philosophy (IEP) (ISSN 2161-0002) : https://www.iep.utm.edu/humor/

३. गो.मा. पवार, "विनोदाचे तत्त्वज्ञान", विनोद: तत्त्व आणि स्वरूप, मौज प्रकाशन, पहिली आवृत्ती २१ डिसेंबर २००६, पान २७३, किंमत रु. २५०/-, ISBN 8174866116.

४. श्रीनिवास हेमाडे , "लैंगिकता – तात्त्विक आणि नैतिक परिप्रेक्ष्यातून" , कामस्वातंत्र्यपर्व, उद्याचा मराठवाडा, दिवाळी अंक २०१९, पान १४ ते २१, अतिथी संपादक : उत्पल व. बा. ,संपादक : राम शेवडीकर

Image may contain: 1 person
श्रीनिवास हेमाडे
तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि संगमनेर  येथे प्राध्यापक 


2 Comments

  1. सर,आपण एका दुर्लक्षित विषयाची दखल घेतली आहे,खूपच छान.

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form