गेल्या वर्षभरापासून मी जव्हार आणि आसपासच्या भागात काम करते आहे. माझ्या कामामुळे मला ह्या भागात रहाणार्या आदीवासी लोकांच्या खाद्य संस्कृतीची ओळख झाली. इथल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीवर शहरी विचारांचे आक्रमण होऊन काय बादल होताहेत, त्याचा वेध घेणारा लेख.
जव्हारला मुख्य शेती भाताची. त्या बरोबर नागली/नाचणी, वरई (भगर), उडीद आणि आणखी तीन डाळी अशी आणखी सहा म्हणजे एकूण सप्तधान्य पेरण्याची इथे पद्धत आहे. पावसाळ्यात भात आणि नागली यांची रोपे घेण्याची पद्धत साधारण सारखीच आहे. पहिल्यांदा शेताच्या एका कोपऱ्यात याची रोपे लावली जातात. साधारण एक फुटाची उंची झाली आणि जरा पाऊस झाला जिथे भात लावायचा तिथे चांगल पाणी साचलं,चिखल झाला की मग भाताचे रोप लावतात. भाताचे रोप ज्या चिखलात लावतात त्याला ‘खाचर’ म्हणतात. पण नागली मात्र डोंगर उताऱ्यावर लावतात. तिला भाताइतक्या पाण्याची गरज नाही. जिथे नागली लावलेली आहे तिथून पाणी वाहिले तरी नागली चांगली येते. ही रोपे लावतात तेव्हा लावणी करतांना नागलीचे रोप नुसते आडवे ठेवून देतात आणि मग थोड्याच दिवसात तिची मूळ जमिनीत आपोआप जाऊन ती रोप उभी राहतात आणि नागली येते.
पण भाताच्या लावणीला मात्र ते रोप चिखलात खोचतात/टोचतात आणि मग ते उभे राहते. नागली जेव्हा शेतातून खुडून जिथे धान्य झोडून कणसातून धान्य बाहेर काढण्यासाठी खळ्यात आणतात तिथे तिची पूजा होते आणि घरी आणतात तेव्हाही तिची पूजा करतात, मग तिला घरात आणतात. नागलीला इकडे ‘कणसरी माता’ असे म्हंटले जाते. अशी एक कथा सांगतात की, नागली आणि भात यांची एकदा चर्चा झाली आणि तेव्हा नागली भाताला म्हणाली की, मी का देवी? तर मी कुठेही येते म्हणून मला आल्हाद ठेवतात आणि तुला नख लावून चिखलात टोचतात! आदिवासी माणसे नागली विकत नाही. तुम्ही त्यांच्या घरी जाल तेव्हा वानवळा म्हणून देतील. नागलीचे पापड करणार्या शहरी लोकांचा त्यांना राग आहे. पण आता आदिवासी समूहातील जे लोक शहरात आले,त्यांना यामागचे राजकारण कळू लागले आहे. त्यांनी आता नागली विकायला आणि पापड बनवायलाही सुरुवात केली आहे. नागलीची भाकर जेव्हा बनवली जाते तेव्हा ती भाजताना तिचा लाल रंग उडणार नाही, तिला कुठलाही डाग पडणार नाही, भाकरी चटकणार नाही याची काळजी घेतली जाते. यापैकी काहीही झाले तर त्या स्वयंपाक करणाऱ्या बाईच्या खानदानीचा उद्धार होतो. बायकांना अशाच काहीतरी बिनाकामच्या कथा ऐकवून कामाला लावले जाते. तिच्यावर सतत असलेला कामाचा दबाव, कोणाचे न कोणाचे दडपण त्यांच्या लक्षात येऊ नये - यासाठी असल्या भाकडकथा रचल्या जातात , हे आपण नेहमीच अनुभवतो!
