चव स्वावलंबी स्वयंपाकाची

खरंच, स्वावलंबनात जो आनंद असतो त्याला इतर कशाचीही तोड नाही. नोकरी करून, घर सांभाळताना जेव्हा स्वयंपाकघर आपल्या हातात येतं तेव्हा त्या घराबद्दल आपुलकी, जवळीक, प्रेम आणि जबाबदारीची भावना निर्माण होते हे मी अनुभवलंय. मी जर घरी वेळेत गेले नाही तर आम्ही खाणार कायअशी प्रेमळ काळजी असो, दमून आलेल्या पार्टनरला गरम कॉफी करून देण्याची गोड हुरहूर असो, बायकोने बिनधास्त बाहेर जावं - मी बनवेन ना माझ्यापुरतं - असा विश्वास व्यक्त करून तिला अधिक रिलॅक्स करणं असो. खूप छोटे छोटे पण तरीही आनंद, आत्मविश्वास, प्रेम आणि स्वातंत्र्याची चव असलेले हे क्षण स्वयंपाकघरच सहज मिळवून देत असतं.


तू चहा कसा गाळतेस?” आनंदने फोनवर हॅलो, म्हणण्याच्या आधी हा प्रश्न विचारला. मी त्याला म्हटलं चिमट्याने पातेलं पकडते मग, कपावर ठेवलेल्या गाळणीच्या वरच्या भागावर आपल्या बाजूने अंगठा तर समोरच्या बाजूने पहिलं आणि मधलं बोट येईल अशा पद्धतीने हात ठेवते. मग, पातेलं नेमकं कपावर येतंय का? हे पहिल्या बोटाने हळूच स्पर्श करून पाहते आणि मग, ते तिरकं करून कपात चहा ओतत जाते. कधी कधी चटकेही लागतात पण, आता सरावाने चटक्यांचं प्रमाण खूप कमी झालंय. पण, तू का विचारतोएस?” “मी शिकतोय ना चहा करायला म्हणून. बनवता आला पण, ओतता मात्र आला नाही. असं एखादं भांडं असतं का जे वापरून आपण चहा व्यवस्थित सर्व करू शकतो?”  मीही हसत हसत म्हटलं, हो असतं आणि त्याला वगराळं म्हणतात. लांब दांडा असतो त्याला एका बाजूला छोटासा कप असतो. त्यात चहा भरून तो कपात ओतून घेऊ शकतोस. त्याला एकदम कससंच झालं. नको वाटलं चहात दुसरं भांडं बुडवणं. पण, त्याच्या चौकशीने मात्र मला गंमत वाटली. स्वयंपाक घराशी माझा संबंध कसा आला? कसं जेवण बनवायला मी शिकले आणि त्यात प्रयोग करणं कधी सुरू झालं हे या वगराळ्याने आठवलं.
नवीन लग्न झालं तेव्हा मला नोकरी नव्हती. घरात दिवसभर बसून भरतची वाट पहायची एवढंच काम असायचं. सकाळी लवकर उठून अंघोळ करायची आणि झाडू मारणं, लादी पुसणं, कपडे धुणं ही कामं मी करायचे. खरं तर, अशा कोणत्याच कामाची मला सवय नव्हती. शाळेच्या वसतीगृहात असताना हे सारं करावं लागायचं पण, स्वतःपुरतंच. पहिल्यांदाच चार माणसांची जबाबदारी आणि तीही अशी की, ज्यात सहजासहजी एक्स्क्यूज नसणारी अंगावर पडली होती. मी सुरुवातीला खूप आनंदाने आणि आपलेपणाने सर्व करायचे. पण, स्वयंपाक घरात जायला मात्र मला मज्जाव होता. हे बंधन हळूहळू माझ्या लक्षात येत गेलं. आईंना तिन्ही मुलगेच, त्यातही दोघं दृष्टीहीन. म्हणजे दृष्टीहीन मुलगी स्वयंपाक घरात व्यवस्थित वावरू शकते हे त्यांना पटवून देणं अशक्य होतं. मी किचनकडे जाताना दिसले की, त्या लगबगीने उठून येत आणि मला काय हवंय ते विचारत. मी पाणी म्हटलं की, त्या स्वतः ग्लास अगदी हातात आणून देत. सुरुवातीला यातही मला खूप आनंद वाटायचा. पण मग, हळूहळू लक्षात आलं की, मी स्वयंपाक घरात जाणं आईंना आवडत नाहीये. याचं कारण काय असावं यावर मी विचार करू लागले. त्यांनीही सारखं मी स्वयंपाक घरात जाऊन पाणी घेण्याचा प्रयत्न करते हे पाहून त्यावर तोडगा म्हणून पाण्याची बाटली भरून ठेवायला सुरुवात केली. मी स्पष्टपणे त्यांना काही बोलू शकत नव्हते पण, मनाला या सर्व गोष्टी टोचत होत्या. सारखं माझं घर आठवायचं. जिथे फ्रिज उगाचंच उघडून पप्पांनी खायला काय आणलंय हे मी दिवसातून १२ वेळा तपासायचे. गरम झालं की, फ्रिजची हवा खायला स्वयंपाक घरात जायचे कारण, एसी लावायचा कंटाळा यायचा. भरतकडे सतत भुणभुण करत होतेच. पण, आईंना समजावूनही काही फरक पडत नव्हता.
