निवडणुका जाहीर झाल्या आणि आमचे धाबे दणाणले. तरी स्टाफची पुरुष मंडळी काहीशा उपरोधाने म्हणाली , ‘लेडीज लोकांच्या ड्युट्या नाही लागत , फक्त नावाला प्रशिक्षण देतात . मग राखीव म्हणून बसवून ठेवतात .’ त्याचा काही लेडीजना राग आला. कारण त्यांनी याआधी विधानसभा , लोकसभाच काय पण अगदी पंचायत समितीच्याही निवडणुकात ड्युटी केली होती. त्यावरून आरामात अर्धा तास त्यांच्यात बाचाबाची झाली. आम्ही [म्हणजे मी ]अगदी नवीनच असल्याने भांबावल्या होतो. निवडणुकीच्या सुरस आणि सरम्य कथा आम्ही आजवर अनेक ऐकल्या होत्या मात्र प्रत्यक्ष अनुभव मुळीच घेतला नव्हता. युद्धकथा आपण वाचल्या असतात पण कधी युद्धावर प्रत्यक्ष कधी गेलो नसतोच . त्यापैकीच हे !
त्यामुळे प्रारंभापासूनच आमचं धाबं दणाणलं होतं. त्यातच इलेक्शनचं प्रशिक्षण आहे असं पत्र मिळालं.
त्याबरोब्बर –
‘अरे काय नाय होत. जायचं; काय सांगतात ते ऐकायचं आणि त्यांनी दिलेलं पुस्तक घरी आणून अभ्यास करायचा.’ असं एका सहकाऱ्याने सांगितलं.
‘आपल्याला काही करावं लागत नाही म्याडम , फक्त डबा आठवणीनी सोबत न्या. ते लोक निस्त्या चहावरच साजरं करतात ट्रेनिंग !’ असा दुसरा सल्ला .
‘ट्रेनिंग तीन वाजता आहे. तुम्ही किती वाजता पोहोचाल तिथे’ ? एक अनुभवी , बेरकी प्रश्न .
‘अं ? मी पावणेतीन पर्यंत अगदी नक्की टच होईन .’ आमचं [म्हणजे माझं ] घाईत , घाबरून दिलेलं उत्तर .
यावर ऊर्ध्व लागल्यासारखे डोळे करून आणि एक नि;श्वास टाकून ते अनुभवी –
‘साडेतीन च्या आधी नका जाऊ. कोणी नाही येत. केर काढायला बोलावलं आहे का ?’
असं म्हटल्यावर आपण काय उत्तर द्यायचं ? निमूट मान डोलावली.
ठरल्यानुसार प्रशिक्षणासाठी गेल्यावर [अगदी सव्वातीन वाजता ] आजूबाजूला पाहिल्यावर अधिकच न्यूनगंड आला. सगळे एका अजब सांकेतिक भाषेत बोलत होते.
व्ही.व्ही.पॅट , सी.यू . बी. यू. पी.आर.ओ.
काहीही समजायचं कारण नव्हतं. आता रडू येईल असं वाटलं. तेवढ्यात आमच्याकडे पाहून एका सहृदय दिसणाऱ्या काकू टाईप बाईंनी विचारलं –
‘ट्रेनिंगसाठी आलात नं ? ‘ काकू
‘हो..हो !’ आम्ही
‘कशाचं ट्रेनिंग ?’ काकू
‘इलेक्शनचं..’ आम्ही
‘नाही , नाही...म्हणजे कशाचं ? ‘ काकू
‘निवडणूक आहे नं , त्याचं ‘ आम्ही
[काकू , आमच्याकडे गॉन केस आहे असं बघत ] ‘म्हणजे , काय म्हणून ? कोणती पोस्ट ?’
‘अं , माहित नाही. पण शाई लावायचं काम मिळवायचं असेल तर काय म्हणायचं ? ‘ आमचा पुन्हा एक अजागळ प्रश्न
‘तुम्हाला पत्र मिळालं असेल नं ?’ काकू
‘हो..हो...हे बघा...’ आम्ही पत्र देतो.
‘तुम्ही तर पीआरओ आहात म्याडम !’ काकू
‘निवडणुकीत पिआरओ चं काय काम ? उमेदवार तसाही पब्लिकशी संवाद साधतातच ना...!’ आमचा आणखी एक अजागळ बॉल .
