अन्नपूर्णेसाठी पूर्णान्न




आहाराविषयी शास्त्रीय संशोधन करणार्‍या काही महाराष्ट्रियन महिलांनी स्त्रियांच्या आहाराविषयी विशेष विचार केला. संशोधन आणि प्रयोग करून मार्गदर्शन केले. त्यांच्या ह्या योगदाना बद्दल विशेष लेख


असंही आपल्या समाजात बायकांच्या खाण्याला फारसं महत्त्व कधीच नव्हतं. पूर्वी तर नवरा जेवून उठला की बायका त्याच्या ताटात जेवत असत. काही कनवाळू नवरे बायकोला काही खास पदार्थ मिळावेत म्हणून जास्तीचं वाढून घेऊन पानात टाकत असत. एरव्ही पुरूषांच्या, मुलांच्या पंगती झाल्या की शेवटी उरलंसुरलं बायका खात. काही त्यातूनही मार्ग काढीत. आमच्या गावच्या एका बाईंची नक्कल माझ्या सासूबाई करीत. त्यांना सून घरात आल्यावर सगळ्यांसोबत वाढलं जाऊ लागलं. मग सणासुदीला नवरा जेवत असतांना त्याच्या पानातल्या गुळवणीतल्या तुपाचा लपका हळूच खात म्हणत, तुमच्या ताटातलं लय ग्वाड लागतंय.
अशा प्रकारे बायकांना जेवायला धड मिळायची मारामार असे. नंतर काळ थोडाफार बदलला. बायका सर्वांसोबत बसून जेवू लागल्या, इतकंच नाही तर आपल्या पाककृतींविषयी लिहूही लागल्या. पन्नासच्या दशकाच्या आसपास बायकांच्या पाककृतींना मासिकांतून, वृत्तपत्रांतून स्थान मिळायला  लागलं. त्यात पारंपरिक पदार्थांसोबत हळूहळू इतर राज्यांतील आणि इतर देशांतील पाककृतींचीही भर पडत चालली. पण यात बायकांना जी पोषणमूल्यं आवश्यक आहेत त्यासंबंधी काहीच नव्हतं. अशा वेळी सत्तरच्या दशकात कमला सोहोनी, मालती कारवारकर, विजया साठे यांनी आणि नंतरच्या काळात ऋजुता दिवेकर अशा काही संशोधकांनी, आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ महिलांनी त्याविषयी लिहायला, जागृती निर्माण करायला सुरूवात केली.

मालती कारवारकर 
गंमतीचा भाग असा की कमलाबाई आणि मालतीबाई दोघींनाही स्वयंपाक करण्याची फारशी आवड नव्हती. कमलाबाईंना तर आपल्या संशोधनातून स्वयंपाक करायला वेळही नव्हता. पण चित्रकलेची, साहित्याच्या आणि वैचारिक साहित्याच्या वाचनाची आवड जोपासणाऱ्या मालतीबाईंच्या बाबतीत मात्र असं घडलं की लग्नानंतर स्वयंपाक गळ्यात पडला. कमलाबाईंनी १९३४ ते १९६९ या काळात रोज आपल्या खाण्यात येणारे दूध, कडधान्यं, तृणधान्यं, नीरा इ. पदार्थांवर संशोधन करून जवळपास १५० हून अधिक शोधनिबंध लिहिले असले आणि आपल्या मुलांना चांगला पौष्टिक आहार मिळावा म्हणून स्वयंपाकघरात लक्ष घातलं असलं, तरी आपलं स्वयंपाकघर हीच प्रयोगशाळा करण्याचा विचार त्यांनी निवृत्त झाल्यावर सुरू केला. हे त्यांनी सामान्य माणसांसाठी आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग करावा म्हणून केलं. तर मालतीबाई नवऱ्याच्या निवृत्तीनंतर मुंबईत स्थायिक व्हायला आल्या आणि प्रदूषण, रेशनिंगचा घोळ, नोकरांची टंचाई असल्याने कामात पडलेली भर या सगळ्यामुळे स्वतःच आजारी पडल्या. खाणंपिणं चांगलं असूनही आपण आजारी पडतोय याचं कारण पोषणमूल्यांच्या बाबतीत आपला फारसा अभ्यास नाही, असं वाटायला लागल्यावर त्यांनी आहारतज्ज्ञाचा अभ्यासक्रम करावा असं त्यांनी ठरवलं आणि त्या अभ्यासातून त्यांना आपल्या संशोधनाची वाट तर सापडलीच. पण बायकांच्या आहारातलं पोषणमूल्य वाढवण्याच्या दृष्टीने मोलाच्या सूचना करता आल्या.
कमला सोहोनी 

