प्रशस्त कम्पाऊंडमध्ये असणारी अवाढव्य इमारत…… त्यावरचा मान वर करूनच संपूर्ण पाहता येणारा उंच मनोरा आणि मोठा आवाज करणारा भोंगा…… त्यासरशी आपली पाळी संपवून बाहेर पडणारा कष्टकरी कामगार.. ही मुंबईतल्या गिरणगावाची कोणे एकेकाळची ही ओळख! आता त्यांची जागा घेतलीये ती मान उंच करूनच पाहता येणाऱ्या चकाचक इमारतींनी आणि कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांनी… पण एक गोष्ट थोड्या-फार फरकाने सारखीच राहिली. पूर्वी कष्टकऱ्यांसाठी जेवणाचे डबे देणाऱ्या बायका आता याच कंपन्यांसमोर उभं राहून कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना एकवेळ जेवण देणाऱ्या, इथल्या कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या ‘मावशी’झाल्या आहेत.
गिरणगाव.... गिरण्यांचा दिमाख आणि कामगारांच्या उत्साहाने व्यापलेले टुमदार शहर. कामगारांच्या गावाकडे राहणाऱ्या कुटुंबीयांसाठी कुतूहल आणि मुंबईबाहेरील लोकांसाठी आकर्षण. हे शहर घडत गेलं, घडवत गेलं, गिरणी कामगारांबरोबरच त्यांच्या बाजूने वाढणाऱ्या अनेक व्यवसायांना, खेळांना, संस्कृती आणि परंपरांनाही. गिरणगावाचा स्वत:च्या जगण्याचा एक बाज होता. गिरण्यांच्या भोंग्यानुसार चालू राहणारे त्यांचे आयुष्य सोपे नव्हतेच कधी; पण तक्रारीचा सूर नव्हता.गावाकडच्यांना चार पैसे मिळत आहेत, हेच समाधान अधिक होतं. हे कामगार एका खोलीत गटागटाने राहत असत. बैठकीच्या खोल्यांमध्ये.एका खोलीत २०-२५ जणंही असत. प्रत्येक जण आपल्या पाळीनुसार या खोलीत वावरत असे. प्रश्न होता तो जेवणाचा. तो या गिरणगावात राहणाऱ्या काही महिलांनी सोडवला. या महिलांनी खाणावळी सुरू केल्या आणि त्या या कामगारांना त्यांच्या पाळीनुसार डबे पुरवू लागल्या. यातून महिलांचं अर्थाजन हा भाग होताच. त्याहून जास्त आत्मीयता,आपुलकी आणि आपल्या गावाकडच्या नातेवाईकाला प्रेमाने खाऊ घालण्याची इच्छा होती. सण-उत्सवानुसार गोडधोड डब्यातून मिळत असे. आजारी पडल्यावर पथ्याचं जेवणही. पैशांची अडचण असेल तर उसनवारीही चालायची. त्यामुळे कामागारही पगार झाला की, खाणावळ चालवणाऱ्या वहिनींना आठवणीने गोडाची पुडी द्यायला विसरत नसत.
गिरणीचा भोंगा बंद झाला, तसे गिरण्यांच्या भोवताली असणारे व्यवसायही कोलमडले. पण खाणावळी जगानुसार बदलल्या. महिलांनी गिरण्यांच्या जागेवर उभ्या राहिलेला कॉर्पोरेट कंपन्या हेरल्या. इथला अधिकारी हॉटेलमध्ये खाणारा असला, तरी कर्मचारी मात्र घरच्या भाजी-पोळीला प्राधान्य देणारा हे त्यांना उमगलं आणि त्याच व्यवसायाला त्यांना नवी फोडणी घातली. जेवणाचा धंदा कधी मरत नाही, असं म्हणतात.कारण दोन वेळची पोटाची भूक भागवणं जेवढं गरजेचं तेवढंच जिभेचे चोचले पुरवणंही दैनंदिनीचा भाग झालाय. स्वयंपाक आलाच पाहिजे, हा घरातल्यांनी शिकविलेला अलिखित नियम पाळून गिरणी कामगारांच्या घरातील महिलांनी ते करण्याचं कौशल्य कमवलं होतंच, गिरण्या बंद पडल्यावर त्यातील अनेकींनी ते पैसे कमवण्याचं साधन म्हणून वापरायचं ठरवलं. आता त्यांनी कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर स्टॉल उभे केले. हॅलो सर,मॅडम, काय खाणार, तुम्हाला मागे आवडलेला पदार्थ आजही आहे, असं प्रोफेशनल बोलण्याचं कसब अवगत केलं. अगदी ग्राहकाने पैसे दिल्यावरही स्मितहास्य करून थँक्यू बोलायलाही त्या विसरत नाहीत.
