सिनेमातले स्त्रीवादी विनोद !

मला टीव्ही बघायला अजिबात आवडत नाही. टीव्हीवर मी जास्तीत जास्त बातम्या बघू शकते. पण त्यावरच्या हिन्दी, मराठी रडक्या सिरियल्स – अपने बस की बात नहीं ! पण फिल्म्स बघायला मात्र मला आवडतात. कॉलेजात जाण्यापूर्वी मी हिन्दी फिल्म्स आवडीने पाहत होते. तेव्हाही इंग्लिश फिल्म्सची थोडी ओळख झालेलीच होती. पण film appreciation वर्कशॉप्स मुळे जागतिक फिल्म्सची ओळख होत गेली. पूर्वी आपल्या आवडीच्या फिल्म्सची देवाणघेवाण मित्र मैत्रिणींच्या मार्फतच व्हायची. नेटफ्लिक्स आणि प्राइम विडिओ आल्यापासून मेरील स्ट्रिप, ऑड्रि हेपबर्न, फ्रँक कापराच्या अर्ध्यापेक्षा जास्त, वेस अँडर्सनच्या सगळ्या आणि अजून पण भरपूर ‘क्लासिक’ फिल्म्स बघून झालेल्या आहेत.  
ह्यातल्या सगळ्याच फिल्म्स मला आवडल्या आहेत किंवा मी फक्त क्लासिक्स बघते - असं अजिबात नाही. मला जंक फिल्म्ससुद्धा आवडतात. (जंक फिल्म्स म्हणजे ज्या फिल्म्स फार विचार करायला लावत नाहीत अशा. टाइम पास फिल्म्स. त्या आर्ट फिल्म्स पेक्षा जास्त प्रसिद्ध असतात.) तरीही ‘हम साथ साथ है’ पेक्षा ‘द बिग वेडिंग’ शी मी नक्कीच जास्त रिलेट होऊ शकते. ‘बॅंड बाजा बारात’ पेक्षा मला ‘डेव्हिल वेअर्स प्राडा’ मला जास्त अपील होतो. याचं एक कारण म्हणजे अनेक भारतीय फिल्म्स पेक्षा इंग्लिश फिल्म्स मध्ये नतेसंबंधांचे चित्रण बारकाईने केलेलं असतं. आणि दुसरं कारण म्हणजे त्यातले कॉमेडी सीन्स! भारतीय फिल्म्स मध्ये विनोदासाठी जे साचे वापरले जातात त्यापेक्षा बऱ्याच निराळ्या प्रकारचा विनोद परदेशी सिनेमात पाहायला मिळतो.
खरं म्हणजे माझ्यासारख्या स्त्रीवादी मुलीला रिलेट होता येईल अशा कॉमेडी फिल्म्स हॉलीवूड काय किंवा बॉलीवूड काय - कुठेही फार नाहीच आहेत. कारण 80 टक्के फिल्म्स मध्ये विनोदाचा उपयोग बायकांचा अपमान करण्यासाठी केला जातो. कधी बायकांच्या लैंगिकतेवरुन खिल्ली उडवली जाते, कधी रंगावरून तर कधी जाडेपणा वरून. असल्या आचरटपणामुळे सिनेमा बघायची मजाच निघून जाते. पण कधीकधी अशा ठोकळेबाजपणाच्या पलीकडे जाणारा प्रासंगिक विनोद पाहायला मिळतो.तर मला आवडलेल्या अशाच काही विनोदी सीन्सची लिस्ट मी इथे देते आहे. हे सगळेच विनोद काही खदाखदा हसायचे विनोद नाहीत. शब्द बंबाळ तर अजिबात नाहीत.पण तुम्ही सुद्धा जर मीसॉजिनिस्ट/स्त्रीद्वेषी नसाल तर ह्या फिल्म्स नक्की बघा.
