‘कशासाठी, पोटासाठी’, अशी एक जगण्यातली ऊर्जा घेऊन आपण सगळेजण या पोटाची काळजी वाहत असतो. शेवटी सारं चाललंय ते या पोटासाठीच ना, असं वाक्य आपण अनेकदा ऐकलेलं असतं आणि कधी आपणही ते बोलतोच. आणि यात खोटं काहीच नाही. जगायचं, तर पोट भरणं ही एक अत्यावश्यक आणि अपरिहार्य गोष्ट. पण पोटाला सक्तीने रिकामं ठेवणं, यालाही एक वेगळी प्रतिष्ठा वेगवेगळ्या धर्मांनी दिलेली आहे. ‘उपास’ असं एक गोंडस नाव त्याला आहे. ‘उपवास’ म्हणजे ईश्वराचं सान्निध्य. त्यावरूनच ‘उपास’ हा शब्द आला. पण प्रत्यक्षात माणसं उपास करतात, त्यात पोटाला विश्रांती मिळण्याऐवजी, नेहमीपेक्षा वेगळं खाल्ल्यामुळे एक निराळा अनुभव मिळतो असं दिसतं. खाणं हे एक तऱ्हेचं ऐंद्रिय सुख आहे. ते दूर लोटलं की काहीतरी पवित्र कृत्य घडतं, अशी एक समजूत (विश्वास म्हणू हवं तर) यामागे आहे. तेही पण ठीकच. कारण या निमित्ताने का होईना, शरीराला विश्रांती देऊन, तब्येतीला व आरोग्याला हितकारक असं काहीतरी माणूस करतो. कमी आहार घेतला की आपोआपच पचनाच्या समस्या उद्भवत नाहीत, खरंच आहे. आधीच्या समस्या दूर व्हायलाही मदतच होते. एखाद्या दिवशी लंघन करणं, म्हणजे अजिबात काहीही न खाल्ल्यामुळे शरीरातले रोगाचे जीवजंतू निष्प्रभ होतात आणि आजार लवकर बरा होतो, हे तत्त्व यामागे आहे. साधा सर्दी-खोकला झाला, तर गोळ्या घेण्यापेक्षा लंघन करणं केव्हाही श्रेयस्कर असतं. अर्थात असा उपास झेपला तरच तो करावा. पण वास्तवात याहून वेगळंच होताना दिसतं. उपासाच्या नावाखाली खूप जड पदार्थ खाल्ले जातात. नेहमीपेक्षा जास्तही आहार होतो. उपासामागचं मूळ तत्त्व बाजूलाच राहतं आणि नसत्या पद्धती नेमनियमांच्या नावाखाली रुजतात. मुख्य म्हणजे, पारंपरिक प्रथा पहिल्या, तर उपास करण्याची जबाबदारी ही मोठ्या प्रमाणावर स्त्रीवर्गाच्या शिरावर दिलेली असते. उपास करण्याची कशाला, एकूणच धर्मपालन हे स्त्रीच्या वागणुकीवर, चालचलवणुकीवर, समाजाने बनवलेली वाट ती किती काटेकोरपणे चोखाळते, त्यावर विसंबलेलं असतं. स्त्री जर यात कुठे कमी पडली, तर धर्माला बट्टा लागलाच समजा!
बाकी धर्मनियमांची चर्चा न करता उपासांकडेच वळूया! उपासाचे प्रकारही बरेच असतात. संपूर्ण दिवसाचा उपास, सकाळी उपास धरून रात्री सोडायचा उपास आणि सकाळी खाऊन रात्री करायचा उपास. निर्जळी उपासही असतात. उपास पाळण्याच्या पद्धतींतही वैविध्य आहेच. उपासाला काही पदार्थ चालतात आणि इतर काही चालत नाहीत. यातून मग विशिष्ट धान्यं व भाज्या-फळंच खाऊन उपास केले जातात. किंवा मग एकच प्रकार खाऊन उपास केला जातो. कोणी आहारात मीठ घेत नाही, तर कोणी गोड खात नाही. भगर किंवा वरी, साबुदाणा, बटाटा-रताळी वगैरे कंद अशा गोष्टी उपासाला चालतात. धर्माने म्हणण्यापेक्षा खरं तर समाजाने उपासाचा खटाटोप सुरू केला आणि महिलावर्गाला त्यात अडकवलं. हिंदू संस्कृतीत निसर्गाच्या चक्रानुसार जीवनपद्धती ठेवण्याचा संदेश आहे, हे चांगलंच. स्त्रियांबाबत मात्र, त्यांच्या स्वाभाविक शारीरिक गरजा आणि आरोग्यविषयक हित यांच्याकडे लक्ष न पुरवताच बऱ्याचश्या परंपरा आणि कर्मकांडं बनली की काय, असं वाटून जातं. मुळात, एखाद्या स्त्रीने काही हेतू वा अपेक्षा मनात ठेवून उपास करणं आणि तिच्या इच्छेची पूर्ती यामुळे होणं, यातला कार्यकारणभावाचा वा इतर कोणताही संबंध स्पष्ट होत नाही. पण याबद्दल कोणी प्रश्नही उपस्थित करत नाही. कारण पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी निमूट स्वीकारणं, म्हणजे उत्तम धर्मपालन, असा इथला संकेत आहे.
