एकटीची खादाडी


मला अगदी स्पष्ट आठवतंय, मी पहिल्यांदा कधी एकटीने हॉटेलमध्ये जाऊन खाल्लं होतं! मला तेव्हा खूपच मज्जा वाटली होती! मी मुंबई युनिव्हर्सिटीत फोर्टला काही कामाने एकटीच गेले होते, तेव्हा तिकडे सँडविचच्या स्टॉलवर खाल्लं आणि इराणी हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यायला होता. मी इराण्याबद्दल वडिलांकडून फक्त ऐकलं होतं. खरं तर अगदी छोटीशी गोष्ट होती, पण आपली हौस पूर्ण केल्याचं त्यात समाधान होतं !

पण आम्ही ज्या काळात मोठ्या होत होतो, तेव्हा स्वतंत्रपणे काही करायची उर्मी असायची तेव्हा ‘एकटीने बाहेर खाणे’ – ही एक आवर्जून करण्यासारखी गोष्ट वाटायची. माझी आई खूप लहानपणापासून मुंबईत राहिलेली असल्याने माझ्या आईमध्ये पण ही आवड होती. माझ्या वडिलांनाही आवड होती हॉटेलमध्ये खाण्याची. महिन्यातून एखाद वेळेस ते आम्हाला मुलुंड वरुन चर्चगेट वगैरे भागात इंग्लिश सिनेमा पहायला न्यायचे. मग छानपैकी जेउन आम्ही घरी यायचो. ते त्याकाळी आम्हाला आवर्जून साऊथ मुंबईत काही विशिष्ट ठिकाणी चायनीज खायला घेऊन जायचे. तेव्हा चायनीज अगदी नवीन होतं. चायनीज गाड्या तर नव्हत्याच! माझ्या मैत्रिणींच्या घरी चायनीज माहीत सुद्धा नव्हतं. कधी सगळेजण गावावरून अवेळी मुंबईत पोचलो तर आईला एकटीला घरी जाऊन काम करत बसायला नको – या उद्देशाने आमच्याकडे बाहेरच खाऊन मग घरी जायची पद्धत होती. हा एक मोकळेपणा घरात होताच. त्यातून ती आवड तयार होत जाते.

माझी आजी दादरला राहायची. त्यामुळे आम्हाला खूप लहानपणापासून मुलुंड ते दादर जायची सवय होती. आमची आजी पण मस्त होती. ती आम्हाला पाणीपुरी खायला, शिवाजी मंदिर मध्ये नाटकं बघायला वगैरे घेऊन जायची. तिथला वडा ठरलेला असायचा! एकदा दहावीची परिक्षा संपल्यावर मी आणि एक मैत्रीण अशा आम्ही दोघी आणखी ५-६ मैत्रिणींना घेऊन मुलुंड वरून दादरला गेलो होतो. आम्ही दोघी लीडर होतो तेव्हा आणि सगळ्या मैत्रिणींना कुठे कुठे खायला घेऊन गेलो, फिरायला घेऊन गेलो, खूप मजा आलेली. त्या सगळ्या मैत्रिणी पहिल्यांदाच येत होत्या दादर पर्यंत.

पूर्वी नाटकात कामं करत असताना मला चहाची तलफ यायची तेव्हा सोबत कोणी असो-नसो; मी आपली टपरीवर चहा पिऊन यायचे. पण एकदा आम्ही दिल्लीला एका नाटकाच्या प्रयोगा साठी गेलो होतो. तेव्हा मी, एक मैत्रीण आणि एक मित्र असे खरेदी करायला बाहेर पडलो. चांगलीच थंडी होती म्हणून चहा प्यायची इच्छा झाली. आम्हाला एक टपरी पण सापडली. पण तिथे गेल्यावर आमचा मित्र सोबत असून सुद्धा लोकं इतक्या घाण घाण कमेंट्स करायला लागली... ! त्यामुळे सोबत असो किंवा नसो, त्रास देणारी लोकं त्रास देतातच.

हल्ली मी २-४ वर्षांपूर्वी मुलीच्या कास्ट सर्टीफिकेटच काम करायला सोलापूरला गेले होते. तिथेही मी एकटी राहिले, जेवले आणि मला काही वाईट अनुभव आला नाही.

