वरुण नार्वेकर

‘मुरांबा’ चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून आपण वरुण नार्वेकरचं नाव ऐकलेलं असेलच! त्याने नुकतीच ‘आणि काय हवं’ नावाची वेबसिरीज सुद्धा केली आहे. पण आम्हाला त्याने केलेल्या खाद्यपदार्थांच्या जाहिराती जास्त वैशिष्ट्यपूर्ण वाटल्या. ह्या जाहिरातींच्या निमित्ताने खाद्यसंस्कृतीशी जोडलेल्या लिंगभावाविषयी त्याने जे विचार मांडले आहेत – त्याविषयी त्याची ही खास मुलाखत! 
ही मुलाखत 'पुन्हा स्त्री उवाच' च्या सहसंपादक अंजली जोशी यांनी घेतली आहे. 



वरुण, आम्ही तुझे चित्रपट पाहिले, तुझी वेब सीरिज पाहिली आणि अर्थात, तुझ्या चितळे बंधूंच्या, अंबारी मसालेच्या आणि इतर जाहिराती बघितल्या आहेत. आम्हाला खास करून मागच्या दिवाळी दरम्यान केलेली - ‘नवं पाऊल’ ही जाहिरात फार आवडली. त्या संदर्भात वंदनाने तिच्या ‘दिव्यमराठी’ मधल्या लेखमालेमध्ये एक लेख लिहिला होता. एका जाहिरातीत दिवाळीचा फराळ हा विषय होता. पारंपरिक चौकट मोडणारा एक वेगळाच विचार त्यात मांडलेला होता. तिला Content Marketing Summit & Awards या संस्थेकडून Best Topic Specific Video हा पुरस्कार मिळाला. ही जाहिरात होती की लघुपट होता? 

वरुण : हा सोशल मिडियावर जाहिरातीचा नवा ट्रेंड आहे. सोशल मिडियावर लघुपटाद्वारे ब्रॅण्ड प्रमोशन करणं हे काही नवं नाही. गेली काही वर्ष आपण नॅशनल ब्रॅण्डसना अशा प्रकारचे लघुपट करताना पाहत होतो. पण आता रिजनल ब्रॅण्डसही यात उतरु लागले आहेत. परंपरागत जाहिरात आणि लघुपटाद्वारे जाहिरात यात महत्त्वाचा एक फरक म्हणजे परंपरागत जाहिरात माध्यमात प्रॉडक्ट विकण्याकडे कल असतो आणि या लघुपटांच्या नव्या माध्यमात एका चांगल्या कथेद्वारे ब्रॅण्ड लोकांच्या लक्षात रहावा हा उद्देश असतो.
नवं पाऊल’ बद्दल सांगायचं तर ‘चितळे बंधू मिठाईवाले यांच्यासाठी दिवाळी निमित्त एक लघुपट’- इतक्या छोट्या ब्रीफनी खरतर या सगळ्याची सुरुवात झाली. इथे प्रॉडक्ट नव्हतं असं नाही; तयार फराळ हे या लघुपटासाठीचं प्रॉडक्ट होतं. नवं पाऊलमध्ये ‘तयार फराळ’ या सोयीचा उपयोग करुन घेऊन घरातली मुख्य स्री कशा प्रकारे तिच्या आनंदाच्या गोष्टी दिवाळीत करु शकते, असा विचार आम्ही मांडला. पण हा विचार येण्यामागे मुळात तयार फराळ ही तयार तूप किंवा तयार लोणची, पापड यासारखीच उपयोगी ‘सोय’ आहे हा दृष्टीकोन होता. त्यामुळे प्रॉडक्ट हे रुचकर, खमंग, खुसखुशीत याच्याही पलिकडे जाऊन ते ‘सोय’ आहे हे सांगावसं वाटलं आणि इथेच तो विचार परंपरागत जाहिरात माध्यमाहून वेगळा होऊन एका चांगल्या कथेत बांधण्यासाठी सज्ज झाला.

