
विनोदी कार्यक्रमापासून व्यावसायिक पातळीवर अभिनयाची सुरुवात करणारी रसिका आगाशे ही अभिनेत्री मागील काही वर्षातच निव्वळ विनोदी अभिनयाच्या खूप पुढे गेली आहे. अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका, कवयित्री म्हणून तिनं अल्पावधीत गाठलेला यशाचा टप्पा, तिचं भरीव काम थक्क करणारं आहे. कलावंत म्हणून आपला परीघ विस्तारत असताना तिने अनेक आशयघन नाटकांचं लेखन, दिग्दर्शन केलं आहे. आज तिची नाटकं ‘प्रोटेस्ट थिएटर’ प्रकारातली सर्वोत्तम नाटकं म्हणून ओळखली जातात. ही निषेध नाट्य, सामाजिक - राजकीय प्रश्नांवर भाष्य करणारी नाटकं लोकांचं मनोरंजन करता करता त्यांना अंतर्मुख करतात, ही किमया तिनं कशी साधली, विनोदाचा वापर कसा केला, हा प्रवास उलगडण्यासाठी अरुंधती हैदर यांनी तिच्याशी केलेला हा संवाद.
प्रश्न - अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शक म्हणून तू अनेक वर्ष व्यावसायिक तसंच प्रायोगिक पातळीवर मराठी, हिंदी इंडस्ट्रीत काम केलं आहेस. अभिनेत्री म्हणून व्यावसायिक पातळीवर विनोदी भूमिका, विनोदी कार्यक्रमात काम करताना आलेला अनुभव कसा होता?
उत्तर - ह्युमरच्या माध्यमातून कलात्मकरित्या एखादी गोष्टी सांगणं, कॉमिक परफॉर्मन्स देणं, कलाकृती मनोरंजक करणं..हे मला स्वत:लाआवडतं. विनोद मनापासून आवडतो. त्यामुळे माझ्या बहुतेक कलाकृतींमध्ये मी या सगळ्याचं मिश्रण असलेल्या शैली वापरल्या आहेत. त्याबद्दल नंतर सविस्तर सांगेन. आधी अभिनयाबद्दल सांगते. मी सहा सात वर्षांपुर्वी झी मराठीच्या ‘फु बाई फू’ या विनोदी कार्यक्रमात काम करत होते. त्यावेळी आपण कोणत्या प्रकारचा विनोद सादर करत आहोत, त्यात लिंगभाव, जात, वर्ग, वर्णभेदी अशी टिप्पणी केली जातेय का याबद्दल मी तेव्हाही सजग होते आणि काय करायचं नाही, याची स्पष्टता मला होती. पण तेव्हा मी फारशी स्थिरस्थावर झाले नव्हते, ती सुरुवात होती म्हणून मी अगदीच माझा फेमिनिस्ट पवित्रा सगळीकडे दाखवला नाही. मात्र जिथे मला खूपच जास्त भेदभाव करणारं काही किंवा बायकांना अगदीच मूर्खात काढणारं असं काही दिसलं तर तिथे मी बोलले, टोकलं आहे. पण असा हस्तक्षेप तेव्हा आजच्याइतका तीव्र नव्हता यामागचं महत्वाचं कारण म्हणजे तसं तुम्ही केलंत तर लोक तुमच्या नावावर फुल्या मारायला सुरुवात करतात आणि सुरुवात होण्याआधीच तुमचा प्रवास संपू शकतो. आपलं म्हणणं ठामपणे मांडणं, काही भूमिका घेता येणं, यासाठीही एक पॉवर हातात यावी लागते, ती येईपर्यंत काहीवेळा तात्कालिक तडजोडी कराव्या लागतात. आज माझ्याकडे ती पॉवर आहे की मी सेक्सिस्ट, मिसोजिनिस्ट संहितेला नकार देऊ शकते. मला जे लिहायचंय ते मी लिहिते, ते मला जसं दाखवायचंय तसं दिग्दर्शित करते. तेव्हा अशी स्थिती नव्हती फू बाई फू दरम्यानचा एक किस्सा सांगते, तृप्ती खामकर या माझ्या सहकलाकारासोबत मला एकदा सादरीकरण करायचं होतं. पण दोन स्त्री कलाकारांचं विनोदी