विनोदाला जात असते काय? मराठी विनोद, कानडी विनोद, पंजाबी विनोद अशी त्याला प्रादेशिकता असते का? भारतीय, जपानी, इंग्रजी आणि अमेरिकन विनोद अशा त्याला राष्ट्रीय सीमा असतात काय? पुरुषी विनोद आणि बायकी विनोद अशी काही गोष्ट असते काय?
माझ्या मते, वरील सर्व प्रश्नांची उत्तरं ‘होय’ अशीच आहेत. सर्वच विनोद सीमाबद्ध असतो, असं माझं म्हणणं अर्थातच नाही. काही विनोद या सर्व सीमांपलीकडचा- केवळ मानवी परिणाम असलेला असतो, याबद्दल वाद नाही; पण बहुसंख्य विनोदाला वरील प्रकारच्या सीमा असतात, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
गेली कित्येक वर्षं पाश्चात्य व्यंगचित्रकलेचा मराठी वाचकांस परिचय करून द्यावा, या हेतूनं मी लेख लिहितो आहे. मला सतत जाणवत आलं आहे की, बहुसंख्य पाश्चात्य चित्रं तिथल्या वातावरणाचा परिचय नसलेल्या मराठी वाचकांना कळणं अशक्य आहे. अन कळली, तरी मनापासून भावणं असंभवनीय आहे. यात नवल मात्र काही नाही.
विनोदकार विनोद टिपतो तोच मुळी त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीतून. ही परिस्थिती देशा-देशांमध्ये, प्रांता-प्रांतांमध्ये वेगवेगळी असणे अपरिहार्य आहे. आणि विनोदकाराची विनोद टिपण्याची दृष्टी घडविण्यात तिचा मोठा हातभार असतो. त्यामुळे बहुसंख्य विनोदाला वर उल्लेखिलेल्या सीमा पडणं साहजिक आहे.
उदाहरणासाठी हे माझं हास्यचित्र:
गिऱ्हाईकाला त्याच्यासमोर म्हशीचं दूध पिळून मिळण्याची सोय पूर्वी कोल्हापुरात सर्रास होती. त्यावर आधारलेलं हे हास्यचित्र. मला त्या गावापुरताच हा परिस्थितीजन्य संदर्भ परिचित होता, म्हणून मला ते सुचू शकलं. हा संदर्भ माहित नसणाऱ्यांना चित्र कळणार नाही.
सभोवतालच्या परिस्थितीच्या सीमा पडतात त्या अशा. हे खरं असेल तर स्त्रियांनी निर्माण केलेल्या साहित्यात त्यांचा म्हणून पुरूषांच्या साहित्यापेक्षा वेगळा ठसा दिसला पाहिजे. पुरुषांचं अनुकरण न करता स्वतःच्या संवेदनक्षम मनाला अनुसरून भोवतालच्या परिस्थितीतून स्फुरलेलं जे लिखाण स्त्रियांनी केलेलं असतं, त्यामध्ये याची तशी प्रचीती येतेही, असं मला वाटतं.
स्त्रियांना विनोदबुद्धी असते का, हा पुरुषनिर्मित प्रश्न ‘स्त्री आणि विनोद’ हे दोन शब्द एकत्र उच्चारले की लगेच केला जातो. स्त्रियांनी केलेलं लिखाण हेच त्याला खरं उत्तर आहे.
अर्थात विनोदबुद्धी असणं, विनोदी लिखाण करणं आणि विनोदी चित्र काढता येणं- या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काही शब्दात मांडता येणं, हीच मुळी कुणालाही जमेल अशी गोष्ट नाही. हे झालं आपल्याला जन्मल्यापासून परिचित असलेल्या शब्दांच्या बाबतीत. चित्र काढता येणं ही तर अत्यंत मोजक्या भाग्यवंतांच्या नशीबातली गोष्ट.
पुरुषाला स्त्रीच्या दृष्टिकोनातून किंवा त्याउलट- स्त्रीला पुरुषांच्या दृष्टिकोनातून लिहिता येईल का? मला वाटतं, केवळ वरवरचं अनुकरण करूनच ते शक्य होईल. ‘बटाट्याची चाळ’ बद्दल त्या चाळीतल्या एखाद्या स्त्रीनं लिहिलं असतं तर ते कसं असेल, असा एक गमतीदार विचार माझ्या मनात केव्हा केव्हा येतो.
यासंदर्भात माझा एक अनुभव सांगतो. ‘मिळून साऱ्याजणी’ साठी हास्यचित्रं काढायचा विचार मी करू लागलो की मला सुचणारे विषय, त्यावरील कल्पना माझ्या मनाला त्या मासिकाशी सुसंगत वाटत नाहीत. ते स्त्रियांच्या प्रश्नांना वाहिलेलं मासिक आहे. केवळ स्त्रियांनीच स्त्रियांसाठी चालवायचं मासिक नसेल; पण शक्यतो स्त्रीचा जगाबद्दलचा दृष्टिकोन त्यातून व्यक्त होणं उचित ठरेल, अशी माझी धारणा आहे.