जाहिरातीसारख्या मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमधून असा अपारंपरिक विचार मांडावा असं तुला का वाटलं?
वरुण : मी लहानपणापासून बघत होतो की दिवाळीचा फराळ तयार करताना किती त्रास होतो. त्यामुळे त्याच्या बाजूने मला विचार मांडायचा होता. म्हणजे सगळेजण असंच म्हणतात की मला दिवाळीचा आईच्या हातचा फराळ आवडतो किंवा घरचा फराळ आवडतो, घरचीच चव आवडते. पण त्यासाठी किती कष्ट लागतात हे मी बघत होतो. दोनशे दोनशे चकल्या तळणं हे काही सोपं काम नाहीये. मी आईला तळायला मदत करायचो. त्यामुळे काय काय करावं लागतं हे मी नीट बघितलेलं आहे. महिलांना दिवाळी फराळाचे पदार्थ करणे हेच एक काम नसतं! तर त्याच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरं काही करावंसं वाटू शकतं. पण त्याकरता त्यांना वेळ मिळत नाही. हे मी सगळं बघितलेलं आहे . त्यामुळे मनात विचार अगदी पटलेला होता म्हणून मी तो जाहिरातीमध्ये मांडला. त्या जाहिरातीमध्ये सून नोकरी करते आणि तिला वेळ नाही म्हणून ती फराळ करत नाही असं नाही तर सासूला काही वेगळं करायचं आहे, हे ती समजून घेऊ शकते...आणि नंतर त्या मुलाच्या पण ते ध्यानात येतं. असं मी मांडलेलं होतं.

तुझ्याकडे घरी आधीपासून अशा प्रकारचं वातावरण होतं का?

हो.माझ्याकडे माझे वडीलच नाही तर आजोबादेखील आजीला, माझ्या आईला घरकामात मदत करायचे. म्हणजे स्वयंपाक नाही करायचे, पण जेवायच्या आधी ताटवाटी घेणं, जेवण झाल्यानंतर सगळं आवरून ठेवणं या सगळ्या कामात ते मदत करीत. हे मी सगळं लहानपणापासून बघत होतो आणि माझ्यावर हे सगळे संस्कार होते. आणि माझ्या या आजच्या विचारात खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन सुमित्रामावशींचं (सुमित्रा भावे) पण आहे.कारण मी त्यांच्याबरोबर सात वर्षं काम केलं आहे. त्यांच्याबरोबर काम करताना स्त्रीवादी किंवा समानतेचे विचार मला मिळाले. म्हणजे मला काही वेगळं करायला लागलं नाही, ते माझ्यात झिरपतच गेलं.

आपल्या आजूबाजूला असं घडताना खूपजण बघतात पण ते प्रत्येकात झिरपत नाही. तुझी अंबारी मसालेची जाहिरात बघितली. त्यातदेखील सासरे सुनेला मदत करताना दिसतात..

वरुण : हो, मला वाटतं की पुरुषांना स्वयंपाक घरी करणं जमलं नाही तरी त्यांना स्त्रियांना बाकीच्या कामात मदत करता येते. जसं की उद्या सकाळी ब्रेकफास्टला काय करायचं? स्वयंपाक काय करायचा आहे? सगळं बायकांनी ठरवायचं असतं. तर त्यांना पुरुष म्हणू शकतात की तुला काय लागेल ती मदत करतो, काही बाहेरून आणायचं असेल तर सांग. त्यासाठी माझी मदत होऊ शकेल. माझ्या घरी आणि सासरीसुद्धा माझे सासरे घरी सगळी मदत करतात….सुनील सुकथनकर सरांचा सुद्धा माझ्या विचारात फार मोठा वाटा आहे. ते छान फिल्म करतातच, पण त्याचबरोबर छान स्वयंपाक सुद्धा करतात.सात वर्षं त्यांच्याबरोबर काम करताना मी हे सगळं देखील शिकत होतो.

हो...त्यांच्याबरोबर काम करत असताना मीसुद्धा एकदा त्यांच्या हातचं जेवले होते, खूप छान खिचडी केली होती. पण वरूण, मला एक सांग की तू इतका बिझी आहेस तर तुला घरात काम करायला वेळ मिळतो का?
वरुण : मी जेव्हा घरी असतो तेव्हा काही कामांची जबाबदारी मी माझ्याकडे घेतलेली आहेत. ही काम करताना मला खूप मजा येते. म्हणजे मी त्याच्यात रमतोच. कधी त्याच्यावरून सगळे माझी थट्टा उडवतात. पण मी ते काम मनापासून करतो. त्यातलं एक काम म्हणजे कपड्यांच्या घड्या. मी कपड्यांच्या अतिशय सुंदर इस्त्री केल्यासारख्या घड्या घालतो. पुरुषांना स्वयंपाक करता आला तर छानच आहे, पण नाही आला तरी त्यांनी बाकीच्या कामात तरी स्त्रियांना बरोबरीने मदत करायला पाहिजे असं मला वाटतं. माझ्या मुरंबा चित्रपटात पण जे बाबा आहेत म्हणजे सचिन खेडेकर यांची जी व्यक्तिरेखा दाखवली आहे मी, ते अगदी छोट्या छोट्या कामात मदत करतात, सांभाळून घेतात.