सादरीकरण यशस्वी होणार नाही, दोन बायकांची कॉमेडी नीट वर्क आऊट होत नाही, असं तेव्हा बोललं गेलं. पुरुष कलाकाराशिवाय बायकांना विनोदनिर्मिती करता येणार नाही असा सुप्त विचार कुठेतरी त्यातून डोकावत होता, कारण बाईला विनोद कळण्याचा, विनोद सांगण्याचा सेन्सच नसतो असं आपल्याकडे रुजवलं आहे. पण आम्ही ठाम होतो. आम्ही दोघींनी छान सराव करुन ते स्किट सादरही केलं आणि त्याला चांगली दादही मिळाली, प्रेक्षकांनाही ते सादरीकरण आवडलं. ते स्किट खूपच भारी होतं असं नाही पण दोन बायका एकत्र येऊन विनोदी सादरीकरण करु शकत नाहीत, या धारणेला तर आम्ही छेद देऊ शकलो.अन्यथा विनोदी कार्यक्रमांमधे कलाकारांच्या जोड्या, स्त्री - पुरुष किंवा पुरुष - पुरुष अशाच असतात. दोन स्त्री कलाकारांचा एकत्रित विनोदी परफॉर्मन्स सहसा पाहायला मिळत नाही.
(रसिका आगाशे आणि तृप्ती खामकरच्या ह्या विनोदी सादरीकरणाचा विडिओ ह्या लिंकवर पाहता येईल. https://www.youtube.com/watch?v=umGkaBMCQk8 )
दोन बायका एकत्र आल्या की त्या काय करणार तर गॉसिप..असे काही स्टिरियोटाईप्स तर आपल्याकडे जाणीवपूर्वक रुजवलेले आहेत. हल्ली व्हॉट्सअपवरही बायकांबदद्ल वाह्यात जोक्स लिहून फॉरवर्ड केले जातात. ज्यात बाईला कमी लेखलेलं असतं, त्यांची अक्कल काढलेली असते. बायकांच्या गाडी चालवण्यावरुन विनोद केलेले असतात. मला असे जोक्स पाठवणाऱ्यांचा भयंकर संताप येतो. अशा लोकांशी मी संवाद करायचा प्रयत्न करते आणि बरेचदा भांडतेही. तर मुद्दा बायकांना कॉमेडी किती कळते, किती सादर करता येते, किती लिहिता येते आणि त्यामागे कारणं काय आहेत, हे ‘समजून’ घेण्याचा आहे, त्यावरुन फालतू विनोद करणं योग्य नाही.. पण दुर्दैवाने याचंच प्रतिबिंब आपल्या टेलिव्हिजन कार्यक्रमातही दिसतं. विनोदी कार्यक्रमांमध्ये बॉडीशेमिंग, जाडेपणा, रंग यासारख्या गोष्टींचा वापर विनोदनिर्मितीसाठी केला जातो. असं करणं हे अनेक कलाकारांना खटकतंही. महिला कलाकारांनाही या गोष्टींना नकार द्यावासा वाटतो पण ज्याचं पोट फक्त अभिनयावर चालतं, त्याला तिथं बंडखोरी करता येत नाही आणि अभिनय करताना नटाला आशयाचं स्वातंत्र्य नसतं. समोर जी संहिता असेल, त्यानुसारच काम करणं अपेक्षित असतं, कलाकृतीच्या आशयात बदल करण्याची लिबर्टी तुम्हाला लेखक - दिग्दर्शक झाल्यावर मिळते. त्यामुळे मी फक्त अभिनय करत होते तेव्हा मलाही या अपरिहार्यतेतून जावं लागलेलं आहे. शिवाय कॉमेडी करताना नटाला राजकीय मतं असणं, ती व्यक्त करणं आपल्या इंडस्ट्रीत धक्कादायक ठरतं. ती मतं उघड झाली की नंतर लोक तुम्हाला कामासाठी विचारत नाहीत. मलाही फू बाई फू च्या नंतरच्या सीझन्समध्ये सहभागी होण्यासाठी विचारणा झाली नाही. मराठी इंडस्ट्रीसाठी तर जणू माझं अस्तित्वच नाही. त्यात आता तर माझ्या नावापुढे ‘रायटर, डिरेक्टर’नंतर ‘एक्टीविस्ट’ असंही लिहिलं जातं, जी मी नाहीये पण मी जे करते, त्यामुळे लोकांना तसं वाटतं.