गिरण्यांच्या प्रशस्त जागेत उभ्या राहिलेल्या वेगवेगळ्या गिरण्यांच्या कम्पाऊंडसमोरच छोटंसं टेबल, चार-पाच मोठे स्टीलचे डबे आणि ताटं मांडून त्या उभ्या राहतात. समोर किमान दहा-बारा जणांचा घोळका...तिथे हळूच डोकावलं की, “मावशी, आज कुठली भाजी?”… “वहिनी,आज दोनच चपात्या द्या,”… “ताई, आज सुरमई नाही का आणली?”... असे संवाद कानावर पडतात. येथे येणारा माणूसही नेहमीचाच असल्याने या दोघांमध्ये अनोखं नातं निर्माण झालेलं. त्यामुळे रोज जेवणाऱ्याला काय आवडतं आणि काय नाही, हेही त्यांना माहीत असतं. रोज सकाळी कामासाठी लवकर बाहेर पडणाऱ्या या कॉर्पोरेट कल्चरमधल्या कर्मचाऱ्याला किमान ५० रुपयांत घरगुती चवीचं हमखास खात्री देणारं जेवण मिळतं. मग अजून काय हवं? इथल्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये काम करणाऱ्या बायकाही न लाजता या स्टॉलसमोर, म्हणजे अगदी रस्त्यात उभं राहून आरामात जेवताना दिसतात.
हॉटेलमधल्या थाळीत दोन भाज्या, पोळी, वरण-भात असतो. पण या स्टॉलवर चार प्रकारच्या भाज्या,चिकन, मटण, खिमा, अंडामसाला, मोदक, भाकऱ्या, घावण... पदार्थांची यादी महिला भराभर सांगतात तेव्हा थक्क व्हायला होतं. काहींनी जेवणानंतर पाचक द्रव्य म्हणून ताक, सोलकढीचा व्यवसायही येथे सुरू केला आहे. वयाच्या पन्नाशी ओलांडलेल्या या महिला नित्यनेमाने दही लावून ताक करणं, खोबरं किसून सोलकढी करणं हे काम करत असतात. विशेष म्हणजे पहिल्या तासाभरातच या महिलांकडेच अनेक पदार्थ संपलेले असतात. मांसाहाराला अधिक मागणी असते. पारंपरिक चवीचा मांसाहार कॉर्पोरेट कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना आकर्षित करत असल्याचे दिसते.
खरे तर दोन ते तीन तासांचा हा व्यवसाय. पण पहाटेपासून त्याची तयारी करावी लागते. त्या व्यतिरिक्त या महिला सणसमारंभासाठी ऑर्डरही घेतात. या ऑर्डर आणि रोजचा व्यवसाय यात सूसुत्रता ठेवण्याचं तंत्रही त्यांनी अनुभवानं अवगत केलं आहे. या महिलांमधला समान धागा म्हणजे आधी असणारी बिकट आर्थिक परिस्थिती. गिरण्या बंद पडल्यावर यातील अनेकींनी हा व्यवसाय सुरू केला. संसाराची जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेतली आणि ती पार पाडण्यासाठी त्या सज्ज झाल्या. पण आजही मागे वळून पाहताना त्या भावूक होतात. अपार मेहनतीने या दिवसांवर मात केली आणि आता समाधानाचे जीवन जगत आहोत... त्या सांगतात. या व्यवसायावर त्यांनी मुलांची शिक्षणं, लग्न केली. अनुभव आणि हातच्या चवीने खूप काही दिल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो.
