महत्त्वाची विनोदी सामग्री


कमला भसीन यांनी संपादित केलेल्या स्त्रीवादी व्यंगचित्रांच्या पुस्तकाची शुभांगी थोरात यांनी करून दिलेली ओळख 

२००३ साली ‘जागोरी’ ह्या महिलांच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या संस्थेच्या वीसाव्या वर्धापनदिनी जेष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या, लेखिका, समाजशास्त्रज्ञ कमला भसीन आणि त्यांची सहकारी चित्रकार बिंदिया थापर (बिंदिया थापर यांचं २०१४ साली कर्करोगाने निधन झालं, पण कर्करोगग्रस्त असूनही त्या फार आनंदाने आणि उत्साहाने शेवटपर्यंत काम करीत राहिल्या) या दोघींनी ‘लाफिंग मॅटर्स’ या छोटेखानी पुस्तकाच्या माध्यमातून अनेक विनोद, व्यंगचित्रं आणि इतर विनोदी साहित्य प्रकाशित केलं. पुस्तकाच्या शीर्षकातच श्लेष साधला गेलाय. कमला भसीन यांनी त्यांच्या संपादकीय नोंदीत म्हटल्याप्रमाणे जगभरातल्या विनोदी लेखिका, व्यंगचित्रकार या सगळ्यांनी निर्मिलेली ही सगळी विनोदी सामग्री या अर्थी ‘लाफिंग मॅटर्स’ आहेच, पण विनोदाला, हसण्याला बायकांच्या दृष्टीने फार महत्त्व आहे त्याअर्थीही ते ‘लाफिंग मॅटर्स’ आहे. कारण प्रखर अशा स्त्रीविरोधी आणि पितृसत्ताक वातावरणात झगडतांना विनोदाच्या बळावरच बायका सगळं काही निभावू शकतात, ताणतणावाला तोंड देऊ शकतात.
सगळ्याच राजकीय विनोदांप्रमाणे या स्त्रीवादी विनोदांनाही एक रागाची, कडवट भावनांची, उपरोधाची, पूर्वग्रहांची किनार आहे आणि ते अत्यंत साहजिक आहे. पण या पुस्तकाची सुरूवातच स्त्रीवाद्यांवरच्या विनोदांनी झालीय. स्वतःवर विनोद करणं हे फार मोठं मानसिक सामर्थ्य मानलं जातं. त्यामुळे या पुस्तकातले विनोद हे किती खिलाडूपणाने केलेले आहेत याची साक्ष सुरूवातीलाच पटते. आजूबाजूला पोरं गोंधळ घालताहेत, कामांच्या बोज्याखाली शिणलेली बाई लादी पुसतेय आणि एक छान टापटीप बाई तिला आपली ओळख करून देत विचारतेय, “मी स्त्रीवादी कार्यकर्ती म्हणून काम करते आणि तू?” हे व्यंगचित्र अशा विनोदांचं एक उदाहरण.
पितृसत्ताक तर्कदुष्टता, स्त्रीवादी तर्कशास्त्र, पुरूष, स्त्रिया आणि काम इ. प्रकरणांचे मथळे पाहिले -  तर त्या त्या विभागातल्या विनोदांची जातकुळी लगेच कळते. पितृसत्ताकातली तर्कदुष्टता असो की स्त्रीवादी तर्कशास्त्र, स्त्रीपुरूष आणि कामाची पारंपरिक वाटणी असो की प्रेम आणि लग्न यातला संबंध असो त्यातले गैरसमज, पूर्वग्रह, विचारातल्या त्रुटी हे सगळं विनोदाच्या सहाय्याने समोर येतं तेव्हा जखमांवर फुंकर घालणं आणि त्याचवेळी अतिरेकी विचारसरणीतला धोका जाणवून देण्याचं काम आपोआप होतं. उफाळणाऱ्या भावनांना आवर घालीत, परिस्थितीवर नियंत्रण आणू शकण्याच्या विनोदाच्या सामर्थ्याचा इथे पुरेपूर फायदा घेतलाय.
नाचता नाचता एक पुरूष सर्वांना सांगतोय “आता आपण सर्वांनी कपडे काढून टाकूया- अर्थात माझी बायको सोडून सर्वांनी”
तशीच “ मी स्वयंपाक करू शकते तसाच कुठलाही पुरूष स्वयंपाक करू शकतो, कारण मी काही माझ्या गर्भाशयाने स्वयंपाक करीत नाही.” असं बजावणारी स्त्री किंवा
“चांगल्या मुली स्वर्गात जातात. बाकीच्या मुली त्यांना वाट्टेल तिथे जाऊ शकतात.” अशा वेगवेगळ्या विनोदांतून वेगवेगळ्या गंभीर विषयावर एक भाष्य केलं जातंय.
याशिवाय खुदकन् हसू फुटावं अशा शाब्दिक कोट्याही आहेत. लैंगिक विषयावरचे मनमोकळे विनोद आहेत. विवाहसंस्थेची खिल्ली उडवणारे विनोद आहेत. लहानपणापासून ते विवाहसंस्थेच्या जाचात अडकून मुलाबाळांच्या व्यापात गुंतून स्वत्व हरवण्यापर्यंतच नव्हे तर म्हातारपणापर्यंत सामान्य स्त्रीच्या आयुष्यातले सगळे टप्पे आणि त्यातलं गर्भित शोषण, लैंगिक व्यवहारातलं अज्ञान, त्यातला बंदिस्तपणा, स्त्रीपुरूष नातेसंबंध, कामाची वाटणी हे सगळं इथे विनोदाच्या माध्यमातून मांडलं गेलंय. विनोदाचा आधार घेतल्याने या विषयांमधली विचित्र गोंधळाची, अस्वस्थतेची, अवघडलेपणाची भावना टाळता येत विषयाला भिडता येतं.

अर्थातच यातले सर्वच विनोद स्त्रीवादाशी संबंधित आहेत असं नाही. काही निखळ विनोदही आहेत. कारण यामागचा उद्देश हा बायकांना खळखळून हसायला लावण्याचा आहे. एक आनंदी स्त्री आपलं आयुष्य आपल्याला हवं तसं जगू शकते हा विचार त्यामागे आहे. त्यामुळे नक्की वाचा, हसा आणि आनंदाने जगा.



Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form