उन्हाळा संपताना आमचे हे लोक आपल्या गावाच्या आसपास फिरुन जेवढे मोहाची फळ पडलेली असतात त्याच्या बिया फोडून वाळवतात आणि पावसाळ्यात आपल्या कुटुंबाला जेवढे तेल लागेल तेवढे तेल जवळच्या तेल घाणीतून काढून आणून ठेवतात. हे तेल जरा कडवट असते. त्याचा कडवट पण काढण्यासाठी त्यात नागलीची जाड भाकर करुन ती तशीच कच्ची आख्ख्या तेलाच्या डब्यात सोडतात. ती भाकरी तो कडवटपणा शोषून घेते मग ते तेल गाळून डब्यांमध्ये भरुन ठेवले जाते. त्याच वेळी जंगलातून वेगवेगळ्या प्रकारचे आंबे तोडून आणतात. त्याचे काप करतात आणि घराच्या वर किंवा अंगणात ते सुकवतात आणि पावसाळा सुरु होण्याच्या आधी ते सर्व वाळलेले काप स्वतःला थोडे ठेऊन तालुक्याच्या किंवा बाजाराच्या गावांमध्ये आणून विकतात. ही सर्व उठाठेव बायकाच करतात. त्याबदल्यात त्यांना कांदे, बटाटे किंवा कुठल्यातरी प्रकारचे ड्राय फिश ज्याला ते सुकट म्हणतात ते मिळते. आदिवासी समूह हा मुळचा मांसाहार करणारा समूह आहे. कुठल्याही भाजीच्या चवीसाठी किंवा त्याभाजीचा अंगचा तुरटपणा,कडवटपणा जाण्यासाठी बऱ्याच भाज्यांमध्ये ही सुकट टाकली जाते, ज्याला ते ‘इसान’ असे म्हणतात. हे सर्व वेचण्याचे, फोडण्याचे, सुकवण्याचे काम घरातल्या स्त्रिया करतात.
आपण शाळेत शिकताना जस शिकलो की, मानवाच्या इतिहासात जेव्हा मानवी समूह स्थिरस्थावर झाला, गुहांमधून बाहेर पडून स्वतःचे घर बांधून राहू लागला, त्याला नुकताच शेतीचा शोध लागला होता तेव्हा सर्व समूहांची जगण्याची जी रीत होत तसेच काहीसे आपल्याला इथे पहायला मिळते. पावसाळ्यात इथे लोक पूर्ण कुटुंबच्या कुटुंब शेतावर कामासाठी जाते. कारण प्रत्येकच गोष्ट एका विशिष्ट काळात करायचीच असते त्यामुळे घरात असणारे सर्व माणसे हवीच असतात. जेव्हा शेतावरचे काम सूर्यास्त झाल्यामुळे थांबते तेव्हा ती शेतावर गेलेली स्त्री घरी परत येतांना शेताजवळच्या जंगलातून घरी येते आणि नैसर्गिक रित्या आलेल्या कुठल्या न कुठल्या भाज्या घेवूनच घरी येते.
रात्र झाली की घरातले पुरुष, तरुण मुलं टेंभा घेऊन नदीच्या काठी जातात आणि गोण्या भरभरुन खेकडे घेऊन येतात. जवळ जवळ सर्वाना छान खेकडे धरता येतात, त्याचं झक्कास कालवण करता येतं. खाण्यात खेकड्याचे असलेले प्रमाण त्यामुळे आदिवासी माणसाची हाड चांगली पक्की असतात. मी मोखाडा, जव्हार, विक्रमगड, तलासरी, वाडा आणि डहाणू परिसरात फिरले पण मला कुठेही शहरात दिसतात तसे जाडे,स्वतःचेच शरीर जड झाल्यामुळे मंदावलेले लोक दिसले नाही. माझ्यासारखे शहरातून आलेले मांसल लोक सोडले तर जाडे लोक तुम्हांला तिथे दिसणारच नाही. हा समूह अतिशय काटक असतो. शहरातले लोक जे डोंगर वर्षभरात एकदा कधीतरी ट्रेकिंग म्हणून चढतात ते डोंगर इथे रोज सहजपणे चढले किंवा उतरले जातात. आदिवासी समाज मुळचा मांसाहारी पण सध्या इतक्या प्रकारचे ‘बाबा’ इथे पोहोचले आहे की विचारता सोय नाही आणि सगळ्यात वाईट याचे वाटते की हे बाबा त्यांना ‘माळ’ घालतात आणि शाकाहारी करतात. त्यामुळे आता आदिवासी काटक वैगरे ह्या इतिहास जमा कथा झाल्या आहेत. पण आधीच कष्टाच जीण जगत असलेले आदिवासी ह्या ‘शाकाहारी’ संकल्पनेमुळे अधिकच अशक्त झाले आहेत. त्यातही स्त्रियांवर याचा गंभीर परिणाम होतांना दिसतो आहे. आधीच बालविवाह, लगेचच बाळंतपण, एकापेक्षा जास्त बाळंतपण, मरेस्तोवर काम आणि त्यात पुरेसा आहार नाही. त्यामुळे बायकांच्या पोटाची कातडी अगदी हाडाला चिकटलेली असते.
