किरण येले


किरण येले 
बाई माजघरात
कापते । चिरते । किसते । तळते । शिजवते । उकडते
काही काही ;दिवसभर काम करत राहाते
चाकू, सुरे, विळे, आग, वाफेसोबत
तिला एकही इजा होत नाही

सायंकाळी
पुरुष घरी परतू लागतात
ती सावध होते.
तिला जखमा होऊ लागतात.


बाई बनवते वेगवेगळे पदार्थ
मुलांच्या आवडीचे
सासू - सासर्‍यांच्या आवडीचे
नवर्‍याच्या आवडीचे
नवर्‍याच्या मित्रांच्या आवडीचे
पण तुम्ही बाईला
कधी दुसर्‍यांच्या आवडीचे
पदार्थ बनवत
असतानाच्या वेळी पाहिलंय ?
तिची त्या वेळची
लगबग, हालचाल, उत्सुकता, काळजी...सगळंच ?
जाऊ द्या...
नसेल पाहिलं
कारण, तुमच्या मते
बाईनं बनवलेली गोष्ट महत्त्वाची
ती बनवतानाची तिची स्थिती बिनमहत्त्वाची
असं असू शकेल

तर
बाई बनवते
वेगवेगळे पदार्थ
मुलांच्या आवडीचे
सासू - सासर्‍यांच्या आवडीचे
नवर्‍याच्या आवडीचे
नवर्‍याच्या मित्रांच्या आवडीचे

पण
बाईला कधी तुम्ही
तिच्या आवडीचा पदार्थ
बनवताना पाहिलंय ?

सांगायची गोष्ट अशी की
रांधणारी आणि वाढणारी
ती स्वतःच असली तरी
जेवताना
बाईच्या ताटात नेहमी
दुसर्‍यांच्याच आवडीचे पदार्थ असतात.
ताटात
आणि आयुष्यातही !








Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form