हिरा बनसोडे

सखी

सखी, आज प्रथमच तू माझ्याकडे जेवायला आलीस       
हिरा बनसोडे 

नुसतीच आली नाहीस तर तुझी जात विसरून आलीस

सहसा बायका परंपरेची विषमता विसरत नाहीत

परंतु तू आभाळाचे मन घेऊन आलीस

माझ्या वीतभर झोपडीत

वाटलं, जातीयतेचा तू कंठच छेदला आहेस

माणसाला दुभांगणाऱ्या दऱ्या तू जोडीत आली आहेस

खरंच सखे फार फार आनंदले मी

शबरीच्या भोळ्या भक्तीने मी तुझं ताट सजवलं

किती धन्य वाटलं मला!

पण -

पण ताट बघताच तुझा चेहरा वेडवाकडा झाला

कुत्सित हसून तू म्हणालीस

इश्श! चटण्या कोशिंबिरी अशा वाढतात का?

अजुन पान वाढायला ही तुला येत नाही?

खरंच तुमची जात कधीच सुधारणार नाही!

माझा जीव शरमुन गेला -

मघाशी आभाळाला टेकलेले माझे हात

चटकन कुणीतरी छाटल्यासारखे वाटले

मी गप्प झाले

जेवण संपता संपता तू मला पुन्हा विचारले

हे ग काय? मागच्या भातावर दही ताक काहीच कसं नाही?

बाई ग, त्याशिवाय आमचं नाही हो चालत

माझं उरलं सुरलं अवसान ही गळाला

तुटलेल्या उल्के सारखं

मन खिन्न झालं, सुन्न झालं



पण दुसऱ्याच क्षणी मन पुन्हा उसळून आलं

पाण्यात दगड मारल्यावर जसा तळाचा गाळ वर येतो

तसं सारं पूर्वायुष्य हिंदकळून समोर आलं.

सखे दही ताकाचं विचारतेस मला!

कसं ग सांगू तुला?

अगं लहानपणी आम्हाला चहाला सुद्धा दूध मिळत नव्हतं

तिथं कुठलं दही आणि कुठलं ताक!

लाकडाच्या वाखरीतून आणलेल्या टोपलिभर भूषावर

माझी आई डोळ्यातला धूर सारित स्वयंपाक करायची.

मक्याच्या भाकरीवर लसणाची चटणी असायची कधी मधी

नाहीतर भाकरी कालवणाच्या पाण्यात चुरून खायचो आम्ही.

सखी, श्रीखंड हा शब्द आमच्या डिक्षनरीत नव्हता तेव्हा

लोण कढी तुपाचा वास घेतला नव्हता माझ्या नाकाने

हलवा बासुंदी चाखली नव्हती कधी ह्या जिभेने

सखी, तुझी परंपरा तू सोडली नाहीस

तुला वाढलेल्या ताटात आज पदार्थांचा क्रम चुकला

यात माझा काय दोष हे मला सांगशील का?

माझा काय दोष हे मला सांगशील का?

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form