पोटामध्ये भूक आणि
डोळ्यामध्ये पाणी
कशी गाऊ सांग आता
स्वातंत्र्याची गाणी
खूप छान दिवस येतील
होती मनात आस
आधारकार्डावीना बघ
हिसकून घेतलाय घास
भात भात करून इथं
चिमणीच गेलेय उडून
वासनांध नजरांनी
कळ्याच टाकल्यात खुडून
आँक्सिजनविना गुदमरून
बालमरण सजतय
गाईचं प्रकरण मात्र
संसदेतही गाजतय
आयुष्यभर पुरेल एवढी
माया त्यांनी लाटली
निवडून आल्यानंतर माझी
नोटच त्यांनी लुटली
पूर असो, असो वादळ
उशिराच जमतो थवा
मदतीच्या पाकिटांवर मात्र
हसराच फोटो हवा
सारच आहे त्यांच्या हाती
आमचं काय उरलय
गरीबीच्या चटक्यांनिशी
घरच उघडं पडलय
काय खावं काय प्यावं
चोख त्यांचा पहारा
ओसाड या मनाला
अश्रूंचाच सहारा
पोटामध्ये भूक आणि
डोळ्यामध्ये पाणी
कशी गाऊ सांग आता
स्वातंत्र्याची गाणी
Tags
कविता
अप्रतिम कविता
ReplyDeleteजबरदस्त
ReplyDeleteवास्तवाची दमदार मांडणी
ReplyDeleteमस्त... सुंदर कविता आहे...
ReplyDeleteनेहमीसारखीच तुझी कविता झणझणित आहे...समकाल कवेत घेणारी.
ReplyDeleteशुभेच्छा कविता
ReplyDelete