दरम्यान नोकरी लागली, बाळ झालं पण स्वयंपाकघर काही वावरण्यासाठी खुलं झालं नाही. एकदा सुट्टीच्या दिवशी भरतने मला पोहे करायला सांगितलं. आईला तू किचनमध्ये थांबू नकोस असंही त्याने सांगितलं. पण, त्या आल्याच. मी ओट्यावर हाताने पाहू लागले तर, मला शोधू देण्याआधीच त्यांनी लायटर उचलून माझ्या हातात दिला. मी गॅसच्या बर्नरला हात लावून लायटर तिथे टेकवला खरा! पण, हात भितीने थरथरू लागला. आई हसल्या आणि दाब की गं बटान असं म्हणाल्या. मी आतून रागाने पेटले. अपमान वगैरे काहीतरी डोक्याने घेतलं. तरीही हिंमतीने तिथेच उभी राहिले. बटन घाबरत घाबरत दाबलं आणि गॅस पेटवला. मला वाटलं होतं तेल गरम होण्याचा आवाज येईल पण, थेट तेलात कांदा टोमॅटो शिजतानाचा चर्चर् असा आवाज आला आणि मी आईंना विचारलं की, काय झालं हा असा आवाज? “आगं तुला जमनार न्हाई म्हून मीच कांदा टमाटर आदी घातलंयअसं म्हटल्यावर मी फणकाऱ्याने म्हटलं की, मग आई तुम्हीच करा मी बाबूकडे थांबते. तो दिवस आयुष्यातला निर्णायक दिवस ठरला. आम्ही वेगळा संसार मांडायचा हे पक्कं केलं यामागचं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे हरवलेला विश्वास.
आत्मविश्वास हा एकच प्रकार आहे ज्याच्या बळावर कोणतीही व्यक्ती मग ती अपंग असो वा नसो, ठाम असते, आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून असते, आपल्या पायावर उभी असते. मी तो हरवताना पाहू शकत नव्हते. बरं असंही नव्हतं की, मी त्यापूर्वी कधीच स्वयंपाकघर हाताळलं नव्हतं. मध्यंतरी, गावाला काहीतरी इमर्जन्सी आल्याने आईपप्पांना जावं लागलं होतं. तेव्हा मी नोकरी करत नव्हते. सकाळी लवकर उठून मी भरतला चपाती भाजीचा डब्बाही १०-१२ दिवस दिला होता. 

असं असूनही आईंनी त्या परत आल्यावर माझा किचनमधला वावर पूर्ण बंद केला. तो इतका की, लायटर धरून बर्नरपर्यंत जायलाही घाबरत होते. खरंच, माझ्या आत्मविश्वासाचा बळी मला द्यायचा नाही अशा शब्दात भरतला ठणकावलं आणि जिद्द नसेल तर आपण काहीच नसतो हे स्वानुभवातून समजलेल्या भरतनेही मला ठामपणे पाठिंबा दिला. आम्ही पुढच्या सहा महिन्यातच वेगळं घर घेतलं आणि लग्नानंतर तब्बल दोन वर्षांनी खऱ्या अर्थाने संसार सुरू केला. मी पुन्हा चहा करायला शिकले अगदी नव्याने. भाताला नेमकं किती पाणी घालायचं, किती वेळ त्याला शिजू द्यायचं, कोणत्या प्रकारचं भांडं वापरलं तर तो खाली न लागता व्यवस्थित शिजतो आणि किती वेळाने गॅस बंद करायचा हे मी दोन तीनदा भात करपल्यावर शिकले. भरतने आणि ओजसनेही कच्चंपक्कं अन्न खाल्लंय. माझ्या हातचं खाताना कधीही त्यातली कमतरता उपहासाने त्याने सांगितली नाही. हळूहळू मी अधिक अचूक बनत गेले.
