शुभा खांडेकर

‘पुन्हा स्त्री उवाच’ च्या वाचकांना शुभा खांडेकर हे नाव ओळखीचे आहे. सप्टेंबरच्या अंकाचे मुखपृष्ठ शुभाने काढलेल्या एका व्यंगचित्रावर आधारित होते. शिवाय त्या अंकात त्यांची इतर अनेक व्यंगचित्रं आपण पाहिली आहेत. “आर्कीओगिरी’ हे शुभाचे पुरातत्वशास्त्राविषयीच्या व्यंगचित्रांचे नावाजलेले पुस्तक आहे. पुरातत्त्वशास्त्रासारख्या गंभीर विषयावर व्यंगचित्रे काढावी असे तिला का वाटले? तिने व्यंगचित्र काढायला कशामुळे सुरुवात केली? इतिहास हा सध्या अतिसंवेदनशील विषय झालेला असताना तिला या विषयावर व्यंगचित्र काढायला भीती वाटते का? आपल्या चित्रामुळे कुणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत - यासाठी ती काय काळजी घेते? अशा अनेक प्रश्नांबद्दल शुभा खांडेकरशी वंदना खरे यांनी गप्पा केल्या आहेत.

शुभा तू व्यंगचित्र काढायला सुरुवात कधी केलीस? पुरातत्त्वशास्त्रासारख्या गंभीर विषयावर व्यंगचित्र काढायची कल्पना तुला कशी सुचली? 
मी बर्‍याच वर्षांपूर्वी जेव्हा MA केलं, त्यानंतर आर्किओलोजीचा डिप्लोमासुद्धा केला होता. त्यानंतर मुंबईला आल्यावर अनेक वर्षांनी पुन्हा आर्किओलोजीत रिफ्रेशर सारखा एक सर्टिफिकेट कोर्स केला. इथे आम्हाला शिकवणारे जे लोक होते ते खूप हसतखेळत गमतीजमती करत शिकवत असत. त्यामुळे मला ह्या विषयातले अनेक विनोद लक्षात यायला लागले.
पण त्याआधी मधल्या काळात 25/30 वर्ष मी वृत्तपत्रात नोकरी केली होती. वृत्तपत्रात असं असतं की रोजचं एक पॉकेट कार्टून लागतंच. आर.के.लक्ष्मणचे ‘यू सेड इट’ हे पॉकेट कार्टून असते या एकमेव कारणासाठी तो पेपर घेणारे लोक मी पहिले आहेत. न्यूजपेपर मध्ये काम केल्यावर रोज ती कार्टून्स बघून बघून आपल्या रोजच्या आयुष्यात देखील कसा विनोद दिसू शकतो हे थोडंसं अंगवळणीच पडतं. त्या उलट इतिहास आर्किओलोजी मध्ये अशा रोजच्या व्यवहारांचं फारसं डीटेलिंग तुम्हाला सापडू शकत नाही.म्हणजे - एक राजा, त्याची अमूक इतकी वर्षांची कारकीर्द,त्याने केलेल्या लढाया इ. समजतं. पण त्या काळातलं रोजचं आयुष्य कसं होतं ते फारसं समजत नाही. आजचा पेपर उद्या शिळा होतो. इतिहास मात्र वर्षानुवर्षे तसाच लिहिला-वाचला जातो. मोठ्या लोकांच्या कारकिर्दीत सामान्य माणूस म्हणजे शेतकरी, धोबी, चांभार, स्त्रिया, सैनिक आणि त्यांच्या रोजच्या जगण्याचे तपशील इतिहासात सापडत नाहीत. आपण राजामहाराजांच्या चुका काढतो की अमुक तहाची कलमं चुकली इ. मग त्याच्या राज्यात राहणार्‍या सामान्य माणसांना त्यावेळी काय वाटलं असेल? बायकोला काय वाटलं असेल? असे विचार करताना मला विनोद सुचू लागले.
