मंगला गोडबोले



मराठीत सातत्याने विनोदी लेखन करणार्‍या काही मोजक्या लेखिकांमध्ये मंगला गोडबोले या अतिशय महत्त्वाच्या लेखिका आहेत. त्यासोबत त्यांनी विविध विषयांवर गंभीर लेखनदेखील देखील केलेले आहे. त्यांच्या साहित्याला अनेक पुरस्कारांनी गौरवले गेले आहे. त्यात राज्य सरकारच्या आठ पुरस्कारांचाही समावेश आहे. गेल्या पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळापासून मंगला गोडबोले विनोदी लेखन करीत आहेत. त्यांची लेखन प्रक्रिया कशी असते? त्यांना आजच्या विनोदी लेखनाबद्दल काय वाटतं? अनेक स्त्रिया विनोदी लेखन करायचे का टाळतात? विनोद निर्मिती करण्यासाठी स्त्रियांनी कोणती वैशिष्ठ्ये अंगिकारली पाहिजेत? अशा अनेक प्रश्नांबद्दल वंदना खरे आणि अंजली जोशी यांनी मंगलाताईंशी केलेली ही बातचीत!

मंगलाताई, तुम्ही जेव्हा लेखनाला सुरुवात केलीत - त्याकाळी अनेक पुरुषांच्या विनोदी लेखनात स्त्रियांची बरीच टिंगल केलेली असायची. त्याला छेद देण्यासाठी तुम्ही विनोदी लिहायला लागलात का?

नाही, असा काही स्पष्ट विचार माझ्या मनात तेव्हा तरी नव्हता. आता तर मला असा दृष्टीकोनच संकुचित वाटतो. माझ्या दृष्टीने चांगलं साहित्य हे निर्हेतुक असावं. एखाद्या व्यक्तिला आपला जीवनानुभव कुणाला तरी सांगावासा वाटतोय, इथेच त्याचं प्रयोजन संपतं. साहित्यातून काही शिकवणे,विशिष्ट विचारांचा प्रभाव पाडणे ही तशी गैरसाहित्यिक प्रयोजनं आहेत. ती देखील चांगलीच आहेत आणि सगळ्या चळवळींना साहित्य लागतच असतं.
जरी मराठी साहित्यातला विनोद हा बायकांना खर्ची घालूनच केलेला होता, तरी त्याला उत्तर देण्यासाठी आपण लिहावं असं मला वाटलं नाही. पुरूषांना धडा शिकवण्यासाठी विनोदी लिहिणं खूप चुकीचं आहे. त्यातून निष्कारण द्वेषभावना निर्माण होईल, तो आपला हेतु नाही. चांगल्या सहजीवनाकडे जायचं असेल तर ते योग्यही  नाही. मी फक्त पुरुषांच्या बद्दल लिहीत बसले तर पुरुषासोबतच्या नात्याखेरीज आपलं इतर जे आयुष्य आहे - ते सगळे बंद होईल. माझं विश्व मीच मर्यादित करून घेतल्या सारखं होईल. ते चूक आहे. तरी पण बाईच्या चष्म्यातून हे जग कसं दिसतं? काही वेगळं दिसतं का – ते मांडावं या भावनेतून माझं लिहिणं आलं असावं. माझं लिखाण फक्त जागरूक बाईच्या चष्म्यातून जगाकडे पाहणे एवढंच आहे. लिहायला सुरुवात केली तेव्हा तर तितकं सुद्धा कळत नव्हतं!

तुमच्या घरातलं वातावरण लिखाणाला पोषक होतं का ?
मी अगदी सामान्य, मध्यमवर्गीय आणि पारंपरिक प्रकारच्या कुटुंबात वाढले. आमच्याकडे मुलींनी मोठ्या आवाजात हसणं सुद्धा वाईट मानलं जात असे. लिखाणाला काही प्रोत्साहन नव्हतं. पण त्याचबरोबर माझं वाचन बर्‍यापैकी होतं. बुद्धी बरी होती आणि कुठल्याही गोष्टीला स्वीकारण्याआधी त्याबद्दल ‘असं का?’ हे विचारायचा मनाचा कल होता! माहेरी असं वातावरण आणि मग माझं 22 व्या वर्षी लग्न झालं तेव्हा मी मुंबईहून कराडला गेले. तो देखील माझ्यासाठी एकप्रकारे कल्चरल शॉक होता! सासरी मोठं कुटुंब होतं.नवराही अतिशय पारंपरिक विचाराचा होता. मग रीतीनुसार दोन मुलं झाली, त्यांच्यात आपोआप गुंतले. तेव्हा आपल्याला काय वाटतं, हे पहाण्यापेक्षा इतरांना काय वाटतंय हे पहात बसावं लागायचं. तसं दुष्ट कुणीच नव्हतं बरं का! पण एकूणच सगळ्या नात्यागोत्यातली राजकारणं, सत्तासंघर्ष समजले – त्याचाही कंटाळा आला. त्यातून स्वभावाचा मुद्दा पण आहे. मला फार किरकिरीचाही कंटाळा येतो. म्हणून म्हटलं त्यातलीच काही गम्मत शोधावी आणि सांगावी यातूनच विनोदी लिखाण सुरू झालं. कदाचित माझ्या बाबतीत – अति झालं आणि हसू आलं – असंही झालं असेल!

