कनिका मिश्रा


भारतीय महिला व्यंगचित्रकारांनी काढलेली कार्टून्स इंटरनेटवर शोधत असताना मला कनिका मिश्राची व्यंगचित्र दिसली. मी तिच्याबद्दल जास्त माहिती मिळवायला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की कनिकाला एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे. तिच्या व्यंगचित्रातली राजकीय समज आणि धिटपणा मला फार आवडला. मी तिच्याशी फेसबुक च्या माध्यमातून संपर्क केला आणि लवकरच तिच्याशी बोलायची संधी मिळाली. (वंदना खरेंनी कनिकाशी हिंदीमध्ये केलेली ही बातचीत मुक्ता खरेने मराठीत अनुवादित केली आहे.) 



कनिका, तू कधीपासून व्यंगचित्र काढते आहेस?

मी लहानपणापासूनच कार्टून्स काढते आहे. कॉलेजमध्ये शिकत असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधे पण मी काहीतरी क्रिएटीव करावं कार्टून्स काढायचे, माझी बरीच चित्र आणि पोर्ट्रेट पेपर मध्ये छापून आली पण पॉलिटिकल कार्टून्स काही कधी छापली गेली नाहीत. कदाचित बऱ्याच न्यूज पेपर्स मध्ये पॉलिटिकल कार्टून्स काढायला आधीच कोणीतरी व्यक्ति नेमलेली असते हे त्याचं कारण असू शकतं किंवा मी मुलगी आहे म्हणून म्हणून मला कोणी सिरियसली घेत नव्हतं हे ही असू शकतं. मला ते कधी नीट समजलं नाही, पण माझी कार्टून्स छापून यावीत म्हणून मी प्रयत्न करत राहिले आणि कार्टून्स काढत राहिले. कधी नोकरीतून वेळ काढून तर कधी कुठेतरी illustratorची छोटीशी नोकरी करून मी व्यंगचित्र काढणे सुरू ठेवले.

तू व्यंगचित्र काढायला कुठे शिकलीस?

खरं म्हणजे कुठेच शिकलेली नाही. ते मला जन्मत: मिळालेलं गिफ्ट आहे , असं मी समजते.  लखनौ आर्ट कॉलेज मधून माझं शिक्षण झालेलं आहे. मी मास्टर ऑफ फाईन आर्ट केलेलं आहे. त्यामुळे माझं त्यातच ट्रेनिंग झालेलं आहे. शिवाय बॅचलर ची माझी डिग्री कमर्शियल आर्ट मध्ये आहे. त्यामुळे माझं फोटोग्राफी, इलस्ट्रेशन्स इ. विषयातलं सुद्धा ट्रेनिंग मिळालेलं आहे. पण ह्या दोन्ही कोर्सेस मधे कार्टूनिंगचं प्रशिक्षण मात्र कुठेही नाहीये. जरी मला illustration, designing हे सगळंच येत होतं. तरी मला खरा इंटरेस्ट पॉलिटिकल कार्टून्स काढण्यातच होता. मी ग्रॅजुएट होण्यापूर्वी देखील मी पॉलिटिकल कार्टून्स काढलेली आहेत. एकदा कॉलेज मध्ये असताना मी मायावती आणि bjp बद्दल मी एक कार्टून काढलं होतं. ते मी एक पेपरच्या संपादक कडे घेऊन गेले. तेव्हा तो म्हणाला की कार्टून तर खूप चांगलं आहे पण आता छापायला उशीर झालाय. पुढे तो म्हणाला की कधी गरज असली तर कळवेन - पण त्याच्याकडून कधी बोलावणं आलंच नाही.

तर मग तू काढलेलं व्यंगचित्र पहिल्यांदा कधी छापून आलं ?