पण, एक प्रसंग सांगते जो आजही अंगावर काटा आणतो. मैत्रीण घरी आली होती म्हणून मी चिकन आणलं होतं. गॅसवर कूकर ठेवला होता कारण, तेव्हा किती वेळ पातेलं गॅसवर ठेवल्याने चिकन शिजतं हे माहीत नव्हतं आणि एका मैत्रिणीने कूकरची मंद आचेवर ठेवून एक शिट्टी घेतली की बास! असं सांगितलं होतं. मी कूकरमध्ये बरच तेल घातलं आणि तेलाचा आवाज येतो का हे कान देऊन ऐकू लागले. वाट पाहिली पण, आवाज काही येईना. म्हणून स्लो होता तो एकदम फास्ट केला गॅस. तर, भक्कन्  आवाज झाला आणि कूकरमधून आगीच्या ज्वाळा बाहेर आल्या. मी भरतला ओरडून समोरच्यांना बोलवायला सांगितलं. त्याला काय झालंय हे कळेच ना. सांगितलंय तेवढं कर लवकर असं किंचाळत मी आधी गॅस बंद केला, मग, खाली वाकून सिलेंडर बंद केला. मग, आठवलं, की, जळत्या कूकरच्या शेजारीच ओट्यावर तेलाचा पाच किलोचा डब्बा आहे, तो उचलून खाली आपटला आणि कूकर थरथरत्या हाताने बेसिनमध्ये नेला. त्यावर पाणी ओतलं तर आणि भडका झाला पण, दुसर्याच क्षणी आग मंदावली. मी पाय लटपटत असतानाही पाणी घालतच राहिले. आग शांत झाली. मग समोरचे आले आणि त्यांनी कूकर काळा कुट्ट पडल्याचं सांगितलं. काय झालं ते मात्र त्यांनी विचारलं नाही आणि मी सांगितलं नाही.
जेव्हा स्वतंत्र रहायला लागलो तेव्हा सकाळच्या डब्ब्यासाठी आम्ही स्वयंपाकीणबाई ठेवल्या. संध्याकाळचं मात्र मीच करायचे. पण, काम करताना सहज व्हावं म्हणून किचनमधलं सारं सामान आम्ही जागा ठरवून ठेवलं. आजही त्या जागा आम्ही बदलत नाही. आई आणि मम्मी दोघी अधूनमधून घरी येतात. त्या स्वच्छतेसाठी नकळत बऱ्याच वस्तूंच्या जागा बदलतात. पण, त्या गेल्या की, आम्ही दोघंही आधी जर कोणतं काम करत असू तर ते म्हणजे वस्तू जागच्या जागी ठेवण्याचं. यातून मी मिळवलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट जर काय असेल तर ती म्हणजे आईंचा माझ्यावरचा ठाम विश्वास. आता त्या आल्या की, चिकन बनवण्याचं काम हमखास माझ्याकडे असतं. फ्राय चिकन तर त्यांनी स्वतःहून बनवणं माझ्यावर सोडून दिलं. कारण मी बनवलेलं त्यांना खूप आवडतं म्हणून. आणि मीही त्या आल्या की, त्यांचं खाणंपिणं आणि औषधगोळ्यांवर लक्ष ठेवून असते. आमचं वेगळं राहणं का आवश्यक होतं हे आम्हा दोघांना समर्थपणे घर सांभाळताना पाहून त्यांनीही समजून घेऊन स्वीकारलंय यातच आम्ही समाधानी आहोत.

स्वयंपाक करणारा भरत
मला वाटतं तेव्हा मला सहावा महिना चालू होता. आणि काही कारणांमुळे आईपप्पा बाहेर गेले होते. मीही तेव्हा बोईसरला माहेरी होते. भरतकडे कोणीच नाही म्हणून मी बदलापूरला जायचं ठरवलं आणि येत असल्याचं अचानकच कळवलं. आई त्याच्यापुरतं जेवण बनवून गेल्या होत्या आणि ते त्याने संपवलंही होतं. मी दोन जीवांची. फक्त भूकच लागायची तेव्हा. उलट्यांनी हैराण होत घरी पोहोचले. पोटात भुकेचा आगडोंब. स्वतः उभं राहून बनवणं तर अशक्य होतं. मग, मी भरतला गॅसकडे उभं केलं. त्याला सांगितलं तसंतसं त्याने केलं आणि मस्त चहा माझ्या पुढ्यात आला. त्याला इतका आनंद झाला होता की, मला सांगता येणं शक्य नाही. सारखं खरंच चांगला झालाय चहा? विचारून मला नक्को करून टाकलं होतं त्याने. मग, अशीच एकदा गर्भारपणामुळे बिकट झालेल्या अवस्थेत भरतने मॅगी बनवून दिली होती आणि सोबत अननसाचा रस.. त्यावेळी एवढं चविष्ट जेवण मिळणं हे माझ्यासाठी स्वर्गसुख होतं. पण, कठीण प्रसंगात जो नवरा स्वयांपकघर सांभाळू शकतो त्याची साथ खूप अमूल्य ठरते.