श्रावण महिना म्हणजे तर उपासतापासांचा हंगामच. एका बाजूने हेही खरं की, या काळात जठराग्नी मंद झालेला असतो. त्यामुळे भूकही सडकून लागत नाही. पचनशक्तीही जरा कमकुवत राहते. त्यामुळे या काळात उपास करणं हे आरोग्यासाठीही चांगलंच ठरतं. पण या महिन्यात व एकूणच चातुर्मासात विविध उपासांचा जो सुकाळ असतो, तो जरा जास्तच आहे. आठवड्यातल्या प्रत्येक वार या ना त्या देवाचा वा देवीचा. तर त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी म्हणे बाईने उपास धरायचा. वेगवेगळी व्रतवैकल्यं याच महिन्यात विपुल असतात. एरवीही वर्षभर ती असतातच. श्रावण सोमवार कडक उपासाचा; संध्याकाळच्या आत जेवण आवश्यक. शिवाय सोमवार एकदा धरला की म्हणे सोडता येत नाही. मरेपर्यंत तो करतच राहायचं. मुख्यतः बायाच हा उपास करतात. संध्याकाळच्या आत जेवण करणं हे घरच्या बाईला कितपत शक्य होत असेल? इतर कुटुंबाचा सैपाक केल्यविना तिला स्वतःचा विचारही करता येत नाही. लग्न व्हावं, शंकरासारखा नवरा मिळावा, म्हणून हरतालिकेचं व्रत करायचं आणि कडक उपास करायचा. मग लग्न झालं, हेतू साध्य झाला, तरी ते पुढे चालूच राहतं. लग्नानंतर नवऱ्याच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी उपास असतातच. मुलांच्या कल्याणासाठी, त्यांना यश मिळण्यासाठी असे वेगवेगळ्या कारणांसाठी उपास केले जातात. उपासाचे तपशील उगाळण्याचं कारण नाही. मुद्दा हा की, बाईने उपाशी राहिल्यशिवाय इतरांचं कल्याण साधत नाही. मग त्यापायी बाईच्या तब्येतीची हेळसांड झाली तरी चालेल, अशी एकूण मानसिकता असते.
वटसावित्री, करवा चौथ अशी व्रतं तर नवऱ्याच्या आयुष्याच्या दोरीसाठीची. म्हणजे स्वतःच्याच सौभाग्यासाठी, असं स्त्रीच्या मनावर बिंबवलेलं असतंच. त्यासाठी पोटाला सक्तीची विश्रांती द्यायची ती मात्र बाईने. दुसरीकडे, एकही व्रत वा उपास नवरा आपल्या पत्नीसाठी करत नाही. पुन्हा या साऱ्या उपासांना आणि त्यामागच्या भावनांना एक उदात्त आणि रोमँटिक वलय असतं. अलीकडे तर लग्नापूर्वीपासूनच तरुणी आपल्या मित्रासाठी करवा चौथ करताना दिसतात. चित्रपटांमधून नायिकेचं दिवसभर उपाशी राहणं आणि रात्री हातात चाळणी घेऊन चंद्रदर्शन करणं आणि नवऱ्याला खाऊ घालूनच आपण उपास सोडणं वगैरे करवा चौथचं चित्रण रोमहर्षक पद्धतीने दाखवतात. किंवा वटपौर्णिमेला नटूनथटून वडाच्या झाडाभोवती फिरून पूजा करणं वगैरे...या साऱ्या गोष्टी आजच्या स्त्रीच्या भावविश्वाचा भाग नाहीत, असं वाटत असतानाच, दुसरीकडे या साऱ्या प्रथा-परंपरा नव्या दमाने पुन्हा पुन्हा नव्याने अधोरेखित होताना दिसतात, तेव्हा खेद वाटतो. कुणाच्या धर्मभावना व श्रद्धा दुखावण्याचा इथे हेतू नाही. पण तारतम्याने विचार करण्याची बुद्धीच हरवली आहे, हे मात्र नक्की. आजच्या जमान्यात उपास करणाऱ्या स्त्रीचा स्वतःचाही अनेकदा त्यावर विश्वास नसतो. पण घरच्यांना व नवऱ्याला दुखावल्याची भावना होऊ नये, म्हणून काहीजणी या गोष्टी करत राहतात. आपली निष्ठा, पातिव्रत्य यामुळे सिद्ध होतं, उगाच कोणी आपल्याला बोल लावायला नको, असंही त्यांना वाटत असू शकेल. वेगवेगळ्या दबावांपायी स्त्रिया उपासतापास आणि इतर व्रतं करत राहतात. आपण उपास न केल्यामुळे घरात नराजी नको, असंही स्त्रीला वाटत असतं.