‘अहो पीआरओ म्हणजे केंद्राध्यक्ष ! तुम्ही केंद्राध्यक्ष आहात .’ काकू बोलल्या
‘काय ? अहो पण मला काहीच येत नाही. मी या आधी इलेक्शन ड्युटी नाही हो केली. ‘ रडकुंडीला येऊन आम्ही .
‘त्यासाठीच तर ट्रेनिंग देतात ना ? घाबरू नका . ‘ काकुंचा आवाज आकाशवाणीतल्या घरसंसार वगैरे कार्यक्रमात आलेल्या पाहुण्या , ‘बरं का मैत्रिणींनो , आज आपण मटार प्याटीस करणार आहोत...’ सारखा ऐकू येऊ लागतो.
ट्रेनिंग सुरु होताच एक अलिखित नियम असल्याप्रमाणे एक बाई हातात कागद घेऊन फिरतात.
‘आपल्या नावासमोर सही मारा...’ असा आदेश देतात. त्यानुसार सगळे सही ‘मारतात’ !
मग सर्वांना एक पुस्तक दिलं जातं. हीच ती मार्गदर्शिका . आणि बघता बघता ते पुस्तक या सर्व कार्यक्रमात प्रमुख पात्रांच्या बरोबरीने वावरू लागतं.
प्रशिक्षण देण्यासाठी आलेले गृहस्थ , आल्या आल्या विचारतात.
‘कोण कोण नवीन आहेत ? ‘
माझ्यासह चार पाच हात आणखी वर होतात. म्हणजे एकूण सहा सात लोक नवीन आहेत तर या वर्गात ! मला जरा समाधान वाटतं. आणि बाकीचे चाळीसच्या
संख्येतले लोक चक्क मुरलेले. अशावेळी आणखी एक अडचण अशी असते की ते अनुभवी लोक काहीही ऐकत नाहीत. काही फोनवर क्यांडी क्रश खेळतात. काही फोनवर बोलत बोलत बाहेर जातात तर काही चक्क आपसात बोलत रहातात. नवीन लोक काहीच्या काही प्रश्न विचारतात.
उदाहरणार्थ - ‘सर जर समजा मतदान सुरु असताना लाईट गेले तर ?’
इथे अनुभवी लोकांचं गडगडाटी हास्य ... ‘जाऊ द्या ...मतदानाचं कोणतही यंत्र विजेवर चालणारं नाही.त्यामुळे त्यात बाधा येणार नाही. ‘
दुसरा प्रश्न , ‘सर मी थर्ड पोलिंग ऑफिसर आहे , समजा एखाद्या व्यक्तीला तर्जनी नसेल तर , शाई कुठं लावायची ?’
यावर पुन्हा वर्गात हशा. मग ते मार्गदर्शक – ‘ हे बघा , तर्जनी नसेल तर इतर बोटं चालतील किंवा अगदी हात तुटला असेल तर दुसरा हात चालेल किंवा एखादेवेळी अपघातात दोन्ही हात गमवावे लागले असू शकतात तेव्हा दंडापर्यंत च्या भागावर शाई लावता येते.’
तेवढ्यात चहा येतो. सगळे चहा पिऊ लागतात. चहा खरं तर दहा मिनिटात प्यायची सुट्टी द्यायला हवी असते. पण लोक दहा मिनिटांचा अर्धा तास लावतात म्हणून वर्गात जागेवर चहा दिला जातो. त्यावरून प्रशिक्षणार्थी कितीही चतुर असले तरी प्रशासन त्यांना नीटच ओळखून आहे हे लगेच लक्षात आलं.
हस्तपुस्तिका दिली तिचा रंग योगायोगाने पिवळा होता. त्यामुळे कोणत्याही प्रश्नावर पुढचे मार्गदर्शक सतत तिचा उल्लेख करू लागले. जसं की ,
‘सर , व्हीव्हीपॅट, सी यू आणि बी यू ची जोडणी आपल्याला वेळेवर नाही आठवली तर ? ‘
मार्गदर्शक – ‘हे बघा , नवीन लोकांनी घाबरून जायची काहीही गरज नाही. तुम्हाला जे ‘पिवळं पुस्तक’ दिलं आहे , त्यात सगळं लिहून आहे. काय करायचं , कसं करायचं , काय करू नये , कशाने काय होईल ...वगैरे सगळं जर तुम्ही पिवळ्या पुस्तकात वाचून काम केलंत तर पहिलीच वेळ असली तरी फार टेन्शन येणार नाही.’
