स्वयंपाक माझ्या नावडीचा


मला आठवतंय लहानपणी भातुकली खेळताना खूप आवडीने स्वयंपाक करायची. पण जेव्हापासून नीट कळतंय तेव्हापासून स्वयंपाक करणं फारसं आवडलं नाही. मला वाटतं त्याला माझं बालपण जबाबदार असेल कदाचित. मी लहान असताना माझी आजी मी उठायच्या आधी आंघोळ करून स्वयंपाकाला सुरुवात करायची, नंतर सगळ्यांना म्हणजे पुरुष मंडळींना सोवळं नेसून वाढायची. सोवळं एक वाजता सुटायचं आणि मग जेवायची. तेव्हा काही कळायचं नाही, पण ते बघून वाईट मात्र वाटायचं आणि एवढी मेहनत करून जेवणारे पुरुष खूश असतील याची खात्री नाही आणि स्वयंपाक करताना तिला चव बघायची मुभा नव्हती. त्यामुळे कधी मीठ कमी-जास्त झालं तर बोलणी खायला लागायची म्हणजे एवढी मेहनत करून कणभरही कौतुक नसायचं.

तसंच आईचं पण होतं. आई तर बाबांबरोबर रेडिओ दुरूस्तीचं दुकान सांभाळायची, पण सगळा स्वयंपाक तीच करायची. रात्री दुकानातून घरी येऊ ती बाबांनी सांगितलेला स्वयंपाक करायची आणि मग सगळ्यांचं जेवून झाल्यावर जेवायची आणि बाबा तिला सतत सूचना द्यायचे एवढी भाजी शिजव, त्यात हे मसाले टाक.. हे सगळं पहात मी मोठी झाले त्यामुळे मला स्वयंपाक कधीच मनापासून करावसा वाटला नाही.
त्यात बोलणीच खावी लागणार असं वाटायचं. जेव्हा लग्न झालं तेव्हा स्वयंपाकाला घरी मावशी होत्या. माझ्या नवऱ्याला मी सांगितलं की मावशींना स्वयंपाक करू दे. असं नाही की मी स्वयंपाक करत नाही, पण खूप गुंतागुंतीच्या पाककृती करायचं तर सोडा पण बघायला देखील आवडत नाही. त्यामुळे माझा पूर्ण दिवसाचा स्वयंपाक एक तासात संपतो. पूर्ण स्वयंपाकाची जबाबदारी घेण्यापेक्षा मला त्यात मदत करायला आवडतं. मी कोणाकडे गेले तर मदत म्हणून नंतरचं आवरायचं काम आवडीने करते. पण स्वयंपाकाची जबाबदारी घ्यायला आवडत नाही.
आता माझा नातू आलाय तो जेव्हा म्हणतो की आजी तुझ्या हातची पाणीपुरी सगळ्या जगात छान असते, तेव्हा आता परत स्वयंपाक करावा असं वाटू लागतं.








अंजली जोशी 

अंजली केमिकल इंजिनीअर आहे. 15 वर्षे ती पुण्यातील एका इंजिनियरिंग कॉलेजमध्ये विभाग प्रमुख म्हणून काम करत होती. नंतर गेल्या पंधरा वर्षांपासून ती प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात काम करीत आहे .
अंजली "पुन्हा स्त्री उवाच " ची सहसंपादक आहे .  

4 Comments

  1. खूप प्रामाणिक लिखाण वाटलं. Very nice.

    ReplyDelete
  2. छोट्याश्या कथेतून माणसाला सतत च्या सुचना सोडून प्रेमाच्या,कौतुकाच्या शाबासकीची,कशी गरज असते ते नीट पोहोचलाय व शेवटच्या ओळींमधून एक प्रेरणा कसा बदक घडवतो ते दिसले. सुंदर.

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिले

    ReplyDelete
  4. खूप छान लिहिले

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form