“मेल्या पीठ नीट मळ घसरा देऊन”

मी वयाच्या सोळासतराव्या वर्षापर्यंत जुन्नर तालुक्यातल्या तेजेवाडी या अगदी छोट्या खेड्यात वाढलो. अजूनही तिथे एस.टी जात नाही. घरची शेती होती. पण त्यावर कुटुंबाचा गाडा चालवता येत नसे. त्यामुळे वडील मुंबईत नोकरी करीत आणि आई शेती सांभाळीत असे. कुटुंबात मुलगी नव्हती आणि आई शेतकरी. त्यामुळे असेल पण श्रमविभाजनाचे पारंपरिक संस्कार नव्हते. बायकांची अशी जी कामं असतात ती आम्ही करायला हवीत असं आईला वाटे. त्यामुळे विहिरीवरून पाणी शेंदून आणणं, जळणासाठी काट्या तोडणं, सारवणं, झाडून काढणं, कोंबड्या डालणं त्यांची खुराडी साफ करणं अशी सगळी कामं करावी लागत. आई आजारी असतांना स्वयंपाक करावा लागे. तेव्हा आई आम्हाला, “अरे मेल्या असं नाही अस्सं चांगलं घसरा देऊन मळ.” अशा प्रकारे शिकवी.


मग सतराअठराव्या वर्षी शिक्षणासाठी मुंबईत वडीलांसोबत रहायला आलो. सुरूवातीला खानावळीत जेवत असू.
तोवर समुद्रातले मासे खाल्ले नव्हते. ते इथे मालवणी खानावळीत खाऊन आवडायला लागले. पण खानावळीत रोज जेवणं परव़डणारं नव्हतं आणि ते बरंही वाटेना, म्हणून वडील आणि मी घरीच स्वयंपाक करायला लागलो. वडील थोडंफार शिकवीत (ते भरलेलं पापलेट फार छान करीत), अधून मधून रहायला येणारी आईही शिकवीत असे. पण तरीही चुकतमाकत करता करता अधिक शिकलो. वडील सोबत असल्याने श्रमाच्या वाटणीत कटकटीची कामं जसं की भाकरी करणं, भांडी घासणं, पसारा आवरणं हे मला करावं लागे.

लग्नानंतरही कामं करीत होतो. ओवी आणि क्षितिज या दोन्ही मुलांनाही या सगळ्या गोष्टींचे धडे दिले.

आता निवृत्तीनंतर आम्ही कामं वाटून घेऊन करतो (पूर्वीही करीत होतो, पण तेव्हा इतर व्यवधानांमुळे रोज जमेलच असं होत नसे). आता मी चहा करतो, शुभा नाश्ता करते. मी भाकरी किंवा पोळी करतो, शुभा भाजी, आमटी करते. भांडी घासायला बाई येते. पण त्या आमच्या बेगमताई सुट्टीवर असल्या तर भांडी घासतो कारण शुभाला गुडघ्याच्या त्रासामुळे फार उभं रहाता येत नाही. कपडे मशिनमध्ये धुणं, बाहेर काढून वाळत टाकणं ही कामं करतो. आणि हे सगळं रोज करतो.
असं असलं तरी स्वतःसाठी काय किंवा इतरांसाठी काय स्वयंपाक करणं, पसारा आवरणं हे मनापासून आवडत नाही. त्यात माझ्या दृष्टीने सर्जनशील असं काही नाही. अर्थात प्रत्येकाला असं वाटेल असं नाही. उदाहरणार्थ आमच्या दोन्ही मुलांना स्वयंपाक करायला आवडतो. क्षितिजला ते करणं सर्जनशील वाटतं. तसंच ताण कमी करण्यासाठी त्याला स्वैंपाक करायला आवडतो. तो लहानपणीही आवडीने नवे नवे प्रकार करीत असे. जसं की तो आठेक वर्षांचा असतांना पावाच्या चुऱ्यात उकडलेल्या बटाट्याचा कीस, पनीरचा कीस, मीठ, मीरपूड घालून त्याला वेगवेगळे आकार देऊन बाजूने तेल सोडून ते भाजून एक प्रकारचे पॅटीस करीत असे. एकदा त्याला द्राक्षाच्या पानातली कोलंबी करायची होती. तर द्राक्षाची पानं न मिळाल्याने त्याने विड्याची पानं वापरली. असं तो फार आवडीने करतो आणि आता तर एकटा रहात असल्याने त्याला जवळपास रोजच स्वयंपाक करावा लागतो. पण माझं तसं नाही. जात्याच मी फार अव्यवस्थित माणूस आहे. पण अशा अव्यवस्थेत राहता येत नाही. त्यामुळे काम करावं लागतं. त्यामुळे आवड म्हणून नाही तर गरज म्हणून शिकलो आणि गरज म्हणून करतो. सवयीने जमतं. सगळा स्वयंपाक येत नसला तरी पाककृती मिळाली किंवा कुणी सूचना दिल्या तर करू शकतो. शुभाला अपघात झाला होता तेव्हा दोन महिने मी घरातली सगळी कामं करून स्वयंपाक केला होता. पण अन्न बाहेरून आणलं तर मला अधिक आवडेल. कारण शुभाचा आणि माझा बराच वेळ त्यात जातो. पण आपल्याकडे अजून असं रोज बाहेरून अन्न आणणं आरोग्य दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या परवडणारं नाही. स्वच्छता, तेलाचा वापर या गोष्टींमुळे भीतीही वाटते.