सध्या Love, Rosie ह्या फिल्म मधला सीन माझ्या लिस्टमध्ये एक नंबर वर आहे ही 2014 मध्ये आलेली इंग्लिश फिल्म आहे. सिसिलिया अहनच्या Where rainbows end ह्या कादंबरीवर आधारित आहे. ही रोझी आणि तिचा लहानपणापासूनचा मित्र अॅलेक्स ह्यांची लव स्टोरी! ‘बिफोर’ ट्रीलॉजी नंतर मला हीच लवस्टोरी सगळ्यात जास्त आवडते. इतर लव स्टोरीज सारखे ह्यातले हीरो हिरोईन एकमेकांच्या प्रेमात नाकापर्यंत बुडालेले नाही दाखवलेत.
ते दोघंही संधीसाधू आहेत, चुका करतात, एकमेकांचे अपमान करतात, त्यांच्यात नीट कम्युनिकेशन नाही आणि तरी प्रेम आहे. एकदा रोझी आणि अॅलेक्स खूप दारू पितात आणि kiss करतात. पण दुसऱ्याच क्षणी रोझी पाय घसरून पडते आणि डोक्यावर आपटते. दुसऱ्या दिवशी अर्थात तिला आदल्या रात्रीचं फार काही आठवत नसतं. अगदी kiss देखील नाही! त्यातच ती अॅलेक्सला म्हणते, ‘मी काल किती घाण वागले, मला खूप लाज वाटत्ये, आपण परत कधीच कालच्या रात्रीचा विषय काढायचा नाही.’ इथे ती बोलत असते, दारू पिऊन पडण्याबद्दल पण अॅलेक्सला वाटतं की रोझीला आपल्यात मैत्री व्यतिरिक्त दूसरा काही इंटरेस्ट नाहीये! म्हणून तो पण परत विषय काढत नाही. आणि पुढची कित्येक वर्षं त्यांच्यात हा गैरसमज तसाच राहतो. त्यामुळेच ही फिल्म घडत जाते.अशा ह्या फिल्म मधला माझा आवडता विनोदी प्रसंग
 - अॅलेक्स एका मुलीला घेऊन स्कूल डान्सला जातो. मग रोझी पण शाळेतल्या सगळ्यात हॉट मुलाबरोबर जायचं आणि नंतर सेक्स पण करायचं असं ठरवते. पण दुर्दैवाने तिच्या सगळ्या प्लॅनचा चुराडा होतो. ते जेव्हा सेक्स करायचा प्रयत्न करतात तेव्हा कोंडोम चुकून तिच्या योनिमध्येच अडकतं आणि तिला एकटीला ते काढता येईनासं होतं. ती भयानक पॅनीक होते, अॅलेक्सला फोन करते, काय झालंय ते सांगते आणि मग तो तिला डॉक्टर कडे घेऊन जातो. पण तो मुलगा मात्र पूर्ण वेळ तिची टिंगल करत राहतो आणि हसत राहतो.
मला ह्या सगळ्या गोंधळातला वास्तविकपणा  खूपच अपील होतो. अठरा वर्षाची मुलं कोणाचाही गाईडन्स / सल्ला न घेता सेक्स करायला जातात, त्यांच्या स्वतःकडून आणि पार्टनर कडून पण पहिल्यावेळेबद्दल अगदी अवास्तव अपेक्षा आहेत. आपला प्रयत्न फसला तर काय करायचं ह्याचं प्लॅनिंग नाहीये . आणि ह्या सगळ्यात त्या मुलाची इनसेंसीटीविटी! आपल्या चुकीमुळे कोंडम तिच्या योनीत अडकलंय हे मान्य करायची लाज वाटते. क्लासिक टॉक्सिक मॅस्क्यूलिनिटी! ह्या अख्या सीनमधला Rawness आपल्याला एकीकडे अस्वस्थ करतो, त्रासदायक वाटतो आणि त्या विचित्र परिस्थितीचं हसायला पण येतं. कदाचित म्हणूनच आपल्याला त्याच्याशी रिलेट पण होता येतं.