यावर मागे बसलेली तमाम प्रजा तोंड दाबून खुदुखुदू हसू लागते. नव्या लोकाना त्याचा अर्थ जवळजवळ प्रशिक्षण संपल्यावर कळतो. मग काय बाई वाह्यातपणा ...अशी एक प्रतिक्रिया मनात उमटते. झालं.
इतकं झाल्यवर देखील मनात अंधुक आशा असते की आपला नंबर नाहीच लागणार . राखीव म्हणून बसवून ठेवतील. मात्र तसं होत नाही. नंबर लागतोच. त्यात लेडीजबायांना गावातच केंद्र दिली जातात. ती थोडी लांब असली तरी अगदीच बाहेरगावी पाठवत नाहीत. हे समाधान.
आमचा [म्हणजे माझा ] नंबर लागतो ते तसं बरंच आतल्या भागात असलेलं केंद्र. एका मोठ्या शाळेत जवळजवळ सहा ते सात वर्गखोल्या आणि त्यात प्रत्येकी एक केंद्र.
तीन मतदान अधिकारी , एक केंद्रप्रमुख या टीम मध्ये एक स्त्री अधिकारी असतेच. घाबरण्याचं काही कारण नसतं. कारण सगळे सहकार्य करणारे असतात. शाळा परिसरात भरपूर गर्दी असते. महिला पओलीस असतात . शिवाय प्रत्येक वर्गखोलीतल्या एकेक स्त्रीला मोजलं तरी बऱ्यापैकी स्त्रीवर्ग उपस्थित असतो. दुसरं असं की एकदा केंद्र नीट लावून झालं की ती मंडळीच स्त्रीवर्गाला ‘म्याडम , तुम्ही जा घरी , उद्या सकाळी या पावणेसहा पर्यंत असं सांगून देतात. ‘
त्यामुळे ;मोकळेपणाने त्यांनाही बर्मुडे , लुंग्या घालता येतात, फिरता येतं. शिवाय सगळेच सहकार्य करणारे , समजदार असतात. त्यामुळे फार त्रास होत नाही. हे तितकंच खरं आहे. त्यानुसार संध्याकाळी स्थानिक स्त्री वर्ग आपापल्या घरी परततो. दुसऱ्या दिवशी भल्या पहाते पुन्हा केंद्रावर हजर !
खरी गंमत प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी .
प्रत्यक्ष मतदानाला , उमेदवारांची माणसं , मतदार प्रतिनिधी म्हणून येऊन बसतात तिथून खरी मजा सुरु . त्या प्रतिनिधित देखील एखादा अनेक वर्षांचा अनुभवी सापडतो तर एखादा पाहुया काय थ्रील आहे...असं म्हणून नव्यानेच आला असतो आणि बघता बघता त्याचा सगळा उत्साह संपत जातो.
अमुक एक नाव आपल्या यादीत स्थलांतरीत म्हणून दिसतं आणि आपल्या समोर ती व्यक्ती मात्र उभी असते. त्यावरून दुसरा सहकारी सांगतो – ‘हे तर काहीच नाही म्याडम , मागच्या लोकसभेत माझ्या यादीत एकाचं नाव मयत म्हणून लिहिलं होतं आणि तो माझ्या समोर मतदानाला उभा होता. आता बोला ! ‘
तेवढ्यात बाहेर रांगेत कल्ला ऐकू येतो. चौकशी केल्यावर मतदारांचा असंतोष जाणवू लागतो. कुठल्याशा मतदार केंद्रावर म्हणे कोणालाही मत द्या ते एका विशिष्ट उमेदवारालाच जात आहे.
