मुंबई ते नैरोबी आणि नैरोबी ते मोंबासा हा विमान प्रवास उरकून मी मोंबासा विमानतळावर उतरलो. अलुवालिया मला विमानतळावर न्यायला येईल असा अंदाज होता. पण फक्त हॉटेलची गाडीच आली होती. तो कदाचित कामात बिझी असेल असं मी मनाला समजावलं आणि गाडीत बसलो. साधारण अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर ‘रीफ’ हॉटेलच्या प्रवेशदारात मी गाडीतून उतरलो आणि हॉटेलकडे मी प्रथम पाहिलं तेव्हाच मला हॉटेलची वास्तू आणि भोवतालचा परिसर मनापासून आवडला. मी रिसेप्शन लॉबीत शिरलो तर पंचतारांकित हॉटेलात असतात त्या सगळ्या सुविधा तिथे होत्याच पण सजावट करताना कुठेही रुक्ष आधुनिकता आणली नव्हती. हॉटेलच्या खांब, तुळया, दरवाजे, खिडक्या यांत सढळ हस्ते नीट पॉलिश केलेल्या काळ्या आणि लाल लाकडाचा वापर केला होता. भिंतींवर असलेलं रफ प्लास्टर जरी सिमेंटचंच असलं तरी भिंती मातीने लिंपून त्यावर चुन्याचा गिलावा केल्याचा भास होत होता. भिंतींवर सजावटीसाठी वापरलेले निरनिराळे आफ्रिकन मुखवटे, प्राणी, शस्त्र आफ्रिकन संस्कृतीची ओळख करून देत होते. भरपूर उतार असलेला छताचा सांगाडादेखील ओबडधोबड परंतु पॉलिशने चकाकणाऱ्या लाकडी वाशांचाच बनवला होता. छत झाकायला आपल्या कोकणाप्रमाणेच नारळाच्या सुकवलेल्या झावळ्या एकमेकांवर रचल्या असल्या तरी रचायची पद्धत मात्र कोकणापेक्षा वेगळी होती. त्या हॉटेलच्या लॉबीत, इकडून तिकडे कामासाठी धावपळ करणारे स्थानिक कर्मचारी माझ्या दृष्टीला खूप वेगळे वाटले, पण त्या हॉटेलच्या लॉबीला मात्र ते शोभा आणत होते. तिथे वावरणारे सर्वच लोक गडद वर्णाचे आणि माझ्यापेक्षा खूपच उंच होते (मुलीसुद्धा माझ्यापेक्षा कितीतरी उंच होत्या). हॉटेलने त्यांना दिलेला गणवेशही अनौपचारिक आणि केनयन संस्कृतीची ओळख करून देणारा होता. त्या लॉबीत इकडून तिकडे वावरणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक आकर्षक हास्य होतं तर वावरण्यात एक उत्साह. लॉबी तशी चारही बाजूंनी उघडीच होती. त्या रिसेप्शन लॉबीमधूनच लाकडी पायऱ्यांचा जिना एका प्रचंड मोठ्या दालनात उतरत होता. ते रेस्टॉरंट किंवा डायनिंग हॉल असावा असं वाटलं. त्याच्या पलीकडे दूरवर दिसणाऱ्या समुद्रापर्यंत सुंदर बागा पसरलेल्या होत्या. त्या बागांच्या सौंदर्याला कुठेही धक्का लागू न देता कॉटेजसारख्या दिसणाऱ्या रुम्सची संकुलं बांधली होती. लॉबीप्रमाणेच या संकुलाच्या बांधकामात वापरण्यात आलेलं साहित्यही आजूबाजूच्या निसर्गातूनच घेतलं होतं. जिथे पाहावं तिथे निरनिराळ्या रंगांचे बोगनवेल, चाफे, नारळ, पोफळी, पाम असल्या ओळखीच्या झाडांची रेलचेल. या बागांतून पूर्ण आळसात लोळत पडलेले, आजूबाजूच्या जगाशी काहीही संबंधच नाही असं दाखवणारे युरोपीय पर्यटक या रिसॉर्टचं सौंदर्य वाढवतच होते. या लॉबीची रचना इतकी मोकळी होती की हे सर्व दृष्य मला तिथे उभ्याउभ्याच दिसत होतं.
माझं रिसेप्शन लॉबीमधे एक शहाळं प्यायला देऊन यथोचित स्वागत झालं आणि एक बेलबॉय मला माझ्या रूममधे घेऊन गेला. रूममधे माझं सामान ठेवून मी आंघोळ वगैरे करून थोडासा फ्रेश झालो. याच हॉटेलमधे अलुवालिया काम करत होता. त्याला भेटून आपला पुढचा कार्यक्रम आखावा असं डोक्यात होतं. त्यामुळे हॉटेल आणि कामासंबंधी माहिती मला त्याच्याकडून मिळाली असती. अलुवालियाची भेट कधी आणि कुठे घेता येईल याची चौकशी करण्यासाठी मी रिसेप्शनला फोन करणार इतक्यात मला जनरल मॅनेजरच्या ऑफिसमधून बोलावणं आलं. रविवार असल्यामुळे खरं तर जनरल मॅनेजरची सुट्टी होती पण फक्त मला भेटायलाच तो हॉटेलमधे आला होता. मी तातडीने जनरल मॅनेजरच्या ऑफिसमधे त्याला भेटायला गेलो. ‘श्री. क्लोहे’ मी दारावर लावलेल्या पाटीवरचं नाव वाचलं. दारावर टकटक करून आत शिरलो. बाहेरच्या छोट्याशा खोलीत त्याच्या सेक्रेटरीचं टेबल होतं. रविवार असल्यामुळे सेक्रेटरीची खुर्ची रिकामीच होती. आतली जनरल मॅनेजरची केबिन उघडी होती. आत्तापर्यंत मुंगिजखानशी झालेल्या बोलण्यावरून, श्री. क्लोहे नावाचे कोणी जर्मन गृहस्थ या हॉटेलचे जनरल मॅनेजर आहेत हे माहीत होतं. पण नावापलीकडे या इसमाबद्दल काहीच माहिती मला नव्हती. श्री.क्लोहे माझीच वाट बघत असल्याचं लक्षात आलं. त्यांनी मला अत्यंत त्रासिक आवाजात आतमधे बोलावलं, बळेबळेच अभिवादन केलं आणि बसायला सांगितलं. मी मोंबासाला यायला रविवारचाच दिवस निवडल्यामुळे त्यांना त्यांच्या सुट्टीचा वार खराब करायला लागला होता याची जणू जाणीव ते करून देत होते. त्यानंतर जो एक छोटासा संवाद आमच्यामधे झाला, त्याने मला पहिला धक्का दिला.
“तुला सांगताना मला आनंद होत आहे की, तुझ्या मुंगिजखान या मित्राला परत भारतात पाठवण्यात आलं आहे. आणि मोंबासातील तुझा मित्र अलुवालिया मुंगिजखानची जागा घ्यायला झांझिबारला पळाला आहे. तेव्हा आता तुला कोणाच्याही मदतीशिवायच मोंबासात आपली कुवत सिद्ध करावी लागेल.’’ हॉटेलमधे नवीन आलेल्या शेफचं स्वागत जनरल मॅनेजरने या वाक्यांनी केलं होतं. याच ग्रुपच्या झांझिबारच्या हॉटेलमधे श्री. मुंगिजखान जनरल मॅनेजर म्हणून काम करत असत. पण मधल्या काळात मॅनेजमेंट बरोबर झालेल्या काही वादांमुळे मुंगिजखानने नोकरी सोडली होती आणि झांजिबारच्या हॉटेलमधे त्याची जागा घेण्यासाठी अलुवालियाला पाठवण्यात आलं होतं. हे सर्व काळजी करण्यासाखंच होतं.
“काळजी करू नका. मी सर्व व्यवस्थित सांभाळीन.’’ मी उसनं अवसान आणून उत्तरलो. या सगळ्याचा अर्थ असा होता की या एकशे सत्तर खोल्यांच्या तीस एकरवर पसरलेल्या रिसॉर्टमधे मी एकटाच भारतीय शिल्लक राहिलो होतो. संपूर्णपणे नव्या देशातील, वेगळ्या वातावरणातील नवीन नोकरीत मला थोडा पाठिंबा देऊ शकतील, सुरुवातीच्या काळात मला थोडा सल्ला देऊ शकतील असे माझे दोनही आधार पहिल्याच दिवशी गायब झाले होते. त्या काळात इ-मेल आणि सेलफोनचाही आधार नव्हता ज्याद्वारे मी अलुवालियाशी झांझिबारला सतत संर्पकात राहू शकलो असतो. श्री. क्लोहेंनी मला आडून आडून असंही सुचवायचा प्रयत्न केला होता की माझ्या तथाकथित गॉडफादरची मुंगिजखानची या ग्रुपमधून उचलबांगडी झाली असल्यामुळे मला इथे मोंबासात काम करणं थोडं कठीणच असणार आहे. आमच्या या संवादात त्यांनी मला दोनतीनदा जाणीव करून दिली की, खरं तर या पदासाठी कोणीतरी चांगला प्रोफेशनल जर्मन शेफ त्याला आणायचा होता पण मुंगिजखानमुळे माझी वर्णी या नोकरीसाठी लागली होती. हे बोलताना हसत हसत त्याने मी प्रोफेशनल आणि चांगला शेफ नाही, चांगले शेफ हे फक्त जर्मनच असतात, आणि आता गॉडफादरशिवाय माझं मोंबासात काही खरं नाही हे माझ्या मनावर बिंबवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता.
“आज रविवार आहे. सुट्टीचा दिवस. आज शक्य आहे तेव्हा स्विमींग पूल बारवर मजा किंवा आराम करून घे. पण उद्या सकाळच्या मीटिंगला मात्र ठीक साडेनऊ वाजता आपण भेटूच.’’ त्याने कुत्सितपणे हसत मला दुसऱ्या दिवशी सकाळच्या मीटिंगला हजर राहायला सांगितलंच पण माझं तुझ्यावर लक्ष आहे तेव्हा सावधान राहण्याचा इशाराही दिला. वर्णद्वेष मी कधी अनुभवला नव्हता; पण यालाच वर्णद्वेष म्हणतात का? ही शंका येऊन गेली. मनातलं बोलायलाही आजूबाजूला कोणी नव्हतं. माझा माझ्या कामावर, कर्तृत्वावर विश्वास होता. मी किचन चांगल्या प्रकारे चालवू शकेन याबद्दलही खात्री होती. मी मुंगिजखानकडे माझी ढाल म्हणून कधीच बघितलं नव्हतं. तरीसुद्धा नोकरीच्या पहिल्याच दिवशी आपला बॉसच आपल्या विरोधात आहे आणि ही माहिती आपल्या बॉसनेच आपल्याला हसत हसत देणं जरा भीतिदायकच होतं. पण विचार केला की भारत सोडून मी इतक्या दूर नोकरीसाठी आलोच आहे तेव्हा ‘आलीया भोगासी असावे सादर’ या म्हणीप्रमाणे जे जे समोर येईल त्याला तोंड द्यावं.
मला त्या दिवशी तरी हॉटेलच्या आतमधेच राहणं भाग होतं. शहरात माझ्या ओळखीचं असं कोणीच नव्हतं. एकट्याने हॉटेलच्या बाहेर, शहरात फिरणं सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचं आहे असं मला आत्ताच रिसेप्शनिस्टने बजावलं होतं. मी हॉटेलच्या लॉनवर फेरफटका मारला आणि पूलजवळच्या बारवर स्थानापन्न झालो. जाडजूड लाकडी खांबांचा आणि नारळाच्या झावळ्यांनी झाकलेल्या उतरत्या छताचा मांडवच होता तो! तिथे एकदोन बियर पिण्याचा विचार होता. बारमनने फेसाळलेल्या बियरचा पिल्सनर ग्लास माझ्यासमोर ठेवलादेखील. मी बियरचा पहिला घोट घेत, हाताने मिशीला लागलेला फेस पुसत इकडेतिकडे बघत होतो तर लक्षात आलं की श्री. क्लोहे आपल्या बायको आणि मुलांसमवेत समोरच स्विमींग पूलवर मजा करत होते. म्हणजे त्यांची सुट्टी माझ्यामुळे पूर्ण खराब झाली नव्हती. मला थोडं बरं वाटलं. त्यांची नजर माझ्यावर पडली. ते आपल्या पत्नीला घेऊन माझ्या खुर्चीजवळ आले आणि माझी तिच्याशी ओळख करून दिली. आमचा थोड्या वेळापूर्वी एक रंजक संवाद झाला आहे याचा मागमूसही त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. शिष्टाचाराची चार वाक्यं बोलून ते निघून गेले. थोड्या वेळाने एक, कॉटनची अर्धी चड्डी, कॉटनचा हाफ स्लीव्हचा शर्ट आणि डोक्यावर टक्कल झाकू शकेल एवढीच मोठी एक पांढऱ्या रंगाची कॉटनची टोपी अशा वेशातला, अगदी बुटका, गोरा पण रापून लाल झालेल्या वर्णाचा, भारतीय वंशाचा म्हातारा माझ्या समोरच्या खुर्चीवर बसला. त्याने स्वतःची ओळख करून दिली. “मी कुलदीप सोंधी. या ग्रुपचा मॅनेजिंग डायरेक्टर. रीफ हॉटेलमधे तुझे स्वागत करतो. तुला भेटून खूप आनंद झाला.’’ माझा बियरच्या ग्लास पटकन खाली ठेवत, मी माझ्या बारस्टूलावरून अर्धवट उठलो आणि त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. नोकरीच्या पहिल्याच दिवशी कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरशी माझी ओळख झाली होती, पण ती बियर पिताना. भारतीय नोकरीतील शिष्टाचारांनुसार हा मोठा गुन्हाच होता. मी मनात थोडासा घाबरलो. आज कुठलीच गोष्ट सुरळीत होत नव्हती. ते चेहऱ्यावर न दाखवण्याचा प्रयत्न केला. श्री. सोंधीशी मी फोनवर बोललो होतो. त्यांनी माझा फोनवर इंटरव्ह्यू घेतला होता. त्यांची माझ्या मनात असलेली प्रतिमा ही उंच, दाट दाढीमिशा वाढवलेले, पगडी बांधलेले, अशा शीख सरदाराची होती. त्या प्रतिमेला या भेटीने पूर्णपणे तडा गेला. एकतर श्री. सोंधी फारच बुटके होते. त्यांना पूर्ण टक्कल होते. त्या टकलावर पगडी बांधण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. त्यांनी माझ्याशी काही अगदीच जुजबी आणि औपचारिक गप्पा मारल्या. ते निघून गेले. पुढच्या अर्ध्या तासात मला हॉटेलचे चारपाच इतर अधिकारी उगीचच भेटून गेले. इतक्या लोकांना भेटल्यानंतर का ते माहीत नाही पण मी अत्यंत अस्वस्थ झालो. त्यांच्याशी मारलेल्या गप्पांनंतर माझ्या एक लक्षात आलं, की आपण इथे येणार असल्याची बरीच चर्चा इथल्या अधिकारी वर्गात झाली आहे. अवघ्या सहाआठ महिन्यांत इथे नोकरी करणारा मी तिसरा शेफ होतो. माझ्याकडे हे सर्व जण नवं गिऱहाईक म्हणूनच बघत असल्याचं मला प्रकर्षाने जाणवलं. नोकरीच्या पहिल्याच दिवशी मला जनरल मॅनेजर कडवट स्मितहास्याच्या मुखवट्याआडून दम देतो आणि मग हॉटेलचे सर्व वरिष्ठ अधिकारी मला बारकाउंटरवर बसून बियर पिताना भेटून जातात. (भेटूनपेक्षा न्याहाळून!) त्या सर्वांच्या चेहऱ्यावर मला, ‘हा आता किती दिवस टिकतो बघू या,’ असं सांगणारं छद्मी हास्य दिसत होतं. आत्तापर्यंत मी घेतलेल्या अनुभवांपेक्षा हा फार वेगळा आणि न पचणारा असा होता. मी माझं बियर पिणं घाईघाईनेच आटपलं, आणि सरळ माझ्या रूमकडे सटकलो. दुपारी उशिरा मी जो बिछान्यात शिरलो तो दुसऱ्या दिवसाच्या सकाळपर्यंत तिथेच होतो. इतका वेळ बिछान्यात राहूनही रात्री झोप मात्र नीट लागलीच नाही.
दुसऱ्या दिवशी लवकर उठून मी सकाळच्या मीटिंगला वेळेच्या आधीच पाच मिनिटं पोहोचलो. सेक्रेटरीला मी माझी ओळख करून दिली. सकाळच्या मीटिंगला जनरल मॅनेजरच्या उजव्या हाताची दुसरी सीट शेफची होती. मी माझ्या खुर्चीवर बसलो. एक एक जण येऊ लागले आणि माझ्याकडे कुतूहलाने बघत आपल्या खुर्चीत बसू लागले. डोळ्यांत भाव होते ते मी काल पूलबारवर अनुभवलेलेच. ‘आता हा प्राणी बघू या किती दिवस टिकतो ते!’ सर्वांत शेवटी जनरल मॅनेजर आले आणि मीटिंगला सुरुवात झाली. किचनचा प्रतिनिधी म्हणून अली नावाचा एक शेफ आला होता. मीटिंगमधे श्री. क्लोहे आणि एक मार्केटिंग मॅनेजर हे युरोपियन तर चीफ इंजिनीयर आणि हाऊस कीपर हे भारतीय वंशाचे लोक सोडून बाकी सर्व आफ्रिकन लोकच होते. सगळ्यांचा वर्ण गडद आणि त्या वर्णामुळे उठून दिसणारे पांढरे स्वच्छ दात आणि निर्विकार डोळे. मी रिसेप्शन कक्षात पाहिलेल्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि इथे असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव यांत मला जमीन-अस्मानाचा फरक जाणवत होता. इथे मीटिंगच्या वातावरणाचा दबाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. सर्वप्रथम जनरल मॅनेजरने माझी सर्वांना ओळख करून दिली. अत्यंत औपचारिक पद्धतीने, ठराव मांडून माझं हॉटेलमधे स्वागत करण्यात आलं. नंतर सर्व आफ्रिकन मॅनेजरनी आपली ओळख करून दिली. काहींची नावं ख्रिश्चन असली तरी बाकीच्यांची नावं स्थानिकच असल्यामुळे मला लगेच लक्षात राहणं कठीणच होतं, पण नावं मात्र मला मजेशीर वाटली. त्या औपचारिक ओळख परेडचा मला खरा कंटाळा आला होता. मी भारतात बऱ्याच मीटिंगना उपस्थित राहिलो आहे. पण एवढी औपचारिकता कधीच कुठे पाहिली नाही. या मीटिंगमधे मला एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे आफ्रिकन मॅनेजर कुठल्याही युरोपियन आणि भारतीय माणसांच्या नजरेला नजर मिळवत नव्हते. एक तर ते खाली बघत किंवा दुसरीकडेच कुठेतरी बघत. त्यांचं मीटिंमधलं बोलणं अत्यंत औपचारिक होतं. जड जीभ आपल्याच तोंडात घोळवत बोलण्याच्या त्यांच्या लकबीमुळे आणि इंग्रजीच्या थोड्याशा वेगळ्या उच्चारांमुळे कळायला थोडं कठीण जात होतं. पण ते क्लोहे साहेबांचीच री पुढे ओढत आहेत एवढा मात्र अंदाज येत होता.
त्या मीटिंगच्या दरम्यान मला दोन गोष्टी सांगितल्या गेल्या; पहिली म्हणजे गेल्या सहा महिन्यांत ह्या हॉटेलमधून दोन शेफ नोकरी सोडून (पळून) गेले होते. (ही गोष्ट मला आदल्या दिवशी कळली होती). दुसरं म्हणजे किचनमधील माझी सेकंड इन कमांड असलेल्या मार्गारेट नावाच्या ‘सु-शेफ’ला महिन्याभरासाठी सुट्टीवर पाठवण्यात आलं होतं. म्हणजेच काम करताना कुठल्याही प्रकारचा सपोर्ट मला मिळणार नाही याची तजवीज करण्यात आली होती. तिच्या जागी अली या ज्युनियर शेफला मला किचनबद्दल सर्व माहिती देण्याची आणि मला किचनची सवय होईपर्यंत म्हणजे अजून एक आठवडा तरी कामकाजाची जबाबदारी त्याच्यावरच ठेवण्यात आली होती. मी मनातल्या मनात या निर्णयासाठी तरी जनरल मॅनेजरचे आभार मानले. या किचनचा कंट्रोल पूर्ण आपल्या ताब्यात घेणं फार सोपं जाणार नाही याची कल्पनाही तोपर्यंत मला आली.