मात्र त्यानिमित्ताने माझ्या मनात येतो तो एक वेगळाच विचार. स्त्री-हास्यचित्रकारांची आपल्याकडे एवढी वानवा का आहे? एकदा हा विचार मनात आल्यावर- इतक्या वर्षांत आपलं या गोष्टीकडे लक्ष कसं गेलं नव्हतं, याचं मग मला नवल वाटायला लागलं. एकदा हा विचार मनात आल्यावर मी माझ्याजवळचे इंग्लिश, अमेरिकन व काही फ्रेंच व्यंगचित्रसंग्रह या दृष्टिकोनातून पाहिले, तर त्यामध्ये एकही व्यंगचित्रकर्ती नाही! मराठीत तर आठवून आठवून मला चार नावांवर नावंच आठवत नाहीत. प्रशांत कुलकर्णी यांच्या ‘निवडक मराठी व्यंगचित्रे’ या प्रातिनिधिक हास्यचित्रसंग्रहात त्यापैकी दोघींच्याच चित्रांचा समावेश आहे. त्यातल्या मेधा गुळवणे यांची ‘महाराष्ट्र टाईम्स’ मध्ये ‘डोंबिवली फास्ट’ ही हास्यचित्रमालिका काही काळ नियमितपणे येत होती. ती बंद झाल्यावर त्यांची चित्रं क्वचितच दिसतात. कल्पना नान्नजकर या सध्या नियमितपणानं हास्यचित्रं काढतात. त्यांनी सोलापूरच्या ‘संचार’ मध्ये व्यंगचित्रांची सुरुवात केली. पिंकी नावाची एक बालिका प्रमुख पात्र असलेली चित्रमालाही प्रसिद्ध केली. इतरांची चित्रं गेल्या कित्येक वर्षात पाहण्यातही आलेली नाहीत.
तुलनेने कर्नाटकातील चित्र अधिक उत्साहजनक वाटतं. १९९८ मध्ये बेंगलोरमध्ये कर्नाटक कार्टूनिस्ट असोसिएशनच्या वतीने व्यंगचित्रकारांसाठी एक कार्यशाळा भरवली गेली होती. त्यामध्ये त्यांच्या निमंत्रणावरून एक दिवसाचा व्याख्याता म्हणून मी गेलो होतो. कार्यशाळेत सहभागी झालेल्या २५-३० जणांपैकी दहा महिला होत्या आणि त्या उत्साहाने चर्चेत भाग घेत होत्या. त्यातील एक मुलगी मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला होती. व्यंगचित्रकलेत तिला खूप रस होता.
इतर भारतीय भाषांतील वृत्तपत्रांतून कुणा हास्यचित्रकर्तीचं काम पाहिल्याचं आठवत नाही. भारतीय भाषांतूनच कशाला, इंग्रजीतल्या मी पाहिलेल्या असंख्य व्यंगचित्रांतही आजवर कुणा व्यंगचित्रकर्तीची कामगिरी-Anton या सहीनं चित्र काढणाऱ्या स्त्रीखेरीज- आढळली नाही. ती स्त्री असल्याचं मी वाचल्याचं अंधुकपणे आठवतं. पण तिच्या रेखाटनशैलीत आणि दृष्टीकोनात मला पुरुषांपेक्षा कोणताच लक्षात येण्याजोगा फरक जाणवला नाही.
‘पंच’ या जगप्रसिद्ध ब्रिटिश साप्ताहिकाच्या पुरुषप्राधान्यावरील तेथल्या लेखिका आणि व्यंगचित्रकर्त्या कर्मचाऱ्यांच्या तीव्र आक्षेपांचा परिणाम म्हणून २९ मार्च १९७२ रोजी बार्बारा कासलच्या संपादकत्वाखाली निव्वळ लेखिका आणि व्यंगचित्रकर्तींनी विशेषांक सजवला आणि तो गाजलाही. पण त्यानंतर ‘Pick of Punch’ म्हणून निघणाऱ्या ‘पंच’च्या वार्षिक संग्रहातल्या १९८४ सालच्या संग्रहात मला एकही व्यंगचित्रकर्ती दिसली नाही. म्हणजे तब्बल बारा वर्षांत एकही लक्षणीय व्यंगचित्रकर्ती ‘पंच’कर्त्यांच्या दृष्टीनं उदयाला आली नाही? ‘पंचची शंभरी’ (१९५६) या नावाने ‘पंच’चा आधीच्या शंभर वर्षांतील निवडक हास्यचित्रांचा संग्रह प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये Anton वजा करता कुणाही चित्रकर्तीची व्यंगचित्रं नाहीत.