नीरेसारखं सहज आणि स्वस्त पेय दिल्याने किंवा ताडाचा गूळ खायला दिल्याने हिमोग्लोबिनची कमतरता दूर व्हायला मदत होते हे कमलाबाईंच्या नीरेवरच्या संशोधनामुळे सिद्ध झालं. नीरा या पेयाच्या पोषक मूल्याच्या त्यांच्या या संशोधनासाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. कडधान्ये शिजवल्यामुळे त्यांच्यामधील ट्रिप्सीन इनहिबिटर हा जो अपौष्टिक घटक कडधान्यांमधील प्रथिनांच्या पचनक्रियेत अडथळा आणतो, त्याचा नाश होतो. डाळी आंबवून केलेल्या पदार्थांमुळेही प्रथिनं पचायला मदत होते आणि जीवनसत्त्वाचं प्रमाणही वाढतं हे कमलाबाईंनी सांगितलं. डाळी आणि कडधान्यांवर त्यांनीच सर्वात प्रथम संशोधन केलं आणि त्यांचं हे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर वाखाणलं गेलं. गवारीच्या शेंगांमधील बियांची सालं काढून त्या दळल्या की जो गवारगम मिळतो त्याचाही वापर त्यांनी स्वैंपाकात करून दाखवला. गरोदर बायका, वाढत्या वयातली मुलंमुली, ग्रामीण भागातील कष्टकरी या सर्वांनी कोणत्या प्रकारचा आहार घेणं गरजेचं आहे यासंबंधीही त्यांनी सूचना केल्या.
आरोग्य हे रोग होऊ न देणं यावर अवलंबून आहे अशी मालतीबाईंची धारणा होती. त्यासाठी कुटुंबाचं अन्न शिजवणाऱ्या व्यक्तीला अन्नघटकांची माहिती, त्यांचे शरीरावर होणारे परिणाम हे निदान प्राथमिक स्वरूपात माहीत असलं पाहिजे, आवश्यकतेनुसार, आर्थिक परिस्थितीनुसार त्यात बदल करणं, पर्याय शोधणं हे त्या व्यक्तीला कळलं पाहिजे या उद्देशाने त्यांनी नुसती पुस्तकंच लिहिली नाहीत तर चांगलं खाण्यापिण्याचा सल्ला देणारं केंद्रही चालवलं. शरीर अवयवांपासून बनलेलं, तर अवयव पेशींपासून आणि पेशी ४० अन्नघटकांतून आलेल्या. पण हे अन्नघटक एकमेकांच्या सहकार्याशिवाय काम करीत नाहीत. उदाहरणार्थ कॅल्शियमचं काम पूर्ण होण्यासाठी जोडीला, प्रथिनं, अ जीवनसत्त्व, ड जीवनसत्त्वही हवीतच हे मालतीबाईंनी सांगितलं. धान्याला प्रथिनाची जोड दिली तर लायसिन आणि मेथिओनाइन या दोन अमायनो अॅसिडसह सर्व दहाच्या दहा अमायनो अॅसिड्स मिळतील. यासाठी पूर्ण प्रथिनं देणारे पदार्थ जसं की पोळी, घट्ट वरण आणि भाजी किंवा मांसाहार, भात/चपाती आणि भाजी खाणं कसं आवश्यक आहे हे त्यांनी दाखवून दिलं. सोयाबीनमधली प्रथिनं आणि नाचणीमधलं कॅल्शियम यांचं बायकांच्या आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्व आहे हे जसं त्यांनी सांगितलं, तसं यीस्टमधली प्रथिनं (बाजारात मिळणाऱ्या पावातली नव्हे कारण त्यातून गव्हाचे सगळे पौष्टिक पदार्थ काढून घेतलेले असतात) वाढीला लागणाऱ्या मुलांसाठी कशी चांगली आहेत आणि त्यासाठी यीस्टचा वापर कशा प्रकारे करावा हे त्यांनी दाखवलं. लोखंडी भांड्यात भाज्या शिजवल्याने किंवा साध्या चुन्याचा आमटीत वापर केल्याने कॅल्शियम सहजपणे कसं  मिळवता येतं अशा सोप्या युक्त्यांचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
स्त्रियांवर निसर्गाने टाकलेल्या जबाबदाऱ्यांमुळे एका बाजूने त्यांची अन्नघटकांची गरज वाढलेली असते, तर बदलत्या जीवनपद्धतीत त्यांच्यावर ओढवलेल्या वाढीव जबाबदाऱ्या जसं की अर्थार्जन, त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर घडामोडी, अधिक नैपुण्य मिळवणं, त्यासाठी परीक्षा देणं, चढाओढ धावपळ या सगळ्यामुळे शरीरातही नैसर्गिक आणीबाणी कशी निर्माण होते याचं चित्रण मालतीबाईंनी केलं आहे. अगदी घरात काही जबाबदाऱ्या नसल्या तरी जिद्द म्हणून इतर कार्य करणाऱ्या स्त्रियांनाही या ताणतणावाला तोंड द्यावं लागतं. अशा वेळी शरीरातल्या राखीव साठ्यावर आणीबाणी पार पडली तरी तिचे मानसिक, शारीरिक परिणाम जाणवत रहातात हे निरीक्षण नोंदवून त्या म्हणतात की स्त्रियांनी सर्व वेगळे वेगळे स्वयंपाकाचे प्रकार करण्याऐवजी मिश्र पद्धतीचा स्वयंपाक करणं गरजेचं आहे ज्यातून वेळही वाचेल आणि पोषणही मिळेल.