मीटिंगनंतर मला एच.आर. मॅनेजरच्या ताब्यात देण्यात आलं. त्याच्याबरोबर त्याच्या ऑफिसमधे जाऊन वर्क परमिट, रेसिडेंट व्हिजाचे फॉर्म अशांसारख्या काही कंटाळवाण्या पण महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण केल्या. त्यानंतर तो मला हॉटेलच्या राउंडला घेऊन गेला. प्रत्येक डिपार्टमेंटमधे माझ्याकडे बळीचा बकरा न्याहाळल्यासारखे बघत होते. संपूर्ण हॉटेलला माझं दर्शन घडवल्यानंतर त्याने मला माझ्या ऑफिसमधे आणून सोडलं. मी केबिनमधे शिरतो न शिरतो तोच किचन तात्पुरतं चालवण्याची जबाबदारी असलेला अली केबिनमधे शिरला. मी घड्याळ बघितलं आणि लंच बुफे लावायची वेळ झाली आहे असा अंदाज बांधला. मला खरं तर पूर्ण स्टाफला भेटायचं होतं पण आत्ता वेळ नव्हता. मी अलीला सांगितलं की, “आता लंचसाठी बुफे लावायची वेळ झाली असेल, तेव्हा तुम्ही लंचचे काम उरकून घ्या. मी बाजूला उभा राहून बघेन. लंच संपला की आपण स्टाफची ओळख करून घेण्यासाठी मीटिंग घेऊ. त्यानंतर तू मला या किचनचं ऑपरेशन नीट समजावून सांग.’’ हसून अलीने होय म्हटलं खरं पण तो अजूनही माझ्याबरोबर मोकळेपणाने बोलत आहे असं मला तरी वाटलं नाही. आम्ही रेस्टॉरंटकडे निघालो. वाटेत अली किचन टीममधील इतरांना स्वाहिली भाषेत काही काही सूचना देत होता. माझ्यासाठी ते बोलणं अगम्यच होतं. त्या सूचना लंच बुफे नीट लावण्यासंबंधी होत्या की अजून काही, याचा अंदाज बांधणं अशक्य होतं. ही भाषा स्वाहिली असावी हासुद्धा माझा अंदाजच होता.
आम्ही डायनिंग रुममधे शिरतच होतो इतक्यात एक उंच, स्मार्ट केनयन मुलगी माझ्या दिशेने चालत आली. “हाय, शेफी!’’ म्हणत तिने आपले दोनही हात मोठ्या उत्साहात वर केले. म्हणजे वेस्ट इंडियन क्रिकेटर्स एकमेकांना हात वर करून टाळ्या देतात ना तसे. मी थोडासा बावचळलोच तरीही तिने हसत हसत आणि उत्साहात केलेल्या अभिवादनाचा मी तिच्याइतक्या सफाईने नाही, पण स्वीकार केला. “मी मेरी. मेरी ओडिंगा. मी या डायनिंग हॉलची बॉस आहे.’’ या मुलीने काळ्या रंगाचा स्कर्ट आणि पूर्ण बाह्यांचा पांढरा ब्लाउज घातला होता. टाळी देण्याच्या नादात तिच्या ब्लाउजच्या बाह्या वर जाऊन तिचे हात थोडेसे उघडे पडले. तिने पटकन त्या बाह्या नीट केल्या. ही माझी आणि मेरीची पहिली भेट.
त्या वेळेला मी माझ्याच अनेक विवंचनांमध्ये दंग होतो. त्यामुळे मेरीकडे फारसं लक्ष दिलं नाही. किचनच्या टीममधील सहासातजण आपआपल्या सेक्शनचं खाणं बुफेवर लावत होते. खाणं बुफेवर सजवण्याची इथली किंवा माझ्या स्टाफची काय पद्धत आहे? त्या पद्धतीत मला ताबडतोब काही बदल करता येतील का? मी केलेले बदल सर्वांच्या लक्षात कसे येतील? या गोष्टींमधे मला त्या वेळेला जास्त रस होता. मी थोडासा बाजूलाच उभा राहून त्यांचं काम बघत होतो. माझ्या जवळच एक शेफ त्याने बनवलेली सलाड्स बुफेवर लावत होता. त्याने खरं तर अनेक तऱ्हेच्या सलाड्सने भरलेले बाउल टेबलावर मांडले होते पण त्या रंगीबेरंगी सलाड्सचे रंग खुलून दिसत नव्हते. त्याचं कारण बुफेवर सलाड्स मांडताना त्या शेफने सलाड्सच्या रंगांबद्दल विचार केला नव्हता. मी थोडंसं पुढे होऊन त्या शेफला सलाड्सच्या रंगसंगतीबद्दल माझ्या मनात असलेल्या शंका विचारल्या. त्या शेफने अत्यंत निर्विकार चेहऱ्याने माझ्याकडे बघत मला न समजणाऱ्या स्वाहिलीमधे काहीतरी उत्तर दिलं. मी पुन्हा तोच प्रश्न विचारला तर त्याने पुन्हा अगम्य अशा स्वाहिलीतच उत्तर दिलं. बाजूला कोपऱ्यातल्या एका टेबलावर बसलेली मेरी आपलं काम करता करता माझे त्या शेफशी संवाद साधण्याचे चाललेले निष्फळ प्रयत्न पाहत होती. त्याची मजाही घेत होती. ती गालातल्या गालात हसत आहे असं मला उगीचच वाटलं. मी अस्वस्थ झालो आणि तिच्या विरुद्ध दिशेला असलेल्या फूड काऊंटरकडे माझं लक्ष केंद्रित केलं. त्या काऊंटरवर मला माहीत नसलेले काही आफ्रिकन पदार्थ ठेवले होते. त्या बुफेची सजावटही आफ्रिकन करण्याचा प्रयत्न दिसत होता. मला ह्या नवीन पदार्थांबद्दल अजून जाणून घ्यावंसं वाटलं. ते पदार्थ बुफेवर लावत असलेल्या शेफला मी तसं विचारलं तर त्यानेही माझ्याकडे तसंच निर्विकार नजरेने बघितलं आणि मग स्वाहिलीमधेच एक एक पदार्थाविषयी तो मला समजावून द्यायला लागला. मी बावचळलो. या इसमाला इंग्रजी येत असावं पण स्वाहिलीत बोललेलं मला काही कळणार नाही हे लक्षात घेऊन तो मुद्दामच माझ्याशी स्वाहिलीत बोलत असावा याबद्दल मला खात्री होती. त्या माणसाचा मनातून सणसणीत राग आला होता पण मी चेहऱ्यावर काहीही न दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्याच वेळी माझ्या पाठून जोरात हसण्याचा आवाज आला म्हणून सहज पाहिलं तर डायनिंग हॉलमधे काम करणाऱ्या दोन मुली मला हसत होत्या आणि मेरी खुणेने त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करत होती. मेरीच्या चेहऱ्यावरही स्मितहास्य होतंच. कितीही राग आला तरी त्या क्षणी रागवून काही उपयोग नव्हता हे मी जाणलं. आपण आज अजून कोणालाही प्रश्न विचारायचे नाहीत असं ठरवलं आणि गुपचूप बाजूला उभं राहून काम बघत बसलो. चारपाच पदार्थांची चवही बघितली. सगळ्या पदार्थांची चव बऱ्यापैकी होती. पण पदार्थ बनवताना अखेरचा हात फिरवण्यात कुठे तरी कमतरता वाटत होती, घाई केल्यासारखं वाटत होतं. तरी मनाला थोडं बरं वाटलं कारण निदान माझ्या टीमला जेवण बनवायला शिकवण्यात माझा वेळ जाणार नव्हता. बुफेची मांडणी, रंगसंगती या गोष्टी मात्र पूर्ण बदलायला लागणार होत्या. मुख्य अडचण होती ती भाषेची. या गोष्टी टीममधल्या लोकांना समजावून सांगणं फार जड जाणार होतं. मी आजूबाजूला बघितलं. मला अलीशी या विषयावर बोलायचं होतं पण अली तर आत किचनमधे होता. मी त्याला किचनमधून बोलवायचं ठरवलं. पण त्याला मी बोलावणार कसा होतो? त्याला बोलावण्यासाठी कोणाबरोबर निरोप पाठवणंही शक्य नव्हतं. तो निरोप पाठवायला मी कुठली भाषा वापरणार होतो? मेरीला इंग्रजी येत होतं पण ती तर पाठी बसून मला हसत होती. मी स्वतःच किचनमधे गेलो. तिथे अली काहीतरी काम करत होता. त्याला हाताने धरून मी डायनिंग हॉलमधे आणलं. मला बुफेच्या मांडणीत काय बदल अपेक्षित आहेत ते मी अलीला सांगितलं. त्यावर त्याने मान तर डोलावली पण नंतर काही कामासाठी किचनमधे जाऊन येतो असं म्हणाला आणि गायबच झाला. माझ्याबद्दल काहीही जाणून न घेताच माझ्या टीमने माझ्याशी असहकार पुकारला आहे हे माझ्या लक्षात आलं. पण त्या क्षणी तरी मी असहाय्य होतो.
इतक्यात माझं लक्ष डायनिंग हॉलच्या दुसऱ्या कोपऱ्यात गेलं. तिथे काल मला भेटलेले हॉटेलचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. सोंधी त्या कोपऱ्यातल्या टेबलावर बसून कोका कोला पित होते. खरं तर माझं काय चाललं आहे ते न्याहाळत होते. मी त्यांना बघितलं आहे हे लक्षात आल्यावर श्री. सोंधी आपला कोका कोलाचा ग्लास तसाच ठेवून माझ्या दिशेने चालत आले. मला म्हणाले, “शेफ तू काळजी करू नकोस, मी फक्त तुला काम करताना बघत आहे.’’ हे वाक्य ऐकून मी थंड पडलो. माझ्या अख्ख्या आयुष्यात नोकरीवर नवीन रुजू झालेल्या शेफवर किंवा कुठल्याही कर्मचाऱ्यावर हॉटेलच्या मॅनेजिंग डायरेक्टरने अशा तऱ्हेने लक्ष ठेवलेलं मी कधीच पाहिलं नव्हतं. मी मनाशी माझी पुढची योजना आखली. मी बुफेवरील पदार्थांची मांडणी स्वतःच बदलायचं ठरवलं. असं आयत्या वेळेस फार काही करणं शक्य नव्हतं आणि कोणाची मदतही घेता येणार नव्हती. मी त्या दिवशीच्या मेनूचा काही अभ्यासही केला नव्हता. आफ्रिकन पदार्थांबद्दल तर मला काहीही माहिती नव्हती. तरीसुद्धा रंगसंगती, घेतलेल्या चवी, माझा पूर्वीचा अनुभव आणि यांच्या जोडीला थोड्या तर्कसंगतीची मदत घेऊन सलाड्स आणि डेझर्ट बुफेची मांडणी बदलायला सुरुवात केली. मी एकटाच काम करतो आहे हे बघून आजूबाजूचे काही जण कुतूहलाने माझ्याकडे बघू लागले. आता बघ्यांची संख्या वाढली होती. त्यात आमचे जनरल मॅनेजर श्री. क्लोहे यांचीही भर पडली होती. थोड्या वेळाने मेरीने हळूच आणखी एका मुलीला सोबतीला घेऊन मला मदत करायला सुरुवात केली. माझा सर्व बदल करून झाला तसा मी बुफेपासून थोडा दूर उभा राहून, अजून काही राहिलं नाही ना, हे न्याहाळत होतो. मेरी माझ्यापाठी उभी राहून फक्त मलाच ऐकू येईल अशा हळू आवाजात कुजबुजली, “शेफ, बुफे खरंच चांगला दिसत आहे.’’ एरवी अशी कोणी पावती दिली असती तर मी ते फारसं मनावर घेतलं असतंच असं नाही. पण त्या क्षणी मेरीचे शब्द माझ्या कानाला मधुर संगीताप्रमाणे वाटले. “मला त्याबद्दल बक्षीस म्हणून कॉफी मिळू शकेल का?’’ मी तिला प्रतिप्रश्न केला. तिने हसून मला माझ्या केबिनमधे जायला सांगितलं. मला कॉफी कशी, स्ट्राँग की लाइट, किती गोड वगैरे तपशील विचारून घेतले. मी केबिनकडे जाता जाता आजूबाजूच्या लोकांच्या प्रतिक्रिया हळूच बघण्याचा प्रयत्न केला. माझ्याच टीममधले काही जण, मी बुफेवर काय बदल केले आहेत ते चोरून बघत होते. त्यांची आपसांत कुजबूजही चालू होती.
केबिनमधे बसून मी एकीकडे माझ्या टेबलावरचे कागद न्याहाळत होतो, पण माझ्या मनात घडत असलेल्या घटनांचं विश्लेषण चालू होतं. मी खरं तर मनातून हादरलो होतो. इतक्यात मेरी माझ्यासाठी कॉफी घेऊन आली. तिने माझ्या चेहऱ्यावरील अस्वस्थता ओळखली असावी. ती हळूच म्हणाली, “शेफ काळजी करू नकोस, या सगळ्यातून तुझा निभाव लागेल.’’ जाता जाता मला रेस्टॉरंटच्या ब्रिफिंगला उपस्थित राहण्याचं आमंत्रण द्यायलाही ती विसरली नाही. (ब्रिफिंग म्हणजे प्रत्येक जेवणाच्या सुरुवातीला रेस्टॉरंटमधे सर्व सर्व्हिस स्टाफला एकत्र बोलवून त्या दिवसाच्या मेनूची, हॉटेलात राहत असलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींची, हॉटेलातील इतर कार्यक्रमांची माहिती देतात.) तिच्या या बोलण्याने थोडंसं बरं वाटलं. मी कॉफी संपवून पुन्हा डायनिंग हॉलमधे गेलो. या वेळेस माझ्याकडे बघायच्या लोकांच्या नजरा थोड्या बदलल्या होत्या असं मला वाटलं. मला ते आता आपणहून अभिवादन करत होते. पलीकडे मेरीच्या समोर तिची संपूर्ण सर्व्हिस टीम ब्रिफिंगसाठी अर्धवर्तुळात उभी होती. आमच्या किचनमधील दोन शेफ सर्व्हिस स्टाफला मेनू समजावून सांगायला आले होते.
प्रथम तिने सर्वांशी माझी ओळख करून दिली आणि माझं तिच्या टीमच्या वतीने स्वागत केलं. मग त्या दिवशीच्या महत्त्वाच्या सूचना झाल्यावर एक शेफ सर्वांना मेनू समजावून देऊ लागला. मगाशी माझ्याशी हट्टाने स्वाहिलीत बोलणारा हा इसम बऱ्यापैकी इंग्रजीत बोलत होता. मेरी माझ्याकडे बघून हसली. मी कुठल्याही प्रकारचं आश्चर्य वाटल्याचं मुद्दामच चेहऱ्यावर दाखवलं नाही. त्या शेफच्या बोलण्यावरून त्याला मेनूबद्दल तशी जुजबीच माहिती होती याचा अंदाज मला आला. ब्रिफिंग झाल्यानंतर माझ्याशी काहीही न बोलता, माझी नजर चुकवून तो किचनमधे पळून गेला. मी त्या दिवशी संपूर्ण लंच टाइम, बुफेच्या मागे कुठेतरी कोपऱ्यात उभं राहून काय चालतं ते बघायचं ठरवलं होतं. ‘माझी कुठल्याही गेस्टशी ओळख अजून करू देऊ नकोस’ असं मी मेरीला बजावलं आणि कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो.
बुफे गेस्टसाठी पूर्ण तयार झाला होता. काही गेस्टही डायनिंग हॉलच्या बाहेर उभे राहून लंच टाइम सुरू होण्याची वाट बघत होते. दरवाजासमोर मेरी उभी होती. तिने स्वाहिली भाषेत जवळच्याच काही कर्मचाऱ्यांना बोलावलं. मग सर्वजण लाइनमधे उभे राहिले. डायनिंग हॉलला दरवाजा असा नव्हताच. दोन विरुद्ध दिशेच्या स्टँडला जोडलेल्या एका दोरीने डायनिंग हॉल बंद होत असे. ती दोरी मेरीने दूर केली आणि त्याच क्षणी तिच्या बरोबर त्या लाइनमधे उभे असलेले सर्व जण,
‘जांबो, जांबो ब्वाना!
हबारी गानी,
मिझूरी साना!’
हे गाणं मेरीबरोबर सुस्वरांत आणि तालात नाचत म्हणू लागले. पुढे ‘लायन किंग’ या गाजलेल्या सिनेमातलं हे गाणं केनयात तेव्हापासूनच फार प्रसिद्ध होतं. तिथल्या सफारी साउंड या बँडने प्रसिद्ध केलेलं हे गाणं गाऊन बुफे उघडायचा, ही पद्धत मला खूप आवडली. कुठल्याही प्रकारची वाद्यं नाहीत, मायक्रोफोन आणि स्पीकर नाहीत तरीही ती सर्व मुलंमुली या गाण्यावर नाचायला लागली. त्यांच्या त्या गाण्याच्या तालावर एका सुंदर लयीत डोलण्याने, डायनिंग हॉलचं वातावरण इतकं अनौपचारिक बनलं की त्या अडसर म्हणून लावलेल्या दोरीच्या पलीकडील युरोपियन गेस्टही त्यांच्यासोबत गायला आणि डोलायला लागले. त्यांनी डायनिंग हॉलमधे प्रवेश केला तो नाचत नाचतच! मीसुद्धा थोड्या वेळासाठी माझ्या सर्व अडचणी विसरलो. इतकी वर्षं हॉटेल व्यवसायात वावरलेल्या मलादेखील तो एक वेगळाच तजेला आणणारा अनुभव होता. त्या गाण्यामुळे अगदी साधेपणाने सजवलेल्या त्या डायनिंग हॉलचा कायापालटच झाला. इथे आफ्रिकेत येऊन मला थोडासाच अवधी झाला होता. त्या अल्पशा कालावधीत मला अजून इकडच्या लोकांबद्दल पुरेशी आपुलकी वाटू लागली नव्हती. मग ती आफ्रिकन लोकांच्या गडद वर्णामुळे असेल, त्यांच्या उंच आणि धिप्पाड शरीरयष्टीमुळे असेल, ते सर्वजण माझ्याकडे ज्या निर्विकार उपऱ्या नजरेने बघत होते त्यामुळे असेल किंवा गेल्या दोन दिवसांत घडत असलेल्या विचित्र घटनांमुळे असेल, पण मला हे लोक मनापासून आवडले नव्हते. किंबहुना आतमधे कुठेतरी मला त्यांच्याबद्दल तिरस्कारच वाटत होता. मी माझ्यावर झालेल्या संस्कारांमुळे स्वतःला पुरोगामी समजत असे. तरीसुद्धा या लोकांविषयी माझ्या मनात ज्या भावना त्या क्षणी होत्या, त्यालाच तर वर्णद्वेष म्हणत नाहीत ना अशी शंका माझ्या मनात पुन्हा येऊन गेली. कुठेतरी अपराधी वाटलं मला! या लोकांबरोबर मोकळेपणाने संवाद साधायला मला प्रयास पडणार याबद्दल मला खात्री झाली होती. पण गेस्टचे डायनिंग हॉलमधे स्वागत करण्याची स्वैर पद्धत पाहिली आणि कुठेतरी आत या लोकांशी आपण जवळीक साधू शकू अशी अंधुकशी आशा वाटली.
ते गाणं संपेपर्यंत, मी मनात नक्की केलं की आपण आपल्या तऱ्हेने बदल सुरू करायचे. कोणाचीही मदत न घेता बदल करण्याने माझे प्रश्न सुटणार होते असं नाही, तरीही मी ते बदल करणं चालू ठेवायचा बेत मनात पक्का केला. मी असं कां ठरवलं हे मलाही ठाऊक नव्हतं.