‘मिळून साऱ्याजणी’ च्या पहिल्या अंकात मी ‘Sour Cream’ (आंबट झालेले दूध), या इंग्लंड-अमेरिकेतील हास्यचित्रकर्तींच्या वैशिष्ट्यपूर्ण संग्रहाचा परिचय करून दिला होता. स्त्री-स्वातंत्र्याबद्दल उत्कट भावना असलेल्या आणि म्हणून आजच्या समाजातल्या पुरुषी वर्चस्वामुळे कोंडमारा होणाऱ्या चौघीजणींनी एकत्र येऊन ठरवलं की, आपल्यावरील अन्यायाला विनोदी रूपात इतरांसमोर आणायचं. सर्वसाधारण स्त्री या स्थितीत लढाच पुकारेल, पण दैवाने त्यांना विनोदबुद्धी दिलेली होती आणि तिचा कलेत आविष्कार करण्याचं कौशल्यही! काही काळानं त्यांना आणखी काही हास्यचित्रकर्त्या मिळाल्या आणि त्यातल्या तेराजणींनी ‘Sour Cream’ याच नावाचा दुसरा हास्यचित्रसंग्रह प्रसिद्ध केला.
आश्चर्य म्हणजे आजपर्यंत मी पाहिलेल्या एकाही ब्रिटिश किंवा अमेरिकन हास्यचित्रकारांचा त्यात समावेश नव्हता. स्त्रीच्या दृष्टिकोनातून काढलेली सतरा हास्यचित्रकर्तींची चित्रं एकाच वेळी पाहायला मिळण्याचा अनुभव अपूर्व होता. वेगवेगळ्या शैली मात्र त्यात व्यक्त झाल्या नव्हत्या. ही हास्यचित्रं संपूर्णतः तेथल्या परिस्थितीतून निर्माण झालेली, त्या परिस्थितीशी एकजीव झालेली अन अनेक संदर्भांत बांधलेली आहेत. हे संदर्भही तिथल्या चालीरीतींचे, जीवनविषयक दृष्टिकोनाचे आहेत.
आपल्याकडील स्त्री-समाजाचा प्रश्न अद्यापि प्रामुख्याने आर्थिक स्वातंत्र्याची निगडित आहे. हुंड्याची चाल, परंपराग्रस्तता हे आपले प्रश्न; तर पाश्चात्य देशांत स्त्रीचं व्यक्तिमत्त्व स्वतंत्रपणे प्रस्थापित करणं, हा स्त्री-चळवळीचा मुख्य बिंदू आहे. शिवाय त्यांचा समाज कितीतरी पटींनी मुक्त आहे. त्यामुळे आपल्याकडील पुरुषसुद्धा धजणार नाहीत अशा लैंगिक विषयांवर या स्त्रियांनी बेधडक हास्यचित्रं काढली आहेत. मुख्य म्हणजे- या देशांमध्ये हास्यचित्रकर्तींची संख्या नगण्य मुळीच नाही, हे या संग्रहातून सिद्ध होते. या संग्रहातला आक्रमक, कडवा स्त्रीवाद पुरुषांना स्वीकारार्ह वाटला नसण्याची शक्यता आहे. कदाचित (या) स्त्रियांनीही अलग राहणं पसंत केलं असावं. एवढं मात्र खरं, की हास्यचित्रकर्तींकडून अद्यापि भरीव म्हणता येईल अशी कामगिरी व्हायची आहे. तशी हास्यचित्रकारांची संख्या कुठेही विनोदी लेखकांपेक्षा कमीच असते.
आपल्याकडे विनोदी लेखिका आहेत आणि चित्रकर्त्यांची संख्याही काही कमी नाही. मग अल्प प्रमाणात का होईना, हास्यचित्रकर्त्या निर्माण का होऊ नयेत? काही काही व्यवसाय पुरुषांनीच करायचे, असं आपल्या मनात रुजलेलं तर नसेल? राजकीय टीकाचित्रांबाबतीत एक वेळ हे ठीक; पण……
स्त्रियांना विनोदबुद्धी कमीच असते, असलं बाष्कळ उत्तर स्मार्ट म्हणून ठीक; पण ते खरं नाही. माझ्या हास्यचित्रांची १२-१३ प्रदर्शनं ठिकठिकाणी झाली, त्यासाठीचा बहुसंख्य प्रेक्षक स्त्रीवर्गच होता.