तुम्हाला विनोद कसा सुचतो? काम करताना सुचले की टिपून ठेवता का? तुम्ही किती ड्राफ्ट्स करता?
माझ्या लिखाणाचे मी खूप ड्राफ्ट्स करते. पण काही सुचलं की नोंद करून ठेवायला मात्र नाही जमत! म्हणजे नेहमी लिखाणापेक्षा काहीतरी वेगळंच महत्त्वाचं काम निघत असतं. असे अनेक विषय विसरून गेलेले आहेत. पण मनात घोळत असलेले विषय चार वर्षांनी सुद्धा लिहिते, तोवर त्याच्यावर मनात काम चालू रहाते. माझ्या मनात खूप व्हीज्युअल्स सुरू असतात. मला लिखाणातून दिसणारा भूगोल महत्त्वाचा वाटतो. आपण ज्या प्रसंगाबद्दल लिहितोय त्यातल्या माणसांच्या हालचाली कोणत्या प्रकारच्या जागेत होणार आहेत याचं भान ठेवावं असं मला वाटतं. जरी मी सिनेमा, टीव्ही - अशा दृश्य माध्यमासाठी लिहिलेलं नसलं तरी मला ते भान महत्त्वाचं वाटतं. मनातल्या मनात तर माझ्या लिखाणाचे मी अनेक ड्राफ्ट्स करते. शिवाय प्रत्यक्ष लिहिताना सुद्धा दोन तीन ड्राफ्ट्स तरी करतेच! आणि शेवटावर सर्वात जास्त काम करते. त्यातल्या एखाद्या शब्दाला सुद्धा खूप महत्त्व असते. अगदी ‘मी’ लिहायचं की ‘मी ही’ लिहायचं यावर देखील मी खूप विचार करते! आपलं लिखाण गोळीबंद असणे – हे विनोदाची मुख्य गरज आहे.
 मंगला गोडबोले यांच्या "काम, क्रोध, मद, मत्सर इत्यादी'' लेखाचे अभिवाचन जरूर ऐका.

तुमच्या अनेक लेखांमध्ये ‘स्टँडअप कॉमेडी’ च्या शक्यता जाणवतात. तुम्ही कधी ‘स्टँडअप कॉमेडी’ लिहायचा विचार केलाय का? 
मला नाही वाटत,मी तशा प्रकारचं काही लिहिन! मला वाटतं की सध्याचं जे ‘स्टँडअप कॉमेडी’ प्रकारातलं लिखाण आहे ते खूप तत्कालिक असतं. शिवाय ते थोडं थिल्लरपणाकडे झुकतं. जरी मी विनोदी लिहलं असलं तरी त्याला विचारांचा मजबूत पाया होता.
तुम्ही काही काळ ‘स्त्री’ मासिकात काम केलं आहे, तुमचं ‘झुळूक’ हे सदर तिथेच सुरू झालं. तुमच्या लेखनावर स्त्रीवादी विचारांचा किती प्रभाव आहे ?
माझ्या लेखनाची सुरुवातच ‘स्त्री’ मासिकापासून झालेली आहे. मी कॉलेजात असताना ‘स्त्री’ मासिकात एक विनोदी कथा पाठवली होती. कथेचं नाव होतं - “कुलाब्यात कृष्णा कपूर”! कुलाब्याच्या मार्केटात जर राज कपूरची बायको कृष्णा आली तर काय होईल? अशी कल्पना करून त्याची गम्मत लिहिली होती. नंतर 1975 चं स्त्रीमुक्ती वर्ष आणि त्यानंतर स्त्रीमुक्ती दशक यांचा माझ्यावर खूप प्रभाव होता. काही काळ मला प्रामाणिकपणे असं वाटायचं की जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्त्रीवादात आहेत. तेव्हा मला स्त्रीवादी विचारांचं खूप आकर्षण होतं आणि अगदी आजही ते आहेच. पण वैयक्तिक जीवनात तो विचार पेलायची पुरेशी शक्ती मात्र नव्हती. मी नवर्‍यावर भावनिक दृष्ट्या खूप अवलंबून आहे, मुलाबाळांच्यात रहाण्याचा मला खूप आनंद वाटतो. एका परीने कधीकधी कटकट वाटली तरी ते आवडतं देखील.
ही माझी मर्यादा मला लवकर उमगली.
माझं आयुष्य तसं मर्यादित अनुभवाचं होतं. तुमच्या लक्षात येईल की माझ्या लिखाणात अनेकदा माझ्या लिखाणात स्त्रीजीवन, कुटुंबजीवन, नातेसंबंध, बदलत चाललेलं बाह्यजग यांचा धांडोळा घेतलेला असतो. मला जर कुणी कॉर्पोरेट जगातल्या गमतीजमतीवर लिहायला सांगितलं तर ते काही मला जमणार नाही. कारण तसा अनुभवच मला नाही. जे माझ्या मनाला भिडेल तेवढंच लिहायला मला जमतं. आपण जे लिहिणार त्या विषयातले बारकावे आपल्याला माहीत पाहिजेत असं मला वाटतं. माझ्या लिखाणावर स्त्रीवादाचा प्रभाव पडायच्या आधी साधारण 1966/67 च्या काळात तरी माझ्यावर पु.ल.देशपांड्यांचा खूप प्रभाव होता. त्यांच्या लिखाणामुळे प्रसन्न वाटतं तसं आपल्या लेखनामुळे वाटलं पाहिजे असं वाटायचं!
तुम्हाला पु लं. च्या साहित्यामधल्या स्त्री-चित्रणाविषयी काय वाटतं ?