स्वतःच्या घरात येऊन चार दिवस झाले होते. दोन दिवस घरात काम करण्यात गेले पण, तिसऱ्या दिवसापासून आम्ही त्याला पाळणाघरात सोडून ऑफिसात हजर झालो होतो. पहिल्याच दिवशी ओजसला आम्ही जवळजवळ दहा तासांसाठी अनोळखी स्त्रीच्या ताब्यात ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशीही तेच. पण, रात्री ओजस तापला. दहा महिन्याचं माझं बाळ तापाने फणफणलं होतं. डोळेही उघडेना. आजाराची काहीच कल्पना नव्हती. शेजारच्यांना विचारलं आणि त्याला दवाखान्यात नेऊन आणलं. शेजारच्यांनाच सांगून त्याला औषधं वगैरे दिली आणि झोपवण्यासाठी मांडीवर घेऊन बसले. बराच वेळ झाला, ग्लानीत असलेलं बाळ झोपलं असेल असं वाटून त्याला गादीवर ठेवण्यासाठी उचललं तर ते किंचाळून रडायला लागलं. पुन्हा त्याला शांत करत झोपवायला अर्धा तास आणि झोपवता झोपवता एक तास गेला. नऊ वाजेपासून मांडीवर एकाच पोजिशनमध्ये बसलेली मी साडेबारापर्यंत तशीच बसले होते. साडेअकराच्या सुमारास भरत उठला आणि म्हणाला, अनुजा, खिचडी कशी करायची ते मला इथून सांग मी तसंतसं करतो. मी घाबरले. 
तेल गरम होण्याचा अनुभव माझ्या गाठीशी होता पण, भरतच्या बाबतीत असं काही झालं तर? मी विचार करू लागले. पटकन् सुचलं की, सारं साहित्य एकत्र करून जर कुकर लावला तर! मी भरतला सांगितलं, आधी तांदूळ धुवून घे. त्यात दोन-तीन पळ्या तेल घाल. मग, जिरं, हळद, मिठ आणि मसाला घाल. चमच्याने नीट ढवळून घे आणि झाकण लावून कुकर गॅसवर ठेव. त्याने तसं केलं. खिचडी तयार झाली. आम्ही त्या रात्री दीड वाजता जेवलोय. 

नवीन घर, नवा संसार. आजूबाजूच्यांशी ओळख होती पण, इतकं स्वातंत्र्य घेऊन त्यांना आपलं अवलंबित्व ठळक करून दाखवण्याची आवश्यकता नव्हती. कसं का असेना आमचं स्वावलंबी असणंच इतरांना अधिक मोकळं, अधिक उत्सुक करतं. त्यांना एखादं अंध कुटुंब कसं सारं आपलं आपण करू शकतं? अशी जिज्ञासा असते आणि त्यातूनच ओळखी होतात. अशा ओळखी अत्यंत गरजेलाच उपयोगात आणाव्यात. बाकी वेळा जमतील तशा पार पाडता येतात. स्वयंपाकघरातले हे दोनचार अनुभव भरतलाही विश्वास देऊन गेलेत. आजही कधी गंमत म्हणून भरत स्वयंपाकघरात शिरतो. मी काही बनवत असताना हाताशी असलेल्या डब्ब्यातलं काही संपलं की, त्या डब्ब्यात नेमकी वस्तू काढून देणं हे भरतचं काम आहे कारण, भरलेलं सामान कोणतं कुठे असतं हे त्यालाच माहिती असतं. मी ते लावत नसल्याने माझा त्या साहित्याशी स्वयंपाक करण्याइतकाच संबंध येतो. मला कंटाळा आला किंवा खूप थकल्यासारखं वाटत असलं की, तो प्रेमाने खिचडी बनवतो. सरावाने तो आणखी पर्फेक्ट झालाय.
