संपादकीय

“पुन्हा स्त्री उवाच” चा हा तिसरा अंक!

खरंतर 16 सप्टेंबरला हा अंक प्रकाशित करायचा असं आम्ही ठरवलं होतं. पण अनेक तांत्रिक अडचणी सोडवता सोडवता अंकाच्या प्रकाशनाला उशीर झाला आहे. सगळे अडथळे पार करून हा अंक वाचकांच्या समोर ठेवताना आम्हाला खूपच समाधान वाटतं आहे!

पहिल्या दोन अंकांच्या तुलनेत ताजा अंक काही बाबतीत वेगळा आहे. मार्चमध्ये प्रकाशित केलेल्या पहिल्या अंकात आम्ही सध्याच्या काळात स्त्रीयांसमोर असलेल्या वेगवेगळ्या आव्हानांचा वेध घेणारे ताज्या दमाच्या स्त्रीवादी लेखकांचे लेख प्रकाशित केले होते. दुसर्‍या अंकात देशविदेशातल्या घडामोडींविषयीचे स्त्रीवादी दृष्टिकोनातून विश्लेषण करणार्‍या लेखांसोबत ‘पर्यावरण आणि स्त्रीवाद’ ह्या विषयावरच्या काही लेखांचा समावेश केला होता. पण ह्या वेळी संपूर्ण अंक “खाद्यसंस्कृती आणि स्त्रीवाद” अशा एकाच सूत्रावर आधारलेला आहे.

महाराष्ट्रातली खाद्यसंस्कृती, जागतिक खाद्यसंस्कृती असे शब्दप्रयोग आपण अनेकदा ऐकतो . अनेक नियतकालिके वर्षातून एकदा तरी अन्नपदार्थांच्या सुंदर रंगीत छायाचित्रांनी नटलेले विशेषांक प्रकाशित करतात. त्याचसोबत अनेक लोक फूडब्लॉग्ज लिहतात किंवा यूट्यूब चॅनेल्स चालवतात – तरीही या सर्वांमधून खाद्यसंस्कृतीत असलेल्या लिंगभावा बद्दलचा विचार मात्र मांडला जाताना फारसा दिसत नाही! म्हणूनच स्त्रीवादी दृष्टिकोनातून खाद्यसंस्कृतीचा विचार मांडायची गरज आम्हाला वाटली. अंकाचे नियोजन करताना या विषयाचे अधिकाधिक पैलू आमच्यासमोर येत गेले आणि त्या दृष्टीने विविध बाजूंनी विषयाचा वेध घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे.

अंकाची जुळवाजुळव सुरू केली तेव्हा आमच्या मनात संभ्रम होता की पूर्ण अंक तयार करण्याइतके ह्या एकाच संकल्पनेवर आधारलेले साहित्य मिळू शकेल का? पण जसजशी ही कल्पना वेगवेगळ्या लेखकांच्या समोर मांडायला सुरुवात केली तसतसा सगळ्यांकडून खूपच सकारात्मक प्रतिसाद येत गेला. काहीनी तर आपापल्या मित्रमैत्रिणींना देखील अंकात लिहायची विनंती केली. अंकातील सगळे लेखच नव्हे तर कविता आणि व्यंगचित्रे देखील याच संकल्पनेशी जोडलेले आहेत. शुभा खांडेकर यांनी अंकाच्या विषयाला अनुरूप नवीन व्यंगचित्र देखील काढली आणि काही पूर्वप्रकाशित व्यंगचित्रांचा उपयोग करण्याची देखील परवानगी दिली.

खाद्यसंस्कृतीमध्ये असलेल्या अनेक लिंगभावात्मक पूर्वग्रहांची(Gender Bias) एक झलक मोहसिना मुकादम यांच्या मुलाखतीतून वाचायला मिळेल. या भेदभावाची ऐतिहासिक कारणे समजून घेतानाच ही विषमता दूर करण्यासाठी कोणते उपाययोजना करायला हवी त्याचाही अंदाज येईल.

स्त्रीयांनी शेतीचा शोध लावलेला असला तरी अजूनही स्त्रीयांना 'शेतकरी' म्हणून दर्जा मिळत नाही. शेतकरी स्त्रीयांचे डावलले जाणारे हक्क आणि त्यांचा संघर्ष ह्याबद्दल आपल्याला सीमा कुलकर्णी यांच्या लेखातून माहिती मिळेल.