![]() |
लोअर परळ भागातच नेत्रा वेंगुर्लेकर आणि शामला मुरबाडकर आठ वर्षांपासून पोळी-भाजीचा व्यवसाय करत आहेत. या व्यवसायात नेत्रा यांनी शिरकाव केला, तो त्यांच्या शेजारच्या वहिनीमुळे. नेत्रा स्वत:सुरुवातीला नोकरी करायच्या; मात्र मूल झाल्यानंतर ती त्यांना सोडावी लागली. तेव्हा त्यांचा नवरा बेस्टमध्ये कामाला होता. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या शामला यांची परिस्थिती बिकट होती. त्यांच्या नवऱ्याचं आजारपणामुळे निधन झालं होतं. पदरात दोन लहान मुलं. एक पहिलीला तर दुसरा तिसरीला. सासरे मिलकामगार, तर सासू गृहिणी.शामला यांनी कमाईसाठी मॉलची नोकरी पत्करली. पगार मिळायचा अवघा पाच हजार रुपये. मग त्यांनी वेगळं काहीतरी करायचं ठरवलं. “मला स्वयंपाकाची आवड होती. माझ्या नणंदेचा पोळी-भाजीचा स्टॉल होता. त्यात माझ्या भावाचं गावी रिसॉर्ट होतं. त्यामुळे जास्त माणसांच्या स्वयंपाकाचा अंदाज होताच. पाच वर्षांनंतर घराबाहेर पडून आम्ही याच व्यवसायापासून सुरुवात केली,’’ असं नेत्रा सांगतात. ‘‘काहीतरी करायचं,हे मी आधीपासूनच ठरवलं होतं. त्यामुळे भाऊबिजेचे पैसे आले की,तेव्हाच मोठमोठी भांडी विकत घ्यायचे आणि त्या भांड्यांवर माझ्या भावांची नावं द्यायचे. तीच भांडी आम्ही यासाठी वापरली. मी तिला म्हटलं होतं, तू काहीच करू नकोस. ताटं पाहिजे होती, तीही आम्ही विकत आणली. तेव्हाचे पैसेही मीच दिले. नंतर आमचा व्यवसाय वाढू लागला,तसतसे ते पैसेही तिने चुकते केले,’ असं नेत्रा आवर्जून सांगतात. भाजी आणणं, ती चिरणं, आदल्या दिवशीची भाजीची तयारी, सुका-ओला मसाला वाटप हे सगळं त्या दोघी मिळून करतात. दररोज संध्याकाळी ताजी भाजी आणण्याचा नेम त्यांनी चुकवलेला नाही. चिकनवाला आणि मच्छिवाल्यांचे पैसे रोजच्या रोज दिले जातात. त्यांच्या व्यवसायाने आता चांगलाच जम बसवलाय. रोज किमान ५० जण तरी त्यांच्याकडे हक्काने जेवतात. स्वत: नेत्रा यांना अधिकचे पैसे मिळतात, तर शामला यांचे संपूर्ण घरच या व्यवसायावर उभं राहिलंय. आता शामला यांचा एक मुलगा दहावीला, तर दुसरा आठवीला आहे. शामला यांच्यावर इतक्या वर्षांत कोणापुढेही पैशांसाठी हात पसरवण्याची वेळ आली नाही, इतका मानसन्मान या व्यवसायाने त्यांना दिला.
रस्त्यावर उभं राहून व्यवसाय करणाऱ्या कोणालाही हप्ता चुकलेला नाही.त्यामुळे यापैकी काही महिलांना याबाबत विचारल्यावर ‘आम्ही सांगू शकत नाही, असं उत्तर काहींनी दिलं. तर हप्ते द्यावे लागतात, ही कबुली देणाऱ्यांनी पोलिसांना की स्थानिक गुंडांना, हे मात्र गुलदस्त्यातच ठेवलं.सध्या या व्यवसायातही स्पर्धा वाढल्याचं त्या सांगतात. बीएमसीचा त्रासही अध्येमध्ये होतो, याची कबुलीही त्या देतात.

