पण मी जेव्हा नोकरीच्या निमित्ताने परगावी घर घेऊन एकटी राहायला लागले – तेव्हा मला वाटायला लागलं की आता मी माझ्या पसंतीचे पदार्थ बनवून खाऊ शकते. जेव्हा मी एकटीचा स्वयंपाक करायची तेव्हा स्वत:च्या आवडीचे पदार्थ करायला लागले. मला पुरीभाजी खूपच आवडते. मग मी आठवड्यातून दोनतीनदा तेच बनवायला लागले. मला वरणभात किंवा आलूपराठे सुद्धा आवडतात – तर तेही मी आवडीने करायला लागले. ती इतरांनाही खूप आवडते. आपण जे खाऊ ते स्वादिष्ट असलं पाहिजे, असं मला नेहमीच वाटत आलं आहे. त्यामुळे मी जे काही पदार्थ बनवते, ते स्वादिष्ट असतील याच्याकडे मी लक्ष देत असे आणि अजूनही देते. मी अनेक वर्ष छत्तीसगढमध्ये रायपूरला ‘रूपांतर’ नावाच्या संस्थेत काम करत होते. मी सामाजिक क्षेत्रात काम करत असे, त्यामुळे घरात भरपूर लोकांचं येणंजाणं सुरू असायचं. माझे सहकारी सगळे तिथलेच मूलनिवासी होते. तिथे बायकांनी स्वयंपाक करायचा आणि पुरुषांनी बघत बसायचं असं काही नव्हतं. सगळेजण समोर येईल ते काम करायचे. सगळ्यांनी मिळून स्वयंपाक करण्याची एक वेगळी गम्मत होती.
मला असं वाटतं; मी काहीही स्वयंपाकाचं काम करत असेन तर आसपासच्या लोकांनी नुसतं बसून राहू नये – त्यांनीही मदत करायला पाहिजे. खास करून पुरुष मंडळींना हे उमजत नाही. माझी अशा वेळी चिडचिड होते आणि मग पदार्थाची चव बिघडते. तसंच आपल्या मेहनतीची दाखल घेतली गेली तर करणाराला काम केल्याचं समाधान वाटतं. आमच्याकडे येणारे सगळे लोक ते आवर्जून करतात. आपला स्वयंपाक हा असा इतरांच्यावर सुद्धा अवलंबून असतो.
जरी स्वयंपाक करण्याची मुळात आवड नसली तरी मी स्वत:च्या पद्धतीने करता करता शिकत गेले आणि अजूनही सवडीने काही ना काही शिकत रहाते.
वयाची पन्नाशी उलटल्यावर मी लोणची घालायला शिकले. रवी नेहमी लोणचं विकत आणायचा, पण मला ते आवडत नसे. त्यात कितपत स्वच्छता असेल, प्रीजरव्हेटीव्ह असतील असं वाटायचं. म्हणून आम्ही दोघं मिरच्या, लिंबू, कैरी अशी लोणची आवर्जून शिकलो. मी जेव्हा रवीच्या सोबत मुंबईला राहायला आले, तेव्हा आमच्याकडे स्वयंपाकाला बाई होती पण मला जरा तिचं काम आवडत नसे. कारण मला फार मसालेदार पदार्थ नाही आवडत आणि ती तेलही खूप वापरत असे. म्हणून मग भाजी तरी आपणच करायला पाहिजे वाटत असे. फोडणीचं वरण करायची माझी एक विशिष्ट पद्धत आहे. ती बर्याचजणांना आवडते. असेच वेगवेगळे पदार्थ करता करता माझ्या हातची एक विशिष्ट चव विकसित होत गेली. माझ्या मुलाला शाळेचा डबा देताना तर मी अनेक प्रयोग करून पाहिले. त्याचा डबा त्याच्या मित्रांनाही खूप आवडत असे. कधीकधी तर मित्रच डबा संपवून टाकायचे आणि तो उपाशीच राहायचा. म्हणून मी त्याला दोन डबे द्यायला लागले. एक त्याच्यासाठी आणि एक मित्रांसाठी! ही पद्धत अगदी कॉलेजमध्येही सुरू राहिली.