आपण जर सामान्य माणसावर लक्ष केन्द्रित केलं तर त्यातले विनोद दिसू शकतात. मी त्या विनोदांवर आधारित कार्टून्स बनवायला तर लागले; पण मला ड्रॉइंग येतच नव्हते! सुरुवातीची चित्रं अगदीच वेडीवाकडी असायची. मला खूप वेळ लागायचा. मी एका ड्रॉइंग क्लासमध्ये विचारलं, तर ते म्हणाले की तुम्ही चांगली रेखाटने बघा आणि त्याची कॉपी करत रहा म्हणजे हळूहळू तुम्हाला जमेल. तसं करून बघितलं. ते जमलं तरी ती कार्टून्स होत नव्हती . cartooning मध्येही चित्रकलेचे बेसिक नियम माहिती असावे लागतात. हे सरावाने जमायला लागलं. काही मनात आलं की काढून पाहायचं आणि मग ते सुधारत जायचं – असं करत करत जमायला लागलं. लोकल ट्रेनमध्ये प्रवास करतांना (अर्थात बसायला जागा मिळाली तरच!) मी आजूबाजूच्या लोकांची caricatures काढायचा प्रयत्न करू लागले. कुठेतरी अंधुकसे साम्य दिसले की व्यक्तीच्या चेहेर्यावर समाधानाचे स्मित झळकायचे. काही लोक ‘माझेही एक काढा ना!’ असा आग्रह करायचे. त्यांना पसंत पडले तर कागद घडी करून घरी घेऊन जायचे. मजा यायची! एकदा एक JJ स्कूलचा विद्यार्थी भेटला. त्याने मला काही tips दिल्या!
त्यावेळी स्टिक फिगर्स ट्राय केल्या का?
नाही. मला वाटतं की त्यात चेहर्‍यावरचे भाव नाही दाखवता येत. माझ्या कार्टून्स मध्ये मला ते महत्त्वाचं वाटायचं. भावना हाच मी फोकस ठेवला होता. विनोद म्हणजे एक भावना आहे. एखाद्याला एखाद्या गोष्टीचा खूप राग येतो आणि त्याचंच आपल्याला हसू येतं, तो राग त्याच्या चेहर्‍यावर दिसला पाहिजे. एखाद्याला खूप आश्चर्य वाटतं तेही चेहर्‍यावर दिसायला पाहिजे. एखादा माणूस खूपच दू:खी असेल आणि आपल्याला बघणार्‍याला वाटतं की ह्यात रडण्यासारखं काय आहे? तर ते दु:ख दाखवता यायला लागतं. भावना, कशा दाखवायच्या ? मोठयाने हसणे, किंचित स्मित यातला फरक, त्यातले बारकावे अशा गोष्टींवर मेहनत घेतली. त्या सुमारास, लोकसत्ता या वृत्तपत्राने महिलांसाठी एक व्यंगचित्र स्पर्धा घेतली होती त्यामध्ये मी माझी अगदी पहिली काही सात आठ कार्टून्स दिली होती. महिलांना प्रोत्साहन म्हणून ती स्पर्धा होती. त्यात मला तिसरं बक्षीस मिळालं होतं. परीक्षक म्हणून पद्मजा फाटक, वसंत सरवटे असे लोक होते. त्यातली माझी बरीचशी कार्टून्स स्त्रीवादी विचारांनी प्रेरित होती.
( त्यावेळी वसंत सरवटे यांनी महिला व्यंगचित्रकारांविषयी लिहिलेला लेख इथे वाचता येईल)
तू वृत्तपत्रात काम करत होतीस तेव्हा तुला चित्रांच्या ऐवजी विनोदी लेखन करावं असं वाटलं की नाही?
वृत्तपत्रात काम करताना माझ्या असंही लक्षात आलेलं होतं की लोकांचा attention span आता कमी झालेला आहे. आम्हाला तर अशी स्पष्ट सूचना असायची की तुमची बातमी ज्या पानावर सुरू होईल, तिथेच ती संपायला पाहिजे. आणि प्रत्येक बातमीसाठी चित्र सुद्धा असलेच पाहिजे असा दंडक तयार झाला होता. वाचण्यापेक्षा चित्रावर फोकस असायला लागला होता. आपण लिहिलं तर कोण वाचणार आहे, ही भावना वाढायला लागली. त्यामुळे मी आपोआप लेख लिहिण्या ऐवजी व्यंगचित्रांकडेच वळले. हे आपोआप झालं, मी विनोदी लिखाण काही केलेलंच नाही. कार्टून या माध्यमाने माझा ताबाच घेतला.