लंच टाइम संपल्यावर मी किचनमधे अलीने बोलावलेल्या स्टाफ मीटिंगला गेलो. साधारण पंचेचाळीस ते पन्नास जण माझ्यासमोर उभे होते. मी माझी सर्वांना ओळख करून दिली आणि त्यांनीही आपापली ओळख करून द्यावी असं मी अलीला सुचवलं. अलीने स्वतःची ओळख करून दिली. पण, एकामागून एक सगळे स्वतःची स्वाहिलीत ओळख करून देत गेले. अशा पन्नास जणांची अगम्य भाषेतील भाषणं ही माझ्यासाठी एक मोठी शिक्षाच होती. अली हा एकमेव माणूस माझ्याशी इंग्रजीतून बोलत होता; पण तोही माझ्याशी फार मोकळेपणाने वागत होता असं नव्हतं. काहीतरी कारण सांगून तो माझ्या समोरून सकाळपासून पळून जात होता. कितीही चांगला शेफ असला तरी तो एकटा तीनचारशे लोकांचे सकाळ-दुपार-संध्याकाळचं जेवण बनवू शकत नाही. त्याला इतरांची साथही लागते. माझ्या स्टाफपैकी बऱ्यांच जणांना इंग्रजी येत असावं पण मुद्दाम ते माझ्याशी स्वाहिलीत बोलत होते. ही कोंडी कुठेतरी सुटायला पाहिजे होती. मी त्यांच्याशी वाद घालू शकलो असतो पण त्यामुळे टीमबरोबरचे माझे संबंध कायमचे बिघडले असते. जनरल मॅनेजर किंवा एच.आर. मॅनेजरची मदत घेणं हा दुसरा पर्याय मला दिसत होता. पण जनरल मॅनेजरने पहिल्याच दिवशी माझ्याबद्दलचं त्याचं मत माझ्याजवळ प्रकट केलं होतं. हा गुंता सोडवण्याचा काहीच उपाय दिसत नव्हता. मधूनच मेरी माझ्याकडे येऊन मला काहीतरी सूचना, सल्ला देई किंवा काहीतरी माहिती पुरवी. त्याचा खूप फायदा होत होता असं नाही पण आपल्याबरोबर कोणी आहे ही जाणीवही पुरेशी होती. दुसऱ्या दिवशी तिने मला स्वाहिली शिकण्यासाठी एक छोटंसं पुस्तक आणून दिलं. त्यात बऱ्याच साध्या इंग्रजी शब्दांना स्वाहिली प्रतिशब्द दिले होते. मला म्हणाली, “आमची भाषा शिक जराशी.’’ इतकं सांगून तिने माझ्याकडून पुस्तकाचे पन्नास शिलींग मागून घेतले. त्या पुस्तकामुळे एका दिवसात मी स्वाहिलीतला पंडित बनणार नव्हतो पण त्यामुळे मी त्यांची भाषा शिकायचा प्रयत्न करतो आहे हा सकारात्मक संदेश स्टाफपर्यंत निश्चित गेला असता असा मेरीचा तर्क होता. मी तिने दिलेले पुस्तक चाळून बघत होतो. काही स्वाहिली शब्द उच्चारायचा प्रयत्नही केला मी! मेरी माझे धेडगुजरी उच्चार ऐकून जोरदार हसली. मी थोडंसं ओशाळून तिच्याकडे बघितलं तर मला जाणवलं की मेरीचे केस दररोज वेगळे असतात. काल आखूड केसांचा बॉयकट असलेल्या मेरीचे केस आज बऱ्यापैकी लांब, थोड्याशा लालसर रंगाचे होते आणि तिने ते नीटनेटक्या पोनीटेलमधे बांधले होते. मी तिचे केस न्याहाळत आहे हे तिच्या ध्यानात आलं असावं कारण ती काहीतरी कारण काढून माझ्या केबिनमधून पळून गेली.
ती जात असताना, माझ्या मनात मुख्य प्रश्न होता तो हा की मेरी मला मदत कां करत होती? मी तिचा कोणीच नव्हतो. तिच्याबद्दल इतर माहिती तर सोडाच पण तिने आपले ओडिंगा हे आडनाव मला सांगितले आहे याचादेखील मला विसर पडला होता. मलाही ती शेफ म्हणूनच हाक मारायची. माझं संपूर्ण नाव तिला माहीत होतं की नाही कोण जाणे? पण आजूबाजूला चाललेल्या सर्व गोंधळात मेरीचाच काय तो आधार होता मला. ती माझ्याशी नीट बोलतवागत असल्यामुळे डायनिंग हॉलमधील स्टाफही माझ्याशी बोलताना कमी बुजत होता.
मी लंच बुफेची मांडणी जशी आपणहून बदलली, तसंच डिनर बुफेबद्दल करायचं ठरवलं. सकाळपेक्षा या वेळेस मी थोडी जास्त तयारी केली होती. मी अलीला काहीतरी कारणाने पकडलं आणि बळजबरीने माझ्यासमोर बसवलं आणि रात्रीच्या बुफेचा मेनू त्याच्याकडून समजून घेतला. मी मेनू वाचून त्याचा थोडासा अभ्यासही केला. हे खाणं बनत असताना बाजूला उभं राहून काहीही न बोलता मी नीट न्याहाळत होतो. त्यात आयत्या वेळी मला एकट्याला काय बदल करता येतील ते मनात योजून ठेवलं. त्यासाठी लागणारं साहित्य जमेल तसं एकत्र करून थोडी पूर्वतयारी करून ठेवली. वेगवेगळ्या विभागाचा बुफे मांडला गेल्यानंतर मी त्या खाण्यात छोटेछोटेच पण महत्त्वाचे बदल कोणालाही न विचारता करायला लागलो. बुफे नीट टेबलावर सजवून झाला तेव्हा बुफेच्या दिसण्यात नेहमीपेक्षा पडलेला फरक सर्वांना जाणवू लागला. ब्रिफिंगच्या वेळी आमचा शेफ डायनिंग हॉल स्टाफला मेनू समजावून देऊ लागला तशी मी मधेच आपल्या टीपा घुसडू लागलो. मूळ उद्देश असा की मेनू संबंधात शेफने सांगितलेल्या माहिती व्यतिरिक्त जास्त माहिती स्टाफला मिळावी. जे मी त्या दिवशी केलं तेच मी पुढचे तीनचार दिवस चालू ठेवलं. किचनच्या स्टाफच्या मनात असलेली माझी इमेज यामुळे बदलेल असं मला वाटलं होतं, पण याचा परिणाम वेगळाच झाला. स्टाफ जास्तच बुजला आणि माझ्यापासून दूर पळू लागला. मला किचनचा पूर्ण चार्ज घेण्यासाठी अजून दोनतीन दिवसच शिलल्क होते. आपल्या बरोबर काम करणाऱ्या लोकांशी न बोलता मी किचन कसं काय चालवणार होतो? जनरल मॅनेजरआणि श्री. सोंधी यांची माझ्यावर दुरून पाळत ठेवणं चालू होतंच. मी केलेले बुफेतील बदल श्री. सोंधीना आवडत आहेत असं मला उगीचच वाटलं तर श्री. क्लोहेना मात्र सगळ्या स्टाफकडून झालेली माझी कोंडी दिसत होती. त्यांच्या चेहऱ्यावरचं छद्मी हास्य लपत नव्हतं. माझ्याच विभागात इतका गोंधळ चालू होता की हॉटेलच्या इतर विभागातील मॅनेजर बरोबरही मी फार ओळख वाढवलेली नव्हती.
परिणामी हे तीनचार दिवस मेरी सोडली तर मी जवळ जवळ कोणाशीच बोललो नव्हतो. दिवसभर किचनमधे कोणाशीही न बोलता काम करायचं आणि रूममधे गेलं की चार भिंती आणि छताशी गप्पा मारायच्या. मी परदेशात होतो. नोकरीच्या पहिल्या दिवसापासूनच माझ्या सर्व सहकाऱ्यांनी काहीही कारण नसताना माझ्याबरोबर संपूर्ण असहकार पुकारला होता. माझा साहेबही, माझ्या विरोधातच होता. कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर ‘या माणसाला इथे आणून आपली खूप मोठी चूक तर झाली नाही ना?’ हे भाव चेहऱ्यावर आणून सतत माझ्यावर पाळत ठेवून होता. तो कधीकधी तर माझ्या केबिनमधे यायचा आणि काहीही न बोलता तासन् तास शेजारच्या खुर्चीवर बसायचा. तेव्हा तो असा केबिनमधे आला किंवा माझ्यापाठी उभा राहिलेला दिसला की पोटात मोठ्ठा गोळा येत असे. मला बहुदा ही नोकरी अजून दोनतीन दिवसांतच सोडायला लागणार याची मनाशी खात्री पटली होती. त्यामुळे इथून परत भारतात घरी गेलो की घरी काय सांगायचं आणि आता मला नवीन नोकरी कुठे शोधता येईल याच विचारात मी रात्री घालवत होतो.
विचारांच्या अशा संभ्रमित अवस्थेत त्या दिवशी सकाळी लवकर ब्रेकफास्टच्या वेळी मी माझ्या केबिनमधे पोहोचलो. त्या दिवशीचा मेनू बघत होतो इतक्यात मेरी माझी कॉफी घेऊन आली. गेले दोनतीन दिवस रोज सकाळी माझ्यासाठी पहिली कॉफी घेऊन तीच येत असे. ते खरं तर तिचं काम नव्हतं. पण ती माझी कॉफी घेऊन स्वतः येते याचं मलाही खूप बरं वाटायचं. कॉफीचा मोठ्ठा मग तिने माझ्यासमोर ठेवला आणि प्रसन्न चेहऱ्याने हसून तिने मला नेहमीच्याच शब्दांत विश केले. “हाय शेफी!’’ कॉफीचा कप माझ्यासमोर ठेवताना तिच्या ब्लाउजची बाही वरती गेली आणि तिचा हात उघडा पडला. तिने घाईघाईने उघडा पडलेला हात परत बाही खाली ओढून झाकला. शर्टाचं वरचं बटण बरेच वेळा उघडं ठेवणारी ही मुलगी आपला हात कां झाकते ही शंका माझ्या मनात आली खरी, पण त्या वेळी समोर असलेल्या समस्या ह्या असल्या छोट्या गोष्टींपेक्षा फारच मोठ्या होत्या. गेले दोनतीन दिवस ती कॉफीचा कप माझ्यासमोर ठेवून, मला अभिवादन करून, थोडंसं काहीतरी बोलून, लगेच आपल्या कामाला पळून जात असे. पण त्या दिवशी ती थोडीशी रेंगाळलेली वाटली. मी तिची चलबिचल पाहिली आणि तिला बसायला खुर्ची पुढे केली. शेफच्या केबिनमधे खुर्चीवर पहिल्यांदाच बसत असावी असं वाटलं मला, कारण ती थोडी अवघडूनच बसली. केबिन काचेची असल्यामुळे बाहेरून आतमधे काय चाललं आहे हे संपूर्ण किचनला नीट दिसत होतं. तिने थोडंसं इकडेतिकडे बघितलं. आज तिचे केस लांब आणि रंगाने लालसर होते. तिने भारतीय पद्धतीची पण जराशी सैलसर वेणी घालायचा प्रयत्न केला होता. त्या वेणीमधे कानाच्या वर तिने हिरव्या चाफ्याच्या तीनचार फुलांचा एक छोटासा झुपका खोवला होता. छान दिसत होतं ते तिला. इथल्या बऱ्याच आफ्रिकन मुली आपल्या डोक्यावरचा केसांचा विग नेहमी बदलत असत. प्रथम फार विचित्र वाटत असे. वाटे, काल तर हिचे केस आखूड होते; आज एवढे लांब कसे झाले? मेरीची ही नवीन केशरचना आपल्याला आवडली असल्याचं तिला सांगावं की नाही याचा मी विचार करत होतो पण तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. मीच तिला बोलतं केलं,
“कॅप्टन, आजच्या या भेटीचं काही खास प्रयोजन?’’
“शेफ, आपल्या सहकाऱ्यांशी बोलल्याशिवाय हे किचन तू कसं चालवू शकणार आहेस? तुझे सहकारी आत्ता तुझ्याशी खेळत आहेत हे मला माहीत आहे. ते तुझ्याशी इंग्रजीतून बोलण्यास नकार देत असले तरी मला ठाऊक आहे की तुझ्या टीममधल्या प्रत्येकाला चांगलं इंग्रजी बोलता येतं.’’
मी काय उत्तर द्यावं याचा खरंच विचार केला, कारण ती पूर्ण सत्य बोलत होती हे मला ठाऊक होतं. “मेरी, पुढे मी आता काय करणार आहे याचा मला यत्किंचितही अंदाज नाही. पण हार मानायची नाही असं मी ठरवलं आहे. खरं सांगायचं झालं तर मी अजून माझ्या भारतातून आणलेल्या बॅग उघडल्यादेखील नाहीत. वेळप्रसंगी भारतात परत जाताना ते अधिक सोपं जाईल.’’ हे बोलताना मी चेहऱ्यावर हसू आणण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
केबिनच्या बाहेरून काही डोळे आमच्यावर नजर ठेवून आहेत हे मला जाणवत होतं. मेरी आफ्रिकन म्हणजे खरं तर आपल्या बाजूने असायला पाहिजे मग ती आपल्या शत्रूबरोबर काय गप्पा मारते? दोघांचं काय गौडबंगाल चाललंय? असले प्रश्न त्या नजरांत स्पष्ट दिसत होते.
“तू हातपाय गाळलेले नाहीस या गोष्टीचा मला आनंद होत आहे. मला याच विषयावर तुझ्याशी बोलायचं आहे.’’
मी तिच्याकडे निरखून बघितलं. तिच्याबद्दल माझ्या मनात विश्वास निश्चित होता पण तिच्या सल्ल्याने असा काय चमत्कार घडणार होता ते मला कळेना.
“शेफ, सर्व भारतीय वाईट असतात असं मला बिलकूल म्हणायचं नाही. आत्तापर्यंत इथे स्थायिक झालेल्या युरोपियन आणि भारतीयांनी आम्हां स्थानिक केनयन लोकांचे पिढ्यान् पिढ्या शोषण केलं आहे. त्यामुळे आमचा कुठल्याही भारतीय वंशाच्या माणसावर पटकन विश्वास बसत नाही. भारतीयच काय पण कुठल्याही, आमच्यापेक्षा वेगळ्या रंगाच्या माणसांवर आमचा विश्वास नसतो. त्यात तुझ्याआधी जे दोन शेफ इथे आले त्यांना आमच्या लोकांनी इथून पळवून लावलं, कारण ते शेफ आपल्या स्टाफशी खूप भांडले, त्यांच्यावर ओरडले, त्यांच्यावर निरनिराळे आरोप केले. या लोकांवर त्यांनी सत्ता गाजवायचा प्रयत्न केला. शेवटी किचनमधले ताणतणाव एवढे वाढले की त्याचा आम्हां सर्व्हिस स्टाफला आणि गेस्टनादेखील त्रास होऊ लागला. दररोज भांडणं व्हायची. आवाज चढायचे. शेवटी शेवटी तर हातही उठले. याचा परिणाम असा झाला की त्या दोघांनाही अक्षरशः पळून जावं लागलं. एक शेफ दीड महिना टिकला तर दुसरा दोन आठवडे.’’
कॉफीचा घोट माझ्या घशातच अडकला. आता ही पुढे काय सांगणार?
“त्या आधीचा शेफ इथे बरीच वर्षं होता. गोरा होता पण स्वाहिली बोलायचा आणि तो या लोकांत मिसळून गेला होता. तसेच काहीसे तुला करायला लागेल. स्वाहिली फार पटकन शिकता येईल असं मला तरी वाटत नाही, पण तुला लवकरात लवकर या लोकांच्यात मिसळायला लागेल. पण हे करताना आपला अधिकारही दाखवायला लागेल. मी तुला एक गंमत सांगते. आम्ही आफ्रिकन लोक कागदावर लिहिलेल्या शब्दाला खूप घाबरतो. कदाचित पारतंत्र्यात राहिल्याचे परिणाम असतील ते. त्याचा फायदा तू घे. तुझ्या प्रत्येक विभाग प्रमुखाला तू काहीतरी काम सांग पण ते इंग्रजीत लिहून दे. पण ही ऑर्डर द्यायच्या आधी थोडी त्यांची चौकशी कर, त्यांच्याबरोबर कॉफी पी, त्यांची थोडी स्तुती कर आणि काम करायचा लेखी आदेश देताना त्यांना प्लीज म्हणायला मात्र विसरू नकोस. कारण लक्षात ठेव, आम्ही आफ्रिकन लोक लिहिलेल्या शब्दाला खूप घाबरतो तसेच दोनचार प्रेमाचे शब्दही आम्हांला विरघळवू शकतात.’’
माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य आल्याचं तिला जाणवलं असावं कारण तीसुद्धा जरा जोरातच हसली. तिच्या बोलण्यात तथ्य होतं. “मेरी, तू मला मदत कां करत आहेस?’’ माझ्या मनातली उत्सुकता उफाळून आली. बरेच दिवस माझ्या मनात असलेला प्रश्न मी विचारून टाकला.
“शेफ, आपण या विषयी कधीतरी नंतर बोलू. आत्ता मी खूप कामात आहे.’’ असं म्हणून तिने पटकन आपल्या ब्लाउजच्या बाह्या नीट करून आपलं मनगट लपवलं आणि माझ्या ऑफिसमधून काढता पाय घेतला. ही मुलगी आपलं मनगट झाकण्याबाबत एवढी दक्ष का असते? मी तिला त्याबद्दल पुन्हा मागे बोलवून काही विचारणार तेवढ्यात ऑफिसच्या बाहेर तिची किचनमधल्या काही शेफबरोबर थोडी बाचाबाची झाली. किचनमधल्या लोकांचा आवाज थोडा चढला होता. संवाद स्वाहिलीत चालू असल्यामुळे मला काही कळण्याचा संभवच नव्हता. पण तिने काही जुजबी उत्तरे त्यांना देऊन तिथून पळ काढला. मोंबासाला आल्यापासून प्रथमच मी माझी कॉफी नीट मजा घेत प्यायलो.
कॉफी पिता पिता माझ्या मनात पुढची योजना नक्की झाली. मुख्य किचनमधे सहा विभाग होते. त्या प्रत्येक विभागाला एक प्रमुख. मी दुसऱ्या दिवशीचे मेनू अलीकडून मागून घेतले आणि त्या मेनूसंबंधात या विभाग प्रमुखांसाठी काही सूचना कागदावर नीट लिहून काढल्या. त्या काळात कॉम्प्युटर ही दुर्मीळ चीज होती. ह्या हॉटेलमधे तर मी फक्त एकच कॉम्प्युटर बघितला होता तो म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टरच्या ऑफिसमधे. जनरल मॅनेजरच्या ऑफिसमधे देखील इलेक्ट्रॉनिक टाइपरायटरच होता. आम्हां सर्वांना तर आमचं सगळं काम लेखीच करावं लागणार होतं. या कामामुळे मी त्या दिवशीच्या लंच बुफेच्या वेळी डायनिंग हॉलमधे जास्ती गेलोच नाही. लंच टाइम संपता संपता मी अलीला ऑफिसमधे बोलावलं. मला प्रत्येक विभागाच्या प्रमुखाबरोबर कॉफी किंवा सोडा घेत गप्पा मारायच्या आहेत अशी इच्छा मी त्याच्याकडे व्यक्त केली. (कोका कोला, फॅन्टा वगैरे पेयांना भारताच्या बाहेर सोडा म्हणूनच ओळखतात.) अलीने या भेटी घडवायला होकार तर दिला पण आता पुढे काय होणार आहे या विचारात पडला. पहिल्या विभाग प्रमुखाला घेऊन तो केबिनमधे आला. मी त्या दोघांना बसायला सांगितलं. आणि मेरीला डायनिंग हॉलमधे फोन लावून माझ्यासाठी कॉफी आणि त्या दोघांसाठी कोका कोला आणायला सांगितला. ऑर्डर घेता घेता मेरीने मला माहिती पुरवली. ‘श्री. क्लोहे जेवणासाठी आले होते. तू न दिसल्यामुळे त्यांना चुकल्याचुकल्यासारखं झालं असावं. कारण ते तुझी चौकशी करत होते. त्यांनी शेफ भारतात पळून गेला का? अशीही चौकशी केली पण मी त्यांना तसं काही नसल्याचं सांगितलं. श्री. सोंधींनीही तुझी चौकशी केली. ते आत्ताच लंच संपवून किचनच्या दिशेनेच यायला निघाले आहेत.’’ मी हसलो. माझं लक्ष पुन्हा अली आणि त्याच्याबरोबर बसलेल्या शेफकडे वळवलं. अलीने माझी या विभाग प्रमुखाची पुन्हा ओळख करून दिली. “या शेफचं नाव झुझि. हा आपल्या बुचर शॉपचा प्रमुख आहे.’ मी मुद्दामच त्याच्या कामाची थोडीशी इंग्रजीतच स्तुती केली आणि थोड्या जुजबी गप्पा इंग्रजी भाषेत सुरू केल्या. कॉफी येईपर्यंत मुद्याला हात न घालण्याचं मी ठरवलं होतं. इतक्यात श्री. सोंधी माझ्या केबिनच्या दरवाजामधून आत आले आणि त्यांनी कोपऱ्यातली एक खुर्ची पकडली. मी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून माझी विभाग प्रमुखाबरोबरची मीटिंग चालू ठेवली.
इतक्यात सोडा आणि माझी कॉफी आली. मेरी स्वतःच ह्या गोष्टी घेऊन आली होती. तिलाही केबिनमधे काय चाललं आहे याची उत्सुकता असावी. तिने आमच्यासमोर आमची पेये ठेवून केबिनमधून पळ काढला आणि बाहेर एका कोपऱ्यात उभी राहून कोणाशी तरी बोलल्याचं निमित्त करून ती केबिनमधे काय चाललं आहे याचा अंदाज घेत राहिली. मी झुझिसाठी लिहिलेला कामाचा कागद त्याच्यासमोर ठेवला आणि त्या कागदाच्या दुसऱ्या प्रतीवर कागद मिळाल्याची आणि वाचल्याची कृपया पोच देण्यास सांगितलं. अली आणि झुझिसाठी हा मोठा धक्काच होता. श्री. सोंधी तिकडेच कोपऱ्यात बसले असल्यामुळे असेल कदाचित पण झुझिनेही कागद न वाचताच दुसऱ्या प्रतीवर मेमो मिळाल्याची सही केली. मी काचेच्या बाहेर उभ्या असलेल्या मेरीकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर युक्ती लागू पडल्याचा आनंद होता. मेरी हसत हसत डायनिंग हॉलमधे सटकली.