पदार्थ बनवताना त्याचा गंध आणि स्पर्श तितकाच महत्त्वाचा असतो जितका महत्त्वाचा त्या पदार्थाला आलेला रंग असतो. पण, या दोन महत्त्वाच्या अंगांकडे बहुधा डोळस व्यक्तींचं दुर्लक्ष होताना मी तरी पाहिलंय. पण, याच दोन गोष्टी आपल्यासाठी पाककलेतलं आपलं कौशल्य अधोरेखित करतात. रिनाताई सांगत होती. आईवडिलांनी प्रयत्नपूर्वक घडवलेला स्वतंत्रबाणा जपणारी रिनाताई बॅंकेतली नोकरी करून पाककलेचा आपला छंदही जोपासते. कटलेट, बटाटेवडे, सॅंडविचेस, ओली भेळ, चिकन लॉलिपॉप, चिकन, अंडा बिर्यानी, सुका चिकन, झिंगा बिर्यानी, वेज पुलाव, आलूपालक, मटरपनीर, दालखिचडी, पापड, निरनिराळ्या प्रकारची भजी, वडे, ऑमलेट तळणं, शेंगदाणे अगदी दुकानातल्या प्रकारे ओवनमध्ये भाजणं, अनेक प्रकारच्या चटण्या. हे सारे पदार्थ रिनाताई अगदी एकट्याने बनवते. गरम मसाला असो किंवा उन्हाळ्यात मिरच्या वगैरे विकत घेऊन दळून करण्याचा गोडा मसाला असो, ती महिन्याला थोडा थोडा घरच्या फूड प्रोसेसरवरच वाटते. हे ऐकून तर मीच अजून धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करतेय. एवढी आवड! “कशी जोपासलीस गं?” तर मोकळं हसून म्हणाली की, मला स्वयंपाक यावा ही माझ्या आईबाबांची इच्छा होती. पुढे जाऊन कधी गरज पडली तर खाण्यासाठी आपल्या मुलीला कोणा दुसऱ्यावर अवलंबून राहवं लागता कामा नये असं त्यांना वाटत होतं. आई नेहमी स्वयंपाक घरातली छोटीमोठी कामं करवून घेत असे. बाबाही काही टिप्स द्यायचे. हळूहळू, सोलणं, चिरण्यावर हात बसला आणि आईने गॅसची कामंही दिली. तशी ओळख होतीच गॅसची. शाळेत होणाऱ्या पाकशास्त्राच्या वर्गात आम्ही स्वयंपाक शिकत असतो पण, प्रत्येकीला ती आवड जोपासण्याची संधी मात्र मिळत नाही.
पहिला पदार्थ काय बनवला होतास?’ असं विचारल्यावर एक किस्सा रिनाताईने सांगितला. शाळेच्या वसतीगृहात असताना एकदा रात्री साडेनऊच्या दरम्यान खूप भूक लागली होती. करायचं काय? आम्ही तिघीचौघी पाकशास्त्राच्या वर्गात गेलो आणि सर्व डबे धुंडाळले. त्यात पोहे, हळद, मिठ, लाल तिखट, साखर, असे जिन्नस सापडले. थोडा विचार केला आणि मी मसाला घालून पोहे बनवण्याचा निर्णय घेतला. बाकी सारी कृती योग्यच होती. फक्त मिर्च्यांऐवजी लाल तिखट होतं एवढंच! पण, पोह्यांना चव आली होती. पोट आणि मन तृप्त करणारी चव. तेव्हाच मनाने घेतलं की, या विषयात रस घेऊन पाककला आत्मसाद करायचीच.