दुसरा आवडता प्रसंग आहे - When harry met sally मधला ! ही 1989 मधली फिल्म आहे. त्यातला हा रेस्टोरंट मधला सीन बहुतेक सगळ्यांना माहीत असणार. हॅरी आणि सॅली एका गजबजलेल्या रेस्टॉरंट मध्ये बसून खात आहेत आणि त्यांचा वाद चाललाय.
हॅरी फुशारक्या मारत असतो की - मी ज्या बायकांबरोबर झोपतो त्या माझ्या बरोबर असताना नक्कीच भरपूर एंजॉय करतात याची मला खात्री आहे! मी प्रत्येकीला ऑरगॅझम दिलाय.
सॅली विचारते - कशावरून? बहुतेक बायका तर वन नाइट स्टँड मध्ये ऑरगॅझम फेक करतात.
पण त्याला तिचं म्हणणं पटत नाही, म्हणून सॅली त्याला तिथल्यातिथे रेस्टॉरंट मध्ये बसल्या बसल्या सगळ्यांच्या समोर एक खोटा ऑरगॅझम परफॉर्म करून दाखवते. आणि हॅरी च्या गोड गैरसमजावर बोळा फिरवते. ह्या सिनचा कळस म्हणजे त्यांच्या शेजारच्या टेबलवर बसलेली बाई सॅलीकडे बोट दाखवून वेटरला म्हणते ‘ती असं काय खात्ये? मला पण तेच द्या.’ मला हा सीन पुरुषांच्या पोकळ आत्मविश्वासाच्या चिंध्या करणारा वाटतो. कित्येक पुरुषांना तर हे सुद्धा मान्य नसतं की बाईला पण ऑरगॅझम मिळू शकतो. मग तिला तो मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं तर लांबची गोष्ट राहिली! 
काही पुरुष तर गृहीत धरून चालतात की सेक्स करताना तर तिला आपोआप ऑरगॅझम मिळालाच असेल. आपण त्याच्यासाठी वेगळं काही करायची काय गरज? पुरुषांची बाईच्या ऑरगॅझम विषयीची ‘निष्कामबुद्धी’ ही कित्येक बायकांच्या डिप्रेशनचं आणि लग्न मोडण्याचंही कारण असते. When harry met sally ही 1989 मध्ये आलेली फिल्म असली तरी 2019 मध्ये सुद्धा हा विषय तेवढाच समर्पक आहे. त्यामुळे माझ्यामते हा सीन कट्टर स्त्रीवादी आहे. 
माझा आणखी एक आवडता विनोदी प्रसंग आहे Crazy stupid love ह्या फिल्म मधला! ही काही स्त्रीवादी फिल्म आहे असं मला अजिबात वाटत नाही. हा एक टिपिकल हॉलिवूडी कॉमेडी ड्रामा आहे. पण ह्यातला मला आवडलेला सीन हा - 
 एकदा हीरो एका बार मध्ये हिरोईनशी काहीही ओळख नसताना भरपूर फ्लर्ट करतो. आणि तिला त्याच्याबरोबर त्याच्या घरी चलायची ऑफर देतो. (अर्थात सेक्स करायला) पण ती काही त्याला भाव देत नाही आणि आपल्या घरी निघून जाते. मग खूप दिवसांनी तिचं तिच्या बॉयफ्रेंडशी ब्रेकअप होतं. तिला तिच्या बॉयफ्रेंडचा खूप राग आलेला असतो. म्हणून ती ह्या हीरोला शोधत शोधत त्याच बार मध्ये येते. तो तर काय तयारच असतो. पण त्याच्या घरी पोचल्यावर ती नर्वस व्हायला लागते. पण तरीही ती त्याला म्हणत राहते की - ‘मी आज सेक्स करणार म्हणजे करणारच आहे!’ शिवाय ती त्याला असं पण ऐकवते की - ‘तुला वाटत असेल की मी अशीच बडबड करून दमेन आणि झोपून जाईन. मग तू माझ्या अंगावर पांघरूण घालशील, माझी पप्पी घेशील आणि दिवा बंद करशील, तर तसं काही होणार नाहीये. मी सेक्स करायला आल्ये आणि सेक्सच करणार आहे!’ मग ते गप्पा मारायला लागतात आणि बोलता बोलता हिरोलाच झोप लागून जाते. मग ती त्याच्या अंगावर पांघरूण घालते, त्याची पप्पी घेते आणि दिवा बंद करून टाकते! 
जेव्हा जेव्हा हुकप किंवा वन नाइट स्टँडचा मुद्दा येतो, तेव्हा तेव्हा पुरुषांची टॉक्सिक मॅस्क्यूलिनिटी उतू जात असते. एवढंच काय, जी मुलगी हुकपला नकार देते तिच्याशी तर बोलणंच टाकतात किंवा तिची बदनामी करतात. पण जी होकार देते तिच्याशी हुकपनंतर संपर्क ठेवणं तर दूर कधी कधी ते ओळख पण दाखवत नाहीत.पण ह्या सीन मध्ये त्या हीरोला vulnerable बघून आणि मुलीबद्दल जाणून घ्यायला उत्सुक बघून बरं वाटलं.
भारतामध्ये अजूनही लग्नाआधी मुला-मुलींनी सेक्स करण्याला घोर पाप समजलं जातं. आणि त्यात तुम्ही सेक्स करताना पकडला गेलात तर मग तर तुम्ही संपलातच! अशा वेळी मुलीला मरणाचं रीडीक्युल केलं जातं, उपाशी ठेवलं जातं आणि फटके तर पडतातच पण तिचं लगेच लग्न पण उरकून टाकलं जातं. (मुलाचं काय होतं माहीत नाही.) या पार्श्वभूमीवर मला “मनमरझियां’ सिनेमातला एक सीन फार आवडला होता. ही फिल्म फार चालली नाही म्हणे! पण मला आवडली होती. आजची गोष्ट, आजचे प्रॉब्लेम्स, तिन्ही लीड कॅरेक्टर्स वर उत्तम काम केलेलं आहे आणि गोष्टीचा स्पीड पण चांगला आहे. रुमी (तापसी) आणि वीकी (वीकी कौशल)चं जोरदार अफेअर सुरू असतं. त्यांची एका Dating app वर भेट झालेली असते आणि दोघं घरातल्यांना पत्ता पण लागू न देता रुमीच्याच घरी सेक्स करत असतात. पण एकदा पत्ता लागतोच. एकदा रुमीची काकू विकीला गच्ची वरुन घरात घुसताना बघते. मग घरातली माणसं तिच्या खोलीचा दरवाजा बडवून बडवून वीकी खिडकीतून सटकायच्या आधीच त्याला पकडतात. थोडा वेळ सगळे फक्त एकमेकांकडे बघत राहतात. मग विकी निघून जातो. सगळे रुमी कडे वळतात. आपल्याला वाटायला लागतं की आता हिची वाट लागणार! मला जर कोणी असं पकडलं तर मी स्पष्टीकरणं देत बसेन. पण असं काहीच होत नाही. रूमी फक्त म्हणते - ‘हां तो उसमे क्या हुआ?’ आणि खोलीतून निघून जाते. घरातले गप्प ते गप्पच! अशा मुलीला बोलणार तरी काय?

