योगिनी राऊळ



मसाल्याची बेटं
योगिनी राऊळ 

हातभर हिरव्या बांगड्या घालून

कपाळावर ठसठशीत लाल कुंकू लावून

तुम्ही उभ्या राहिलात

बिर्याणी पार्सलच्या क्यूमध्ये

किंवा

धुवट केशरी साडी नेसून

बोडक्या डोक्याने लावलीत रांग

चमचमत्या मिठाईच्या दुकानासमोर

किंवा

तोंड झाकणारी काळी ओढणी घेऊन मागितलेत

शुद्ध शाकाहारी दुकानात अळूवडीचे उंडे

तर

बाजारातले लोक

खाऊ की गिळू नजरेने बघतील तुमच्याकडे

जणुकाही माजलाय अधर्म सगळीकडे

अन् बायकांना नाही राहिली चाड

देवाधर्माची, संस्कृतीची, परंपरेची !



पण

माणसाच्या जीभेवर नसतात

जात-धर्मानुसार बदलणारी चवीची केंद्र

अन्न शिजवणार्‍या बोटांना, पाण्याला,

चुलीला, भांड्यांना,

लहान-मोठ्या आतड्याला, शौचाच्या वाटेला नसतो धर्म,

शरीरावरच्या कपड्यांचा नसतो पोटातल्या भुकेशी संबंध,

हे जर पटत असेल बायांनो, तर

कोणते कपडे घालणार्‍या लोकांनी कोणते अन्न खावे,

याचे कोणीतरी, कधीतरी बनवलेले नियम

मोडायची वेळ आलीय, हेही घ्या पटवून....



नपेक्षा

पुचाट दर्यावर्दींची जुनाट गलबतं

तुमच्या मसाल्याच्या बेटात घुसायला

अन् तुमच्या जगण्यावर कब्जा करायला कधीचीच सज्ज आहेत

... इतिहासाच्या पानांतून तुम्ही काहीच का शिकला नाहीत सयांनो?



Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form