अगा चप्पल चप्पल



आजकाल काळ एवढा बदललाय,जग एवढं पुढे गेलय,विज्ञानाने भरारी घेतलीय,स्त्री पुरुष समानतेचं वरवर का होईना पण युग सुरू आहे. अशी सर्व चहुबाजुनी भरभराट सुरू आहे.तरी पण आजही मला चप्पल तुटलं की संकटच वाटतं आणि नवीन विकत घेण्याची उलाढाल करणं हे तर महासंकटच!
चप्पल घेण्याचा एक प्रकार म्हणजे सेलमधील चप्पल. एका टेबलवर हा एवढा मोठा ढीग टाकलेला असतो. दोनशे रुपये कुठलीही घ्या...विक्रेता ओरडतो. काही बायका उत्साहाने ढीग उलटापालटा करीत असतात. ती काय भाकरी आहे उलटुन टाकायला...यात चांगलं चप्पल शोधण्यापेक्षा समुद्रात बुडी मारून नवरत्न शोधणं सोपं.
एकदा एका बाईला एक चांगलं चप्पल (तिच्यामते) त्या ढीगात मिळालं. त्याचा जोड ती तासभर शोधत होती. पण तो जोडा घटस्फोटीत असावा.. तो काही मिळेना. एका हातात चप्पल घेउुन तिचं संशोधन सुरुच. मी मधे जाऊन भाजी, फळं, तांदूळ बिंदुळ घेवून आले, तरीही ही अशीच. दुसऱ्या दुकानात शोधा याचा जोड, मी म्हटलं. ती केविलवाणी हसली. मनातून राग आला असेल, येऊ देत. कोणीतरी असं बोलणं अत्यावश्यकच असतं. मला चपलातलं फारसं काही कळत नाही.. पण वेळ मौल्यवान असतो, हे मात्र पक्कं माहिती आहे.
मी शक्यतो तेच चप्पल परत परत शिवून वापरते.पण नंतर चप्पल शिवणारा पुढे पुढे कंटाळतो.नवीन चपलाचा आग्रह करतो तेव्हा जड पावलांनी मी चपलाच्या दुकानात प्रवेश करते.

“काय पायजे?” दुकानदार विचारतो.

पहीला प्रश्न तर एकदम सोपा निघतो.मला शाळेत असल्या सारखं हात वर करून उत्तर दयावसं वाटतं.

"चप्पल"..मी

“कोणती? हिल्स, पॉईटेड हिल्स,फ्लॅट,सँडल्स ???”

अरे माझ्या कर्मा..आता काय सांगावं बरं ..आणि माझ्या सारख्या साध्यासुध्या बाईला एवढे प्रश्न मुळात विचारावेच का?

“हिल्स जास्त नको..किंचीत हिल्सवालं साधं चप्पलच दाखवा."(जमीन आणि पाय यांच्या अवकाशात चपखल बसणारा एक तुकडा,मी मनात मोठयाने म्हटलं)

"किती पर्यंत रेंज सांगा" तो म्हणाला.

आता रेंज कुठून सुरू होते आणि कुठे संपते कुणाला माहित..

“दाखवा तुमी ..मग मी काय ते ठरवते..”

माझ्या या थोर उदगारानी त्याला रेंज कळली असावी. त्याने चार प्रकारच्या चपलाचे जोड समोर टाकले.

"चार नको.एकच घेणाराय" - मी भारावून म्हटलं. दुस-याने माझ्यासाठी जरा काही केलं तरी मला भारावायला होतं.

“घालून बघा, चॉइस करा.”-तो म्हणाला.

मी चप्पल घातलं ..बरं वाटलं. आणि बरं वाटणारच..मी काय तशी आजारी नव्हतेच.

"चालून बघा"

"घरी जावून येवू?" मी निरागसपणे विचारलं

“इथे दरवाजा पर्यंत चाला...”

मी कशीबशी दरवाजा पर्यंत गेले आणि परत आले.सगळयांच्या नजरा एवढया रोखलेल्या होत्या की चप्पल घालून नेमकं कसं वाटतंय ते मला कळेचना. नवरा तर माझ्याकडे एवढं रोखून बघत होता की वधु परीक्षेच्या वेळी सुध्दा एवढं बघितलं नसेल.

"दुसरी घालून बघा" तो माणूस को-या चेह-याने

"नको नको ..ही राहूदेत.."मी

"अग,बघ ना घालून" नवरा म्हणाला.

शेवटी मी दुस-या चपलेत पाय घातले.

"जरा लहान होतेय.".नवरा म्हणाला.

"ही सगळयात मोठी साईज आहे." तो पुन्हा निर्विकारपणे म्हणाला.(अरे देवा, मी राक्षसबिक्षस वगैरे आहे की काय)

"मग पहीलचं बरय” मी म्हटलं.

"पण ते जरा मोठं होतय आणि आता काय जाडी वाढेल ..पण पावलांची लांबी नाही वाढणार" - नवराहसत....(बाहेर बरं हसायला येतं)

“चल मग दुसरीकडे बघु!”

अरे देवा, दुस-या दुकानात परेड परत...

“नको जावू दे हेच बरं आहे.”मी मोठयाने म्हणाले.

बाहेर आवाज चढवल्याचा उपयोग होतो...शेवटी तेच चप्पल घेतलं आणि निघालो.

"असं काय करत होतीस? चप्पल आपण विकत घेणार होतो."

मी काहीच बोलले नाही.मी जांभवडयाला शाळेत जायचे तेव्हा माझ्या बरोबरीची खूप मुलं अनवाणीच चालायची. त्यामुळे असेल कदाचित. लहानपणापासुन चप्पल या गोष्टीकडे कधी चिकित्सक नजरेने बघितलंच नाही. बरं आणि वाईट. पायात दगडधोंड्यापासुन बचाव करायला काहीतरी असल्याचं कारण. खुप वेळ घालुन काहीतरी महागडं वाईट घेण्यापेक्षा पटकन वाईट घेतलेलं बरं. कितीही किमती चप्पल घेतलं तरीही महिन्याभरात काहीतरी प्रॉब्लेम होतोच आणि मग बाई मी खुप उधळी आहे असं वाटतं. त्यापेक्षा.... असो!

Image may contain: 1 person
सई लळित 
कवयित्री आणि लेखिका 


1 Comments

Previous Post Next Post

Contact Form