झुझिला दिलेल्या लेखी सूचना, बुफेसाठी तो मांसांचे ज्या प्रकारे तुकडे करत होता त्यासंबंधी होत्या. त्याने त्या नीट वाचल्या आणि मला तो म्हणाला, “शेफ, हे कसं करायचं ते तुम्ही मला उद्या दाखवाल का?’’ तो चुकून माझ्याशी इंग्रजीत बोलून गेल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्याचं त्यालाच हसू आलं. तो दिलखुलास हसला. त्याचे शुभ्र दात त्याच्या गडद रंगावर खुलून दिसत होते. मीही त्याला स्वाहिलीत उत्तर दिलं, “हकुना मटाटा.’’ (काहीही अडचण नाही.) दोन दिवसांत त्यांची भाषा शिकणं शक्य नव्हतं पण मेरीने दिलेल्या पुस्तकांतून मी काही स्वाहिली शब्द उचलले होते. मीही तुमची भाषा शिकायचा प्रयत्न करतो आहे हे फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचवणं इतकाच माझा उद्देश होता. मी त्याच्या दोन्ही हातावर टाळी देऊन म्हटलं, “क्वाहेरी.’’ (बाय, बाय.) मी पहिला पडाव पार केला होता. त्या नंतर पुढच्या दोनतीन दिवसांत उरलेल्या विभाग प्रमुखांशी संवाद साधण्यातही मी यश मिळवलं. विभाग प्रमुख माझ्याशी बोलायला लागल्यानंतर इतर स्टाफही माझ्याशी बोलू लागला. याचा परिणाम म्हणजे मी खाणं बनवण्याच्या पद्धतीत, बुफेवर मांडायच्या पद्धतीत आणखी छोटे छोटे बदल करू लागलो. मी केलेले छोटे छोटे बदल गेस्टनाही आवडायला लागले.
दर सोमवारच्या मीटिंगमधे गेस्टनी दिलेले अभिप्राय वाचून दाखवले जात. त्या दिवशी मेरीने मुद्दाम डायनिंग हॉलमधे गेस्टकडून मिळालेले अभिप्राय वाचून दाखवताना सांगितले की, बऱ्याच गेस्टना गेल्या आठवड्यात डायनिंग हॉलमधील जेवणात खूप बदल झालेले जाणवले आणि ते त्यांना आवडले देखील. ती हे अभिप्राय वाचत असताना मी श्री. क्लोहेंचा चेहेरा बघत होतो. ते थोडे ओशाळल्यासारखे वाटले. तिचे वाचन झाल्यानंतर त्यानी मुद्दाम ह्या चांगल्या बदलाचे श्रेय अलीला देऊन त्याची पाठ थोपटली. पण अलीने स्वतःच हे श्रेय माझ्याकडे देऊन माझे आभार मानले आणि म्हणाला की, “शेफ भागवतनी किचनची जबाबदारी पूर्णपणे स्वीकारली असल्यामुळे, आपल्या परवानगीने उद्यापासून मी सकाळच्या मीटिंगला येणार नाही.’’ श्री. क्लोहेंनी त्याला परवानगी दिली. मी मेरीला मान खाली करून हसताना पाहिलं. मी एक लढाई जिंकलो होतो. परत किचनमधे आल्यावर मेरी माझ्या पाठोपाठ माझ्या केबिनमधे शिरली. म्हणाली, “शेफी, तुझ्या आजच्या विजयातील माझ्या वाट्याबद्दल मला तुझ्याकडून एक बियरची पार्टी मिळाली पाहिजे.’’ मी चटकन होकार दिला आणि दोन्ही हातांनी टाळ्या देऊन आमचा बियर पार्टीचा करार पक्का केला. ते करताना खरं तर तिच्या हातावरचं बरेच दिवस बरं न झालेलं इन्फेक्शन मी पुन्हा पाहिलं. तिला त्याबद्दल आत्ताच काही विचारणं अप्रस्तुत ठरलं असतं. तिच्या हातावरचं इन्फेक्शन माझ्या नजरेत आलं आहे हे बहुदा तिला जाणवलं असावं. मेरी थोडीशी ओशाळली आणि घाईघाईनेच केबिनमधून आपल्या कामाला पळून गेली.
खरं तर मेरी आणि माझी ओळख फार थोड्या दिवसांची. पण त्यातही तिने मला जो आधार दिला होता, वेळोवेळी जे सल्ले दिले होते ते मनाला उभारी देणारे होते. त्या सल्ल्यांमुळे माझ्या समोरच्या अडचणी पूर्ण संपल्या होत्या असं नाही पण त्या निश्चितच कमी झाल्या होत्या. ह्या अडचणी आत्ता लगेच नाही तरी यापुढे हळूहळू सुटू शकतील हा विश्वास मला वाटू लागला. माझा माझ्या स्टाफबरोबर संवाद सुरू झाला होता. या संवादामुळे आता मला किचन चालवणं सोपं जाणार होतं.
त्या दिवसापासून मी किचनचा संपूर्ण ताबा घेतला. त्यापुढे अडचणी आल्याच नाहीत असं नाही पण त्या मी एकटा सोडवू शकत होतो. श्री. सोंधी अजूनही माझ्या पाठी पाठी फिरत होते, पण आता त्यांच्या चेहऱ्यावर मैत्रीपूर्ण भाव असत. पण जसाजसा किचनमधे मी स्थिरस्थावर होऊ लागलो, हॉटेलच्या खाण्यामधे झालेले बदल गेस्टना जाणवून त्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया येऊ लागल्या, तसे मधेच कधीतरी ते माझ्याबरोबर माझ्या केबिनमधे चहा किंवा सोडा घेऊ लागले. श्री. क्लोहेंचं मला कोणाच्या तरी आडून त्रास देणं चालूच होतं. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं मी आता इतक्यात भारतात पळून जात नाही, माझा सर्व स्टाफ मला पूर्ण सहकार्य करायला लागला आहे तेव्हापासून त्यांनीही डोक्यातून जर्मनीतून मोठा प्रसिद्ध शेफ आणण्याची कल्पना सोडून दिली आणि ते माझ्याशी जुळवून घ्यायला लागले.
मी आता नोकरीत स्थिरावलो असल्यामुळे पद्माला आणि सौमिलला इथे मोंबासात आणायचं ठरवलं होतं, त्यासाठी मी बाहेर घरही घेतलं होतं. मेरीबरोबरच्या गप्पात आता माझं कुटुंब हाही विषय सामील झाला होता. माझी पत्नी आणि लहान मुलगा आता इथे येणार आणि माझा मोठा मुलगा भारतातच माझ्या आईवडिलांकडे राहणार ही माहिती मी तिला दिली. माझा मोठा मुलगा त्याच्या आजीआजोबांबरोबर राहणार या गोष्टीचं तिला खूप अप्रूप होतं. मुलं आईवडिलांशिवाय आजीआजोबांकडे मजेत राहू शकतात ही कल्पनाच तिला नवीन आणि मजेशीर वाटली. “वेवे ने कुहाकिकिशा क्वांबा म्वाना वाको नी क्वेंडा कुका ना बाबु याके ना बिबी?’’ (शेफ तुला खात्री आहे की तुझा मुलगा त्याच्या आजीआजोबांबरोबर मजेत राहणार आहे?)’’ चेहऱ्यावर मिश्किल भाव आणत मेरीने हा प्रश्न मला स्वाहिली भाषेत अनेक वेळा विचारला. त्या बोलण्याचा अर्थ मला कळायचा नाही आणि हे लक्षात आल्यावर ती प्रत्येक वेळेस तो अर्थ हसत हसत समजावून सांगत असे. तिला पद्मा आणि सौमिल या नावांचे उच्चार मात्र कधी जमलेच नाहीत. ती त्यांच्या नावाचा उच्चार पडमा आणि सोमिल असाच करत असे.
आताशा मला मेरीच्या सल्ल्याची गरज कमी भासू लागली, पण आमची मैत्री मात्र पक्की व्हायला सुरुवात झाली होती. अगदी पहिल्या दिवसापासून दररोज ब्रेकफास्टची वेळ संपली की ती माझ्यासाठी स्वतः कॉफी घेऊन येई. अगदी सुरुवातीला मला कॉफी देऊन, हळूच काहीतरी सल्ला किंवा महत्त्वाची माहिती देऊन ती केबिनमधून पळ काढत असे. पण आता मात्र ती केबिनमधे थांबून माझ्याबरोबर कॉफी घेऊ लागली. कॉफीबरोबर आमच्यात कामाबद्दल तर बोललं जाईच पण काही अवांतर गप्पा होऊ लागल्या. तिच्याकडून तिच्या घरच्यांविषयी, आफ्रिकन लोकांविषयी माहिती मिळू लागली. केनयात साधारण चाळीसहून अधिक आफ्रिकन जमाती आहेत हे मला तिच्याकडून कळलं. ती स्वतः लुओ जमातीची होती. मुळात साधारण पाचसहाशे वर्षांपूर्वी सुदानमधून आलेली ही जमात व्हिक्टोरिया तलावाच्या किनाऱ्यावर वसली होती. लोकसंख्येच्या दृष्टीने लुओ ही केनयात तीन नंबरची जमात असल्यामुळे ते राजकारणातही खूप सक्रिय होते. केनयातील विरोधी राजकारणाची सर्व सूत्रं आक्रमक समजल्या जाणाऱ्या लुओ जमातीच्याच हातात होती. याचं मुख्य कारण म्हणजे शिकल्या-सवरलेल्या लोकांची संख्या लुओंमधे भरपूर होती. मेरीने नैरोबी विश्वविद्यालयातून हॉटेल व्यवस्थापनाचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर गेली १५-१६ वर्षं ती रीफ हॉटेलमधेच नोकरी करत होती. तिचा पहिला नवरा वारला होता म्हणून तिने दुसरं लग्न केलं होतं. या लग्नाची कथा एकदा तिनेच मला सांगितली. ती ऐकून मला धक्काच बसला. शिकली-सवरलेली माणसं असं काही करू शकतात यावर माझा विश्वास बसूच शकत नव्हता. तिचा पहिला नवरा त्यांच्या लग्नानंतर पाचसहा वर्षांतच वारला होता. तो कशामुळे वारला ते सांगणं तिने टाळलं आणि मीही तिला त्याबद्दल काही प्रश्न विचारले नाहीत. त्यांना चार वर्षांची एक मुलगी होती. त्याच्या अंत्यविधीच्या वेळीच लुओ जमातीच्या प्रथेप्रमाणे तिचं लग्न तिच्या नवऱ्याच्या मोठ्या भावाशी लावण्यात आलं. नवऱ्याचा भाऊ चांगला शिकलेला. नैरोबीला राहून इंजिनियरींग पूर्ण केलेला. त्या भावाचीही पहिली बायको वारली होती आणि त्यांचाही एक मुलगा होता. हे सांगताना तिचा चेहरा, आवाज अगदी निर्विकार होता. आपण काहीही जगावेगळं केलं, आपल्या मनाविरुद्ध काही केलं गेलं असं तिच्या आवाजात मुळीच जाणवत नव्हतं. या दोनही कुटुंबांनी खरं तर ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. मग जमातीच्या रुढी पाळण्याचं त्यांना कारणच काय? भारतीय संस्कृतीत वाढलेल्या मला हे पचणं शक्यच नव्हतं. धर्माच्या आणि जमातीच्या रुढी वेगळ्या असा माझा समज. जमातींनाही एक धर्म असतोच की आणि धर्मांतर केल्यानंतर त्या रुढीही बदलल्या पाहिजेत. (खरं तर भारतात देखील धर्मांतरानंतर कित्येक जमातींच्या अस्पृश्यतेसकट सगळ्या रुढी तशाच राहिल्या आहेत. पण आपण मात्र हे सोयीनुसार विसरतो हेच खरं.)
नकळतच माझ्या तोंडून प्रश्न निघून गेला.
“मेरी, या गोष्टीवर माझा विश्वासच बसू शकत नाही. तुम्ही जर ख्रिश्चन असाल तर तुम्हांला जमातीच्या चालीरीती पाळण्याचं कारणच काय?’’
“शेफी, जमातीच्या चालीरीतींची ताकद कळण्यासाठी माणसाला केनयात एखाद्या जमातीत जन्म घ्यावा लागेल.’’
मी अजून काही बोललो नाही, पण मला हे पटलं नव्हतं.
“आम्हां केनयन लोकांच्या दृष्टीने पाहिलं तर मला माझ्या जमातीने घालून दिलेल्या चालीरीतींच्या मर्यादांतच सुरक्षित वाटतं. आफ्रिकेत आपल्या जमातीच्या रिंगणापलीकडे कोणीही सुरक्षित नसतं. कधी अशीही वेळ येते की जेव्हा तुम्हांला फक्त तुमची जमातच वाचवू शकते.’’ मला त्या वेळेस तिच्या विधानाचा अर्थ फारसा कळलाही नाही आणि पटला तर बिलकूल नाही. पण साधारण दोन-अडीच वर्षांनी केनयातील अध्यक्षीय निवडणूकांच्या आधी जेव्हा संपूर्ण केनयात, विरोधी राजकारणात सक्रीय असणाऱ्यांविरुद्ध दंगली झाल्या, तेव्हा मेरीचं हे बोलणं मला आठवलं. माझ्याशी हे वक्तव्य करणारी व्यक्ती कोणी अशिक्षित मागासलेली व्यक्ती नव्हती तर चांगली शिकली-सवरलेली होती. परिस्थितीमुळे असेल कदाचित पण मेरीला तर्कापेक्षा मनातली भीती अधिक वरचढ मानायची सवय झाली होती.
गंभीरपणे बोलणारी मेरी पटकन जोरात हसली आणि म्हणाली,“हा विषय संपवूया आपण आता. शेफ, मला तू बियर कधी पाजणार आहेस ते सांग.’’ आमचा त्या दिवशीचा संवाद इथेच संपला. पण अशा प्रकारचे आमचे संवाद वारंवार होऊ लागले. भारतापासून दूर आल्यावर इकडच्या अगदी वेगळ्या संस्कृतीविषयी, इकडच्या लोकांविषयी समजायला मला या गप्पांचा खूप फायदा झाला. आता तसा मी मोंबासामधे बऱ्यापैकी स्थिरावलेला होतो. माझ्या कामाव्यतिरिक्तही बऱ्यापैकी ओळखी झाल्या होत्या. अनिवासी भारतीय (मुख्यत्वे महाराष्ट्रीयन), स्थानिक मोहिंदी (भारतीय वंशाच्या लोकांसाठी स्वाहिलीतील शब्द), काही मुझुंगु (युरोपीय वंशाच्या लोकांसाठी स्वाहिलीतील शब्द) यांच्याबरोबर मी वेळ घालवू लागलो होतो. त्यांची स्थानिक आफ्रिकन लोकांबद्दलची मतं मी ऐकत होतो. स्थानिक आफ्रिकन लोकांना हे सर्व लोक कसे वागवतात, त्यांच्यापाठी किंवा कधी कधी तोंडावर काय बोलतात हे माझ्या कानांवर पडत होतं. स्वतःच्याच देशात हे सर्व आफ्रिकन लोक दुय्यम दर्जाच्या नागरीकांसारखे जगत होते. आफ्रिकन माणूस कितीही मोठ्या पदावर असला तरी त्यांच्यावर सतत तो चोरीच करत असेल अशा तऱ्हेने नजर ठेवण्यात येई. केनयामधे अकाउंटंट, परचेस मॅनेजर, इंजिनियर, शेफ, कॅशियर यांसारख्या पदांवर विश्वासपात्र आणि भ्रष्टाचार न करणारी अशी प्रतिमा असलेली माणसं नेमण्याचा प्रयत्न केला जाई. भारतीय वंशाचे सगळेच लोक काही विश्वासपात्र नसतात तरीसुद्धा या पदांवरील नोकऱ्यांसाठी आफ्रिकन लोकांचा विचार कधीच केला जात नसे. त्या नोकऱ्या फक्त अनिवासी भारतीय किंवा स्थानिक मोहिंदींसाठीच राखून ठेवण्यात येत. किचनमधे असलेल्या साधारण ५०-६० स्थानिक लोकांना मला दररोज सांभाळायला लागायचं. ते करताना मी इतर भारतीय वंशाच्या लोकांप्रमाणेच आफ्रिकन लोकांबद्दल विचार केला असता तर मला माझ्या सहकाऱ्यांचा विश्वास मिळवणं खूप कठीण गेलं असतं. मेरी बरोबर होणाऱ्यां गप्पांमुळे मला आफ्रिकन लोकांना समजणं फार सोपं झालं.
“शेफी, आम्ही खूप गरीब आहोत हेच सत्य आहे. भ्रष्ट राजकीय पाठबळाशिवाय प्रगती करण्यासाठी आम्हांला दुसरा कुठलाही मार्ग दिसत नाही. जरा आजूबाजूला बघ, या देशात स्थानिक आफ्रिकन मध्यम वर्गच नाही किंवा आमच्या समाजात तुला रॅग्ज टू रीचेस स्टोरीजही दिसणार नाहीत.’’ असले काही तिच्या मनातले सल बोलताना किंवा भारतीय वंशाच्या लोकांबद्दल वाईट बोलताना ती माझ्या डोळ्यांत बघणं टाळत असे. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र उदासीन भाव येत असे. चेहऱ्यावरचा नेहमीचा मुखवटा उडाल्यासारखा! तो चेहरा पाहिला की मलादेखील थोडंसं अपराधी वाटत असे. काही क्षणांनंतर तिलाच आपण थोडंसं भावनिक झाल्याचं जाणवे आणि ती पटकन विषय बदले.
“शेफ, कधी परंपरागत आफ्रिकन जेवण जेवला आहेस का?’’
“हो, खाल्लं आहे की आपल्याच हॉटेलात.’’
“तू इथे आफ्रिकन म्हणून जे खाणं गेस्टना देतोस ते आफ्रिकन नव्हेच. ठीक आहे. मी तुला स्वाहिली जेवायला घेऊन जाईन, नाहीतरी तू मला बियर पाजायला घेऊन जायचं विसरलाच आहेस.’’
आम्ही दोघंही हसलो आणि एकमेकांना नेहमी सारखी दोन्ही हात उंचावून टाळी दिली. तिच्या हातावरचं इन्फेक्शन अजूनही बरं झालं नव्हतं. तिला आणि तिच्या नवऱ्याला बियर प्यायला बोलवायचं मी मनात पक्कं केलं.
मधल्या काळात पद्मा आणि सौमिल मोंबासाला आले होते. त्यांना नवीन घरात स्थिरावायला मदत व्हावी म्हणून मीही हॉटेलमधून दोन दिवस रजा घेतली होती. मी राहत होतो त्याच ठिकाणी पाचसहा भारतीय कुटुंबंदेखील वस्तीला होती. त्यामुळे पद्माची फार काळजी करण्याची आवश्यकता मला भासली नाही. आपल्या शेजाराशी तिने आपणहूनच नीट जुळवून घेतलं. मी जेव्हा परत कामावर आलो तेव्हा मेरी गैरहजर होती. त्याचं कारण मी तिच्याबरोबर काम करणाऱ्या मुलींना विचारलं तर त्यांनी ती मलेरियामुळे आजारी असल्याचं सांगितलं. मी केनयात येऊन काही महिनेच झाले होते तरी ‘मलेरिया’ या शब्दाची मला चांगलीच सवय झाली होती. दररोज एकतरी माणूस माझ्यासमोर येऊन म्हणे, ‘शेफ, मी आजारी आहे, मला घरी जायचं आहे.’ किचनमधला एकतरी माणूस दररोज मलेरियाने आजारी असे. कधीकधी एखादा तापाने तसाच फणफणत कामावर येत असे. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे कामावर येऊन आजारी पडलं तर त्या दिवसाचा पगार मिळत असे आणि घरूनच आजारी असल्याचं कळवलं तर पगार किंवा रजा कापली जात असे. न कळवता तीन दिवस गैरहजर राहिलं तर कामावरून काढून टाकलं जाई, काहीही न विचारता. मी इथे येण्यापूर्वी भारतातल्या युनियनचे घेतलेले अनुभव अजूनही माझ्या मनात ताजे होते. त्या तुलनेत केनयातील लेबरसंबंधातील कायदे मला धक्कादायक वाटले. मेरीला मलेरिया झाल्याचं ऐकून विशेष काही वाटलं नाही. इतरांप्रमाणे ती आधी कामावर हजेरी लावून मग मलेरिया झाला म्हणून घरी जात नाही ही गोष्ट मात्र थोडी वेगळी वाटली.
दोनतीन दिवस मेरी नसल्यामुळे सकाळच्या वेळी कॉफी आणायला कोणाला सांगावं असा विचार करत मी केबिनमधे बसलो होते. इतक्यात माझ्या किचनमधील थोडंसं इंडियन खाणं बनवायला शिकलेला बेनसन नावाचा शेफ केबिनमधे आला आणि नेहमीचं वाक्य म्हणाला, “शेफ, मी आजारी आहे मलेरियानं!’’
तो खरंच तापाने फणफणत होता.