एकीकडे ही परिस्थिती असताना, स्त्री आरोग्याचा बोजवारा उडाल्याचं वास्तवही वारंवार समोर येत असतं. काम करणाऱ्या स्त्रिया स्वतःची काही काळजी घेत नाहीत, हे आपण पाहत असतो. धार्मिक उपासतापासांचा याच्याशी दरवेळी संबध असतोच, असंही नाही. हा उपासाचा एक पूर्णपणे स्त्रीविशिष्ट असा प्रकार आहे.
सगळ्या कुटुंबाच्या पोटासाठी झटणाऱ्या स्त्रीला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो! मग ती घराबाहेर पडून काम करणारी असो की गृहिणी असो. इतरांची काळजी वाहताना, आपल्यालाही भूक लागते, आपणही खाल्लं पाहिजे, याचा जणू तिला विसरच पडतो. घरातून लवकर निघताना आपल्याला खायला अगदी वेळ कसा नसतो, कपभर दूधही घेणं कसं होतच नाही वगैरे गोष्टी मुंबईच्या रेल्वेगाडीच्या महिला डब्यातून प्रवास करताना हमखास ऐकायला मिळतात. कधी तर आविर्भाव असा की, आपण खाणं म्हणजे जणू या बाईला गुन्हाच वाटतो की काय, असं वाटून जातं.स्वतःसाठी स्वतःनेच वेळ काढायचा असतो, हे स्त्रियांना बहुधा लहानपणापासूनच कोणी सांगत-शिकवत नाही. अनेकदा एक तऱ्हेचा अडाणीपणा ठेवूनच स्त्रिया वागत असतात. तुम्हाला जर खायला वेळ मिळत नाही, तर पर्याय शोधायला हवा. डबा भरून प्रवासात खावं किंवा घरीच स्वतःसाठी पाच मिनिटं कशी मिळतील, याचं व्यवस्थापन करावं. त्याची जाणीव इतरांना करून द्यावी. घरच्या बाईच्या गरजा व अडचणी समजत नसतील, तर त्यांना त्या कळल्याच पाहिजेत. स्वतःची काही कामं पुढे ढकलावीत किंवा त्यांची जबाबदारी इतरांनाही उचलायला लावावी. इथे आपण स्त्रीपुरुष समानतेच्या मुद्द्याकडेही येतो. सगळी कामं, सामाजिक-मानसिक तणावातून येणारी बंधनं, यांना तोंड देत जगणाऱ्या खायला वेळ नसल्यामुळे उपाशी राहावं लागणं, याची जबाबदारी तिच्या कुटुंबाकडेही जाते. पण स्त्रियांमध्ये ॲनिमिया, म्हणजे लोहाची-हिमोग्लोबिनची कमतरता व इतर पोषक घटकांचीही मोठ्या प्रमाणात उणीव आढळते, हे इथलं वास्तव आहे. त्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. बाईला आवश्यक ते पोषक घटक न मिळण्याचं कारणही इथल्या पुरुषप्रधान मानसिकतेत दडलेलं आहे. मुलीला मुलापेक्षा कमी दर्जाचं खाणं देणं, तिला कमी खायला देणं हे प्रकार आझही दिसतात. प्रथिनांची आणि लोहाची कमतरता लहान वयापासूनच असल्यामुळे स्त्रीला पुढे त्रास होतो. गरोदर स्त्रीला पुरेसं खाणं न मिलालं, तर रक्त नीट तयार न झाल्यामुळे, बाळंतपण होताना तिला प्रचंड समस्या येतातच, पण मासिक पाळी हा एखादा आजार आहे की काय, असं वाटायला लावणारा अनुभवही अनेकजणींना येतो. शारीरिक श्रम करणाऱ्या कष्टकरी स्त्रियांना तर सकस अन्नाची जास्त गरज असते. पण साधं दोन वेळचं जेवणही त्यांना बरेचदा पुरेसं मिळत नाही. कारण आधी घरातले बाकीचे, मग आपण स्वतः असा विचार ती करत असते. बाईच्या वाट्याचे हे उपास म्हणजे समाजाचं आणि शासनाचं अपयशच आहे.
