घरगुती अध्यात्म...

कालचीच गोष्ट. संध्याकाळी पाचच्या सुमाराला फिरायला बाहेर पडले.मी भरपूर फिरते.जाताना जाड असले तरी येताना बारीक असते.वाटेत त-हेत-हेची जाड बारीक माणसं भेटतात.कधी हसतो कधीबोलतो...कधी अंतर्मुख्‍ होतो.सगळं क्रमाक्रमाने सुरूच असतं.

बघता बघता दोन पिंपळाची, एक गुलमोहराचं झाडं मी मागं टाकलं.मग एक मोठठं वळण आलं.तिथे एक मोठठं वडाचं झाड दिसलं.याला एवढया पाटया लटकलेल्या असतात की याला पाटयांच झाड असचं म्हणावसं वाटतं.जेवणाचे डबे मिळतील,घरघंटीवर पीठ दळून मिळेल,ताजे गोमूत्र मिळेल,पिको, फॉल,सर्व प्रकारच्या बांगडया व शिकवणी मिळेल.मेतकूट व शुध्द शाखारी जेवण मिळेल. अशा चित्रविचीत्र पाटयांनी तो बहरलेला आहे. वारा आला की पानं हलत नाहीत,पाटयाच हलतात. तर काल मी एक विचीत्र पाटी बघितली आणि थबकले."आमच्या इथे रोज घरगुती अध्यात्म करून मिळेल." घरगुती अध्यात्म?? मला अध्यात्माचा एकदम घमघमीत वास आला. म्हटलं बघुया तरी काय ते..म्हणून पुढे गेले... बघते तर...एका छोटयाशा कौलारू घरा समोर मंडप टाकलेला होता. छोटसं कढईच्या आकाराचं अग्नी कुंड धगधगत होतं.रसरसलेल्या निखा-यांवर लोकं भक्ती भावाने जिरं मोहरी हिंग टाकत होते. “कांदा लसुण वर्ज्य” असा बोर्ड लिहीलेला होता.सर्व भक्तगणांनी दिलेलं धान्य कडधान्य एका कोप-यात रचूनठेवलं होतं.कोणा गरीबाने दिलेली मीठ पिशवी निमुट उभी होती.

मी जरा पुढे गेले आणि जिरं मोहरी कुंडात टाकली. सवयीने हात जोडले. एका अंगाला चार बायका जिरंमोहरी, जिरंमोहरी असा जप करत टाळ कुटत बसल्या होत्या. चार ओळी झाल्या की “हिंग” म्हणून जयघोष करत होती.मी त्यांच्यात जावून बसले आणि थोडा वेळ जप करून जम बसवला. मग मोहरीचा एक एक दाणा सोडत नाम स्मरण करणा-या एका बाईला विचारलं "हया गुरु माउली कुठल्या आहेत"?

"म्हणजे तुम्हाला माहित नाही ?"तिने जळलेल्या फोडणी सारखा चेहरा केला.

"नाही,मी अज्ञानी आहे."मी कबुल केलं.

"तिकडे उत्तरेकडे अतिशिक्षीत महाराज म्हणून आहेत.त्यांच्या या गुरु भगिनी आहेत.त्यांचे नाव वहिनी महाराज " तिने पुन्हा श्रध्देने डोळे मिटले!
मी वहिनी महाराजांकडे निरखुन बघितलं.स्वयंपाक पूर्ण झाल्या सारख्या त्या निर्धास्त दिसत होत्या.आता फक्त भरायचं बाकी होतं.मोहरीच्या रंगाची ठिपक्या ठिपक्यांची साडी त्या नेसल्या होत्या.जि-याच्या डिझाइनचा हिरवट पोपटी ब्लाउज होता.अध्यात्मात रममाण झालेल्या दिसत असल्या तरी आतून सावध वाटल्या.अध्यात्माचं घोर लक्षण..!

एवढयात एक बाई पुढे आली.तिने तुरडाळीचा एक किलोचा पुडा समोर ठेवला आणि नमस्कार केला.

"माझ्या मुलीचं अजिबात घरी पटत नाही बघा.सगळी जणं तिच्या जिवावर घर टाकून मजेत राहतात.हिच तेवढी कामाला जुपलेली असते.धा माणसं आहेत घरात...काहीतरी उपाय सांगा."