“मग? आता तुला घरी जायचं असेल ना! इतका ताप असताना तू कामावर न येता आराम करायला हवा होतास.’’ माझा स्वर थोडासा त्रासिकच होता. बेनसन काहीच बोलला नाही. तसाच मान खाली घालून उभा राहिला. मी त्याला बाजूच्या खुर्चीवर बसायला सांगितलं. आमचा संवाद चालू असतानाच मेरी दोघांसाठी कॉफी घेऊन केबिनमधे शिरली. दोन दिवसांच्या आजाराने खूप अशक्त दिसत होती ती!
ती काहीतरी बोलणार इतक्यात बेनसन अगदी ओशाळलेल्या स्वरात म्हणाला, “शेफ सिना पेसा क्वेंडा न्युंबानी ना कुओना दाक्तारी.’’ (शेफ, माझ्याकडे घरी जायला आणि डॉक्टरला द्यायला पैसे नाहीत.) मलासुद्धा आता थोडं थोडं स्वाहिली समजू लागलं होतं आणि हा संवाद तर आता ओळखीचा झाला होता. मी काहीही न बोलता त्याला घरी जाण्यासाठी खिशातून वीस शिलींग काढून दिले. त्याला चिठ्ठी देऊन हॉटेलच्या डॉक्टरकडे जाण्यास सांगितलं. मला ह्या नेहमी होणाऱ्या संवादांचा त्रास होत असे. मन खूप अस्वस्थ व्हायचं. बेनसन आमच्या हॉटेलमधे साधारण पंधरा वर्षं काम करत होता. त्याने एक दिवसाचा पगार वाचवण्यासाठी तापात फणफणत कामावर यावं हे माझ्या मनाला पटतच नव्हतं आणि त्यावर घरी जाण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसणं. रीफ हॉटेलमधील माझ्या गेल्या काही महिन्यांच्या वास्तव्यात मी अशा अनेक जणांना वीस शिलींग दिले होते. मला भारतातील हॉटेलात कामगारांच्या घरून येणाऱ्या फोनची आठवण झाली. “शेफ मैं बिमार है। कामपे नहीं आ सकता।’’ हे भारतात फोनवर ऐकू येणारं वाक्य मला चांगलंच परिचित होतं. त्या आवाजावरूनच ह्या माणसाला काहीही झालेलं नाही तर नुसती कामाला दांडी मारायची आहे हेही लक्षात येई. इकडे मोंबासात तापाने फणफणत असताना लाचार स्वरात माझ्याकडे बेनसनसारख्या अनेकांनी घरी जायला वीस शिलींग मागितले होते.
“शेफी, मला वाटतं तुला बेनसनच्या वेदना सहन होत नाहीत, खरं ना? कॉफी पी. बरं वाटेल.’’ मेरी केबिनमधे असल्याचं माझ्या ध्यानातच नव्हतं.
कॉफीचा घोट घेत तिने बोलायला सुरवात केली. “शेफ, त्रास करून घेऊ नकोस. आम्ही केनयन लोक असेच जगतो. तुला हे क्लेशदायक वाटत असेल पण आम्हांला नाही. कष्टांची आम्हांला सवय आहे. तुला माहीत आहे का की तुझा सगळा स्टाफ कामावर यायचा आणि कधीकधी परत जायचा प्रवाससुद्धा पायी करतो. आणि त्यापैकी कोणीही हॉटेलपासून दहा किलोमीटरच्या अंतरात राहत नाही. उगीच नाही केनया ऑलिम्पिकमधल्या लांब पल्ल्याच्या सर्व शर्यती जिंकते.’’ आपलं बोलणं तिने खोचक छद्मी विनोदाने संपवलं आणि कडवट हसली. माझ्या मनातला अपराधीपणा वाढतच होता.
“शेफ, तुझ्या स्टाफचा सरासरी पगार किती आहे हे माहीत आहे का तुला? ज्या लोकांची सर्व्हीस दहा वर्षांपेक्षा जास्त झालेली आहे त्यांचा सरासरी पगार सहा हजार शिलींगपेक्षा जास्ती नाही. आता खर्च मोज. हॉटेलात जाण्यायेण्याचे बाराशे शिलींग, घरभाडं अडीच हजार शिलींग आणि पाण्याचे पाचशे शिलींग. हे पैसे दिल्यानंतर खाणं, कपडे, औषधं आणि मुलांच्या शिक्षणासाठी पैसे शिलल्क राहतात कुठे? बेनसन तर कामात कुशल आहे, शिकलेला आहे. अकुशल कामगारांची कथा तू न विचारलेली बरी.”
“मी थोडीशी नशीबवान आहे. माझ्या थोड्याशा जास्त शिक्षणामुळे आणि सोंधी कुटुंबाबरोबर असलेल्या माझ्या जवळच्या संबंधांमुळे माझा पगार थोडासा जास्त आहे. पण या ठिकाणी पोहोचण्यासाठी मी कित्येक जणांची वेगवेगळी खास सेवा केली आहे, ज्याचे परिणाम मी आज भोगते आहे. शेफ हे माझ्यासाठी कधीच फार सोपं नव्हतं.’’
तिच्या बोलण्यात दडलेला अर्थ मला कळत होता पण पचण्यासारखा नव्हता आणि बोलण्याचा आवेग सहन होणार नाही असा होता. काय बोलणार होतो मी यावर? मी तसा प्रयत्नही केला नाही.
“पण आमच्या स्वतःच्या देशात आम्ही केनयनच चोर मानले जातो. आमच्या बायकांना वेश्या मानतात कारण त्या कधीकधी पैशासाठी स्वतःला विकतात. ताफाधाली निलेझे, सी हिव्यो इनजस्टीस क्वेटू?’’ (कृपया मला सांग, हा आमच्यावर अन्याय नाही?)
काही वेळ आम्ही गप्पच होतो आणि मग कॉफी न पिताच मेरी माझ्या केबिनमधून निघून गेली. पण त्या बोलण्याचा माझ्यावर परिणाम तर झालाच पण पुढे काय करायचं हेही माझ्या डोक्यात नक्की झालं. मी दुसऱ्या दिवशी एच.आर.मधे गेलो आणि माझ्या सगळ्या स्टाफचे रेकॉर्ड तपासून पाहिले. बऱ्याच जणांचे पाच पाच वर्षांत पगार वाढलेच नव्हते. पुढल्या महिन्याच्या आमच्या मॅनेजमेंट मीटिंगमधे मी प्रस्ताव मांडला की स्टाफच्या कामाचं वार्षिक आकलन आणि मूल्यमापन झालं पाहिजे. त्या स्टाफचं वेतन त्या प्रमाणात वाढलं पाहिजे आणि जे लोक वरच्या तीन मध्ये असतील त्यांना काहीतरी ट्रेनिंगसाठी आपण हॉटेलतर्फे पाठवलं पाहिजे. बऱ्याच लोकांनी विरोध केला. पण मी या मुद्यावरून अकाउंटंट, जनरल मॅनेजर यांच्याशी तावातावाने वाद घातला. शेवटी सर्वांना बाजूला सारून श्री. सोंधीनी माझ्या बाजूने निर्णय दिला. मला जनरल मॅनेजरशी वाद घालताना सर्व आफ्रिकन मॅनेजर अचंबित होऊन बघत होते. ही बातमी बाहेर फुटली आणि मग हॉटेलच्या स्टाफची माझ्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलली.
दुसऱ्या दिवशी हॉटेलमधे फिरताना अनोळखी अशा तीनचार जणांनी तरी मला म्हटलं होतं, “शेफ, वेवे ने तफाऊती.’’ (शेफ, तू काहीतरी वेगळा आहेस.) हा माझा फार मोठा विजय होता असं जरी सर्वांनी मानलं तरी मी याचं सर्व श्रेय मेरीलाच द्यायचं ठरवलं. त्या दिवशी ती आवेगाने जे बोलली त्याचा फायदा माणसांना ओळखण्यात मला आजही होतो.
मेरीशी जरी माझी बऱ्यापैकी मैत्री झाली असली तरी तिच्या घरच्यांबद्दल मला काहीच माहिती नव्हती. ही परिस्थिती मी बदलायचं ठरवलं. तिला आणि तिच्या नवऱ्याला येत्या वीकएन्डलाच बियर प्यायला बाहेर न्यायचं मी पक्कं केलं. दुसऱ्या दिवशी सकाळच्या कॉफीच्या वेळी मी तिला तिच्या नवऱ्यासमवेत रविवारी जेवायला बाहेर जाण्याचं आमंत्रण दिलं. तिच्या चेहऱ्यांवर एक खट्याळ हास्य उमटलं. ती म्हणाली, “शेफ, वेवे ने तफाऊती. हपाना. वेवे नी शुजा क्वा अजिली याओ.’’ (शेफ, तू काहीतरी वेगळा आहेस. खरं तर तू त्यांच्यासाठी हिरो आहेस.) स्टाफ माझ्याविषयी काय बोलतो आहे हे तिच्या कानावर गेलं होतं. त्यासंबंधात हा तिचा मिश्किल शेरा होता. पण पुढे ती म्हणाली, “मी तुला इतरांपेक्षा वेगळं मानते कारण तू पहिला भारतीय वंशाचा माणूस मी पाहिला आहे जो एका स्त्रीला तिच्या नवऱ्यासोबत जेवायला बोलवत आहे. माझा अनुभव मला असं सांगतो की भारतीय वंशाचा पुरुष केनयन बाईला जेवायला बोलावतो तेव्हा नंतर ती आपल्याबरोबर झोपेल ही अपेक्षा ठेवूनच. आमच्या केनयन बायका अशा बोलावण्याचा कित्येकदा स्वीकारही करतात. आम्हांला नैतिक निर्बंध परवडत नाहीत मित्रा.’’
मग म्हणाली, “शेफ, एकदा तू मला मी तुला मदत कां करते? असा प्रश्न विचारला होतास. मी तुला मदत करते कारण तू माझा मित्र आहेस. आणि आपली मैत्री होऊ शकली कारण तू माझा आदर केलास. तुझ्या वागण्यात किंवा डोळ्यांत मला आफ्रिकन लोकांविषयी दूषित पूर्वग्रह दिसला नाही.’’ हे ती फार गंभीरपणे बोलली.
त्यानंतर एक मिस्किल हास्य चेहऱ्यावर आणून विषय परत आमच्या बाहेर जेवायला जाण्याच्या कार्यक्रमाकडे नेला. ती मला आफ्रिकन खाण्याची चव दाखवणार होती. खायला जायची जागा मेरीनेच ठरवली होती. तिने माझ्या खांद्यावर हळूच आपला हात दाबला आणि म्हणाली, “असांते साना क्वा वोटे वाविली म्वालिको ना हेशिमा. (शेफ, थँक्स अ लॉट, या आमंत्रणासाठी आणि दाखवलेल्या आदरासाठी.) मी तुला पारंपरिक लुओ खाणं खायला घेऊन जाणार आहे. बियरचे पैसे तू दे.’’
पुढच्या रविवारी मेरी आणि तिचा नवरा हॉटेलमधे एक टॅक्सी घेऊन आले. तिचा नवरा शिक्षणाने इंजिनियर असल्यामुळे माझ्या मनात त्याची एक प्रतिमा होती. ती पार चुकीची निघाली. रेखीव, काटक शरीर, फाटकी, मळकी जीन्स, वर एक ढगळ बिनगळ्याचा जुनाट टी शर्ट आणि थोडेसे फाटके कळकट बूट हा पेहराव. घामेजलेला पण मोकळं हास्य असलेला चेहरा. असला अवतार पाहिल्यावर मला त्याच्यात शिकला-सवरलेला इंजिनियर कुठेच दिसला नव्हता तर एखादा कामकरी, कष्टकरी माणूस माझ्यासमोर उभा होता. हुशारी आणि शिक्षणाची चमक होती ती फक्त बोलक्या डोळ्यांत! त्याने आपणहूनच त्याची ओळख करून दिली. जॉर्ज हे त्याचं नाव त्यानेच सांगितलं आणि हस्तांदोलन केलं. त्याने केलेल्या कष्टांचा पुरावा त्याच्या हातातील ताकद देत होती. त्याने आणलेली गाडी एक फार जुनी टोयोटा होती. बऱ्याच जागी तिचा रंग उडालेला होता. काही ठिकाणी पोचेही आले होते. आम्ही गाडीत बसलो. मेरी आणि जॉर्ज पुढे बसले. गाडीच्या सीट्स जागोजागी फाटल्या होत्या. त्याने गाडी चालू केली. गाडी चालू झाली पण तिच्या सर्वच भागांचा खडखडाट होत होता. त्याने गाडी हॉटेलच्या बाहेर काढली. आम्ही जेवायला कुठे जाणार याची काहीच माहिती मला नव्हती. त्याबद्दल मी जॉर्जजवळ चौकशी केली. त्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही ‘किसौनी’ नावाच्या जवळच्याच गावात जात होतो. लुओ जमात ही मुळची युगांडा बॉर्डरवर राहणारी. पण नोकरीसाठी मोंबासाला आलेले बरेच लुओ किसौनी या गावात राहत असत. त्यामुळे तिथे पारंपरिक लुओंचं जेवण वाढणाऱ्या खानावळी बऱ्याच होत्या. वाटेत मेरीच जास्त बोलत होती. तिने जॉर्जबद्दल अधिक माहिती दिली. तो शिक्षणाने इंजिनियर असला तरी नोकरी नसल्यामुळे तो ही टॅक्सी चालवायचा. जवळच एक छोटंसं कार रिपेअर गॅरेजही चालवायचा. याव्यतिरिक्त तो मोंबासात निरनिराळ्या हॉटेलांत राहणाऱ्या पर्यटकांना गाइड बनून मोंबासात आणि भोवतालच्या परिसरांत फिरवूनही आणत असे. अर्थात या फेरफटक्यासाठी तो ही टॅक्सी वापरत नाही हेही मेरीने हसत हसत मला सांगितलं. आमच्या गप्पांच्या ओघात आम्ही किसौनी गावात कधी पोहोचलो ते कळलं नाही. आम्ही एका नारळाच्या झावळ्यांनी शाकारलेल्या खोपटाच्या पुढे उभे राहिलो. मी गाडीतून बाहेर पडलो. मी प्रथमच केनयातलं एक गाव बघत होतो. लाल माती सोडली तर बाकी सर्व दृश्य कोकणातलंच होतं. सर्वच घरं नारळाच्या झावळ्यांनी शाकारलेली. अर्थात आता काही जणांनी दरवर्षी शाकारण्याचे कष्ट टाळण्यासाठी छतांवर पत्रे घातले होते. भिंती मातीने लिंपलेल्या, आजूबाजूला असलेली झाडं सगळी ओळखीची. नारळ, पोफळी, आंबा, फणस, चिंच. बोगनवेल तर भरपूर होती, अगदी वेगवेगळ्या रंगाची. वड, पिंपळ मात्र कुठे दिसला नाही. पण त्या जागी एक वेगळंच झाड होतं. खूप रुंद बुंधा असलेलं पण वरती बोडकंच. त्याला केळफुलाच्या आकाराच्या भरपूर शेंगा लटकत होत्या. मी त्या झाडाकडे कुतूहलाने बघतोय हे पाहिल्यावर जॉर्जने त्या झाडाचं नाव ‘बाओबाब’ असल्याचं सांगितलं. त्याने अजून माहिती दिली, “या जातीची भरपूर झाडं पूर्व आफ्रिकेत आहेत आणि हे खूप प्राचीन वृक्ष आहेत. काही काही तर सातआठशे वर्षं जुने. या झाडाच्या बुंध्यावर असलेल्या रेषांनी याचं वय मोजतात.’’ जॉर्जमधला टुरिस्ट गाइड बोलू लागला. तो बाओबाब झाडावर अजून काही बोलणार त्याच्या आधीच मेरीने त्याला हटकलं. “बासी, ना कु पुम्झिका क्वांझा.’’ (अरे थांब. जरा त्याला नीट बसून दम तर खाऊ दे.) जॉर्ज हसला आणि त्याने मला खोपटाच्या आत नेलं.
बाहेर भरपूर ऊन असलं तरी त्या खोपटात मात्र उजेड कमीच होता. छताकडे बघितलं तर कोकणातल्यासारखे पण थोड्या वेगळ्या डिझाइनचे कंदील आत टांगले होते. दिवस असल्यामुळे ते पेटवलेले नव्हते. आधीच्या रात्री ते पेटवलेले असावेत कारण त्यांच्या काचांवर काजळी धरली होती. बहुदा या गावात वीज नसावी. त्या खोलीत लाकडाची जुनाट बाकडी टेबलं म्हणून मांडली होती. बसायला नारळाचे बुंधे कापून ठेवले होते. टेबलावर प्लास्टिकचे कळकट ग्लास आणि एक जग होता. मी त्यात पाणी असेल असं समजून ग्लासात ओतलं तर तो कसलासा ज्यूस होता. कोवळ्या चिंचेचा कोळ काढला तर जसा रंग येईल त्या रंगाचा. तो प्यावा की पिऊ नये असा विचार करत मी तो ज्यूस न्याहाळत होतो. “हा बाओबाब झाडाच्या फळांचा ज्यूस आहे. आम्ही जेवणाबरोबर पाणी पित नाही.’’ असं म्हणून तिने खोपटाच्याच बाहेर असलेल्या बाओबाब झाडाकडे बोट दाखवलं आणि त्यावर लटकणाऱ्या शेंगाही दाखवल्या. त्या शेंगा न्याहाळत मी ज्यूसचा पहिला घोट घेतला. ज्यूसला चिंचेचाच स्वाद होता पण आंबटगोड, थोडासा तुरट अशा वेगळ्या चवीचा तो ज्यूस आवडण्यासारखाच होता. मी आधी थोडाच ज्यूस ग्लासात ओतला होता. अजून ओतायला गेलो तर मेरीने मला थांबवले. म्हणाली, “ज्यूसनेच पोट भरेल, नंतर जेवण नीट जाणार नाही.’’ लहानपणी जेवताना आम्ही पाणी प्यायला लागलो की आईकडून मला हे वाक्य हमखास ऐकायला मिळे!
आतल्या खोलीतून खानावळीचा मालक कसलासा छोटा कार्टन घेऊन आला आणि त्याने तो आमच्या टेबलावर ठेवला. त्यातल्या बियरच्या दोन बाटल्या बाहेर काढून त्याने माझ्या आणि जॉर्जसमोर ठेवल्या. बियर मला आवडते पण अख्खा बारा पाइंट्सचा कार्टन टेबलावर माझ्यासमोर ठेवणं म्हणजे थोडं जास्तच होत होतं. ही माझी प्रतिक्रिया मी दिली मात्र नाही. पण मेरी बियर पिणार की नाही ते विचारलं. “नाही. मेरी बियर पित नाही कारण ती तिच्या तब्येतीला चांगली नाही. आणि घरी जाताना गाडी तीच चालवणार आहे.’’ जॉर्जनेच उत्तर दिलं. तो काहीतरी लपवतो आहे असं वाटलं. मेरी नुकतीच मलेरियातून उठल्याचंही माहीत होतं मला. त्यामुळे हा विषय मी अजून लांबवला नाही. जरा वयस्कर दिसणाऱ्या त्या माणसाशी मेरीने माझी ओळख करून दिली. त्याचं नाव ‘ओबुया’ असं होतं आणि तो मेरीचा कझिन होता. त्याचीच ही खानावळ होती. “ना सासा ना काझी वाके कौंझिशा न वेवे स्वाहिली चकुला.’’ (स्वाहिली क्वुझिनशी त्याची ओळख करून देण्याची जबाबदारी आता तुझी आहे.) मेरीने हसत हसत ओबुयाला सांगितलं आणि आपलं बोलणं संपवलं. ओबुयाने हसतच ही फर्माइश स्वीकारली. तो काहीतरी आतून आणण्यासाठी वळणारच होता इतक्यात आतून एक अत्यंत पारंपरिक आफ्रिकन वेशातली बाई आमच्यासाठी काहीतरी घेऊन आली. तिच्या हातात एक अॅल्युमिनियमची ताटली होती. ती तिने आमच्यासमोर ठेवली. “न्यामा संबूसा,’’ (मटण समोसे) तिने माहिती दिली. मनात आलं, मी आफ्रिकन जेवण चाखायला या गावात आलो पण खातोय मात्र आपल्या मुंबईतल्या मोहम्मद अली रोडवर मिळणारे पट्टी समोसे! काही शतकांपूर्वी भारतीय वंशाचे लोक या उपखंडात रेल्वेच्या उभारणीसाठी जवळ जवळ गुलाम म्हणूनच आले. त्यांच्याबरोबर इथे आलेले सामोसे आता इथलेच झाले होते. त्या अॅल्युमिनियमच्या ताटलीत मटण सामोश्यांबरोबर काही बटाट्याचे सामोसेही मिसळलेले होते. शाकाहारी आणि मांसाहारी या संकल्पना इकडच्या लोकांना माहीतच नसल्यामुळे हे दोनही पदार्थ एकाच ताटलीत ठेवायला त्यांना काहीच अडचण वाटली नाही. समोसे जरी भारतातून केनयात आले असले तरी आता त्यांची चव इकडचीच झाली होती कारण आपल्या समोशातील मिरची आणि मसाले यात नव्हते तरीही ते चवदार होते. आमच्या समोर असलेले सामोसे गप्पांच्या ओघात, बियरच्या घोटांबरोबर कधी पोटात गेले ते कळलंच नाही.