ह्या बायका शेतात काम ही करतात,सतत लवून भाताची, नागलीची लावणी करतील आणि येतांना चार पावल जास्त चालून जंगलात जाऊन भाज्याही आणतील, का तर घरातले सर्व तंदुरुस्त राहिले पाहिजे. ह्यासर्वात ती इतकी थकते की दोन घास पोटात जाताच तिची भूक भागते आणि पडल्याक्षणी तिला झोपही लागते. ह्या भागातल्या स्त्रिया जेव्हा ह्या भाज्या ओळखतात, रोज न चुकता, न दमता आणतात - ह्यावरून शेतीचा शोध बायानीच लावला असेल असे मला तरी पटतेच! पावसाच्या आगमनाच्या चाहुली पासून ते परतीचा पाऊस जाईपर्यंत या भागांमध्ये कुठल्या ना कुठल्या भाज्या उपलब्ध असतात. त्यामुळे ह्या दिवसात आमच्या ह्या भागात खाण्याची एकदम रेलचेल असते. या काळात विविध प्रकारच्या पाले भाज्या, फळ भाज्या, फुल भाज्या, कंद, फळ खाण्याची पद्धत इथे आहे. त्यांचा उगवण्याचा काळ, करण्याची पद्धत, ओळखण्याची पद्धत आणि चव सगळच फार छान आहे. भाज्यांच्या प्रकारा बरोबरच त्या करण्याची साधारण पद्धत ही आपण समजावून घेऊ या.
पालेभाज्या
तेरा, आळूची पाने, लोद, शेवळ, करडई, अंबाडी, तरोटा, कोवळी भाजी, शेवग्याची पाने, सोळ, बाफळी, खुरसणीचा पाला, उडदाचा पाला, तांदूळका, कुर्डू अशा अनेक पालेभाज्या ह्या भागात खाल्ल्या जातात.
यात तेरा नावाची भाजी आहे ती दिसते आळूच्या पानांसारखी. ती बनवतातही तशीच. शिजवून त्याचे गरगट करतात. हे शहरात असलेल्या आळूच्या फदफदया सारखच दिसत. तेरा चा कंद आळूच्या कंदापेक्षा लहान असतो. तो खात नाहीत आळूचा खातात. जरा एखादी व्यक्ती पावसाळ्याच्या दरम्यान आजारी पडली आणि ती सारखी हालत असेल तर त्याने आळू चोरुन खाल्ला आहे असे समजण्याची पद्धत इथे आहे. जसे आळूचे पान सतत हालत असते तसेच ते पान चोरुन खाल्ले तर ती व्यक्तीही तशीच हालते असे इथे मानले जाते. बहुतेक आळूची चोरी होऊ नये यासाठी ही स्टोरी बनवली गेली असावी.
![]() |
शेवळ |
शेवळ उन्हाळा संपताना येत. त्यामुळे जातानाचे उन बाधू नये यासाठी ही भाजी खाल्ली जाते. यातही दोन प्रकार आहे. जे शेवळ उन्हाळ्याच्या शेवटी येते त्याला ‘हळवे शेवळ’ असे म्हणतात तर पाऊस सुरु झाल्यानंतर जे येते त्याला ‘गरवी शेवळ’ असे म्हंटले जाते. शहरात अनेक लोक कौतुकाने शेवळाची भाजी खातात. त्यामुळे यूट्यूबवर ह्या भाजीच्या अनेक पाककृती पाहायला मिळतात. काहीवेळा ह्या भाजीत वाल, मसूर किंवा कोळंबी देखील घातली जाते.