प्रश्न - तू म्हणतेस तसं जेव्हा निर्णय स्वातंत्र्य तु मिळवलंस किंवा ती पॉवर आली, तेव्हापासून कोणत्या प्रकारच्या कलाकृती तू केल्यास, त्यात विनोद, ह्युमरचा कसा वापर केलेला आहे?
उत्तर - दिल्लीच्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर मी म्युझियम हे निषेध नाटक दिग्दर्शित करुन देशभर विविध ठिकाणी त्याचे प्रयोग केले. या नाटकात द्रौपदी, सीता, शुर्पणखा या पौराणिक कलाकृतींमधल्या स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या आयुष्याचं विनोदी अंगाने केलेलं कथन आहे. या स्त्रियांबाबतची मिथकं आणि आजच्या स्त्रीचं जगणं यात फार फरक नाहीये, त्यामुळे आजच्या काळातल्या द्रौपदी, सीता, शुर्पणखेचं आजच्याच भाषेत काय म्हणणं आहे, ते विनोदी, गंमतीशीर अंगाने या नाटकात पाहायला मिळतं. यात गंमती-जंमती, विनोद असला तरी तो अंतर्मुख करणारा, प्रश्न विचारणारा आहे. नाटकाचं सादरीकरण हे प्रबोधनकारी असण्यापेक्षा मनोरंजक असेल हे नाटकाच्या सुरुवातीलाच आम्ही फार जाणीवपूर्वक ठरवलं होतं.
(नाटकाची युट्यूब लिंक - https://www.youtube.com/watch?v=U2-f2Ryq_Dw&t=1431s)

असंच माझ्या गिट्टू बिट्टू या अलीकडच्या नाटकाचं आहे. बरा - वाईट स्पर्श, लहान बालकांचं लैंगिक शोषण, पालक आणि मुलांमधल्या विसंवादाचे परिणाम असे त्यातल्या कथावस्तूचे कितीतरी पदर सांगणं आव्हानात्मक होतं, हे सांगताना ते नाटक प्रचारकी होण्याची शक्यता होती, त्यामुळे त्यातही खुमासदार विनोद, उपहासाचा वापर करुन संवाद लिहिले आणि त्याचा अपेक्षित परिणाम झाला. ‘हारुस मारुस’ हे मी दिग्दर्शित केलेलं नाटकही भांडवलशाहीवर नर्मविनोदी अंगानं भाष्य करणारं नाटक आहे. ‘सत भाषै रैदास’ या नाटकातही काही प्रमाणात अशा शैलीचा वापर आम्ही केला आहे. ‘टोपी शुक्ला’ या कादंबरीचं अभिवाचन आम्ही केलं. मला असं वाटतं विनोद राजकीय असतो. फार पुर्वीपासून नाट्य - कलाक्षेत्रात त्याचा वापर झाला आहे. अगदी पाश्चिमात्य रंगभूमीपासून ते आपल्याकडच्या तमाशा या कलाप्रकारातही त्याचा चपखल वापर केलेला दिसतो. विनोदाचा वापर मनोरंजन आणि लोकशिक्षणासाठी, प्रबोधनासाठीही करता येतो, त्यादृष्टीने फारसा विचार आपल्याकडे (मराठीत) केला जात नाही. सध्या मी ‘आओ औरत बाचे’ या स्त्री साहित्याच्या अभिवाचन मालिकेत विविध स्त्री लेखिकांच्या निवडक साहित्याचं अभिवाचन करते आहे. यात आम्ही महाश्वेतादेवी, कुरतुल ऐन हैदर ते आताच्या अरुंधती रॉय यांसारख्या स्त्री लेखिकांच्या साहित्याचं अभिवाचन केलं. याच मालिकेत मला विनोदी लेखन केलेल्या एखाद्या स्त्रीच्या साहित्याचं अभिवाचन करायचं होतं. त्यासाठी मी अनेक दिवसांपासून तसं लेखन करणारी लेखिका आणि लेखन शोधतेय पण तसं निव्वळ विनोदी लेखन असलेली कोणी लेखिका मला अजून तरी सापडली नाही. तेव्हा माझ्या मनात हा विचार आला की, का बरं स्त्रिया विनोदी लेखन करत नाहीत?