“अकेल्लो, क्वा निनी नी वेवे कुटुमिका चकुला?’’ (अकेल्लो, आता आपण जेवण वाढू या का?) त्या बाईकडे बघत मेरी म्हणाली आणि त्या बाईबरोबरच तिला मदत करायला लगबगीनेच आतमधे गेली. “अकेल्लो नी म्के वांगू.’’ (अकेलले ही माझी बायको आहे.) ओबुयाने माहिती पुरवली. मला खरं तर अजून एवढं स्वाहिली कळत नसे पण जॉर्ज किंवा मेरी वेळोवेळी भाषांतर करून सांगत होते. आमचं बोलणं चालू असताना त्याची खानावळ तर चालूच होती. आजूबाजूच्या बाकड्यावर मधेच कोणीतरी येऊन बसत. बाकड्यावरच्या जगमधून बाओबाब ज्यूस ग्लासमधे ओतून घेत. त्याचा घोट घेता घेता ओबुया किंवा अकेल्लोला स्वाहिलीतून काहीतरी सांगत असत. बहुदा ती त्यांची खाण्याची ऑर्डर असावी. हे दोघं इथूनच काहीतरी आतमधल्या लोकांसाठी ओरडत आणि मग एखादा मुलगा किंवा मुलगी त्या गेस्टसाठी खाण्याने भरलेली अॅल्युमिनियमची थाळी घेऊन बाहेर येत आणि ती त्या गेस्टच्या समोर आदळली जाई. गेस्टनाही या आपल्यासमोर थाळी आदळण्याचं काही वाईट वाटत नव्हतं. ते कुठल्याही गोष्टीकडे लक्ष न देता हातानेच खायला लागत. मला मुंबईतील ‘अनंताश्रमा’ची आठवण झाली. त्यांच्या आपसांत गप्पाही चालल्या होत्या. कोपऱ्यात एक बेसिन होतं त्याच्या बाजूला पाण्याने भरलेलं पिंप व जग ठेवला होता. खाणं झालं की तिथे जाऊन हाततोंड धुवत आणि पैसे बाकड्यावर टाकून चालते होत. जाताना ओबुयाला हात वर करून धन्यवाद द्यायला मात्र ते विसरत नव्हते. “ओबुया, इना ओने काना लेओ उना मोहिंदी म्गेनी?’’ (ओबुया, आज तुझ्याकडे भारतीय पाहुणा आला आहे असं दिसतंय.) मधेच एकाकडून कॉमेंट आली. ओबुयानेसुद्धा, “हॅsss’’ एवढंच उत्तर दिलं. दरम्यान मेरी आणि अकेल्लो आमचं खाणं घेऊन बाहेर आल्या होत्या. आमच्यासाठी प्लेट्स मांडण्यात आल्या. अॅल्युमिनियमच्याच असल्या तरी त्या इतर गेस्टपेक्षा थोडे कमी पोचे आलेल्या असाव्यात!
दोघींनी वाढायला सुरुवात केली. बरेच पदार्थ बनवले होते त्यांनी. हॉटेलमधे आम्ही स्वाहिली खाणं गेस्टसाठी बनवत असल्यामुळे तशी नावंही माहीत होती. पण त्यांची चव कधी फार भावलेली नव्हती. मी बरेचसे पदार्थ ओळखले. उगाली (मक्याच्या पिठाची उकड), गिधेरी (राजमा आणि मक्याचा रस्सा), इरीयो (मटार, बटाटा आणि मक्याची भाजी), सुकुमा विकी (चवळीसारखी एक पालेभाजी आपल्यासारखीच भरपूर लसूण घालून परतलेली), समाकी वा कुकांगा (तळलेले मासे), समाकी वा कुपाका (माशाचे नारळाच्या दुधातील कालवण), छप्पाती (मैद्याचे पराठेच होते ते पण जाडजूड आणि भरपूर तेल वापरून भाजलेले) आणि शेवटी पुलाव (नारळाचं दूध वापरून केलेला). मी हे सर्व पदार्थ आमच्या हॉटेलमधे चाखलेले होते. आणि स्वतःला न आवडूनदेखील गेस्टशी बोलताना त्यांची भरपूर तारीफ केली होती. पण आज या जेवणाची चव काही वेगळीच लागली. ओबुया आणि अकेल्लो आधी आमच्याबरोबर जेवायला बसायला तयार नव्हते पण मी त्यांना बळेबळेच बसवलं. मेरीनेही मला या बाबतीत पाठिंबा दिला. जेवताना मी तरी कोणाशीच बोलत नव्हतो. मी सर्व पदार्थ अगदी मनापासून चाखले. जेवण चालू असताना मेरीचं मला केनयन खाण्याविषयी ज्ञान देणं चालू होतं पण माझं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. तिच्या बोलण्यातलं मला एवढंच लक्षात राहिलं की, हे फक्त लुओ लोकांचं खाणं नाही तर केनयातील वेगवेगळ्या जमातीचं प्रतिनिधित्व करणारे काही पदार्थ आहेत. जेवण झाल्यानंतर लक्षात आलं की मी नेहमीपेक्षा फार जास्त जेवलो होतो. त्यानंतर जागं राहणं तसं अवघडच होतं. मी काहीतरी कारण सांगून त्या दिवशीची आमची भेट आवरती घेतली आणि आम्ही तिथून निघालो. “मी इथे निश्चित परत येईन. पण ते जेवायला नाही तर केनयन जेवण बनवणं अकेल्लोकडून शिकायला.’’ मी ओबुयाला म्हणालो. मी बिल मागितलं तशी मेरीने बिल न देण्यास ओबुयाला बजावलं. “येये नी म्गेनी वेटु.’’ (हे आपले पाहुणे आहेत.) पण मी बळेबळेच ओबुयाच्या खिशात काही पैसे कोंबले. आम्ही परत हॉटेलकडे निघालो. परतताना मेरी गाडी चालवत होती. जॉर्ज तसा गाडी चालवण्याच्या स्थितीत नव्हताच. त्याची स्वाहिलीत अगम्य बडबड चालू होती. मेरी हसत हसत म्हणाली, “म्वुलाना नी मांबो.’’ (हा माणूस आता वेडा झाला आहे.)
त्यानंतर मी मेरीला घेऊन दोनतीनदा किसौनीला अकेल्लोकडे जाऊन त्या दिवशी खाल्लेले आणि इतर काही केनयन पदार्थ शिकलो. ओबुयाच्या खानावळी प्रमाणेच मेरी आणि जॉर्जने मला जवळच्या वेगळ्या गावातील इतर काही जमातींच्या खानावळी नेऊन दाखवल्या. मला त्या खाण्यातला फरकही समजावून सांगितला. आमच्या हॉटेलमधे बनवल्या जाणाऱ्या स्थानिक जेवणात त्याचा प्रत्यय दिसू लागला. माझ्या केनयन सहकाऱ्यांनाही तो फरक जाणवला. माझ्या किचनमधील सहकाऱ्यांना खरं तर चांगलं केनयन जेवण बनवता येत होतं. पण त्यांच्याकडून ते करून घेणारं कोणी नव्हतं. त्यांना पाट्या टाकायची सवय लागल्यामुळे तसेच जुजबी जेवण ते बनवत होते. श्री. सोंधीनाही हा फरक जाणवला. माझं कौतुकही झालं पण याचंही मुख्य श्रेय मेरीला जात होतं. त्यानंतर आमचं तिघांचं बाहेर फिरायला जाणं वाढू लागलं. आफ्रिकन लोकांबरोबर माझं मधून मधून बाहेर जाणं हॉटेलातल्या काही भारतीय वंशाच्या लोकांना विचित्र वाटायचं. एकदोघांनी विचारलं देखील,“सेफ, ये कालोंके साथ बाहर जाते हो। डर नहीं लगता क्या? एक दिन लूट लेंगे। या तुमही कुछ लूट रहे हो उनसे?’’ असं म्हणून ते कुत्सितपणे घाणेरडं हसत असत. माझी एका केनयन मुलीशी फक्त मैत्रीच असू शकते यावर त्यांचा विश्वासच नव्हता. मी त्या बोलण्याकडे फार लक्ष दिलं नाही. पण आता मोंबासात राहणं मला आवडू लागलं होतं. मोंबासात राहणाऱ्या महाराष्ट्रीयन किंवा भारतीय लोकांबरोबर बाहेर गेलं तर मोंबासाचे काही ठरावीक भागच पाहिले जात. पण मेरी आणि जॉर्जबरोबर मी संपूर्ण मोंबासा बघितलं. आजूबाजूची गावं बघितली. केनयाच्या किनाऱ्याला असलेल्या अकांबा, म्जिकेंडे ह्या आणि इतर काही जमातींची गावं बघितली. त्यांची घरं मी आतून न्याहाळली. निरनिराळ्या चालीरीती बघितल्या. त्यांच्याबरोबर निरनिराळ्या तऱ्हेच्या प्राण्यांचं मांस, भाज्या चाखल्या. खूप वेगळ्या प्रकारचा आनंद अनुभवत होतो.
पण हल्ली एक गोष्ट जाणवे, ती म्हणजे मेरी पटकन दमत असे. ती दमली की जॉर्जही अस्वस्थ होत असे. एकदोनदा तर आम्ही आमचं जेवण अर्धवट सोडूनच घरी परतलो होतो. असं काही झालं की त्यानंतर मेरी दोनतीन दिवस कामावर येत नसे. तिच्या आजाराबद्दल कोणी काही फारसं बोलत नसत. विचारलं तर मलेरिया हे ठरलेलं उत्तर असे. जेव्हा ती परत कामावर येई तेव्हा ती थोडी अशक्त, दमलेली असे. पण काम मात्र जमेल तसं करायचा प्रयत्न करायची. मी आणि जॉर्जने काही कार्यक्रम ठरवला तर बरोबर यायला उत्सुक असे. नाइट क्लब किंवा पबमधे यायला तर ती एका पायावर तयार असे. मला स्वतःला नाचायची आवड असली तरी पाश्चात्त्य संगीताबरोबर नाचायची सवय कधीच नव्हती कारण तशी कधी वेळच आली नाही. पण तिथे मेरी आणि जॉर्जबरोबर नाइट क्लबला गेलं तर या आफ्रिकन लोकांना नाचताना बघायला मला खूप आवडायचं. मीही माझे पाय थोडेसे मोकळे करून घेत असे. लय आणि ताल या लोकांच्या रक्तातच असते. कुठलंही गाणं चालू नसतानासुद्धा त्यांना नाचात धुंद झालेलं मी पाहिलं आहे. लय आणि ताल त्यांच्या आतमधे कुठेतरी वाजत असावं का? ते गाणं गुणगुणतही फार सुंदर नाचतात. मी हे किचनमधे नेहमी पाहत असे. कामाचा कुठेही खोळंबा न करता त्या सर्व वीस-पंचवीस जणांची ब्रम्हानंदी टाळी लागलेली असे. मला ते दृश्य फार आवडायचं. आपणही त्यांच्याबरोबर नाचावं असं वाटे.
दर डिसेंबरमधे आमच्या हॉटेलच्या सर्व स्टाफला पार्टी असे. पार्टीसाठी आम्ही सर्व टेनिस कोर्टवर जमा झालो. सर्व स्टाफ आपल्या जोडीदारांसहीत नीट सजूनधजून जमा झाले होते. या सर्व लोकांना एवढ्या औपचारिक कपड्यांत पाहायची सवयच नव्हती. मेरीलाही जॉर्जबरोबर पार्टीला आलेलं मी पाहिलं पण मी माझ्या कामात बिझी असल्यामुळे पुढे जाऊन काही बोलणं मात्र झालं नाही. मेरीने एक सुंदर काळा ड्रेस परिधान केला होता. तर जॉर्जने काळा सूट, पांढरा शर्ट आणि काळा बो-टाय बांधला होता. मेरी आज खरंच छान दिसत होती. तिचं माझ्याकडे बहुधा लक्ष नव्हतं. बरेच मॅनेजरही आपल्या जोडीदारांसमवेत पार्टीत सामील झाले होते. मग श्री. सोंधी, श्री. क्लोहे यांची भाषणं झाली. दोनतीन दिवसांपूर्वीच दुसऱ्या डिपार्टमेंटमधली ‘वंजिरु’ नावाची बाई बरेच दिवसाच्या आजारानंतर वारली होती. ही माहिती मला किचनमधील लोकांनी पुरवली होती पण मी काही त्या मुलीला ओळखत नव्हतो. त्यामुळे असेल कदाचित पण मी अधिक चौकशी केली नाही. श्री. सोंधीनी आपल्या भाषणात सर्वप्रथम वंजिरुला आणि त्या वर्षी दिवंगत झालेल्या आमच्या इतर एकदोन सहकाऱ्यांना आदरांजली वाहिली. दोन मिनिटांची शांतता पाळण्यात आली. काही कामगारांना काही पारितोषिकं वाटण्यात आली. आधी पोटोबा मग विठोबा या न्यायाने त्यानंतर बार आणि बुफे उघडण्यात आला. माझं लक्ष बारकडे गेलं. बियर घेण्यासाठी सर्व कामगार कुठलीही मारामारी न करता बारसमोर नीट रांग लावून उभे होते. एकतर भारतातील हॉटेलांतून स्टाफ पार्टीला बियर किंवा कुठलंही अल्कोहोल देत नाहीत कारण नंतर स्टाफला सांभाळणं कठीण होऊन जातं. जर का आपल्याकडे एखाद्या हॉटेलमधे असं केलंच तर इतक्या शिस्तीत स्टाफ बारसमोर उभा राहील का? मी हे दृश्य डोळ्यांसमोर आणायचा प्रयत्न केला. पण जमलंच नाही. सगळ्या स्टाफने आधी जेवून घेतलं. डिपार्टमेंट हेड, इतर मॅनेजरनीही स्टाफसोबतच जेवून घेतलं. त्यानंतर एखादी बियर घेऊन स्थिरावला, इतक्यात एच. आर. मॅनेजरनी श्री. व सौ. सोंधीना नाच सुरू करायची मायक्रोफोनवरून विनंती केली. ऐंशी वर्षांचे, पाच-सव्वा पाच फूट उंचीचे गोरे पण रापून लाल झालेल्या वर्णाचे श्री. सोंधी आणि साधारण पंच्याहत्तर वर्षांच्या, सहा फूटाच्या आणि गोऱ्यापान वर्णाच्या नॉर्वेजियन वंशाच्या सौ. सोंधी यांनी नाच सुरू केला. ते दृश्य बघण्यासारखं होतं. मला आतून हसायला येत होतं. श्री. सोंधीना फार सफाईने नाचताही येत नव्हतं आणि त्यांना ते फार आवडतही नसावं. सौ. सोंधीच्या नाचण्यात मात्र सफाई होती. पण हा प्रसंग त्यांच्यावर दरवर्षी येत असावा. कारण त्यांच्या या आविष्काराची सर्वांनाच सवय होती. बाकी कोणीच नाचण्यासाठी रिंगणात येत नव्हतं. बॅन्ड वाजवत असलेलं संगीतही श्री. सोंधींच्या वयाला साजेसं जुनं आणि संथ होतं. थोड्या वेळाने श्री. क्लोहे आपल्या पत्नीसह रिंगणात उतरले. त्यांनी सौ. सोंधीना आपल्या सोबत नाचण्याचं आमंत्रण दिलं आणि त्यांच्या पत्नीने श्री. सोंधीना. ही बहुधा दर वर्षीची प्रथा असावी. साथीदारांना बदलून थोडा वेळ नाच झाल्यावर एकदम बॅन्डने गाण्यांची लय बदलली आणि सर्व कामगारांना आवडेल असं रॉक अॅन्ड रोल संगीत सुरू केलं. सौ. सोंधी दमल्या होत्या. श्री. सोंधी मात्र दमले नव्हते. त्यानी सर्व कामगारांबरोबर उभ्या असलेल्या मेरीला आपल्याबरोबर नाचायची विनंती केली. माझं लक्ष प्रथम सौ. सोंधींच्या चेहऱ्याकडे गेलं. श्री. सोंधीचं हे मेरीबरोबर नाचणं त्यांना फारसं रुचलं नसावं. मानेला झटका देऊन त्यांनी आपला राग व्यक्त केला आणि दुसऱ्या कोणाशी तरी बोलायला सुरुवात केली. तरी त्या थोड्या थोड्या वेळाने हळूच वाकून मेरीकडे रागाने बघत होत्या. सोंधी कुटुंबाबरोबर असलेल्या जवळच्या संबंधांबद्दल पूर्वी मेरीने केलेला उल्लेख मला आठवला. मी जॉर्जकडे बघितलं. तो मेरी आणि श्री. सोंधीना नाचताना बघत होता पण त्याचा चेहरा मात्र निर्विकार होता. आताशा सर्वच कामगारांनी नाचायला सुरुवात केली होती. मला नाचाची आवड आहे आणि नाचताही येतं पण अशा प्रसंगी नाचावं की नाही अशा संभ्रमात असल्यामुळे माझ्या डिपार्टमेंटमधल्या काही जणांनी आग्रह केल्यानंतर मी थोडा वेळ कसेतरी पाय हलवले आणि गर्दीतून सटकलो. बारजवळ जाऊन एक बियर घेतली आणि बारकाउंटरच्या बाजूला कोपऱ्यात उभा राहून पार्टीकडे बघत राहिलो. सर्व कामगार संगीताचा मनमुराद आनंद घेत होते. कोणी थकलं की थोडा वेळ थांबे, बारवर येऊन बियर किंवा एखादा सोडा घेई. तो पिता पिता थोडासा दम खाई आणि पुन्हा त्या नाचणाऱ्यांच्या गर्दीत सामील होई. त्या बॅन्डच्या आवाजात काही बोललेलं ऐकू येणं शक्यच नव्हतं. त्यामुळे जे गप्पा मारू इच्छित होते ते तिथून दूर जाऊन बसू लागले. साडेसातच्या सुमारास पार्टीला प्रारंभ झाला होता. भाषणं, लोकांचं जेवण वगैरे उरकून संगीत आणि नाचाचा कार्यक्रम सुरू होईपर्यंत साडेनऊ वाजले होते. आता हे नाचगाणं संपेपर्यंत किती वाजतील काही सांगता येत नव्हतं. साधारण तासभराच्या नाचगाण्यांनंतर वरिष्ठ मॅनेजरांनी हळूहळू तिथून काढता पाय घ्यायला सुरुवात केली. मीही माझ्या सहकाऱ्यांबरोबर गप्पा मारून थोड्या वेळाने तिथून जाण्याच्या विचारात होतो. दुसऱ्या दिवशी माझी सुट्टीच होती त्यामुळे तशी घाई नसली तरी नुसती बियर हातात घेऊन किती वेळ उभं राहणार. एक गोष्ट मात्र मला प्रकर्षाने जाणवली. इतक्या बियर पिऊनसुद्धा ह्या दीडदोनशे जणांच्या समूहात एकही अतिप्रसंग घडला नव्हता. सर्व जण भरपूर मजा घेत होते, भरपूर बियर पित होते. पण त्यासाठी वखवखले नव्हते. काही जोडप्यांनी थोडासा एकान्त मिळेल असे कोपरे शोधले होते. एच. आर. मॅनेजरने सांगितल्याप्रमाणे ही पार्टी दरवर्षी साधारण पहाटे अडीचतीन वाजेपर्यंत चालत असे.
इतक्यात गर्दीतून मेरी आणि जॉर्ज बाहेर पडताना दिसले. मेरी दमली होती. जॉर्ज तिला आधार देत बारच्या दिशेने येत होता. मी हात केला तशी दोघांनी आपली दिशा बदलली आणि माझ्या बाजूला असलेल्या खुर्चीवर त्याने मेरीला बसवलं. स्वतः बारच्या दिशेने त्यांच्यासाठी काहीतरी पेय आणायला गेला. “ओ मटीटा, मीमी निमेचोका. लाकिनी मीमी क्वा क्वेले वालेफुराहि.’’ (अग आई ग, मजा आली! पण खरोखर दमायला झालं.) मेरी स्वतःशीच म्हणाली. आमच्या इकडतिकडच्या गप्पा सुरू झाल्या. मी मेरीला त्या दिवशी आम्ही वंजिरु नावाच्या मुलीला श्रद्धांजली वाहिली होती तिच्याबद्दल विचारलं.
“हाऊस कीपींगमधे कामाला होती पण बरेच महिने आजारी असल्याने कामावरच आली नव्हती.’’ मेरीने माहिती दिली.
“तिला एड्स झाला होता. बिच्चारी, सुटली एकदाची.’’
ती स्वतःशीच पुटपुटली “नी यामु झांगू सासा, रफिकी.’’(आता माझी पाळी आहे मित्रा.)
ती जरी स्वतःशीच पुटपुटली असली तरी मला ते नीट ऐकू आलं होतं. इतके दिवस माझ्यापासून तिने लपवलेलं हे सत्य असं बाहेर आलं होतं.