तिने तसं केलंही. बहिणी, मैत्रिणींच्या मदतीने अनेक पुस्तकं तिने वाचली. ती ध्वनिमुद्रित पुस्तकं, इन्टरनेट ब्रावजिंग करून अधिक माहिती मिळवू लागली. आईबाबांसोबत राहणारी रिनाताई त्यांच्या वयाचा आणि आपल्या आरोग्याचा विचार सतत मनात ठेवूनच पदार्थ बनवते. पदार्थ कसा केला की, अधिक पौष्टिक होईल यावर तिचं बारीक लक्ष असतं. तिच्याशी बोलताना सहज म्हटलं की, अगं रिनाताई, सारं जमतं पण, मासे तळताना ते उलटता येत नाहीत म्हणून कामवालीची मदत घ्यावी लागते. तर, दृष्टीहीन व्यक्ती स्वयंपाक करताना वापरू शकेल अशा उपकरणांची, भांड्यांची मला भरपूर माहिती मिळाली. एकतर, असा चमचा जो पापड तळण्याच्या चिमट्याप्रमाणे असतो. दोन्ही बाजूंना त्याचा रुंद भाग असतो. समजा, तव्यावर मच्छीचा तुकडा टाकलाय आणि मला उलटायचा आहे तर, मी या चमच्याच्या एका बाजूवर तो हलकेच उचलून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने तो नीट धरायचा. म्हणजे तो इथेतिथे सरकून पडणार नाही आणि व्यवस्थितपणे उलटताही येतो. मग, लांब दांडी आणि चोच असलेल्या भांड्याबद्दल म्हणाली की, अशा भांड्यात चहा बनवला की, वगराळं घेण्याची गरज पडत नाही. हे दांड्यांवाली भांडी जरा काही दिवसांनी सैल पडतात. अशावेळी स्क्रूड्रायव्हरचा सेट जवळ असावा म्हमजे दुरुस्ती आपली आपणच करू शकतो. नसेलच तर म्हणे, मी तर मसाल्याच्या छोट्या चमच्यानेही स्क्रू टाइट केलेत. हे बारीकसारीक ज्ञान पण केल्याशिवाय, अनुभवाशिवाय येत नाही. नाही का? मुंबईला आल्यावर माझ्यासोबत स्वयंपाक अधिक सोपा करणाऱ्या अशा भांड्यांच्या खरेदीला यायचं रिनाताईने कबूल केलंय. खरंतर, आम्हा दृष्टीहीन मुलींसाठी तिने पाककलेचे वर्ग सुरू करावेत असं मला आणि तिलाही वाटतंय. पाहू कधी याला मूर्त स्वरूप येतंय ते!
चपाती रोजचा आणि तरीही अत्यंत महत्त्वाचा पदार्थ. डब्ब्याला चपाती लागतेच ना! मला संतोषीताई आठवते. तीही माझ्यासारखी संपूर्णतः दृष्टीहीन. स्वेच्छेने गृहिणीपद आणि स्वीकारलेली, निरनिराळे पदार्थ बनवणारीच नव्हे तर आग्रहाने खायला घालणारी. आग्रह एवढा की, कधीकधी शेजारीच असलेल्या सासरी जाणं टाळावं लागतं. कॉलेजपासून संतोषी साहू आणि किरण भापकर या जोडप्याबद्दल खूपच आकर्षण होतं. हे दृष्टीहीन जोडपं कसं सारं मॅनेज करत असेल? हेच कुतूहल अधिक असायचं. पहिल्यांदा रहायला गेले तेव्हा चिकन आणि भात खाल्लेला अजूनही आठवतंय. तेव्हा एकदा गेलो होतो, त्यावर त्यांना दोन मुलं झाली, आमचं लग्न झालं आणि आमचा मुलगा तीन वर्षांचा झाला तेव्हा कितीतरी वर्षांनी पुन्हा किरणदादाकडे जायचा योग आला. रात्री उशिरा पोहोचलो त्यामुळे जेवून गेलो होतो. रात्री बऱ्याच गप्पा मारल्या आणि बोलता बोलता कधी झोपलो तेच कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी चपाती भाजण्याच्या खमंग वासाने जाग आली. मी आळोखेपिळोखे देत स्वयंपाकघराशी गेले तर, संतोषीताई चपात्या करत होती. थेट आत जाऊन डब्ब्यात हात घातला. अगदी गोल, नरम आणि लुसलुशीत चपाती! मनापासून वाटलं, घरी स्वयंपाकाला येणाऱ्या आंटीला नेऊन दाखवावी आणि म्हणावं जा तिच्याकडून जरा शिकून घ्या म्हणून. मी चहासोबत आवडीने ती गरम चपाती लगेच गट्टम केली.
मला आठवते मीराताई. पतीच्या अकाली निधनानंतर ९ वर्षांची मुलगी आणि ३ वर्षांच्या मुलाचा समर्थपणे सांभाळ करणारी. त्यांच्या शाळेसाठी लवकर उठून, आधी नाष्ता आणि मग स्वतःसोबत तिघांचा चपाती भाजीचा डबा तयार करणारी. पौष्टिक खाण्याची सवय असावी म्हणून हटकून रात्री मोठी गोल ज्वारीची भाकरी थापणारी. बॅंकेतली नोकरी सांभाळून कधी, इडली तर कधी सॅंडविच करून मुलांना खूष ठेवायला धडपडणारी.  
मी निःशब्द होते. शब्दच काही ठिकाणी आपल्याला थांबवतात असं वाटतं.