प्रश्न- तुला काय वाटतं? स्त्रियांचं अत्यल्प वा नगण्य विनोदी लेखन, याची काय कारणं असावीत?
उत्तर - याबद्दल मलाही अनेक प्रश्न आहेत. काही निरिक्षणं आहेत. स्त्री लेखिकेनं लिहिलेलं धमाल विनोदी असं मराठीतही मला फारसं सापडलं नाही. मराठीतले स्त्री पु. ल. देशपांडे कोण? या प्रश्नाचं उत्तर जवळपास नाहीच आपल्याकडे. त्यामागच्या कारणांचा विचार केला तर असं वाटतं की आपल्याकडे बायकांचे मूलभूत प्रश्नच अजून सुटलेले नाहीत. वैयक्तिक माझं म्हणायचं झालं तर रांधा, वाढा, उष्टी काढा यातून माझ्या आधीच्या पिढीतल्या स्त्रीनंही सुटका करुन घेतली होती, त्यामुळे माझ्या पिढीला ते भोगावं लागलं नाही. आणि माझ्यासारख्या स्त्रियांची संख्या खूप कमी आहे. दैनंदिन आयुष्यातल्या अनेक समस्यांमधे बऱ्याच बायका इतक्या पिचून गेलेल्या असतात की त्यांना मोकळेपणानं हसायलाही फुरसत, सवलत अनेकदा मुभाही नसते. अशावेळी त्या विनोदाचा विचार कसा आणि किती करणार? बायकांना विनोदाचा सेन्स कमी असतो, असं म्हणलं जातं, त्यात काहीअंशी तथ्य आहे. पण ते तथ्य समजून घेतलं पाहिजे, त्याची खिल्ली उडवता कामा नये. एखादीच्या आयुष्यातला अडचणींचा डोंगर संपतच नसेल तर ती कितीशी हसणार? तिच्या आजूबाजूचं वातावरण गंभीरच असलं तर विनोद तिच्यापर्यंत कोणत्या माध्यमातून आणि कसा पोहोचणार आणि त्यावर ती कशी रिएक्ट होणार? आणि विनोद निर्मिती तरी कशी करणार? हे खूप गुंतागुंतीचे प्रश्न आहेत.
एक थोडासा वेगळा अनुभव मला उत्तरेकडच्या राज्यात आला. आमच्या म्युझियम या नाटकाचे अनेक प्रयोग आम्ही कष्टकरी महिलांच्या वस्त्यांमधेही केले. उत्तर भारतात अनेक ठिकाणी या नाटकातल्या काही डाललॉग्जवर बायका अक्षरश: शिट्ट्या मारुन दाद द्यायच्या. त्यांना ते प्रचंड आवडलं. ‘खाप पंचायत जर असं म्हणते की मुलगी ही घराची इज्जत - नाक वगेरे आहे, तर ती मुलगीही तोच रुबाब गाजवून म्हणू शकते की, मी तर घराचं नाक आहे, मग मला तुम्ही शिक्षण दिलं पाहिजे, माझ्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत’, अशा आशयाच्या काहीशा विनोदी शैलीतल्या संवादांशी त्या बायका स्वत:ला खूप रिलेट करु शकायच्या. उत्तर भारतीय बायकांची आणखी एक गंमत आहे. त्या बायका- बायकांंमधे लैंगिक संबंधांबाबत मोकळेपणाने बोलतात. त्यात जोक्स असतात, चावट जोक्स पण हार्मलेस असतात. अगदी तुझी पहिली रात्र आणि माझी पहिली रात्र यावरही त्या बोलतात, तेही भरपूर विनोदी, हलक्या-फुलक्या पद्धतीने. असा मोकळेपणा मला महाराष्ट्रातल्या स्त्रियांमधे दिसला नाही.