आता आली का पंचाईत ! मग प्रत्येक उमेदवाराला , ‘हे बघा काका , मत दिल्यावर सात सेकंद वात बघा , ह्या चौकोनात तुम्ही ज्याला मत दिलं ते चिन्ह दिसेल. ते नाही दिसलं किंवा भलतंच चिन्ह दिसलं तर जरूर सांगा .’ असं सांगावं लागलं. मत देऊन आपल्या इष्ट उमेदवारांचं चिन्ह पाहून आनंदाने मतदाराला जाताना पाहणं याहून मोठा आनंद नाही हे त्यादिवशी लख्ख कळू लागतं.
सर्वात जास्त उपद्रव तरुण मुला मुलींचा , ज्येष्ठ नागरिक आणि मतदानाला तीर्थपान करून येणाऱ्या शूरवीर मद्यपींचा ! त्यातही जर तरुणाचं पाहिलं मतदान असेल तर अधिकच. काय काय कल्पना मनात घेऊन ही मुलं मतदानाला येतात देवजाणे. मात्र मत दिल्यावर आणि मतदाना आधी त्यांची सेल्फी सेशन्सच संपत नाहीत. आधी मतदान केंद्रावर आलोत म्हणून आणि मग बोटाला शाई लावल्याचा फोटो.
एका मुलीने तर मतदान केंद्रातच शाई लावताना सेल्फी घेऊ का म्हणून विचारलं. तेव्हा सर्वांनी डोक्यावर हात मारून तिला बाहेर पाठवलं. बिचारीला कायदा सांगून उपयोग नव्हता आणि आम्हाला तितका वेळाही नव्हता.
म्हाताऱ्या लोकांना ओळखपत्र मागितलं की त्यावर रेशनकार्ड , आधारकार्ड , एसटी बसची अर्ध्या तिकिटाची गोष्ट इतकं सगळं पहायला आणि ऐकायला मिळे .
एक आजी मतदानाला आल्या , त्यांच्या मागेच आजोबा होते. आजींचं नाव आजोबांच्या शंभरेक नाव आधी होतं . त्यावरून त्यांनी बोलायला सुरुवात केली.
‘माझा नाव आधी लिवले नं त्याहीचं इतक्या लांब काऊन टाकले जी , तुम्हाले मालूम नाय का , ते आमच्या घरचे हो म्हनून ? ‘ इति आजी
‘अहो आजी , ही यादी आम्ही नाही करत , तुमची नोंदणी तशी झाली असेल...’ इति आम्ही
‘तरी पन , अजब कारभार रायते तुमचा. पुढल्या विलेक्शनले आमचं नाव एवड्या लांब नको लिवा जी सायेब...’ इति आजी
यावर सर्वात मोठी कडी म्हणजे आजोबा !
‘हो तं , नाव लांब रायला म्हनून का होते ? मी हितं तुह्या मांगं हाओच ना ? च्यामारी अजब बाई आहे जी हे ...’ इति आजोबा. तेवढ्या वेळात केंद्रभर हशा पिकतो. आजी देखील हसू लागतात.
मतदानाला तारेत आलेली मंडळी पण आपल्या अंतरीच्या नाना कला दाखवून जातात. पोटात थोडं औषध गेलं की फाडफाड इंग्रजीतून बोलू लागणं , राज्य कसं चालवावं , सरकार कसं &^%$# आहे हे सर्वांना सांगणं शिवाय अमुक पक्षाने तमक्याला उमेदवारी देऊन आपल्याच पायांवर कसा धोंडा मारून घेतला आहे हे स्पष्ट करून सांगणं हे सर्व त्यांच्या घसरत्या जिभेच्या आणि तोल ढळत्या देहाच्या सहाय्याने ऐकत रहाणं म्हणजे अवघड काम आहे. पोटात द्रव्य असल्यावर मतदान करायचं नि मग शुद्ध आल्यावर पुन्हा केंद्रावर यायचं ...आपलयाला पुन्हा संधी द्यावी अशी विनवणी करायची हे निव्वळ थोर होतं.