भाज्या चिरून न धुता धुवून मग चिरणं, त्या शिजतांना सोडा न घालणं, त्या कमी पाण्यात शिजवणं, भाताचं पाणी वेळून काढल्यावर फेकून न देता ते पाणी, भाज्या, मटण, मासे शिजवून उरलेलं पाणी हे सर्व आमटी, सूपमध्ये वापरणं, पदार्थ फार वेळ आणि पुन्हा पुन्हा न तळणं, प्रथिनं असलेले पदार्थ फार न शिजवणं, मिश्र पीठं वापरणं हे दोघींनीही सांगितलं आहे. कोंड्यासकटची धान्यं, वेगवेगळ्या भाज्यांचा पाला (फ्लॉवर, बीट, नवलकोल) मोड काढलेली कडधान्यं, आंबवलेले पदार्थ यांचं महत्त्व दोघींनीही समजावून सांगितलं आहे. या दोघींच्या संशोधनामुळे बायकांच्या आहारातली पोषणमूल्यं, एक स्त्री म्हणून त्यांच्या शरीराला आवश्यक असलेले घटक तर मिळू लागलेच पण या दोघींचं वैशिष्ट्य हे की त्यांनी हे सर्व रोज घरात, आजूबाजूला सहज उपलब्ध असलेल्या वनस्पती, धान्य, कडधान्य यांतून कसं मिळवता येईल हे दाखवून दिलं. इतकंच नव्हे तर सहज करता येण्याजोग्या पाककृतीही सोबत दिल्या. त्या कशा प्रकारे करायच्या, काय काळजी घ्यायची हेही लिहिलं. बाहेरून विकतची उपकरणं आणण्याऐवजी घरातल्या उपलब्ध साहित्यात काही गोष्टी कशा साधता येतात याविषयी कमलाबाईंच्या सूचना वाचण्याजोग्या आहेत. त्याचप्रमाणे अन्नपदार्थांमधील भेसळीची सोप्या साधनांनी घरच्या घरी कशी तपासणी करता येईल हेही त्यांनी सांगितलं. नोकरी करणाऱ्या बायकांकडे वेळ कमीच असतो, पण घरी राहणाऱ्या बायकांनीही बरीच कामं असतात. त्या दृष्टीने फार वेळ न घालवता स्वयंपाक कसा करता येईल, गोड दही कसं लावता येईल, एकाच वेळी दोन्ही वेळच्या पोळ्या करून ठेवून त्या संध्याकाळी वाढतांना गरम आणि नरम राहतील यासाठी काय करायचं, पावाच्या कडा, भाज्यांचे देठ, भाज्यांच्या आणि फळांच्या साली वाया न घालवता काय करता येईल अशा सगळ्या बारीकसारीक सूचना कमलाबाईंनी दिल्या आहेत.