स्वयंपाकघर म्हणजे स्त्री - हे समीकरण हल्ली बदलतंय असं म्हणण्यापेक्षा ते हल्ली नीट स्वीकारलं गेलंय असं म्हणणं अधिक समर्पक ठरेल. टीव्हीवर तर पुरूष शेफ दिसतातच पण, रस घेऊन स्वयंपाक करणारी मुलंही बरीच आहेत. तसेच खंडू भंडारे हा माझा मित्र. कॉलेज जीवनात जिथे सर्वसामान्य मुलं मौज, मजा, मस्ती आणि आपला अभ्यास अशा जगात वावरत असतात तेव्हा खंडू मुंबईत शिक्षणासाठी राहता यावं म्हणून जीवाचं रान करत होता. मुंबईत राहण्याच्या धडपडीत त्याचं शिक्षणच पणाला लागत होतं हे दुर्दैव. वसतीगृहातल्या अटी पूर्ण करता येत नसल्याने कधी मित्रांकडे तर कधी वसतीगृहात दोनचार रात्री काढाव्या लागत होत्या. शिक्षण चालू असल्याने पैसा हातात नव्हताच. एका ठिकाणी सोय नसल्याने खाण्याचे वांदे असायचे. अशावेळी मित्रांनी आधार दिला आणि मदतही केली. त्यांच्यासोबत राहून ट्रेनमध्ये वस्तू विकून मिळवलेला पैसा आणि त्यातून मिळालेलं अन्न याबद्दल तो आजही भरभरून बोलतो. नोकरी लागली आणि एका मित्रासोबत शेअरिंग रूम घेऊन तो वेगळा राहू लागला. मित्र म्हणजे रॉबिनसन डिसुजा, तोही शंभर टक्के अंध. दोघांनी रूम घेतला, गॅस घेतला आणि रॉबिनदादाने खंडूला स्वयंपाक शिकवायला सुरुवात केली. अक्षरशः पद्धतशीर ट्रेनिंगच दिलं म्हणा ना!. गॅस कसा पेटवावा, सुरी कशी धरावी, कांदा, बटाटा, टोमॅटो चिरण्यातला फरक फोडणी देताना होणारे आवाज, सुटणारे वास, शिजल्यानंतरचा पदार्थाचा स्पर्श, गंध आवाज आणि चव. त्याला जेवढं म्हणून येत होतं समजत होतं त्याने तेवढं सगळं खंडूला शिकवलं. खंडू चपाती सोडून सगळा स्वयंपाक बनवू शकतोच तर रॉबिनदादा म्हणतो बिर्यानी त्याची स्पेशल डिश आहे. मला आमंत्रणपेक्षा मीच येईन तेव्हा - बिर्यानी दे हं बनवून असं कबूल करून घेतलंय रॉबिनदादाकडून. दोघेही आपल्या संसारात रमलेत. कधी बायकोला जमलं नाहीच तर तिला संपूर्ण साग्रसंगीत जेवण वाढता येण्याइतके दोघेही या पदार्थांमध्ये तरबेज आहेत. तसं ते करतातही. खूप संघर्षानंतर मिळालेलं हे स्थैर्य त्यांना अधिक उत्तेजन देतं आणि मग हौस म्हणून हे दोघं स्वयंपाकघराचा कधीकधी ताबा घेतात.
आपल्या जगण्याची ऊर्जा म्हणजे अन्न. समाजात सर्वसामान्यांप्रमाणेच वावरता यावं म्हणून, जगता यावं म्हणून आम्ही दृष्टीहीन माणसं रोज असामान्य संघर्ष करत असतो. पाऊल पुढे टाकताना खरंच शाश्वती नसते की, ते योग्य जागी पडेल की, निसरड्या केळ्याच्या सालावर पडेल / कुत्र्यावर पडेल / मधेच पार्क केलेल्या बाइकला जाऊन आपटेल की, पार्क केलेल्या कारचा उघडा आरसा हाताला दोन दिवस दुखेलशी जखम देऊन जाईल. इतक्या अनिश्चिततेमध्ये वावरताना, आपली नोकरी, आपलं घर आणि आपलं कुटुंब सांभाळताना कधी जबाबदारी म्हणून तर कधी रिलॅक्स होण्यासाठी दृष्टीहीन लोक स्वयंपाक घरात पाऊल ठेवतात.