‘स्त्रियांना विनोदबुद्धी असते का?’, असा प्रश्न आपल्याकडे जितक्यांदा गमतीनं विचारला जातो, तितक्यांदा गंभीरपणानेही! गमतीच्या प्रश्नाला गमतीचं उत्तर म्हणजे- ‘पुरुषासारख्या कंटाळवाण्या प्राण्याबरोबर सबंध आयुष्य काढते ती स्त्री काय विनोदबुद्धी असल्याशिवाय?’ मात्र, गंभीरपणे उत्तर देण्याचा प्रयत्न होतो तो प्रतिप्रश्नानेच- ‘आजवर पुरुषप्रधान समाजात होणाऱ्या कोंडमाऱ्यातून, जुलमी वर्चस्वातून स्त्रीचा आवाजसुद्धा उमटणं अशक्य होतं, तर तिला हसू कसं फुटणार?’
पण मग पुढचा प्रश्न असा की, जुलमी परिस्थिती खरोखरच विनोदबुद्धीला मारक असते का? की विनोदबुद्धी ही माणसाला उपजत मिळणारी व नाहीशी न होणारी दैवी देणगी आहे?
सुशिक्षित-अशिक्षित, श्रीमंत-गरीब, सनातनी-आधुनिक असा भेद विनोदबुद्धीच्या आड येताना दिसत नाही, हे विनोदबुद्धी असणाऱ्या पूर्वीच्या स्त्रिया आठवल्या म्हणजे जाणवतं. सारा जन्म उंबरठ्याआड पुरुषाच्या दराऱ्याखाली काढावा लागत असे त्या काळातही विनोदबुद्धी असलेल्या बायकांचे उल्लेख वाड्मयात आढळतात. आलेल्या परिस्थितीत अडचणींना हसत-खेळत तोंड देण्याची कला म्हणजे विनोदबुद्धी आणि ती प्रतिकूल परिस्थितीतही अधिक प्रखर होण्याची शक्यता. यातून कलेचा अविष्कार होतोच असं मात्र नाही.
‘Sour Cream’ मधल्या स्त्री-हास्यचित्रकारांनी मात्र तो साधला.
“खरं म्हणजे मी मेकॅनिकच व्हायचे, पण मुलींना अप्रेंटिस म्हणून घेत नाहीत ना म्हणून…”
(त्यामुळे तिला हेअरड्रेसर व्हावं लागलं. तरी मूळ आवड कुठे जातेय? किंवा गिऱ्हाईकांच्या केसासाठी स्पॅनर वगैरे वापरले आहेत.)
अगडबंब शब्द-
‘भाषणानंतर झाडलोट करायचं काम त्यांच्याकडे असतं ना, तर त्यांनी एवढे अगडबंब शब्द वापरलेच नसते!’ (कारण त्यांना कळलं असतं की, श्रोते असे शब्द कधी ग्रहण करीत नाहीत.)
‘Sour Cream’ मधल्या हास्यचित्रांमध्ये एकच दोष जाणवतो. त्यात शब्दविरहित चित्रं थोडीच. बहुसंख्य शब्दाधारित, भावाधारित आहेत. नवल वाटतं ते हेच की, चित्रकलेची एवढी जाण असलेल्या, विशिष्ट दृष्टिकोन व्यक्त करण्यासाठी हास्यचित्रासारखं दृश्य माध्यम जाणीवपूर्वक निवडणाऱ्या या चित्रकर्तींची चित्रं दुय्यम ठरवतील एवढा शब्दांचा वापर करावा? स्त्री म्हणजे शब्द... शब्द... शब्द... (बडबड) हा पूर्वापार पुरुषप्रणीत आरोप त्यांना खोटा पाडावासा वाटू नये? या स्त्रियांच्या हास्यचित्रशैलीत रेषा, रेखाटन, मांडणी, व्यक्तिदर्शन कशाचीही उणीव जाणवत नाही, हे मात्र खरं.
यासाठी जरुरी आहे ती योग्य वातावरण निर्माण करण्याची ...चित्रकर्तींचा शोध घेऊन त्यांना स्वतःच्या संवेदनक्षम दृष्टीला अनुसरून स्त्री-दृष्टिकोनातून स्वतंत्र विनोदनिर्मितीसाठी जाणीवपूर्वक प्रोत्साहन देण्याची. त्यामुळे मराठी व्यंगचित्रांमध्ये अनोख्या पैलूंची भर पडून मराठी व्यंगचित्रांचं क्षेत्र अधिक व्यापक आणि संपन्न व्हायला हातभार लागेल.
(हा लेख 29 जुलै 2006 रोजी लोकसत्ता दैनिकात प्रकाशित झाला होता. )
वसंत सरवटे
नावाजलेले व्यंगचित्रकार
वा..वा..हास्यचित्रकर्त्यांची वानवा आहे हे पुरेशा गांभीर्याने समोर ठेवलंत,सरवटेसर.
ReplyDeleteI have am seriously urged to think about this for the first time. Some how I did not find it concluding. Thanks
ReplyDelete