मालतीबाईंनी तर आठवडाभरातली रोजची न्याहारी, सकाळचं जेवण, संध्याकाळचं खाणं, रात्रीचं जेवण या सगळ्याचा पोषणमूल्यासह तक्ताही पुरवला आणि त्यासाठी पाककृतीही दिल्या आहेत.
या दोघींनी पुढल्या पिढीसाठी वाट घालून दिली आणि मग या विषयावर पुष्कळ लिखाण होऊ लागलं. ठिकठिकाणी आहारतज्ज्ञ आणि पोषकतज्ज्ञ यांचा सल्ला घेतला जाऊ लागला.
सुरूवातीच्या काळात मालतीबाईंनी ज्यांच्या आहारविषयक लेखनातून स्फूर्ती घेतली त्या डॉ. विजया साठे यांचाही उल्लेख आवश्यक आहे. विजया साठे यांनी पाश्चात्य वैद्यकाचं शिक्षण घेऊन पूरक-वैद्यकाची वेगळी वाट निवडली. आपलं अन्न ही एक औषधशाळा आहे असं त्या मानतात. अन्नपदार्थ अनेक प्रभावी औषधीगुणयुक्त असतात. आपल्या रोजच्या आहारातून थोड्या थोड्या मात्रेतून या औषधीगुणांचा फायदा आरोग्य टिकवण्यासाठी आणि उपचारांसाठीही होत असतो. हे औषधीगुण ताज्या आणि नैसर्गिक अवस्थेतल्या अन्नघटकात असतात. शुद्धीकरणामुळे आणि शिजवण्याच्या प्रक्रियेमुळे त्यांचं आरोग्यदायित्व कमी होत जातं. ताजे, नैसर्गिक अवस्थेतले अन्नपदार्थ पुरेशा प्रमाणात रोजच्या आहारात समाविष्ट केल्याने आधुनिक जीवनशैलीमुळे आरोग्यावर होणारे आघात कमी करता येतात, अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे हवाबंद डब्यातले, प्रक्रिया केलेले, कृत्रिमरीत्या टिकवलेले पदार्थ रूचिवैचित्र्याच्या सोसातून आणि चंगळवादी वृत्तीतून तयार झालेलं फास्ट फूड टाळण्याचा सल्ला त्यांनी दिलेला आहे.