प्रश्न - अलीकडे स्टॅंड अप कॉमेडीचे अनेक कार्यक्रम होतात, 'गर्लियापा'सारखे काही युट्यूब चॅनल्स आहेत, ज्यावर चांगला आशय असलेले कॉमेडी कार्यक्रम दाखवले जातात, ते तू पाहतेस का, त्याबद्दल तुला काय वाटतं?
उत्तर - मी स्टॅंड अप कॉमेडी पाहते. कुणाल कामरा, वरुण ग्रोवरसारखी मुलं आज खूप संवेदनशीलपणे कॉमेडी सादर करतात, ज्यात टोकदार राजकीय भाष्य असतं. शिवाय मला त्यांचं वेगळेपण हे जाणवलं की ते महिला/मुलींवर सेक्सिस्ट, मिसोजिनिस्ट विनोद करत नाहीत. उलट स्त्रियांना कमी लेखणारी कृती किंवा टिपण्णी केली असेल, तर त्याचा ते त्यांच्या स्किटमधून खरपूस समाचार घेतात. अगदी त्यांच्या विरोधी राजकीय विचारसरणीच्या महिला नेत्यांवरही त्यांनी कधी नकोसे वाटणारे विनोद केलेले नाहीत. त्यामुळे ही एक आशादायी गोष्ट वाटते. दुसरी आवडणारी गोष्ट म्हणजे सोशल मीडियावरचे मीम्स. महाराष्ट्रातल्या सध्याच्या पॉलिटिकल ड्रामावर अनेक मीम्स शेयर झाले. मला आलेल्या मीम्सपैकी चक दे इंडियामधल्या शाहरुख खानच्या डायलॉगवर केलेला मीम मी खूप एंजॉय केला, ज्या मीम्समध्ये अशी प्रासंगिकता असते, जे निखळ हसायला लावतं ते मला आवडतं. पण असेही अनेक मीम्स आले, ज्यात लग्न, पाट लावणं, पळून जाणं, मुलीचं चारित्र्य इ. इ. गोष्टी होत्या. हे दोन कारणांमुळे होतं. एक तर आपल्या पितृसत्ताक समाजात मुलीची इज्जत म्हणजे काचेचं भांडं अशी रुजवण झाली आहे आणि बऱ्याचदा अशा प्रकारच्या विनोदातून आपला अपमान केला जातोय, हेच बायकांना कळत नाही, म्हणून त्याही ते जोक्स फॉरवर्ड करतात. त्यांचा अपमान त्यांना समजत नाही कारण आपल्याला काही मान आहे, हेच त्यांच्यावर बिंबवलेलं नाही. त्यामुळे अशा प्रकारचे मीम्स पाठवणाऱ्यांना जसं टोकणं गरजेचं आहे, तसंच ते पाठवणाऱ्या स्त्रियांशी त्याबद्दल संवाद करणं, त्यांना त्याची जाणीव करुन देणंही गरजेचं आहे. अर्थात ते प्रत्येकवेळी शक्य होईलच असं नाही. मग अशावेळी माझ्या हातात काय आहे, ते मी करायला हवं. स्त्रियांचा अपमान करणारा, त्य़ांना कमी लेखणारा आशय एखाद्या कलाकृतीत येत असेल आणि तो काढून टाकण्याची संधी माझ्या हातात असेल, तर मी ते केलं पाहिजे, हे मी करते. इथपर्यंतच थांबून चालणार नाही तर स्त्रियांबाबतच्या समाजाच्या धारणांवरच टोकदार विनोदाने प्रहार करता आला पाहिजे.
हल्लीच्या विनोदी कार्यक्रमांमधे पुरुष स्त्री वेष परिधान करुन स्त्री पात्रं रंगवताना जे हिणकस विनोद करतात, तेही मला खूप खटकतं. मी असं काही पाहत नाही मग. 'गर्लियापा' बद्दल मी ऐकलं आहे, अजून पाहिलेलं नाही. मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल..आमच्या नाटकाच्या टीममधली मुलं- मुली इतक्या मोकळ्या वातावरणात वाढत आहेत की त्यांना बाईच्या मासिक पाळीपासून, सॅनिटरी नॅपकिन्सपर्यंत कशावरही बोलायला संकोच वाटत नाही. माझ्या बॅगमधे नेहमीच सॅनिटरी नॅपकीन्स असतात, मुलंही ती बॅग मोकळेपणाने हाताळतात. मग एखादीला पाळी आली असली तर आमच्याकडे अरे बापरे! असं होत नाही. उलट ‘आज तेरा खुनी फ्रायडे’ मतलब तू थक गयी होगी.. असे हलकेफुलके गंमतीशीर डायलॉग्ज, जोक्स असतात. अशा प्रकारचे विनोद निखळ आहेत आणि त्यामुळे उलट मासिक पाळीसारखे विषय कुजबुज करण्याचे राहत नाहीत. त्याबद्दल बोलण्यात सहजता येते.