भारतीय सिनेमात लैंगिकते विषयी Unapologetic पद्धतीने क्वचितच काही बोललं जातं! पण Angry Indian goddesses ही फिल्म त्याला अपवाद होती. बायकांच्या दोस्तान्या बद्दलची (दिल चाहता है, जिंदगी ना... कॅटेगरी मधली) मला वाटतं ही पहिलीच हिन्दी फिल्म असावी. तशी ही फिल्म मला फार काही आवडली नव्हती. कारण एकाच फिल्ममधे खूप मुद्दे कोंबल्यासारखं वाटत होतं. पण हा त्यातला हा जो एक सीन आहे, तो मी कधीच विसरणार नाही. ह्या मैत्रिणींच्या ग्रुपमधे एक लेस्बिअन कपल आहे आणि  त्यांच्याच लग्नासाठी सगळ्या एकत्र जमलेल्या असतात. त्या सगळया राहत असलेल्या घरात एक जख्ख म्हाताऱ्या आजीबाई कपडे धुवायचं काम करत असतात.
त्यांना या सगळ्या जीन्स घालणाऱ्या उच्चभ्रू मुलींबद्दल खूप अप्रूप वाटत असतं. आजींना जेव्हा ह्या लग्नाबद्दल कळतं तेव्हा त्या मुलींकडे येतात आणि म्हणतात की मला काही लग्नाला येणं जमणार नाहीये; पण मला माझ्या पद्धतीने तुम्हाला आशीर्वाद द्यायचाय. असं म्हणून त्या चक्क फोन वर गाणं लाऊन मस्त डान्स करायला लागतात.
मुलींना एवढं छान वाटतं, की त्या पण आजींना जॉईन होतात. आणि सगळे डान्स करत असताना सीन संपतो. हे कितीही अनरियलीस्टिक असलं तरीही; दोन मुलींनी एकमेकींशी लग्न करायचं ठरवल्यावर, ह्या ७० वर्षाच्या, दात पडलेल्या आजींनी त्यांना एवढ्या प्रेमाने शुभेच्छा देताना बघून मी फक्त रडायचीच बाकी होते!