बाफळी आपण मेथीची भाजी करतो तशीच केली जाते. कडू लागू नये म्हणून पाने उकडून, ते पिळून मग भाजी केली जाते. त्याचे फळ फोडणीला लसणाच्या ऐवजी वापरले जाते. बकरीचे पोट फुगले तर बाफळीच्या फळाची बी उकडून बकरीला देतात. बाकी सर्वच भाज्या कांदा, लसून, हिरवी मिरची टाकून परतल्या जातात. तरोटा भाजी तर स्टोन च्या पेशंट साठी फारच उपयुक्त आहे. पाऊस सुरु झाला की पूर्ण रस्त्याच्या कडेला तुम्हांला चार पानाचा तरोटा दिसेल. त्याने जंगलाला छान आकार ही येतो आणि भाजीही मिळते. कोवळी भाजी कांद्याच्या पाती सारखी दिसते. तिच्या वड्या करुन खातात. शेवग्याच्या पानाचे धपाटे तर तुम्ही शहरातही खाऊ शकतात. सर्व प्रकारची पीठ आणि त्यात ही कोवळी पाने फारच भारी लागतात.
फळ भाज्या
कर्टुली, वास्ता ज्याला शिद असेही म्हणण्याची पद्धत आहे, म्हणजे बांबू शूट, आळींब/ भू छत्र, कच्ची करवंद, मोहाचा दोडा, कच्चे उंबर, भोकरं, जंगली भेंडी. पेंढराचे फळ

पेंढराचे फळ बटाट्याच्या भाजी सारखे कसेही केले तरी चालते. त्याच्यात एक बी असते ती काढून उरलेल्या फळाची भाजी करतात. जसे बटाट्याचे काही जणी साल काढतात तर काहीजणी काढत नाही तसेच याचेही होते. मोहाचे फुल गळाले की तिथे फळ लागते ज्याला दोडा म्हणतात. याचीही बटाट्या सारखी भाजी केली जाते. कच्चे उंबर उकडून घेऊन त्याचा कडवटपणा जाण्यासाठी ते पिळून घेतात आणि मग त्याची भाजी केली जाते.
फुल भाज्या
चाईचा मोहोर, करडईची फुलं, तागाची फुलं, भोकारीचा मोहोर, बहाव्याची फुलं, रान केळीच्या सोन्डीची भाजी/ यालाच कवदरीची भाजी असेही म्हणतात,शेवग्याची फुलं, नडगलीची फुलं, पेंढराची फुलं, मोहाची फुलं, चाईचा मोहोर शहरांमधून ही विकायला येतो. पाण्यात धुवून कांदा,मिरची परतवून त्यावर वाफेवर शिजवून घेतला जातो. अंड्याची भुर्जी जशी लागते तशी याची मांसल चव असते. करडई च्या पिवळ्या धमक फुलाची तसेच त्याच्या दांड्याचीही भाजी केली जाते. शेतात जेव्हा ही फुल लागतात तेव्हा हा परिसर पाहण्यासारखा असतो. ताटव्यांचा छान पट्टा किंवा एरिया तयार होत असतो. तागाची फुलं भेंडीत टाकून खातात, त्यामुळे भेंडीचा चिकट पणा जातो आणि त्याची टेस्ट ही काही औरच होते किंवा ही फुलं सुकवून कुठल्याही डाळीत टाकण्याची पद्धत आहे. भोकरीच्या फुलाची भाजी अंड्याच्या भुर्जी सारखी लागते. उन्हाळ्यात यात डाळीच पीठ टाकून पातोड्या सारखी भाजी करण्याची पद्धत आहे. बहाव्याची फुल उकडून तेलात फ्राय करुन घेतात. शेवग्याची फुलं, नडगलीची फुलं यांचे ही धपाटे करुन खाल्ले जातात. पांढरी शुभ्र फुल असतात ही. मोहाच्या फुलांची चेचून चटणी केली जाते. ती फक्त चवीसाठी नाहीतर औषधी म्हणूनही खाल्ली जाते.