तुला कोणाची व्यंगचित्र आवडतात ? मंजुला पद्मनाभन किंवा सॅनिटरी पॅनेल यांची व्यंगचित्रं कशी वाटतात?
मला मंजुलाची अनेक चित्रं समजतच नाहीत. हे 'सॅनिटरी पॅनेल' काय आहे ते मात्र मी पाहिलेलं नाही. आता पाहायला पाहिजे. पण माझी बेसिक प्रेरणा म्हणजे आर. के. लक्ष्मण यांची कार्टून्स होती. कारण त्या काळात तेच सगळ्यात जास्ती थेट भिडणारे होते. मला शि. द. फडणीस यांची स्टाइलसुद्धा आवडते. अस्टेरिक्स नावाची एक सुंदर कार्टून सिरिज आहे, त्यातले भाषिक विनोद देखील सुरेख आहेत. अगदी त्यातल्या रोमन माणसांची नावं सुद्धा इतकी मजेशीर आहेत. रोमन, ग्रीक, इजिप्शियन इतिहासाबद्दल इतकी कार्टून्स आहेत. पण आपल्या भारतीय इतिहासाबद्दल तसं काहीच नाहीये.
तू कोणकोणत्या विषयांवर व्यंगचित्र काढली आहेस? 
मी अनेक विषयांवर कार्टून्स काढत असे. मी एका कंपनीत काम करीत होते. त्यावेळी त्या कंपनीत ज्या काही घडामोडी होत होत्या, त्याबद्दल साधारण पन्नासेक व्यंगचित्रं मी काढली आणि बॉसला त्याच्या वाढदिवशी एक पुस्तक बनवून गिफ्ट दिलं. त्यात त्या बॉसच्या वागण्याबद्दल पण चित्रं होती. एक असं होतं की ते प्रचंड बिझी असायचे. सारखे परदेशात जायचे, त्यांना खूप लोक भेटायला यायचे पण लोक तक्रार करायचे की त्यांचा वेळ मिळत नाही. ते कधी कधी अपॉईंटमेंट देतात आणि आलेल्या माणसाला समजतं की ते जयपूरला किंवा चेन्नईला गेलेले आहेत. म्हणून मी एका व्यंगचित्रात असं दाखवलं होतं की एक दाढीवाला माणूस आहे आणि त्याची लांबलचक दाढी अगदी जमिनीवर लोळते आहे. तो सांगतोय की यांची वाट बघताबघता असं झालं! सर्वांनाच खूप आवडलं कारण ते सर्वांच्या मनातलंच होतं. त्यांना देखील आवडलं -त्यामुळे बदल असा काही घडला नाही. पण मी त्यामुळे सगळ्यांच्या नजरेत आले. की हिला एखाद्या गोष्टीवर मार्मिक कॉमेंट करून ती अशी चित्रातून मांडता येते.
त्यानंतरही मी अनेक प्रासंगिक व्यंगचित्र काढली. आमच्याकडे एक माणूस होता त्याच्या टेबलावर खूप पसारा असायचा. त्याला अनेकदा सांगूनहे तो काही बदलत नव्हता. एकदा तो कुठल्याशा अरब देशात जाऊन काही काम करून आला होता. तेव्हा मी असं कार्टून काढलं होतं की त्याच्या कॅबीनचं दार उघडून एक अरब आत डोकावतोय आणि विचारतोय की –‘अरे माझा उंट हरवलाय तो तुझ्या कागदाखाली आहे का – ते बघायला आलोय.’असं हळूहळू हे माध्यम माझ्यात भिनायला लागलं.

तुला खास प्रतिसाद कोणाकडून मिळालाय ?