आता तुम्ही कामवाली का ठेवत नाही? किंवा बाहेरून का मागवत नाही असे प्रश्न कोणाच्या मनात येऊ नयेत असं वाटतं.कारण, रोज बाहेरचं खाणं परवडत नाहीच शिवाय तब्बेतीच्या दृष्टीनेही ते मारक ठरत. आणि कामवाली प्रत्येकाला परवडते असंही नाही. त्याहीपेक्षा जर कच्चंपक्कं कसंही का असेना, आपल्याला बनवता येत असेल आणि इतर कुटुंबिय गोड मानून घेत असतील तर आपणच का बनवू नये! असा आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला बाणेदार प्रश्न माझे मित्र-मैत्रिणी हमखास विचारतात. आजकाल स्मार्ट युग आहे. मॉड्युलर किचन ही संकल्पना खूपच लोकप्रिय झाली आहे. अनेक घरांतून ओवन, इन्डक्शन, चपाती बनवण्याचं मशिन अशी स्मार्ट इलेक्ट्रिक साधनं सर्रास वापरली जातात. मी वर उल्लेख केलेल्या माझ्या निवडक मित्र-मैत्रिणींपैकी काही जण अगदी सहज वापर करतात या सर्व वस्तूंचा. 
बिट्टू जयस्वाल 

तरीही मुद्दाम नाव घ्यावं तर मी घेईन बिट्टूकुमार जैसवाल या माझ्या संपूर्णतः दृष्टीहीन असलेल्या मित्राचं. एका सॉफ्टवेअर डेवलपिंग कंपनीमध्ये बिट्टू काम करतो. स्मार्ट जमान्याच्या सर्व प्रकारचे अपडेट हा ठेवतो आणि आम्हा मित्र-मैत्रिणींसोबत सतत शेअर करत राहतो. मायक्रोवेव कसा वापरायचा याबाबतही त्याने सविस्तर माहिती आम्हाला वेळोवेळी दिली. तो स्वतः कोणत्या मोडवर, किती हिट ठेवली की, कोणता पदार्थ छान होतो हे सांगतो. समजावून सांगताना बटन कोणत्या बाजूला आहे, त्याचा आकार कसा आहे, ते किती वेळा दाबलं की, योग्य प्रमाण ठरेल हे सांगतो. शिवाय, प्रत्येक वेळी त्याचा स्वतःचा अनुभवही असतोच. कुकिंग मोड म्हणजे मायक्रोवेव मोड. त्यात त्याने आजवर ढोकळा, सँडविच, कॉफी असे पदार्थ केले आहेत. आज ऑम्लेटवर प्रयोग होणार आहे आणि लवकरच त्याची रेसीपी, टाइम आणि हिटचे डिटेल्स आमच्यापर्यंत पोहोचतील. इतरवेळी त्याचं पाणी गरम करणं, शेंगदाणे भाजणं, एकाच वेळी अनेक पापड भाजणं हे चालूच असतं. अशा सततच्या शेअरिंग प्रेरित होऊन माझे आणखी मित्र-मैत्रिणी ओवन घेण्याच्या विचारात आहेत, त्यांपैकीच मीही.
खरंच, स्वावलंबनात जो आनंद असतो त्याला इतर कशाचीही तोड नाही. नोकरी करून, घर सांभाळताना जेव्हा स्वयंपाकघर आपल्या हातात येतं तेव्हा त्या घराबद्दल आपुलकी, जवळीक, प्रेम आणि जबाबदारीची भावना निर्माण होते हे मी अनुभवलंय. मी जर घरी वेळेत गेले नाही तर आम्ही खाणार काय? अशी प्रेमळ काळजी असो, दमून आलेल्या पार्टनरला गरम कॉफी करून देण्याची गोड हुरहूर असो, बायकोने बिनधास्त बाहेर जावं - मी बनवेन ना माझ्यापुरतं - असा विश्वास व्यक्त करून तिला अधिक रिलॅक्स करणं असो. खूप छोटे छोटे पण तरीही आनंद, आत्मविश्वास, प्रेम आणि स्वातंत्र्याची चव असलेले हे क्षण स्वयंपाकघरच सहज मिळवून देत असतं. नाही का?
                                                                           


अनुजा संखे
मुंबई विद्यापीठातून मास कम्युनिकेशन आणि जर्नलिजमचे पदव्युत्तर शिक्षण. बँकेत नोकरी करत असताना लिखाणाची आवड जोपासते. सोशल मीडियावर सातत्याने लिहिते. सह्याद्री वाहिनीच्या हिरकणी पुरस्काराने आणि सावली फाउंडेशन च्या नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित. 

1 Comments

Previous Post Next Post

Contact Form