नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला ‘पुन्हास्त्रीउवाच’चा चौथा अंक वाचकांच्या समोर ठेवताना मनात संमिश्र भावना आहेत. एकीकडे वर्षभराच्या कालावधीत अनेकांच्या सहकार्याने आम्ही चार अंक प्रकाशित करू शकलो याचे समाधान तर आहेच, पण त्यासोबत देशातल्या सध्याच्या परिस्थितीमुळे एकप्रकारची विषण्णता दाटलेली आहे!
सप्टेंबर महिन्यात प्रकाशित झालेल्या ‘खाद्यसंस्कृती’ विशेषांकाला वाचकांनी पहिल्या दोन अंकांपेक्षा खूपच जास्त प्रतिसाद दिला. म्हणून पुन्हा एकदा एक विशेषांक तयार करायचे आम्ही ठरवले आणि “विनोद आणि स्त्रीवाद” असा विषय पक्का केला. या अंकात स्त्रीवादी दृष्टिकोनातून विनोदाच्या विविध पैलूंचा वेध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु, सध्याच्या सामाजिक वातावरणात विनोदाविषयी काही समजून घेण्याची कोणाची मनस्थिती आहे का – अशी काहीशी शंकादेखील वाटते आहे!
गेल्या काही महिन्यांपासून देशात वेगवेगळ्या कारणांनी प्रक्षोभ उसळलेला आहे. सरकारच्या प्रतिगामी धोरणांना आणि दडपशाहीला विरोध करण्यासाठी देशभरात वातावरण तयार होत आहे पण त्याचवेळी या विद्रोहाला ठेचून काढण्यासाठी हिंसाचार केला जातो आहे. ह्या संघर्षात देशभरातले विद्यार्थी आणि महिलाही मोठ्या प्रमाणावर सामील झालेले आहेत. हा संघर्ष आणखी किती काळ सुरू राहील याची कोणालाच कल्पना नाही. कारण कुठलंही सामाजिक परिवर्तन रातोरात होत नसतं! सध्या ज्या तीव्रतेने संघर्ष सुरू आहे – त्यातून राग, द्वेष आणि कडूपणादेखील येऊ शकतो. अशा परिस्थितीत सकारात्मकता टिकवून ठेवणे अवघड असते, पण ह्या नकारात्मक भावनांपासून बचाव करण्यासाठी कदाचित आपली विनोदबुद्धीच आपल्याला उपयोगी पडू शकेल!
विनोदामुळे हास्यनिर्मिती होते आणि हसण्यामुळे जगण्यातला तणाव कमी होतो. असं म्हणतात की Laughter Is the Best Medicine! पण त्याचबरोबर विनोद हे एक हत्यार आहे – हेदेखील विसरता येत नाही. कोण विनोद करतं आणि कोणावर विनोद केले जातात याचे जे संकेत असतात; ते ‘संस्कृती’ने वेगवेगळ्या सामाजिक गटांना बहाल केलेल्या सत्तेवरच ठरलेले असतात. ज्यांच्या हातात सांस्कृतिक सत्ता असते ते आपल्यापेक्षा कमी सत्ता असलेल्या गटांबद्द्ल हानिकारक साचेबंद गैरसमज तयार करण्यासाठी विनोदाच्या हत्याराचा वापर करतात. समाजात जे विषमतेचे वास्तव आहे ते जणू काही नैसर्गिकच आहे आणि जर त्याचा हसतमुखाने स्वीकार केला नाही तर तुमच्यात खिलाडू वृत्ती नाही, असे मानले जाईल - असा इशारा त्यातून शोषणकर्ता सत्ताधारी वर्ग देत असतो. या गटाला सोयीचे असतील तेच समज, गैरसमज, पूर्वग्रह विनोदाच्या माध्यमातून ठासून सांगितले जातात आणि जात, वर्ग, वर्ण, धर्म आणि लिंगभाव यांवर आधारलेली विषमता गडद करण्याचे काम पार पाडले जाते. अनेक व्यक्तींकडे एखाद्या बाबतीतली सामाजिक सत्ता असली तरी दुसऱ्या एखाद्या बाबतीत तीच व्यक्ती अल्पसंख्यांक गटात असू शकते. एखाद्या बाबतीतल्या विषमतेला विरोध करत असतानाच दुसऱ्या एखाद्या भेदभावाला खतपाणी घातले जाऊ शकते. म्हणूनच आपल्या सामाजिक स्थानाविषयीचे भान सतत जागते ठेवणे गरजेचे असते. ज्या विनोदांतून हिंसाचार, वर्णभेद, जातिभेद किंवा लिंगभेद यांचा प्रसार केला जातो – अशा विनोदांचे विश्लेषण करून त्यांचा निषेध करणे गरजेचे आहे. पितृसत्तेने नेहमीच विनोदाचे हत्यार वापरुन महिलांवर हल्ला केलेला आहे. लिंगभावांच्या चौकटी उभारून ‘स्त्रियांना विनोदबुद्धी कमी असते’ हा गैरसमज लादला आणि स्त्रियांच्या हसण्याला ‘अनैतिक’आणि असंस्कारी ठरवणारे निर्बंधही लादले! लिंगभाव आणि विनोद यांचा परस्परसंबंध उलगडून पाहायचा प्रयत्न या ताज्या अंकात केलेला आहे. यासंदर्भातल्या वेगवेगळ्या मुद्द्याचा निरनिराळ्या पद्धतीने वेध घेणारे लेख, परिसंवाद, कविता, मुलाखती आणि व्यंगचित्रे अंकात बघायला मिळतील.