अर्थात या सर्वांनी स्त्रियांची पारंपरिक भूमिका गृहीत धरली होती. परंतु एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीला झिरो फिगरची महागुरूम्हणून प्रसिद्ध पावलेल्या ऋजुता दिवेकरांनी ती तशी गृहीत धरली नाही. पारंपरिक भूमिकाच नव्हे तर आपल्या शरीरासंबंधातील स्त्रीची पारंपरिक मानसिकताही बदलली पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. आपल्या विमेन अँड द वेट लॉस तमाशा या पुस्तकाच्या सुरूवातीलाच दोन दृश्यं दिली आहेत. स्पिती नदीकाठच्या बलोरी टॉपवर चांगलं पीकपाणी आल्याप्रीत्यर्थ तिथल्या पुरूषांनी लावलेल्या घोड्यांच्या शर्यतीनंतर पिऊन तर्र झालेल्या आपल्या नवऱ्यांना घोड्यावर पाठीमागे बसवून निघालेल्या स्त्रिया हे एक दृश्य तर त्यांच्या होम स्टेमध्ये घरातला पुरूष मोमोज बनवतोय आणि घरातली स्त्री नातीशी बोबडं बोलत ताटं पुसतेय, हे दुसरं दृश्य. त्यांनी पुढे लिहिलंय, या दोन्ही दृश्यांमधून नकळतच मला बोध झाला की स्त्रीचा स्वतःच्या आयुष्यावर ताबा असल्याने तिच्या स्त्रीत्वात उणेपणा येत नाही आणि मग मला झालेला हा बोध या पुस्तकाचा कणा झाला, स्त्रीने कुठलीही गोष्ट दबावाला बळी न पडता विचारपूर्वक करायला हवी. पटत नसलेल्या गोष्टीचा स्वीकार करू नये. मग ते आदर्श वजन किंवा शरीराचे मोजमाप, धार्मिक रितीरिवाज, सामाजिक संकेत असोत; नाहीतर पत्नी-माता-सून-करीअर वूमन अशी चौपदरी भूमिका असो.
त्यांनी सांगितलेली चौसूत्री अशी १. उठल्या उठल्या दहा मिनिटांच्या आत काहीतरी खा, २. दर दोन तासांनी खा, ३. खूप काम असेल तेव्हा जास्त खा आणि काम कमी असेल तेव्हा कमी खा, ४. दिवसातलं शेवटचं खाणं झोपण्यापूर्वी दोन तास आधी घ्या.
याशिवाय पाच मुलभूत नियमही त्यांनी सांगितलेत. १. ताजं अन्न खा, २. आपण जितकं कमी माणसांसाठी शिजवतो तितकी पोषणमूल्य राखली जातात ३. फळं कापून न खाता अख्खी खा. भाज्या आयत्या वेळी चिरून वापरा, फळं किंवा भाज्यांचा रस काढू नका, ४. तुमच्या जनुकांशी प्रामाणिक रहा. लहानपणापासून जे खात आलाय तेच खा आणि ५. ऋतुनुसार उपलब्ध असेल ते खा. उदा. उन्हाळ्यात आंबा.त्यांनी जे सांगितलंय त्यातला काही भाग त्यांच्या पूर्वसुरींनीही सांगितलाय. पण त्या जेव्हा मधुमेहींनीही आंबा, केळी, भात हे  खावं असं सांगतात तेव्हा लोक चमकतात. पण त्यासोबतच त्या रोज नियमित व्यायाम करण्यावर भर देतात हे ध्यानात घेतलं जात नाही. व्यायामाविषयीही त्यांनी सांगितलंय  ६० मिनिटांहून अधिक काळ केलेल्या कुठल्याही व्यायामामुळे स्नायूग्रंथी कमी होतात, त्यामुळे चयापचय मंदावतं. याचा अर्थ चरबी जाळण्याची क्रिया मंदावते. त्यामुळे एका तासापेक्षा जास्त व्यायाम केल्याने व्यायामाचा हेतूच हरवतो.

त्यांची काही निरीक्षणं आणि कारणमीमांसा ध्यानात घ्यायला हवी. त्या म्हणतात हॉस्टेलवर रहाणाऱ्या बायकामुली लगेच ओळखू येतात कारण त्यांना कमी पोषणमूल्यांच्या आहारावर समाधान मानावं लागतं. जास्त उष्मांकांमुळे नाहीतर पोषणमूल्यांच्या कमतरतेमुळे त्यांचं वजन वाढलेलं असतं. एकट्या राहणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीतही हाच प्रकार घडतो. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहातही आपल्या जोडीदाराच्या जीवनशैलीशी जुळवून घेण्याच्या नादात आपल्या जनुकांशी प्रतारणा करून लहानपणापासून आपण जे खाल्ले ते सोडून दिल्यानेही वजनावर आणि आरोग्यावर परिणाम होतो असं त्यांचं निरीक्षण आहे.
अशा प्रकारे स्त्रियांच्या वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावरच्या समस्यांचा विचार करून त्यानुसार पौगंडावस्थेतील मुली, विवाहित तरूण मुली, गरोदर बायका व माता, मेनॉपॉजच्या अवस्थेतील बायका, मेनॉपॉजनंतरच्या स्थितीतील बायका असा सर्वांच्या आरोग्यविषयक विविध समस्यांचा विचार या सर्व आहारतज्ज्ञांनी केला आहे जो बायकांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतोच. पण त्याच्या मानसिक अंगाचा त्यांनी केलेला विचारही तितकाच महत्त्वाचा आहे. बायकांनी स्वत:च्या आहाराची आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे – हा महत्त्वाचा विचार ह्या सगळ्या जणीनी ठामपणाने मांडला. बाईपणाचे भोग असं ज्या त्रासांना म्हटलं जातं – त्यामागची सामाजिक कारणे त्यांनी समोर आणली. महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठीचे व्यावहारिक उपायही सुचवले हा त्यातला समान धागा आहे. आपण सर्वांनी आता ते उपाय अमलात आणायला हवेत!