प्रश्न -विनोद, उपहासगर्भ शैली याचा मनोरंजनासाठी आणि लोकशिक्षणासाठीही चांगला वापर करता येतो, हे तू तुझ्या जवळपास सर्व कलाकृतींमधून यशस्वीपणे दाखवून दिलेलं आहेस. हे सारं कुठून येतं? तू कोणाला आदर्श मानतेस, अशा प्रकारचं काम करण्यासाठी काय करावं लागतं?
उत्तर - बोलण्याचे सर्व मार्ग जेव्हा बंद होतात, तेव्हा ह्युमर बेस्ट असतो असं मला वाटतं, ह्युमर खूप काही सांगून जातो. याबाबतीत ‘दारियो फो’ हा लेखक- नाटककार माझा आदर्श आहे. त्याशिवाय आपल्याकडे आपल्या मातीतल्याही काही गोष्टी आहेत. तमाशासारखं माध्यम आहे. बबन प्रभू आपल्याकडे चांगलं फार्सिकल लिहित होते. अर्थात त्या लेखनात काही सेक्सीस्ट कमेंट्स असायच्या, त्या काळात आजच्या इतकी लिंगभाव, भेदभावाची चर्चा नव्हती, त्यामुळे असेल कदाचित. पण तसा काहीसा भाग वगळता त्यांचा फार्स प्रभावी होता.
हरिशंकर परसाईंच्या साहित्यात खूप उपहास, उपरोधिक टोकदारपणा दिसतो. हे सगळं आपल्या आजूबाजूलाच आहे. संवेदनशीलपणे वाचलं. त्यावर विचार केला, की त्यातल्या गंमती गवसतात. मी काही गोष्टींवर बोलायचं ठरवलं आहे. सामाजिक प्रश्न आहेत, राजकीय आहेत, मला माणूस म्हणून अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी आहेत, त्यावर बोलल्याशिवाय माझ्यातली अस्वस्थता संपत नाही, त्यामुळे मी नाटक हे माध्यम निवडलंय. पण ते नाटक मनोरंजक बनवलं पाहिजे. प्रचारकी बनवून उपयोग नाही.. मग ते मनोरंजक करण्यासाठी मी वेगवेगळे मार्ग वापरते. संहिता लिहितानाच या सगळ्याचं भान ठेवणं, दिग्दर्शक म्हणून वेगळे प्रयोग करणं, नेपथ्य - प्रकाश - संगीतात काही वेगळ्या गोष्टी करुन पाहणं हे ओघाने आलंच. कधी तरी त्यात अपयशही येऊ शकतं, अडचणी येऊ शकतात. म्युझियम या नाटकाचं चित्रीकरण करुन ते युट्यूबवर पाहायला उपलब्ध केल्यानंतर त्या विडिओखाली अनेकांनी शिव्यांची लाखोली वाहिली, घाणेरड्या भाषेत ट्रोलिंग केलं गेलं. आम्हाला वाईट चालीच्या बायका म्हणण्यापर्य़ंत कमेंट्स गेल्या, पण आपली इज्जत ‘त्या अडीच इंचात’ नाही, हे स्वत:शी स्पष्ट असल्याने त्या गोष्टींशीही डील करता आलं. अशा गोष्टी होत राहतात पण प्रयत्न सुरु ठेवले पाहिजेत. मुळात मी स्वत:ला सुपरवुमन समजत नाही. आय एम अ फॉल्टी वुमन, आय कॅन मेक मिस्टेक्स हे इतकं साधं आहे!