माझ्या मित्रमैत्रिणींनाही माझ्या हातचे काही पदार्थ खूपच आवडतात. कधीकधी ते अगदी फर्माईश करून खायला येतात. जसजसा खाणार्या मंडळींच्याकडून फीडबॅक मिळत गेला – तसतसा माझा इंटरेस्ट आणखी वाढायला लागला. नवीन प्रयोग करून पहावेसे वाटायला लागले. हळूहळू माझ्या स्वयंपाकाची खासियत लोक मला सांगायला लागले. हा लेख लिहिण्यासाठी आम्ही दोघं आणि आमचा मुलगा एकत्र बसून माझ्या स्वयंपाकाबद्दल काय लिहावं असा विचार करत होतो – तेव्हा नवर्याने आणि मुलाने माझ्या स्वयंपाकाची काही वैशिष्ट्यं माझ्या नजरेस आणून दिली! गम्मत म्हणजे ही सगळी वैशिष्ट्य ‘स’ अक्षराशी जोडलेली आहेत. म्हणजे माझ्या स्वयंपाकात -"स" फार महत्त्वाचा आहे.
साधेपणा – घरात ज्या वस्तु नेहमी असतात त्यातूनच करायचं, एखादा पदार्थ बनवायचा म्हणून मुद्दाम क्रीम आणा, खास वस्तू आणा - वगैरे मी करत नाही. त्यामुळे माझा स्वयंपाक तसा स्वस्त असतो.
सहजता – मला खूप सगळ्या प्रक्रिया करून बनवायला आवडत नाही. मिक्सर मधून काढा, ओव्हन मध्ये घाला, मग एक तास थांबा - असं लांबलचक काही नको वाटतं. फार वेळ रेंगाळत बसायला आवडत नाही – पटापट काम झालं पाहिजे.
सुंदरता – पदार्थ बघूनच तो खावासा वाटला पाहिजे! मला कलरफुल जेवण चांगलं वाटतं. मला कोशिंबीर करायची असेल तरी त्यातल्या रंगांच्याकडे मी लक्षं देते. जर कोशिंबीरीत बीट घातलं तर संपूर्ण पदार्थ लाल रंगाचा होऊन जातो – त्यातल्या वेगवेगळ्या घटकांचे रंग झाकले जातात. म्हणून मी नेहमी बीटाची कोशिंबीर वेगळी बनवते आणि इतर सगळ्या वस्तूंचे रंग एकमेकाला खुलवतील अशा प्रकारे आणखी एक कोशिंबीर करते.
स्वास्थ्य – माझे पदार्थ अगदी शंभर टक्के आरोग्यपूर्ण असतीलच असं नाही. पण मी शक्य तितकं पोषणमूल्य वाढेल असा प्रयत्न करते. म्हणजे शक्य तिथे मोडाच्या कडधान्याचा जास्ती उपयोग करते, कमीत कमी तेलात स्वाद राखून जेवण बनवते.
स्वाद – स्वयंपाकात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वाद. पदार्थ नुसता छान दिसून उपयोग नाही पण पदार्थ खारट किंवा तिखट झाला असेल तर मजा नाही. तिखटमिठाचं, मसाल्याचं योग्य प्रमाण पाहिजे.
भारती दिवाण
मुळात मध्यप्रदेशातिल असून गेल्या तीस वर्षांपासून मुंबईत स्थायिक आहे. अनेक वर्षांपासून महिला आणि मुलांसोबत विविध सामाजिक प्रश्नांवर स्त्रीवादी विचारांनी काम करीत आहे.




Khupach sundaar padhatiney lihlay. Interesting ahe ha lekh
ReplyDeleteKhupach sundaar padhatiney lihlay. Interesting ahe ha lekh
ReplyDeleteमला लेख आवडला।अजून एक स ऍड करते।स्वागतशीलता।भारतीबद्दल अनुभव असा की अतिशय स्वागतशीलने ती खिलवते। त्यामुळे आपण तो पदार्थ आणखी एन्जॉय करतो
ReplyDelete