नीट जेवायला न मिळणाऱ्या मुलींचा विषय निघाला की मला एक हिंदी कथा नेहमी आठवते. लेखकाचं नाव नेमकं आठवत नाही, पण ते बहुधा रवी मिश्रा असावं. यात एका घरी पाहुणा म्हणून गेलेला असतो. तिथे एक हाडकुळी मुलगी खाली मान घालून भात-डाळ किंवा तत्सम काहीतरी मुकाट खात असते. तिचा भाऊ छान सकस जेवण जेवून शाळेला जातो. तिला घरीच थांबायचं असतं, कारण घरी काम असतं. आलेला पाहुणा तिला विचारतो, तुला असं साधं जेवण मिळतं. शाळेत जायला, मनाप्रमाणे खेळायला मिळत नाही. तुला काय वाटतं, असं तुझ्या घरचे का म्हणून करतात ? माहीत आहे का तुला ? त्यावर खाली मान घालून जेवणारी ती मुलगी उत्तर देते, ‘मी मुलगी आहे ना, म्हणून.’ चटका लावून जाणारी ही गोष्ट या देशातल्या इतरही अनेक मुलींची गोष्ट असेल...
धार्मिक स्वरूपाचे उपासतापास हिंदूंप्रमाणेच इतरही धर्मींयांमध्ये असतात. त्यात विशेषतः जैन धर्मात कडक उपास व ते करण्याची व्रतं आहेत. लहान वयात संन्यासाची दीक्षा घेणं, घरदार सोडून धर्मपीठांच्या शिकवणीनुसार आचरण ठेवणं हे प्रकार जैन धर्मातली मुलंमुलीही करताना दिसतात. स्त्रियांप्रमाणे लहान मुलींनाही धर्माचरणाच्या दबावामुळे प्रभावित केलं जातं. यातून भलते प्रकारही घडताना दिसतात. अशीच एक दुर्दैवी घटना तीन-चार वर्षांपूर्वी घडली.हैदराबादला राहणारी आराधना - एक शाळकरी मुलगी. एका संपन्न घरात ती जन्मली होती. तिचे वडील सुवर्णालंकारांचा व्यवसाय करत, पण तो तोट्यात होता. जैनांमधलं ‘तपस्या’ हे चातुर्मासातील व्रत साधारणपणे वडीलधारी मंडळी करतात. ते व्रत जर आराधनाने केलं, तर तिच्या वडिलांना चांगले दिवस पुन्हा दिसतील, असं या कुटुंबाच्या धर्मगुरूंनी म्हणे सांगितलं होतं. आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या आराधनाने ते व्रत करण्याचा निश्चय केला आणि घरच्यांनीही तिला पाठिंबा दिला. खरं तर तेरा वर्षांचं वय म्हणजे स्वच्छंदपणे बागडण्याचं, जीवनाकडे कुतूहलाने बघत बघत आनंद लुटण्याचं वय. पुस्तकांमध्ये दडलेलं आणि पुस्तकांपलीकडे पसरलेलं ज्ञान-विज्ञान अन् विश्वाचं भान आपल्या नजरेने निरखत, पचवत त्याचं आकलन करण्याचा प्रयत्न करण्याचं वय...पण याच वयाच्या आराधना संधारियाने मात्र उपवासाचं व्रत केलं आणि तिने न खाता 68 दिवस उपवास केलाही. ती एवढे दिवस केवळ पाण्यावर राहत होती. मग तिने उपवास सोडला, तेव्हा मोठा समारंभ झाला आणि तिच्याबरोबर अनेकांनी सेल्फी वगैरे काढून घेतली. ‘बालतपस्वी’ म्हणून तिचा गौरव झाला. त्या रात्रीच तिची तब्येत बिघडली आणि तिला हॉस्पिटलात न्यावं लागलं. जिथे तिला मृत घोषित करण्यात आलं.