हा लेख ज्या प्रकारच्या विनोदाबद्दल आहे, त्या प्रकारचे खूप विनोद Queen या फिल्ममधेही आहेत. उदा. आजीने तिची समजूत काढण्याचा सीन, ती इनोसंटली चुकून सेक्स टॉईज विकत घेते तो सीन, सगळ्यात शेवटी ती अंगठी परत करते तो सीन इत्यादी. पण माझा आवडता सीन वेगळा आहे.
अॅमस्टरडॅम मधे कंगना त्या तीन मुलांबरोबर रूम शेअर करून राहत असते. तिची अजून त्यांच्याशी नीट ओळख झालेली नसते. एकदा सकाळी तिला जाग येते तेव्हा एक मुलगा बाथरूमच्या बाहेर वाट बघत उभा असतो. तिच्या एकदम लक्षात येतं की आपण अजून ब्रेसीयर घातलेली नाहीये. ती तशीच बाजूला पडलेली असते. ती खूप अवघडून जाते. ती पटकन ब्रेसीयर घेते आणि पांघरुणात शिरते. मग कमीत कमी वळवळ करून ती पांघरुणाच्या आतच ब्रेसीयर घालते आणि मगच पांघरुणातून बाहेर येते. मुलगा हे सगळं बघत असतो. आणि शेवटी तिला फक्त Thums up करतो! एवढंच - सीन संपला. आपल्या आसपास असताना एखाद्या बाईला कमफर्टेबल वाटावं म्हणून पुरुषाने जागरूक असणं हे नक्कीच एक स्त्रीवादी कृत्य आहे. ह्या सीन मधे पण तो मुलगा तिला हेच सांगायचा प्रयत्न करत असावा की एवढं सगळं करायची गरज नव्हती, मी काही पहिल्यांदा ब्रेसीयर बघत नाहिये!
बाईने सार्वजनिक जीवनात कसं वावरायचं ह्याचे जे नियम असतात त्यात तिने कसं हसायचं यावरही निर्बंध  असतातच. ही बंधने तोडणारे सीन्स क्वचितच हिन्दी फिल्म मध्ये बघायला मिळतात. त्यापैकी माझा सर्वात आवडता सीन आहे - 'तुम्हारी सुलू' मधला. एकदा सुलूच्या 'डायल-इन' कार्यक्रमात ती एका श्रोत्याला वेगवेगळ्या प्रकारे हसून दाखवत असते. एका क्षणी ती गोडगोड आणि सेक्सी हसणं सोडून अचानक खदाखदा विकट हास्य करते. तिला मार्गदर्शन करायला बसलेला सहकारी पण चमकून मागे सरकतो!  हा सीन मी ट्रेलर मध्ये पहिल्यापासून एंजॉय केलेला आहे. प्रत्यक्षा सिनेमात तर जास्तच मजा येते!
सर्वात शेवटी ‘चक दे इंडिया’ ह्या फिल्मचा खास उल्लेख झालाच पाहिजे. मी कोणत्याही मूड मधे ही फिल्म बघितली तरी मला मस्तच वाटतं. यातले आवडते सीन्स तर कितीतरी आहेत. सुरुवातीला एकेक मुलगी रजिस्ट्रेशन साठी येते तो सीन, ती मणिपूरची मुलगी छेडणाऱ्या मुलाच्या कानाखाली मारते तो सीन, मॅकडोनाल्ड मधला तो क्लासिक मारामारीचा सीन आणि अजुन पण कितीतरी आहेत. पण अशा सीन्स बद्दल बोलण्याऐवजी मला एक वेगळा मुद्दा मांडावासा वाटतो.
'बाईच बाईची सगळ्यात मोठी शत्रू असते' हा समाजाचा सगळ्यात आवडता गैरसमज असावा. जेव्हा बायका एकमेकींशी स्पर्धा करतात तेव्हा हेच वाक्य पुढे केलं जातं. (जसं काही पुरुष एकमेकांशी स्पर्धा करतच नाहीत!) पण माझ्यामते ह्या फिल्मने त्या गैरसमजाला पुसून काढलेलं आहे. जेव्हा १५ महत्वाकांक्षी खेळाडू मुली एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात स्पर्धा तर होणारच होती . ती अगदी बेसिक मानवी वृत्ती आहे. पण बायका स्पर्धेच्या बरोबरीने सहकार्य पण करतात हे या फिल्मने दाखवून दिलेलं आहे! बायकांचा जाडेपणा, निर्बुद्धपणा, आपसातली भांडणे, विनाकारण पैसे खर्च करणं – असे सगळे चावून चोथा झालेले मुद्दे न वापरता देखील इंटरेस्टिंग विनोदी प्रसंग निर्माण करता येतात – हेच ह्या सगळ्या फिल्म्स मधून दिसलेलं आहे. आपल्याला सगळ्यांनाच असे वेगळ्या स्टाईलचे विनोद पाहायला आवडतील - नाही का?
मुक्ता खरे
तरुण स्त्रीवादी रंगकर्मी आणि लेखिका. मराठी वृत्तपत्रातून लेख प्रकाशित झाले आहेत. अनेक लघुपटातून आणि योनीच्या मनीच्या गुजगोष्टी या नाटकात सहभाग.

7 Comments

  1. फ्रेश..फ्रेश,,फ्रेश!

    मस्तच,मुक्ता!

    ReplyDelete
  2. वा वा ..! मुक्ता ..�� अगदी मस्त अन मुक्त लिहिलंयस तू ... अशीच लिहिती राहा ...����

    ReplyDelete
  3. वा वा ..! �� मुक्ता ..!! मस्त आणि मुक्त लिहिलंयस तू ... अशीच लिहिती राहा .

    ������

    ReplyDelete
  4. आज आपण झपाट्याने मुक्त विचारांकडे.... त्यांच्या कृतींकडे वळतोय... तेही अगदी निर्बंधपणे...हिच काळाची गरज आहे...महत्वाच्या विषयावर मार्मिक वैचारिक लिखाण मुक्ता दी.... लिहीत रहा... आम्ही (स्त्रिया).. .बदलाच्या दिशेने वळतोय... 👏👏👏🙋

    ReplyDelete
  5. वा मुकता मस्तच। तुझे पाय काय पाळण्यात दिसले की काय? म्हणून मुक्ता नाव ठेवलं तुझं?पण ते काही असो।छान लिहिलं आहेस।अशीच लिहीत राहा।

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form