Archaeologist कडून मला छान प्रतिसाद मिळालाय. माझ्या "आर्केओगिरी" या पुस्तकाच्या प्रकाशनाला पुण्याहून प्रा.म.के. ढवळीकर आले होते. मी त्यांच्याकडेच बेसिक आर्किओलोजी शिकले आहे. तर माझ्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस त्यांनी असं सांगितलं की आम्ही वर्षानुवर्ष आर्किओलोजीचं इतकं काम करतोय आणि आम्हाला खूप मजेदार अनुभव येतात, पण त्यांची कार्टून्स कशी बनवावी ते आम्हाला कधी समजलं नाही – ते काम हिने केलंय. आपण आपला इतिहास जणू काही जीवन मरणाचा प्रश्न असल्यासारख्या गंभीरपणे घेतो. आपण का आपल्या इतिहासा बद्दल काही गमतीदार विचार करू शकत नाही? आपल्या इतिहासाबद्दल मी असा विचार करायला लागले आणि त्यातून माझं पुस्तक तयार झालं. पण तू बाई असल्यामुळे तुझी व्यंगचित्र वेगळी आहेत असं कोणी म्हणालेलं नाही.
तरी एक गोष्ट मला लक्षात आली की वृत्तपत्रात सामान्य माणसाचा विचार करावाच लागतो. त्याला पचेल अशी भाषा, त्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न याविषयी सांगावं लागतं. इतिहासात मात्र सामान्य माणूस दिसत नाही. जी गोष्ट कित्येक वर्षांपूर्वी घडून गेली तिच्या बद्दल बारीकसारीक तपशील फारसे सांगता येत नाहीत. फक्त ठळक गोष्टी सांगता येतात. ते जर आपण कल्पना केली तर आर. के. लक्ष्मण सारखी आपल्याला सापडतील. आपल्या पुरातत्व विभागात जे काही पुरावे आहेत, त्यात ज्या सामान्य माणसाचा जो काही सहभाग आहे त्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला गमती सापडू शकतील – असं मला वाटलं.उदा. म्हणजे राणाप्रतापचा जो घोडा आहे – त्याचा मोताददार असेल.
त्यामुळे माझ्या कार्टून्स मध्ये अशी सामान्य माणसं असतात ज्यांना इतिहासाच्या पुस्तकात स्थान मिळालेलं नाही. त्यांना खूप स्कोप मिळालाय. इतिहासात महिलांच्या विषयी फारसं रेकॉर्ड नाहीये. सामान्य माणसाचं भलं होणार नाही असा निर्णय राजाने घेतला असेल तर नाइलाजाने तरी त्याला तो मानावाच लागतो – अशा वेळी त्याचं किंवा त्याच्या बायकोचं काय म्हणणं असेल याचा विचार केला तर विनोद सापडू शकतो. थोडक्यात 'अन्डरडॉग'चा शोध घेतला पाहिजे. जो पिचलेला आहे, वंचित आहे त्या व्यक्तीच्या दृष्टीने पाहायला पाहिजे. तर हमखास विनोदाच्या जागा सापडतात.
हल्ली इतिहास हा विषय जरा ज्वलनशील झाला आहे. त्या विषयावर व्यंगचित्र काढताना कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून काय काळजी घेतेस ?
आपले लोक इतिहासा बद्दल जास्त सेंसिटीव्ह आहेत. चारशे वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटनेसाठी आज एकमेकांचा जीव घेणारे लोक आपल्या देशात आहेत. तसं इतर देशात नसते. ग्रीक, इजिप्शियन इ. राजांनी काय केलं त्याचा आजच्या माणसांना फरक पडत नाही. आपल्या इथे भावना दुखावू शकतात, ते खरं की खोटं, चांगले की वाईट - ते मला माहीत नाही. म्हणून आपल्याला असं करता यायला पाहिजे की कुणाच्या भावना दुखवता कामा नये. भावना दुखावल्या जाणं केव्हा justify होईल? तर आपल्याला कोणाचं भलं करणारा मेसेज द्यायचा असेल तरच! पण जर काही सकारात्मक परिणाम होणार नसेल तर मात्र नाही!