आदिवासी खाद्यसंस्कृतीवर नागरी जीवनाचा प्रभाव पडल्यामुळे स्त्रियांवर होणार्‍या परिणामा विषयी अनीता पगारे यांच्या लेखातून लक्षात येईल.श्रीरंग भागवत यांच्या ललित लेखात आफ्रिकन खाद्यसंस्कृती आणि आफ्रिकन स्त्रीजीवनाचे अनोखे दर्शन घडेल.

भारतीय संस्कृतीत स्त्रीला -अन्नपूर्णा - म्हटले जाते ; पण तरीही आपल्या देशातील ५० टक्क्यांहून अधिक महिला रक्तपांढरीने ग्रासलेल्या असतात. मुग्धा कर्णिक आणि नंदिनी आत्मसिद्ध यांच्या लेखातून भारतीय स्त्रीयांचा अन्नाबरोबर असलेल्या नातेसंबंधाचा उलगडा होईल.

पाककौशल्याचा उपयोग करून स्वत:च्या कुटुंबासाठी अर्थार्जन करणार्‍या गिरणगावातल्या महिलांची ओळख सुचित्रा सुर्वे आणि ऋतुजा सावंत यांच्या लेखातून होईल. संयोगीता ढमढेरेच्या लेखातून वैयक्तिक स्वयंपाकघराचा उंबरठा ओलांडून इंटरनेटच्या विश्वात स्वत:ची ओळख निर्माण करणार्‍या स्त्रियांचा प्रवास पाहता येईल.

अपंगत्वावर मात करून स्वयंपाकाचा आनंद मिळवण्याचे अनुजा संखे आणि सोनाली नवांगुळ यांचे अनुभव सर्वांनाच प्रेरणादायक ठरतील.

'रसोईतल्या सोयी' ह्या लेखात आर्किटेक्ट श्रीकांत चव्हाण यांनी स्वयंपाकघराच्या रचनेत होत गेलेल्या बदलांचा आढावा घेतलेला आहे.

प्रसारमाध्यमांतून अनेकदा स्त्रीच्या पारंपरिक भूमिकांचे गौरवीकरण केलेले असते. टिव्हीवरचे अनेक कार्यक्रम पाहताना किंवा खासकरून जाहिराती पहाताना ही त्रुटी नेहमीच जाणवते. पण दिग्दर्शक वरुण नार्वेकरने मात्र ह्या परंपरेला छेद देऊन खाद्यपदार्थांच्या जाहिरातींमधून समतेचा विचार मांडलेला दिसतो. म्हणून त्याची मुलाखत आम्ही समाविष्ट केलेली आहे.

स्वयंपाक करणे ही स्त्रीत्वाची ओळख बनू नये असे स्त्रीवाद मानतो. जगभरातल्या सगळ्याच समाजांमध्ये स्वयंपाकाची जबाबदारी स्त्रीयांवरच ढकललेली असली तरी अनेक स्त्रियांना ही सक्ती नकोशी वाटते. त्याचप्रमाणे पुरुषांनी घरात स्वयंपाकाचे काम करण्याला समाजाची मान्यता नसली तरीदेखील अनेक पुरूषांनाही पाककलेत रस असू शकतो - हे अंकातल्या अनेक लेखातून आणि मुलाखतींमधून दिसून येईल. स्वयंपाका विषयीच्या आवडीची आणि नावडीची कारणे व्यक्तीगणिक किती वेगवेगळी असतात - हे समजून घेताना आपल्या मनात नक्कीच स्वत:विषयी प्रश्न उभे राहतील.

सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत आणि त्याचसोबत निवडणुकांचे पडघम वाजत आहेत. तेव्हा एका बाजूला मजेदार खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत असताना दुसरीकडे खाद्यसंस्कृतीच्या माध्यमातून वर्षानुवर्षे खेळल्या जाणार्‍या राजकारणाची सुद्धा आठवण ठेवूया! समाजातली विषमता नाहीशी करण्यासाठी समतेच्या दिशेने पावले टाकण्यासाठी ह्या अंकातला वैचारिक खुराक सर्वांना शक्ती देईल - अशी आम्हाला आशा वाटते.

 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form