कधीच नाही! आजपर्यंत माझं एकही  व्यंगचित्र कुठल्याही वृत्तपत्रात छापून आलेलं नाही! दिल्लीला आल्यावर पण मी अनेक मासिकं आणि न्यूज पेपर्स मध्ये मी प्रयत्न सुरूच ठेवले. नंतर 2011 मध्ये जेव्हा मी आसारामला अटक झाली होती तेव्हा तेव्हा मी त्याबद्दल काही कार्टून्स काढली होती, ती इंडिया टूडे ने त्यांच्या पोर्टल वर प्रकाशित केली. त्यावेळी मी पुन्हा एकदा प्रयत्न करायचं ठरवलं. ह्यावेळी पोटा पाण्याचा सुद्धा प्रश्न होता. मी कितीतरी न्यूज पेपर्स, मासिकं, चॅनेल्सना माझी नवी कार्टून्स पाठवली पण त्यातल्या कोणीही ती नाही म्हणजे नाहीच छापली. मग मला कळलं की काही लोकं माझी कार्टून्स मला क्रेडिट न देता पण छापत आहेत. पण मला हवी तशी माझी ओळख काही तयार नाही झाली.



तुला इंटरनॅशनल अवॉर्ड कसं मिळालं? 
मी सोशल मिडियावर माझं काम पोस्ट करत असे. त्यामुळे माझे बरेच फॉलोअर्स तयार झाले होते. पण तिथूनच मला बलात्काराच्या आणि खुनाच्या धमक्या सुद्धा मिळायला लागल्या. खासकरून आसारामच्या कार्टून नंतर इतक्या धमक्या येत होत्या की मला आणि माझ्या नवऱ्याला 3-4 दिवस घरी बसून राहावं लागलं होतं. पोलिसांकडे गेलो तर त्यांनी मलाच कार्टून्स काढणं बंद करायला सांगितलं. मी अर्थात तसं केलं नाही आणि माझ्या भूमिकेवर खंबीर राहिले. त्यानंतर मला एवढी हिम्मत दाखवल्याबद्दल आणि कार्टून्स काढणं बंद न केल्याबद्दल अवॉर्ड मिळालं. हे अवॉर्ड मिळालेली मी पहिली महिला कार्टूनिस्ट आहे.

तुला अवॉर्ड मिळाल्या नंतर तुझ्या व्यंगचित्रांना मागणी यायला लागली आहे का?
नाही! अजून तरी नाहीच. कधीतरी एखाद्या वेबसाइटवर किंवा पोर्टल वर एखादं चित्र प्रकाशित होतं पण त्याचे कोणी पैसे देत नाही. जरी मी हे आवड म्हणून करत असले तरी मला त्याचे पैसे का मिळू नयेत? एखाद्याचं काम फुकट उचलण्याची मेंटॅलिटिच वाईट आहे.
पण काही काळ तुझं जे ट्रोलिंग होत होतं ते कसं थांबलं? पोलिसांनी मदत केली की लोकांनी मदत केली? 
लोकांनी तर मला खूपच मदत केली. माझ्या मित्रांनी आणि फॉलोवर्स ने सुद्धा सपोर्ट केलं, ते माझ्या वतीने भांडले, शिव्या पण खाल्ल्या. नंतर मी दिल्लीत पोलिस, सायबर क्राइम आणि विमेन कमिशन तिन्हीकडे तक्रार केली. पण नंतर जेव्हा आसारामच्या मुलाला अटक झाली त्यानंतर हळूहळू ट्रोलिंग कमी होत गेलं. पण आसारामचं संपलं तर आता bjp वाले ट्रोलिंग करतात. सुरुवातीला मी चक्क भीतीने थरथर कापत असे .