मी इतिहासाबद्दल इतकी व्यंगचित्र काढलीत. पण मला आजवर इतक्या कार्टून्स मध्ये कोणी तसं भावना दुखावल्याची तक्रार केली नाही. मी गणपती बद्दल एक कार्टून असं काढलं होतं की आजोबा आणि आजी हत्ती आपल्या हत्ती नातवंडांना गोष्टी संगत बसलेत. झाडावर एका हत्तीचा फोटो आहे हार घातलेला आहे. हत्ती आजीच्या डोळ्यातून अश्रु येतायत आणि ते अशी गोष्ट सांगताहेत की ती माणसं जंगलात आली तेव्हा सगळे प्राणी लपून बसले. पण आमचे आजोबा एवढे मोठे होते की ते कुठे लपून बसणार? त्यामुळे ते माणसांना सापडले आणि त्यांचं डोकं कापून घेऊन गेले. हे कोणालाही आक्षेपार्ह वाटलं नाही. हत्तीचंच डोकं का लावलं गणपतीला – याबद्दल काही पौराणिक कथा आहेतच. पण मी त्यात जात नाहीये. यात अंडरडॉग कोण आहे? त्याचं काय म्हणणं असेल? असा विचार केला.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पांडव लेणी आहेत. महाभारत खरं तर पंजाब UP मध्ये घडलं. असं असतांना महाराष्ट्रात पांडव लेणी कशी काय? त्यावर मी एक असं कार्टून काढलं की पांडवांची जेवणं चाललीयेत. द्रौपदी स्वयंपाक करतेय, इतरांचे जेवण आटोपलं आहे पण भीमाच्या समोर मोठ्ठा भाताचा डोंगर आहे आणि त्याचं खाणं अजून सुरूच आहे. ते पाहून युधिष्ठीर त्याला म्हणतो की अरे बाबा लवकर आटप आपल्याला महाराष्ट्रात जाऊन लेणी कोरून काढायची आहेत.
दुसरं एक पौराणिक विषयावरचं माझं व्यंगचित्र मला आठवतं - देवी लक्ष्मी नेहमी विष्णूचे पाय चेपत असते. माझ्या चित्रातली ही लक्ष्मी असं म्हणतेय की कधी एकदा हा विष्णू त्याचा कल्कीचा ड्रेस घालून निघेल पृथ्वीवर जायला असं मला झालंय! त्याचा संदर्भ असा आहे की कल्की हा दहावा अवतार सांगितलाय यात युगानुयुगे पाय चेपत बसलेली लक्ष्मी अंडरडॉग आहे. जेव्हा केदारनाथला मोठा पूर आला होता; तेव्हा एक कार्टून असं काढलं होतं की सगळे लोक बुडताहेत, मंदीर सुद्धा पाण्याखाली गेलंय – शंकरा ची एक मोठी फॅमिली आहे. सगळ्यांची वाहनं वगैरेही पाण्यात आहेत. तेव्हा पार्वती त्याला ओरडून सांगतेय की – तरी मी तुला कितीवेळा सांगितलं होतं की त्या बयेला (म्हणजे गंगेला) डोक्यावर बसवून ठेऊ नकोस!
म्हणजे समाजाचं नुकसान करणार्‍याच्या भावना दुखावल्या तर मला चालेल पण उगाच खोडी काढण्याची गरज नाही. अन्याय करणाराच्या भावना दुखावल्या तर हरकत नाही. लोकं आपल्यावर रागावली आहेत – हे अनेकांना अभिमानास्पद वाटू शकतं. पण आपलं चुकते आहे आणि लोक आपल्याला हसतायत, आपली टिंगल करतायत हे सहन होत नाही, त्याला लोक घाबरतात - Humour is Deadly Weapon!

विनोदाचं हे शस्त्र अनेकदा पुरुषांनी बायकांच्या विरुद्ध वापरलं आहे, त्याबद्दल काय वाटतं?