मी नेहमीच म्हणत आलेय की ‘व्यक्ती आणि वल्ली’ मध्ये एकाही स्त्रीचे चित्रण नसावे हे पुलंच्या लिखाणातल्या स्त्रियांच्या स्थानाचं द्योतक आहे. त्यावर काही लोक म्हणतात की पुलंनी हिराबाई आणि माणिक वर्मा यांच्याबद्दल लिहिलंय! पण ह्या महिलांबद्दल लिहिलंय ते एक कलाकार म्हणून लिहिलं आहे, व्यक्ती म्हणून त्यांचं चित्रण केलेलं नाही. उदाहरणार्थ, त्यांच्या सोज्वळपणा विषयी लिहिलंय पण त्यांना तसं सोज्वळच दिसायचं होतं की ते त्यांच्यावर लादलेलं होतं? ते कधी मांडलं नाही. पण एकप्रकारे ते त्या पिढीचेच गुणदोष आहेत. त्याकाळी बायकांच्या योगदानाबद्दल फारसा healthy दृष्टिकोण नव्हताच! त्यांनी एवढी स्वयंपाकाची वर्णनं लिहिली पण तिचे कष्ट कुठेच नाही सांगीतले! त्यांच्या लिखाणात त्यांचं जे स्वभावत: सौजन्य आणि गोडवा होता तो दिसतो. पण पुलंच्या विनोदी लेखनात अनेकदा बिनडोक कॉमेंट्स करणारी बाई दिसते. आणि त्यांच्या अफाट लोकप्रियतेमुळे साहित्यामध्ये तो एक आकृतिबंध रूढ झाला! मराठी साहित्याचे हे एक मोठंच नुकसान झालेलं आहे.
पण त्यामानाने त्यांच्या चाळीस वर्ष मागे असून चिं. वी. जोशी खूप पुढे जातात. मराठीतले एक नंबर विनोदकार! ते देवळाच्या परिसरात रहात असत. तरीही ‘ओसाडवाडीचे देव’ मध्ये देवांची भरपूर चेष्टा करतात. त्यांची कावेरी ज्या प्रकारे नवर्‍याची चेष्टा करते तेही वैशिष्ट्यपूर्ण आहे. एका ठिकाणी तिच्या तोंडी असा संवाद आहे की - ‘उद्या ऋषिपंचमी आहे बैलाच्या कष्टाचं खायचं नाही म्हणजे इकडून भाजी आणलेली चालणार नाही.’ सासूसमोर ती नवऱ्या विषयी असं बोलू शकते; हे केवढं मोठं आहे. चिं. वि. जोश्यांची समतेची भावना मला अद्भुत वाटते.
तुमच्या समकालीन लेखिकांपैकी कुणाचे लेखन तुम्हाला आवडत होते ? सध्याचे कोण लेखक आवडतात? 
आमच्या पिढीतल्या पद्मजा फाटक यांचं लिखाण आवडत असे आणि जवळचं वाटत असे. तसं गौरी देशपांडेचंही आवडत असे. एकीकडे त्यातलं चित्रण दुष्प्राप्य वाटत असे पण तरीही आवडत असे. तिची विचारातली स्पष्टता खूप आवडत असे. प्रत्येक पिढीत चांगले लेखक असतात. आधीच्या पिढीतल्या लेखकांनी ते पाहिलंच पाहिजे. सध्याच्या पिढीतल्या अनेकजणांच लेखन मी आवर्जून वाचते आणि मला आवडतं. पण काही अपवाद वगळता नव्या लेखकांपैकी अनेकांचे लेखन मला एपिसोडीक वाटतं. तो सध्याच्या जीवनशैलीचा देखील परिणाम असेल. काहीजण नुसतं चकचकीत किंवा धक्कादायक लिहिण्याची निवड करतात. त्यात सखोलपणा, इंटेंसिटी कमी वाटते. मी अगदी ‘भाडीपा’सुद्धा पाहिलं आहे. गेल्या वर्षी पुलोत्सवात दोन तासांचा लाईव्ह ‘भाडीपा’ कार्यक्रम पाहिला. त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत होता. हसून हसून माणसं लोटपोट होत होती. ते लग्न संस्था, शिक्षण व्यवस्था, राजकारण यावर अगदी मार्मिक बोलतात. काही अतिशय स्मार्ट वाक्य त्यात होती. पण मला दोनतीन दिवसांनी त्यातलं काहीच आठवेना.