"हे बघा सहा म्हयने जमवून घ्यायला सांगा तिला.मिक्स भाजी करताना आपण वेगवेगळया चवीच्या,आकाराच्या ,रंगाच्या भाज्या एकत्र शिजवून घेतो.तसंच जमवून घ्या."

"आणि मग सहा महिन्यानी परत येवू ?"

"गरज पडणार नाही.(तोपर्यंत तिला सवय झालेली असेल) आम्ही आहोत"

"कुठे?"

"इथेच...म्हणजे तिच्या पाठीशी.." मग एक भरपुर फुलं माळलेली कोकणातली बाई पुढे आली. तिने काजुगराची पिशवी पुढयात ठेवली.

मावली गालात हसल्या, "खूप लांबून आलीस मुली ...बोल काय ते..!"

मुली म्हटल्यावर कुठल्याही बाईला बरंच वाटतं..

"हाली दोन वर्षा आमका कसल्याच गोष्टीत यश नाय.चेडवाचा लगीन जमना नाय.लगीन जमा जमाक मोडता.झिलाक नोकरी नाय!कोणी काय करून शिरा पडला घातला की काय?"

"मोहरी जिरं टाक कुंडात."(तिने चिमुट भर ऐवजी बचक भर टाकलं.हा खकाणा उसळला.)े

"शिरा ...कर रोज..आणि एकवीस मुंग्यांना खाउ घाल.बाकीचा बंदोबस्त मी करीन.तू रोज पिठी भात कर आणि सलग आठ दिवस वेगवेगळया पावण्यांना खाउ घाल."

"वेगवेगळया पावण्यांका?"

"मग काय रोज कोण खातलो पिठी भात..?."

"निस्तो पिठी भात?"

"बरोबर लोणचं नाहीतर भाजलेला बांगडा दे.वारानुसार ठरव काय ते"

"होय, होय तसाच करीन"

"आणि काम झालं की सव्वा पाच किलो तुरडाळ इथे अर्पण करायची."

"म्हणजे होमात टाकूक"

"गप्प बस..ऐकून घे नीट..इथे ..हया जागेवर आणुन ठेवायची ती..ती काय आम्ही सगळी खात नाही. एक पोतंभर जमली की वाटीभर आम्ही अनाथ आश्रमाला देतो.समाज कार्यही करतो.हे तू ध्यानात ठेव."

"होय तर..माझा काय अडाण्याचा..तुमीच धेनात ठेवा म्हंजे झाला..तुमका तेतुर गती आसा."

"बरं..फोडणी दया चरचरीत ..हरे राम हरे कृष्ण....बोला मोहरी जिरं..मोहरी जिरं..मोहरी जिरं हो.."

एवढयात त्यांची दृष्टी माझ्याकडे गेली.त्या प्रसन्न हसल्या.अरे माझ्या कर्मा..तिच्या प्रसन्न होण्याची मला भिती वाटली.

"किती जन्मानी भेटलीस!"
"ऑ?" मी अवाक !

"अग, या जन्माच्या आधी तीन जन्म भेटली होतीस...तू नाही ओळखायचीस..पण मला ही वेगळीच (चमत्कारीक) द्ष्टी आहे .आपली ओळख फार जुनी आहे."

आजुबाजुच्या बायका थकक होवून बघायला लागल्या! बायकाना हे एक बरं जमतं... मग मी पण एक वाडगाभर आदर चेह-यावर पसरून ठेवला.

"हं प्रसाद घ्या".एका फ्रॉकवाल्या मुलीने..फोडणीचा भात आणि रापलेला चहा समोर आणून ठेवला.मी तो खाल्ला नाही, भक्षण केला. माउलीची दृष्टी मजवर रोखलेली होतीच.

प्रसाद घेतल्यावर मी म्हटलं,"बरं वैनी महाराज येवू मी आता?"

"ये आणि याच जन्मी ये" त्या हसत म्हणाल्या.
मी सर्व भक्तीणींवर नजर फिरवली. त्या तृप्त आणि समाधानी दिसत होत्या.चेह-यावर भक्तीभाव थबथबलेला होता.जगातली कुठलीही समस्या त्यांना भेडसावत नसावी.खरचं सुखी होण्यासाठी हे असं असणं गरजेचं असतं का?



Image may contain: 1 person
सई लळित 
कवयित्री आणि लेखिका


2 Comments

  1. ही तुमची स्वाभाविक सहजविनोदशैली आवडली,सई.

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form