शुभा कोकणातली आणि मी देशावरचा. त्यामुळे खाद्यसंस्कृती पूर्णपणे वेगळी. ओलं खोबरं आमच्या स्वयंपाकात अजिबात नसतं. पण तरी आमच्या घरात दोन्ही प्रकारचा स्वयंपाक होतो आणि दोघांनाही आवडतो. मला चपात्या येत असल्या तरी फार चांगल्या जमत नाहीत. त्यात मी आधी पीठ मळतो, मग गोळे करून घेतो. मग त्यात तेल, पीठ घालून ते भरून घेतो. सगळ्या चपात्या आधी लाटून घेतो, मग सगळ्या एकामागोमाग एक करीत भाजून घेतो. मध्यंतरी दोन पाहुणे आले तेव्हा या पद्धतीने केलेल्या चपात्या त्यांनी खाईपर्यंत कडक झाल्या. एकदा मी केलेल्या चपात्या डब्यात होत्या. विद्यापीठाच्या कँटीनमध्ये आमचा मित्र उदय रोटे आणि त्याची पत्नी ज्योती (जी माझी विद्यार्थिनीही आहे) जेवायला बसलो. मी केलेली चपाती ज्योतीला खाऊन बघायला सांगितल्यावर तिची प्रतिक्रिया अशी “तुम्ही ना पीठात पाणी कमी घालता त्यामुळे पोळी खुसखुशीत होत नाही. थोडं पाणी जास्त घालत जा.” (हे शुभाही सांगत असते). आमचे हे विद्यार्थीही स्वयंपाक करतात. शैलेश औटी तर उडदाच्या आमटीसारखे खास माझ्या माहेरचे पदार्थ करून डब्यात घालून आणून देतो दोघांनाही.

भाकरी करणं हाही एक संवेदनशील प्रकार आहे. पाणी कमी झालं तर ती चिरफाळते. जास्त झालं तर मोडते. तवा जास्त गरम होणं, कमी तापणं यावरही भाकरी चांगली होणं अवलंबून असते. बारीकसारीक तपशील ध्यानात ठेवावे लागतात. त्याचा कंटाळा येई. पण आता सवयीने माझी भाकर चांगली होते. माझे विद्यार्थी, आमचे येशू पाटील, नातवंडं खास माझ्या हातची भाकर खायला येतात. आमच्या ओवीलाही मी भाकरी करायला शिकवलंय. मध्यंतरी आमचा नातू सात्त्विक कुलकर्णी रहायला आला होता सुट्टीत. शुभाने दोन दिवस त्याला पुऱ्या, वडे, चपात्या खायला घातल्यावर त्याला म्हटलं, “गड्या आता भाकर खातोस काय माझ्या हातची?” तो हो म्हणाला. भाकरी केली आणि मी काम करीत बसलो. त्याला भाकरी इतकी आवडली की मोठ्ठी भाकरी खाऊन तो म्हणाला की अजून हवी. मग शुभाने भाकर केली. ती त्याने अर्धीही खाल्ली नाही. म्हणाला यापेक्षा आजोबाची भाकरी छान होती. जय हो!




हरिश्चंद्र थोरात
सुप्रसिद्ध समिक्षक आणि संपादक. 
मुंबई विद्यापीठात अनेक वर्षे मराठीचे अध्यापन केल्यावर निवृत्त झाले आहेत. विविध प्रकल्पांना मार्गदर्शन आणि लेखन तसेच संपादनाचे काम सातत्याने सुरू असते. 




5 Comments

  1. थोराट सर भाकरी एक्सपर्ट भी हैं?

    ReplyDelete
  2. उन्हें भाकरी बनाते देखना सुखकर है।

    ReplyDelete
  3. गोल गरगरीत भाकरीच प्रात्यक्षिक आणि सोबत गप्पा टप्पा मारणारा लेख पोट भरल की. सिद्धहस्त ही उपाधी पुरेपूर लागू पडते. भाकरीचा गरमागरम सुगंध मनात रुंजी घालतो.

    ReplyDelete
  4. भारी!
    मला ते काठवट फारच आवडलं.
    मजा आली वाचायला आणि बघायला

    ReplyDelete
  5. मला काठवत बघायला मजा आली। इतके दिवस तो शब्दकोड्यातला शब्द होता।

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form