“मेरी, याचा अर्थ काय?’’
तिने त्यावर काहीच उत्तर दिलं नाही आणि सोड्याचा घोट घेऊन नजर दुसरीकडे फिरवली. मी तिला पुन्हा तोच प्रश्न केला. पण उत्तर मिळालं नाही. जॉर्जने मग हळूच माझा खांदा दाबला. मी गप्प झालो. मला जे कळायचं ते कळलं होतं. मेरीचं नेहमी आजारी पडणं, तिच्या हातावरचं बरं न होणारं इन्फेक्शन, तिचं पटकन दमून जाणं आणि कधीकधी उगीच भावूक होणं, तिचा आफ्रिकेतर समाजावर असलेला राग. सगळ्याचा उलगडा माझ्या मनात होत होता. मला काही बोलताच येईना. बराच वेळ गप्पच बसून होतो आम्ही. तिच्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे तिनेच बोलणं परत सुरू केलं, पण विषय बदलून!
“पडमा आणि सोमिल कसे आहेत? मोंबासात स्थिरावले का? कधीतरी भेटलं पाहिजे त्यांना.’’
जॉर्जचा हात पकडून ती उभी राहिली. आजची भेट संपल्याची सूचना होती ती!
थोडा गोंधळ उडाला होता माझ्या डोक्यात. झोपच लागली नाही त्या दिवशी. उठल्यानंतर हॉटेलमधे एक फेरी मारुन यायचं ठरवलं. गाडीत बसल्या बसल्या कालच्या आठवणी परत येऊ लागल्या. हॉटेलमधे आल्यानंतर बघितलं तर रात्री दोनतीनपर्यंत पार्टीत नाचत असलेले माझे सर्व सहकारी अगदी वेळेवर कामावर हजर होते. कुठल्याही कारणासाठी कामाचा एक दिवस चुकवणं त्यांना परवडणंच शक्य नव्हतं. माझ्या सुट्टीचा दिवस होता तो पण किचनमधला स्टाफ कामावर असेल की नाही याची खात्री नसल्यामुळे मी हॉटेलात आलो होतो. आता इथे थांबण्याचं काहीही प्रयोजन नव्हतं. तरीसुद्धा आलोच आहोत तर थोडा वेळ थांबावं या विचाराने मी केबिनमधे शिरलो. आज माझ्यासाठी मेरी कॉफी आणणार नाही ही कल्पना मला होती. मी दुसऱ्या कोणालातरी कॉफी आणायला सांगितलं. कॉफीची वाट बघता बघता मी उगीचच किचनमधे काम करत असलेल्या माझ्या सहकाऱ्यांना न्याहाळत होतो. नेहमी दिसणारा कामातला उत्साह आज दिसत नव्हता. कालच्या पार्टीचा थकवा हे त्यामागचं कारण असावं असं वाटलं. पण आज ते गंभीर चेहऱ्याने आपसांत काहीतरी कुजबुजत होते. त्या कुजबुजण्याकडे फार लक्ष देण्याच्या मूडमधे मी नव्हतो. मी सकाळची शिफ्ट सांभाळणाऱ्या मार्गारेट नावाच्या सु-शेफला केबिनमधे बोलावलं. तिच्याकडून मी त्या दिवशीचे सर्व कामकाज नीट चाललं आहे ना याची खात्री करून घेतली आणि तिला जायला सांगितलं. आता रेस्टॉरंटमधे ब्रेकफास्ट करून घरी पळण्याचा माझा विचार होता. झोप न झाल्यामुळे माझंही डोकं जरा जड झालं होतं. पण मार्गारेट अजून केबिनच्या दरवाजातच घुटमळत होती. तिला मला काहीतरी सांगायचं होतं.
“मार्गारेट, तुला काही सांगायचं आहे का?’’ मीच विचारलं.
“शेफ, काल रात्रीचा प्रसंग तुम्हांला माहीत आहे का?’’
शेवटी थोडंसं अवघडूनच मार्गारेटने ती धक्कादायक बातमी सांगितली. आदल्या दिवशीच्या पार्टीनंतर घरी जाताना जॉर्जच्या गाडीत तो आणि मेरीव्यतिरिक्त हॉटेलमधलीच अजून एक मुलगी होती. जॉर्ज आणि मेरी हॉटेलजवळच असलेल्या न्याली गावात राहत असत. त्यांच्या घरी जाताना मुख्य रस्ता सोडून आतमधे साधारण एकदीड किलोमीटरचा कच्चा रस्ता लागत असे. त्या वळणावर त्याची गाडी दरोडेखोरांनी काहीतरी अडसर लावून थांबवली. त्यांच्याकडे बंदूक असल्यामुळे जॉर्ज काही करू शकला नाही. जॉर्जला त्या लोकांनी बेदम मारून बेशुद्ध पाडलं आणि मेरी व त्या दुसऱ्या मुलीला घेऊन ते पसार झाले. त्या दोघींवर बलात्कार करून त्यांना मलिंदी रोडवर मटवापा नावाच्या गावाजवळ सोडून ते पसार झाले होते. मार्गरेटलाही अधिक माहिती नव्हती. मेरीच्याच गावातला एक मुलगा सकाळी कामावर आला. त्याने ही बातमी आणली होती. हे ऐकून मी थंड झालो. पोटात एक मोठ्ठा गोळा आल्यासारखं झालं मला. मी बलात्काराच्या बातम्या पेपरात आणि आता टेलिव्हिजनवर पाहिल्या आहेत. त्यानंतर होणारा सगळा सामाजिक आक्रोशही पाहिला आहे. आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्यावर उद्वेगपूर्ण चर्चा करतानाही पाहिलं आहे. पण आपल्या एका प्रिय अशा मैत्रिणीवर, जी गेले काही महिने आपल्यापाठी आधार बनून उभी होती, तिच्यावर हा प्रसंग येतो. मी मनातून हादरलो होतो. आता यानंतर मी कसं वागलं पाहिजे? नक्की काय केलं पाहिजे? काही कळतच नव्हतं. तसं विशेष काही करणं शक्य होतं असं नाही. पण जाऊन जॉर्जला आणि मेरीला भेटायला तर पाहिजे असं एकदा वाटलं. पण सकाळच्या मीटिंगमधे श्री. क्लोहेंनी दिलेली सूचना मला कळली. ‘अजून एकदोन दिवस तरी त्यांना भेटायला कोणी जाऊ नये. एच. आर. मॅनेजर तिथे जात आहेत. आत्ता तिथे पोलीस वगैरेंचा गोंधळ देखील बराच असेल. वैद्यकीय किंवा इतर कुठल्याही मदतीची मेरीला आणि त्या मुलीला आवश्यकता असेल ती हॉटेलतर्फे पुरवण्यात येईल.’ अशा वेळी कदाचित मेरीला एकान्ताचीच जास्त आवश्यकता असेल. मी गेलो नाही.
पुढचे दोनतीन दिवस मी फक्त स्वतःला समजावण्याच्या निष्फळ प्रयत्नांत होतो. कामात राहिलो गुंतून तर कदाचित बरं वाटेल, आपल्या डोक्यातून हा विषय जाईल असं वाटल्याने मी स्वतःला कामात बुडवून घेतलं. हॉटेलमधलं वातावरणही थोडंसं उदासच होतं. पण ही घटना कुठल्याही गेस्टला कळू द्यायची नाही अशी सूचना हॉटेलतर्फे सर्व कामगारांना देण्यात आली होती. मग मी केबिनमधे बसून सहकाऱ्यांना कामाच्या सूचना देण्याऐवजी थेट किचनमधे शिरून त्यांच्याबरोबर काम करणं सुरू केलं. त्याचा थोडाफार उपयोग झाला. पण काम संपल्यावर पुन्हा तेच विचार डोक्यात येत होते. रात्री स्वस्थ झोप लागणं तर शक्यच नव्हतं. घरी पद्माला माझा अस्वस्थपणा जाणवला असावा. तिने पुन्हा पुन्हा कामावर काही अडचण आहे का ते विचारलं. परंतु ती आणि सौमिल मोंबासात अजून पुरते रुळले नव्हते. इथल्या नवीन वातावरणाची भीती त्यांच्या मनातून पूर्णपणे गेली नव्हती. अशा स्थितीत मी त्यांना ही घटना ऐकवली तर त्यांच्या मनातली आफ्रिकेबद्दलची भीती अजून वाढेल असं वाटलं. डोक्यात असंख्य शंका घोंगावत होत्या. मेरीच्या आजाराबद्दल मला कालच कळलं होतं आणि आता त्यावर कळस म्हणजे ही घटना. या घटनेचा दोष स्वतःकडे घेण्याचाही प्रकार मनातल्या मनात घडला. काल जर मी त्या एच. आय. व्ही.ने वारलेल्या मुलीचा विषय काढला नसता तर? कारण त्या विषयामुळे तिच्या आजाराचा विषय निघाला, ती अस्वस्थ झाली आणि मग घरी निघून जाण्याचा निर्णय तिने आणि जॉर्जने घेतला. तो विषयच निघाला नसता तर कदाचित ती दोघं अजून बराच वेळ गप्पा मारत बसली असती. मी चरकलो. पण ह्या जर-तरला काही अर्थ नाही हेही स्वतःला समजावायचा प्रयत्न करत होतो. अशाच स्थितीत तीनचार दिवस गेले. खरं तर बाकी सगळं नेहमीप्रमाणे सुरळीत चालू होतं हॉटेलमधे. सकाळी केबिनमधे मला कॉफीही मिळत होती पण ती बेचव लागायची कारण मेरीच्या बाबतीत जे काही घडलं होतं ते...
त्या दिवशी मला सकाळी कॉफी पिण्यासाठी केबिनमधे एकट्याने बसणं नको वाटलं म्हणून मी किचनमधे जाऊन एका शेफबरोबर त्या दिवशीच्या लंच मेनूसंबंधी चर्चा सुरू केली. किचनमधलं वातावरण आता थोडंफार निवळू लागलं होतं. शेफ आणि वेटर आपसांत कधी बाचाबाची तर कधी थट्टामस्करी करू लागले होते. पण प्रयत्न करूनदेखील मी त्या थट्टामस्करीत फार रमत नव्हतो. काही वेळानंतर डायनिंग हॉलमधील एक वेटर माझ्याजवळ आली आणि माझी कॉफी तिने केबिनमधे ठेवल्याचं मला सांगितलं. त्रासिकपणे तिला मी कॉफी इथे किचनमधेच घेणार आहे असं सांगणार त्याआधीच ती म्हणाली, “म्टु एना टाका कुवा कहावा ना वेवे.’’ (तुमच्याबरोबर कोणीतरी कॉफी प्यायला येत आहे.) मला तिच्या बोलण्याचं फारसं आकलन झालं नाही. त्यादिवशी मला कोणीच भेटायला येणार नव्हतं. तरी मी केबिनच्या दिशेने चालायला लागलो. किचन आणि डायनिंग हॉलला जोडणारा एक व्हरांडा होता. त्या व्हरांड्याच्या दरवाजासमोरच माझी केबिन होती. कोणीही किचनमधे आला तर केबिनमधून प्रथम माझ्या नजरेत येई. मी केबिनमधे शिरता शिरता माझी नजर त्या व्हरांड्यात गेली, तर मेरी समोर! तिने हॉटेलचा गणवेश घातला होता. ती जरी माझ्याच केबिनकडे चालत येत असली तरी वाटेतले सगळे जण त्यांच्या नेहमीच्या सवयीनुसार दोन्ही हात वर करून तिला टाळी देऊन तिचं स्वागत करत होते, कोणी तिची चौकशी करत होते. मधेच कोणी तिला सैलसर आलिंगन देत होतं. ही टाळी किंवा आलिंगन देताना त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी दिसणारं हास्य आणि उत्साह नव्हता, पण टाळी देताना ते ‘पोले साना’ म्हणून झालेल्या प्रसंगाबद्दल दुःख व्यक्त करत होते. एका मुलीवर बलात्कार होतो. तीनचार दिवसांतच ती मुलगी कामावर हजर होते आणि तिचे सर्व सहकारी तिचं स्वागत करतात. ‘तू आमच्यापैकीच एक आहेस आणि आम्ही तुझ्या बरोबर आहोत’ अशी जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतात. कामावर येताना त्या मुलीला कुठल्याही प्रकारची लाज वाटत नाही, स्वतः काही गुन्हा केल्याची भावना तिच्या चेहऱ्यावर नाही. हे एक अलौकिक दृश्य होतं. हे असं घडू शकतं यावर विश्वासच बसेना. मी तर या देशाला मागासलेला समजत होतो. मलाच या गोष्टीबद्दल अपराधी वाटू लागलं. सर्व सहकाऱ्यांच्या भावना स्वीकारून मेरी माझ्या दिशेने येत होती.
पण तिला भेटायची माझीच तशी मानसिक तयारी नव्हती. आता आपण तिच्याशी काय बोलणार आहोत? मेरीला होत असलेल्या वेदनांचा मला अंदाजच येत नव्हता. ज्या स्त्रीवर अशी वेळ आली आहे तिला कशा प्रकारच्या वेदना अनुभवायला लागत असतील? बलात्कार या विषयावर चर्चा मी ऐकल्या होत्या, त्यात कधीतरी भागही घेतला होता. पण या चर्चा करणाऱ्या माणसांना त्या स्त्रीच्या वेदनांचा अंदाज असतो का? अशी व्यक्ती समोर आल्यानंतर त्या व्यक्तीला आपण कसं सामोरं गेलं पाहिजे? अशा परिस्थितीत तिच्या माझ्याकडून नक्की कुठल्या प्रकारच्या अपेक्षा असतील? तिच्या मनात आत्ता नक्की काय विचार असतील? तिच्या मनात समस्त पुरुषांबद्दल काही अढी असेल का? मी पुरुष असल्यामुळे ती माझा तिरस्कार करेल का? मला पुरुष असल्याची लाज वाटली पाहिजे का? -अशा या प्रश्नांनी मात्र मी जरासा मनातून घाबरलो. एक पुरुष म्हणून मी तिला कसं सामोरं जाणार होतो? खरं तर या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नव्हती. पण मला पुरुष असल्याची लाज मात्र वाटली नाही. हे कृत्य करणारी माणसं जरी पुरुष असली तरी दुसऱ्याच्या वाईट कृत्याचं लांछन मी माझ्यावर घ्यायचं काहीच कारण नव्हतं. मला जर पुरुष म्हणून लाज वाटली असती तर तिच्याबरोबर या प्रसंगातही खंबीरपणे उभा राहणारा जॉर्जही पुरुषच होता की! आणि आज मनापासून तिला आपल्यातली मानून तिच्या पाठी उभ्या राहणाऱ्यांतही बरेच पुरुष होतेच की! मी मनाची समजूत घालत होतो. आपण जसे आहोत तसेच भेटू तिला, मी ठरवलं. एव्हाना मेरी माझ्याजवळ पोहोचलीसुद्धा आणि नेहमीप्रमाणे आपले हात टाळी देण्यासाठी वर केले. मी माझ्या नकळतच माझे हात वर करून टाळी दिली. आज मात्र तिने माझ्या गळ्याभोवती हात टाकून मला अगदी सैलसर मिठी मारली आणि तशीच तिथे ती जराशी विसावली. मी तिच्या कानात ‘पोले साना मामा’ असं म्हणून दुःख व्यक्त केलं. काही क्षणांनंतर तिच्या मिठीतून स्वतःला मोकळं केलं आणि केबिनचा दरवाजा तिच्यासाठी उघडला. ती आत शिरली आणि माझ्या टेबलाच्या बाजूला असलेल्या एका खुर्चीवर बसली. त्यानंतर बराच वेळ आम्ही गप्पच होतो. काही वेळानंतर तिने कप उचलून कॉफीचा घोट घेतला. तिच्याशी काही बोलायचं धैर्य मात्र माझ्यात नव्हतं. काय विचारणार होतो मी तिला? पण मला ती शांतताही सहन होत नव्हती.
“जॉर्ज कसा आहे?’’ मला जॉर्जबद्दल काळजी होतीच. त्याने हे सर्व कसं घेतलं असेल? पण आत्ता मात्र मी हा विषय काहीतरी बोलायचं म्हणून कसंबसं विचारलं.
“तो ठीक आहे. दुखावलेला आहे. क्वा हसिरा या म्वेनेवे लाकिनी सावा.’’( स्वतःवर रागावलेला आहे पण ठीक आहे.) ती अगदी क्षीण आवाजात म्हणाली. ती थकली होती, चेहऱ्यावर झालेल्या जखमा दिसत होत्या पण मला अप्रूप वाटलं ते या गोष्टीचं की ती नेहमीप्रमाणेच माझ्या डोळ्यांत डोळे घालून बोलत होती. त्यामधे मला कुठेही अपराधीपणाची भावना दिसत नव्हती. “त्याला फार वाईट तऱ्हेने मारलं त्यांनी. लोखंडी कांबानी बदडलं त्याला. बास्टर्ड्स!’’ मेरी जळजळीत स्वरात म्हणाली.
नंतर थोडा वेळ ती स्तब्ध झाली. येणारे अपशब्द गिळले असतील तिने कदाचित. कारण नंतर ती थोड्या शांत स्वरात म्हणाली,“त्यानेही आजपासून काम करायला सुरवात केली आहे. निदान तसा प्रयत्न तरी करणार आहे तो.’’
तिच्यातला एक फरक मला जाणवला. आज ती मनगटावर असलेलं इन्फेक्शन बाहीने लपवायचा प्रयत्न करत नव्हती. बेदरकारपणे तिने अख्खा हात उघडाच ठेवला होता. तिला आता काहीच लपवायची गरज वाटत नव्हती. सगळंच तर उघडं पडलं होतं! त्यानंतर बराच वेळ केबिनमधे शांतताच होती. काहीतरी बोलायचं म्हणून मीच संवाद सुरू केला. “मेरी, तू कामावर कां आलीस? अजून थोडा आराम करायचा ना. उकेन्गालिया उमेचोका, वेवे नी कुमिया विबाया साना.’’ (तू खूप दमलेली दिसतेस. आणि तुला लागलंयही किती.)
ती इकडेतिकडे बघू लागली. “शेफ, वाटु मस्किनी हावाना वेझो कुपुम्झिका न्युम्बानी.’’ (गरिबांना घरी आराम करणं परवडत नाही शेफ.) ह्या तिच्या बोलण्यामधे भरपूर कडवटपणा भरला होता. कदाचित माझ्या बोलण्यात तिच्याविषयी दया डोकावली होती. ती आवडली नसावी तिला. प्रथमच मी तिला माझ्या डोळ्यांत न बघता बोलताना पाहिलं. या एका बाबतीत ती बाकी सर्व केनयन लोकांपेक्षा वेगळी होती. अगदी जॉर्जपेक्षासुद्धा.
आणि अचानकच ती माझ्यावर ओरडली, “शेफ, व्हॉट हॅपन्ड दॅट डे वॉज फोर्स्ड सेक्स. बट अॅट होम जॉर्ज फक्स मी एव्हरी अदर डे. इट इज ऑलसो अ फॉर्म ऑफ सेक्स. व्हॉट डू यु एक्सपेक्ट मी टू डू देन. स्टे अॅट होम? हू विल अर्न फॉर माय किड्स फ्युचर अॅन्ड एज्युकेशन? आय कांन्ट अफोर्ड इट फ्रेन्ड.’’
आज प्रथमच ती माझ्यावर अशी ओरडत होती. तिच्या आवाजातला आक्रोश मला जाणवत होता. नजर मात्र होती केबिनच्या छताकडे. ती रडत नसली तरी तिचे डोळे निश्चित पाणावले होते आणि ते लपवण्याचा ती प्रयत्न करत नव्हती. मी तिला समजू शकत होतो, तिचा तो आक्रोश सहनही करू शकत होतो पण पाणावलेले डोळे मला बघवत नव्हते. केबिनमधे काय चाललं आहे हे बाहेरील लोकांना दिसत होतं. त्यांना माझ्या आणि मेरीच्या मैत्रीबद्दल कल्पना असल्यामुळे आश्चर्य वाटलं नसावं. पण मी मात्र त्यांच्या नजरांनी अस्वस्थ झालो. मेरीला या गोष्टींची चिंता नव्हती. या पूर्वी जेव्हा जेव्हा आमच्यात काही कडू विषयावर चर्चा व्हायची तेव्हा ती केबिनमधून पळून जात असे. पण आज मात्र ती तिथेच बसून होती. तिला कदाचित कोणाशी तरी बोलायचं होतं, मन मोकळं करायचं होतं. कोणावर तरी राग काढायचा होता. तो तिने माझ्यावर काढला. त्यानंतर किती वेळ असाच गेला माहीत नाही पण इतक्या वेळात आम्ही दोघांनी कॉफीचा घोटही घेतला नव्हता. मला माझं काम तर करायलाच हवं होतं. मी तिला तिथे एकटीलाच सोडून एकदोनदा डायनिंग हॉल आणि रेस्टॉरंटमधे फेरी मारून आलो. पण मेरी तिथेच होती. मी माझ्या टेबलवरची कागदपत्रं लावून घेतली. इतरही काही बैठी कामं उरकून घेतली. रोज सकाळी ब्रेकफास्टनंतर माझी स्टाफबरोबर मीटिंग असे. तीही आज मी केबिनमधे न घेता किचनमधे उभ्याउभ्याच घेतली. मेरीला कदाचित वेळेचं आणि आजूबाजूचं भानच नव्हतं. ती एका ट्रान्समधे गेली असावी. लंचची वेळ झाल्यावर मला बुफे तपासायला डायनिंग हॉलमधे जाणं आवश्यक होतं. तिचा खांदा मी हाताने हळूच दाबून मूकपणे निरोप घेतला. गेस्ट यायला सुरुवात झाली होती. त्यापैकी काहींशी गप्पा मारून, त्यांच्या सूचना, प्रतिक्रिया घेऊन, आपल्या स्टाफला नीट सूचना देऊन मी किचनमधे परतलो तेव्हा मेरी केबिनमधे नव्हती. बहुधा ती घरी निघून गेली असावी.