शेंगा
तरोटा शेंग,टेटूची शेंग, अभयची शेंग, कोवळी भाजी
प्रचंड प्रमाणात येणारा तरोटा, त्याच्या कोवळ्या पानांची भाजी खाल्ली की त्यानंतर येणाऱ्या शेंगा विशेष असतात. ह्या शेंगा फोडून त्या बिया भाजून घेतात आणि त्याची कॉफी करतात. अभयची शेंग ही वाल पापडी सारखी दिसते. याचा वेल असतो. टेटूची शेंग वालाच्या शेंगे सारखी लांब असते. तिचे लोणचे करण्याची पद्धत आहे. किंवा तिचे छान असे बारीक बारीक काप करतात उकडून घेतात आणि पाणी न लावता तेलावर परतून घेतात. याची पाने खूपच मोठी आणि जाड असतात तर आमच्या कडची पोर उन्हाळ्यात ही पान तोडून त्याच्या चपला बनवतात. आहे की नाही मज्जा!
आता आमच्याकडेही पुरुषांच्या पुढाकाराने ‘रान भाज्या महोत्सव’ केला जातो. आमच्या बाया मोठ्या उत्साहाने सर्व करतात पण आयोजक म्हणून पुन्हा कोण्या शहरी पुरुषाचेच नाव असते. या भाज्यांचे नुसते वर्णन ऐकण्यापेक्षा पुढच्या पावसाळ्यात लॉंग विकेंड पाहून जवळच्या आदिवासी भागात जा, आमच्या लोकांसोबत जरा रानातही जा म्हणजे ते भाज्या कसे ओळखतात ते तुम्हांला डोळ्यांनी पाहता येईल कारण त्याचे वर्णन करताच येत नाही. मग त्यांच्याच घरात राहून धुराच्या लोटात, चुलीच्या उबी मध्ये केलेला स्वयंपाक गरमागरम नागलीची भाकर खाताना जो आनंद तुम्हांला मिळेल त्याची काही किंमत ठरवता येणार नाही.
आता आमच्याकडेही पुरुषांच्या पुढाकाराने ‘रान भाज्या महोत्सव’ केला जातो. आमच्या बाया मोठ्या उत्साहाने सर्व करतात पण आयोजक म्हणून पुन्हा कोण्या शहरी पुरुषाचेच नाव असते. या भाज्यांचे नुसते वर्णन ऐकण्यापेक्षा पुढच्या पावसाळ्यात लॉंग विकेंड पाहून जवळच्या आदिवासी भागात जा, आमच्या लोकांसोबत जरा रानातही जा म्हणजे ते भाज्या कसे ओळखतात ते तुम्हांला डोळ्यांनी पाहता येईल कारण त्याचे वर्णन करताच येत नाही. मग त्यांच्याच घरात राहून धुराच्या लोटात, चुलीच्या उबी मध्ये केलेला स्वयंपाक गरमागरम नागलीची भाकर खाताना जो आनंद तुम्हांला मिळेल त्याची काही किंमत ठरवता येणार नाही.
अनिता पगारे
संगिनी महिला जागृती मंडळ, नाशिक ह्या सामाजिक संस्थेची संस्थापक अध्यक्ष. अनेक वर्षांपासून स्त्रियांसोबत विविधा मुड्ड्यांवर काम सुरू आहे. सध्या पाचवी ते सातवी च्या वर्गातील मुलामुलींना मासिक पाळी हा विषय आणि अकरावी- बारावीच्या विद्यार्थ्यां बरोबर जेंडर आणि हिंसाचार ह्या विषयावर काम.
Tags
खाद्यसंस्कृती
बरीच वेगळी माहिती मिळाली. धन्यवाद
ReplyDeleteमहाराष्ट्राच्या नकाशावर नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासी खाद्यसंस्कृतीबाबत आपण उत्तम लिखाण केले आहे. कुपोषण आणि गरीबी पाचवीलाच पुजलेली असली तरी, निसर्गाची अनोखे नाते निर्माण करीत आदिवासी बांधव सुखाने जगत असतात.नागलीला जव्हारच्या भागात कणेसरी माता म्हटले जाते हे आपले सूक्ष्म निरीक्षण वाखाणण्याजोगे आहे. यामुळे जव्हार भागाची नव्याने ओळख झाली. अभ्यासपूर्ण लिखाणाबद्दल धन्यवाद.
ReplyDelete