‘‘आम्ही ना दर्जात तडजोड करत, ना दरात. २०१०मध्ये आमच्या राइसप्लेटची जी ५० रुपये किंमत होती, तीच आताही आहे. आम्ही सोडा मारत नाही. तेलही चांगलं वापरतो,’ असं त्या मोठ्या अभिमानाने सांगतात. इतकंच नव्हे तर त्यांनी भांडी घासण्यासाठी एक महिलाही ठेवली आहे. तिला महिना दोन हजार रुपये पगार त्या देतात. शिवाय,भाजी कापण्यासाठाही एक मुलगा येतो. तसेच, एक मैत्रीण त्यांना भाकऱ्या बनवून देते. तिला या एका भाकरीमागे आठ रुपये देतात.त्यामुळे त्या स्वत: स्वावलंबी झाल्याच, शिवाय एक पाऊल पुढे टाकत त्या इतरांनाही रोजगार देणाऱ्या ठरल्या आहेत.
५६ वर्षांच्या नंदिनी पाटील यांचे पतीही मोरारजी मिलमध्ये कामाला होते.त्यांना अगदी जेमतेम पगार होता. केवळ अडीचशे रुपयांमध्ये घरखर्च चालवावा लागत असे. त्यामुळे आधीपासूनच धडपड्या स्वभावाच्या पाटीलबाईंनी स्वयंपाक घरातूनच संसाराला हातभार मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू केले. तेलपोळी या कठीण पदार्थांपासूनच त्यांनी श्रीगणेशा केला. नंतर समारंभासाठी जेवण, दिवाळीचा फराळ, नाष्त्याचे पदार्थ,याच्या ऑर्डर त्या घेऊ लागल्या आणि हळूहळू या व्यवसायात त्यांचा चांगलाच जम बसला. आर्थिक स्थिती बेताची असताना त्या दिवसाला ३० डबे पोहोचवत असत. नंतर चार पैसे मिळू लागले. मुलाचं शिक्षण झालं.तो चांगल्या नोकरीला आहे. तरीही पाटीलबाई त्याच उत्साहाने व्यवसाय करतात. ऑर्डर खूपच कमी केल्या असल्या तरी काम पूर्णपणे बंद केलेलं नाही. स्वत:ला कामात व्यग्र ठेवलं की, अन्य विचार येत नाहीत आणि एक ऊर्जा आपोआपच मिळते. म्हणूनच शक्य आहे तोपर्यंत हे काम करत राहणार, असं त्या सांगतात.
काही दिवसांपूर्वी Scroll ने रस्त्यावर खाद्यपदार्थ बनवणार्या विक्रेत्यांच्या आर्थिक गणिता विषयी एक व्हिडिओ मालिका केली होती. कोणताही धंदा अथवा व्यवसाय नफ्यात नसेल, तर तो चालू शकत नाही.इतक्या वर्षांत या महिला आता बऱ्यापैकी नफा मिळवू लागल्या आहेत. मात्र किती पैसे सुटतात, या प्रश्नांचं उत्तर मात्र त्या अस्सल व्यापाऱ्यांसारखं हसत हसतच टाळतात.एकूणच चकचकीत आकाशाला टेकलेल्या इमारतींच्या गर्दीत अनेक गोष्टी हरवल्या. हातातून निसटल्या. परंतु या टॉवरच्या अध्येमध्ये उभ्या असलेल्या जुन्या इमारतींत राहून या महिला अर्थार्जनासाठी,स्वावलंबनासाठी, घर सावरण्यासाठी रांधत आहेत. घराला संकटातून समृद्धीकडे नेत आहेत. यातून त्यांच्याही न नकळत एक संस्कृती जपली जातेय-आत्मीयतेची, जिव्हाळ्याची आणि दुसऱ्याला पोटभर खाऊ घालण्याची. पार्सल काऊंटर, फास्ट फूड, उच्चभ्रू कॅफेच्या गर्दीत हे चार पायांचे स्टॉल म्हणूनच जवळीक निर्माण करत आहेत.
![]() |
ऋतुजा सावंत सुचित्रा सुर्वे |
ऋतुजा सावंत महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रात वरिष्ठ उपसंपादक पदावर, तर सुचित्रा सुर्वे सहाय्यक वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. दोघींनी महिलांसंबंधी विषयांसोबत अन्य घडामोडींवरही लेखन केले आहे.
Tags
खाद्यसंस्कृती