चहा आणून द्यायला कोणी नाही , मतदान केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात कोणतेही दुकान नसावे म्हणून काही खायला मिळण्याचा संभाव नाही. जेवण मागवलं तर दुप्पट किमतीत मिळेल पण जेवायला वेळ नाही. आपापले डबे टेबलावर ठेवा आणि एकेक घास खाता खाता मतदारांना अटेंड करा. पाणी प्या मात्र पाय मोकळे करायला किंवा निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला उठायला वेळ नाहीच. त्यातही पुरुष मंडळी चटकन उठून कार्यभाग उरकून घेतीळी मात्र स्त्रीयांना , प्रसाधनगृहाच्या दाराला कडी नाही हे आठवूनच गोठल्यासारखं होणार ! हे सगळं आत्ता आठवलं तरी धडकी भरतेय मात्र तेव्हा ते कोणत्या जोमात पार पडतं देव जाणे.
इतकी मोठी यंत्रणा असते. किती तरी महिने आधीपासून काम सुरु असतं. अविरत राबत असतात लोक . गर्भवती- बाळंत स्त्रिया आणि फार गंभीर आजार किंवा अगदीच एक्गादा जन्म किंवा जवळचा मृत्यू ह्या कारणांशिवाय ड्युटीतून सूट मिळत नाही. तरीही काही लोक आपल्या ओळखी काढून ती मिळवतात. मात्र ज्या मोठ्या संख्येने संवेदनशील भागातही लोक काम करतात. लोकशाही टिकावी म्हणून , तिच्यावर विश्वास वाढावा म्हणून...त्या आपल्या मोठ्या देशात मतदारांची अनास्था किती मोठी आहे !म्हातारी माणसं आणि तरुण मंडळी सोडली तर जबाबदार प्रौढ मतदारांची संख्या फार कमी होती हे कशाचं लक्षण ? आपल्या पक्षाच्या उमेदवारांबद्दल स्थानिकांच्या मनातली प्रचंड नाराजी राजकीय पक्षांना दखलपात्र गोष्ट का वाटत नाही ?
मतदाराणे एक मत दिल्यावर त्याला आपलं मत पुन्हा बदलवता येत नाही. मग ज्याला मत दिलं तो आपला पक्ष सोडून दुसरीकडे जातो किंवा पाठींबा देतो यात मतदाराचा विश्वासघात नाही का ? याबद्दल उमेदवार विचार का करत नाहीत ?
आणि इतका सावळा गोंधळ पार पाडून ; आपली कामं चोखपणे पूर्ण करून एक निकाल आयोगासमोर दिल्यावर महिना होऊनही आपल्याला स्थिर सरकार मिळू नये हा सर्वात मोठा विनोद कोणत्या पेपरात छापायचा ?
मतदान केल्यावर महिनाभर चाललेला तमाशा पाहून त्यावर पांचट विनोद फोरवर्ड करणारा मतदार राजा मूर्ख नाही का ? हे आणि असे अनेक प्रश्न मनात घेऊन आता आमच्यासारखा चाकरवर्ग आता जनगणनेच्या ड्युटीकडे डोळे लावून बसलो आहोत. नवस बोलतो आहोत की नाही आली जबाबदारी तर बरं. कारण तिथं देखील भर उन्हात वणवण भटकून दारं थोठ्वायाची आणि मुलं किती ? घरात सदस्य किती आणि त्यांची वयं काय विचारल्यावर शिव्या खायच्या , तोंडावर दारं मिटली तरी गोष्टीतल्या कावळ्यासारखं दार उघड म्हणत तिष्ठत राहायचं. हे करायचं आहेच.
अज्ञान , अजाण नागरिक , प्रत्येकवेळी कोणत्याही जबाबदारीतून अंग काढून घेणारे चतुर नोकरदार , आपली पोळी शेकून घेणारे राजकीय पक्ष आणि मान मोडून काम करणारे , शिव्या खाणारे , कारवाई सोसणारे प्रामाणिक कर्मचारी !
यात देश फक्त त्या मुठभर लोकांच्या जीवावर सुरळीत सुरु आहे असं म्हटलं तर देखील मोठा विनोद झाल्यासारखे सात मजली हसाल तुम्ही... ! तुमचं काय जातं हसायला !

माधवी भट
हिंदी,मराठी व बंगाली साहित्याच्या अभ्यासक, कवयित्री, नाटककार
हिंदी,मराठी व बंगाली साहित्याच्या अभ्यासक, कवयित्री, नाटककार
येस..लाखमोलाचा प्रश्न!
ReplyDelete