 पण आता मला कळलंय की लोकांना असं ट्रोल करणं ही त्यांची 9 ते 5 ची नोकरी असते. पोटापाण्याचा व्यवसाय असतो. कधी तर अशीही लोकं भेटतात की जी कॉमेंट्स मध्ये शिव्या देतात पण मग वैयक्तिक मेसेज पाठवून मला ब्लॉक करायला सांगतात. पण मी काही लक्ष देत नाही.आता मला अशा माणसांची मला फक्त कीव येते. अगदी शिकली सवरलेली माणसं सुद्धा ‘एका नाईटचे किती घेते’ अशा टोकाच्या असभ्य भाषेत बोलतात. कदाचित लोकांची सेनसीबलिटीच संपत चालली आहे.
तुझ्यात ही कमिटमेंट कुठून येते?
हे मला वाटतं आपली जडणघडण आणि आपले स्वतःचे विचार ह्या दोन्हींच्या मिक्सचर मधून येतं. मी माझ्या विचारांना पटेल असं काम करण्यासाठी जशी हिम्मत दाखवली तसंच माझ्या नवऱ्याच्या प्रोत्साहनामुळे सुद्धा ते शक्य झालं. लहानपणा पासून माझ्या वडिलांनी प्रश्न विचारण्याची खूप चांगली आणि महत्वाची सवय लावली आहे. ते म्हणतात, एखाद्या माणसाने जर आपल्याला एखादं काम करायला सांगितलं तर त्याला आधी “का?”विचारायचं! “मी हे काम केल्याने काय होईल?” हा विचार करायला मी त्यांच्यामुळे शिकले. माझे वडील म्हणायचे की कोणाला घाबरायचं नाही. कोणी आपल्यावर हल्ला केला तर आपण पण त्याला धरून मारायचं! छेडछाडीला अजिबात घाबरायचं नाही. मान वर करून चालायचं.
माझा मोठा भाऊ माझ्यासाठी रोल मॉडेल आहे. तो माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. आमच्या आई वडिलांनी सुद्धा आमच्यात लहानपणापासून कधी भेदभाव केला नाही. आमच्यातल्या कलांना कायम प्रोत्साहन दिलं. उदा. लहानपणी शाळेत पेपर लिहून झाला की मी त्याच्या मागे चित्र काढायचे. पण ते पेपर बघून माझे बाबा मला कधीच रागावले नाहीत. वडिलांनी मला कायम मदत केली आणि प्रोत्साहन दिलं, आर्ट कॉलेजचा खर्च पण भरपूर असतो आणि आमचे आईवडील काही श्रीमंत नव्हते. तरीपण त्यांनी मला खूप चांगलं मनासारखं शिक्षण घेऊ दिलं,पूर्ण मोकळीक दिली. माझ्यावर खूप खर्च होतोय असं मला कधी जाणवू दिलं नाही.
तुझा आवडता व्यंगचित्रकार कोण आहे?
अर्थातच आरके लक्ष्मण! माझी त्यांना भेटायची पण खूप इच्छा होती, पण ते काही जमलं नाही. पण मला असंही वाटायचं की त्यांचा जसा कॉमन मॅन होता तशी एखादी कॉमन वुमन का नाही, कॉमन गर्ल का नाही? सबकॉनशीयसली माझ्याही मनात ते राहिलेलं असणारच.कदाचित त्यामुळेच माझ्या व्यंगचित्रात एक कॉमन गर्ल दिसते.
तू व्यंगचित्रांचे विषय कसे ठरवतेस?
विषय आजूबाजूच्या घटनांवरूनच मनात येतो. आसपास असे बरेच इशूज आहेत ज्याच्याबद्दल पुरेसं बोललं जात नाही किंवा दुर्लक्षित होतात अशा विषयांवर कार्टून्स काढायला मला आवडतं.पावरफुल माणसांवर अन्याय झाला तर सगळेच सपोर्ट करतात. न्यूज चॅनेल्स तर असं वागतात जसं काय त्यांना जेवणच जात नाहीये. पण समजा एखाद्या गरीब माणसाच्या मुलीवर बलात्कार झाला, खून झाला तर? कुठेतरी एखादी बातमी आली तर येते. शेतकऱ्यांवर किती बातम्या येतात? अशा विषयांवर मी कार्टून्स काढते.
पण सध्या मी कार्टून्स करणं थोडं थांबवलं आहे. कारण पूर्वी जेव्हा कॉँग्रेसच्या काळात मी कार्टून्स काढायचे तेव्हा त्याचा काहीतरी परिणाम दिसायचा, चर्चा तरी होताना दिसायची. पण आता कोणाला काही फरकच पडत नाही. कार्टून्स काढून काही उपयोगच नाही. शिवाय सध्या मला फार वेळ पण नसतो. एक प्रकारे निराशा वाटायला लागली आहे - असंच म्हणावं लागेल. कोणी काही नियम पाळत नाही, काम करत नाही, सध्याच्या पॉलिटिक्सला काही अर्थच नाहीये.सध्या मी एनिमेशनचं फ्रीलान्स काम करते. त्या असाइन्मेंट्स सुरूच असतात. व्यंगचित्र काढणं खूप कमी झालंय.पण मी माझी वेबसाइट बनवली आहे. http://www.karnikakahen.com/

कनिकाचे TEDTALK पुढील लिंक वर पहाता येईल - https://www.youtube.com/watch?v=tdQyve6qlyE







Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form