तिच्यावर कोणताही दबाव नव्हता, असं तिच्या घरच्यांचं म्हणणं. आराधनाची अंतिम यात्राही थाटात काढण्यात आली. तिच्या मृत्यूचं दुःख सर्वांनाच झालं, पण तिने केलेल्या उपवासाबद्दल त्या परिवारात कौतुकाचीच भावनाच होती. आपल्या मुलीने धार्मिक कर्मकांडांत लक्ष घालावं हे तिच्या वडिलांना भूषणच वाटत होतं. सिकंदराबादच्या सेंट फ्रान्सिस या ख्यातनाम शाळेत आराधना व तिची बहीण जात असत. पण घरात काही धार्मिक कृत्य असलं, तर त्यांनी शाळा बुडवायला वडील लक्ष्मीचंद यांची अजिबात हरकत नसायची. आराधानावर असे संस्कार झाल्याने म्हणा किंवा आणखी काही; तिची वृत्तीही उपासतापासाकडे झुकलेली होती. त्याआधीच्या उन्हाळी सुट्टीत ती पाटणच्या पार्श्वनाथ तीर्थ येथील शाळेत दोन महिने राहिली होती. तिथे संन्यासी होण्यासाठीची नोंदणी करावी लागते. तिच्या चेहऱ्यावर उपवासानंतर कसं तेज आलं होतं, तिला या काळात डॉक्टरची गरजही कशी पडली नव्हती वगैरे गोष्टी अभिमानाने सांगितल्या जात होत्या. पण सर्वच जण अशा विचारांचा पुरस्कार करणारे नसतात. या घटनेनंतर एका जैन नेत्याने स्पष्टच म्हटलं होतं की, अल्पवयीन मुलीला इतके दिवस उपवास करू देण्याची पद्धत जैनांमध्ये नाही. तसंच लहान वयातल्या मुलामुलींनी याप्रकारे उपवास करायचा नसतो, असंही आमचा धर्म म्हणतो, असं मत जैनधर्मातीलच काहीजणांनी व्यक्त केलं आहे. आराधनाच्या अकाली निधनाभोवती अशा अनेक गोष्टी गुंफलेल्या आहेत.धर्माचं पालन करणं, रूढी व प्रथांचा आधार घेणं ही व्यक्तिगत बाब असली, तरी त्याचीही एक मर्यादा आहे, याचा विसर पडू न देणं महत्त्वाचं असतं. आणि बदलत्या काळानुसार धर्मात बदल हा झालाच पाहिजे. त्यातही मुलींवर धर्म पाळण्याची जबाबदारी टाकली जाते, तशी सक्तीच एकेकदा केली जाते. सगळी व्रतं ही स्त्रिया व मुलींसाठीच अधिक असतात. तशा तर या देशात अनेक मुली जन्माला येण्याआधीच कळीसारख्या खुडल्या जातात. अनेकजणींना त्या मुली आहेत, याच एका कारणासाठी पोटभर खायलाही दिलं जात नाही. तर आराधनासारखी मुलगी सधन असून, वेगळ्याच कारणाने अन्नाअभावी गेली, हा दैवदुर्विलासच. हाही एकप्रकारचा अन्याय नाही, तर दुसरं काय आहे? धर्मालाही कायद्याने सन्मानाची जागा दिली आहे, पण ती व्यक्तिगत आयुष्यापुरती. मात्र लहान व अज्ञान वयातल्या मुलीने याप्रकारे उपवास करणं आणि त्यातून तिचा मृत्यू ओढवणं ही केवळ व्यक्तिगत बाब ठरत नाही.
उपासाचा परिणाम किती टोक गाठू शकतो, ते अशा अनेक उदाहरणांवरून कळून येतं. पण धर्माचं लेबल चिकटलेल्या इतर सगळ्याच गोष्टींप्रमाणे उपासावरही प्रश्न उपस्थित केले, तर काहींना ते आवडत नाही. उपासाचं उदात्तीकरण थांबलं पहिजे आणि उपास लादले जाण्याबाबत स्त्रियांनीच सजग होणं आवश्यक आहे. पण स्त्री याप्रकारे डोळस होणं का नाकारते? या प्रश्नाचं उत्तर आपल्या इथल्या पारंपरिक समाजव्यवस्थेत आणि पुरुषालाच महत्त्व देण्याच्या मानसिकतेत आहे.
नंदिनी आत्मसिद्ध
सध्या ‘साप्ताहिक सकाळ’मध्ये - ‘पोटपूजा’ हे खाद्यसंस्कृतीवरील सदर लिहितात. अनेक वर्षांपासून विविध सांस्कृतिक-सामाजिक विषयांवर सातत्याने लेखन करत आहेत. त्यांना हिंदी, बंगाली, उर्दू व फ़ारसी या भाषाही अवगत आहेत आणि त्यांची अनेक स्वतंत्र आणि अनुवादित पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
Tags
खाद्यसंस्कृती