आपल्या मनातलं बोलून तिला हलकं वाटलं असावं. तिला मन मोकळं करायला घरी कोणी होतं की नाही माहीत नाही. मुलांशी ती बोलू शकत नव्हती. जॉर्जशी बोलू शकली असती पण तो स्वतःच हादरलेला असणार. तिचे इतर कोण मित्र-मैत्रिणी होते की नाही याची मला काहीच कल्पना नव्हती. माझ्यावर ओरडून तिला कोणावर तरी तिचा राग काढता आला होता. तिच्याबरोबर झालेल्या ह्या भेटीने माझ्या मनावरचा भार मात्र निश्चित कमी झाला होता.
तो दिवस तसा कामातच गेला. या गेल्या तीनचार दिवसांत भरपूर पेपरवर्क बाकी राहिलं होतं ते मी संपवून घेतलं. दुसऱ्या दिवशी मी माझी सकाळची फेरी संपवली. ब्रेकफास्टची सर्व्हीस वगैरे व्यवस्थित चालली आहे याची खात्री करून घेतली आणि माझ्या केबिनमधे आलो. त्या दिवशीचा रात्रीचा मेनू मी लिहायला घेतला. तर केबिनच्या दारावर टकटक झाली. मेरी माझी कॉफी घेऊन आली होती. तिला पाहून मी अवाक झालो. कारण तिच्या चेहऱ्यावर तिचं तेच हास्य परतलं होतं चेहरा दमलेला, आजारी वाटत होता, झालेल्या जखमांच्या खुणा ताज्या होत्या पण स्मितहास्यामुळे चेहरा फ्रेश दिसत होता.
“शेफी, पोले साना क्वा जाना. युवर कॉफी.’’ (शेफी, कालच्या वर्तनासाठी मी क्षमा मागते. तुझ्यासाठी कॉफी.)
“असांते साना.’’ (धन्यवाद.) मला तू अशीच आवडतेस. चेहऱ्यावर हसू असलं की तू छान दिसतेस.’’ मी मनापासून बोललो. त्या दिवशी दहाएक मिनिटे अवांतर गप्पा मारून ती केबिनमधून निघून गेली. दिवसभर आम्ही दोघंही आपापल्या कामांत व्यस्त होतो. अधूनमधून मला मेरी दिसत होती, गेस्टशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करत होती. या प्रसंगातही आनंदी राहण्याच्या तिच्या या प्रयत्नांचं मला मनात खरोखर कौतुक वाटत होतं.
हॉटेलमधले सर्व कार्यक्रम पुन्हा सुरळीत चालू झाले तसेच आमच्या दोघांच्या दिवसातून एकदोनदा होणाऱ्या गप्पासुद्धा. त्या अगदी वेगवेगळ्याच विषयांवर असत. आम्ही नुसत्या केनयातीलच नाही तर युगांडा, टांझानिया वगैरे आजूबाजूच्या देशांतील खाण्याबद्दल बोललो. आमच्या बोलण्यात निरनिराळे वन्य प्राणी तर आलेच, पण तिच्या गावाच्या बाजूला असलेल्या लेक व्हिक्टोरियातील मासेसुद्धा आले. मला जरी फार इंटरेस्ट नसला तरी केनयातील बायकांच्या कपडे, दागिने किंवा केशरचनांच्या फॅशन तिच्याकडून मी न कंटाळता ऐकल्या. आफ्रिकेतील वेगवेगळ्या जमातींच्या रुढी मला तिच्याकडूनच कळल्या. केनयात तीसहून अधिक भाषा आहेत पण लिपी मात्र एकही नाही ही माहितीही मला या गप्पांतच मिळाली. इंग्रजी आणि स्वाहिली एकत्र मिसळून बोलायची मेरी. तोपर्यंत थोडीफार स्वाहिली मीही बोलायला लागलो होतो तरी तिच्या बोलण्यातील काही गोष्टी मला कळत नसत. मी त्याचा अर्थ विचारला की तिला आपली चूक लक्षात येई आणि मग इंग्रजीत मला अर्थ सांगे. आजही त्या गप्पा मारतानाचे प्रसंग कधीकधी डोळ्यांसमोर येतात. आताशा तिचं आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं होतं. दर आठवड्याला एकदा तरी ती आजारी पडायची. गैरहजर राहायची. पुन्हा एकदोन दिवसांनी परत कामावर यायची. पण ह्या मध्यांतरांचा कालावधी वाढतच गेला आणि काही दिवसांनी ती कामावर यायचीच बंद झाली.
आपण तिच्या घरी जाऊन यावे का हा विचार मनात यायला लागला. तिच्या घराजवळ राहणाऱ्या कोणाजवळ तरी मी चौकशी करत असे. त्यांचं उत्तर ठरलेलं असे. “येये नी म्गोज्वा साना. मलेरिया.’’ (ती खूप आजारी आहे. मलेरिया.) कुठल्याही आजाराला मलेरिया म्हणणं किंवा आजाराचं नाव लपवायला मलेरिया झाला आहे म्हणून सांगणं ह्याची मला सवय झाली होती. आता पुढच्या सुट्टीच्या दिवशी तिच्या घरी नक्की जाऊन यायचं हे मनात ठरवलं. त्या दिवशी दुपारी माझ्या केबिनच्या दारावर हाऊसकीपींगमधे काम करणाऱ्या एका मुलीने टकटक केलं. तिच्या चेहऱ्यात, अंगयष्टीत काहीतरी मेरीशी साम्य होतं. म्हणाली, “माझे नाव मरियम. मेरीची मी बहीण! माझं घर तिच्याच घराच्या जवळ आहे. जॉर्जने तुम्हांला सांगितलं आहे की मेरीची तब्येत खूप ढासळली आहे. तिला हॉस्पिटलमधे ठेवण्यात आलं आहे.’’ तिने एक कागदाची चिठ्ठी माझ्यासमोर ठेवली. कुठल्या तरी मिशनरी हॉस्पिटलचं नाव-पत्ता होता त्या चिटोऱ्यावर. मेरी माझी मधूनमधून आठवण काढत असल्याचंही तिने मला सांगितलं.
सुट्टीच्या दिवशी तिच्या घरी जाण्याचा बेत बदलून त्याच दिवशी दुपारी हॉटेलमधून घरी जाताना हॉस्पिटलमधे डोकावून यायचं मी ठरवलं. हॉस्पिटल जेमतेमच होतं. पण स्वच्छ होतं. एका मोठ्या हॉलमधे तीन सरळ रेषांमधे लोखंडी खाटा आणि त्यावर अगदी पातळ गाद्या घातल्या होत्या. वॉर्डच्या अगदी दुसऱ्या टोकाला जॉर्ज मेरीच्या खाटेजवळ एकटाच बसला होता. वरती कुठेतरी शून्यात नजर होती त्याची. मी तिच्या खाटेजवळ जाताच जॉर्ज उभा राहिला. बळेबळेच हसायचा प्रयत्न करून त्याने माझे आभार मानले. मी त्याचे दोन्ही हात हातात घेतले. हस्तांदोलन करताना त्याच्या हातात नेहमीची ताकद जाणवली नाही. एरवी भेटला की आम्ही एवढ्या गप्पा मारायचो पण आज मात्र बोलावंसं वाटलं नाही. मेरीच्या खाटेच्या कोपऱ्यावर मी बसलो. तिच्याकडे बघितलं. खरं तर तिच्या चेहऱ्याकडे बघवत नव्हतं. खूप बारीक आणि अशक्त दिसत होती ती. ऑक्सिजनचा सिलेंडर बाजूलाच पडला होता. तिला श्वास घ्यायला खूप त्रास होत असावा. म्हणून श्वास घ्यायचा मास्क तिला लावला होता. कोणतीही खोटी केशरचना केली नसल्याने मी पहिल्यांदाच तिचे खरे केस पाहिले. अगदी आखूड, कुरळे, राठ केस होते तिचे. कदाचित आजारपणामुळे देखील झाले असतील. तिचे डोळे आता खोल जाऊ लागले होते आणि वाईट गोष्ट म्हणजे त्यातले भाव हरवायला सुरवात झाली होती. माझ्याकडे तिने बघितलं. मी तिचा हात हातात घेतला. हातात शक्ती नव्हती तिच्या. पण तिने माझ्याकडे बघून हसायचा प्रयत्न केला. थोडा वेळ मी तिथे बसलो. काहीही न बोलता. तिच्यात बोलण्याची ताकदच नव्हती आणि मला बोलायची इच्छा नव्हती.
जॉर्जशी मी थोडा वेळ बोललो. लक्षात आलं की त्याचीही तारेवरची कसरत चालली आहे. मुलांचं करून मग टॅक्सी चालवायला तो बाहेर पडे. मधेच वेळ मिळाला की हॉस्पिटलमधे येऊन मेरीच्या शेजारी थोडा वेळ बसून पुन्हा सटके आपल्या कामांसाठी. मेरीचे शब्द पुन्हा आठवले. “गरिबांना आराम करणं परवडत नाही मित्रा!’’ काही मदत लागली तर सांग असं जॉर्जला सांगून मी तिथून निघालो. तसं आता आम्ही कोणीही काही करू शकू असं बाकी राहिलं नव्हतंच. जितका काळ ती जगेल तितका काळ तिला मधूनमधून भेटणं. जमेल तेव्हा हॉटेलमधून तिच्यासाठी फळं किंवा मुलांसाठी काही खाऊ पाठवणं शक्य होतं. हे मात्र मी नित्यानियमाने करत राहिलो. पुढचे सहासात महिने हे असंच चालू होतं. दिवसेंदिवस ती बारीक बारीक होत चालली होती. इतकी की तिला तिच्या बिछान्यात शोधायलाच लागायचं. तिच्या डोळ्यांतून ओळखही गायब झाली होती. त्या अर्थाने तिनं जगणं आता बंदच केलं होतं.
एकदा मी कामात असताना मरीयम पुन्हा माझ्या केबिनमधे येत म्हणाली, “मेरी आता या जगात राहिली नाही. फ्युनरल शुक्रवारी ठेवण्यात आलं आहे.’’ मी तिला ‘पोले साना’ असं म्हणून मला दुःख झाल्याचं सांगितलं आणि शिष्टाचार पाळला. पण मनात फार विचित्र भावना होत्या. नजीकच्या काळातील माझी सर्वांत जवळची मैत्रीण मला सोडून गेली होती. दुःख तर झालं होतंच; पण माझा मोठा आधार गेल्यासारखं वाटलं! मनात त्या वेळेस नक्की काय चाललं होतं हे सांगणं थोडंसं कठीण आहे. फार मोठा धक्का बसला होता असं नाही कारण हे अपेक्षितच होतं. मनावरचा बोजा थोडासा उतरल्यासारखं वाटलं. तिचे कष्ट, वेदना आता संपले होते. मला आश्चर्य वाटलं ते या गोष्टींचं की थोड्या वेळाने एक एक करून माझा प्रत्येक सहकारी माझ्याजवळ आला आणि त्यांनी मला ‘पोले साना’ असं म्हणून त्यांचं दुःख व्यक्त केलं. मी खरंतर मेरीचा कोणीही नव्हतो. ते जसे माझे सहकारी होते तशीच मेरीही. माझी आणि मेरीमधील मैत्री त्यांच्यापासून लपली नव्हती. माझ्या सहकाऱ्यांनी आमच्या मैत्रीची दखल अशा प्रकारे घेतली या गोष्टीचं मला बरं वाटलं.
मी त्याच दिवशी जॉर्जला भेटून आलो. मेरीच्या फ्युनरलला मात्र येऊ शकणार नसल्याचं त्याला सांगितलं. मेरीच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याची ताकद माझ्यात खरोखरच नव्हती.
पुढच्या काही दिवसांत मेरीशिवाय हॉटेलात काम करण्याची सवय झाली पण तिच्याबरोबर मारलेल्या गप्पा, वेगवेगळ्या ठिकाणी चाखलेलं स्वाहिली खाणं, तिच्याकडून कळलेल्या आफ्रिकन चालीरीती, मजेत घालवलेले असंख्य क्षण आजही आठवतात. तिचा जीर्ण झालेला पण तरीही हसण्याचा प्रयत्न करणारा चेहरा, शेवटच्या दिवसांतला अशक्त आणि लाचार झालेला आवाज मला माझ्या आठवणींत आज नको असतो पण कधीतरी तोच डोळ्यांसमोर येत राहतो. पहिल्या महिन्यातच मोंबासातून भारतात परत यायला निघालेला मी, त्यानंतर मोंबासाला तीनहून अधिक वर्षं राहिलो त्यामागे मेरीचं योगदान होतं. तिने मला सुरुवातीला सहकार्य केलं नसतं तर त्या हॉटेलमधे माझा इतके दिवस टिकाव लागला असता की नाही कोणास ठाऊक? तिने मला सहकार्य केलं तेव्हा खरं तर आमची नीट ओळखही नव्हती. माझ्या नवखेपणाचा फायदा घेऊन जेव्हा किचनमधील माणसं माझ्याशी खेळ खेळण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा इतर बरेच जण माझी खिल्ली उडवत. तसं तीही करू शकली असती. मग तिने मला मदत का केली? त्या माझ्या प्रश्नावर ती मला म्हणाली होती, “शेफ, आपली मैत्री होऊ शकली कारण तू माझा आदर केलास आणि तुझ्या वागण्यात आणि डोळ्यांत मला आफ्रिकन लोकांविषयी दूषित पूर्वग्रह दिसला नाही.’’ कदाचित खरंही असेल हे. पण आफ्रिकेतील माझ्या वास्तव्यातून मी ज्या काही चांगल्या आठवणी परत घेऊन आलो त्यांचा मेरी हा एक अविभाज्य भाग होती. मेरी खरं तर आधी माझी कोणीच नव्हती. आमची ओळख झाली आणि त्याचं रूपांतर मैत्रीत कधी झालं ते कळलंच नाही. आम्ही मैत्रीच्या रूपाने एकत्र घालवलेला काळ जेमतेम दीड वर्षाचा. त्यातलाही बराच वेळ आम्ही कामाच्या ठिकाणीच भेटलो. पण त्या थोड्याशा काळातही मेरी मला आयुष्यासाठी खूप देऊन गेली.
केनयात जे भारतीय नशीब अजमावायला जातात, ते तसे आपल्या लोकांच्या वर्तुळातच वावरतात. आफ्रिकन लोकांबरोबर ते जास्त मिसळत नाहीत. आफ्रिकन लोकांविषयी असलेले त्यांचे पूर्वग्रह हे या मागचं मुख्य कारण. एक तर स्थानिक लोक आपल्यापेक्षा वेगळे दिसतात. त्यात चोरीमारीच्या घटना एवढ्या घडत की तिथे राहणाऱ्या सर्व भारतीयांना स्थानिक आफ्रिकन लोकांची भीतीच वाटते. मेरी गेल्यानंतरही मी बराच काळ मोंबासात राहिलो. आफ्रिकन लोकांकडे बघायची माझी दृष्टी मात्र तिथे असलेल्या भारतीय लोकांपेक्षा नेहमीच फार वेगळी राहिली. त्या लोकांना इतरांसारखं चोर, दरोडेखोर मानण्याची किंवा त्याच्या मागे तसं संबोधण्याची मला इच्छाच झाली नाही. कारण त्यांच्या वागण्यामागचे तर्क मला मेरीच्या दृष्टीतून पाहायची सवय झाली होती.
काही दिवसांनी मेरीशिवायही सकाळची कॉफी पिण्याची सवय लागली. ग्रुपच्या मोंबासातील हॉटेलबरोबर इतर हॉटेलच्या कामांतही मी व्यग्र झालो. कामाव्यतिरिक्तही बरेच मित्र झाले. काही स्थानिक, काही भारतीय. त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमांत मी गुंतलो. मधूनच कधीतरी जॉर्जशी भेट होत असे. हळूहळू आमच्या भेटीतलं अंतर वाढत गेलं. दिवस पटकन उडून जातात. म्हणता म्हणता पुन्हा डिसेंबर उजाडला. पुन्हा स्टाफ पार्टीची वेळ झाली. या वेळी मी हॉटेलला, इकडच्या लोकांना सरावलेला होतो. पार्टीचा कार्यक्रम म्हणजे गेल्या वर्षीचीच पुनरावृत्ती होती. फक्त फरक इतकाच होता की मी माझ्या सहकाऱ्यांत पूर्ण मिसळून गेलो होतो आणि ते होण्याला कारणीभूत असणारी मेरी मात्र नव्हती. सर्व सहकारी गेल्या वर्षीसारखेच धुंद होऊन नाचत होते. मीही गेल्या वर्षीसारखाच बाजूला एका खुर्चीवर बसून बियरचा आनंद घेत होतो. अचानक त्या गर्दीत मला जॉर्ज दिसला. थोडं आश्चर्य वाटलं. आला असेल कोणाबरोबर तरी, मी फार विचार केला नाही. पण थोड्या वेळाने आपल्या जोडीदारासोबत त्याला माझ्या दिशेने येताना पाहिलं. मी उठून उभा राहिलो आणि त्याला अभिवादन केलं. त्याच्या जोडीदाराकडे माझी नजर गेली तर चेहरा ओळखीचा वाटला.
“हाय शेफ, मी मरीयम, मेरीची बहीण. जॉर्ज डान्सला माझ्यासमवेत आला आहे.’’ ती हसत म्हणाली आणि मेरीप्रमाणे टाळी द्यायला हात वर केले. मेरीला हॉस्पिटलमधे ठेवल्याचं आणि नंतर मेरी गेल्याचं सांगायला हीच आली होती.
“आम्ही आता एकत्र राहायला लागलो आहोत.’’ जॉर्जने मला हसत माहिती पुरवली.
“जेव्हा पुरेसे पैसे असतील तेव्हा लग्न करू. आमच्याकडे दुसरा पर्यायच नाही. मुलांच्या भविष्याचा विचार करायला हवा.’’ त्याने थोडंसं ओशाळून हळूच माझ्या कानात सांगितलं.
मी फक्त जॉर्जच्या खांद्यावर हसत थोपटलं आणि म्हणालो, “रफीकी, वेवे उनाटाका किला ला हेरी. कुफुराही चामा.’’ (मित्रा, तुमच्या भविष्याला मनःपूर्वक शुभेच्छा. पार्टीत मजा करा.) मला माझ्या धेडगुजरी स्वाहिलीचा थोडासा अभिमान वाटला. जॉर्जने मला नेहमीप्रमाणे टाळी दिली आणि ते दोघे बारच्या दिशेने निघून गेले.
पाठून मरीयम हुबेहुब मेरीसारखीच दिसत होती.
( हा ललितलेख मौज - 2017च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला होता. लेखासोबतची चित्रे विनायक सुतार यांची आहेत. )
श्रीरंग भागवत
मौज प्रकाशनाच्या भागवत परिवारात जन्म झालेले श्रीरंग भागवत व्यवसायाने शेफ आहेत. जवळ जवळ चाळीस वर्षांच्या व्यावसायिक आयुष्यात त्यांनी भारतात आणि परदेशात अनेक ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे. या भटकंतीच्या दरम्यान देशविदेशातील विविध माणसांसोबत संवादाचा त्यांनी आनंद घेतला. त्याबरोबर तिकडच्या अनेक ज्ञातअज्ञात खाद्यसंस्कृती, त्यांचा इतिहास, निराळ्या खाद्यसाहित्याची माहिती, त्याच्या उपयोगामागचे नैसर्गिक, सामाजिक आणि वैयक्तिक तर्क याबाबतचे त्यांच्याजवळ जमा झालेलं ज्ञान ह्या अनुभवांच्या शिदोरीच्या भरवशावर त्यांनी अलिकडेच (तीन वर्षांपूवी) लिहायला सुरुवात केली आहे.
खूपच सुंदर लिहिलं आहे
ReplyDeleteत्याचबरोबर खूप प्रेरणादायी
मनापासून धन्यवाद
आणि असेच आणखी अनुभव लिहिण्यासाठी शुभेच्छा
धन्यवाद!
ReplyDeleteश्रीरंग भागवत