स्त्रिया विनोदी लेखन फारच कमी प्रमाणात करतात, त्याचं काय कारण असावं?
त्याला बरीच कारणं आहेत. मुख्य म्हणजे - बाईची आपल्यावर लादलेली प्रतिमा आणि विनोदी लेखनासाठी लेखकाकडुन जी अपेक्षा असते – त्यामध्ये आपल्या समाजात फार मोठी तफावत आहे.
विनोदाची पहिली मागणी आहे – irreverence म्हणजे अनादर! पण आपल्या समाजात स्त्रीने नाती, परंपरा याविषयी अनादर दाखवण्याला मुभा नाही. उलट सगळ्यांना मान दिला पाहिजे – असंच महिलांना शिकवतात.
दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विनोदात विरुपिकरण असते. उदा. दादा कोंडकेंनी चड्डीची नाडे लोंबत ठेवलेली आपल्याकडे वर्षानुवर्षे चालत होते. पण एखाद्या बाईने ब्लाऊजची बटन उलटीसुलटी लावलेली आपल्याला चालेल का? तुम्ही नीट पाहिलं तर लक्षात येईल की सगळ्या विनोदी काम करणार्‍या बायका नैसर्गिक विरुपिकरण म्हणजे जाडेपणा टिकवतात. जन्मभर स्लिमट्रिम राहणे आणि विनोदीपणा करणे हे तितकंसं जुळत नाही!
विनोदी लेखनाची आणखी एक महत्त्वाची मागणी असते – Abandon! म्हणजे स्वैराचार नव्हे तर वैचारीक मुक्तता. आपल्याकडे बायकांनी नि:संकोचपणे विचार व्यक्त केलेले चालतात का? एखादी बाई नवर्‍याला म्हणेल का की - तुझं सुटलेलं पोट आधी कमी कर, नाहीतर माझ्यासोबत पार्टीला येऊ नकोस! नवर्‍यावर, सासरच्यावर गमतीत सुद्धा टीका केलेली मान्य होत नाही! माझ्या लिखाणात अनेक मजेशीर  वैयक्तिक उल्लेख यायचे तेव्हा मलाही लोक म्हणायचे की – ‘बरं बाई, गोडबोल्यांना चालतं तुमचं लिखाण!’
आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे बायकांना गद्य लिखाणाचं फिनिशिंग करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे त्या कविता लिहून टाकतात! बायकांनी विनोदी लिखाणाकडे न वळण्याची अशी बरीचशी सामाजिक कारणं आहेत.
   

 
मंगला गोडबोले यांच्या सोबतच्या गप्पा आम्हा दोघींसाठी एक मेजवानीच होती. ज्या दिवशी आम्ही भेटलो त्याच दिवशी आमच्या 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी' ह्या  नाटकाचा प्रयोग होता. त्यामुळे नाइलाजाने आम्ही गप्पा आवरत्या घेतल्या आणि मंगलाताईंना प्रयोग पाहायला येण्याचं आमंत्रण देऊन आम्ही निघालो! त्या अगत्याने प्रयोगाला आल्या आणि सर्व कलाकारांचे  कौतुक केले. त्यांच्याशी झालेल्या गप्पा  वाचकांच्यापर्यन्त पोचवताना आमचा आनंद द्विगुणित झाला आहे ! 




1 Comments

Previous Post Next Post

Contact Form