त्यासाठी एक मराठमोळी पाककृती इथे सुचवाविशी वाटते. पारंपरिक मराठी पाककृतींमधली एक महत्त्वाची ‘वनपॉटमिल’ पाककृती म्हणजे वरणफळं. याच पारंपरिक पाककृतीमध्ये किंचित बदल करून आपण एक पौष्टिक पूर्णान्न तयार करू शकतो.



वरणफळे 

साहित्य 
मसुरीची डाळ १ वाटी, कणकेचे पीठ (तीन व्यक्तींसाठी), आवडीच्या किंवा घरात उपलब्ध होतील त्या भाज्या. उदा. लाल भोपळा, वांगी, भोपळी मिरची, कांदा, बटाटा, टोमटो, गाजर, पालक.
ओले आणि सुके मसाले – हळद, हिरवी मिरची किंवा लाल तिखट, गोडा मसाला, धणे-जिरे आलं पेस्ट, गूळ, कढीपत्ता, कोथिंबीर...
कृती 
सगळ्यात आधी साधारण चार ते सहा पोळ्या होतील एवढं पीठ मळून घ्यावं. मळताना त्यात हळद, थोडं लाल तिखट आणि मीठ घालावं. डाळ कुकरला शिजवून घ्यावी. सगळ्या भाज्या जरा लहान आकारात चिरून घ्याव्या.
आमटी



एक चमचा तेल गरम झाल्यावर त्यात मोहोरी, अख्खं जिरं, हिंग आणि चार मेथी दाणे घालावेत. त्यानंतर फोडणीत भरपूर कढीपत्ता, थोडी आल्याची पेस्ट घालावी. नंतर कांदा नीट परतून घ्यावा आणि टोमॅटो वगळून इतर भाज्या परतून घ्याव्या. (भाज्यांची निवड आणि प्रमाण हे आपल्या आवडीप्रमाणे घेता येईल). भाज्या अर्धवट शिजल्या की त्यात टोमॅटो आणि हळद, लाल तिखट, गोडा मसाला, धणे-जिरे पावडर असे सगळे उरलेले मसाले घालावेत. थोडासा गूळ घालावा. त्यानंतर एकजीव केलेली डाळ घालून आमटी पातळ होईल इतपत पाणी घालावे. एक उकळी काढून घ्यावी.नंतर मळून ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या लाटून, त्याचे शंकरपाळे कापून घ्यावे.ते थोडे थोडे असे अत्यंत काळजीपूर्वक आमटीत सोडावे.(एकमेकांना कणकेचे शंकरपाळे चिकटणार नाहीत याची काळजी घ्यावी) शंकरपाळे शिजले की झाली आपली वन पॉट मिल पाककृती तयार. हा पदार्थ गरमागरम खाण्यास अधिक रूचकर लागतो. वाढताना वरून भरपूर कोथिंबीर, लिंबू पिळून आणि घरगुती तूप घालून वाढावे. भाज्या, डाळी यांच्यात वैविध्य आणून चवीतही बदल करता येईल.

( ही पाककृती डॉ. गौरी कुलकर्णी हिने सुचवली आहे. )



शुभांगी थोरात

शुभांगी निवृत्त बँक अधिकारी आहे. त्या हिंदी, मराठी, इंग्रजी आणि स्पॅनिश ह्या भाषांमधून भाषांतरं आणि त्या बरोबरीनेच कविता आणि ललित लेखन सुद्धा करत आल्या आहेत. त्या 'पुन्हा स्त्री उवाच' च्या सहसंपादक आहेत.

1 Comments

  1. माहितीपुर्ण लेख आहे . आधी वाचलेल्या पुस्तकांतील माहितीला उजाळा मिळाला . मुलं लहान आणी वाढत्या वयात असताना काय खाणं दयाव हे माहित करून घेण्यासाठी या आहारतज्ञांची पुस्तकं वाचली होती बरेच वर्षांपुर्वी . आज त्या ज्ञानाचा पुनःप्रत्यय आला .

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form