एकदा माझ्या घराचं शिफ्टींग सुरू होतं. त्या माणसांना सगळं आवरताना जवळ जवळ बारा वाजले, म्हणून त्यांना खायला देण्यासाठी मी घराखाली पावभाजीच्या गाडीकडे जाऊन दहा पावभाजींची ऑर्डर दिली. त्या गाडीवाल्यानेही चटकन मला हवं ते बांधून दिलं, पण तेव्हा अचानक माझ्या लक्षात आलं की दिवसाच्या मानाने रात्री आपला रस्ता किती वेगळाच दिसतो. सगळे भाजीवाले उठून गेलेले होते. तिथे सगळी दिवसभराची थकली भागलेली कामगार पुरुष माणसं खायला आलेली होती. अनेक वेश्याव्यवसाय करणार्‍या बाया होत्या. मला कोणाचाही कसलाच त्रास झाला नाही.

मी गरज म्हणून पण एकटी हॉटेलमधे जाते आणि आवड म्हणून पण जाते.कुलाबाच्या लिओपोल्ड काफे मध्ये मी एकटीने कॉफी प्यायली आहे. ती जागा आणि कुलाबा परिसरातच भटकायला मला फार आवडते. शिवाय दर वेळी कंपनी मिळेलच असं नाही. आणि विचित्र कंपनी पेक्षा एकटं असणं कधीही बरं!
आणि एखादी विशिष्ट वेळ आपल्याला साजरी करायची असेल तर कधी कंपनी मिळेल त्याची वाट का बघत बसायची? किंवा भूक लागली तर मी का म्हणून इडलीवडा पार्सल करून घेऊनच का खायचं ? मी का छानशा ठिकाणी जाऊन खायचं नाही? स्वत:चं आयुष्य आनंदी करण्यासाठी लोकांची पर्वा कशाला करायची?

मुंबईत आजही एकटीने हॉटेलमध्ये आरामात जाऊन एंजॉय करणार्‍या बायका फार नाही दिसत. ज्या दिसतात त्या बरेचदा खूप conscious होऊन, चुपचाप मान खाली घालून खाणाऱ्या अशाच दिसतात. क्वचितच मॉलमधे वगैरे एकटी बाई आइसक्रीम खाताना दिसते. पण तिथे येणाऱ्या लोकांचा क्लास वेगळा असतो. गुजराती बायका बाजारहाट करून येताना पिशव्या हातात घेऊन कधीकधी घोळक्याने रस्त्यावर उभ्या राहून चाट खाताना दिसतात. पण माझ्या बऱ्याच मैत्रिणींना असं करता येत नाही. अगदी पन्नाशीच्या मैत्रिणींनाही ऑकवर्ड वाटतं, सारखी कंपनीची गरज वाटते, ह्याचं मला वाईट वाटतं.

एकटीने जाऊन खाण्यात एक आर्थिक तोटा मात्र असा असतो की फारशा व्हरायटी खाऊन पाहता येत नाही. कारण अनेक पदार्थ घेतले तर ते जास्त होतात. दोघी-तिघी मिळून गेलो तर प्रत्येकीने वेगळा पदार्थ सांगितला तर सर्वांना थोडं थोडं चाखायला मिळतं.
एकटीने खायला गेल्यावर मला कधीच मुंबईत तरी वाईट अनुभव आलेला नाही. दादर माटुंगा परिसरातला माझा अनुभव तर खूप चांगला आहे. खासकरून उडपी हॉटेल्स मध्ये खूप सभ्यपणे वागतात.
मला इराणी हॉटेल्स मध्ये जायला पण आवडतं. पण तिथे एकट्या बायका कमी दिसतात. जास्त करून पुरुषच असतात आणि ते एकट्यानेच चहा प्यायला आलेल्या बाईकडे बघतात देखील . त्यांनाही बिचार्‍यांना सवय नसते -अशा बायका पाहायची. आपल्या वागण्यातला मोकळेपणा दुसर्‍यांना भीती वाटेल असा असू शकेल. कदाचित माझी बॉडी लॅंगवेज तशी डेव्हलप होत गेली असेल. पूर्वी जसं वाटायचं की आपण असं एकटं हॉटेल मधे जाऊन क्रांती वगैरे करतोय तसंही आता वाटत नाही. आता ही अगदीच नॉर्मल गोष्ट वाटते.




आसावरी घोटीकर 

सध्या मुंबई महापालिकेत Microbiologist या पदावर काम करते. अनेक मराठी नाटके, चित्रपट आणि टीव्ही सिरियल्स मध्ये अभिनय केलेला आहे. काही नामांकित निर्मिती संस्थाच्या सोबत वेशभूषाकार या नात्याने काम केले आहे. प्रवास, वाचन आणि खाणे आवडते. 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form