व्यंगचित्रांच्या विभागात महिला व्यंगचित्रकारांनी काढलेली चित्रे पाहायला मिळतील आणि त्याच बरोबर शुभा खांडेकर आणि कनिका मिश्रा ह्या दोन व्यंगचित्रकारांच्या तपशीलवार मुलाखतीही घेतलेल्या आहेत. विनोदाचा उपयोग करून विद्रोही आशय मांडणारी रंगकर्मी रसिका आगाशे आणि प्रसिद्ध ‘स्टँडअप कॉमेडियन’ तृप्ती खामकर यांच्या मुलाखती वाचताना विनोद निर्मिती करणाऱ्या स्त्रीयांच्या समोरची आव्हाने लक्षात येतील.
गेल्या पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळापासून विनोदी लेखन करत असलेल्या मंगला गोडबोले यांच्या मुलाखती मधून त्यांची लेखन प्रक्रिया समजून घेता येईल आणि स्त्रिया विनोदी लेखन करायचे का टाळतात; विनोद निर्मिती करण्यासाठी स्त्रियांनी कोणती वैशिष्ठ्ये अंगिकारली पाहिजेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरेही सापडतील.
‘हसण्यावारी नेऊ नका’ आणि ‘विनोदाला वळसा’ या दोन परिसंवादातून सेक्सीस्ट विनोदाचे मानसशास्त्रीय विश्लेषण आणि अशा विनोदांचा प्रतिवाद याविषयी अनेक मान्यवरांचे विचार वाचता येतील.
लिंगभाव आणि विनोद यातील सत्तासंबंधाचा वेगवेगळ्या पद्धतीने वेध घेणारे मराठी, हिन्दी आणि इंग्लिश अशा तिन्ही भाषांतले अभ्यासपूर्ण लेख या अंकात आहेत. श्रीनिवास हेमाडे यांच्या लेखात या विषयावर जगभरात झालेल्या संशोधनाबद्दल माहिती मिळेल. राहुल निशांत यांनी स्त्रीद्वेषटया विनोदांचे समाजशास्त्रीय विश्लेषण केले आहे. समाजाने बनवलेले लिंगभेदाचे साचे आणि हास्य-विनोद यांचा एकमेकांवर पडणारा प्रभाव याबद्दल डॉ सीमा घंगाळे यांच्या लेखात विश्लेषण केले आहे.
टीव्ही मालिकांतील महिलांच्या विनोदी व्यक्तिरेखांतल्या नकारात्मक चित्रणाविषयी सोनाली देशपांडेने लिहिले आहे. तर इंग्लिश आणि हिन्दी सिनेमातल्या स्त्रीवादी विनोदाविषयी मुक्ता खरेने लिहिले आहे. पु.ल. देशपांडे यांच्या लिखाणातील लिंगभावाविषयी उत्पल व. बा. यांचा लेख आहे.
एखाद्या ठोकळेबाज सामाजिक संकल्पनेला हाणून पाडायचे असेल तर Subversion हा एक बहारदार उपाय असतो. ह्या अंकात काही लोकप्रिय कवितांचे विडंबन देखील वाचायला मिळेल. त्याशिवाय सई लळित, माधवी भट आणि सुषमा परचुरे यांचे चुरचुरीत ललित लेखसुद्धा आवर्जून वाचा!
बंगालीतून विनोदी लेखन करणाऱ्या नवनीता देवसेन यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. त्यांच्या लेखनाची आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारा नंदिनी आत्मसिद्ध यांचा लेख आणि सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांनी 2005 साली महिला व्यंगचित्रकारांविषयी लिहलेला लेख असे दोन लेख आवर्जून पुनर्मुद्रित केले आहेत.
आता नववर्षाच्या शुभेच्छांसहित हा अंक तुमच्या हाती ठेवताना तुमच्या प्रतिक्रिया समजून घेण्याची उत्सुकता आहे!
उत्तम संपादकीय!
ReplyDelete