याचे दोन भाग आहेत. एक म्हणजे आपली आजची जी मूल्यं आहेत; उदा. जेंडर, कास्ट, रेस विषयीची समता इ. ही मूल्यं पूर्वीच्या काळी नव्हती. म्हणून पूर्वीच्या कलाकृतींना आजच्या मूल्यानुसार त्यांचं मूल्यमापन करायला नको. पण आज जर तीच जुणीपुरणी मूल्यव्यवस्था कोणीही पुढे दामटत असेल तर ते सोडलं पाहिजे. उदा. एखाद्या बाईचा एखादा दुर्गुण सांगायला तुम्ही नेमका शब्द शोधायच्या ऐवजी तिला 'रांड, वेश्या' वगैरे म्हणणं हा आळशीपणा आहे. हे आंब्याला पेरु म्हटल्या सारखं आहे. शिव्या देणे हा linguisticआळशीपणा वाटतो. त्यांची क्रीएटिविटि कमी पडते. आजच्या आपल्या जाणिवा बदलल्या आहेत. असे जोक्स करणारे आणि हसणारे दोघेही मागास आहेत.
मग त्यावर उपाय काय? याला उत्तर म्हणून स्त्रीवादी विनोद कसा असावा ?
समाज एका दिवसात बदलत नाही. पण नवी जाणीव वाढत जाईल, पसरेल - अशी अपेक्षा आपण करू शकतो. कदाचित काही लोक दहा वर्षांनी पण नाही बदलणार. तरी त्याविषयी मुलांशी बोलत रहायला पाहिजे.
पण जर संदेश देणे एवढाच व्यंगचित्रामागचा उद्देश असेल तर मग तो 'विनोद' रहात नाही. ते illustration होतं. तरीही आज डेव्हलप झालेल्या नव्या सेंसिटिव्हिटीमुळे बदललेल्या नव्या परिस्थिती बद्दल निराळी व्यंगचित्र केली पाहिजेत. पण ही एक दुधारी तलवार आहे. अजिबात विवादास्पद नसलेले स्त्रीपुरुष समता या विषयावरचे व्यंगचित्र करणं अशक्य आहे. समाजात जेंडर सेन्सिटिव्हिटी वाढेल असं काहीतरी करायला पाहिजे. सगळं बदलत आहे. आपण जे करतोय तेच आदर्श आहे – असंही कुणी समजू नये.
महिला व्यंगचित्रकारांची खास करून स्त्रीवादी व्यंगचित्रकारांची संख्या कमी का असते? स्त्रियांना विनोद बुद्धी कमी असते का?

मला नाही वाटत की स्त्रियांना विनोद बुद्धी कमी असते! पण आतापर्यंत महिलांवर विनोद करण्याचे काही ठराविक साचे बनलेले आहेत. उदा. जाडी बाई, खूप पैसे खर्च करणारी बाई वगैरे. याव्यतिरिक्त जोक्स बनवायला जास्त कल्पनाशक्ती लागेल. विनोदाची जी स्टँडर्ड टेंपलेट ठरलेली आहेत, त्यापलीकडे जाऊन नवे मुद्दे घेऊन व्यंगचित्र बनवायची जबाबदारी पण स्त्रीवादी कार्टूनिस्ट वर आहे. त्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. या ठराविक साच्यांच्या बाहेर जायला लागेल. काही जुन्या साच्यांना उलटंपालटं (subvert) करावं लागेल. चळवळीचं काही चुकत असेल तर तेही सांगायला पाहीजे. एकूणच पुरोगामी चळवळींनी विनोदाचे महत्त्व ओळखून त्याचा चांगला उपयोग करायला हवा.







4 Comments

  1. Aatya... You are just amazing... The interview is truly interesting... And the points you have put forth it superb. Hats off... And heartiest congratulations!!

    ReplyDelete
  2. Great going Shubha. The cartoons are really good. The humour is subtle but not hurting.The satirical comments are apt. The observation and thought behind them is superb. The interview is good.
    Congratulations.

    ReplyDelete
  3. Shubha Tai, this soooo wonderful! You Rock!

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form