'मुरांबा' बघताना अजूनही एक गोष्ट लक्षात आली म्हणजे त्यात खाण्यापिण्याचे खूप संदर्भ येतात. म्हणजे एकतर दृश्य स्वरूपात किंवा इतर. त्याचं काही विशिष्ट कारण आहे का?
मला हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला ‘मुरांबा’ विषयीच्या इंटरव्यूमध्ये. खरं म्हणजे हे नकळत झालेलं आहे, जाणीवपूर्वक झालेलं नाहीये. मी लिहिताना याचा अजिबात विचार केला नव्हता. पण हा प्रश्न यायला लागल्यावर मी विचार केला, तेव्हा लक्षात आलं की ‘मुरांबा’ ही एकत्र येण्याची फिल्म आहे. आणि त्याच्यासाठी अन्न हे एक कारण आहे. हा संवादाचा चित्रपट आहे आणि संवादासाठी लोक एकत्र येणं गरजेचं आहे. चहा, जेवण या कारणासाठी तरी किमान लोक एकत्र येतात, बसतात, बोलतात. तर ते एकत्र येण्याचं माध्यम म्हणून अन्न वापरलं आहे असं मला वाटतं.

तुझ्या व्यक्तिगत आयुष्यात किंवा चित्रपट करताना तुला अन्नाशी संबंधित आठवणीत राहतील असे काही वेगळे अनुभव म्हणजे काही आहेत का?
खरं म्हणजे मला शेफ व्हायचं होतं, पण तो एक वेगळाच मुद्दा आहे. दहावीनंतर मला असंख्य गोष्टी करायच्या होत्या त्यातली हीपण एक गोष्ट होती. अजून एक गोष्ट म्हणजे मी खूप लहानपणापासून म्हणजे सातवीत असल्यापासून पावभाजी करतो. खोटं वाटतं लोकांना! पण एकदा आईबाबा घरी नव्हते तेव्हा मग पावभाजी करून त्यांना खाऊ घातली होती. तेव्हा आईला खूप काळजी वाटत होती की आपण घरी नसताना याने गॅस सुरू केला, काही झालं असतं तर ? पण बाबा खूश होते माझे! हा झाला माझ्या व्यक्तिगत आयुष्यातला किस्सा आणि एक चित्रपटामधला किस्साही आहे. 
मुरंबामध्ये जी आई होती, तिला डोसे खूप छान करता येतात. त्याला जे पीठ लागतं ते ती सेटवर घेऊन आली. प्रॉपर्टीवाल्यांना ती म्हणाली की तुम्ही आणू नका मला माहीत आहे कसं पीठ लागतं. त्याप्रमाणे तिने पीठ करून आणलं आणि लोणीपण घेऊन आली. आणि मुरंबामध्ये असा एक शॉट आहे कि ती डोशावरती खूप लोणी घालते. तिचं कुटुंबपण कर्नाटकामधलं असल्यामुळे ती म्हणाली की इतकंच लोणी घालतात. त्यामुळे मला खूप छान वाटलं की फिल्ममधली आई तशीच मिळाली, जिला खूप छान डोसे करता येतात आणि आमचा सीन झाल्यावर तिने सगळ्यांना डोसे खाऊ घातले होते.

तू आत्ताच म्हणालास की तुला शेफ व्हायचं होतं. मग तुला एखादा चटकन होणारा किंवा तुला आवडणारा पदार्थ, त्याची पाककृती द्यायला आवडेल का?
हो नक्कीच. त्याचं नाव नाहीये पण मी तो पदार्थ करतो म्हणजे मी पण घरी टीव्हीवर बघूनच शिकलेलो आहे. खूप कांदा, खूप टोमॅटो, शेजवान सॉस आणि काही अगदी बेसिक भाज्या हे सगळं घेऊन मी एक भाजी तयार करतो आणि पॅनवर लावतो. त्याच्यामध्ये मध्ये जागा तयार करतो, त्याच्यावर अंडी फोडतो, त्यातला जो पिवळा भाग असतो तो डिझाईनसारखा त्या होलमध्ये जाऊन बसतो. मग त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि ते शिजू द्यायचं. मग हळूहळू तो पिझ्झासारखा तयार होतो. मग तो पोळी किंवा ब्रेड कशाहीबरोबर खाता येतो. अशी माझी एक झटपट पाककृती आहे. मला जेव्हा जेवणाचा कंटाळा येतो तेव्हा मग मी हा पदार्थ करतो आणि तो मला खूप आवडतो. हा पदार्थ तो खूप स्पाइसी असतो आणि त्यात मी भरपूर चीज घालतो.

छान आणि इन्स्टंट रेसिपी आहे.. मी पण करुन बघेन. तुझ्या पुढच्या मालिकेसाठी आणि सगळ्या सर्जनशील प्रवासासाठी खूप शुभेच्छा!

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form